My Blog List

Sunday 9 December 2018

         ९ डिसेंबर महाराणी ताराराणी स्मृतिदिन विशेष



                         मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द

पारतंत्र्यातुन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळवलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अशा दोन्ही वेळी ‘स्वातंत्र्ययुद्ध’ खेळावे लागते. दोन्हीही युद्धात असंख्य नरवीरांच्या प्राणांची आहुती पडते. तेव्हा कुठे स्वातंत्र्यदेवता प्रसन्न होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना १६८१ ते १७०७ या २६ वर्षाच्या कालखंडाला अनन्य साधारण महत्व आहे. या प्रदीर्घ कालखंडात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी मराठ्यांनी मोगलांच्या विरुद्ध जो तीव्र लढा दिला त्यालाच ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ संबोधले जाते.

छत्रपती शिवरायांनी आदिलशाह, कुतुबशाह, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी या परकीय सत्तांबरोबरच स्वकीय वतदारांशीही लढून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. स्वतः राज्यभिषेक करवून घेऊन मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची घोषणा केली. यादवांच्या पाडावानंतर तीन शतकांपासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात सत्व-स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवीले. आपण लढूही शकतो आणि जिंकूही शकतो हा आत्मविश्वास सामान्यांच्या मनात निर्माण केला.
मराठयांच्या राज्यनिर्मितीनंतर मोगल सम्राट औरंगजेब याच्याशी कधीना कधी सामना करावा लागणार व तोच स्वराज्याचा मुख्य शत्रू आहे याची जाणीव शिवरायांना फार पूर्वीच झालेली होती. औरंगजेबाच्या बंदोबस्तासाठी त्यांची लष्करी योजनाही चालू होती. दक्षिण दिग्विजय हा त्या योजनेचाच एक भाग होता. औरंगजेब जर महाराष्ट्रावर घसरला तर आणीबाणीच्या वेळेस राजधानी दक्षिणेकडे हलवता येईल ही दूरदृष्टी त्यामध्ये होती. 
शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्या अफाट लष्करी सामर्थ्यानिशी, अगणित खजिन्यासह मराठ्यांची सत्ता समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने दक्षिणेत उतरला आणि इतिहास प्रसिद्ध ‘मराठयांच्या स्वातंत्र्ययुद्धाची’ सुरवात झाली. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले, झटले, झगडले. औरंगजेब हा अनुभव संपन्न, चाणाक्ष, शक्तिशाली, आणि कसलेला सेनानी होता, त्याचप्रमाणे धुर्त राजकारणपटूही होता. असे असूनही त्याला अगदी मराठ्यांच्या नवख्या राज्यापुढे, अननुभवी नेतृत्वापुढे गुडघे टेकावे लागले. मराठ्यांनी औरंगजेबास पुन्हा दिल्लीदर्शन होऊ दिले नाही. त्याला याच मराठी मातीत दफन होण्यास भाग पाडले. एकेका वर्षात आदिलशाही, कुतुबशाही जिंकणाऱ्या व हा हा म्हणता मराठ्यांना बुडवू म्हणणाऱ्या औरंगजेबास महाराष्ट्रातच चिरनिद्रा घ्यावी लागली. 

छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वकीयांचा झालेला विरोध मोडून संभाजीराजे छत्रपती झाले. सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज यांना जरब बसवून त्यांनी औरंगजेबाला आपला मोर्चा आदिलशाही, कुतुबशाहीकडे वळवायला भाग पाडले. १६८० ते १६८९ या नऊ वर्षात स्वराज्य रक्षणासाठी व स्वराज्याच्या वाढीसाठी अथक परिश्रम व संघर्ष केला. मराठयांच्या दुर्दैवाने १६८९ साली आपल्यातीलच काही फितुरांमुळे संभाजीराजे पकडले गेले आणि औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याला मराठे संपले असं वाटलं असेल तर नवल नाही. परंतु संभाजीराजेंची हत्या ही औरंगजेबाची सर्वात मोठी राजकीय चूक ठरली. छत्रपतींच्या हत्येच्या अपमानाने अवघा महाराष्ट्र पेठून उठला. गवतालाही भाले फुटले. सामान्य रयत स्वातंत्र्यरक्षणासाठी उभी ठाकली. संभाजीराज्यांच्या हत्येनेनंतर येसूबाई यांनी पुत्रप्रेम बाजूला ठेऊन आपल्या दिराला (राजाराम महाराज) छत्रपती म्हणून मान्यता दिली. त्यांना जिंजीकडे जायला सांगून स्वतः रायगडी थांबल्या. काही दिवसात रायगड मोगलांच्या हाती आला. बाल शाहू, येसूबाई यांना कैद झाली. राजाराम महाराजांनी अतिशय दिव्य संकटांचा सामना करून जिंजी गाठली. महाराष्ट्रातील कारभाऱ्याना छत्रपतींचे अधिकार देऊन जिंजीत राजधानी स्थापली. छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनेनंतर पहिल्या सहा महिन्यात स्वराज्याचा जवळपास सर्व भाग औरंगजेबाने ताब्यात घेतला परंतु हे यश औरंगजेबाला पचू न देता मराठ्यांनी पुढील सहा महिन्यात मोगलांनी जिंकलेले जवळपास सर्व किल्ले व जिंकलेला भूभाग पुन्हा स्वराज्यात आणला. संताजी-धनाजीं या सेनापतींनी पराक्रमाची शर्थ केली. औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या छावणीच्या कळस कापून नेला त्यावेळी औरंगजेबही थोडक्यात बचावला. मराठ्यांच्या ज्वाज्वल्य पराक्रमाने स्वराज्याचा मामला असा थाटात चालला असताना. राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात वितुष्ट येऊन छत्रपती व सेनापती यांच्यातच युद्ध होणे, छत्रपतींचा पराभव होणे, संताजी-धनाजी या सेनापतींचा दुर्दैवी संघर्ष, संताजी घोरपडेना सेनापती पदावरून हटवले जाणे. फंदफितुरीमुळे संताजी घोरपडयांचा खून होणे. इत्यादी घटना मराठ्यांच्या शोकांतिकेच्या साक्ष देतात. अशा सर्व धामुधुमीच्या काळातच राजाराम महाराजांचे निधन झाले. ऐन तारुण्यात वैधव्य आणि औरंगजेबसारखा कसलेल्या शत्रू या दोन्ही संकटांचा सामना महाराणी ताराबाईंनी केला. महाराणी ताराबाईंनी अतिशय आक्रमकता दाखवत मराठी सैन्याला नर्मदा पार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मराठ्यांनी बंगालच्या सुभ्याला धडक दिली. औरंगजेबाशी त्यांनी एकच निर्णायक लढाई न देता‚ त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमीकाव्याचे युद्ध चालविले आणि शेवटी त्यास अगतिक करून टाकले.
^^मराठ्यांची अस्मिता व स्वातंत्र्यता ताराबाईंच्या रूपाने प्रकटली होती. तत्कालीन कवी देवदत्त याने ताराबाईंना ‘भद्राकाली_भवानी’ असे संबोधले असून तिने खुद्द दिल्लीशहाचे ‘पाणी’ राखले नाही‚ असे म्हटले आहे. ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना तो म्हणतो −
 ‘दिल्ली झाली दीनवाणी 
दिल्लीशाचे गेले पाणी 
ताराबाई रामराणी 
भद्रकाली कोपली ॥ 
ताराबाईंच्या बखतें 
दिल्लीपतीची तखते 
खचो लागली ते विभतें 
कुराणें ही खंडली ॥ 
वजीरांस झोडि जे ते 
मुगलांस तोडि जे ते 
मशीदीस फोडि जे ते 
म्लेंच्छ कुले दंडिली ॥ 
उमराव दस्त झाले 
देव द्विजा बकसिले 
दिगंती ती कीर्ति चाले 
यशें जगे मांडिली ॥ 
ज्या नगरी सुखें नाचे 
हर दिल्लीशावरि 
कहर होता रामराणीची 
नजर जहराची लहरी ॥ 
असी धिंग रामराणी 
नाचतसे वैभवानी 
मूर्तिमंत हे भवानी 
जगी अवतरली ॥ 
मानहानी दिल्लींद्राची 
सभा हासते इंद्राची 
आजिकाल कवींद्राची 
सर्व चिंता हारली ॥ 
निरंतर चाल केली 
पातशाही तळा नेली 
दिल्लीचीही लज्जा गेली 
म्लेंच्छ गवण गळाला ॥ 
रामराणी भद्रकाली 
रणरंगी क्रुद्ध झाली 
प्रलयाची वेळ आली 
मुघल हो सांभाळा ॥ 
देवदत्त म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच दिल्लीच्या मोगल सिंहासनाची लाज गेली होती. त्याची अप्रतिष्ठा झाली होती. मोगलांच्या दृष्टीने हा प्रलयकालच होता. या प्रलयकालात मोगल साम्राज्याची इभ्रत बुडत चालली होती आणि खुद्द मोगल साम्राज्याच्या भव्य इमारतीवर या प्रलयाच्या लाटा धडका मारू लागल्या होत्या.^^
ज्या महाराष्ट्रास गुलाम करण्यास औरंगजेब धावून आला होता‚ त्याच महाराष्ट्रातील मराठ्यांनी त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले.‚ इतिहाससातील हा मराठयांचा दैदिप्यमान विजय आहे. छत्रपती संभाजी‚ छत्रपती राजाराम‚ महाराणी ताराबाई आणि स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केलेले असंख्य मराठे वीर या महान विजयाचे मानकरी आहेत.

आज ९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिस 
#विनम्र_अभिवादन

@संदिप रामचंद्र चव्हाण
(वरील माहितीपर लेख लिहण्यासाठी ‘मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध… लेखक डॉ. जयसिंगराव पवार’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे)

संदर्भ:^^मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध… डॉ. जयसिंगराव पवार