My Blog List

Saturday 30 November 2019

भय इथले संपत नाही..
महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा महिनाभर चाललेला गोंधळ आणि राजकिय नेत्यांच्या 'सत्तेतसाठी सर्वकाही' या असंवेदनशील भूमिकेने, संवेदनशील माणसाच्या मनात राजकारणी नेत्यांबद्दल आणि राजकीय पक्षांबद्दल आत्यंतिक चीड निर्माण झालेली असतानाच हैद्राबादमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दिशा (नाव बदलले आहे) या तरुणीवर काही नराधमांनी सामुहीक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तेलंगण पोलिसानी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवार दि २७ नोव्हेंबरच्या रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला. हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला. 
घडलेली ही घटना खूपच धक्कादायक, संतापजनक आणि हृदयद्रावक आहे.

स्त्री आपला अभिमान आहे, आपला सन्मान आहे, आपली जननी आहे असं मानणाऱ्या भारत देशात बलात्कार ही घटना तशी नवीन राहिलेली नाही. कुपोषण, गरिबी, बेरोजगारी याबाबतीतील समस्या संपवण्यात आपण इतर देशांच्या तुलनेत पाठीमागे राहिलो असलो तरी जगभरात स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या आकडेवारीत मात्र भारताचा नंबर खूप वरती लागतो. देशात दररोज सरासरी तब्बल १०६ महिलांवर बलात्कार होतात अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) अहवाल २०१६ ने दिली आहे. २०१६ या वर्षी भारतात वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांवर एकूण ३८,९४७ बलात्कार झाले. यामध्ये २१६७ गँगरेप (सामूहिक बलात्कार ) झाले. ही सर्व अधिकृतपणे नोंद झालेल्या बलात्कारांची आकडेवारी आहे. ज्याची नोंदच झाली नाही, जे अत्याचार मूकपणे सोसले गेले, दडपशाही करून दाबून टाकले गेले, ज्यांचा आवाज पोलीसस्टेशनपर्यंत पोचलाच नाही अशी संख्याही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडचे ताजे आकडे याहूनही भयानक असू शकतात. 

दिल्लीमधील निर्भया असो, कोपर्डीची छकुली असो की हैदराबादची दिशा असो, माध्यमातून बातम्या येतात, श्रद्धांजलीचे बोर्ड झळकतात, सोशलमीडियावर दुःख व्यक्त केले जाते, आरोपीचा धर्म कोणता किंवा अत्याचार झालेल्या मुलीची जात कोणती यावरून राजकीय फायद्याची गणिते जुळवण्यासाठी काही नेते आणि काही संघटना पुढे येतात, काही ठिकाणी कँडल मार्च निघतात तर काहींच्या नशिबी फक्त वर्तमानपत्रातील एक किरकोळ बातमी येते. घटनेला काही दिवस होतात, महिने उलटतात आणि पुन्हा अशाच किंबहुना अधिक धक्कादायक गोष्टीसाठी आपण सिद्ध होतो. हे दुर्भाग्यपूर्ण सामाजिक वास्तव आपणाला कोठे घेऊन जाणार आहे याची कल्पनाही भयावह वाटते. समाजात वाढणारी 'मला काय त्याचे' ही वृत्ती गुन्हेगारांना अप्रत्यक्षपणे मदत करणारी ठरत आहे.

 २१ व्या शतकातही भारतातील मोठ्या शहरात स्त्री सुरक्षित नसेल तर मग आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारणे थांबवायला हवे. सत्तास्वार्थासाठी जिथे रात्रंदिवस नेते, अधिकारी, सरकारी यंत्रणा सक्रिय राहतात तिथे मात्र सामान्यांच्या प्रश्नांवर जलदगतीने निर्णय होत नाहीत. पोलिसात तक्रार द्यायला गेलेल्या पीडित तरुणीला प्रश्न विचारून विचारून भांबावून सोडले जाते. कोण्या मोठ्या आसामीबद्दल तक्रार असेल तर तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस वेळकाढूपणा करतात. (पहा ऑगस्ट २०१५ मधील औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णी आत्महत्या.) FIR ची प्रक्रिया पूर्ण होऊन केस कोर्टात उभी राहिली तरी 'तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख' या अजब प्रकाराने आधीच मानसिक, शारीरिक, सामाजिक खच्चीकरण झालेल्या पीडिताला न्याय मिळण्यास उशीर होतो.. बऱ्याच वेळा तो मिळतच नाही. 

बलात्कारी व्यक्तीला अतिकठोर शिक्षा हवी व तशी समाजाची मागणीही आहे. परंतु या शिक्षेच्या भीतीतून आरोपी पीडित व्यक्तीला जिवंत मारण्याचे प्रमाण वाढेल याची भीतीही वाढते. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असायला हवीच पण त्याहून महत्वाचे म्हणजे आरोपींना शिक्षा होणारच ही हमी वाढायला हवी. आम्ही काहीही केलं तर जामिनावर किंवा निर्दोष सुटू ही कायद्याला खिजगणतीतही न धरणारी भावना वाढली असल्याने कायद्याचे भय उरलेले नाही. गावगुंड गुन्हे करून निसटात, चित्रपटातील अभिनेते आपल्या गाडीखाली सामन्यांना चिरडून पुन्हा सेलिब्रिटी जीवन जगतात, राजकारणी/शासकीय अधिकारी मोठमोठाले घोटाळे करून उजळ माथ्याने फिरतात, कायद्याच्या नाकावर टिच्चून निवडणुका लढवून निवडूनही येतात आणि तेच पुन्हा कायदे बनवतात. अशा घटनांमधून गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, हा संदेश समाजात झिरपतो. त्यामुळे गुन्हा करण्याची मानसिकता असणाऱ्यांचे धाडस वाढते. ‘मी कुठल्याही गुन्ह्यातून सुटू शकेन’ असा विश्वास बळावतो आणि मग होतात बलात्कार..!!

यावर उपाय म्हणजे गुन्हेगारांना शासन आणि पीडिताला न्याय मिळेल अशी देशभर जलदगती न्यायालयीन यंत्रणा उभी रहायला हवी. अशा गुन्ह्यातील तक्रार नोंदवताना पोलीस यंत्रणेबद्दल पीडिताच्या निकटवर्तीयांना आणि पीडिताला विश्वास वाटणारे वातावरण निर्माण व्हायला हवे. अगदी लहान वयापासून मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे व्यावसायिक (प्रोफेशनल) पद्धतीने धडे मिळतील अशी व्यवस्था हवी. प्रत्येक शाळेत जुडो-कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी याचे प्रशिक्षण देणारा विशेष प्रशिक्षित स्टाफ असलायला हवा. शाळेतून लैंगिक शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी. बलात्कार पीडित व्यक्तीकडे समाजाने गुन्हेगार म्हणून न पाहता सन्मानाने वागवायला हवे. पीडित व्यक्तीला तिच्या घरातून, मित्र-मैत्रिणीकडून 'आम्ही तुझ्या सोबत आहोत ' हा विश्वास मिळलायला हवा. त्याचबरोबर महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवानगा सहज मिळायला हवा. समाजातून संस्कारशील पिढी घडावी म्हणून प्रत्येक जाती-धर्मातील विचारवंतांनी पुढाकार घ्यायला हवा. बलात्काराच्या समस्येवरील उपाययोजनेत पुढाकार घेण्यासाठी सामान्य लोकांचा लोकप्रिनिधींवर दबाव हवा. बलात्काराची ही कीड कमी करण्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने त्यामध्ये खारीचा वाटा उचलायला हवा… कारण आग शेजारी लागलेली आहे ती कधीही आपल्यापर्यंत पोचू शकते…ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी..!!

~संदीप रामचंद्र चव्हाण

#ताजा_कलम.. 
महाराष्ट्रातील नवीन सरकारने विधिमंडळात आजच विश्वासदर्शक ठराव जिंकला…आशा करूया हे सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना राबवून जनतेचा विश्वास जिंकेल!!