My Blog List

Friday 11 September 2020

पक्षीमित्र

 सालीम अली



"मत्यूनंतर तुम्हाला विस्मृत व्हायचं नसेल तर वाचण्यासारखं काही लिहा किंवा तुमच्यावर काही लिहावं असं करून दाखवा." बेंजामिन फ्रॅंकलिनने सांगीतलेल्या या दोन्ही गोष्टी ज्यांनी सत्यात उतरवल्या अशी अनेक श्रेष्ठ माणसं आपल्या भारत देशात होऊन गेली. सालीम अली त्यापैकीच एक.. नव्हे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातील ते एकमेवाद्वितीय!

ज्या अभ्यासाला समाजात स्थान नाही, प्रतिष्ठा नाही, लौकिकदृष्ट्या जो मार्ग चाकोरीबाहेरचा आहे अशा पक्षीनिरीक्षणशास्त्राचा त्यांनी साठ वर्षे ध्यास घेतला. संशोधन केले. निरीक्षणे नोंदवली. त्यावर शेकडो लेख आणि कित्येक पुस्तके लिहली. त्यांनी भारतात एका नव्या अभ्यास शाखेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' म्हणून संबोधले जाते. 

सालीम अलींना बालपणापासूनच विविध पक्षांच्या निरीक्षणाचा आणि शिकारीचा छंद होता. त्यांना भेट मिळालेल्या बंदुकीने पक्षी टिपण्यात ते पटाईत होते. पक्ष्यांची शिकार करता करता पक्षांच्या जीवनशैलीचा, अभ्यासाचा ध्यास त्यांनी घेतला. १९४३ मध्ये 'द बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकासह त्यांनी लिहलेली इतर अनेक पुस्तके पक्षीप्रेमी-पक्षीअभ्यासक यांच्यासाठी लाखमोलाची ठेव आहे. पक्ष्यांवर प्रेम करताना कृषिप्रधान देशात शेती आणि मानवी जीवनात पक्ष्यांचे अर्थशास्त्रीय आणि महत्वपूर्ण स्थान त्यांनी ओळखले. शेतकऱ्यांचे खरे शत्रू कीटक आहेत पक्षी नव्हेत असं स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडले. निसर्गातील सजीव साखळीतील पक्षी हा मुख्य घटक आहे, जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगले पाहिजेत असं ते स्पष्टपणे सांगत असत.

सालीम अलींचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ आणि मृत्यु  २० जून १९८६ रोजी झाला. ९१ वर्ष निरोगी आयुष्य लाभलेल्या सालीम अलींच्या पत्नी मात्र १९३९ साली तारुण्यातच निर्वातल्या… सालीम अलींचे घरटे जणू उन्मळून पडले. सावलीसारखी नेहमी पाठीशी असणारी पत्नी गेली, मुलबाळ नाही त्यामुळे त्यांचं जगणं नीरस बनले. काही दिवस नैराश्यानेही त्यांना घेरले. मात्र अल्पावधीतच त्यांनी या नैराश्यावर मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. या दुःखद घटनेनंतर जवळपास चार दशके त्यांनी पक्षीनिरीक्षण, संशोधन, जंगल भ्रमंती आणि पुस्तके या गोष्टींनाच आपला संसार मानला. 

शालेय जीवनात साधारण विद्यार्थी, गणिताची परिस्थिती चिंताजनक, वडीलढाऱ्यांच्या सल्ल्यानुसार दादर कॉलेजमध्ये कमर्शिल लॉ आणि अकौंटन्सी शिकणारा विद्यार्थी पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला कसा आला आणि जगभरात ख्याती कसा पावला हे समजून घ्यायचे असेल तर सालीम अलींची साठ वर्षाची तपश्चर्या आपल्याला अभ्यासावी लागेल. सालीम अलींना सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र, पक्षीशास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु या शाखेतील काही विषय त्यांना अवघड वाटले त्यामुळे या कॉलेजचे नियमित विद्यार्थी ते होऊ शकले नाहीत. नंतर इथेच त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची अनुमती मिळाली. (म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक जिज्ञासू विद्यार्थी म्हणून) पक्षीविज्ञानशास्त्रातील भीष्म पितामह होण्यासाठी त्यांना कोणत्याही डिग्रीची आणि त्या शाखेतील नियमित विद्यार्थी होण्याची आवश्यकता भासली नाही. त्याकाळची पक्षीनिरीक्षण आणि अभ्यास करण्याची पद्धत मोडून काढून त्यांनी स्वतः नवीन पद्धती अवलंबल्या. इंग्रजांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. अनेक दिग्गज्यांच्या चुकीच्या निष्कर्षांना संशोधन आणि पुराव्यानिशी खोडून काढले. आणि हे घडले कारण त्यांनी यासंदर्भात स्वतःचं सर्वस्व झोकून काम केले. कामालाच ईश्वर आणि अल्ला मानले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि इतर शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले. सरकार दरबारी मोठा दबदबा वाढला. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली, आवृत्यावर आवृत्त्या छापल्या गेल्या... परंतु सालीम अलींचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. ते नेहमी साधेपणाने.. कोणत्याही डामडौलाविना अगदी सामान्य व्यक्तिप्रमाणे वावरले. आज अशी ऋषितुल्य माणसं खूप अपवादात्मक हयात असतील. एखाद्या ध्येयासाठी जीवन समर्पित करणारेही विरळच!

 पक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या डॉ.सालिम अली यांची जयंती 'पक्षी दिन' म्हणून साजरी केली जाते. या

निसर्गाच्या हानीसोबतच अनेक पक्षी जातींचे नामशेष होणे ही आज चिंतेची बाब बनली आहे. अशा वेळी आपल्याला सालीम अलींची उणीव निश्चितच जाणवते.

Sandip R Chavan


संदर्भ: 

सालिम अली- वीणा गवाणकर (मराठी पुस्तक)

विकिपीडिया

गुगलवरती सालीम अली यांच्यासंदर्भात उपलब्ध असणारे वेगवेगळे लेख.

Thursday 20 February 2020

सेक्स गुलाम ते नोबेलची मानकरी

कल्पनातीत अन्याय-अत्याचार सोसूनही खचून न जाता त्या अत्याचाराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या एका तरुणीची ही कहाणी आहे.. द लास्ट गर्ल.. नादिया_मुराद!!

इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर इराकमधील सुन्नी गटाच्या अबू-बखर-अल-बगदादीने (जो नुकताच मारला गेला) 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (आयसिस) या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. आयसीसीने इराक मधील मोठे तेल क्षेत्र ताब्यात घेऊन तेल आणि खंडणीवसुलीतून भरपूर पैसा आणि शस्त्र मिळवली. त्या जोरावर त्यांनी आतांकी दहशत माजवून संपूर्ण इराकमध्ये खलिफाची राजवट आणण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाच्या आड येणाऱ्यांचा क्रूरपणे खात्मा करण्याचा त्यांनी सपाटा लावला. २०१४ मध्ये इराकमधील मोसुल प्रांतातील त्यांच्या दृष्टीने 'काफिर' असणाऱ्या आणि कोणताही धर्मग्रंथ नसणाऱ्या 'यजीदींना' त्यांनी लक्ष बनवले आणि २०१४/१५ दरम्यान खूप मोठ्या संख्येने यजीदींचा नरसंहार घडवला. [त्याच काळात आयसिसने इराकमधील ३९ भारतीय बांधकाम मजुरांना बंदी बनवून ठार मारले होते.]

जागतिक महासत्तांचे तेलाचे राजकारण, त्यांची शस्त्रस्पर्धा, दहशतवाद्यांना मिळणारे वेगवेगळ्या देशांचे छुपे किंवा उघड पाठबळ, दहशतवादी संघटनांची टोकाची धार्मिक कट्टरता, धर्माच्या नावाने त्यांनी चालवलेला नंगानाच इत्यादी जागतिक समस्या बनलेल्या अनेक गोष्टी सामान्यांच्या आयुष्याची कशी धूळधाण उडवतात याचे बोलके उदाहरण म्हणजे इराकमधील यजीदींचे झालेले हत्याकांड होय.

I want to be the last girl in the world with a story like mine. अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावी..२०१८ च्या शांतता नोबेल पुरस्काराची मानकरी नादिया मुराद हिच्या आत्मकथेतील हे शेवटचे वाक्य आहे.
 नादिया मुराद ही इराकमधील सर्वसामान्य यजीदी कुटुंबातील २१ वर्षाची तरुणी. मोठा कुटूंबकबिला आणि बेताचे उत्पन्न तरीही आनंदीत असणाऱ्या या कुटुंबावर आणि त्यांच्या 'कोचो' गावावर  २०१४ साली आयसिसची वक्रदृष्टी पडली. आयसिसने नादीयाच्या गावातील सगळ्या रहिवाशांना एका शाळेत नेऊन त्यांची पुरुष, लहान मुले, विवाहित तरुणी, अविवाहित तरुणी, वयस्कर स्त्रिया अशी विभागणी केली. सर्वच्या सर्व पुरुषांना आणि वयस्कर स्त्रियांना एकाचवेळी ठार मारून सामूहिक कबरीत त्यांचे दफन केले. लहान मुलांना ब्रेनवॉश करून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत पाठवले. इराकमधील इतर ठिकाणी पकडलेल्या यजीदी तरुणींप्रमाणेच कोचोमधील विवाहित-अविवाहित तरुणींना सेक्स गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून विकायला आणि वापरायला त्यांनी सुरवात केली. फेसबुक आणि इंटरनेटवर या तरुणींची एखाद्या वास्तूप्रमाणे विक्रिची जाहिरात दिली. इराक आणि सीरिया येथील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहशतवादी गटामध्ये भेट म्हणून त्यांना वाटले गेले. या काळात हजारो यजीदी तरुणींना रोजच्या रोज अनेकवेळा बलात्कार सोसावे लागले. कोचो गावामध्ये घडलेल्या हत्याकांडात आयसीसीने नादिया मुरादच्या सहा भावांना आणि आईलाही मारले, तिच्यासह सर्व बहिणींना, वहिनींना, भाच्याना सेक्स गुलाम (सबिया) बनवले आणि इराक, सीरियामधील वेगवेगळ्या दहशतवादी कँम्पमध्ये पाठवले. आणि एका आनंदी, मोठ्या कुटूंबाची त्यांच्या गावाबरोबरच पूर्ण वाताहत झाली.

सुरुवातीला नादियाचा एकच मालक होता त्याचे नाव हाजी सलमान. तो पेशाने न्यायाधीश होता आणि त्याचा खूप दरारा होता. तो नादियाला प्रचंड मारहाण करत असे, बलात्कारापूर्वी मेकअप करायला लावत असे, मध लावलेले त्याचे तळवे तिला चाटायला लावत असे. नादियाने त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि ती पकडली गेली तेव्हा त्यानं तिला चाबकानं फोडून काढलं आणि नग्न करून आपल्या सहा सुरक्षारक्षकांना बलात्कार करण्यासाठी तिच्यावर ‘सोडलं’ अगदी ती बेशुद्ध होईपर्यंत. या घटनेनंतर सलमानने तिला विकून टाकलं. ज्याने तिला विकत घेतले त्याने व त्याच्या ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका रस्त्यावरील चेकपोस्टवरच्या खोलीत बंद केलं.... चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या कुणाही दहशतवाद्यासाठी! तिथे कोणीही तिच्यावर बलात्कार करू शकत होते. तीच्यावरच्या अत्याचाराचा हा प्रवास सतत तीन महिने सुरू होता. एके दिवशी चेकपोस्टवरून एक दहशतवादी तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथून तिने धाडशी पलायन केले…!!

यजीदी तरुणींवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे काही यजीदी तरुणींनी आत्महत्या केली. तर अनेकींची हत्या झाली. काही तरुणीं पळून जाण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत असत परंतु त्यांच्या आजूबाजूला पसरलेला लालची, मुका, बहिरा आणि क्रूर समाज त्यांना पकडून पुन्हा आयसिसच्या ताब्यात देत असे. इराकमधील अशा भयानक वातावरणात सगळीकडे अराजकता माजली असताना, कौर्याची- छळाची परिसीमा गाठली असताना, आयसिसच्या ताब्यातील इलाख्यातील कोणीही व्यक्ती, सबियाला (सेक्स गुलामाला) मदत करेल याची तिळमात्र खात्री नसतानाही नादिया आयसिसच्या ताब्यातून पळून जाण्याचा दुसऱ्यांदा धाडशी प्रयत्न करते आणि एवढ्या बजबजपुरीत तिला आधार मिळतो तोही माणुसकीचा झरा- सहृदय मन असणाऱ्या एका सुन्नी कुटूंबाचा!
या कुटुंबतील सर्वजण जीवावर उदार होउन नादियाला पळून जाण्यासाठी मदत करतात. तिला आसरा देतात, तिची खोटे ओळखपत्र बनवतात. पुढील प्रवासात पावलापावलावर असणारा धोका आणि पकडले गेलो तर क्रूरपणे ठार मारले जाण्याची शक्यता माहीत असूनही त्या कुटुंबातील 'नासिर' तिचा खोटा 'पती' बनतो आणि तिला सुरक्षितपणे कुर्दीस्तानमध्ये पोचवतो. या थरारक घटनाक्रमाची सविस्तर माहिती नादियाच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळते.

क्रूर आयसिसनं नादियाचा आवाज बंद करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला... त्यांनी तिचं अपहरण केलं, तिला गुलाम बनवलं, तिच्यावर बलात्कार केला, तिचा अनन्वित छळ केला, आणि एका दिवसात तिच्या कुटुंबातील सात जणांचा जीवही घेतला. पण नादियानं गप्प राहण्यास नकार दिला. कोणत्याही स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाल्यास त्याबद्दल वाच्यता करण्यास ती स्त्री किंवा तिचे कुटुंब घाबरते. समाज आपल्याला वाळीत टाकेल ही भीती त्यांना असते. विशेषतः आशियाई देशात हे प्रमाण जास्त दिसते. कारण समाजाचा आणि कायद्याचा धाक नसल्याने अत्याचार करणारा गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत असतो आणि चुकी नसतानाही अत्याचारग्रस्त मात्र जगनिंदेला बळी पडतात. शिवाय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठीही अनेक त्रास सोसावे लागतात. त्रास सोसूनही न्याय मिळेल याची खात्री त्यांना नसते. यासारख्या अनेक कारणाने स्त्रिया मूकपणे अत्याचार सोसतात आणि त्यांचे कुटुंबीयही शांत राहण्यात धन्यता मानतात. त्याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो.. ते चेकळतात आणि नवीन गुन्हे करायला सिद्ध होतात. या उलट नादिया मुराद तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जितकी होईल तितकी प्रसिद्धी करते. सगळ्या जगाला तिची (यजीदी तरुणींची) कहाणी समजावी म्हणून ती आत्मचरित्र लिहते. देशोदेशी जाऊन व्याख्यानातून तिची आपबिती सांगते. आयसिसने केलेला अत्याचारालाच त्यांच्याविरुद्धचे शस्त्र म्हणून ती वापरते आणि त्यांना आतंरराष्ट्रीय कोर्टात खेचते. शक्तिशाली राष्ट्रांना यजीदींना मदत करण्यासाठी आवाहन करते.
अनाथ- बलात्काराची शिकार- गुलाम- निर्वासित असे आयुष्यानं नादियावर मारलेले सगळे शिक्के ती धुडकावते. त्याऐवजी तिनं स्वतःसाठी नवी बिरुदे तयार केली आहेत : ‘सर्वायवर’ म्हणजे भयानक आपत्तीतून वाचलेली व्यक्ती. यजिदींची नेता. स्त्रियांच्या हक्कांची पुरस्कर्ती. नोबेल शांतता पुरस्काराचे मानांकन मिळवणारी तरुणी. संयुक्त राष्ट्रसंघाची ‘सदिच्छा दूत’ आणि आता ‘लेखिका’. आज ती नरसंहाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक यजिदीचा, दुर्वर्तनाची शिकार ठरलेल्या प्रत्येक स्त्रीचा, मागे उरलेल्या प्रत्येक निर्वासित व्यक्तीचा आवाज बनली आहे.

छोट्या मोठ्या संकटांनी, कौटूंबिक- सार्वजनिक- शैक्षणिक अपयशाने, अन्याय-अत्याचारास बळी पडल्यास अनेकजण आत्महत्या करतात. वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या आत्महत्या हा आज चिंतेचा विषय बनला आहे. नादियाने मात्र कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, ना तिला कधी स्वत:विषयी घृणा किंवा करुणा वाटली. ती जिवंत राहिली स्वतःवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आई-भावांच्या हत्येची दाद मागण्यासाठी आणि आयसिसच्या ताब्यातील हजारो यजीदी तरुणींना- लहान मुलांना सोडवण्यासाठी!
कोणत्याही घटनेमुळे आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आप्तांची साथ, वैद्यकीय उपचार, मोठे ध्येय आणि प्रेरणादायी चरित्रे उपयोगी पडतात. जगभरातील मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींनी असंख्य हालअपेष्टा सोसून यशाची शिखरे पादाक्रांत केली. अनेकांचा तिथपर्यंतचा मार्ग निश्चितच सुकर नव्हता. अशांचा जीवनप्रवास सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणादायी असतो. नादिया मुराद त्यापैकीच एक!

~संदीप रामचंद्र चव्हाण

संदर्भ:
१) द लास्ट गर्ल (आत्मचरित्र)
मूळ लेखिका: नादिया मुराद
मराठी अनुवाद: सुप्रिया वकील

२) २०१४/१५ मधील काही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल वरील इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेली माहिती