My Blog List

Monday 30 September 2019

खेळण्यांचा जादूगार

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ॥
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥

कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या ‘लावण्य रेखा’ या कवितेतील वरील ओळी आहेत. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या कतृत्वान व्यक्तींचे हात आणि त्यांनी निवडलेल्या खडतर मार्गावरुन आनंदाने चालणारी त्यांची पाऊले, हीच खरी सुंदरतेची प्रतीके असतात. असा काहीसा अर्थ कविवर्य बोरकरांना सुचवायचा आहे. आज आपण अश्याच एका कतृत्वान व्यक्तीचा परिचय करून घेऊया ज्यांनी लहान मुलांना खेळातून विज्ञान-संकल्पना शिकवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले आहे. चांगल्या पगाराची नोकरी सोडून खडतर वाटेने प्रवास करत गेली चाळीस वर्षें ते अविरतपणे चालत आहेत… न थांबता…. न थकता!
या तपस्वी व्यक्तीचे नाव आहे…अरविंदजी गुप्ता!

काही महिन्यांपूर्वी अरविंदजी गुप्ता यांच्याबद्दलची दोन पुस्तके वाचनात आली. शोभा भागवत यांनी लिहलेले खेळण्यांचा जादूगार आणि दीपा देशमुख यांचे सुपरहिरो अरविंद गुप्ता.
अरविंद गुप्ता यांचे संक्षिप्त चरित्र व त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी ही दोन्ही पुस्तके उपयुक्त आहेत. ही पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर pdf स्वरूपात उपलब्ध आहेत.


अरविंदजीं गुप्ता यांनी विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले आहे. टाकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी बनवण्याच्या शेकडो कृती त्यांनी शोधल्या. लाखों विद्यार्थ्यांना खेळण्यातून विज्ञान शिकवले. हजारो शाळांमध्ये जाऊन विज्ञान खेळण्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली. शेकडो शिक्षकांना कार्यप्रवण केले. त्याचबरोबर त्यांनी खेळणी बनवण्याच्या शोधलेल्या हजारभर कृतींचे व्हिडीओ बनवले, खेळणी बनवण्याची कृती त्यांनी पुस्तकातून उतरवली. जगभरातील शेकडो ऊत्तोमौउत्तम इंग्रजी पुस्तके हिंदी भाषेत अनुवादित केली, ही पुस्तके तळागाळातील लोकांपर्यंत पोचावीत म्हणून पुस्तकांची किंमत कमीतकमी रहावी यासाठी प्रयत्नही केले. "A Million Books for a Billion People" हे ब्रीद घेऊन सामान्यातील सामान्य व्यक्तीला जगभरातील चांगले चांगले साहित्य विनामूल्य वाचायला मिळावे म्हणून त्यांनी http://www.arvindguptatoys.com नावाची वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटवर त्यांनी स्वतः लिहलेली जवळपास २५ ते ३० पुस्तके, त्यांनी अनुवादित केलेली जवळपास ३५० पुस्तके, त्याचबरोबर भारतीय आणि जगभरातील कॉपीराईट हक्क संपलेली मराठी, हिंदी, इंग्रजीमधील दर्जेदार पुस्तके त्यांनी या वेबसाईटवर ठेवली आहेत. कॉपीराईटचा बागुलबुवा न करणाऱ्या भारतीय आणि जगभरातील अनेक नामांकित लेखकांची अलीकडेच प्रकाशित झालेली नवनवीन पुस्तकेही या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहेत. अशी सर्व मिळून जवळपास ८००० (pdf) पुस्तके या वेबसाईट उपलब्ध आहेत. पुस्तकांच्या प्रकारनुसार वेगवेगळ्या विभागात पुस्तकांची विभागणी केली आहे यामुळे ज्या विषयाचे पुस्तक हवे असेल तो विभाग शोधल्यास पुस्तक मिळणे सोपे जाते. इंग्रजी विभागातील पुस्तकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिंदी विभागातील संख्याही लक्षणीय आहे. तर मराठीमध्येही जवळपास  ७०० ते ८०० पुस्तके आहेत.

 पुस्तकांसोबतच २२ भाषेमध्ये विज्ञान खेळणी बनवण्याच्या कृतीचे ८५०० व्हिडीओ आणि खेळणी बनवण्याच्या कृतीचे फोटोही या वेबसाईटवर आहेत. एका क्लिकने आपण हे व्हीडियो पाहू शकतो. बहुतांश व्हिडीओ १ ते ३ मिनिटांचे आहेत. सूचनेप्रमाणे रद्दीपेपर, ड्रॉइंग पेपर किंवा क्राफ्ट पेपरची घडी घालत गेल्यास त्यापासून अनेक प्रकारची खेळणी बनवता येतात. त्यामध्ये घर, कबुतर, फुलपाखरू, मासा, पंख हलवणार पक्षी, उड्या मारणारा बेडूक, मोदक इत्यादी बरोबरच चार पाच प्रकारच्या टोप्याही बनवता येतात. ‘बबलुची बोट’ या गोष्टींच्या व्हिडीओमध्ये एकाच कागदापासून १० ते १५ वस्तू बनवल्या आहेत. त्याचप्रमाणे फुग्यामध्ये हवा भरून त्यास इतर काही वस्तू जोडून त्याचे रॉकेट बनवता येते. पळणारी चार चाकी गाडी बनवता येते. प्लास्टिक स्ट्रॉ थोडी कापून फुंकल्यास त्याची पिपाणी बनवता येते. कंपणाने ध्वनी बनतो हे त्यातून सहज समजवता येते. सिरिंज, सलाइन ट्यूब, झाकणं, लाकडी पट्ट्या इत्यादी वापरून जेसीबी आणि जॅक बनवू शकतो. हा जेसिबी चक्क (छोटी) गवताची पेंढी उचलून दुसरीकडे टाकू शकतो. पुढे मागे, उजवीकडे वा डावीकडे तो फिरू शकतो. तर जॅक वरखाली होऊन खेण्यातील गाडी उचलू शकतो. वापरून फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यापासून बनवलेल्या कित्येक प्रकारच्या खेळण्यांचे व्हिडीओ या संग्रहात आहेत. या बाटल्यापासून घराच्या व्हरांड्यात टांगता येण्यासारखी फुलदाणी, कारंजी, पिचकारी, स्प्रिंकलर, पंप, अशी अनेक खेळणी आहेत. विद्युत जनरेटर्सची अनेक खेळणी या वेबसाईटवर आहेत. या जनरेटरने LED बल्ब उजळण्याएवढी ऊर्जा तयार होते. लोहचुंबकांचा वापर करूनही अनेक प्रकारची खेळणी बनवलेली आहेत. चुंबकांच्या सहाय्याने पेन्सिल तरंगती ठेवणे, मोटर बनवने इत्यादी अनेक प्रयोगांचे व्हिडीओ आहेत. नारळाच्या करवंटीपासून एक सुंदर प्राणी बनवले आहेत. फ्रुटीच्या टेट्रापॅकच्या वेष्टनापासून बनवलेला क्यूब आहे. पिंपळाच्या पानापासून बनवलेले मांजर व त्याची पिल्ले आहेत. त्यांच्या खजिन्यात विज्ञानाचे धडे शिकवणारे अनेक खेळणी आहेत. चायनीज खेळण्यांपेक्षा ही खेळणी नक्कीच ओबडधोबड दिसणारी आहेत परंतु ही खेळणी मुलांच्या स्वतःच्या सहभागाने त्यांच्यासाठी खूप मौल्यवान बनून जातात. स्वतः सहभाग घेऊन बनवलेली खेळणी मुलांसाठी अनमोल असतात. हा अनुभव मी स्वतः घेतो आहे. वेबसाईटवर खेळण्यांचा प्रकारानुसार व्हिडिओचे वेगवेगळे गट केले आहेत. या वेबसाईटला रोज हजारो लोक भेट देतात. आतापर्यंत ६.५ कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिली आहे. रोज हजारो पुस्तके डाउनलोड केली जातात. पदरमोड करून या वेबसाईटचा खर्च अरविंदजीं करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने २०१८ मध्ये पद्मश्री देवून त्यांना सन्मानित केले आहे.

खेळण्यांचा जादूगार आणि  सुपरहिरो अरविंद गुप्ता ही दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर मला वेळ मिळेल तेव्हा http://www.arvindguptatoys.com ही वेबसाईट मी जवळपास दोन महिने पाहिली. त्यावरील खुपसारे व्हिडीओ आणि शेकडो पुस्तके डाउनलोड केली. या व्हिडिओच्या मदतीने जमेल तेव्हा (सुट्टीदिवशी) माझ्या मुलासह जवळपासच्या तीन- चार मुलांना काही खेळणी, वस्तू, प्रयोग करून दाखवण्याचा मी आणि माझे चार मित्र प्रयत्न करत असतो. मुलांनाही हा उपक्रम खूप आवडतो आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून अरविंद गुप्ता यांच्या जीवनप्रवासाबद्दल जसजशी माहिती मिळत गेली तसतसा मी भारावून गेलो. त्यांना भेटण्याची इच्छाही झाली. त्यांना इमेल केल्यानंतर त्यांच्या रिप्लाय मधून ते सध्या वेल्लोरे, तमिळनाडू येथे वास्तव्यास असल्याचे समजले.
@संदीप रामचंद्र चव्हाण

संदर्भ
१)वेबसाईट:- http://www.arvindguptatoys.com

२)पुस्तके:- खेळण्यांचा जादूगार (मराठी पुस्तक):- शोभा भागवत
सुपरहिरो अरविंद गुप्ता (मराठी पुस्तक):- दीपा देशमुख

 ३)मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रातील लेख:-
आनंदयोगी (ब्लॉग):- निलांबरी जोशी, ७ जानेवारी २०१८

मोडा तोडा विज्ञान शिका:- अरविंद गुप्ता, शब्दांकन: वसुधा जोशी, लोकमत १९ एप्रिल २००९

भेट एका अवलीयाची:- संजय सावरकर, अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र, वार्षिक २०११

बाप लेकीचे विलक्षण विश्व:- नीला शर्मा

A Million Books for a Billion People:- Arvind Gupta, Minefield third quarter 2009

Making science child play:- Ankila Kannadasan , THE HINDU 28 March 2017

The toymaker and his dream:- Ankila Kannadasan, THE HINDU

The toy maker who weves TRASH into EDUCATIONAL GOLD:- Chandana Banergee, American Magazine Feb 2017
झाडं लावणारा माणूस
the man who planted trees

इ. स. १९१३ मध्ये फ्रांसमधील आल्प्स पर्वतीय प्रदेशात एका ठिकाणी की जिथे पाणी नाही, झाडे नाहीत, पशु-पक्षी नाहीत, शेती नाही, अगदी तुरळक मनुष्यवस्ती आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे फक्त ओस पडलेली गावे आहेत अशा ओसाड वाळवंट वाटणाऱ्या प्रदेशात एक मेंढपाळ राहत होता. त्याच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचाही मृत्यु झालेला होता. एकटा, एकाकी आयुष्य जगत नियतीने पदरात टाकलेले दुःख कुरवाळत न बसता त्याने आजूबाजूच्या दुष्काळी परिस्थितीत बदल करण्याचा निश्चय केला. या बदलासाठी तिथे झाडे लावून वननिर्मिती करणे गरजेचे होते हे त्या अडाणी-खेडुताला उमजले होते. तो दररोज १०० सफेद्या-झाडाच्या बिया माळावर जाऊन पेरत असे. सुरवातीच्या तीन वर्षात त्याने जवळपास एक लाख सफेद्याच्या बियांची नियमितपणे लागवड केली. त्यापैकी नव्वद टक्के बिया उगवल्या नाहीत किंवा झाडे उगवूनही मरून गेली तरी दहा हजार झाडे या ओसाड माळरानावर जगतील असा त्याचा अंदाज होता. सफेद्याबरोबर त्याने बीच वृक्ष लावले, ओक लावले, भूर्जपत्र लावली. त्याचे हे काम त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच वृक्षारोपणाचे काम सुरू केल्यापासून जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षे चालले. हे काम अतिशय शांतपणे,अखंडपणे, न बोलता इतक्या सहजपणे चालू होते की तो काय करतोय हे कोणाला जाणवले देखील नाही. सुरवातीच्या पंधरा-वीस वर्षांतच तिथे हिरवेगार जंगल तयार झाले. ओसाड प्रदेशात नंदनवन फुलले. पशुपक्षी आले. जमिनीत पावसाचे पाणी मुरले. मृत झरे वाहायला लागले. काही दशकांपूर्वी चिट-पाखरूही नसलेल्या प्रदेशात पक्षांची किलबिलाट ऐकू येऊ लागली. नवनवीन प्राणी दिसू लागले. नवीन घरे बांधली जाऊ लागली, जुनी घरे दुरुस्त केली, माणसे राहायला आली, त्यांची वस्ती वाढली. १९४५ साली दहा हजार लोकवस्ती तिथे गुण्यागोविंदाने राहत होती. हे अशक्य वाटणारे काम प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी फक्त एकटा माणूस झटला. ज्याच्या स्वतःच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता त्याने उघड्या बोडक्या डोंगरावर नंदनवन फुलवले. प्रसिद्धीपासून दूर राहून अगदी शांतपणे, कुणाच्याही मदतीची- कुठल्याही मोबदल्याची-कुणाकडूनही सन्मानाची-कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न धरता, शेवटच्या श्वासापर्यंत नित्यनेमाने काम करून ज्याने नवी सृष्टी फुलविली अशा असामान्य व्यक्तीचे नाव होते… एलिझार बुफिए!

जेव्हा जग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात होरपळत होते. बॉंब, बंदुका, रणगाडे, विमाने या साधनांनी सृष्टीचा आणि मानवजातीचा विनाश घडवला जात होता त्यावेळी गरीब, अडाणी एलिझार बुफिए नावाचा अवलिया मात्र सृजनाचे काम करत होता… निष्ठेने आणि जिद्दीने निसर्गाच्या/ मानवजातीच्या कल्याणासाठी निःस्वार्थपे नवी सृष्टी घडवत होता. स्वतःच्या कामावर श्रद्धा आणि आपण खूप मोठे काम करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या ठाई होता. संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या युद्धपिपासू राज्यकर्त्यांपेक्षा आणि काम न करता फक्त बडबड करणाऱ्या सुशिक्षित लोकांपेक्षा न शिकलेला हा खेडूत जास्त सुसंस्कृत होता.

जाँ जिओनो या फ्रेंच लेखकाने एलिझार बुफिए यांच्या जीवनावर आधारित फ्रेंच मध्ये लिहलेली लघु कथा (Short story) ‘द मॅन हू प्लँटेड ट्रीज’ या नावाने १९५३ मध्ये प्रथम इंग्रजी मध्ये प्रकाशित झाली. या छोट्याशा इंग्रजी पुस्तकांमुळे एलिझार बुफिए ही व्यक्ती जगाला माहिती झाली. माधूरीताई पुरंदरे यांनी या इंग्रजी पुस्तकाचा खूप छान आणि सोप्या भाषेत मराठी अनुवाद केला आहे. अनुवादाबरोबरच त्यांनी पुस्तकामध्ये छानशी चित्रेही रेखाटली आहेत.

(युरोपातील आल्प्स पर्वतीय परदेशात झाडे लावणारा एलिझार बुफिए हा फ्रेंच मेंढपाळ जगभरात प्रसिद्धी पावला. भारतातही ईशान्येकडील आसाम राज्यात असाच एक ध्येयवेडा कार्यरत आहे. ‘फॉरेस्ट मॅन’, ‘मोलाई दा’ अशा नावांनी ओळखली जाणारी ही व्यक्ती म्हणजे जादव मुलाई पायेंग. गेली ३६-३८ वर्षे अव्याहतपणे झाडे लावण्याचे अद्वितीय काम या आसामीने केले आहे. यांचे जीवनकार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी आहे.)
--संदिप रामचंद्र चव्हाण

पुस्तकाचं नाव- झाडं लावणारा माणूस
मूळ लेखक- जाँ जिओनो
अनुवाद व चित्रे - माधुरी पुरंदरे
प्रकाशन - राजहंस प्रकाशन
किंमत - ₹६०
पाने- ६०