My Blog List

Monday 26 March 2018

मराठी पुस्तक परिचय: बखर शिक्षणाची

बखर शिक्षणाची
लेखक: हेरंब कुलकर्णी
प्रकाशन: राजहंस प्र.
किंमत: १६० रु.
पृष्ठ संख्या: १५०


बखर शिक्षणाची हे पुस्तक शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त असलेल्या ५४ पुस्तकांच्या बद्दल थोडक्यात माहिती देणारे पुस्तकांवरील पुस्तक (बुक्स ऑन बुक्स) आहे.
लेखक स्वतः इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. ते तरुणपणी मुलांना शिक्षा करायचे, कठोर बोलायचे, मुलं आपल्याला घाबरली पाहिजेत असं त्यांना वाटायचं. त्यामुळे ते विद्यार्थ्यांशी आक्रमकपणे वागायचे. पण एक दिवस त्यांना जाणवलं की मुलांना शिक्षणात रस नसण्याचे, त्यांना शिकवलेले न उमजण्याचे काहीतरी वेगळे कारण असले पाहिजे. काही दिवसांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करणे चुकीचे आहे असे वाटायला लागले. मग त्यांनी या समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यातून वेगवेगळी पुस्तक वाचायला सुरुवात केली.
'शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच अशा जागा आहेत, की जिथे कुणीच स्वतः होऊन जात नाही, तिथे दाखल करावे लागते.'  हे जे. कृष्णमूर्तींचे विचार वाचल्यावर लेखक अस्वस्थ झाले. हादरून गेले. मग लेखकांनी जे. कृष्णमूर्तींची ऐंशी पुस्तके मिळवली. त्याच प्रमाणे भारतातील सर्व 'कृष्णमूर्ती शाळा' बघितल्या. तिथे राहिले, तिथले अनुभव घेतले. (या अनुभवावर आधारीत त्यांचे दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे 'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल'. हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले आहे. किंमत २२०रु आहे.)
कृष्णमूर्ती यांच्या शाळा पाहिल्यामुळे लेखकांना एक वेगळीच दृष्टी मिळाली अस मत ते बखर शिक्षणाची या पुस्तकातील 'हितगुज शिक्षकांशी व पालकांशी' यात व्यक्त करतात.
नंतर लेखकांनी महाराष्ट्रतील शिक्षणात वेगळे प्रयोग करणाऱ्या लीलाताई पाटील, रमेश पानसे यांची पुस्तके वाचली. मुलांना लिहता वाचता यावे म्हणून शिकवण्याच्या पध्दतीत प्रयोगशीलता आणायला हवी हे लेखकांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी स्वतःच्या अध्यनपद्धतीत योग्य ते बदल केले. यातून त्यांचा शिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला असही मत ते हितगुजमध्ये मांडतात.
शिक्षण क्षेत्रात देश परदेशातील अनेक क्रांतिकारक बदल करणाऱ्या शिक्षकांची/शिक्षण क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या आदर्शांची शिक्षणविषयक पुस्तक लेखकांनी वाचली. या पुस्तक वाचनातून लेखकांच्या शिक्षकी जीवनाचा कायापालट झाला.
लेखकांनी शिक्षकांसमोर महाराष्ट्रभर खूप व्याख्याने दिली. त्यात ते या वेगवेगळ्या पुस्तकाबद्दल बोलत. आपण सांगतोय हे शिक्षकांना काहीतरी अद्भुत वाटतंय असं लेखकांना दिसून यायचे. शिक्षक या विविध पुस्तकाबद्दल प्रश्न विचारायचे. यातून मग या पुस्तकांबद्दलची माहिती शिक्षक/ पालकांना व्हावी म्हणून यातील निवडक पुस्तकांचा परिचय देणारे हे पुस्तक तयार झाले. लेखकांनी या पुस्तकांबद्दल दैनिक पुढरीत वर्षभर स्तंभ लिहले आहेत.

या पुस्तकात जपानची तोत्तोचान आणि तिचे शाळा मुख्यद्यापक कोबायशी; दुसऱ्या महायुध्दात जखमी झालेला, आपल्या शरीरात बंदुकीचे छरें घेऊन जगत असलेला, आपल्या बायको आणि बाळाला जर्मन सैनिकांनी मारल्यानंतरही निराश न होता शाळा चालवणारा वासिली सुखोम्लिन्स्की आपल्याला भेटतो; मुलांना स्वातंत्र्य देणारी मुलांना हवी तशी शाळा काढणारा, जगातील शिक्षणक्षेत्राला अनेक दशके प्रभावित करणारा इंग्लंडचा 'निल' व त्याच्या 'नीलची शाळा समरहिल' या पुस्तकाबद्दल माहिती मिळते;
आर्मीतून निवृत्त झालेला. निग्रो असल्यामुळे वर्णद्वेषाचा बळी ठरलेला, कुठेही नोकरी न मिळाल्याने एका झोपडपट्टीजवळच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेला इंग्लंडमधील 'ब्रेथवेल' आपल्याला माहीत होतो. त्याच्या 'टू सर विथ लव्ह' या आत्मचरित्राचा संक्षिप्त भाग आपल्याला इथे वाचायला मिळतो;
अमेरिकेतील भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल ग्रीनबर्ग स्वतःच्या मुलाला हवी तशी शाळा मिळत नाही म्हणून समविचारी पालकांना एकत्र करून शाळा सुरू करतो; न्यूझीलंडमधील शिक्षिका सिल्व्हिया वॉर्नर हिने केलेले शैक्षणिक प्रयोग व तीची झालेली शोकांतिका, तिने चोवीस वर्षे काढलेली व नंतर जाळली गेलेली चित्रे, मृत्यूनंतर अमेरिकेतून प्रकाशित होणारे तिचे शैक्षणिक प्रयोग इत्यादी कहाणी असणाऱ्या 'टीचर' या पुस्तकाची संक्षिप्त माहिती याच पुस्तकातून आपल्याला समजते; 'माय कंट्री स्कुल डायरी' हे अमेरिकेतील डोंगराळ भागात काम करणाऱ्या ज्युलिया वेबन गॉर्डन या एका समर्पित शिक्षिकेचे प्रेरणादायी काम बखर शिक्षणाची या पुस्तकामुळे आपल्या समोर येते.

गिजुभाई बधेका यांचे दिवास्वप्न, जे.कृष्णमुर्ती यांचे शिक्षणविचार, टागोरांचे शांतिनिकेतन; गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पन्नास वर्षांपूर्वी वेगळा शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या गो.ना. मूनघाटेंची काटेमुंढरीची शाळा; चाकोरीबाहेरच्या नऊ शाळाबद्दल रेणू दांडेकर लिहलेले 'कणवू'; शिक्षण आनंदक्षण, नयी तालीम, मुलांचे शिक्षण पालक व शासन ही शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांची पुस्तके; 'कोसबाडच्या टेकडीवरून' शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या कार्याबद्दल आणि अशा शैक्षणिक क्रांती करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती आपल्याला हेरंब कुलकर्णी आपल्या बखर शिक्षणाची या पुस्तकात करून देतात. त्याचप्रमाणे विनोबांचे शिक्षणविचार, आचार्य रजनीश यांचे शिक्षणविचार, भाऊ गावंडे यांचे प्रकाशाच्या उंबरठ्यावर, अमिता नायडू यांचे प्लॅटफॉर्म नंबर झिरो; राजा शिरगुप्पे यांचे न पेटलेले दिवे; अरुण शेवते यांचे नापास मुलांची गोष्ट, लीलाताई पाटील यांचे शिक्षण देता घेता, अर्थपूर्ण आनंदशिक्षणासाठी; सतीश पोरे यांचे वाचन संस्कार; रेणु गावस्कर यांचे आमचा काय गुन्हा; नामदेव माळी यांचे शाळाभेट इत्यादी चोपन्न पुस्तकाबद्दल संक्षिप्त पंरतु अत्यंत उपयोगी माहिती आपल्याला या पुस्तकातून होते. व ही पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढते.
बखर शिक्षणाची या पुस्तकातून शिक्षक, पालकांना नवी दृष्टी मिळेलच परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही ही चरित्रे, आत्मचरित्रे, वेगळे शैक्षणिक प्रयोग प्रेरणा देतील.
सध्या सर्व सुखसोई असूनही रडणारे पालक- शिक्षक यांनीही यातून शोध आणि बोध घेतल्यास शैक्षणिक क्रांती व्हायला उशीर लागणार नाही. मुलांना 'प्रॉडक्ट' समजणाऱ्या आजच्या शैक्षणिक परिस्थितीत हे गरजेचे आहे.
आपल्या समाजाच्या बहुतेक समस्या प्रभावहीन शिक्षण पध्दतीत लपल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील क्रांतिकारक बदल जाणून घ्यायला आणि चांगल्या बदलासाठी शक्य ते प्रयत्न करायला 'बखर शिक्षणाची' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
(लेखकांबद्दलची माहिती लिहताना पुस्तकातील सुरवातीला असणाऱ्या 'हितगुज' यातील संदर्भ म्हणून वापर)

संदिप रामचंद्र चव्हाण

Friday 16 March 2018

किंडल_डिव्हाईस

किंडल_डिव्हाईस ....चालतं फिरतं ग्रंथालय!
वाचनाचे बदलते तंत्र.

गोष्ट तशी जुनीच आहे. परंतु ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमीसाठी थोडंस नवीन तंत्रज्ञान म्हणजे अमेझॉन किंडल डिव्हाईस होय.
अनेक पुस्तक प्रकाशकांनी खूप सारी पुस्तके वेगवेेगळ्या इबुक्स स्वरूपात आणली आहेत. डेलिहंट इबुक्स, बुकगंगा इबुक्स, साहित्य प्रतिष्ठान यांनी आणलेली इबुक्स, वेगवेगळी पुस्तकाची अँड्रॉईड अँप, अमेझॉन किंडल इबुक्स इत्यादी. ज्या त्या संस्थेने आपापली अँप डेव्हल केली आहेत. काहींनी ईबुक रीडर डिव्हाइस ही टॅबसारखी इलेक्ट्रॉनिक वस्तू (गॅजेट) बनवली आहे. त्यापैकी एक म्हणजे 'अमेझॉन किंडल ईबुक रीडर' होय.


मराठी पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर काही ग्रुप सदस्यांना या बद्दल माहिती हवी होती. त्यांना व सर्व मित्रपरिवराला माहिती कळावी या हेतूने...

जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे।
सकळ जन।।

या भावनेने हा लेख प्रपंच.

अनेक प्रकारची, अनेक विषयांची, अनेक भाषांची, अनेक लेखकांनी लिहलेली, अनुवादित केलेली पुस्तकं मिळण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय किंवा त्याला वाचनालय म्हणण्याचाही प्रघात आहे. सार्वजनिक वाचनालये, शाळा- कॉलेजची, पालिका- महापालिका यांची ग्रंथालये वाचकांसाठी आवडीची ठिकाणे असतात. मोठ्या लोकांची स्वतःची मोठी लायब्ररी घरात किंवा कार्यालयात असते. सर्वसामान्य वाचकप्रेमी जमेल तसा पुस्तकसंग्रह करत असतो. पण सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा छोट्या घरात पुस्तकांची व्यवस्थित निगा राहील असे कपाट किंवा पुस्तक ठेवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करणं मोठं जिकिरीचं होतं. शिवाय नोकरी करणाऱ्यांना, भाड्याच्या घरात राहणार्यांना, बदली झाल्यावर किंवा घर बदलल्यावर संग्रही असणारा पुस्तकसाठा इकडून तिकडे नेण्यात अनेक अडचणी येतात. पेपरलेसच्या जमान्यात यावर उपाय म्हणजे सर्व भाषांमधील पुस्तके इलेक्ट्रॉनिक बुक(ईबुक) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेझॉनने आणलेले किंडल ईबुक होय. 2004 मध्ये अमेझॉनने किंडल ईबुक रीडरची प्रथम पिढी मार्केटमध्ये आणली. आता त्यात संशोधन होऊन आठवी/ नववी पिढी बाजारात आली आहे. अमेझॉनने पुस्तकांच्या दुनियेत मोठा क्रांतिकारक प्रयोग केला व जगभरात त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इंग्रजी भाषेत शेकडो पुस्तके अगदी मोफत आहेत तर प्रादेशिक भाषेतही काही ठराविक पुस्तके मोफत आहेत. चांगल्या चांगल्या पुस्तकांवर भरगोस सूट व हार्डकॉपीच्या मनाने कमी किंमत, फॉन्ट लहान मोठा करायची व्यवस्था, अमेझॉन आकाउंटशी कनेक्ट असल्यामुळे ईबुक लायब्ररी कोणत्याही नवीन गॅझेटवर(मोबाईल किंवा किंडल डिव्हाइसवर) पुन्हा उपलब्ध होते. हजार ते पंधराशे पुस्तके सेव(डाऊनलोड) होऊ शकतील अशी इंटर्नल मेमरी, डोळयांना त्रास होणार नाही असे तंत्रज्ञान, जिथे वाचायचे थांबलो तिथूनच पुढे सुरवात, चांगले ब्याटरी ब्याकप इत्यादी अनेक सुविधा नवीन जनरेशनच्या किंडल मध्ये आहेत.

भारतात किंडल ईबुक लॉन्च करून दहा वर्षे झाली आहेत. सध्या किंडल डिव्हाइसवर भरगोस सूट व त्या बरोबर पुस्तक खरेदी साठी 80% डिस्कउंट मिळणारे दोन हजाराचे प्रमोशन गिफ्ट इत्यादी ऑफर सद्या मिळत आहेत.
किंडलवर खरेदी केलेले पुस्तक आवडले नाही तर काही दिवसाच्या मुदतीत परत करता येते. विकत घेतले पुस्तक परत करण्यासाठी ठराविक संख्येची मर्यादा आहे. नाहीतर प्रत्येक पुस्तक वाचून परत केले जाईल. हे कंपनीने लक्षात घेऊन यावर मर्यादा घातली आहे. पुस्तक परत केल्यावर जेवढे पैसे पेड केलेत तेवढे माघारी मिळतात. खरेदीआधी कोणत्याही उपलब्ध ई पुस्तकाचे सँम्पल मोफत डाउनलोड करता येते. त्यातून पुस्तकाचा सार समजू शकतो. एकच पुस्तक एकाच वेळी किंडल डिव्हाईस व मोबाईल किंडल अँपवरती वाचता येते.

किंडल ईबुक रीडरवरचा पुस्तक संग्रह वाचायला किंडल डिव्हाईसच हवं असं नाही. मोबाईल मधे किंडलचा ॲप इन्स्टॉल करून अमेझॉन आकाउंटचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकला की ॲमेझॉनवर किंडल अँप रजिस्टर होतो. किंडल डिव्हाइस रजिस्ट्रेशनही अमेझॉन लॉगिन आयडीनेच करायचे असते. किंडल डिव्हाइस असल्याचा फायदा म्हणजे ते फक्त वाचाण्यासाठी डिजाईन केलं आहे. ऍडीओ, व्हिडीओ, इतर अँप्स, गेम्स इत्यादी काहीही नसते. त्यामुळे फक्त वाचनावर लक्ष केंद्रीत होते. त्याचप्रमाणे यावर पुस्तक वाचताना कागद वाचतोय असं फील होते. स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्टेबल असल्याने डोळ्यांना सुट होईल तसा सेट करता येतो (पाच हजारच्या आसपास मिळणारे बेसिक मॉडेलमध्ये LED लाईट नाहीत त्यामुळे ते मॉडेल फक्त उजेडातच वापरता येते) अक्षरांचा आकार हवा तितका लहान मोठा करता येतो. त्यामुळे चेष्मा विसरला किंवा जवळ नसला तरी काही फरक पडत नाही. आपण पुस्तकाची हार्डकॉपी जिथे वाचायचे थांबू तिथे काहीतरी खूण ठेवतो तसेच किंडल डिव्हाईस स्वतः लक्षात ठेवते व जिथं थांबलो त्या पुस्तकाचे तेच पान उघडते. त्या मध्ये लेखकांच्या नावावरून, प्रकाशकांच्या नावावरून, कथा, कादंबरी, ऐतिहासिक इत्यादी नावाने फोल्डर बनवता येतात.
मी हार्ड कॉपी व किंडल पेपरव्हाइट ईबुक दोन्ही वापरतो. किंडलवरती पुस्तके हार्डकॉपीच्या तुलनेत कमी किमतीत मिळतात. शिवाय वार्षिक अनलिमिटेड प्लॅन घेतला तर वर्षभर उपलब्द सर्व पुस्तके फ्री मिळतात व वर्षाने पुन्हा पैसे भरावे लागतात. या प्लॅनची पुस्तके कायम अकाउंटवर राहत नाहीत. मी कोणतंही पुस्तक विकत घेतो ते कायमस्वरूपी आपल्या अकाऊंटवर राहते. शिवाय काही पुस्तके फ्री मिळतात. इंग्रजी वाचणाऱ्यांना खूप पुस्तके कमी किमतीत किंवा फ्री मिळू शकतात.
अमेझॉन अँपवरती marathi ebooks for Kindle  असे सर्च केले की पुस्तकांची यादी मिळते. हवे त्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या नावानेही पुस्तक शोधाता येते.
वेगवेळ्या मॉडेलनुसार किंडल डिव्हाइसची किंमत चार हजार ते चाळीस हजार असू शकते. सध्या ईबुक रीडरच्या किंमती जास्त दिसत आहेत. अमेझॉनच्या विशेष ऑफर मध्ये किंमत 10 ते 20 टक्के कमी असते. त्याच वेळी पेटीयम वर त्यापेक्षा कमी किंमत असू शकते हा माझा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनवर किंडल पेपरव्हाइट 8999 ला होते तेव्हा पेटीयमवर 7265 होते. काहीवेळा पुस्तक खरेदीसाठी 2000 रु चे 80 टक्के डिस्काउंट कुपन मिळत. त्यामध्ये 2500 ची पुस्तके 500 मध्ये मिळतात.
 वाचनाची आवड असणार्यांसाठी किंडल नक्कीच उपयुक्त आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप: मी वर उल्लेखलेल्या कोणत्याही कंपनीचा एजेंट नाही. किंवा ही माहिती देण्यात माझा कोणताही आर्थिक लाभ नाही)

किंडल मोबाईल अँप ची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle

Wednesday 14 March 2018

शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने...

शेतकरी_मोर्चाच्या_निमित्ताने...
नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चाची सांगता १२ मार्च रोजी झाली. ३० ते ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट करत अतिशय शांत, संयमाने मार्गक्रमण करून आपल्या मागण्या मायबाप सरकारपुढे ठेवल्या. सरकाने लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली व मोर्चा विसर्जित झाला. सरकार मागण्यांची पूर्तता व दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी करते हे पुढे दिसेलच. मोर्चा मुबंईत पोचण्याआगोदर निर्णय घेऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या त्रासाला पूर्णविराम देता आला असता. पण निबर झालेले अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री, शासकीय यंत्रणा, कोणतीही गोष्ट गळ्याला आल्याशिवाय लक्ष देत नाहीत. अशी काहीशी परिस्थिती कायमच दिसत आली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलन यशस्वीपणे हाताळले असं म्हणावं लागेल. त्यांनी अजून तत्परता दाखवली असती तर हे आंदोलन कसारा घाट ओलांडुन पुढे गेले नसते. तरीही त्यांनी हे आंदोलन जास्त चिघळू न देता हाताळले... हेही नसे थोडके!!

शेतकरी मोर्चाबद्दल अनेक समज गैरसमज सोशलमीडियामध्ये चर्चिले गेले. अजूनही त्यावर वादविवाद चालूच आहेत. सोशल मीडियावर या मोर्चातील काही फोटो आणि मोर्चासंबंधीच्या काही पोस्ट अनेकांनी शेअर करत शक्य त्या सर्व मार्गांनी अन्नदात्याचे हे प्रयत्न मोठ्या स्तरावर इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियानेही दखल घेतली. कोणी वाटेत खायची,नाष्ट्यापाण्याची सोय केली. कोणी जखमींवर उपचार केलेे. तर कोणी चुकीचे आरोप करून शेतकऱ्यांच्या मनाला जखमी केले. मोर्चातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या जखमी पायांचे, तुटलेल्या चपलांचे, त्यांच्या कारुण्याचे, दयनीयतेचे फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर काहींनी टोमणे मारले. सर्वंच राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन मतपेटी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी तशी राजकीय नेत्यांनी मोर्चाला भेट दिली. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे न उमजलेले एक कोडेच आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांना काय मिळाले? फक्त आश्वासनांची कागदी भेंडोळी! या पेक्षा काही नाही.
शेतकर्याच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या व अनेक समस्या आहेत त्याला आतापर्यंतची सर्व सरकारे जबाबदार आहेत. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर भर द्यायला हवा. पण असं होताना दिसत नाही. प्रगल्भता येण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीय पक्षांचे व नेत्यांचे वैचारीक अधपतन होताना दिसत आहे. त्याच्या नेमकं उलट वर्तन अशिक्षित, जेमतेम शिकलेला शेतकरी आपल्या मोर्चातुन दाखवतो तेव्हा नक्कीच तो कौतुकास पात्र ठरतो.
स्वतः आत्मक्लेश सहन करून आपल्या मागण्या मांडणे, भरपूर संख्या जमली तरी उन्माद न करता शांतता ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी गोष्टींचा वस्तुपाठच या मोर्चाने घालून दिला. एवढ्या संख्येने लोक जमतात परंतु गडबड, गोंधळ, पळापळ, जाळपोळ, दगडफेक यातले काहीही होत नाही. आंदोलक आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत, मुंबईत आल्यावर दहावीच्या मुलांना त्रास नको म्हणून स्वतः त्रास सहन करून कित्येक किलोमीटर चालत रातोरात आझाद मैदानात पोचतात. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडतात. त्यासाठी शांतपणे मोर्चा काढतात. खाजगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान न करता मोर्चा विसर्जीत करतात. हे शेतकऱ्यांच वागणं प्रगल्भता दाखवत नाही का? सध्या विविध आंदोलनामध्ये विध्वंसक वृत्ती वाढत असताना असा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेला आंदोलनाचा एक चांगला पर्याय आहे. (याचा प्रत्यय 'मराठा क्रांती मोर्चा' मध्येही आला आहे.)
या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शेतकरी मोर्चाला नक्षली चळवळीचा संबध कोणी जोडत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून शेतकरी कष्टकरी जनतेच्या भावना लक्षात येत नाहीत. त्यासाठी समाजाची नाळ जुळावी लागते. परंतु सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना कष्टकरी जनतेचे प्रश्न कसे समजणार??

आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, झेंड्याचा रंग कोणता होता हे पाहण्यापेक्षा या मोर्चात आंदोलक शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने त्रास सहन करून कसा आला हे पहावे लागेल. अनेक वेळा आश्वासने मिळून आपल्या मागण्या वर्षोनुवर्षे तशाच आहेत. सत्तेच्या साठमारीत आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही ही भावना शेतकऱ्यांमध्ये बळावली. विरोधीपक्षातील लोक आपल्या मागण्यांसाठी आग्रही दिसत नाहीत व सत्ताधारी मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा समज सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनात तयार होण्याला कोण जबाबदार आहे??
शेतकऱ्यांना झेंड्याच्या रंगाशी देणे घेणे नाही त्यांना गेंडयाच्या कातडीच्या व्यवस्थेपुढे आपले प्रश्न, समाश्या मांडणारे, त्यांना पटवून देणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे हा मोर्चा कोणी काढला हे पाहण्यापेक्षा हा मोर्चा शेतकऱ्यांचा होता असे पहायला हवे.

कोणता झेंडा घेऊ हाती?? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना स्वार्थाने का होईना कोणी त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडण्यात पुढाकार घेत असेल तर सर्वत्र अंधकार दिसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना हा आधार वाटल्यास नवल नाही. शेतकऱ्यांना आता पर्यंत सर्वजण फसवत आले आहेत. संघटित नसल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात कायमच मागे पडला आहे. शेतकऱ्यांच्या आडून सर्वजण सत्तेची खुर्ची जवळ करतात. कदाचित हा मोर्चाही त्याला अपवाद नसेल. मोरच्यातुन स्वतःची इमेजबिल्डिंग व त्यातून राजकीय लाभ असाही कोणाचा छुपा हेतू असू शकतो. परंतु जी संघटना एखादे आंदोलनाचे नियोजन करते तेव्हा तिचे नाव, त्यांचे ब्यांनर, झेंडे त्यात ओघाने येणारच!.. ते काही दुसऱ्या संघटनेचे, पक्षाचे झेंडे आंदोलकांच्या हातात देतील का?? हे लक्षात घेणे जरुरी आहे. टोप्या उन्हापासून रक्षण करतात तरीही 'टोप्या व झेंड्यापेक्षा आंदोलक शेतकऱ्यांना चप्पल द्यायला हवी होती' या काहींनी दिलेल्या सुचनेवर शेतकरी नेत्यांनी नक्कीच विचार करायला हवा. अनाठायी खर्च कोणत्याही संघटनांनी टाळायला हवेत व मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. हे मात्र नक्की!

मुळात या मोर्चातील मुख्य मागणी, वनजमीन कसणार्या शेतकर्याच्या नावे ती वनजमीन असावी ही होती. आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे कागदोपत्री जमीन नसल्यामुळे त्यांना साधं कर्जही मिळत नाही. इतरही मागण्या होत्या परंतु त्या दुय्यम होत्या. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाण्यासह आदिवासी भागातील होते. सलग सहा दिवस रणरणत्या उन्हात पायपीट करत निघालेले मोर्चेकरी जसजसे पुढे गेले, तसतसे नाशिकसह ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील शेतकरी मोर्चात सहभागी होऊ लागले. मुळात त्यांना दिडदोनशे किलोमीटर चालायला लावणे गरजेचे होते का? त्याच्याबरोबर पूर्णवेळ मोर्चाचे आयोजक चालत होते का? हा प्रश्नच आहे?? या आंदोलनात बहुसंख्य आदिवासी शेतकरी व गरीब शेतकरी होते. कष्टप्रद आंदोलनात सुखवस्तू सहभागी होत नाहीत हेही ध्यानात घ्यायला हवे. घरुन घेतलेली कांदा भाकर, आणि मुक्काम असेल तिथे तीन दगडाच्या चुलीवर केलेला भात खाऊन आंदोलक सहभागी झाले होते. ते भाडोत्री नव्हते. आजकाल पैसे देऊन, वाहनांची सोय केल्यानंतरही राजकीय पक्षांच्या सभेला लोक येत नाहीत. तिथे रणरणत्या उन्हात रोज वीस ते तीस किलोमीटर चालत, शिळेपाके अन्न खाऊन स्वतःला त्रास करून कोण घेईल?? ज्या भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले तिथे 'अखिल भारतीय किसन सभा' या डाव्यांच्या संघटनेचे अस्तित्व असल्याशिवाय त्यांच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत. अनेक वर्षे अनेक समस्यांची झळ बसल्यामुळे शेतकरी सहभागी झाले असणार. भूलथापांना बळी पडून एवढ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील का?
डाव्यांनी असाच मोर्चा पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काढला तर यशस्वी होईलच अस नाही. बहुदा यशस्वी होणारच नाही. कारण त्यांचे तिथे अस्तित्व नाही. मुळात मोर्चा कोणी काढला हा मुद्दा गौण आहे. पश्चिम महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टीनी आत्मक्लेश यात्रा काढली होती त्यालाही लोक पुणे ते मुंबई चालत आले होते. त्या मोर्चालाही शेतकऱ्यांचा उस्फुर्थ प्रतिसाद लाभला होता.भाडोत्री लोक अशा आंदोनलात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय? ते आंदोलन का करतात? हे समजून घ्यायला हवे. फक्त वरवरची शेरेबाजी उपयोगाची नाही. यातून फक्त मनं कलुषित होतील... आणि प्रश्न जिथल्या तिथेच राहतील. राजकारणी लोक सेटलमेंट व सर्वसामान्यांची दिशाभूल करायला तरबेज असतात. त्यांना समाजातील विविध घटकामध्ये द्वेषाची दरी वाढली तर आनंदच होतो. कारण दुभांगलेल्या समाजावर पकड ठेवणे तुलनेने सोपे जाते. आज शेतकरी जात्यात आहेत तर इतर घटक सुपात आहेत. हे सर्वांनी लक्षात घेऊन शेतकर्याच्या दुःखावर फुंकर मारता आली नाही तर किमान डागण्यातरी देऊ नयेत.

भारतभर व महाराष्ट्र राज्यातही विभागवार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक शेतकरी संघटना आहेत. त्या वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवतात. या संघटनांच्या आडून संघटनेचे पुढारी काही वेळा आपला स्वार्थ साधतात. कोणी राजा हरिश्चंद्र नाही.
शेतकऱ्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही. पण एकट्या दुकट्याने मागण्या मांडून, आंदोलनं करून, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून काहीही हाती लागत नाही. एकट्याने लढलो तर त्याचा 'धर्मा पाटील' होतो हे शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना कोणत्यातरी संघटनेचा झेंडा हाती घ्यावा लागतो. ही त्याची मजबुरी आहे. टीका करणार्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे.

शेतकरी आत्महत्या, शेतकरी संप, शेतकऱ्यांचा मोर्चा हा टिंगलटवाळी करण्याचा विषय नाही. हा खूप गंबीर सामजिक विषय आहे. सर्वांनाच सुख, संमृद्धि हवी असताना शेतकऱ्यांना का नको? त्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यात काय गैर आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन शेतकरी झालेल्यांना व नवश्रीमंत शहरी वर्गाला हे कधी कळणार?? का कळवूनच घेणार नाहीत??
सत्ताधारी शेतकर्याच्या बाजूने, विरोधक शेतकर्याच्या बाजूने असं असताना शेतकर्यांवर वारंवार आंदोलन करण्याची वेळ का येते?? राजकीय पक्षांच्या धुरणींनी यावर विचार करायला हवा. शेतकरी आज शांततेत मोर्चे काढतोय, आत्मक्लेश करून घेतोय, अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर आत्महत्या करतोय. त्यांचा वापर वेगवेगळ्या संघटना व पक्ष गरजेनुसार करून घेतायत. हे वेळीच थांबायला हवे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात हाच शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी दोन हात करायला उभा राहिला तर त्याचा दोष शेतकऱ्याला देता येणार नाही.

संदिप रामचंद्र चव्हाण.

Tuesday 6 March 2018

'पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची' आणि 'टीनएजर्सच्या मनात'

पहिली_आठ_वर्षं... सहज शिक्षणाची
लेखिका: डॉ. श्रुती पानसे (पीएचडी शिक्षणशास्त्र)
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १८०रु
पुष्ठ संख्या:१६०


मुल जन्माला आल्यापासून आठ वर्ष्याचे होईपर्यंत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कशी होते याबद्दल विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक आहे. बाळ लहान असल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो.
पहिली एकत्र कुटुंबात मुलं कशी मोठी व्हायची लक्षातही यायचे नाही... परंतु आज त्रिकोणी,चौकोनी कुटुंबात मुलांना वाढवणे म्हणजे अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नवं पालकांना मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.

मुल (मुलगा किंवा मुलगी या अर्थाने) जन्माच्या पूर्वतयारीपासून ते मुलाचा जन्म, त्याचे/ तिचे रांगणे, उभे राहणे, अडखळणे, चालणे, पळणे, बोलणे, चिडणे, रागावणे, रडणे, हट्ट करणे, खोड्या करणे, मोठ्यांचे अनुकरण करणे इत्यादी मुलाच्या वर्तणुकीचे सूक्ष्म निरीक्षण व आपल्या पीएचडी संशोधनात केलेला लहान मुलांचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय अभ्यास डॉ. श्रुती पानसेंनी सर्व पालक, शिक्षक, समाज, शासन यांना पुस्तकरूपाने उपलब्द करून दिला आहे.

कोणत्याही नवपालकांनी, शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे व कसे वागू नये, मुल वाढवताना पालकांची भूमिका कशी असावी त्याच प्रमाणे पहिली आठ वर्षे ही मुलांच्या वाढीसाठी किती महत्वाची असतात याचे सोप्या भाषेत व अतिशय विचार करायला लावणारी मांडणी पुस्तकामध्ये केली आहे.
पुस्तक एकूण एकोणतीस प्रकरणात विभागले आहे. हे सर्व लेख सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'स्मार्ट संगोपन' या नावाने प्रसिध्द झाले आहेत.

मला हे पुस्तक का आवडले?
मी स्वतः पालकाच्या भूमिकेत असल्याने मला यातील बहुतेक सर्व मुद्दे व त्याबद्दलची माहिती महत्वाची वाटली.  मी मुलाशी कसे वागतो, कुठे चुकतो किंवा विनाकारण मुलावर रागवतो का? या बद्दल आत्मपरीक्षण करू लागलो.

हे पुस्तक कोणी वाचावे?
शून्य ते आठ/ दहा वर्षांच्या मुला-मुलींचे पालक, पाळणाघर ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील इतर घटक ज्यांचा संबध या वयोगटातील मुलांसोबत येतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात निर्णय घेणारे राजकारणी व अंमलबजावणी करणारे सनदी अधिकारी, या व्यतिरिक्त ज्यांच्या घरी या वयोगटातील मुलं आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी हे पुस्तक वाचावे.

या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे 'टिन एजर्सच्या मनात' त्याची माहिती खालीलप्रमाणे

पुस्तक परिचय: टीनएजर्सच्या_मनात
लेखिका: डॉ. श्रुती पानसे
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १४०
पृष्ठ संख्या: १२०
'टीनएजर्सच्या मनात' हे पुस्तक साधारण ८-९ वर्षांपासून ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या आईवडीलांसाठी लिहलेलं आहे. परंतु याचे वाचन या वयोगटातील मलामुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांनी व या वयोगटातील मुलं ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वाचल्यास मुलांच्या शारीरिक व मानसिक बदलाचीे शास्त्रीय, मानसशास्त्रीय माहिती मिळेल. हे पुस्तक एकूण २३ प्रकरणात विभागले आहे.


डॉ. श्रुती पानसे यांनी बालमानशास्त्र, मेंदू आणि शिक्षण यावर विविध पुस्तकं लिहली आहेत. लेखिका शिक्षणशास्त्रात पीएचडी आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणविषयक परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले आहेत. विविध शिक्षणसंस्थांमधून व्याख्याने दिली आहेत. 'पहिली आठ वर्षं सहज शिक्षणाची' या पुस्तकाचा पुढील भाग म्हणून 'टीनएजर्सच्या मनात' या पुस्तकाकडे पाहता येईल.
बाळ हळू हळू मोठं होत असत. सुरवातीला बाळाच्या खोड्या बाललीला म्हणून कोणी गंबिरतेने घेत नाही. परंतु हेच बाळ जेव्हा आठ दहा वर्षाचे होते तेव्हा त्याला चांगली समज आलेली असते. नाईन ते नाइंटिन या वयोगटातील मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये असतात. त्यांच्या खोड्या, अनपेक्षित वागणं हे घरापूरते मर्यादित नसते. या वयात शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी, त्यांचे पालक, शिक्षक, यात गुंतले जातात. काहीवेळा मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे 'लहान होती तेच बरे' असं म्हणायची वेळ पालकांवर येते.
९-१९ या वयोगटातील मुलामुलींच्या समस्या लहान वयोगटातील (०-८) मुलामुलींपेक्षा वेगळ्या असतात. शारीरिक वाढ, लैगिंक भावना, परलिंगी आकर्षण, अभ्यासाचा ताण, पालकांशी कमी होणारा संवाद, मित्र-मैत्रिणी अधिक जवळच्या वाटू लागने, स्वप्रतिमेच्या प्रेमात पडणे, कोणत्याही कामात वेळ काळाचे भान हरवणे, अघोरी धाडस करणे, भावनांवर नियंत्रण नसणे, सोशलमीडियाच्या आहारी जाणे, व्यसनात अडकण्याची शक्यता, सबकुछ चलता है ही प्रवृत्ती असणे, इत्यादी वेगवेगळ्या समस्या या वयोगटातील मुलांच्यात/मुलींच्यात दिसतात.

या पुस्तकात मुलाची, मुलीची शारीरिक वाढ, त्यांच्या हार्मोन्समध्ये होणारे बदल, शरीराने मोठे झाले तरी मेंदू विकसन पूर्णत्वाला आलेले नसणे, मोठं होण्याची लक्षणे, मेंदुसदर्भातील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, अमिग्डाला, न्यूरॉन्स, डेन्ड्राईट्स, न्यूक्लिअस, अक्झॉन, सीनँप्स इत्यादी बद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे.
टिनएजर्सच्या वाढीचा मानसशास्त्रीय अभ्यास समजून घेण्यासाठी हे पुस्तक पालकांना, शिक्षकांना उपयोगी आहे.
हे पुस्तक मिळण्याची अमेझॉन लिंक

संदिप रामचंद्र चव्हाण.

Friday 2 March 2018

निमित्त:होळी, धुलीवंदन, रंगपंचमी

निमित्त_होळी_धुलीवंदन_रंगपंचमी

काल होळी झाली.. आज धुलीवंदन (धुळवड) आहे. अजून चार दिवसांनी रंगपंचमी येईल. भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची एक परंपरा आहे. निसर्गाच्या बदलाप्रमाणे व कृषिसंस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण साजरे करणारा भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे. जगातील इतरही देशात त्यांच्या संस्कृतीनुसार उत्सव साजरे होतात पंरतु वर्षाच्या बाराही महिन्याला येणारी सणांची माळ बहुदा आपल्याच देशात असेल. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेनुसार सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या खंडप्राय  देशात खान-पान, राहणीमान, भाषा जश्या वेगवेगळ्या आहेत तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
आपल्या राज्याचा विचार करता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची सुरवात होते तर फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीने, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलीवंदनाने व धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीने वर्षाची सांगता होते. होळी ते रंगपंचमी हा एकच सण मानला जातो.

शेकडो वर्षांपासून होळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. ^^काहींच्या मते होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत आहे, तर काही लोक त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. पुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नावाची राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेतून साजरा होतो आहे.^^
होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. काही ठिकाणी होळीची राख पाण्यात मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जाते. उत्तर भारतात धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची होळी खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उत्तर भारतीय मोठ्या प्रमानार स्थलांतरित झाल्यामुळे व चित्रपटातील सेलिब्रेटींना हाताशी धरून विविध कंपन्यांनी धुलीवंदनाचे मार्केटिंग केल्यामुळे आजच्या दिवशी रंगांची होळी(होली) खेळली जाते. त्यामुळे मोठ्या शहरात मराठीसण असणारी रंगपंचमी कुठेतरी मराठी भाषेसारखीच हरवत चालली आहे.

कोकणात होळीला शिग्मो म्हणतात. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शिमगा म्हणतात.
शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढतात त्याला शिमग्याने सोंग म्हणतात. काही ठिकाणी तर वेगळीच तरा असते... कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बोरीचा बार यासाठी प्रसिद्ध आहे. काही गावामध्ये जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. धिंड झाल्यावर जावयाला सुहासिनिकडून उटण्याने आंघोळ घातली जाते व पोशाख देऊन सन्मान केला जातो. जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा असते. त्‍यामुळे गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. नाशिक जिल्ह्यातील वंडांगळी या गावात अशी पध्द्त असल्याचं वाचनात आलं आहे. अजूनही वेगवेगळ्या खेडोपाडी वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत.
कोणत्याही रूढी परंपरांचा काही अर्थ असतो. चुकीच्या रूढी परंपरा बंध झाल्या पाहिजेत व कालांतराने त्या बंधही होतात. काही चांगल्या परंपरांचे जतन करणे हेही सर्वांचे काम आहे. वाईट रूढी परंपरा बंध होताहोता आता दारू पिऊन धुळवड साजरी करण्याची नवी परंपरा काही ठिकाणी चालू होताना दिसते आहे. आषाढ आमावस्याची गटारी आमावस्या झाली. त्याचप्रमाणे धुलीवंदन(धुळवड) म्हणजे पिणाऱ्यांसाठी पर्वणीच अस काहीसं चित्र तयार होत आहे.
अलीकडे राजकीय धुळवड असाही शब्दप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो आहे. यातून राजकीय विचारांचे पतनच सुचवायचे असते. नुकत्याच झालेल्या विविध निवडूनकामधून राजकीय धुळवड दिसून आली आहे.

होळीच्या आधी झाडांची पानगळ झालेली असते. तो पालापाचोळा गोळा करून, परिसरातील कचरा एकत्र करून त्यात आपल्या मनातील वाईट विचार टाकून होळी पेटवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड, गोवऱ्या(शेण्या) जाळणे कुठेतरी थांबायला हवे. होळीच्या अग्नीत मनातील काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर, अहंकार यांना जाळून टाकायला हवे. पण हे विकार मनात ओझं म्हणून वागवणारे आपले मन खूपच विचित्र असते. बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात...

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते. (मंत्राने विष उतरत नाही, शब्दशः अर्थ घेऊ नये) पण मनातील विष म्हणजे वाईट दुषवृत्तीवर कोणता इलाज?? आपल्या स्वभावातील दोष शोधून त्याचे निर्मूलन करणे हा होळीचा उद्देश व्हायला हवा.

धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते. शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते. होळीपासून वाढणाऱ्या उष्म्यात झाडांची नवी पालवी डोळ्यांना सुखावते. पशु पक्षांना आपल्या सावलीत घेते. ऋतूंचा राजा म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतु हा तारुण्याचा निदर्शक आहे. जुनी जळमटे काढून नवी पालवी लेऊन आयुष्याचा मार्ग चालायचा असतो. असा काहीसा संदेश वसंतऋतु देत असतो. अडचणी आल्या, संकटे आली म्हणून निराश होऊ नका. वसंत होऊन नव्याने नवी सुरवात करा असाच संदेश तो देतो.

रंगपंचमी उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते.¶
सध्या रंगपंचमीला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का याची जागा कृत्रिम रासायनिक रंगांनी घेतली आहे. रासायनिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. कृत्रिम रासायनिक रंग बाजारात उघडय़ावरही विकले जातात. या रंगाच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते, डोळ्यांना त्रास होतो. रंगपंचमीला कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर हवा. हुल्लडबाजीला आवर हवा. रंगाच्या पाण्याचे फुगे मारणे हा धोकादायक प्रकारही थांबायला हवा. या दिवशी रंगांची उधळण करून एकमेकाप्रति जिव्हाळा, मैत्री, स्नेह जपण्याचा प्रयत्न हवा.

वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?? होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली विभिस्तपणा होणार नाही याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष असायला हवे. आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल... नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.
सर्वांना होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदिप रामचंद्र चव्हाण.

^^ संदर्भ:- भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा
¶¶ संदर्भ:- मराठी विश्वकोश.