My Blog List

Monday 3 September 2018

पूर्णपुरुष कृष्ण

पूर्णपुरुष कृष्ण
काल कृष्णजन्माष्टमी झाली आणि आज गोपाळकाला सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे #कृष्ण! कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा शब्द म्हणजे कृष्ण!
◆कृष्ण शब्दाचा मूळ संस्कृत कृष् धातूशी संबंध आहे. कृष् म्हणजे खेचणे‚ ओढणे. कृष् वरूनच कृषी म्हणजे शेती हा शब्द बनला आहे. शेतकरी शेत नांगरतो‚ नांगर ओढतो‚ ही कार्ये ह्यात अभिप्रेत आहेत. येथे खेचणे म्हणजे जो सगळ्या घटना ओढून घेतो‚ सगळी सारतत्त्वे ग्रहण करतो आणि नंतर ती वहन करून नेतो तो कृष्ण‚ असा एक अर्थ होतो. कृष्ण शब्दाचा संबंध ‘कर्षण’शी जोडता येईल. कर्षण म्हणजे आकर्षणचे मूळ रूप. जो आकर्षक आहे व तो कृष्ण!!◆

आजच्या घडीला कृष्ण आणि त्याचे चरित्र  किती लाभकारक ठरेल हा प्रश्नच आहे. शिवाय कृष्ण होता की नव्हता याबद्दलही मतमतांतरे आहेत. महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी साजऱ्या करण्यात धन्यता मानून त्याच्या विचारांना कायमच फाटा देणार्यांनी कृष्णाच्या जयंतीचाही इव्हेंट केला आहे. असे असले तरीही चांगल्या गोष्टींचा, विचारांचा फायदा कोणत्याही व्यक्तीला आणि समाजाला कायमच होत असतो. महामानवांच्या चरित्रातील प्रेरणादायी गोष्टी पाहून, ऐकून समाजाला नवप्रेरणा मिळू शकते. किमान या हेतून तरी अशी चरित्र पहावयास हवीत.

 कृष्णाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतला देवकीच्या पोटी! मोठा झाला यशोदेच्या मातृछायेत, तिच्याच अंगणी खेळला, हट्ट केला, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या अगदी यशोदेचा मारही खाल्ला. लहानपणापासून तो संकटात वाढला. मृत्यूची छाया त्याच्या जन्मापासून त्याचा पाठलाग करत होती. परंतु प्रत्येकवेळी तो संकटांना पुरून उरला..! सामान्य बालकप्रमाणे बाललीला करत हसतमुखाने लहानाचा मोठा झाला.


कृष्ण श्रीमंत घरात जन्मला. परंतु तो रमला गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये. त्याच्याबरोबर खेळला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा कृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. या आपल्या कृतीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश तो देत होता. कृष्णाने कधीही गरीब श्रीमंत, उच्च- नीच असा भेदभाव केला नाही. त्याला पांडव जितके प्रिय होते तेवढेच त्याचे सुदाम्यावरही प्रेम होते. समाजातील सर्व घटकांशी तो एकरूप होऊन वागला.
गोकुळात उत्पादित होणारे दूध, लोणी, तूप इत्यादी मथुरेतील लोकांना विकले जायचे. त्यावर कंसाची प्रजा, सैनिक पुष्ट व्हायचे. आणि गोकुलवासीयांनाच त्रास द्यायचे. गोकुळात निर्माण होणाऱ्या दूध,दही,ताक,लोणी यावर पहिला हक्क गोकुळातील बालगोपालांचा आणि उरले तर इतरांचा. गोकुळातील भावी पिढीच्या आरोग्यासाठी हितकारक असणारा हा विषय कृष्णाने गोकुलवासीयांना पटवून दिला. वेळप्रसंगी त्याने लोण्याची चोरी करून आपल्या सवंगड्यांना खायला दिले.
आज या घटनेकडे पाहताना आपल्या लक्षात येईल, शेतकरी काबाडकष्ट करून दूध उत्पादन करतो. आपल्या लहानग्यांच्या आणि स्वतःच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी खातो. पोटाला चिमटा घेऊन, पैशासाठी उत्पादित दूध कवडीमोल दराने डेअरीला, शहरातील नवश्रीमंताना इमाने- इतबारे पोचवतो. आर्थिक विवंचना असल्याने त्याच्यापुढेही पर्याय नसतो. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या गोकुळात कृष्णासारखा नेता होईल का नाही माहीत नाही. परंतु मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या नेत्यांची गर्दी पाहिलीे की कृष्णासारख्या नेतृत्वाची आठवण होते.

बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हा गुण कृष्णात होता. गोकुलवासीयांना त्रास देणाऱ्या कालियासर्पाला त्याने यमुनेतून पिटाळून लावले. कर्मकांडापेक्षा कर्माचा पुरस्कार त्याने केला. अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम त्याने केले.  इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वत हाच गोकुळाचा रक्षणकर्ता आहे हे गोकुलवासीयांना पटवून दिले. दुर्लक्षित असणारी गुरख्यांची #बासरी हातात घेऊन प्राणपणाने त्याने फुंकली. तिच्यातून उमटलेल्या स्वरांनी बसरीला संगीतक्षेत्रात अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळवून दिली. साध्या आणि दुर्लक्षित गोष्टीही किती मोठ्या असतात किंवा होऊ शकतात याचाच संदेश जणू त्याने दिला.

गोपिकांशी आणि राधेशी त्याच नातं हे वासणारहीत प्रेमाचे प्रतीक होते. आज या गोष्टीचा वेगळ्या पध्द्तीने विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, राधेला/ गोपिकांना कृष्ण मिळाला नाही किंवा कृष्णाला राधा मिळाली नाही म्हणून त्यातील कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. किंवा स्वतःला इजा करून घेण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचली नाही. कारण त्याचं प्रेम हे त्यागाच्या भक्कम पायावर उभे होते. ते अपेक्षारहित, वासणारहीत, निर्व्याज प्रेम होते. आज टिनएजर्स, कॉलेज तरुण- तरुणी यांची प्रेम(?)प्रकरणे पाहिली की आठवण होते ती #राधाकृष्णाची!

कृष्णाने नेहमीच सामान्यांच्या हिताचे रक्षण केले. धोका पत्करून नेतृत्व स्वीकारले. वेळप्रसंगी आप्तांनाही शिक्षा केली. कंस हा मामा असूनही कृष्णाने त्याचा वध केला. शिशुपाल हा आत्तेभाऊ होता, शंभर अपराध भरल्यावर एकशे एकावा अपराध करण्याची संधीच त्याने शिशुपलास दिली नाही. कृष्णाने ज्या विचारांचा, तत्त्वांचा आयुष्यभर पुरस्कार केला त्यानुसारच तो वागला. उच्चार आणि आचार यांत त्याने फरक केला नाही. गोकुळात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करून कंसवधानतर तो मथुरेत स्थिरावला. गोकुळ सोडल्यानंतर पुन्हा कधीही तो परतून गोकुळाकडे फिरकला नाही. मथुरेत उग्रसेनाने दिलेले राजेपद त्याने नाकारले. आणि तरीही तो यादवांचा नेता राहिला. सत्ता मिळवण्याची, तिचे रक्षण करण्याची पात्रता असूनही सत्तेचा लोभ त्याला नव्हता. खुर्चीची आसक्ती त्याला नव्हती. निर्लोभी आयुष्य कसं जगावं हे कृष्णाने आपल्याला शिकवले आहे. दुर्दैवाने त्याच्याच नावावर आज दहीहंडीचा बाजार भरवून सत्तेची खुर्ची जवळ करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

जरासंध हा कंसाचा सासरा होता. कंसवधानंतर त्याने मथुरेवर अनेक आक्रमणे केली. यादवांनी प्रत्येकवेळी त्याला शौर्याने प्रतिकार केला. जरासंधाबरोबर वारंवार होणारे युद्ध व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृष्णाने संपूर्ण मथुराच दूर द्वारकेत वसवली. यामुळे त्याला कोणी रणछोडदासही म्हणाले परंतु त्याची तमा त्याने बाळगली नाही. कृष्णाची मथुरेतून माघार ही त्या काळानुसार खूप मोठी व महत्वाची घटना आहे. या कृतीमुळे यादवांना सुरक्षितता, स्वास्थ मिळाले, त्यांची भरभराट झाली. परंतु हे रणांगणातून पळ काढण्यासारखे होते. काहींची नाराजी पत्करून कृष्णाने ही कृती केली.
●‘वर्तुणुकीचे कोरडे नियम पाळणारे आणि त्यांना चिटकून राहणारे नष्ट होतात.’ तर ‘काही वेळेस नुसते जिवंत राहणे, अस्तित्व टिकवून ठेवणे हेच एक मूल्य ठरते. कारण अस्तित्व आणि फक्त अस्तित्वच मूल्याधिष्ठित- मूल्यात्मक जगाची निर्मिती करण्याची शक्यता निर्माण करते.’● हे तत्व त्याने या (माघार घेण्याच्या) कृतीतून पटवून दिले.

द्वारकेमध्ये आल्यावर रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती यांच्याबरोबरचा विवाह, स्यमंतक मण्याच्या चोरीचे प्रकरण, स्यमंतक मण्यावर हक्क असूनही तो अक्रूराच्या हवाली करणे, कृष्ण पांडव भेट, जरासंधाचा भिमाकरवी केलेला वध, पंढवांच्या वनवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, पांढवांचा वनवास संपल्यावर कौरव-पंढवांच्या समेटासाठी- शांतीसाठी केलेला प्रयत्न या महत्वाच्या घटना आहेत.

नरकासुरवध आणि नरकासुराचा कैदेत असणाऱ्या, त्याच्या अत्याचारास बळी पडलेल्या आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या हजारो स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकारून केलेले त्यांचे #पुर्नवसन ही खूप मोठी आणि क्रांतिकारक घटना आहे.

महाभारत युद्धात अर्जुनाचा सारथी होणे. ही घटनाही खूप मोठी व महत्वपूर्ण आहे. त्या काळात सारथी हे काम तुलनेने कमीपणाचे होते. परंतु कृष्ण कोणतेही काम कमीपणाचे मानत नव्हता. त्याने सारथी होऊन कृतीतून ते पटवून दिले. त्याने अर्जुनाचे सारथ्य केले. एक प्रकारे मार्गदर्शन केले. युद्धातून प्रारंभीच माघार घ्यायला निघालेल्या अर्जुनास ‘गीता’रूपी तत्वज्ञान सांगितले. त्याला त्याचे कर्म आणि क्षत्रियाचा धर्म सांगितला. अपराजित योद्धा असूनही हाती शस्त्र न घेता सुयोग्य योजना बनवून पांडवांना विजय मिळवून दिला.

यशाच्या, समृद्धीच्या शिखरावर असणाऱ्या यादवांना सत्तेचा, संपत्तीचा, शक्तीचा अहंकार झाला. यादव उन्मत्त झाले. मद्यपानाच्या आहारी गेले. मद्यपी यादवांना नाशापासून वाचविण्याचा, मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. त्याने द्वारकेत दारूबंदीही केली. परंतु यादवांनी मर्यादा ओलांडली, भावबंदकी उफाळून आली आणि त्यांचा नाश झाला. मदमस्त झालेल्या आप्तांनाही कृष्णाने वाचवले नाही किंवा यादव आपापसात भांडत असताना त्यांच्याकडे त्याने संपूर्ण दुर्लक्ष केले. तो प्रत्येक गोष्टीत भरून पावला आणि तेवढाच अलिप्तही राहिला.

कृष्णाचा स्वत:चा शेवट दु:खदायक आहे. त्याच्या आयुष्यात झालेल्या अनेक युद्धात कोणत्याही शस्त्रा-अस्त्राचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. साधा ओरखडाही उठला नाही. परंतु ‘जरा’ नावाच्या व्याध्याच्या साध्या क्षुल्लक बाणाने कृष्णाचा मृत्यू झाला! त्यातून काळाने मानवजातीला धडा दिला आहे... माणूस कितीही महान, देवतुल्य, असू दे, #मृत्यु हे अंतिम सत्य आहे. आणि कृष्णही त्याला अपवाद नाही.

कृष्णाबद्दल लिहण्याइतकी माझी पात्रता कदाचित नसेलही. परंतु लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी, अलीकडे त्याच्याबद्दल वाचलेली पुस्तके यातून कृष्ण या व्यक्तिमत्वाबद्दल काय वाटतं हे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
लोणी खाणारा बाळकृष्ण, बालगोपालांचा सवंगडी, बासरी वाजवणारा वादक, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आद्यसमाजसुधारक, अन्यायाला वाचा फोडणारा बंडखोर, वासनारहीत प्रेमाची परिभाषा शिकवणारा प्रेमी, मैत्रीला जागणारा/जपणारा मित्र, जबाबदारीची जाणीव असणारा पती, प्रेमळ पिता, चक्र-गदा-पाचजन्य हाती घेतलेला योध्दा, पांडवांचा समेटाचा प्रस्ताव कौरवसभेला प्रभावीपणे पटवून देणारा वक्ता, गोंधळलेल्या अर्जुनाला गीता सांगणारा तत्वज्ञ, सर्व शत्रूंना साम-दाम-दंड-भेद या नीतीने पराभूत करणारा राजकारणपटू असे असंख्य गुण कृष्णात होते म्हणूनच त्याला #पूर्णपरुष म्हणतात.
आणि म्हणूनच म्हणतात… झाले_बहु_होतील_बहु_परी_या_सम_हा!!!!

आजच्या घडीला कृष्ण नसला तरी कृष्णाचे बालपण प्रत्येकाच्या घराघरात रांगत असते. घरोघरी प्रत्येकाचा एक बाळकृष्ण(मुलगा/मुलगी या अर्थाने) असतो. आणि तसं पाहिलं तर लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये खोडकर,निरागस, हट्टी, बंडखोर, हवाहवासा, एक #बालळकृष्ण असतोच! परंतु मोठेपणाचे (वय,पद,प्रतिष्ठा) जोखड घेऊन वावरणारे आपण सर्वजण आपल्यातल्या बाळकृष्णाला स्वतःच कारागृहात डांबून ठेवतो…! आणि साऱ्या विश्वाचा भार डोक्यावर घेतल्यासारखे मख्ख चेहऱ्याने आयुष्य जगत असतो. ‘पूर्णपुरुष’ होता नाही आलं तरी किमान गरज आहे आपल्यातल्या बाळकृष्णाला जपण्याची….!! आणि तीच पहिली पायरी असेल कृष्णत्वाच्या प्रवासाची….!!
@संदिप रामचंद्र चव्हाण.

संदर्भ: ◆महाभारतातील पितृवंदाना
          ● या सम हा
           युगधंर
            व्यासपर्व

No comments:

Post a Comment