My Blog List

Saturday 22 September 2018

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे ब्रीदवाक्य आणि “वटवृक्षाचे” बोधचिन्ह घेऊन सामान्य रयतेच्या घराघरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारे ‘रयत शिक्षण संस्थेचे ' संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज १३१ वा जन्मदिन.

 महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी सुरवातीला मुलांसाठी वसतिगृहे स्थापली. शिक्षणासाठी मोठ्या गावात येणाऱ्या दिनदुबळ्या, गरीब, वंचीत घटकातील मुलांसाठी ‘कमवा व शिका’ हा नवा मूलमंत्र देऊन स्वाभिमान, स्वावलंबन शिकवले. ज्या काळात टोकाची जातीव्यवस्था, कर्मठता होती त्याकाळात सर्व जाती-धर्मातील मुलांना एकच वसतिगृह स्थापन करण्याच्या त्यांचा निर्णय मोठा धाडसाचा होता. ‘‘भाऊराव‚ मला साबरमती आश्रमात जे करता आले नाही‚ ते तुम्ही सातारसारख्या एका छोट्या गावी करून दाखविले; याबाबत मी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.’’(हिंदीमध्ये) असे गौरवोद्गार महात्मा गांधींनी सातारच्या ‘छ.शाहू बोर्डिंग हाउस’बद्दल काढले होते.

१११९ मध्ये काले (ता. कराड, जि. सातारा) येथे सत्यशोधक समाजाची परिषद होती. त्यावेळी भाऊरावांनी आवाहन केले की, ‘‘आपल्या समाजाचे विचार आपण भाषणे व जलसे यांद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत परंतु, आपल्या विचारांप्रमाणे जनता सुधारत असल्याचे आढळून येत नाही. शिक्षण प्रसाराशिवाय याला परिणामकारक तोडगा मला तरी दिसत नाही. म्हणून बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण देण्याकरिता एक शिक्षणसंस्था स्थापन करणे आवश्यक आहे.’’ ही सूचना सर्वांना पसंत पडली आणि त्याप्रमाणे ठरावही झाला व ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना झाली.

वसतिगृहातील मुलांसाठी कर्मवीर अण्णांनी मूठ मूठ धान्य गोळा केले. अण्णांच्या गैरहजेरीत पत्नी लक्ष्मीबाईंनी स्वतःचे  सर्व दागिने वेळोवेळी मोडून शेवटी सौभाग्याचे लेणे मंगळसूत्रही मोडून मुलांच्या जेवणाची सोय केली.
किर्लोस्कर नांगराचे सेल्स एजंट म्हणून नोकरी करणारे आणि त्या नोकरीला साजेसा पोषाख करणारे आण्णा, नोकरी सोडून रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी फकिरासारखे आयुष्य जगले. गोरगरीब मुलांसाठी देणग्या गोळा करायला अखंडपणे अनवाणी पायाने फिरले. शरीराने धिप्पाड, पैलवान असणारे आण्णा अतिशय सत्यप्रिय स्वभावाचे होते. कोल्हापुरात इंग्रजांच्या राजा- राणीच्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासले त्या ‘डांबर प्रकरणात’ खोटा गुन्हा दाखल झाल्यावर इंग्रज पोलिसांनी त्यांना असंख्य यातना दिल्या. आण्णा बाबाजी लठ्ठेंच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी इंग्रजांनी त्यांना खूप त्रास दिला. मात्र आण्णानी खोटी साक्ष दिली नाही. हे लठ्ठे म्हणजे ज्यांनी अण्णांना जैन वस्तीगृहातून हाकलून लावले होते ते, परंतु अण्णांनी त्याच्याबद्दल मनात कसलीही अढी ठेवली नाही.
राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधकार ठाकरें या दोघांशीही अण्णांचा चांगला स्नेह होता. त्यांनी सातारच्या वस्तीगृहालाही शाहूमहाराजांचे नाव दिले.
सातारच्या वसतिगृह भेटीच्यावेळी महात्मा गांधीनी कर्मवीर अण्णांना जिज्ञासेपोटी विचारले‚ ‘‘भाऊरावजी‚ आपने इस बोर्डिंग को राजर्षी शाहू महाराज का नाम दिया है। उन्होने आपको कितने पैसे दिये है?’’ भाऊरावांनी उत्स्फूर्त उत्तर दिले‚ ‘‘उनसे मैंने कुछ भी पैसा नहीं लाया‚ लेकिन मैं उनसे बडा दिल लाया हूँ ।’’ आज या मोठ्या मनाच्या, मोठ्या दिलाच्या दिलदार महामानवाची जयंती आहे.

सध्या शिक्षण सम्राटांनी शिक्षण संस्थांना पैसे छपाईचे कारखाने बनवले आहेत; उच्च शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे; सरकारी शाळांची अवस्था तोळा-मास झालेली आहे; अश्यावेळी स्वतः मॅट्रिक नापास असूनही असंख्य तरुणांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या; बहुजनांच्या शिक्षणासाठी अखंडपणे झटणाऱ्या; प्रचलित शिक्षणपद्धतीत ‘कमवा व शिका’ या अनोख्या आणि क्रांतिकारक पध्दतीची सुरवात करणाऱ्या कर्मवीर आण्णांनसारख्या शिक्षणमहर्षीची समाजाला खूप गरज आहे.

कर्मवीर अण्णांना विनम्र अभिवादन!!

संकलन: @संदिप रामचंद्र चव्हाण.
(लेख लिहताना गुगलवर उपलब्ध माहितीचा आधार घेतला आहे; शिवाय काही पुस्तकांमधील माहितीचा उपयोग केला आहे)

No comments:

Post a Comment