My Blog List

Friday 30 November 2018

टू सर, विथ लव्ह

ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक बणतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी अनुवाद केलेला आहे.


दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६)
निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…!

या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे.
असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते.
सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक ब्रेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत.

मला या पुस्तकाबद्दलची माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या बखर शिक्षणाची या पुस्तकातून मिळाली. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे.
भारतात आज खाजगी शिक्षणसंस्थांचे आलेले उदंड पीक, सरकारी/अनुदानित शाळेतील/महाविद्यालयाततील कायम असणाऱ्या शिक्षक/प्राध्यापकांची विद्यार्थ्यांबद्दलची अनास्था; बहुसंख्य काँट्रॅक्ट भरती केलेले शिक्षक व त्यामुळे त्यांना आलेले नैराश्य; प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकांची समाजाशी-विद्यार्थ्यांशी तुटलेली नाळ; शिक्षकी पेशाचे विसरले गेलेले भान; कुठेच रोजगार नाही म्हणून नाइलाजाने शिक्षक झालेले शिक्षक; संस्था चालकांना लाखों रुपये देऊन व वशिलेबाजी करून मिळवलेली नोकरी; प्राथमिक/माध्यमिक शाळेतील मुलांची मानसीकता त्यांचं निरागस मन समजून घेण्यात आलेलं अपयश इत्यादी अनेक दोष आजच्या बहुसंख्य शिक्षकांमध्ये दिसतात. काही शिक्षक याला अपवाद आहेत; जीव तोडून, पदरच्या खर्चाने, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टाने आणि नेटाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. ब्रेथवेट यांचं टू सर, विथ लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे.
आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट (शिक्षक) प्रत्येक तरुणाला, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.
@संदिप रामचंद्र चव्हाण.

टू सर, विथ लव्ह
मूळ लेखक: ई. आर. ब्रेथवेट
मराठी अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत: ₹१८०
पाने: २०४


Saturday 24 November 2018

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)

‘ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत’ अशांना अर्पण केलेला ‘अलोक’ हा सहा कथांचा कथासंग्रह म्हणजे बदलेल्या ग्रामीण जीवनाची वास्तवता सांगणाऱ्या जणू सहा कादंबऱ्या आहेत.
ग्रामीण कथा म्हणजे किस्से आणि इरसाल गोष्टी अशा समिकरणातून ग्रामीण कथेला यशस्वीपणे बाहेर काढण्याचे काम लेखक आसाराम लोमटे यांनी केलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही दशके खेडे आणि शहर यात बराच फरक होता. उत्तरोत्तर शहर आणि खेडे यांच्या सीमारेषा धुसूर होऊ लागल्या. आजच्या घडीला खेडं कुठं संपतं आणि शहर कुठं सुरू होतं हेही लक्षात येत नाही. सगळी सरमिसळ जाणवते.
शहर आणि खेडं यांच्यातील फरकाने ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ अशी वर्गवारी केली होती. इंडियाने भारताचे शोषण केले ही वास्तवता असली तरी भरतातल्या भारतातही शोषणव्यस्था होती/आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकानी ‘आलोक’ या कथासंग्रहात केलेला आहे.

या कथासंग्रहात एकूण सहा दीर्घकथा आणि एक परिशिष्ट आहे. यातील प्रत्येक कथेची मांडणी, त्यातील बोलीभाषा, प्रसंगाचे वर्णन वाचकाला गुंग करून टाकते.  कथेतील सर्व प्रसंग आपल्याच समोर घडतायत, जणू आपण एखादा चित्रपट पाहतोय असं वाचकाला जाणवतं.

खेड्यातला माणूस म्हणजे केवळ शेतकरी नव्हे तर शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया, मुलं/मुली, शाळेचे शिक्षक, छोटे मोठे व्यावसाईक इत्यादी सर्व घटकांचे मिळून खेडं बनतं. खेड्यातील या माणसांचं संघर्षम जगणं, या जगण्यातले ताणतणाव, त्यांना रोज भेडसावणाऱ्या अनंत अडचणी, त्या अडचणींचा सामना करताना आणि प्राप्त परिस्थितीशी झगडा देताना त्यांच्या मनाची होणारी तगमग, त्यांच्या जीवाची होणारी घालमेल, जीवन जगण्यासाठीचा त्यांचा चिवट जीवनसंघर्ष, संघर्ष करताना येणारं अपयश, गमावलेला आत्मविश्वास, आणि तरीही उठून उभा राहण्याचा प्रयत्न, काहींच्या वाट्याला आलेलं धडपडत जगणं, आणि जगण्यासाठीची धडपड तर काहींच्या वाट्याला आलेली पद-प्रतिष्ठा-सत्ता-संपत्ती, त्याबरोबरच खेड्यापाड्यापर्यंत पोचलेलं भ्रष्ट- वेडंवाकडं राजकारण, राजकारणात सरळ माणसाचे होणारे खच्चीकरण, खेड्यातील वाढती व्यसनाधीनता, जमीन-जुमल्यावरून होणारी भांडणं- मारामाऱ्या त्यातून होणारे खून, इतक्या साऱ्या प्रसंग-घटना-परिस्थितीचे वर्णन ‘आलोक’ या कथासंग्रहात येतं. यातील सर्व कथा मनाच्या आतपर्यंत उतरतात. काही कथा मनाला गदगदून हलवून सोडतात तर काही मनाला चटका लाऊन पापण्याच्या कडा ओलावुन जातात.

#ओझं’ ही मनाला चटका लावणारी अशीच एक कथा. या कथेत आपल्यापेक्षा सात-आठ वर्षानी मोठ्या पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावानं केलेला संवाद आहे. मोठा भाऊ लग्न झाल्यावर, आठव्या इयत्तेत असणारी एक पोर पदरात असताना, सततची नापिकी, वाढत्या कर्जाला कंटाळून व्यसनाच्या आहारी जातो. आर्थिक विवंचना, वाढते कर्ज आणि दुष्काळी परिस्थितीमुळे गावाकडील भाव कमालीचा खचून जातो आणि आत्महत्या करतो. 
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही मृत भावाची बायको जणू निवडुंगातून वाट काढण्यासाठी खंबीर उभी राहते. तिचं आयुष्य म्हणजे जत्रा पांगल्यासारखं, वैशाखातील उन्हांन आयुष्यभरासाठी पाल ठोकावं तसं. आता साऱ्या घराचा डोलारा तिच्यावर.
ज्या घरात कर्त्या माणसाची आत्महत्या होते त्या घरातील लोकांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते, विशेषतः गेलेल्या व्यक्तीच्या बायकोला नवऱ्याच्या पश्चात कच्चीबच्ची वाढवताना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागतात, सामन्य शेतकरी कुटुंबात कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते याची कल्पना या कथेतून येते.

#वळण’ ही मनाचा ठाव घेणारी अशीच दुसरी कथा! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या बापाची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली त्या शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना त्या वाटेवर कोणाचीतरी किंकाळी ऐकते, मागे वळून पाहते तर डोंगराच्या टेकडीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. पुढे प्रयगच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं.
या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावले पोट असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील एक कोडं सुटावं तर दुसऱ्या कोड्यात फसावं अशी अवस्था. संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करते.

#जीत ही कथा ग्रामपंचायत पोटनिवडणूक व त्यातील शह-काटशह यावर बेतलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य असणारा नवरा अचानकपणे अपघातात गेल्यानंतर त्याच्या बायकोला पोटनिवडणुकीचा अर्ज भरायला कसं मजबूर केलं जातं. ग्रामीण भागात भावकीचे राजकारण कसं चालतं. निवडणुकीत पैसा, दारूचा पूर कसा वाहतो याच जिवंत चित्र या कथेतून डोळ्यासमोर उभं राहतं. 

#खुंदळण' ही कथाही राजकारणावर बेतलेली आहे. दत्ताराव हा एक सामाजिक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ता सततच्या पराभवाला कंटाळून, लेकीच्या लग्नाला पैशाची चणचण असताना आमदाराने केलेल्या आर्थिक मदतीच्या ओझ्याखाली दबून पक्षांतर करतो. परंतु त्याचा पिंड या नव्या राजकीय संसारात रमणारा नाही. त्याच्या मनाची घालमेल, जुन्या साथीदारांचं टोचून बोलणं, नव्यानी त्याला उपरा मानणं. यात त्याची कमालीची घुसमट होते. राजकारणातील सामन्य कार्यकर्त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याचं वर्णन या कथेत आहे.

गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन #कुभांड’ या कथेतून होते.

जमीन जुमल्यावरून खून होऊनही हैद्राबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा म्हणून नोंद झालेल्या आणि आजोबाच्या पाठीमागे #चिरेबंदी’ वाड्यात एकटीच राहणाऱ्या आजीच्या शहरातून आलेल्या नातवाला त्या वाड्याबद्दल आत्मीयता न वाटण्याचे कारण चिरेबंदी या कथेत रेखाटलं आहे.

अशा सहा कथा संपल्यावर परिशिष्ट आहे. परिशिष्टात लेखकानी त्यांच्या लिहण्यामागची भूमिका, पत्रकारिता करताना त्यांना समाजात येणारे अनुभव, बदलत्या वास्तवाची झालेली जाणीव इत्यादी गोष्टींचा उवापोह केलेला आहे.

आसाराम लोमटे यांची लेखनशैली वर्तमानातील खऱ्याखुऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारी वाटली. शहरी व्यक्तीला या कथा किती जवळच्या वाटतील हे सांगता येत नाही. परंतु माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या व तिथल्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना हा कथासंग्रह म्हणजे आपल्या गावातीलच घटना आहेत असं वाटल्यास नवल ठरणार नाही.
या पुस्तकातील ‘नाहि रे ‘वर्गाच्या व्यथा सगळीकडे सारख्याच वाटतात. गावोगाव बदलेलं राजकारण, गरिबांचं होणारे शोषण, स्वार्थासाठी कुणाचेही नुकसान करणारी माणसं, वाढती व्यसनाधीनता, तरुण पिढीला आलेलं नैराश्य, वेळीअवेळी पडणारा पाऊस, सततचा दुष्काळ, भाऊबंदकीचे तंटे, उत्पन्न आणि खर्चाचा न बसणारा ताळमेळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड आणि असंख्य तडजोडी, परिस्थितीमुळे अर्ध्यावर सोडावं लागणारं शिक्षण, कसतरी शिकलं तरी नोकरीचा आ-वासून असलेला प्रश्न, एखाद्या उद्योग धंद्यासाठी उपलब्ध न होणारं भांडवलं, शेतकरी मुलांची न होणारी लग्ने, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली तरुण/तरुणी  या व अश्या कित्येक सामाजिक समस्यांनी उग्र रूप धारण करायला सुरुवात केलेली आहे. यातील बहुतेक समस्यांचे प्रतिबिंब लोमटे सरांच्या ‘आलोक’ मध्ये उमटले आहे असं मला वाटतं आणि ते संवेदनशील मनाला साद घालतं, जागं करतं. म्हणूनच प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीनी हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचावे असे माझं मत आहे.
@संदिप रामचंद्र चव्हाण.

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)
लेखक: आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन
किंमत: ₹२५०
पृष्ठ संख्या: १८२ संख्या: १८२

Monday 19 November 2018

दिन_दिन_दिवाळी

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाईचा चारा, बैल नवरा,
झंडू माळ्या, म्हशी काळ्या,
म्हशीच्या पोटी, हंब रेडं,
गाईच्या पोटी चिक्कार पाडं….


बारा-पंधरा पोरांचं टोळकं मोठ्या आवाजात दिवाळीचं गाणं (लोकगीत) गात एका घराच्या चौकटीतून पुढच्या घराच्या चौकटिकडं सरकत होतं. मी चौकात उभा राहून हे पाहिलं आणि एकदम चकित झालो. लगेचच त्यांच्या जवळ येऊन उभा राहिलो… पोरं सगळी वळकीचीच…. वयानं लहान असली तरी चांगली दोस्त असणारी. ह्या पोरांनी एखाद्या घरापुढे मोठ्या आवाजात सूर धरला की त्या घरात उपस्थित असणारी सर्व माणसं, पोरं-बाळं त्यांना पहायला चौकटीत येऊन उभी रहायची. त्या घरातील कोणीतरी अजून एक गाणं(लोकगीत) होऊन जाऊद्या म्हणले की पोरांना हुरूप यायचा… आणि लगेच फर्माईश पूर्ण व्हायची.

अकाकू मकाकू,
कुंच्या बैलाला घालू जु, घालू जु.
रतन बैल कुंनाचा, कुंनाचा,
पाटीव झेंडा फुलांचा, फुलांचा.
फुल गेले दिवसाळी, दिवसाळी,
दिवसाळीला आला राग, आला राग.
शाळेतल्या पोरांनी मारला वाघ, मारला वाघ.
गुरुजींच्या पोरांनी खाल्ला वाघ, खाल्ला वाघ.
(कष्टकऱ्यांच्या कष्टावर बुद्धीजीवी कायमच डल्ला मारतात.. ही अगतिकता वर्षानुवर्षे यातून व्यक्त होते आहे)

हे गीत झालं की , दिन दिन दिवाळी हे अजून दुसऱ्या प्रकारात म्हणायचीत…

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाई-म्हशी कुनाच्या,
लक्ष्मनाच्या.
लक्ष्मन कुनाचा, आई-बापाचा.
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी.!
(माईनं खोबऱ्याची वाटी खायला दिली तर वाघालाही घाबरणार नाही हा आत्मविश्वास यात दिसतो)

बायबापड्या ओवळायला आल्या की गीत म्हणणाऱ्या पोरांना आनंद व्हायचा मग ते गीतातून तेल मागायची…

आक आकल्याच, घोडं लाकडाचं,
मिशी मांजराची, दाडी उंदराची,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
सखुबाई,ठकुबाई सण-वार आला,
दिन दिन दिवाळी, पळी पळी तेल घाला.
(शेतीला त्रास देणाऱ्या रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन यात आहे)

पळी पळी तेल घाला म्हणून मोठा आवाज व्हायचा. घराघरातील आयाबहिणींनी तेलाची धार धरली की पोरं वामणाच्या शेंडीला हात घालायची…

वाकडी तिकडी बाभळ,
त्याव बसला व्हला,
मी दिला टोला,
टोला गेला गंगेत,
गंगेची माणसं,
लिंबऱ्याची कणसं,
तिळाची पेंढी,
उपटा वामण्याची शेंडी!!!

कृषिसंस्कृतीशी नातं सांगणारा दिवाळी सण हा सर्व सणात मोठा सण! पावसाळा संपला की दसऱ्याला नवीन पिकांची कापणी होते. घरात धान्यरूपी लक्ष्मी येते. गरजेपुरते ठेऊन शेतकरीराजा नव्या धान्याची विक्री करतो. आलेल्या पैशातून घरदुरुस्ती, जमल्यास रंगरंगोटी, नवीन कपडे, गोडधोड, घरातील लक्ष्मीला एखादा डाग, नवीन बैलजोडी खरेदी करणे इत्यादी गोष्टी शतकांपासून केल्या जात होत्या.
धान्यरूपी दौलतीची(लक्ष्मीपूजन) व ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्या गोधनाची (वसुबारस) पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याची पध्द्त म्हणून #दिवाळीची सुरवात झाली. लोकगीतात म्हणूनच ‘गाई- म्हशी ओवाळी’ हे कडवं आलं. कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या अन्याय अत्याचाला बळी पडलेल्या शेकडो स्त्रियांचे पुनर्वसन केले अशी पुराणकथा जनमानसात रुजली म्हणून नरकचतुर्दशी साजरी करण्याची पध्द्त पडली.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा त्याला वामनाने फसवून पाताळात गाडलं. त्याची आठवण म्हणून बलिप्रतिपदा साजरी होऊ लागली. आणि म्हणूनच वामणावरील राग त्याची शेंडी उपटून लोकगीतातून पिढ्यानपिढ्या काढला गेला.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! तिमिरातून तेजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा! अग्नीचा शोध लागल्यानंतर आदिमानवाचे आयुष्य पालटले. अग्नी हा मानवाच्या आयुष्यात महत्वाचा व त्याचे जीवन बदलवून टाकणारा शोध होता. सहाजिकच सर्वात मोठा व आनंदाचा दिवाळी सण अग्नीच्या साक्षीने दिव्यांच्या लखलखाटात साजरा झाला नसता तर नवल! तर असा हा आनंदाचा, प्रकाशाचा, उत्साहाचा दिवाळी सण कालांतराने बदलत गेला. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मार्केटिंग करून आपलं उत्पादन लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. शांत, प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात उत्साहाने साजरा होणारा दिव्यांचा सण कधी कर्णकर्कश आवाजाच्या फटाक्यांचा झाला आणि त्याच फटाक्यांच्या धुरात हरवून गेला हे कुणालाच समजलं नाही. समाज शिक्षित होऊ लागला, शहराकडे पळू लागला. खेडी ओस पडली आणि शहर बकाल होत गेली. मातीशी नाळ तुटली. जगण्यात कृत्रिमता आली. मल्टिनॅशनल कम्पन्यांनी बाजार भरविला. लोकांच्या डोक्यावर सतत जाहिरातींचा मारा करून आवश्यक अनावश्यक वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले. घरातील जिवंत माणसं कमी झाली आणि निर्जीव वस्तू वाढल्या. त्यालाच सुख मानण्याची सवय जडली. सुखाच्या शोधत समाधान हरवले. माणसं दुरावली. धान्य पूजनाच्या जागी पैशाची बंडलं आली. गाई-म्हशी जाऊन दोनचाकी/चारचाकी गाड्या ओवळण्याची पध्दत सुरू झाली. दिव्यांची जागा भगभगित लायटिंगने घेतली. गरिबांची गरीब दिवाळी (दिवाळ) तर श्रीमंतांची श्रीमंती दाखवणारी दिवाळी साजरी होऊ लागली. समाज एकोप्याने नांदण्यासाठी सणवार उपयोगी पडत होते. आज सणवार आले की समाज दुभंगतो की काय अशी परिस्थिती झाली आहे.
 या सर्व परिस्थितीत माझ्या गावच्या तरुणांनी माझ्या गावात पुन्हा ‘दिन दिन दिवाळीची’ हाळी दिली (पहिला दिवा ते पाचवा दिवा) आणि मला वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला. आमच्या गल्लीतील वयाने मोठ्या असणाऱ्या तरुणांच्या नेतृत्वाखाली आम्हीही दिवाळी घेऊन दारोदारी भटकायचो, किलो किलो गोडेतेल जमवून दुकानात विकायचो.…. त्या पैशाचा खाऊ घ्यायचो. गावात असे पाच/दहा ग्रुप (टोळ्या😊) असायचे प्रत्येकाचा #इलाका ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हा सांस्कृतिक वारसा बंद पडला. महाराष्ट्रातील कित्येक पिढय़ा या लोकगीतांनी दिवाळी साजरी करत होत्या. आता हा भूतकाळ झाला कारण अशी दिवाळी घेऊन घरोघरी तेल मागणारी पोरंठोरं  कुठंही दिसत नाहीत. बरीचशी लोकगीतं विस्मृतीत गेली आहेत. काही खेड्यापाड्यात अजूनही या वारशाची जपणूक केली जाते. परंतु वाढते शहरीकरण व शहराला लागून असणारे खेडेगावं (ना धड शहर ना धड खेडं) तिथे मात्र संस्कृतीच्या अनेक खुणा धुसूर झाल्या आहेत.
माझ्या गावातील तरुणांनी पुन्हा हा वारसा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाला त्यांचे विशेष कौतुक वाटते.

घरोघरी फिरणारी ही ‘दिवाळी’ करंजीच्या झाडाच्या फाट्याची(लगोरी सारखी) फांदी, बाभळीच्या काटेरी छोट्या फांद्या, झेंडू व जास्वंदीची फुले, नागाच्या आकाराच्या फण्या, एक दिवा इत्यादी सामुग्री वापरून तयार केली जाते. ( गावोगाव यात फरक असू शकतो)

ही दिवाळी पुन्हा सुरू करणारे माझे मित्र सागर चव्हाण, विशाल चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सोमनाथ चव्हाण (सोमा), सिद्धनाथ चव्हाण, सागर तुपे, अमोल, संदिप(दादाराम), सारंग, जयंत, सार्थक, आर्यन, आदित्य, सुयश, शुभम बुधे, सुहास, बापूराव, अनिकेत, विशाल, दीपक, निखिल, चैतन्य, अजित यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
राजेंद्र चव्हाण(भावड्या), उत्तम चव्हाण (बापू), हणमंत चव्हाण(आण्णा), प्रदीप साळवे (तात्या), पृथ्वीराज चव्हाण(काका), सोमनाथ बुधे यांनी दिवाळी बांधून देण्यात व गीतं मिळवून चाल लाऊन देण्यात विशेष सहकार्य केले.

हा वारसा असाच वृद्धिंगत होवो या सदिच्छा देऊन सर्वांचं अभिनंदन करतो.
@संदिप रामचंद्र चव्हाण