My Blog List

Monday 19 November 2018

दिन_दिन_दिवाळी

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाईचा चारा, बैल नवरा,
झंडू माळ्या, म्हशी काळ्या,
म्हशीच्या पोटी, हंब रेडं,
गाईच्या पोटी चिक्कार पाडं….


बारा-पंधरा पोरांचं टोळकं मोठ्या आवाजात दिवाळीचं गाणं (लोकगीत) गात एका घराच्या चौकटीतून पुढच्या घराच्या चौकटिकडं सरकत होतं. मी चौकात उभा राहून हे पाहिलं आणि एकदम चकित झालो. लगेचच त्यांच्या जवळ येऊन उभा राहिलो… पोरं सगळी वळकीचीच…. वयानं लहान असली तरी चांगली दोस्त असणारी. ह्या पोरांनी एखाद्या घरापुढे मोठ्या आवाजात सूर धरला की त्या घरात उपस्थित असणारी सर्व माणसं, पोरं-बाळं त्यांना पहायला चौकटीत येऊन उभी रहायची. त्या घरातील कोणीतरी अजून एक गाणं(लोकगीत) होऊन जाऊद्या म्हणले की पोरांना हुरूप यायचा… आणि लगेच फर्माईश पूर्ण व्हायची.

अकाकू मकाकू,
कुंच्या बैलाला घालू जु, घालू जु.
रतन बैल कुंनाचा, कुंनाचा,
पाटीव झेंडा फुलांचा, फुलांचा.
फुल गेले दिवसाळी, दिवसाळी,
दिवसाळीला आला राग, आला राग.
शाळेतल्या पोरांनी मारला वाघ, मारला वाघ.
गुरुजींच्या पोरांनी खाल्ला वाघ, खाल्ला वाघ.
(कष्टकऱ्यांच्या कष्टावर बुद्धीजीवी कायमच डल्ला मारतात.. ही अगतिकता वर्षानुवर्षे यातून व्यक्त होते आहे)

हे गीत झालं की , दिन दिन दिवाळी हे अजून दुसऱ्या प्रकारात म्हणायचीत…

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाई-म्हशी कुनाच्या,
लक्ष्मनाच्या.
लक्ष्मन कुनाचा, आई-बापाचा.
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी.!
(माईनं खोबऱ्याची वाटी खायला दिली तर वाघालाही घाबरणार नाही हा आत्मविश्वास यात दिसतो)

बायबापड्या ओवळायला आल्या की गीत म्हणणाऱ्या पोरांना आनंद व्हायचा मग ते गीतातून तेल मागायची…

आक आकल्याच, घोडं लाकडाचं,
मिशी मांजराची, दाडी उंदराची,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
सखुबाई,ठकुबाई सण-वार आला,
दिन दिन दिवाळी, पळी पळी तेल घाला.
(शेतीला त्रास देणाऱ्या रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन यात आहे)

पळी पळी तेल घाला म्हणून मोठा आवाज व्हायचा. घराघरातील आयाबहिणींनी तेलाची धार धरली की पोरं वामणाच्या शेंडीला हात घालायची…

वाकडी तिकडी बाभळ,
त्याव बसला व्हला,
मी दिला टोला,
टोला गेला गंगेत,
गंगेची माणसं,
लिंबऱ्याची कणसं,
तिळाची पेंढी,
उपटा वामण्याची शेंडी!!!

कृषिसंस्कृतीशी नातं सांगणारा दिवाळी सण हा सर्व सणात मोठा सण! पावसाळा संपला की दसऱ्याला नवीन पिकांची कापणी होते. घरात धान्यरूपी लक्ष्मी येते. गरजेपुरते ठेऊन शेतकरीराजा नव्या धान्याची विक्री करतो. आलेल्या पैशातून घरदुरुस्ती, जमल्यास रंगरंगोटी, नवीन कपडे, गोडधोड, घरातील लक्ष्मीला एखादा डाग, नवीन बैलजोडी खरेदी करणे इत्यादी गोष्टी शतकांपासून केल्या जात होत्या.
धान्यरूपी दौलतीची(लक्ष्मीपूजन) व ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्या गोधनाची (वसुबारस) पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याची पध्द्त म्हणून #दिवाळीची सुरवात झाली. लोकगीतात म्हणूनच ‘गाई- म्हशी ओवाळी’ हे कडवं आलं. कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या अन्याय अत्याचाला बळी पडलेल्या शेकडो स्त्रियांचे पुनर्वसन केले अशी पुराणकथा जनमानसात रुजली म्हणून नरकचतुर्दशी साजरी करण्याची पध्द्त पडली.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा त्याला वामनाने फसवून पाताळात गाडलं. त्याची आठवण म्हणून बलिप्रतिपदा साजरी होऊ लागली. आणि म्हणूनच वामणावरील राग त्याची शेंडी उपटून लोकगीतातून पिढ्यानपिढ्या काढला गेला.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! तिमिरातून तेजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा! अग्नीचा शोध लागल्यानंतर आदिमानवाचे आयुष्य पालटले. अग्नी हा मानवाच्या आयुष्यात महत्वाचा व त्याचे जीवन बदलवून टाकणारा शोध होता. सहाजिकच सर्वात मोठा व आनंदाचा दिवाळी सण अग्नीच्या साक्षीने दिव्यांच्या लखलखाटात साजरा झाला नसता तर नवल! तर असा हा आनंदाचा, प्रकाशाचा, उत्साहाचा दिवाळी सण कालांतराने बदलत गेला. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मार्केटिंग करून आपलं उत्पादन लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. शांत, प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात उत्साहाने साजरा होणारा दिव्यांचा सण कधी कर्णकर्कश आवाजाच्या फटाक्यांचा झाला आणि त्याच फटाक्यांच्या धुरात हरवून गेला हे कुणालाच समजलं नाही. समाज शिक्षित होऊ लागला, शहराकडे पळू लागला. खेडी ओस पडली आणि शहर बकाल होत गेली. मातीशी नाळ तुटली. जगण्यात कृत्रिमता आली. मल्टिनॅशनल कम्पन्यांनी बाजार भरविला. लोकांच्या डोक्यावर सतत जाहिरातींचा मारा करून आवश्यक अनावश्यक वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले. घरातील जिवंत माणसं कमी झाली आणि निर्जीव वस्तू वाढल्या. त्यालाच सुख मानण्याची सवय जडली. सुखाच्या शोधत समाधान हरवले. माणसं दुरावली. धान्य पूजनाच्या जागी पैशाची बंडलं आली. गाई-म्हशी जाऊन दोनचाकी/चारचाकी गाड्या ओवळण्याची पध्दत सुरू झाली. दिव्यांची जागा भगभगित लायटिंगने घेतली. गरिबांची गरीब दिवाळी (दिवाळ) तर श्रीमंतांची श्रीमंती दाखवणारी दिवाळी साजरी होऊ लागली. समाज एकोप्याने नांदण्यासाठी सणवार उपयोगी पडत होते. आज सणवार आले की समाज दुभंगतो की काय अशी परिस्थिती झाली आहे.
 या सर्व परिस्थितीत माझ्या गावच्या तरुणांनी माझ्या गावात पुन्हा ‘दिन दिन दिवाळीची’ हाळी दिली (पहिला दिवा ते पाचवा दिवा) आणि मला वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला. आमच्या गल्लीतील वयाने मोठ्या असणाऱ्या तरुणांच्या नेतृत्वाखाली आम्हीही दिवाळी घेऊन दारोदारी भटकायचो, किलो किलो गोडेतेल जमवून दुकानात विकायचो.…. त्या पैशाचा खाऊ घ्यायचो. गावात असे पाच/दहा ग्रुप (टोळ्या😊) असायचे प्रत्येकाचा #इलाका ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हा सांस्कृतिक वारसा बंद पडला. महाराष्ट्रातील कित्येक पिढय़ा या लोकगीतांनी दिवाळी साजरी करत होत्या. आता हा भूतकाळ झाला कारण अशी दिवाळी घेऊन घरोघरी तेल मागणारी पोरंठोरं  कुठंही दिसत नाहीत. बरीचशी लोकगीतं विस्मृतीत गेली आहेत. काही खेड्यापाड्यात अजूनही या वारशाची जपणूक केली जाते. परंतु वाढते शहरीकरण व शहराला लागून असणारे खेडेगावं (ना धड शहर ना धड खेडं) तिथे मात्र संस्कृतीच्या अनेक खुणा धुसूर झाल्या आहेत.
माझ्या गावातील तरुणांनी पुन्हा हा वारसा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाला त्यांचे विशेष कौतुक वाटते.

घरोघरी फिरणारी ही ‘दिवाळी’ करंजीच्या झाडाच्या फाट्याची(लगोरी सारखी) फांदी, बाभळीच्या काटेरी छोट्या फांद्या, झेंडू व जास्वंदीची फुले, नागाच्या आकाराच्या फण्या, एक दिवा इत्यादी सामुग्री वापरून तयार केली जाते. ( गावोगाव यात फरक असू शकतो)

ही दिवाळी पुन्हा सुरू करणारे माझे मित्र सागर चव्हाण, विशाल चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सोमनाथ चव्हाण (सोमा), सिद्धनाथ चव्हाण, सागर तुपे, अमोल, संदिप(दादाराम), सारंग, जयंत, सार्थक, आर्यन, आदित्य, सुयश, शुभम बुधे, सुहास, बापूराव, अनिकेत, विशाल, दीपक, निखिल, चैतन्य, अजित यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
राजेंद्र चव्हाण(भावड्या), उत्तम चव्हाण (बापू), हणमंत चव्हाण(आण्णा), प्रदीप साळवे (तात्या), पृथ्वीराज चव्हाण(काका), सोमनाथ बुधे यांनी दिवाळी बांधून देण्यात व गीतं मिळवून चाल लाऊन देण्यात विशेष सहकार्य केले.

हा वारसा असाच वृद्धिंगत होवो या सदिच्छा देऊन सर्वांचं अभिनंदन करतो.
@संदिप रामचंद्र चव्हाण

No comments:

Post a Comment