My Blog List

Sunday 24 February 2019

प्रिय बाई

‘स्कुओला दि बार्बियाना’ या मूळ इटालियन पुस्तकाचे Letter to a Teacher हे इंग्रजी अनुवादित पुस्तक लेखिका सुधा कुलकर्णी यांनी वाचल्यानंतर त्यांनी त्याचा जो मराठी अनुवाद केला आहे, ते पुस्तक म्हणजेच ...प्रिय बाई, बार्बियानाची शाळा!
हे पुस्तक म्हणजे इटलीमधील डोंगराळ भागातील ‘बार्बियाना’ या छोट्याश्या वस्तीत ‘डॉन लोरेंझो मिलानी’ यांनी सुरू केलेल्या शाळेतील आठ गरीब विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेला लिहलेले पत्र आहे. खरेतर हे पत्र समाजातील उच्चवर्गीय म्हणजेच श्रीमंतांच्या दृष्टीने सोईच्या असनाऱ्या शिक्षणव्यवस्थेला उद्देशून आहे. या पत्राला व त्यातील घटनांना आज जवळपास पन्नास वर्षे उलटून गेली आहेत तरीही या पत्रातून त्या आठ मुलांनी देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणाचे मांडलेले वास्तव वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. जणू काही आपल्या आजूबाजूच्याच गोष्टी या पुस्तकातून मांडल्यात की काय, असं क्षणभर का होईना वाटून जाते.

‘प्रिय बाई, मी किंवा माझं नाव- तुम्हाला काहीच आठवणार नाही. आमच्यातल्या इतक्या जणांना तुम्ही नापास केलेलं आहे. नापास करून सरळ तुम्ही आम्हाला शेतात आणि कारखान्यात टाकून देता आणि विसरून जाता.’ पुस्तकाच्या सुरवातीलाच असणाऱ्या या ओळी वाचताना एके काळी प्राथमिक/माध्यमिक शाळांमधून नापास झालेल्या (की केलेल्या) असंख्य शाळाबाह्य मुलांचं विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ही मुले लहान वयातच प्रौढ होतात. घराला आधार म्हणून चार पैसे मिळविण्यासाठी आपल्या स्वप्नांचा चुराडा करतात. खेळण्या-बागडण्याच्या वयात ढोर मेहनत करतात. त्यामुळे त्यांच हलकं-फुलकं-लाडकं बालपण आकालीच कोमेजून जाते. भांडवली व्यवस्थेला कष्टकरी वर्गाची नेहमीच गरज असते. जणू काही कष्टकऱ्यांच्या निर्मितीसाठीच अधिक ठळक लाल अक्षरात नापास हा शेरा मारत असावेत का? हा प्रश्न पुस्तक वाचताना पडतो.

१९५४ मध्ये ‘डॉन लोरेंझो मिलानी’ हे बार्बियानाच्या चर्चमध्ये पाद्री म्हणून आले. त्यावेळी आजूबाजूच्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची दुरावस्था त्यांच्या लक्षात आली. नापास झाल्याने बहुतेक मुलांनी शाळा सोडून दिली होती. तिथल्या शिकवायच्या पध्द्तीमूळे ही मुलं नापास झाली होती व त्यांचा शिकण्याचा उत्साह मावळला होता. अशी दहा-बारा वर्षाची आठ-दहा मुलं एकत्र करून भरगच्च वेळापत्रक व एकही सुट्टी नसलेली शाळा त्यांनी सुरू केली. ‘शेतात आणि गुरा-ढोरांच्या मागे फिरून कष्ट करण्यापेक्षा शाळा कैकपटीनी चांगली’ या विचाराने मुलं रविवारीही आनंदाने शाळेत येत. त्या शाळेत आवडता विद्यार्थी- नावडता विद्यार्थी असा भेद नव्हता. उलट अभ्यासात कच्चा, मंद, आळशी असलेल्यांना आपणच सगळ्यात आवडते आहोत असे वाटण्याइतपत चांगली वागणूक त्या शाळेत दिली जात असे. शाळा जणूकाही फक्त त्याच्यासाठीच आहे असं त्यांना वाटेल, असं वातावरण त्या शाळेत होते. त्या शाळेने गरीब, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी घटकातील मुलांना सामावून घेऊन त्यांच्यामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण केला की या शाळेतील मोठी मुलं लहान मुलांना शिकवण्याचे काम करत. लहान मुलांना शिकवता -शिकवता त्यातील आठ मुलांनी एक वर्षभर मेहनत घेऊन इटलीतील शैक्षणिक प्रगती/अधोगतीची आकडेवारी गोळा केली. कष्टपूर्वक मिळवली. त्या आधारावर त्यांनी आधीच्या शाळेत भेटलेल्या बाईंना (एक प्रकारे शिक्षणव्यवस्थेलाच उद्देशून) हे पत्र लिहले आहे.

या पत्रात शिक्षक, शिक्षणव्यवस्था, राज्यकर्ते, शिक्षणाधीकारी यांच्यावर जोरदार कोरडे ओढलेले आहेत. तसेच श्रीमंत आणि गरीब मुलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या दर्जाबाबत, असमान संधीबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा या मुलांचा दृष्टिकोन आणि कोवळ्या वयातल्या कडू अनुभवांच्या चटक्यांनी त्यांना आलेलं डोळस शहाणपण या पत्रातून दिसते. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून विविध कारणाने मुलांची शाळेतून गळती होते. त्यामध्ये मुलांना नापास केल्याने होणाऱ्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. यात सर्वाधिक प्रमाण गरीब कुटुंबातील मुलांचे असते. ही गळती झालेली मुले बालकामगार म्हणून काम करतात परंतु सरकारला या मुलांचा विसर पडलेला असतो किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामाला लावायची मनाई असणारा कायदा इटलीमध्ये आहे. परंतु हा कायदा शेतीसाठी लागू नाही. म्हणजे शेतकऱ्यांची मुलं ही बालके नसून प्रौढ (बापे) असतात असंच सरकारला वाटतं की काय? ही शंका ते पत्रातून व्यक्त करतात. शिक्षकांचे कामाचे तास, त्यांच्या पगारी सुट्ट्या, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि इतर कामगारांना कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला, त्यांच्या कामाचे तास इत्यादी अनेक विषयांवर ते भाष्य करतात.

नापास केल्याने बहुतेक गरीब मुलांची शाळा सुटणे हे सर्वात मोठं कारण असले तरी ‘शाळाच आवडत नाही’ हे शाळा सोडण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे. मुलांना शाळेचा वर्ग बंदिखाना वाटतो, तिथे अपमानित आणि सतत दबावाखाली रहावे लागते म्हणून शाळा सोडणारी मुलं आहेत या गोष्टीकडे ते लक्ष वेधताना म्हणतात की ‘शाळेमध्ये कंटाळवाणेपणा कळसाला गेला आहे.’ याउलट बार्बियानाच्या शाळेत मुलं सुट्टी घेत नाहीत. इतर शाळेत मुलं सुट्टीची वाटच बघत असतात. मग कोणती शाळा चांगली आणि मुलांचा विचार करणारी आहे? असा तुलनात्मक प्रश्न ते शिक्षणव्यस्थेला विचारतात. शाळा सोडण्याचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे मुलांना चांगले लिहता-वाचता येत नाही हे होय. शिक्षक आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नाहीत. कामाचे तास कमी व आर्थिक मोबदला जास्त म्हणूनच या शिक्षकी पेशाकडे वळणारांची संख्या जास्त आहे असा आरोप ते करतात. प्राथमिक शाळेत ८०% गरिबांची मुले तर २०% आर्थिक सदन कुटुंबातील मुले असतात हे चित्र विद्यापीठात मात्र पूर्णतः पालटते. विद्यापीठात गरिबांची मुले २०% पेक्षा कमी तर श्रीमंतांची मुले ८०% पेक्षा जास्त असतात. उच्च शिक्षणाचे अर्थकारण स्पष्ट करताना गरिबांच्या कराच्या पैशातून श्रीमंतांची मुलं कशी शिकतात हे वास्तव ते आकडेवारीच्या सहाय्याने शिक्षणव्यवस्थेला समजावतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही उपायही ते सुचवतात. विद्यार्थ्यांना नापास करू नका. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांसाठी दिवसभर शाळा भरवा. पती पत्नीने मिळून घरी चालवलेली व ठरीव वेळापत्रक नसलेली आणि प्रत्येकाला खुली असणारी पूर्णवेळ शाळा बनवता येईल का यावर विचार करा. असे काही पर्याय ते व्यवस्थेला सुचवतात. याशिवाय ते पालकांच्या संघटनेचे महत्व विशद करतात. त्यांच्या मते आईवडिलांची अशी एक छान संघटना असावी  की जी शिक्षकांना आठवण करून देईल की त्यांना पगार आम्ही (पालक) देतो आणि हा पगार आमची (विद्यार्थ्यांची) सेवा करण्यासाठी आहे...आम्हाला शाळेच्या बाहेर हाकलून लावण्यासाठी नाही.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात बार्बियानाच्या शाळेत इतर श्रीमंत शाळांपेक्षा जास्त योग्य प्रकारे माणुसकी शिकवली जाते हे सांगितले आहे. बसमधून प्रवास करणाऱ्याकडे कानाडोळा करायला गाडी, इमारतीतल्या माणसांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लिफ्ट, एकमेकांच्या घरी जाणे टाळण्यासाठी टेलिफोन इत्यादी (अ)सुविधा वापरणाऱ्याना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला आणि इतरांचे ऐकून घ्यायला शिकवण्यास श्रीमंत शाळा कमी पडल्या आहेत ही गोष्ट ते नेमकेपणाने पटवून देतात. एकूणच बिघडलेली/बिघडवलेली शिक्षणव्यवस्था ठीक करावयाची असेल तर पालकांनी संघटित होऊन शिक्षणाप्रति जागरूक असायला हवे यावर ते भर देतात. या जागृतीसाठीच तर त्यांनी हे पुस्तक(पत्र) लिहलय असं ते सांगतात आणि म्हणूनच जिथं जिथं म्हणून मुलं शाळेबाहेर हकलली जातात त्या प्रत्येक देशात हे पुस्तक पोचलं पाहिजे असे या पुस्तकाच्या आठ लेखकांना वाटते.

आकाराने १२×१८ सेमी असे छोटसे असणारे हे पुस्तक कथा-कादंबऱ्या वाचणाऱ्यांना रुक्ष, निरस आणि कंठाळवाणे वाटू शकते. परंतु वास्तव जग हे काल्पनिक जगाहून वेगळे असते ते समजून घ्यायला स्वानुभव किंवा अशी पुस्तके उपयोगी पडतात. अशा वाचनातून सामाजिक परिस्थितीची जाणीव होते. मनात काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठीचा थोडाफार प्रयत्नही होऊ शकतो. प्रश्न समजले की उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नांना थेट भिडण्याची वृत्ती वाढते. यातून व्यवस्था भलेही बदलू शकलो नाही तरी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर काही सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे.
@संदिप रामचंद्र चव्हाण

प्रिय बाई, बार्बियानाची शाळा.
मराठी अनुवाद: सुधा कुलकर्णी
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन
मूल्य: ₹१२०
पाने:१३६

No comments:

Post a Comment