My Blog List

Thursday 18 January 2018

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

शाळा दोन अक्षरी शब्द.... प्रेत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक.... माणसाच्या जडणघडणीमध्ये जसा आई-वडिलांचा महत्त्वाचा वाटा असतो, तसा शिक्षकांचा अन शाळेचाही असतो.  'आवडते ही मज मनापासून शाळा, लाविते लळा, जशी माउली बाळा......!' कवी म्हणतो की आई इतका लळा, प्रेम करणारी शाळा मनापासून आवडते. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या कोपर्डे हवेली
जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
 मुल कुटुंबात जन्माला येतं... हळूहळू मोठं होतं... दिसेल ते पाहत... कानावर पडेल ते ऐकत... बोलण्याचा प्रयत्न करत... अखंडपणे शिकत असतं. ठराविक वय झालं की त्याला शाळेत घातलं जातं. पूर्वी बालवाडी असायची, सर्वच मुलं बालवाडीत जयचीच असं नाही, स्पर्धा नव्हती, कंपलशन नव्हते, माझा मुलगा- मुलगी मागे पडेल(म्हणजे नेमकं काय?) असा विचारही पालकांच्या मनाला शिवत नव्हता. आता प्लेस्कुल, नर्सरी, केजी असते, नवीनच जन्माला आलेल्यांना पाळणाघर असते... मागील पंचवीस तीस वर्षांपूर्वी ही जीवघेणी स्पर्धा नव्हती किंबहुना तुलनेने अगदीच कमी होती.


 वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत प्रवेश व्हायचा. काही पालक पाचव्या वर्षीही मुलाला पहिलीत घालायचे. जन्मदाखल्यात जुगाड करायचे.. (त्यामुळे बऱ्याच मुलांची जन्मतारीख जुनमधील असायची)
काही वर्षांपूर्वी पर्यंत ग्रामीण भागात बहुतेक मुलांचे पहिलीचे प्रवेश जिल्हापरिषद शाळेत व्हायचे... गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलांमुलींची नावे शाळेत घालण्याची (ऍडमिशन) एक परंपरा होती... अजूनही काही ठिकाणी आहे....  पुढे शाळा जूनपासून सुरू व्हायची... आणि आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात व्हायची.

गावच्या लोखंसंख्येवर किंवा परिस्थितीतनुसार शाळेची रचना असायची. काही ठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा, तर काही ठिकाणी सातवीपर्यंत शाळा असायची. मोठ्या गावात हायस्कुल व शहरात कॉलेज असायचे... आता कुठेही इंटरनॅशनल(?) स्कुल पासून कॉलेजपर्यंत सुळसुळाट झाला आहे.
माझ्या गावात जिल्हापरिषदची पहिली ते चौथी शाळा व पाचवी ते दहावी हायस्कुल आहे. गावातील बहुतेक सर्व नागरिक याच शाळेत शिकुन मोठे झाले आहेत. शाळेच्या स्थापनेला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. 18 जानेवारी 1918 साली गावात शाळा आली. सुरवातीला शाळा कशी होती?, किती मुलं शाळेत शिकत होती?, कोण शिक्षक होते?, या बद्दल मला माहिती नाही.

  माझे पहिली ते चौथी शिक्षण ज्या काळात झाले त्यावेळच्या काही आठवणी अजून मनाच्या एका कोपऱ्यात तशाच आहेत. 1989-90 साली माझे पहिलीत ऍडमिशन झाले. 1992-93 ला चौथी पास झालो. 93- 94 या शैक्षणिक वर्षासाठी मी गावातील हायस्कुलमध्ये पाचवीत प्रवेश घेईपर्यंत म्हणजे चार वर्षाचा काळ मी ज्या शाळेत घालवला त्या माझ्या जिल्हापरिषद शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

 कोणत्याही संस्थेला, संघटनेला, व्यक्तीला शंभरी लाभणे म्हणजे खूप मोठं यश मानलं जातं. क्रिकेटमध्ये सेंच्युरीला विशेष महत्व असते. कोणत्याही गोष्टीच्या पूर्णत्वाची ओळख म्हणजे 100 टक्के म्हणजे पूर्ण. बंदा रुपया शंभर पैशाचा असतो. अस शंभर या संख्येला वेगळेच महत्व आहे. आज शाळेला शंभर वर्षं पूर्ण होऊन शतकमोहत्सव साजरा होताना खूप आंनद वाटतो आहे. चार पिढ्या, शंभर ब्याचेस या शाळेने घडवल्या. शाळेच्या सुरवातीला शिकणारे अनेकजण आज हयात नाहीत. दोन पिढ्या वृद्ध झाल्या आहेत, एक पिढी तरुण तर एक पिढी शिकत आहे. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा- मुलगी या चार पिढीतील लोकांना मोठं होताना शाळेने बघितले आहे. त्यांच्या व गावच्या जडणघडणीत या शाळेचा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे.... शाळा व शिक्षक हे वेगळे नसून एकच असतात. किंबहुना शिक्षक म्हणजेच शाळा होय. शिक्षकाशिवाय शाळा म्हणजे फक्त निर्जीव भिंतींची इमारत... त्यामध्ये जीव येतो शिक्षकांमुळे... चैतन्य येतं लहानग्या मुलांच्यामुळे, विद्यार्थ्यांमुळे!

 पहिली ते चौथी एका ब्याचला एकच शिक्षक, (प्रत्येक वर्षी नवीन शिक्षक असला प्रकार zp शाळेत नसतो.) बसायला घरूनच आणलेले गोणपाट, पाटी पुस्तकासाठी तंगूसची पिशवी (नॉयलॉन ब्याग) किंवा युरियाचा मोकळ्या 'ठिक्या'पासून (युरिया खताची मोकळी प्लास्टिक सदृश्य ब्याग) फल्ले आण्णांकडून किंवा इतर टेलर कडून शिवून आणलेली पिशवी. पावसाळ्यात छत्री म्हणून गाई म्हैशीच्या खाद्याच्या गोंणपाटाची "खोळ" असायची, तीच पावसापासून सौरक्षण करायची. पायात असेल तर स्लीपर नसेल तर अनवाणी. खाकी चड्डी, ढगाळ पांढरा शर्ट असा अवतार बहुतेक मुलांचा असायचा. मुलींना निळा -पांढरा फ्रॉक असायचा. शाळेत दूध मिळायचे त्यासाठी घरूनच ग्लास घेऊन जावा लागत असे. वनभोजन करण्यासाठी वर्ष्यातून एकदा सर्व शाळा वेताळबा मंदिरात जायची. हे मंदिर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे व आजूबाजूला खूप सारी झाडी व गर्द सावली आहे. तिथे एकत्र बसून नकला, गाणी, "आई माझे पत्र हरवले, दे मला सापडले.." हा खेळ व्हायचा हे उपक्रम झाल्यावर सर्वाना गोल बसवून घरुन सुती फडक्यात बांधून आणलेली शिदोरी एकमेकांना घास घास देऊन वनभोजन संपन्न व्हायचे. आजच्या तुलनेत किती सहज शेअरिंग हॅबिट शिकवली जायची, हे आठवले की आताची बालके या अनुभवापासून वंचीत राहतात याचं खूप वाईट वाटतं. हे वनभोजन तीन चार किलोमीटरची पायपीट आमच्यासाठी एक दिवसाची सहलच असायची. परीक्षेत नंबर आला किंवा थोरांच्या जयंती- पुण्यतिथीला भाषण देण्यात भाग घेतला तर कंपासपेटी, पेन्सिल- खोडरबर असे बक्षीस मिळायचे. सर्वांच्या भाषणाची सुरवात "अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला.....बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने एकूण घ्यावे अशी माझी नम्रविनंती आहे." अशी व्हायची. भाषण रट्टा मारून पाठ केलेले असायचे, अचानक काही वेळा आठवायचे नाही. मग मुलांच्यात चुळबुळ चालू व्हायची मग भाषण देणारा अजूनच गांगारून जायचा आणि जागेवर जाऊन बसायचा अशी सगळी गम्मत असायची. त्याचप्रमाणे दरवर्षी गुडीपाढाव्याला पाटी पूजन असायचे. बहुतेक लिखाणाचा सर्व सराव खपरी पाटीवरच व्हायचा. शाळेचा निकाल बहुदा 1 मे ला असायचा, शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चालू व्हायची. पाहिली मध्ये येणाऱ्या मुलांचं ऍडमिशन गुडीपाढाव्याच्या मुहूर्तावर व्हायचे. आजच्या खाजगी शाळा मागतात तसा पालकांकडून आय. टी. रिटर्न मागण्याची पध्द्त त्यावेळी नव्हती व अजूनही zp शाळेत सर्वसामान्य जनतेची मुलं शिकत असताना पालकांचे उत्पन्न किती? हे पाहिले जात नाही.  सुरवातीला शाळेत येताना मुलं मुली खूप रडायचीे... आताही मुलं रडतातच... जे.कृष्णमूर्ती त्यांच्या शिक्षण विषयक विचारात म्हणतात  "शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कुणीचं स्वत:होऊन जात नाही दाखल करावं लागतं" त्यामुळे कदाचित सुरवातीला मुलांना आपलं स्वातंत्र्य बंदिस्त होतंय का काय असा प्रश्न पडत असावा.


 माझी शाळा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी व दाट लोकवस्तीत आहे. शाळेला मोठे मैदान, आजूबाजूला सुंदर झाडे, बाग- बगीचा, खेळणी असला प्रकार तेव्हाही नव्हता व आताही नाही. कोणत्याही राजकीय नेतृत्वाला असं काही असावं याची गरज वाटली नाही. व अजूनही शाळेला चांगले ग्राउंड देण्यात राजकीय नेतृत्वाला यश आलेले नाही. मात्र शाळेची जागा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी बांधण्यासाठी वापरली गेली आहे. ती जागा शाळेची का ग्रामपंचायतची या बद्दल माहिती नाही पण तिथे शाळा होती व मी त्यात शिकलो हे पक्के लक्षात आहे. जवळजवळ सगळे पालक शेतकरी वर्गातले व जेमतेम शिकलेले, शिवाय खेळ म्हणजे वेळ वाया घालवणे असा काहीसा (गैर)समज त्याकाळी होता व आताही आहे. त्यामुळे पालकांनाही मैदानाचे महत्व कळाले नाही. आताही कळत नाही. कदाचित त्यामुळेच की काय गावात एकही मोठा खेळाडू होऊ शकला नाही.
शाळेला जागा कमी असल्यामुळे गावातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या पूर्वेला व पश्चिमेला शाळेची विभागणी झाली होती. रस्त्याच्या पश्चिमेला पहिली व दुसरी तर पूर्वेला तिसरी व चौथी असे वर्ग भरायचे. बेंगलोरी कौलाची, दगडी भिंतीची, शहाबादी फरशी असलेली इमारत होती. ती इमारत आता अस्तित्वात नाही. आता मुख्य रोडच्या पश्चिमेला दोन मजली इमारत आहे. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग एका ठिकाणी आहेत.
मी शाळेत असताना प्रत्येक इयत्तेचे 'अ' तुकडी व 'ब' तुकडी असे दोन दोन वर्ग होते. शेख बाई, फुके बाई, सुतार गुरुजी, तोडकर गुरुजी, पवार गुरुजी, मुल्ला बाई असे शिक्षक असल्याचे आठवते. आमच्या वर्गाला वर्गशिक्षक शेख बाई होत्या. पहिली ते चौथी त्याच शिक्षिका म्हणून होत्या. तेव्हा प्राथमिक शाळेत शिक्षकांना सर, म्याडम म्हणण्याची पध्दत नव्हती.
माझ्या ब्याचचे बहुतेक विद्यार्थीमित्र आज पालकाच्या भूमिकेत आहेत. जवळजवळ सर्व ब्याचमेट लग्न होऊन संसाराला लागले आहेत. मुली खूप आधीच सासरी गेल्या आहेत. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन तब्बल पंचवीस वर्षे उलटून गेली. एवढ्या मोठ्या काळात शाळेत, शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक व विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप बदल झालेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्यांची मुलं पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतायत त्यांना ही गोष्ट लक्षात येत असेल.

 मी ज्या वेळी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होतो तो काळ म्हणजे आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा काळ होय. 1991 नंतर भारतीय बाजारपेठ परकीय उद्योगासाठी खुली झाली. हळूहळू शिक्षण क्षेत्रातसुद्धा याचा परिणाम जाणवू लागला. खाजगी शाळांचे स्तोम वाढले. इंग्रजी माध्यमाला अवास्तव महत्व आले. ठरवून जाणूनबुजून मराठी शाळांना प्रतिकूल असणारी धोरणं राज्यकर्त्यांनी राबवली. झेडपी शाळांची गुणवत्ता ढासळली. शिक्षकांच्यावर बिगरशैक्षणिक कामाचा अतिरिक्त तान दिला गेला. सरकारे बदलली की योजना अद्यादेश बदलू लागले, मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणे नवीन अध्यादेश निघू लागले. झेडपी शाळांची अवस्था तोळामास झाली. तरीही काही धडपड्या शिक्षकांनी पालकांकडून, लोकनिधीतून अनेक शाळा पुन्हा दिमाखात उभ्या केल्या. पुन्हा फ़िनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. माझ्या गावच्या शाळेेत सद्या कार्यरत असणारे मुख्याध्यापक मोरे सर यांनी शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण हे प्रयत्न तोकडे आहेत. कोणत्याही गोष्टीची किंमत ती गोष्ट आपल्यापासून दूर गेल्यावर समजते. सरकारी शाळांचे तसेच आहे. जो पर्यंत त्या आहेत तो पर्यंतच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न हवेत. या शाळा सर्वसामान्य जनतेला मोठा आधार आहेत. त्या व्यवस्थित चालणे यात समाजाचे हित आहे. माझी मुलं कुठं सरकारी शाळेत जातात? असा दृष्टिकोन जर कोना सदन पालकाचा असेल व त्यामुळे त्यांना सरकारी शाळेकडे लक्ष देणे जरुरी वाटत नसेल तर ही खूप मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. ज्या समाजात आपण राहतो, तिथे फक्त आपण आपले कुटुंब सुस्थितीत असून चालत नाही, आजूबाजूचा समाज सुस्थितीत हवा. तर सर्व ठीक राहील. आपल्या बरोबर समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला तर त्याची फळे सर्वांना चाखता येतील. जर सामजिक विषमता व शैक्षणिक दरी वाढत गेली तर हे समाजव्यवस्थेला घातक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक गावच्या झेडपी शाळांच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. "एखाद्याची शंभरी भरणे" हा वाक्यप्रचार दुसऱ्या अर्थाने धोक्याची घंटा म्हणून परिचित आहे. या शाळा डबल सेंच्युरी मारण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्थरातील लोकांनी लक्ष घातले पाहिजे. शिक्षकांनी बदलत्या जगाचा कानोसा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान शिकायला हवे. शिक्षकांनी शिक्षक सोसायट्या व इतर गट तटाच्या राजकारणापासून दूर राहून निरपेक्षपणे सेवा करण्याचा वसा घेतला पाहिजे. सद्याच्या परिस्थितीत सरकारी शाळा टिकतील का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेच्या समस्येवर खरे उपाय शोधण्याचा सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवा.

माझ्या व  माझ्या गावच्या जडणघडणीत ज्या शाळेने शंभर वर्षे योगदान दिले त्या शाळेला अजून पुढच्या चार पिढ्या शिकवण्याची, घडवण्याची संधी मिळो याच शुभेच्छा या वेळी मी, माजी विध्यार्थी म्हणून देतो.
....संदिप रामचंद्र चव्हाण.

Sunday 14 January 2018

वाचत सुटलो त्याची गोष्ट.. मला आवडलेले मराठी पुस्तक

वाचत_सुटलो_त्याची_गोष्ट.. मला आवडलेले मराठी पुस्तक

लेखक:- निरंजन घाटे,
प्रकाशन:-समकालीन प्रकाशन,
पुष्ठ संख्या:- 246
किंमत:- 300 (10 ते 20 टक्के डिस्काउंट मिळते व हे आपण कुठून घेतो त्यावर अवलंबून आहे)


कोण किती वाचेल, काय वाचेल, किती वेगाने वाचेल या बद्दल व्यक्तिपरत्वे भिन्नता असू शकते. वयाच्या पाचव्या- सहाव्या वर्षांपासून वयाच्या सत्तर वर्षायापर्यंत व अजूनही पुढे वाचत जायचे व वाचण्यासाठी जणू हा जन्म, वाचन हेच कर्म आणि धर्म असं ज्यांचं आजपर्यंतचे आयुष्य व आयुष्यातील बहुतेक वेळ ज्यांनी वाचन केले व त्यामुळे 180 च्या वर ज्यांनी पुस्तके लिहली व विज्ञान विषयीचे लेखक म्हणून जे प्रसिद्ध झाले अशा अवलियाचे वाचनासंबंधीच्या आयुष्याचा धावता पट उलगडून दाखवणारे पुस्तक म्हणजे 'वाचत सुटलो त्याची गोष्ट....'

लेखक निरंजन घाटे यांनी आयुष्यात इतके वाचले की खचितच असे चौफेर वाचन कोणाचे असेल. आवडीचे किंवा एखाद्या दुसऱ्या विषयाचे सखोल अभ्यास करणारे व त्यावर ग्रंथ लिहणारे पुष्कळ लोक आहेत. परंतु घाटे यांना कोणताही विषय वर्ज नाही. कोणताही विषय त्यांच्या 65 वर्ष्याच्या वाचनातून सुटलेला नाही. त्यांची तपाचर्या त्यांनी लिहलेल्या 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' यातून आपणाला समजते. या पुस्तकात उल्लेख झालेल्या व लेखकांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी करायची म्हणले तर ही संख्या हजारच्या वर जाईल. आणि ही यादी म्हणजे सर्वकाही नव्हे. लेखकाने फक्त त्यांच्या स्मृतीत व वाचकांना काही उकृष्ट द्यावे असेच या पुस्तकात उल्लेख केले आहेत.
पुस्तके कशी मिळवली, त्यामध्ये काय आहे, त्यातून लेखकाला नवीन काय मिळाले या बद्दलचा उवापोह या पुस्तकात आहे.
लेखकाचे लहानपण प्रतिकूल परिस्थितीत गेले, पण आईने केलेले वाचन संस्कार त्यांना किती उपयोगी पडले याचा ते अभिमानाने उल्लेख करतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आकाशवाणी, काही ठिकाणी संपादक व प्राद्यापक म्हणून नोकरी करतात व वाचनाबद्दलची आवड असणारी पत्नी मिळाते. पत्नीला चांगली नोकरी लागल्यावर, कौटूंबिक स्थिरता आल्यावर लेखक नोकरी सोडून पूर्णवेळ वाचन लेखन करतात... त्यावेळी.... यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे सिद्ध होते. पत्नीबद्दलचा अभिमान ते वेळोवेळी व्यक्त करतात. खाजगी आयुष्यातील थोडेसे उल्लेख सोडले तर हे आत्मचरित्र पूर्णपणे वाचलेल्या पुस्तकांना वाहिले आहे...
माझ्या सारख्या नववाचकाला असंख्य नवीन पुस्तक- लेखकांची माहिती यातून मिळते. यात उल्लेख झालेली बहुतांश पुस्तके इंग्रजी आहेत किंवा परकीय लेखकांची आहेत. भारतीय लेखकांच्या पुस्तकांचाही उल्लेख आहे पण तुलनेने कमी वाटतो. एकूण तेरा प्रकरणात हे पुस्तक विभागले आहे.
ज्यांना चौफेर वाचन करायला आवडते किंवा करायचे आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. वाचताना नेहमी कागद व पेन जवळ ठेवावा त्यामुळे उल्लेख झालेल्या पुस्तकांची व त्या पुस्तकांच्या लेखकांची नावे लिहणे सोपे जाईल. मी सलग पुस्तक वाचले त्यामुळे अशा नोट्स काढल्या नाहीत... पण पुस्तक संग्रही असल्यामुळे नंतर वाचताना यातील उल्लेखलेल्या पुस्तकांची यादी नक्की बनवायची असं ठरवून पुस्तक ठेऊन दिले.
---- संदिप रामचंद्र चव्हाण

या पुस्तकाबद्दल इतर ठिकाणी वाचलेली माहिती व ब्लॉग खालीलप्रमाणे...
http://mahamtb.com/Encyc/2017/9/2/Wachat-sutalo-tyachi-goshta-Book-review-by-prasad-phatak-.html

https://www.loksatta.com/lekh-news/vachat-sutalo-tyachi-goshta-marathi-books-by-author-niranjan-ghate-1521168/

http://sahityasuchi.erasik.com/articles/vachat_sutlo_tychi_goshta

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/book-by-niranjan-ghate/articleshow/61507240.cms

https://m.facebook.com/story.php?story_fbid=647545992113087&substory_index=0&id=231117740422583

मकरसंक्रांत आणि संक्रात....

मकरसंक्रांत आणि संक्रात.... संदिप रामचंद्र चव्हाण.

मकर संक्रात हा इंग्रजी कॅलेंडर वर्षातील पहिला हिंदू सण. तिळगुळ घ्या गोड बोला... असं म्हणून एकमेकाप्रति सलोखा, प्रेम, आत्मीयता, आदर, सन्मान व्यक्त करण्याचा व चैतन्याचा सण! मित्रांना, आप्तांना तिळगुळ देऊन स्नेह वृद्धिंगत करण्याचा तर शत्रुलाही तिळगुळ देऊन मित्रत्वाचा हात पुढे करण्याचा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे 14 जानेवारी. अपवादाने(अंदाजे 70 वर्षांनी) 15 जानेवारीलाही मकर संक्रांत येते... माणसाच्या आयुष्यात जसा महत्वाचा तसा निसर्गातील मोठ्या बदलला सुरवात होणारा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. संक्रमन, ओलांडून जाणे, बदल स्वीकारणे, त्यासाठीची तयारी करणे म्हणजे मकरसंक्रांत.

दिवस मोठा व रात्र लहान होऊन उत्तर गोलार्थातील लोकांना जास्त प्रकाश मिळण्यास सुरवात होते, याला उत्तरायण सुरवात म्हणू शकतो. (शास्त्रीय दृष्टया उत्तरायण 21 मार्च ते 21जून असे असते)
सर्व हिंदू सण तिथीप्रमाणे येतात व साजरे केले जातात, परंतु मकरसंक्रात मात्र तारखेप्रमाणे साजरी होते. अजूनतरी यावरून तारीख का तिथी असा वाद नाही. याचे श्रेय न चुकता सदैव आपले काम करणाऱ्या सूर्याला द्यावे लागेल....

भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रातीच्या आधी एक दिवस बाजरीची भाकरी तीळ लाऊन सर्व उपलब्द भाज्यांची एकत्रित केलेल्या भाजीबरोबर खाणे, तीळ आणि गूळ संक्रातीला खाणे हे शारीरिक बल वाढवण्यासाठी उपयोगी असते. पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात शारीरिक झीज भरून निघावी यासाठीची योजना असते.
संक्रातीला पौराणिक महत्वही आहे.. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे.
संक्रात येणे म्हणजे संकट येणे असाही वाक्यप्रचार मराठीमध्ये रूढ आहे. तर अशा पद्धतीने मकरसंक्रात हा हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा सण आहे.
अलीकडे मकरसंक्रातीला होणाऱ्या पंतगबाजीमुळे हा सण काही कुटुंबावर व पक्षांवर खऱ्या अर्थाने संकटांची संक्रात घेऊन येत आहे. त्याला जबाबदार बेजबाबदारपणे पतंग उडवणारे नागरिक किंवा मुलांना नॉयलॉन मांजा आणून देणारे पालक होय.

संक्रातील पतंग उडवण्याची पध्दत उत्तरभारतात दिसते... अनुकरणप्रिय महाराष्ट्रातील बहुतेक शहरी व काही प्रमाणात ग्रामीण जनतेने पतंग उडवण्याची पद्धत स्वीकारली आहे. यामुळे पतंगाची बाजारपेठ वाढली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीला, सणाला समाज उपयोगी साजरे न करता त्याला विध्वंसक, त्रासदायकरीतीने कसे साजरे करायचे याचा उत्तम (अव)गुण आपल्याकडे आहेत.
नॉयलॉन मांज्यावर गांज्याप्रमाणे बंदी घालूनसुद्धा कोठेही अगदी सहजरित्या न तुटणार धागा मिळत आहे. चिनी मांजा, भारतीय नॉयलॉन मांजा, काच लावलेला मांजा असे वेगवेगळे मांजाचे प्रकार बंधी असूनही मिळतात तेव्हा शासकीय यंत्रणेचे अपयश व व्यवसायात कायद्याचा धाक नाही हेच निदर्शनास येते. मृत्यूदूत असणाऱ्या नॉयलॉन मांजाचा व्यवसाय करणारे जसे या समस्येला जबाबदार आहेत तसे विकत घेणारे बेजबाबदार ग्राहकही या समस्येला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत.
असंख्य पक्षी जायबंधी किंवा मृत्यू होण्याचे कारण नॉयलॉन मांजा आहे. अनेक मोटरसायकल चालक व लहान मुलं नायलॉन मांजची शिकार झाली आहेत... मांजमुळे जखमी झालेल्या पक्षांना वाचवतानाही काहिजनांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हसती खेळती घरे कोसळून पडली आहेत... त्यांची हानी कोणतेही मोल देऊन भरून निघणारी नाही. सण उत्सव हा समाजाच्या, व्यक्तींच्या जीवनात आनंद आणणारा क्षण असतो. तो तसाच आनंददायी रहावा म्हणून सर्व स्थरातून प्रयत्न करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मकरसंक्रांतीमुळे कोणाच्या आयुष्यात संक्रात येऊ नये हीच काय ती अपेक्षा करतो व थांबतो. मी लिहलेले वाचून एका व्यक्तीने जरी नॉयलॉन मांजा खरेदी न करण्याचा निर्णय घेतला तरी मला त्या गोष्टीचे समाधान असेल. त्या समाधानाच्या अपेक्षेनेच हा लेखप्रपंच....
( खाली काही लिंक दिल्या आहेत त्या नॉयलॉन मांजा संबधी उदाहरण म्हणून आहेत)

http://zeenews.india.com/marathi/maharashtra/owl-injured-due-to-nylon-manja-yeola-nasik/405714

Nayonbara Bazar Nylon Manja due to many ban | नंदुरबारात नॉयलॉन मांजामुळे अनेक जायबंदी | Lokmat.com - http://www.lokmat.com/

नायलॉन मांजाची सर्रास विक्री - nylon manja problem in city - Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nylon-manja-problem-in-city/articleshow/62285591.cms?utm_source=whtsapp&utm_campaign=ampmobile&utm_medium=referral&fb_ref=Default

https://www.loksatta.com/nagpur-news/permanently-ban-on-nylon-manja-1274797/

Thursday 4 January 2018

संस्कृतीकडून विकृतीकडे.... भाग दोन. 20/12/17

संस्कृतीतून_विकृतीकडे... भाग दोन
शाळा कॉलेज मधील तरुण पिढीचे वर्तन कसे बदलत आहे या बद्दल मी संस्कृतीतून विकृतीकडे भाग एक मध्ये काही मुद्दे मांडले आहेत.
समाजातील अशाच काही असंवेदनशील इतर गोष्टीं घडत आहेत त्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाढत्या वयाच्या पिढीवर आणि समाज मनावर परिणाम करतात...
त्यापैकी काही घटना पाहू....
काही दिवसांपूर्वी एक बातमी टीव्ही न्यूजला आली...व माध्यमातून यावर चर्चा झाली... सासू सुनेचे पटेना, व आईसाठी भाड्याने वेगळी खोली घ्यायची ऐपत नाही म्हणून नगरमध्ये पोटच्या मुलाने म्हाताऱ्या आईला जिवंतपणी स्मशानात सोडले, तर दुसरीकडे मुंबई मधील उच्चभ्रू वसाहतीत असणाऱ्या फ्लॅट मध्ये एक वृद्ध महिला इतके दिवस मरून पडलेली असते की जेव्हा तिचा मुलगा परदेशातून येतो तेव्हा फक्त तिचा सांगाडा शिल्लक राहिलेला असतो,,
दुसऱ्या एका उदाहरणात परदेशातून मुलगा येतो... आईवडिलांना गोड बोलून पुण्यात असणारं घर विकायला लावतो... सोबत न्यायचं कबूल करून विमातळावरच सोडून परदेशात पैशासह पोबारा करतो... खूप वेळ मुलगा येईना म्हणून वृद्ध जोडपं चौकशी कक्षात चौकशी करत तेव्हा मुलाचा प्रताप लक्षात येतो... गाठीला रुपायासुद्धा नसल्यामुळे ती म्हातारी आई हातातील सोन्याची बांगडी विमानतळावरील कर्मचाऱ्याला देऊ करते व परतीच्या प्रवासाला पैसे मागते... हा प्रसंग त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.. तो कर्मचारी त्यांना ते सोने न घेता पैसे देऊन त्या वृद्ध दांपत्याची विचारपूस करतो... असा चित्रपटात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या मातीतल्या दिवट्याच्या वागण्याने घडतो...,,
व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून दारूच्या नशेत स्वतःच्या आईचा खून करनारा व तिचे तुकडे करून काळीज काढुन कौर्याची परिसीमा करणारा विकृत कोल्हापूरच्या मातीत निपजतो,, तेव्हा छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा हाच का तो महाराष्ट? असा प्रश्न पडतो.
अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली... आई सारखे प्रश्न विचारते म्हणून मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने आईचा खून केला व तिच्याच रक्ताने मेसेज लिहून ठेवतो.. मला पकडा आणि फाशी द्या!
नाशिकचा कुंभमेळा हा वृद्ध लोकांना एकाकी सोडून देण्याचे ठिकान झाले आहे, कुंभमेळ्याची पर्वणी साधतासाधता बरोबर आणलेल्या म्हाताऱ्या आई- वडिलांना किंवा दोहोंपैकी जे हयात आहेत त्यांना एकाकी सोडून पोटची मुलं निघून जातात... तेव्हा वृद्धांची "समृद्ध अडगळ" (?) मुलांना नकोशी असते का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जमिनीच्या तुकड्यांनी भावभावनांचा "पाठबळ ते सख्ये भाऊ पक्के वैरी" इतपर्यंतचा प्रवास घडवला आहे. त्यांतून भावाभावांची हाणामारी, कोर्टकचेरी अगदी खून सुध्दा पडत आहेत. सासू सुनांची भांडणे, किरकोळ कारणावरून टोकाचे मतभेद- मनभेद होत आहेत. हुंड्यासाठीचा छळ जेव्हा जिवंत जाळून टाकण्यापर्यंत जातो तेव्हा जिजाऊ, सावित्रीबाई, राणी लक्ष्मीबाई याच मातीत घडल्या याचा विसर आपल्याला पडला का? असा प्रश्न पडतो. आणि समाज संस्कृतीतून विकृतीकडे चालला का? हाही प्रश्न निर्माण होतो.
लहान मुलीपासून वयस्कर महिलेवर बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत, कोपर्डी बलात्कार असो की दिल्ली मधील निर्भया घटना, यासारख्या बलात्काराच्या घटनामध्ये सतत वाढ होऊन हा विषय खूप गंभीर व गुंतागुंतीचा बनत आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पण अशा इतर गुन्ह्यातील अजून असंख्य गुन्हेगार मोकाट आहेत, यात कायद्याच्या दृष्टीने बालगुन्हेगारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
कौटूंबिक स्थरावर विचार करता विवाह पूर्व व विवाहबाह्य संबध यात काही कमीपणा वाटेनासा झाला आहे. यातून कुटुंबाच्या ठिकऱ्या होत आहेत. घटस्फोट वाढून मुलांना एकेरी पालकत्व वाट्याला येत आहे, समाजात त्यांना अपमानित जीवन जगावे लागते, त्यामुळे मुलांचे भावविश्व उध्वस्त होत आहे. यातून पुढे गुन्हेगार तयार होण्याची शक्यता असते.
लोकशाहीतील महत्वाच्या मतदान प्रक्रियेत मतासाठी दारू, मटण, पैसे वाटले जातात व लोकही ते घेतात व आपली किंमत ठरवतात. साम,दाम,दंड,भेद वापरून कशीही हवी पण सत्ता हवी यासाठी सर्वच राजकीय पक्ष पराकोटीचा प्रयत्न करताना दिसतात. निष्ठेच्या बाता मारणारे राजकीय नेते रोज निष्ठा बदलून कपडे बदलावीत तसे पक्ष बदलत आहेत, तर रस्त्यावरील लोकांना चिरडून पाळणारे अभिनेते गुन्हा करून निर्दोष सुटत आहेत. कायद्याचा खिस पाडण्यासाठी त्यांच्या दिमतीला खर्याचे खोटे व खोट्याचे खरे कऱण्यात पटाईत कायदेतज्ज्ञ आहेत. आणि असे लोक तरुणांचे आयडॉल आहेत. याला काय म्हणावे?
सरकारी नोकरदार भ्रष्टाचाराने लिडबडलेले आहेत, सरकारी कार्यालये लोकांच्या सेवेसाठी का गैरसोईसाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत कायद्याचे रक्षक भक्षक बनले व आरोपी म्हणून ताब्यात असणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण करून अर्धवट जाळून फेकून देण्याचे धाडस त्यानी केले आहे. गुन्हेगारांना पोलीस व कायद्याचा वचक नाही, त्यांचे समांतर जग तयार झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणजे देव ही भूमिका बदलून डॉक्टर म्हणजे कसाई.. येईल त्याला पैशाला कापतो, गोरगरिबांनी उपचाराविना मरायचे अथवा सरकारी हॉस्पिटलमध्ये सडायचे.... अशी मानसिकता सर्वसामान्यांची झाली आहे. दिल्लीमध्ये एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलीला अँडमिट केल्यानंतर दिवसाला लाखापेक्षा जास्त बिल आकारले जाते व ती शेवटी मृत होते पंधरा दिवसाचे बिल सतरा अठरा लाख होते व हा विषय केंद्रीय आरोग्यमंत्रालयापर्यंत जातो. तेव्हा हॉस्पिटल हे जीव वाचवण्यासाठी असतात. की यातून पैसे कमवणारीे,शोषण करणारी नवीन दुकानदारी सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
शिक्षणाचे बाजारीकरण व बालक- पालकांचे शोषण अशी नवीन शिक्षणव्यवस्था दिमाखात उभी राहिली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देऊन कोणीतरी विद्यापीठ खोलतो व तिथे विद्यार्थ्यांना पदव्यांची खिरापत वाटली जाते, या बाबतीत शिक्षणयंत्रणा यावर आजपर्यंत गप्प बसते... अशीही बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लोकांना समजते तेव्हा शिक्षणाने माणूस घडतो यावरचा विश्वास कमी होण्यातच हातभार लागतो.
जय जवान जय किसान हे नावाला राहिले आहेत... जवान सीमेवर आणि किसान शेतावर रोज मरतो आहे. लाखों शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे तरीही शेती व शेतकरी याबद्दल सरकार, उच्च शिक्षित नवश्रीमंत वर्ग गंबीर आहे असं वाटत नाही. खाजगी उद्योगात कामगारांचे शोषण अजूनही चालू आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत भारतीय लोकांची संख्या वाढत असताना भूकबळी व कुपोषणाने उद्याचा भारत मरत आहे. देशात गोरगरीब उपाशी व कर्जबुडवे उद्योगपती(?) तुपाशी अशी परिस्थिती आहे.
कुठे अपघात झाला तर मदत करणे बाजूला व हातातील मोबाइलवर शुटिंग चालू असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसतोय, साध्या साध्या अफवेवर विश्वास ठेऊन गडबड गोंधळ उडत आहे. त्यात माणसं किड्यामुंग्याप्रमाणे चिरडून मरत आहेत. मुंबईतील अपघात त्याचे जिवंत उदाहरण आहे.
ऐकून घेण्याची सवय कमी झाली आहे. माझंच खरं ही प्रवृत्ती वाढून विरोधी विचारांना विचाराने विरोध न करता विरोधी विचार करणाऱ्यांचे खून पडत आहेत.
सार्वजनिक स्वच्छता याबद्दल तर काय बोलावे? कुठेही थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे लोक रस्त्यावर, बसमध्ये, रेल्वेमध्ये, सरकारी कार्यालयात, जिन्याच्या कोपऱ्यात थुंकण्यात धन्यता मानतात. सरकारी औद्योगिक क्षेत्रात व काही खाजगी औद्योगिक क्षेत्रात तर ज्या मशीनवर पोट चालते, जिथे काम करतो, त्या मशीनवर त्या जागेवर थुंकण्यात कसलाच कमीपणा न मानणारी, सार्वजनिक टॉयलेट मध्ये वापर झाल्यावर पाणी टाकायचे असते याचे भान हरवलेली बेभान माणसं पहिली की वाटतं ही लोकं घरातही असंच वागत असतील का?
पंचवीस, तीस वर्षांपूर्वी नदीचे पाणी भांड्यात भरून घ्यावे किंवा ओंजळीने प्यावे अशी परिस्थिती होती, आज  घरोघरी पाण्याचे फिल्टर आणि टीडीएस मिटर आणावे लागत आहे. जगाचा विचार करता उपलब्द सर्व जलस्त्रोत दूषित करण्यात आपण आघाडीवर आहोत. कोणतीही वस्तू खरेदी करताना घरातून मोकळ्या हाताने जाऊन येताना प्लॅस्टिक ब्याग हातात हलवत येण्यात काही कमीपणा वाटत नाही, उलट त्याला प्रतिष्ठा आली आहे. त्यातून प्लास्टिक समस्या निर्माण झाली आहे. घरातील कचरा हा रस्त्यावर टाकण्यासाठीच तयार झालेला असतो अशी काहीशी मानसिकता लोकांच्यात तयार झाली आहे.
श्रद्धेच्या विषयात तर एवढा विसंवाद आहे की त्यावरून दंगली घडत आहेत. भोंदू बाबांनी आपापली दुकानं थाटून कोट्यवधीची माया जमवून श्रध्देचा बाजार मांडला आहे, महिलांचे लैगिंक शोषण व बेकायदेशीर काम केल्यामुळे बऱ्याच जणांना जेलची हवा खायला मिळाली आहे. आणि तरीही त्यांचे भक्त त्यांना देव मानत आहेत. पैशाचा पाऊस, इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी अंधश्रद्देतून नरबळी देण्याच्या घटनाही अधेमधे घडतात, तेव्हा समाज संस्कृतीतुन विकृतीकडे चालला का? हा प्रश्न अधिक गडद होतो आहे.
वरील नमूद केलेल्या घटना या हिमनगाचे टोक आहे.
या सर्व गोष्टी खूप प्रातिनिधीक आहेत अश्या असंख्य घटना घडल्यात व घडत आहेत. या सर्व गोष्टींचा कोणालाही ना खेद ना खंत! असे भीषण असणारे वास्तव  व व्यक्तिगत, सामाजिक हानी करणारे प्रसंग रोज कुठेना कुठे घडत आहेत. या सर्व परिस्तितीत चांगले अपवाद जरूर आहेत. पण विकृतांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे... याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत.
देश स्वतंत्र होईपर्यंत लोकांना,तरुणांना एक निश्चित ध्येय होते.. देशाचे स्वातंत्र्य!! स्वातंत्र्य मिळाले, काळ पुढे जाईल तसा लोकांचे वागणे व व्यवहार बदलू लागला.
स्वातंत्र्या नंतर पहिली तीस पस्तीस वर्षे लोकांच्यात व राज्यकर्त्यामध्ये साधेपणा व सच्चेपणा होता अस अनेक नोंदीमधून समजते. काळ जाईल तसे लोक व राज्यकर्ते बदलत गेले, नीतीची जागा अनितीने घेतली, शिष्टाचाराची जागा भ्रष्टाचाराने घेतली, न्याय कमी व अन्याय जास्त, आदर कमी व अनादर वाढला, पोषण कमी व शोषण वाढले, सत्व स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी वाढली, स्वातंत्र्याची जागा स्वयराचाराने घेतली. लोक देशाचा सोडून स्वतःचा विचार करायला लागले. याच दरम्यान टीव्ही आला व लोकांना नवीन करमणुकीचे साधन झाले. पुढे मोबाईल क्रांती झाली, जग जवळ येत असताना जवळची माणसं लांब गेली. करलो दुनिया मुठ्ठीमें म्हणता म्हणता कुटुंबातील एकोप्याची सुट्टी तर जाती-जातीत कधी कट्टी झाली हे समजले नाही.
ही परिस्थिती पालटायची असेल तर प्रत्येकाने आयुष्याचे भान व सामाजिक जाण ठेऊन वर्तन करायला हवे... ते घडत नसेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, मंगळावरील वारी आणि चंद्रावरील स्वारी व्यर्थ आहे. आतून शरीर व्याधीने पोखरले असताना वरून नवीन कपड्याने सजवले तरी दुर्धर व्याधी बरी होत नाही... यावर मुळातूनच उपाय हवा. भौतिक विकासाचा वेग कमी असला तरी समाज विकृतीचा वेग कमालीचा वाढला आहे. या विकृतीच्या जंगलात माणूस नावाचा प्राणी हरवून जाईल....मग मात्र याचे लाभार्थी कोण??यापेक्षा यात हानी कोणाची झाली?? हा प्रश्न महत्वाचा व गंबीर असेल. ती हानी समाजाची, सर्वसामान्य जनतेची, कुटूंबव्यवस्थेची, चांगुलपणाची, न्याय, नीतीची, स्वाभिमानाची असेल व त्याची किंमतही मोठी असेल.
.....संदिप रामचंद्र चव्हाण.
(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.1 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)