My Blog List

Thursday 4 January 2018

संस्कृतीकडून विकृतीकडे.... भाग दोन. 20/12/17

संस्कृतीतून_विकृतीकडे... भाग दोन
शाळा कॉलेज मधील तरुण पिढीचे वर्तन कसे बदलत आहे या बद्दल मी संस्कृतीतून विकृतीकडे भाग एक मध्ये काही मुद्दे मांडले आहेत.
समाजातील अशाच काही असंवेदनशील इतर गोष्टीं घडत आहेत त्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाढत्या वयाच्या पिढीवर आणि समाज मनावर परिणाम करतात...
त्यापैकी काही घटना पाहू....
काही दिवसांपूर्वी एक बातमी टीव्ही न्यूजला आली...व माध्यमातून यावर चर्चा झाली... सासू सुनेचे पटेना, व आईसाठी भाड्याने वेगळी खोली घ्यायची ऐपत नाही म्हणून नगरमध्ये पोटच्या मुलाने म्हाताऱ्या आईला जिवंतपणी स्मशानात सोडले, तर दुसरीकडे मुंबई मधील उच्चभ्रू वसाहतीत असणाऱ्या फ्लॅट मध्ये एक वृद्ध महिला इतके दिवस मरून पडलेली असते की जेव्हा तिचा मुलगा परदेशातून येतो तेव्हा फक्त तिचा सांगाडा शिल्लक राहिलेला असतो,,
दुसऱ्या एका उदाहरणात परदेशातून मुलगा येतो... आईवडिलांना गोड बोलून पुण्यात असणारं घर विकायला लावतो... सोबत न्यायचं कबूल करून विमातळावरच सोडून परदेशात पैशासह पोबारा करतो... खूप वेळ मुलगा येईना म्हणून वृद्ध जोडपं चौकशी कक्षात चौकशी करत तेव्हा मुलाचा प्रताप लक्षात येतो... गाठीला रुपायासुद्धा नसल्यामुळे ती म्हातारी आई हातातील सोन्याची बांगडी विमानतळावरील कर्मचाऱ्याला देऊ करते व परतीच्या प्रवासाला पैसे मागते... हा प्रसंग त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.. तो कर्मचारी त्यांना ते सोने न घेता पैसे देऊन त्या वृद्ध दांपत्याची विचारपूस करतो... असा चित्रपटात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या मातीतल्या दिवट्याच्या वागण्याने घडतो...,,
व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून दारूच्या नशेत स्वतःच्या आईचा खून करनारा व तिचे तुकडे करून काळीज काढुन कौर्याची परिसीमा करणारा विकृत कोल्हापूरच्या मातीत निपजतो,, तेव्हा छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा हाच का तो महाराष्ट? असा प्रश्न पडतो.
अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली... आई सारखे प्रश्न विचारते म्हणून मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने आईचा खून केला व तिच्याच रक्ताने मेसेज लिहून ठेवतो.. मला पकडा आणि फाशी द्या!
नाशिकचा कुंभमेळा हा वृद्ध लोकांना एकाकी सोडून देण्याचे ठिकान झाले आहे, कुंभमेळ्याची पर्वणी साधतासाधता बरोबर आणलेल्या म्हाताऱ्या आई- वडिलांना किंवा दोहोंपैकी जे हयात आहेत त्यांना एकाकी सोडून पोटची मुलं निघून जातात... तेव्हा वृद्धांची "समृद्ध अडगळ" (?) मुलांना नकोशी असते का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जमिनीच्या तुकड्यांनी भावभावनांचा "पाठबळ ते सख्ये भाऊ पक्के वैरी" इतपर्यंतचा प्रवास घडवला आहे. त्यांतून भावाभावांची हाणामारी, कोर्टकचेरी अगदी खून सुध्दा पडत आहेत. सासू सुनांची भांडणे, किरकोळ कारणावरून टोकाचे मतभेद- मनभेद होत आहेत. हुंड्यासाठीचा छळ जेव्हा जिवंत जाळून टाकण्यापर्यंत जातो तेव्हा जिजाऊ, सावित्रीबाई, राणी लक्ष्मीबाई याच मातीत घडल्या याचा विसर आपल्याला पडला का? असा प्रश्न पडतो. आणि समाज संस्कृतीतून विकृतीकडे चालला का? हाही प्रश्न निर्माण होतो.
लहान मुलीपासून वयस्कर महिलेवर बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत, कोपर्डी बलात्कार असो की दिल्ली मधील निर्भया घटना, यासारख्या बलात्काराच्या घटनामध्ये सतत वाढ होऊन हा विषय खूप गंभीर व गुंतागुंतीचा बनत आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पण अशा इतर गुन्ह्यातील अजून असंख्य गुन्हेगार मोकाट आहेत, यात कायद्याच्या दृष्टीने बालगुन्हेगारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
कौटूंबिक स्थरावर विचार करता विवाह पूर्व व विवाहबाह्य संबध यात काही कमीपणा वाटेनासा झाला आहे. यातून कुटुंबाच्या ठिकऱ्या होत आहेत. घटस्फोट वाढून मुलांना एकेरी पालकत्व वाट्याला येत आहे, समाजात त्यांना अपमानित जीवन जगावे लागते, त्यामुळे मुलांचे भावविश्व उध्वस्त होत आहे. यातून पुढे गुन्हेगार तयार होण्याची शक्यता असते.
लोकशाहीतील महत्वाच्या मतदान प्रक्रियेत मतासाठी दारू, मटण, पैसे वाटले जातात व लोकही ते घेतात व आपली किंमत ठरवतात. साम,दाम,दंड,भेद वापरून कशीही हवी पण सत्ता हवी यासाठी सर्वच राजकीय पक्ष पराकोटीचा प्रयत्न करताना दिसतात. निष्ठेच्या बाता मारणारे राजकीय नेते रोज निष्ठा बदलून कपडे बदलावीत तसे पक्ष बदलत आहेत, तर रस्त्यावरील लोकांना चिरडून पाळणारे अभिनेते गुन्हा करून निर्दोष सुटत आहेत. कायद्याचा खिस पाडण्यासाठी त्यांच्या दिमतीला खर्याचे खोटे व खोट्याचे खरे कऱण्यात पटाईत कायदेतज्ज्ञ आहेत. आणि असे लोक तरुणांचे आयडॉल आहेत. याला काय म्हणावे?
सरकारी नोकरदार भ्रष्टाचाराने लिडबडलेले आहेत, सरकारी कार्यालये लोकांच्या सेवेसाठी का गैरसोईसाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत कायद्याचे रक्षक भक्षक बनले व आरोपी म्हणून ताब्यात असणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण करून अर्धवट जाळून फेकून देण्याचे धाडस त्यानी केले आहे. गुन्हेगारांना पोलीस व कायद्याचा वचक नाही, त्यांचे समांतर जग तयार झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणजे देव ही भूमिका बदलून डॉक्टर म्हणजे कसाई.. येईल त्याला पैशाला कापतो, गोरगरिबांनी उपचाराविना मरायचे अथवा सरकारी हॉस्पिटलमध्ये सडायचे.... अशी मानसिकता सर्वसामान्यांची झाली आहे. दिल्लीमध्ये एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलीला अँडमिट केल्यानंतर दिवसाला लाखापेक्षा जास्त बिल आकारले जाते व ती शेवटी मृत होते पंधरा दिवसाचे बिल सतरा अठरा लाख होते व हा विषय केंद्रीय आरोग्यमंत्रालयापर्यंत जातो. तेव्हा हॉस्पिटल हे जीव वाचवण्यासाठी असतात. की यातून पैसे कमवणारीे,शोषण करणारी नवीन दुकानदारी सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
शिक्षणाचे बाजारीकरण व बालक- पालकांचे शोषण अशी नवीन शिक्षणव्यवस्था दिमाखात उभी राहिली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देऊन कोणीतरी विद्यापीठ खोलतो व तिथे विद्यार्थ्यांना पदव्यांची खिरापत वाटली जाते, या बाबतीत शिक्षणयंत्रणा यावर आजपर्यंत गप्प बसते... अशीही बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लोकांना समजते तेव्हा शिक्षणाने माणूस घडतो यावरचा विश्वास कमी होण्यातच हातभार लागतो.
जय जवान जय किसान हे नावाला राहिले आहेत... जवान सीमेवर आणि किसान शेतावर रोज मरतो आहे. लाखों शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे तरीही शेती व शेतकरी याबद्दल सरकार, उच्च शिक्षित नवश्रीमंत वर्ग गंबीर आहे असं वाटत नाही. खाजगी उद्योगात कामगारांचे शोषण अजूनही चालू आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत भारतीय लोकांची संख्या वाढत असताना भूकबळी व कुपोषणाने उद्याचा भारत मरत आहे. देशात गोरगरीब उपाशी व कर्जबुडवे उद्योगपती(?) तुपाशी अशी परिस्थिती आहे.
कुठे अपघात झाला तर मदत करणे बाजूला व हातातील मोबाइलवर शुटिंग चालू असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसतोय, साध्या साध्या अफवेवर विश्वास ठेऊन गडबड गोंधळ उडत आहे. त्यात माणसं किड्यामुंग्याप्रमाणे चिरडून मरत आहेत. मुंबईतील अपघात त्याचे जिवंत उदाहरण आहे.
ऐकून घेण्याची सवय कमी झाली आहे. माझंच खरं ही प्रवृत्ती वाढून विरोधी विचारांना विचाराने विरोध न करता विरोधी विचार करणाऱ्यांचे खून पडत आहेत.
सार्वजनिक स्वच्छता याबद्दल तर काय बोलावे? कुठेही थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे लोक रस्त्यावर, बसमध्ये, रेल्वेमध्ये, सरकारी कार्यालयात, जिन्याच्या कोपऱ्यात थुंकण्यात धन्यता मानतात. सरकारी औद्योगिक क्षेत्रात व काही खाजगी औद्योगिक क्षेत्रात तर ज्या मशीनवर पोट चालते, जिथे काम करतो, त्या मशीनवर त्या जागेवर थुंकण्यात कसलाच कमीपणा न मानणारी, सार्वजनिक टॉयलेट मध्ये वापर झाल्यावर पाणी टाकायचे असते याचे भान हरवलेली बेभान माणसं पहिली की वाटतं ही लोकं घरातही असंच वागत असतील का?
पंचवीस, तीस वर्षांपूर्वी नदीचे पाणी भांड्यात भरून घ्यावे किंवा ओंजळीने प्यावे अशी परिस्थिती होती, आज  घरोघरी पाण्याचे फिल्टर आणि टीडीएस मिटर आणावे लागत आहे. जगाचा विचार करता उपलब्द सर्व जलस्त्रोत दूषित करण्यात आपण आघाडीवर आहोत. कोणतीही वस्तू खरेदी करताना घरातून मोकळ्या हाताने जाऊन येताना प्लॅस्टिक ब्याग हातात हलवत येण्यात काही कमीपणा वाटत नाही, उलट त्याला प्रतिष्ठा आली आहे. त्यातून प्लास्टिक समस्या निर्माण झाली आहे. घरातील कचरा हा रस्त्यावर टाकण्यासाठीच तयार झालेला असतो अशी काहीशी मानसिकता लोकांच्यात तयार झाली आहे.
श्रद्धेच्या विषयात तर एवढा विसंवाद आहे की त्यावरून दंगली घडत आहेत. भोंदू बाबांनी आपापली दुकानं थाटून कोट्यवधीची माया जमवून श्रध्देचा बाजार मांडला आहे, महिलांचे लैगिंक शोषण व बेकायदेशीर काम केल्यामुळे बऱ्याच जणांना जेलची हवा खायला मिळाली आहे. आणि तरीही त्यांचे भक्त त्यांना देव मानत आहेत. पैशाचा पाऊस, इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी अंधश्रद्देतून नरबळी देण्याच्या घटनाही अधेमधे घडतात, तेव्हा समाज संस्कृतीतुन विकृतीकडे चालला का? हा प्रश्न अधिक गडद होतो आहे.
वरील नमूद केलेल्या घटना या हिमनगाचे टोक आहे.
या सर्व गोष्टी खूप प्रातिनिधीक आहेत अश्या असंख्य घटना घडल्यात व घडत आहेत. या सर्व गोष्टींचा कोणालाही ना खेद ना खंत! असे भीषण असणारे वास्तव  व व्यक्तिगत, सामाजिक हानी करणारे प्रसंग रोज कुठेना कुठे घडत आहेत. या सर्व परिस्तितीत चांगले अपवाद जरूर आहेत. पण विकृतांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे... याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत.
देश स्वतंत्र होईपर्यंत लोकांना,तरुणांना एक निश्चित ध्येय होते.. देशाचे स्वातंत्र्य!! स्वातंत्र्य मिळाले, काळ पुढे जाईल तसा लोकांचे वागणे व व्यवहार बदलू लागला.
स्वातंत्र्या नंतर पहिली तीस पस्तीस वर्षे लोकांच्यात व राज्यकर्त्यामध्ये साधेपणा व सच्चेपणा होता अस अनेक नोंदीमधून समजते. काळ जाईल तसे लोक व राज्यकर्ते बदलत गेले, नीतीची जागा अनितीने घेतली, शिष्टाचाराची जागा भ्रष्टाचाराने घेतली, न्याय कमी व अन्याय जास्त, आदर कमी व अनादर वाढला, पोषण कमी व शोषण वाढले, सत्व स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी वाढली, स्वातंत्र्याची जागा स्वयराचाराने घेतली. लोक देशाचा सोडून स्वतःचा विचार करायला लागले. याच दरम्यान टीव्ही आला व लोकांना नवीन करमणुकीचे साधन झाले. पुढे मोबाईल क्रांती झाली, जग जवळ येत असताना जवळची माणसं लांब गेली. करलो दुनिया मुठ्ठीमें म्हणता म्हणता कुटुंबातील एकोप्याची सुट्टी तर जाती-जातीत कधी कट्टी झाली हे समजले नाही.
ही परिस्थिती पालटायची असेल तर प्रत्येकाने आयुष्याचे भान व सामाजिक जाण ठेऊन वर्तन करायला हवे... ते घडत नसेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, मंगळावरील वारी आणि चंद्रावरील स्वारी व्यर्थ आहे. आतून शरीर व्याधीने पोखरले असताना वरून नवीन कपड्याने सजवले तरी दुर्धर व्याधी बरी होत नाही... यावर मुळातूनच उपाय हवा. भौतिक विकासाचा वेग कमी असला तरी समाज विकृतीचा वेग कमालीचा वाढला आहे. या विकृतीच्या जंगलात माणूस नावाचा प्राणी हरवून जाईल....मग मात्र याचे लाभार्थी कोण??यापेक्षा यात हानी कोणाची झाली?? हा प्रश्न महत्वाचा व गंबीर असेल. ती हानी समाजाची, सर्वसामान्य जनतेची, कुटूंबव्यवस्थेची, चांगुलपणाची, न्याय, नीतीची, स्वाभिमानाची असेल व त्याची किंमतही मोठी असेल.
.....संदिप रामचंद्र चव्हाण.
(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.1 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)

No comments:

Post a Comment