My Blog List

Thursday 18 January 2018

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

शाळा दोन अक्षरी शब्द.... प्रेत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक.... माणसाच्या जडणघडणीमध्ये जसा आई-वडिलांचा महत्त्वाचा वाटा असतो, तसा शिक्षकांचा अन शाळेचाही असतो.  'आवडते ही मज मनापासून शाळा, लाविते लळा, जशी माउली बाळा......!' कवी म्हणतो की आई इतका लळा, प्रेम करणारी शाळा मनापासून आवडते. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या कोपर्डे हवेली
जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
 मुल कुटुंबात जन्माला येतं... हळूहळू मोठं होतं... दिसेल ते पाहत... कानावर पडेल ते ऐकत... बोलण्याचा प्रयत्न करत... अखंडपणे शिकत असतं. ठराविक वय झालं की त्याला शाळेत घातलं जातं. पूर्वी बालवाडी असायची, सर्वच मुलं बालवाडीत जयचीच असं नाही, स्पर्धा नव्हती, कंपलशन नव्हते, माझा मुलगा- मुलगी मागे पडेल(म्हणजे नेमकं काय?) असा विचारही पालकांच्या मनाला शिवत नव्हता. आता प्लेस्कुल, नर्सरी, केजी असते, नवीनच जन्माला आलेल्यांना पाळणाघर असते... मागील पंचवीस तीस वर्षांपूर्वी ही जीवघेणी स्पर्धा नव्हती किंबहुना तुलनेने अगदीच कमी होती.


 वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत प्रवेश व्हायचा. काही पालक पाचव्या वर्षीही मुलाला पहिलीत घालायचे. जन्मदाखल्यात जुगाड करायचे.. (त्यामुळे बऱ्याच मुलांची जन्मतारीख जुनमधील असायची)
काही वर्षांपूर्वी पर्यंत ग्रामीण भागात बहुतेक मुलांचे पहिलीचे प्रवेश जिल्हापरिषद शाळेत व्हायचे... गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलांमुलींची नावे शाळेत घालण्याची (ऍडमिशन) एक परंपरा होती... अजूनही काही ठिकाणी आहे....  पुढे शाळा जूनपासून सुरू व्हायची... आणि आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात व्हायची.

गावच्या लोखंसंख्येवर किंवा परिस्थितीतनुसार शाळेची रचना असायची. काही ठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा, तर काही ठिकाणी सातवीपर्यंत शाळा असायची. मोठ्या गावात हायस्कुल व शहरात कॉलेज असायचे... आता कुठेही इंटरनॅशनल(?) स्कुल पासून कॉलेजपर्यंत सुळसुळाट झाला आहे.
माझ्या गावात जिल्हापरिषदची पहिली ते चौथी शाळा व पाचवी ते दहावी हायस्कुल आहे. गावातील बहुतेक सर्व नागरिक याच शाळेत शिकुन मोठे झाले आहेत. शाळेच्या स्थापनेला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. 18 जानेवारी 1918 साली गावात शाळा आली. सुरवातीला शाळा कशी होती?, किती मुलं शाळेत शिकत होती?, कोण शिक्षक होते?, या बद्दल मला माहिती नाही.

  माझे पहिली ते चौथी शिक्षण ज्या काळात झाले त्यावेळच्या काही आठवणी अजून मनाच्या एका कोपऱ्यात तशाच आहेत. 1989-90 साली माझे पहिलीत ऍडमिशन झाले. 1992-93 ला चौथी पास झालो. 93- 94 या शैक्षणिक वर्षासाठी मी गावातील हायस्कुलमध्ये पाचवीत प्रवेश घेईपर्यंत म्हणजे चार वर्षाचा काळ मी ज्या शाळेत घालवला त्या माझ्या जिल्हापरिषद शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

 कोणत्याही संस्थेला, संघटनेला, व्यक्तीला शंभरी लाभणे म्हणजे खूप मोठं यश मानलं जातं. क्रिकेटमध्ये सेंच्युरीला विशेष महत्व असते. कोणत्याही गोष्टीच्या पूर्णत्वाची ओळख म्हणजे 100 टक्के म्हणजे पूर्ण. बंदा रुपया शंभर पैशाचा असतो. अस शंभर या संख्येला वेगळेच महत्व आहे. आज शाळेला शंभर वर्षं पूर्ण होऊन शतकमोहत्सव साजरा होताना खूप आंनद वाटतो आहे. चार पिढ्या, शंभर ब्याचेस या शाळेने घडवल्या. शाळेच्या सुरवातीला शिकणारे अनेकजण आज हयात नाहीत. दोन पिढ्या वृद्ध झाल्या आहेत, एक पिढी तरुण तर एक पिढी शिकत आहे. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा- मुलगी या चार पिढीतील लोकांना मोठं होताना शाळेने बघितले आहे. त्यांच्या व गावच्या जडणघडणीत या शाळेचा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे.... शाळा व शिक्षक हे वेगळे नसून एकच असतात. किंबहुना शिक्षक म्हणजेच शाळा होय. शिक्षकाशिवाय शाळा म्हणजे फक्त निर्जीव भिंतींची इमारत... त्यामध्ये जीव येतो शिक्षकांमुळे... चैतन्य येतं लहानग्या मुलांच्यामुळे, विद्यार्थ्यांमुळे!

 पहिली ते चौथी एका ब्याचला एकच शिक्षक, (प्रत्येक वर्षी नवीन शिक्षक असला प्रकार zp शाळेत नसतो.) बसायला घरूनच आणलेले गोणपाट, पाटी पुस्तकासाठी तंगूसची पिशवी (नॉयलॉन ब्याग) किंवा युरियाचा मोकळ्या 'ठिक्या'पासून (युरिया खताची मोकळी प्लास्टिक सदृश्य ब्याग) फल्ले आण्णांकडून किंवा इतर टेलर कडून शिवून आणलेली पिशवी. पावसाळ्यात छत्री म्हणून गाई म्हैशीच्या खाद्याच्या गोंणपाटाची "खोळ" असायची, तीच पावसापासून सौरक्षण करायची. पायात असेल तर स्लीपर नसेल तर अनवाणी. खाकी चड्डी, ढगाळ पांढरा शर्ट असा अवतार बहुतेक मुलांचा असायचा. मुलींना निळा -पांढरा फ्रॉक असायचा. शाळेत दूध मिळायचे त्यासाठी घरूनच ग्लास घेऊन जावा लागत असे. वनभोजन करण्यासाठी वर्ष्यातून एकदा सर्व शाळा वेताळबा मंदिरात जायची. हे मंदिर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे व आजूबाजूला खूप सारी झाडी व गर्द सावली आहे. तिथे एकत्र बसून नकला, गाणी, "आई माझे पत्र हरवले, दे मला सापडले.." हा खेळ व्हायचा हे उपक्रम झाल्यावर सर्वाना गोल बसवून घरुन सुती फडक्यात बांधून आणलेली शिदोरी एकमेकांना घास घास देऊन वनभोजन संपन्न व्हायचे. आजच्या तुलनेत किती सहज शेअरिंग हॅबिट शिकवली जायची, हे आठवले की आताची बालके या अनुभवापासून वंचीत राहतात याचं खूप वाईट वाटतं. हे वनभोजन तीन चार किलोमीटरची पायपीट आमच्यासाठी एक दिवसाची सहलच असायची. परीक्षेत नंबर आला किंवा थोरांच्या जयंती- पुण्यतिथीला भाषण देण्यात भाग घेतला तर कंपासपेटी, पेन्सिल- खोडरबर असे बक्षीस मिळायचे. सर्वांच्या भाषणाची सुरवात "अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला.....बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने एकूण घ्यावे अशी माझी नम्रविनंती आहे." अशी व्हायची. भाषण रट्टा मारून पाठ केलेले असायचे, अचानक काही वेळा आठवायचे नाही. मग मुलांच्यात चुळबुळ चालू व्हायची मग भाषण देणारा अजूनच गांगारून जायचा आणि जागेवर जाऊन बसायचा अशी सगळी गम्मत असायची. त्याचप्रमाणे दरवर्षी गुडीपाढाव्याला पाटी पूजन असायचे. बहुतेक लिखाणाचा सर्व सराव खपरी पाटीवरच व्हायचा. शाळेचा निकाल बहुदा 1 मे ला असायचा, शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चालू व्हायची. पाहिली मध्ये येणाऱ्या मुलांचं ऍडमिशन गुडीपाढाव्याच्या मुहूर्तावर व्हायचे. आजच्या खाजगी शाळा मागतात तसा पालकांकडून आय. टी. रिटर्न मागण्याची पध्द्त त्यावेळी नव्हती व अजूनही zp शाळेत सर्वसामान्य जनतेची मुलं शिकत असताना पालकांचे उत्पन्न किती? हे पाहिले जात नाही.  सुरवातीला शाळेत येताना मुलं मुली खूप रडायचीे... आताही मुलं रडतातच... जे.कृष्णमूर्ती त्यांच्या शिक्षण विषयक विचारात म्हणतात  "शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कुणीचं स्वत:होऊन जात नाही दाखल करावं लागतं" त्यामुळे कदाचित सुरवातीला मुलांना आपलं स्वातंत्र्य बंदिस्त होतंय का काय असा प्रश्न पडत असावा.


 माझी शाळा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी व दाट लोकवस्तीत आहे. शाळेला मोठे मैदान, आजूबाजूला सुंदर झाडे, बाग- बगीचा, खेळणी असला प्रकार तेव्हाही नव्हता व आताही नाही. कोणत्याही राजकीय नेतृत्वाला असं काही असावं याची गरज वाटली नाही. व अजूनही शाळेला चांगले ग्राउंड देण्यात राजकीय नेतृत्वाला यश आलेले नाही. मात्र शाळेची जागा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी बांधण्यासाठी वापरली गेली आहे. ती जागा शाळेची का ग्रामपंचायतची या बद्दल माहिती नाही पण तिथे शाळा होती व मी त्यात शिकलो हे पक्के लक्षात आहे. जवळजवळ सगळे पालक शेतकरी वर्गातले व जेमतेम शिकलेले, शिवाय खेळ म्हणजे वेळ वाया घालवणे असा काहीसा (गैर)समज त्याकाळी होता व आताही आहे. त्यामुळे पालकांनाही मैदानाचे महत्व कळाले नाही. आताही कळत नाही. कदाचित त्यामुळेच की काय गावात एकही मोठा खेळाडू होऊ शकला नाही.
शाळेला जागा कमी असल्यामुळे गावातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या पूर्वेला व पश्चिमेला शाळेची विभागणी झाली होती. रस्त्याच्या पश्चिमेला पहिली व दुसरी तर पूर्वेला तिसरी व चौथी असे वर्ग भरायचे. बेंगलोरी कौलाची, दगडी भिंतीची, शहाबादी फरशी असलेली इमारत होती. ती इमारत आता अस्तित्वात नाही. आता मुख्य रोडच्या पश्चिमेला दोन मजली इमारत आहे. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग एका ठिकाणी आहेत.
मी शाळेत असताना प्रत्येक इयत्तेचे 'अ' तुकडी व 'ब' तुकडी असे दोन दोन वर्ग होते. शेख बाई, फुके बाई, सुतार गुरुजी, तोडकर गुरुजी, पवार गुरुजी, मुल्ला बाई असे शिक्षक असल्याचे आठवते. आमच्या वर्गाला वर्गशिक्षक शेख बाई होत्या. पहिली ते चौथी त्याच शिक्षिका म्हणून होत्या. तेव्हा प्राथमिक शाळेत शिक्षकांना सर, म्याडम म्हणण्याची पध्दत नव्हती.
माझ्या ब्याचचे बहुतेक विद्यार्थीमित्र आज पालकाच्या भूमिकेत आहेत. जवळजवळ सर्व ब्याचमेट लग्न होऊन संसाराला लागले आहेत. मुली खूप आधीच सासरी गेल्या आहेत. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन तब्बल पंचवीस वर्षे उलटून गेली. एवढ्या मोठ्या काळात शाळेत, शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक व विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप बदल झालेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्यांची मुलं पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतायत त्यांना ही गोष्ट लक्षात येत असेल.

 मी ज्या वेळी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होतो तो काळ म्हणजे आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा काळ होय. 1991 नंतर भारतीय बाजारपेठ परकीय उद्योगासाठी खुली झाली. हळूहळू शिक्षण क्षेत्रातसुद्धा याचा परिणाम जाणवू लागला. खाजगी शाळांचे स्तोम वाढले. इंग्रजी माध्यमाला अवास्तव महत्व आले. ठरवून जाणूनबुजून मराठी शाळांना प्रतिकूल असणारी धोरणं राज्यकर्त्यांनी राबवली. झेडपी शाळांची गुणवत्ता ढासळली. शिक्षकांच्यावर बिगरशैक्षणिक कामाचा अतिरिक्त तान दिला गेला. सरकारे बदलली की योजना अद्यादेश बदलू लागले, मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणे नवीन अध्यादेश निघू लागले. झेडपी शाळांची अवस्था तोळामास झाली. तरीही काही धडपड्या शिक्षकांनी पालकांकडून, लोकनिधीतून अनेक शाळा पुन्हा दिमाखात उभ्या केल्या. पुन्हा फ़िनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. माझ्या गावच्या शाळेेत सद्या कार्यरत असणारे मुख्याध्यापक मोरे सर यांनी शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण हे प्रयत्न तोकडे आहेत. कोणत्याही गोष्टीची किंमत ती गोष्ट आपल्यापासून दूर गेल्यावर समजते. सरकारी शाळांचे तसेच आहे. जो पर्यंत त्या आहेत तो पर्यंतच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न हवेत. या शाळा सर्वसामान्य जनतेला मोठा आधार आहेत. त्या व्यवस्थित चालणे यात समाजाचे हित आहे. माझी मुलं कुठं सरकारी शाळेत जातात? असा दृष्टिकोन जर कोना सदन पालकाचा असेल व त्यामुळे त्यांना सरकारी शाळेकडे लक्ष देणे जरुरी वाटत नसेल तर ही खूप मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. ज्या समाजात आपण राहतो, तिथे फक्त आपण आपले कुटुंब सुस्थितीत असून चालत नाही, आजूबाजूचा समाज सुस्थितीत हवा. तर सर्व ठीक राहील. आपल्या बरोबर समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला तर त्याची फळे सर्वांना चाखता येतील. जर सामजिक विषमता व शैक्षणिक दरी वाढत गेली तर हे समाजव्यवस्थेला घातक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक गावच्या झेडपी शाळांच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. "एखाद्याची शंभरी भरणे" हा वाक्यप्रचार दुसऱ्या अर्थाने धोक्याची घंटा म्हणून परिचित आहे. या शाळा डबल सेंच्युरी मारण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्थरातील लोकांनी लक्ष घातले पाहिजे. शिक्षकांनी बदलत्या जगाचा कानोसा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान शिकायला हवे. शिक्षकांनी शिक्षक सोसायट्या व इतर गट तटाच्या राजकारणापासून दूर राहून निरपेक्षपणे सेवा करण्याचा वसा घेतला पाहिजे. सद्याच्या परिस्थितीत सरकारी शाळा टिकतील का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेच्या समस्येवर खरे उपाय शोधण्याचा सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवा.

माझ्या व  माझ्या गावच्या जडणघडणीत ज्या शाळेने शंभर वर्षे योगदान दिले त्या शाळेला अजून पुढच्या चार पिढ्या शिकवण्याची, घडवण्याची संधी मिळो याच शुभेच्छा या वेळी मी, माजी विध्यार्थी म्हणून देतो.
....संदिप रामचंद्र चव्हाण.

No comments:

Post a Comment