My Blog List

Sunday 14 January 2018

मकरसंक्रांत आणि संक्रात....

मकरसंक्रांत आणि संक्रात.... संदिप रामचंद्र चव्हाण.

मकर संक्रात हा इंग्रजी कॅलेंडर वर्षातील पहिला हिंदू सण. तिळगुळ घ्या गोड बोला... असं म्हणून एकमेकाप्रति सलोखा, प्रेम, आत्मीयता, आदर, सन्मान व्यक्त करण्याचा व चैतन्याचा सण! मित्रांना, आप्तांना तिळगुळ देऊन स्नेह वृद्धिंगत करण्याचा तर शत्रुलाही तिळगुळ देऊन मित्रत्वाचा हात पुढे करण्याचा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे 14 जानेवारी. अपवादाने(अंदाजे 70 वर्षांनी) 15 जानेवारीलाही मकर संक्रांत येते... माणसाच्या आयुष्यात जसा महत्वाचा तसा निसर्गातील मोठ्या बदलला सुरवात होणारा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. संक्रमन, ओलांडून जाणे, बदल स्वीकारणे, त्यासाठीची तयारी करणे म्हणजे मकरसंक्रांत.

दिवस मोठा व रात्र लहान होऊन उत्तर गोलार्थातील लोकांना जास्त प्रकाश मिळण्यास सुरवात होते, याला उत्तरायण सुरवात म्हणू शकतो. (शास्त्रीय दृष्टया उत्तरायण 21 मार्च ते 21जून असे असते)
सर्व हिंदू सण तिथीप्रमाणे येतात व साजरे केले जातात, परंतु मकरसंक्रात मात्र तारखेप्रमाणे साजरी होते. अजूनतरी यावरून तारीख का तिथी असा वाद नाही. याचे श्रेय न चुकता सदैव आपले काम करणाऱ्या सूर्याला द्यावे लागेल....

भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रातीच्या आधी एक दिवस बाजरीची भाकरी तीळ लाऊन सर्व उपलब्द भाज्यांची एकत्रित केलेल्या भाजीबरोबर खाणे, तीळ आणि गूळ संक्रातीला खाणे हे शारीरिक बल वाढवण्यासाठी उपयोगी असते. पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात शारीरिक झीज भरून निघावी यासाठीची योजना असते.
संक्रातीला पौराणिक महत्वही आहे.. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे.
संक्रात येणे म्हणजे संकट येणे असाही वाक्यप्रचार मराठीमध्ये रूढ आहे. तर अशा पद्धतीने मकरसंक्रात हा हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा सण आहे.
अलीकडे मकरसंक्रातीला होणाऱ्या पंतगबाजीमुळे हा सण काही कुटुंबावर व पक्षांवर खऱ्या अर्थाने संकटांची संक्रात घेऊन येत आहे. त्याला जबाबदार बेजबाबदारपणे पतंग उडवणारे नागरिक किंवा मुलांना नॉयलॉन मांजा आणून देणारे पालक होय.

संक्रातील पतंग उडवण्याची पध्दत उत्तरभारतात दिसते... अनुकरणप्रिय महाराष्ट्रातील बहुतेक शहरी व काही प्रमाणात ग्रामीण जनतेने पतंग उडवण्याची पद्धत स्वीकारली आहे. यामुळे पतंगाची बाजारपेठ वाढली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीला, सणाला समाज उपयोगी साजरे न करता त्याला विध्वंसक, त्रासदायकरीतीने कसे साजरे करायचे याचा उत्तम (अव)गुण आपल्याकडे आहेत.
नॉयलॉन मांज्यावर गांज्याप्रमाणे बंदी घालूनसुद्धा कोठेही अगदी सहजरित्या न तुटणार धागा मिळत आहे. चिनी मांजा, भारतीय नॉयलॉन मांजा, काच लावलेला मांजा असे वेगवेगळे मांजाचे प्रकार बंधी असूनही मिळतात तेव्हा शासकीय यंत्रणेचे अपयश व व्यवसायात कायद्याचा धाक नाही हेच निदर्शनास येते. मृत्यूदूत असणाऱ्या नॉयलॉन मांजाचा व्यवसाय करणारे जसे या समस्येला जबाबदार आहेत तसे विकत घेणारे बेजबाबदार ग्राहकही या समस्येला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत.
असंख्य पक्षी जायबंधी किंवा मृत्यू होण्याचे कारण नॉयलॉन मांजा आहे. अनेक मोटरसायकल चालक व लहान मुलं नायलॉन मांजची शिकार झाली आहेत... मांजमुळे जखमी झालेल्या पक्षांना वाचवतानाही काहिजनांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हसती खेळती घरे कोसळून पडली आहेत... त्यांची हानी कोणतेही मोल देऊन भरून निघणारी नाही. सण उत्सव हा समाजाच्या, व्यक्तींच्या जीवनात आनंद आणणारा क्षण असतो. तो तसाच आनंददायी रहावा म्हणून सर्व स्थरातून प्रयत्न करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मकरसंक्रांतीमुळे कोणाच्या आयुष्यात संक्रात येऊ नये हीच काय ती अपेक्षा करतो व थांबतो. मी लिहलेले वाचून एका व्यक्तीने जरी नॉयलॉन मांजा खरेदी न करण्याचा निर्णय घेतला तरी मला त्या गोष्टीचे समाधान असेल. त्या समाधानाच्या अपेक्षेनेच हा लेखप्रपंच....
( खाली काही लिंक दिल्या आहेत त्या नॉयलॉन मांजा संबधी उदाहरण म्हणून आहेत)

http://zeenews.india.com/marathi/maharashtra/owl-injured-due-to-nylon-manja-yeola-nasik/405714

Nayonbara Bazar Nylon Manja due to many ban | नंदुरबारात नॉयलॉन मांजामुळे अनेक जायबंदी | Lokmat.com - http://www.lokmat.com/

नायलॉन मांजाची सर्रास विक्री - nylon manja problem in city - Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nylon-manja-problem-in-city/articleshow/62285591.cms?utm_source=whtsapp&utm_campaign=ampmobile&utm_medium=referral&fb_ref=Default

https://www.loksatta.com/nagpur-news/permanently-ban-on-nylon-manja-1274797/

No comments:

Post a Comment