My Blog List

Tuesday 10 April 2018

मामाचा गाव हरवलाय....

 मामाचा गाव हरवलाय ...आणि हरवलंय बालपण!
एकेकाळी सुंदर निसर्ग, प्रेमळ आजी-आजोबा, सुगरण मामी, बालहट्ट पुरवणारा मामा, मायेची मावशी-आत्या, लहान मोठे मामेभाऊ-आतेभाऊ ही सगळी मंडळी उन्हाळी सुटयामध्ये आजोळी भेटायची. उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की ग्रामीण व शहरी भागातली मुले मामाच्या गावाला जायची. तेथे गेल्यावर भरपुर खेळायची, विटीदांडू, लगोऱ्या, आबाधबी, लपाछपी (इस्टॉप), चौलोस, गोट्टया, सुरपाट्या, लंगडी, सिगारेटची पाकिटे गोळा करून पाकिटाने खेळणे, पत्ते, सापशिडी असे खेळ असायचे. त्याचबरोबर सर्वजण पोहायला शिकायची, तास न् तास विहीरीत/नदीत डुंबायची, मौजमस्ती करायची. सुट्या लागल्या की मामा न्यायला येणार म्हणून बच्चेकंपनी खुश असायची. सर्व मावस भाऊ/बहीण आणि मामाची मुलं एकत्र आली की पायाला भिंगरी अन कानात वारा भरलेल्या वासरासारखी दिवसभर हुंदडायची.

आजची परिस्थिती मात्र झपाट्याने बदलत आहे.
एकेकाळच्या आठवणीतील सायकल गेली आणि बुलेट आली. बैलगाडीची जागा फोरव्हिलरने घेतली. सायकलवरून/बैलगाडीतुन फिरण्याची मजा बुलेट/फोरव्हीलरमध्ये कुठे आहे? खेळांचंही तेच झालं अंगणात, मैदानावर खेळले जाणारे खेळ बंध झाले. त्याची जागा मोबाईल, टॅबवरील गेम्सने घेतली. लोखसंख्या वाढीचा अन भोंगळ सरकारी नियोजनाचा फटका मैदानांना बसला त्यामुळे मैदाने कमी झाली आणि त्यावर मनसोक्त खेळणारी मुलंही.... ती गुंतली टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल मध्ये.

'गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी' असे म्हणण्याची वेळ सद्या आली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनाचा, बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा फटका लहानग्यांच्या सुट्टीलाही बसला आहे. मामाचा चिरेबंदी वाडा कधीचाच ढासळला आहे. त्याजागी वन,टू,थ्री बीएचके फ्लॅट असणारी अनेक मजली अपार्टमेंट झाली आहेत. रो-हाउस, कडेकोड कंपाऊंड असणाऱ्या बंगलोंनी आपापली हद्दनिच्चीती केली आहे. अगदीच तसे नसले तरी प्रत्येक मामाची छोटीमोठी पण वेगवेगळी घरे झाली आहेत. एकत्र कुटुंब शोधून सापडत नाही. घरातील छोट्या मोठ्या वादविवादाने, प्रॉपर्टीसाठी होणाऱ्या भांडणाने, म्हातारा/म्हातारीचा (काही ठिकाणी म्हाताऱ्या आई वडिलांना बोलण्याची पध्द्त) सांभाळ कुणी करायचा यावरून भावाभावांचे पटत नाही. या कारणातून सक्के भाऊ पक्के वैरी होतात. मुलीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क मिळाल्यामुळे काही ठिकाणी सासुरवासिनीला माहेरच्या संपत्ती/शेतीवाडीत हक्क मागायला लावणारा नवरा, सासू-सासरे भेटतात. याकारणाने बहीण-भावाच्या नात्यात दुरावा येतो. मनं कलुषित होतात. त्याचा परिणाम भाच्यांचे आजोळ कायमचे तुटण्यात होतो.

काळाच्या ओघात आधुनिक मामा पोटापाण्यासाठी आजोळातून हद्दपार झाला. रोजगारासाठी दूरच्या शहरात, अगदी परदेशात स्थिरावला. मामाला वेळ असेल तेव्हा भाच्यांची शाळा असते व भाच्याना सुट्ट्या असतील तेव्हा मामाला वर्कलोड असतोे. त्यामुळे भाच्यांसाठी वेळ द्यायला मामाकडे वेळच नाही. 'मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या नोटा....' बालगीतातील या ओळींचा खराखुरा प्रत्यय येऊ लागला आहे. मामा राहत असलेला गाव(शहर) खूप मोठा आहे. मामाकडे पैसाही आला आहे पण या मोठ्या गावात भाच्यांचा जीव लागत नाही. पैशाच्या नोटा त्यांना नको आहेत. त्यांना हवी असणारी मायेची माणसं त्या ठिकाणी भेटत नाहीत. मामाच्या मोठ्या गावी आणि नवीन घरी आजी आजोबांना स्थान नाही. असलेच तर घरात त्यांना किंमत नाही. एके काळी आजोबांचा असणारा दरारा आता राहिला नाही. सगळ्या घराचं ओझं वागवणारे आजी आजोबा आता मुलांना ओझं वाटत आहेत. आजी-आजोबा स्वतःच परावलंबी(?) असल्याने नातवंडांना हवं ते देऊ शकत नाहीत. जॉब करणाऱ्या मामीला स्वतःचाच डबा करायला वेळ नाही. असलाच वेळ तर टीव्ही, मोबाईलमधून सवड नाही अन स्वयंपाकाची आवड नाही. त्यामुळे 'रोज रोज पोळी शिकरण' हे बोलणं बालगीतापूरतं मर्यादित राहिलं आहे. त्यातच ती कॅलरी कॉन्शन असल्यामुळे रोज रोज पोळी शिकरण करण्याची शक्यताही नाही. या व अशा कारणाने भाच्यांचे मन इथे लागत नाही.

गेल्या पंचवीस/तीस वर्षाचा विचार केल्यास त्यावेळी असणारे भाचे/भाच्या आज मामा/मामीच्या व पालकाच्या भूमिकेत आहेत. हे नवपालक व अलीकडचे मामा/मामी जरा जास्तच जगरूक झालेत. आपल्या मुलांना सुट्टीमध्ये मनसोक्त खेळु बागडू न देता, वेगवेगळ्या व्हेकेशन कँम्पला, पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या ट्युशनक्लासला त्यांची ऍडमिशन घेतात. त्यांचं बालपण हिरावतात. त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात सगळंच कस आखीव, रेखीव असतं. तिथे दंगामस्तीला वावच नसतो. शिस्तीचा तर अतिरेखच असतो. आपल्या लहानपणी आपण काय करत होतो याचा विसर पाडून मुलांचं बालपण हिरावून घेण्यात नवपालकांनी मोठीच आघाडी घेतली आहे. कुटुंबांच्या नॅनो आवृत्तीमुळे मुलांना अनेक नात्यांना मुकावे लागत आहे. त्याची परिणीती मामाचा गाव हरवण्यात होत आहे.

एकुलता एक, एकुलती एक या कारणाने मुलांवर अतिप्रेम. मुलांना कुणी रागावलेलं पालकांना चालत नाही. मुलं एकत्र येऊन वादविवाद होतात. एकत्र जमल्याचा निर्भेळ आनंद घ्यायचा सोडून माझी मुलं इतरांच्या मुलापेक्षा किती हुशार,ऍक्टिव्ह दाखवण्यात मुलांच्या 'मम्मी' वेळ दवडतात. काहीवेळा यातून माहेरी आलेल्या बहिणी बहिणीच्या नात्यात, नणंद भावजयच्या नात्यामध्ये दुरावा येतो. 
शिवाय आता सुट्ट्या चालू होण्याआधी वेगवेगळ्या प्रसिध्द, जगप्रसिद्ध ठिकाणी फ़िरायला जायचे प्लॅनिग झालेले असते. यातून वेळ मिळाला तर मामाचा गाव. तेही अगदी मोजके दिवस. जातानाच येतानाचे रिझर्व्हेशन नक्की केलेले असते. किती दिवस राहणार? याचे उत्तर त्यातच दडलेले असते. अशी सर्व परिस्थिती आहे.

काळ बदलला, वेळ बदलली. अनेक गोष्टी बदलल्या. याचा परिणाम मामा अन मामाच्या गावावरही झाला. रोजगाराचा प्रश्न मोठा असल्यामुळे खेडेगावातील/ छोट्या शहरातील तरुणांना गाव सोडून नोकरी धंद्याला बाहेर पडावेच लागते. या गोष्टीला पर्याय राहिला नाही. स्वतःच्या गावाबद्दल अन मायेच्या नात्याबद्दल कितीही ओढ वाटत असली तरी आहे त्या परिस्थितिचा स्वीकार केल्यावाचून गत्यंतर नसते. सगळ्याच भाच्याना मामाचा गाव दुरावलाय असं नाही. बदललेल्या परिस्थितीत ही भरपूर ठिकाणी आशादायक चित्र आहे. अजूनही कुटुंब एकत्र येतात. सणवार,उत्सव,लग्नकार्य,जावळ,जत्रा याचा आनंद घेतात. जमेल तसा वेळ काढून व काही तडजोडी करून ही मंडळी एकमेकांना भेटतात. 
काही ठिकाणी नवी पिढी अधिक समजूतदार वागताना दिसते. भाऊबंदकी, वाद विवाद टाळताना दिसते. भावा भावात पटत नसेल तर सामंजस्याने स्वतंत्र राहते. त्यामुळे कलह टळतात. दूर असले तरी नाती टिकून राहतात.

गाव असो की शहर, देश असो की परदेश कुठंही राहत असलो तरी ठराविक वयोगटापर्यंत मामाचा गाव प्रिय असतो. आता मात्र मामाचा गाव हरवलाय, ती मायेची माणसं हरवलीत, ते निरागस बालपण हरवलंय…... त्यांना शोधण्याचे, एकत्र आणण्याचे काम मामा-भाच्यांनाच करावे लागेल ना!!.. तर चला! या सुट्टीत सर्वांना एकत्र बोलावूया... हरवलेल्या बालपणाला पुन्हा शोधुया..... मामाच्या गावाला जाऊन सुट्टीचा आनंद द्विगुणीत करूया!😇
समाप्त.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

एक होता मामाचा गाव... हा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post.html?m=1

No comments:

Post a Comment