My Blog List

Wednesday 27 June 2018

प्रेम, स्पर्श आणि आकर्षण... निरंजन घाटे.

प्रेम, स्पर्श आणि आकर्षण
लेखक: निरंजन घाटे
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन, पुणे.
किंमत: रु.२५०
पृष्ठे: २८०

विज्ञानकथा, विज्ञान विषयक लेख, विज्ञानविषयक पुस्तके लिहणारे प्रसिद्ध लेखक निरंजन घाटे यांचे ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ हे पुस्तक म्हणजे स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची शास्त्रीय माहिती, सहज, सोप्या पध्द्तीने सर्वसामान्यांपर्यंत पुस्तकरूपाने पोचवण्याचा केलेला उकृष्ट प्रयत्न आहे.
‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ या पुस्तकातून लेखक निरंजन घाटे यांचे वाचन किती अफाट आहे, याची कल्पना येते. त्यांचा वाचनाचा प्रवास समजतो.

प्रेम_स्पर्श_आणि_आकर्षण हे पुस्तक वाचतानाही या पुस्तकात लेखकानी वेळोवेळी उल्लेखिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते.
एकूण तीन भागात आणि एकवीस प्रकरणात विभागलेले हे पुस्तक वाचल्यावर दैनंदिन जीवनात स्त्री-पुरुष संबंधाबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा उलगडा होऊन ज्ञानात भर पडते.

प्राण्यांमध्ये नर आणि मादी ठराविक काळामध्ये एकमेकांकडे आकृष्ट होतात, त्यांचे मिलन घडते आणि वंशवृद्धी होते. पुनरुत्पादनासाठी भिन्नलिंगी प्राण्यात आकर्षण असणे हा निसर्गनियम आहे. परंतु मानव सोडून इतर बहुतेक प्राण्यांमध्ये विशिष्ट काळातच नर मादी संबध येतो. एकदा गर्भधारणा झाली, की त्या जोडीतील लैगिंक संबंध संपुष्टात येतात. मग असे प्राणी जोडीने पूर्ण वेळ अपत्य संगोपनासाठी खर्च करतात. काही प्राण्यांमध्ये नराचा संबंध फक्त प्रजननकाळापुरताच असतो. गर्भधारणा झाली की तो मादीला सोडून निघून जातो. अपत्य संगोपन करण्यात असे नर, मादीला मदत करत नाहीत.
मानवाचे वैशिष्ट्य म्हणजे, माणसातील नर-मादी वर्षभर प्रजननक्षम असतात. पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेऊन कितीही अपत्य कितीही काळ जन्माला घालू शकतो. त्यामुळे आधीच्या अपत्य संगोपणाकडे दुर्लक्ष होऊ शकते. हे टाळण्यासाठी निसर्गताच माणसात प्रेमसंबंध निर्माण झाले असावेत असं मानलं जाते. याबद्दलची संशोधकांची मते, केलेले सर्व्हे आपल्याला पुस्तकातून समजतात.

स्त्री- पुरूष यांच्यामध्ये प्रेमसंबंध कसे निर्माण झाले?
स्त्री पुरुष संबंधातील आकर्षणाचं शास्त्र काय?
प्रेम आणि आकर्षण यातील फरक काय आहे?
आपण त्याच व्यक्तीच्या प्रेमात का पडतो?
प्रेमाची रसायने कोणती?
स्त्री-पुरुष संबंधांत गंधाचे, स्पर्शाचे, चुंबनाचे महत्व काय आहे?
स्पर्श ही भावना किती महत्वाची आहे?
शास्त्रज्ञ स्पर्शाला “टी” जीवनसत्व का म्हणतात?
काही स्त्री-पुरुष एकाच जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहतात तर काही एकनिष्ठ राहत नाहीत. याला शरीरातील काही रसायने कारणीभूत असतात का?  इत्यादी प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडू शकतात.

वयात येणं, रजोनिवृत्तीची उत्क्रांती याबद्दलची माहिती.
अश्लिलतेचा इतिहास व साहित्य, संततीनियमनाचा इतिहास, पौरुषवृद्धी(कामवर्धक) औषधांबद्दलचे समज-गैरसमज आणि धोके. याचा घेतलेला मागोवा. इत्यादी विषयाबद्दल वाचकाला पुस्तकातून माहिती मिळते.

सिग्मंड फ्रॉईड, हेलन काप्लर, हेन्री एलिस, क्राफ्ट एबिंग, व्हॅन दे व्हेल्डे, अल्फ्रेड किन्सी, विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन अशा इतर अनेक संशोधकांचं (आधुनिक कामशास्त्रज्ञ) या कामातलं योगदान, त्यांनी केलेले संशोधन, मांडलेले सिद्धांत याविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
 मराठीमध्ये स्त्री-पुरुष संबंधावर शास्त्रीय माहिती मिळणारी फार थोडी पुस्तके आहेत. स्त्री-पुरुषांमधील प्रेम, स्पर्श, आकर्षण याबद्दलचे जगभरातील संशोधन, सिध्दांत, इतिहास याची थोडक्यात परंतु महत्वपुर्ण माहिती या पुस्तकात वाचकाला वाचायला मिळते. सदर पुस्तकातील लेख ‘पुढरीच्या’ दिवाळी अंकात आणि ‘अनुभव’ मासिकात याआधी छापून आलेले आहेत. या लेखांचे मिळून १ मार्च २०१२ ला या पुस्तकाची प्रथमावृत्ती आली. या पुस्तकात संस्कृत काव्यपंक्ती, मराठी कविता, चित्रपटगीतं यांचा ठिकठिकाणी आलेल्या उल्लेखामुळे आधीच इंटरेस्टींग असलेला विषय अधिक इंटरेस्टींग होतो.

संदिप रामचंद चव्हाण.

No comments:

Post a Comment