My Blog List

Friday 15 June 2018

विवाह ते सहजीवन

विवाह ते सहजीवन
^हिंदू धर्मातील व्यक्तीच्या जन्म (गर्भधारणा) ते मृत्यू या कालावधीत सोळा संस्कार सांगितले आहेत. त्यामधील महत्वाचा एक संस्कार म्हणजे ‘लग्न’ (विवाह). सर्वच धर्मात लग्न(विवाह) या संस्काराला विशेष महत्व आहे.
दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी वंशवृद्धीसाठी आणि झालेल्या संततीच्या संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यपूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय.^

अनेक सामाजिक स्थित्यंतर झाल्यानंतर कुटुंबसंस्था उदयास आली. बहुपत्नीत्व, बहुपतीत्व, सामुहिक पती-पत्नीत्व अशा त्या त्या काळी अनुकूल परंतु सद्या प्रतिकूल आणि चुकीच्या असणाऱ्या पध्द्ती मागे पडल्या. आणि बहुतेक सर्व जाती धर्मात एक पतीत्व, एक पत्नीत्व स्वीकारले गेले. (काही अपवाद)
सध्या विवाहाचे काही वेगवेगळे प्रकार दिसून येतात. त्यामध्ये प्रेमविवाह (लव्हम्यारेज), किंवा प्रेमिकेशी घरच्यांच्या परवानगीने विवाह करणे (लव्ह प्लस अरेंज), कुटुंबातील लोकांनी पाहिलेल्या मुला-मुलीबरोबर विवाह करणे (अरेंजम्यारेज) आणि चौथा प्रकार म्हणजे मनाविरुद्ध झालेला विवाह.
बहुतेक विवाह या चार प्रकारात मोडतात. प्रेमविवाहात मुलामुलींना एकमेकांची ओळख असते. एकमेकांप्रति प्रेम(?) असते. बहुदा आकर्षणही असते. एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती असतात. त्यामुळे आवडीच्या व्यक्तीबरोबर आपला विवाह झाला. तो/ती आपल्याला जीवनसाथी म्हणून मिळाला/मिळाली. याचा आनंद अशा नवदापत्याना असतो. तरीही काही वेळा असे विवाह अयशस्वी होतात.
अरेंजम्यारेज मधील दोघांना, एकमेकांना समजून घ्यायला, एकमेकांच्या आवडीनिवडी कळायला थोडा अवधी लागतो. एकमेकांना समजून घेतले तर सहजीवनाची रंगत वाढते.नाहीच समजून घेतलं तर संसाराचा गाडा फक्त ढकलला जातो आणि चाललेला संसार फक्त उपचार ठरतो.
मनाच्या विरुद्ध झालेल्या विवाहात मात्र पती/पत्नी खुश नसतात. या नवदापत्यामध्ये हा विवाह कधी एकाच्या मनाविरुद्ध असतोे तर कधी दोघांच्याही मनाविरुद्ध असतो. इथे सुरवातच अशी मनाविरुद्ध असल्याने पुढे संसारचे गणित बिघडते. तिथे सहजीवन तर खूप दूरची गोष्ट असते.
महाबळेश्वर येथे हनिमूनला जाणाऱ्या नवंदांम्पत्यातील पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केली. पिंपरी चिंचवड मध्ये पतीने प्रियसीच्या मदतीने पत्नीची व नऊ महिन्याच्या मुलाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. ही माहीती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आली आहे.
असे भयंकर गुन्हे मनाविरुद्ध झालेल्या विवाहामुळे होतात. अशा विवाहानंतर सहजीवनाची सुरवात तर नाहीच, उलट कुटुंबं उध्वस्त होतात. त्यामुळे विवाह हा लादून करण्याचा प्रकार नाही. हे ज्या त्या कुटुंबातील पालकांनी समजून घ्यायला हवे.

पूर्वी विवाह बालवयात किंवा पाळण्यातही व्हायचे. स्त्री-पुरुषाच्या वयामध्ये अंतरतही खूप असायचे. पसंती नापसंती हा विषय नसायचा. शिवाय अनेक सामाजिक बंधने, रूढी,परंपरा असल्याने पतीपत्नीच्या नात्यात अबोला असायचा. आता परिस्थिती खूपच सुधारली आहे. बालविवाहबंदी कायदा व शिक्षणामुळे सामजिक स्थितीत मोठा बदल घडला आहे.  सर्वसाधारणपणे मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असल्यास कायद्याने त्यांना सज्ञान म्हणून मान्यता दिली आणि विवाहासाठी हे वय ग्राह्य धरले आहे. हल्ली मुलगा मुलगी हा भेद कमी झाल्यामुळे आणि मुलांच्या जोडीने मुलीही उच्छ शिक्षण घेत आसल्याने मुलामुलींच्या लग्नाचे वय वाढले आहे. साहजिक त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भरपूर ठिकाणी मुलगी २३ ते २५ तर मुलगा २८ ते ३० वर्षांचा होईपर्यंत त्यांच्या कुटुंबात विवाह या विषयावर चर्चाही केली जात नाही. अनेक ठिकाणी ही वयाची पातळी ३० ते ३५ वर्षाकडे गेलेली दिसते. काहींचे विवाह लवकर तर काहींचे उशिरा होतात. काहींना आपल्या स्वप्नातील राजकुमार/राजकुमारी मिळते. तर काहींना तडजोड करावी लागते. १००% परफेक्ट मॅच होणारी जोडी अपवादानेच असते.

एकदा का विवाह झाला की वैवाहिक जीवन सुरू होते. त्याला आपण ‘संसार’ म्हणतो. लग्न झाले की सुरवातीचे एक, दोन वर्षे अगदी नव्याची नवलाई असते. पती-पत्नी या दोघात तिसरा नको असतो. त्या दोघांना एकमेकांशिवाय चैन पडत नाही. ती किंवा तो सोडून जगात बाकी काही असते याचे भानही त्यांना असत नाही. स्वप्नांच्या झोक्यावर बसून बेभानपणे झोके घेणे चाललेले असते. पहिल्या दोन तीन वर्षात त्यांच्या जीवनवेलीवर एक फुल उमलते. वंशवृद्धी होते. मुलगा झाल्यास बहुतेक कुटुंबाना आनंद होतो. तर मुलगी झाल्यास काही ठिकाणी लोकं दुःखी होतात. भरपूर ठिकाणी ‘पहिली बेटी… धनाची पेटी’ असं मानून आंनद व्यक्त करतात. पती-पत्नीलाही आनंद होतो. आता नव्याचे नवदिवस संपलेले असतात. लहान मूल वाढवण्यासाठी पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त कष्ट घ्यावे लागते. नऊ महिने गर्भ पोटात वाढवावा लागतो. शरीराचा आकार बदलतो. थोडासा बेढबपना येतो. ती राजकुमारी आता आई झालेली असते. तिच्याकडून पतीला दिला जाणारा वेळ सहाजिकच थोडा कमी होतो. त्यात अशी आई नोकरी करत असल्यास अजून खूप तडजोडी कराव्या लागतात. एकमेकांशिवाय एकही क्षण राहू न शकणाऱ्या जोडीला याची सवय लावावी लागते. आणि इथून खरी सुरवात होते… सहजीवनाची…. किंवा तडजोडीच्या संसाराची.

सहजीवन (Symbiosis)... दोन जिवामध्ये असणाऱ्या अगदी निकट परंतु स्वतंत्र(अपरजीवी) भागीदारीला, एकत्र राहण्याला सहजीवन म्हणतात. ही भागीदारी दोन प्राणी, दोन पक्षी, दोन वनस्पती, दोन सूक्ष्मजीव यांच्यात असते. हे दोन भिन्न जीव एकमेकांच्या सहवासात, सानिध्यात परस्परांना पूरक, अनुकूल जीवन जगत असतात. त्यालाच सहजीवन म्हणतात. ही झालीे वनस्पती,प्राणिशास्त्रातील व्याख्या.

मानवी पातळीवर पती पत्नीच्या नात्यालाही सहजीवन म्हणतात. पण हे फक्त या नात्यासाठी नाही तर अशी कित्येक नाती एकमेकांना अनुकूल, पूरक असतात. एकमेकांच्या साथीने, आधाराने एकत्र राहत असतात. परंतु सहजीवन म्हणजे फक्त पती पत्नीचे नाते असा सर्वत्र समज झाला आहे.
पती पत्नीच्या नात्याबद्दलच बोलायचे तर जिथे पती-पत्नी एकमेकांना सन्मानाने वागवतात, पतीपत्नीच्या नात्यात जेव्हा मैत्रीचे नाते फुलते, ते एकमेकांचे जेव्हा मित्र बनतात, एकत्रित संसार करूनही परस्परांच्या अस्तित्वावर आक्रमण करीत नाहीत, एकमेकांच्या भावभावनांचा, मतांचा जिथे आदर होतो,जे नातं वय वाढेल तसं अधिक प्रगल्भ होत जाते, अशा सुंदर नात्यातून निर्माण होते ते सहजीवन होय. असं सहजीवन ज्यांना लाभते ते सुखी आणि आंनदी असतात, आनंदी राहतात.

सध्याच्या गतिमान जीवनशैलीत काही ठिकाणी डिंक (DINK) फॅमिली दिसून येतात. डिंक म्हणजे ‘डबल इन्कम नो किड्स’. अशा कुटुंबात पतिपत्नी या दोघांनी दोघांच्या नोकरी- करियरवर फोकस करून अपत्यप्राप्ती रोखलेली असते. तर काही कुटुंबानी सिंगल चाइल्ड (एक मूल सुंदर फुल) कन्सेप्ट स्वीकारला आहे. बहुतेक ठिकाणी ‘हम दो हमारे दो’ कुटुंबे दिसतात. काही ठिकाणी दोन, तीन, चार अशीही मुलामुलींची संख्या असते. मुलगा होईपर्यंत फॅमिली प्लॅनिग केले जात नाही. स्त्रीला मुलांना जन्म देणारी मशीन समजले जाते. त्या वारंवार आई होणाऱ्या आणि कित्येक वेळा पोटाची चिरफाड करून घेणाऱ्या स्त्रीचा विचार, तिच्या वेदनांचा विचार त्या कुटुंबातील कोणीही करत नसेल आणि त्या स्त्रीचा पतीही या गोष्टीचा विचार करत नसेल तर त्यांच्या नात्याला सहजीवन म्हणता येईल का?? मूल होऊच द्यायचे नाही ते मुलगा होईपर्यंत स्त्रीने अपत्य जन्माला घालायची अशी टोकाची व विरोधाभासी मानसिकता समाजात दिसून येते. हा प्रकार कधी पतीपत्नीच्या दोहोंच्या मान्यतेने असतो तर कधी एकाच्या मर्जीने असतो. या गोष्टींमुळे पतीपत्नीच्या नात्यातील संवाद हरवतो. अशी जोडी गरज आहे व पर्याय नाही म्हणून एकत्र नांदत असते. कित्येक वर्षे एकत्र वैवाहिक जीवन जगूनही भावनिक ओलावा निर्माण झालेला नसतो.
अनेक कुटुंबात छोट्या मोठ्या गोष्टींवरून पतीपत्नीच्या नात्यात विसंवाद होतो. वादविवाद ताणले गेले तर घटस्पोट होतात. त्यात अनेक कुटुंबं विस्कटून जातात. पतीपत्नीने एकमेकांना आधार देण्याऐवजी टोकाची भांडण करत रहाणे, एकमेकांवर अविश्वास दाखवणे, सतत संशय घेणे, लागट बोलणे, मारझोड करणे, चारचौघात अपमान करणे, एकमेकांवर सतत दबाव ठेवणे. एकमेकांना कोणत्याही गोष्टीचे स्वातंत्र्य नसणे. अश्या वर्तुणूकीमुळे पतीपत्नीचे वैवाहीक जीवन बिघडते. अशाही स्थितीत संसाराचा गाडा चालला असेल तर ते सहजीवन होऊ शकत नाही. तिथे संसाराचा गाडा फक्त रेटला जात असतो. कधी मुलांसाठी तर कधी सामाजिक दबावाखाली ही घुसमट सोसली जात असते.

पतीपत्नीने एकमेकाना नीट समजून घेण्यासाठी, सहजीवन आनंददायी बनवण्यासाठी टॉक,टाईम,टच या तीन "टी”चा फॉर्म्युला यशस्वीपणे अंमलात आणायला हवा. या तीन “टी” खूप महत्वाच्या व परिणामकारक गोष्टी आहेत.

टॉक...बोलणे. संवाद साधणे. विश्वास देऊन पार्टनरचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे. त्याच्यावर विश्वास ठेवणे. मतं मांडणे, एकमेकांच्या मतांचा आदर करणे. चुकीचे वाटल्यास कसे चूक आहे हे समजून सांगणे. स्वतःची चूक झाल्यास कबूल करणे. चांगले वाईट अनुभव शेअर करणे. एकमेकांजवळ मन मोकळं करणे. जे काही करतोय/करतेय ते आपल्या संसारासाठी, कुटुंबासाठी हे पटवून देणे.
या गोष्टीसाठी आवश्यक आहे… टॉक…एकमेकांशी बोलणे....संवाद साधने.
संवाद असेल तर विसंवाद होत नाही. संवादाने, एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्याने कुटुंबं एकसंघ राहतात.
पतीपत्नीच्या सहजीवनाच्या यशस्वीतेची पहिली पायरी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे ही आहे.

टाईम…. वेळ.  पतीपत्नीने एकमेकांना क्वालिटी टाइम देणे महत्त्वाचे आहे. विवाह झाल्यानंतर सुरवातीच्या एखाद्या दोन वर्षाच्या हनिमून पिरीयडमध्ये असा वेळ दिला जातो. पण पुढे तसा प्रयत्न होताना दिसत नाही. यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. एकमेकांसोबत घालवलेले अगदी साधे साधे क्षणही खूप काही जादू करून जातात. फक्त तिच्यासाठी/फक्त त्याच्यासाठी काढलेला थोडासा वेळही खूप आश्वासक असतो. आपण तिच्यासाठी/त्याच्यासाठी खूप महत्त्वाची/महत्वाचे आहोत ही भावना खूप मोठी असते. ही भावना निर्माण होण्यास दिलेला वेळ मोठे काम करत असतो. रोजच्या शुष्क व्यवहारात थोड्या थोड्या कालावधीने असा ठरवून काढलेला वेळ व एकत्र घालवलेले क्षण सहजीवनाचा पाया अधिक मजबूत करतात.

टच….स्पर्श. सहजीवनाची सुरवात, सहजीवनाचा आत्मा प्रेमभरल्या स्पर्शात आहे.
स्पर्श ही प्राणीसृष्टीतील एक मूलभूत भावना आहे. ती उपजत असते. स्पर्शामुळे मानव, प्राणी, पक्ष्यामध्येही एक प्रकारची उभारी प्राप्त होते. नवचैतन्य मिळते. मानवाचा जन्म झाल्याझाल्या त्याला आईचा स्पर्श हवा असतो. मायेची ऊब हवी असते. जसजसे ते मूल मोठे होईल तसे नात्यातील इतरांचा आश्वासक स्पर्श त्याला हवा असतो. स्पर्शवंचित बालकं आजाराला बळी पडतात, मतिमंद होऊ शकतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, पुढे मोठी झाल्यावर ती घाबरट किंवा हिंसक बनू शकतात. लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांना हवा असतो मायेचा स्पर्श. पाळीव प्राणीही प्रेमभरल्या स्पर्शाने सुखावतात. हिंस्र प्राणीही मानसाळतात. ही जादू प्रेमाने, मायेनेे केलेल्या स्पर्शात असते.

पतीपत्नीच्या नात्यातही स्पर्शाला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे स्पर्शाशिवाय हे नातंच टिकू शकत नाही. पतीपत्नीने अगदी सुरवातीला हातात घेतलेला हात असो की पुढे एकमेकांत सामावून जातानाचा स्पर्श असो. हा स्पर्श सहजीवन खुलवतो. एकमेकांना बांधून ठेवतो. आंनद देतो. मन ताजेतवाने करतो. वैवाहिक जीवन सफल करतो.
◆हव्याश्या स्पर्शामुळे शरीरात एन्डॉर्फिनची निर्मिती होते. जेव्हा एखादी आवडती व्यक्ती आपल्याला जवळ घेते तेव्हा शरीरातील एन्डॉर्फिनची पातळी वाढते. हे रसायन आपल्या मनात सुखाची भावना निर्माण करते.◆ त्यामुळे असा सुखकारक स्पर्श व्यक्तीला हवाहवासा वाटतो.
परंतु हा स्पर्श फक्त आनदंदाय, सुखकारकच असतो असे नाही. बऱ्याच वेळेला पती आपल्या पत्नीला हक्काची वस्तू मानतो. हवे तेव्हा, हवा तसा स्पर्श करत सुटतो. तिच्या मनाचा विचार न करता तिला हवं का नको हे न पाहता फक्त स्वतः आनंद मिळवतो. हा एकतर्फी आनंद दोघांच्या नात्यात न दिसणारी दरी निर्माण करत असतो. काही वेळा या दरीत दोघांच्या वैवाहिक जीवनाचा कडेलोट होतो.
वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेत पतीपत्नीमधील यशस्वी आणि आंनदी कामजीवनाचा वाटा मोठा असतो. याबाबतीत काही समस्या असल्यास योग्य आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हितकारक असते. चुकीची माहिती, चुकीच्या अवास्तव कल्पना अज्ञानापेक्षाही घातक असतात. अयशस्वी कामजीवन, कामजीवनातील सुख एकतर्फी ओरबडणे, पार्टनरच्या भावनांना किंमत न देणे. या गोष्टी विवाहबाह्य संबंधाना आमंत्रण देतात. दोहोंपैकी कोणीही एक यात फसला, गुरफटला तर वैवाहिक जीवनाचा कडेलोट ठरलेला असतो. यात पतिपत्नी आणि त्यांचे सर्व कुटुंब भरडले जाते. मुलं असतील तर सर्वात जास्त नुकसान त्यांचे होते. त्या लहान जीवांना कळतही नाही की आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाचे काय कारण आहे.
◆जोडीदारापासून स्पर्शवंचित राहिलेल्या स्त्रिया भावनिक उदासीनतेला बळी पडतात. त्यांच्याशी फक्त शारीरिक संबध ठेवणाऱ्या नवऱ्याचा त्या द्वेष करतात. त्यांना नवरा जवळ येणे संकट वाटते. तर स्त्री-स्पर्शवंचित पुरुष आक्रमक आणि अत्याचारी बनतो. स्पर्शवंचित स्त्री-पुरुष चिडचिडे बनतात . त्यांचा रक्तदाब वाढतो. इतर विकारही जडू शकतात.◆
(यालाही काही अपवाद असू शकतात)

सोशलमीडियाचा घातक परीणाम:-
सोशलमीडियाची क्रांती झाली आणि कुटुंबांवर संक्रात आली. अशी काहीशी स्थिती दिसून येते आहे. पतीला पत्नीच्या किंवा पत्नीला पतीच्या मोबाइलचा पासवर्ड माहीत नसतो. तो मागावा लागतो. पासवर्ड सतत बदलला जातो. याला काय म्हणावे….?  हा एकमेकांप्रति असणारा अविश्वास नव्हे का? विश्‍वास हा पती-पत्नीच्या नात्याचा, सहजीवनाचा पाया असतो. हा पायाच ढासळला तर उरतो तो फक्त कुटुंब चालवीण्याचा ‘फार्स’. अनेक घटस्फोट हे सोशलमीडियाच्या अतिवापरामुळे होत आहेत. सोशलमीडियाच्या माध्यमातून आधी विरुद्धलिंगी मैत्री(?) होते, नंतर सतत चॅटिंग, त्यातून भेटीगाठी, अजून पुढे जाऊन विवाहबाह्य संबध घडतात. अशा कारणाने पतीपत्नीच्या नात्यात तणाव वाढून विसंवाद वाढत जातोे. याचा परिणाम त्या पूर्ण कुटूंबावर पडतो. याचाही विचार पतीपत्नी या दोहोंनी करायला हवा.
पती पत्नी एकमेकांचे मित्र हवेत. परंतु मी एकटीच मैत्रीण किंवा मी एकटाच मित्र बाकी कोणी चालणार नाही. ही अतिरेकी व अविश्वासाची भूमिका नसावी. मर्यादा पाळून आणि जबाबदाऱ्या सांभाळून लग्नानंतरही आपापला मित्रपरिवार जपायला हरकत नसावी. पण हे दोहोंच्या समजूतदारपनावर अवलंबून आहे. मित्र/मैत्रीण हा स्त्री-पुरुषांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण जर अशा मैत्रीमुळे वैवाहिक जीवनात वादळ येत असेल तर मात्र यावर गंबीरपणे विचार करायला हवा. तिथे अहंकार नको. माझंच खर ही भूमिका नको. तिथे हवा संवाद.
अहंकाराने, अविश्वाससाने पतीपत्नीचे नातं एका फटक्‍यात मोडून पडतं. कोरडं होऊन जातं. नात्यातील ओलावा संपतो. प्रेम, स्नेह सारं काही संपून जाते. आणि मग कायद्यानं हे नातं संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयाचा आधार घेतला जातो.
हे घडू द्यायचे नसेल आणि सहजीवनाचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर पतीपत्नीने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून वर्तन करायला हवे.

अलीकडे लग्नाचे वाढदिवस सोशलमीडियावर साजरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस कुठे साजरा करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपलं खाजगी आयुष्य किती सार्वजनिक करावे? कोणते फोटो शेअर करावेत?  कोणते करू नयेत? या प्रशांची उत्तरेही व्यक्तिगत पातळीवर शोधायला हवीत. पतीपत्नीच्या नात्यातील आनंदाचे खाजगी क्षण सोशलमीडियावर सार्वजनिक होतात, त्याला लाईक आणि शुभेच्छाही मिळतात. त्यावरच फोटो टाकणारे सुखावत. पण यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे पतीपत्नीने एकमेकांना मनापासून लाईक करणे. ते होत नसेल आणि फक्त सोशलमीडियावर शोबाजी होत असेल तर हे नातं कमकुवत पायावरती उभे आहे असे समजावे.
वैवाहिक जीवनाचे सुख दिखाव्यात नसते, ओरबाडण्यात नसते… ते देण्यात असते. प्रेमाने मिळवण्यात असते. सहजीवनात ओरबाडण्याला, अहंकाराला, दिखाव्याला थारा नसतो. तिथे असते फक्त प्रेम,माया,ममता,आदर,विश्वास,समजूतदारपणा,संयमीपणा. हा विश्वास जपून, समजूतदारपणा दाखवून, प्रेमाने सहजीवनाचा मार्ग सुकर करायला हवा. विवाह होतो त्यानंतर सहजीवनाची सुरवात होते. विवाह हा एका दिवसाचा असतो. सहजीवनाचा प्रवास कित्येक वर्षांचा असतो. या प्रवासात टॉक,टाईम,टच हे थांबे खूप महत्वाचे आहेत. योग्य वेळी योग्य थांब्यावर थांबल्यास सहजीवनाचा प्रवास करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि हा प्रवास सुखकारक होतो.

या वर्षी नव्यानेच वैवाहिक जीवनाची सुरवात करणाऱ्या आणि अनेकवर्षे यशस्वीपणे संसार करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना सुखी, आंनदी, निरोगी, उत्साही सहजीवनाच्या शुभेच्छा.

संदिप रामचंद्र चव्हाण.

संदर्भ:
१) ^मराठी विश्वकोश
२)◆प्रेम, स्पर्श आणि आकर्षण… निरंजन घाटे
३)विवाह, सहजीवन या विषयावरील वाचलेलीे वेगवेळीे माहिती, काही पाहिलेलले प्रसंग, आलेले अनुभव इत्यादींच्या मदतीने वरील विषय मांडला आहे.

No comments:

Post a Comment