My Blog List

Wednesday 27 June 2018

बनगरवाडी... व्यंकटेश माडगूळकर.

बनगरवाडी
लेखक: व्यंकटेश माडगूळकर,
प्रकाशन: मौज प्रकाशन,
किंमत: रु १००
पृष्ठे: १३०

बनगरवाडी माणदेशातल्या 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली आणि लेखक व्यंकटेश माडगूळकर यांना आलेल्या अनुभवावर आधारीत असलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित होऊन आतापर्यंत बारा भाषेत अनुवादित झालेली आहे. बनगरवाडी कथानकावर एक मराठी चित्रपटही १९९५ साली प्रदर्शित झालेला आहे. १९९९ नंतर निघालेल्या आवृत्त्यामध्ये लेखकांनी स्वतः चित्रे रेखाटली आहेत.

 स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानच्या अधिपत्याखाली असणारी मेंढपाळांची ३०/४० घरांची वस्ती म्हणजे बनगरवाडी होय.
 कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. ‘मास्तर’ म्हणून गावात दाखल झाल्या झाल्या त्याला ‘बालट्याच्या’ धमकीचा सामना करावा लागतो. परंतु बनगरवाडीतील म्हाताऱ्या करभाऱ्याची साथ त्याला मिळते.
शाळेत जाण्यापेक्षा मुलांनी मेंढरामागे जावे या मताचा बनगरवाडीतील पालकवर्ग, पालकांना शाळेबद्दल असलेली अनास्था, यामुळे राजाराम मास्तरला वाडीतील मुलं शाळेत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हळूहळू शाळा सुरू होते. राजाराम मास्तर बनगरवाडीतील बाययाबापड्यांचा विश्वास जिंकतो आणि तिथल्या समाजजीवनात मिसळून जातो.

अडाणी, गरीब पण इमानदार असणारी वाडीतील लोकं मास्तरला कारभाऱ्याच्या बरोबरीने मान देतात. घरातील सुखदुःख सांगतात. मास्तरला त्याच्या गावी जाताना, तालुक्याला जाताना हक्काने कामे सांगतात. मास्तरही लोकांची मने जिंकायची म्हणून कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची कामे मास्तर करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असं गावकऱ्यांना वाटत असते. त्यामुळे ‘शेकू’ पेरणीसाठी गावातून कोणाकडूनही बैल घेउन दे अशी विनवणी मास्तरला करतो. पण ती मागणी मास्तर पूर्ण करू शकत नाही. पेरणीसाठी बैल न मिळाल्याने शेकूची बायको नांगराला दुसर्या बैलाच्याठिकाणी स्वतःला जुपूंन घेते. या घटनेचे मास्तरला खूप वाईट वाटते. हाच शेकू पुढे बायकोशी कसा वागतो? दुसऱ्या लग्नाची स्वप्ने का पाहतो? हे कादंबरीच्या पुढच्या टप्प्यात समजते.
 रामा धनगर बुचडा छाप राणीच्या पैशाची (बंध झालेले चांदीचे नाणे) तालुक्याला जाऊन मोड आणण्याची विनंती मास्तरला करतो. मास्तर अशी मोड आणतो. परंतु ते पैसे चोरीला गेल्याने मास्तरला खूप मनस्ताप भोगावा लागतो. पुढे ते पैसे त्याला कसे मिळतात ही घटनाही रंजक आहे.
मदत करण्याचे भूत मास्तरच्या डोक्यात असल्याने कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ‘बालट्याला’ हे माहित होते आणि कारभार्याचे तो कान भरतो. कारभारी आणि मास्तरचे बिनसते परंतु काही दिवसांनी कारभाऱ्याचा गैरसमज कसा दूर होतो, हेही पूर्ण कादंबरी वाचल्यावर समजते.
जगन्या रामोशाचे प्रेमप्रकरण, वयात आलेल्या अंजीचे वागणं, आयुबा आणि आनंदा रामोशी यांचे मास्तरांबद्दल असणारे प्रेम, बाळा धनगराला वाळीत टाकण्याचे कारण, बालट्याला कोणी मारले? याचे शेवटी मिळणारे उत्तर, इत्यादी प्रसंगांनी कथानक जिवंत होते.

हे सर्व घडत असताना एकही पक्की इमारत नसणाऱ्या बनगरवाडीत एक पक्की इमारत असावी म्हणून मास्तर लोकसहभागातून तालीम बांधायची ठरवतो. त्यात येणाऱ्या अनंत अडचणी, पैशाची केलेली व्यवस्था,  बांधकाम शेवटच्या टप्प्यात असताना आयुबच तालमीवरून पडणं, तालीम पूर्ण करण्यासाठी सगळ्या गावाचं एक होणं, पंत सरकारांच्या हस्ते तालीमच्या उद्घाटनाचे नियोजन, मास्तरमुळे छोट्याशा धनगरवाडीत राजाचं येणं, म्हाताऱ्या कारभाऱ्याला पाटीलकीचा मान मिळणं. असं सगळं चांगलं चाललेलं असताना म्हाताऱ्या कारभऱ्याचं अचानक जाणं. माणदेशी दुष्काळ पडणं आणि सारा भाग ओसाड होऊन ‘बनगरवाडीतुन’ सर्वांचं स्थलांतर होणं. चाऱ्या अभावी, रोगराईने असंख्य मेंढरांचा बळी जाणं. आणि हसती खेळती बनगरवाडी निर्मनुष्य होणं.… काळजाचा ठाव घेते.
हा कादंबरीचा सार आहे.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही काळ शिक्षक, गुरुजी किंवा मास्तर याच नावाने ओळखले जात असत. मास्तर नेमणूक झालेल्या गावी मुक्कामी वस्ती करून रहायचे. त्या त्या गावातील खडानखडा माहिती आणि लोकांशी जुळलेली नाळ या बळावर मास्तरला गावात खूप मान असायचा, त्यांच्या शब्दाला किंमत असायची. आता हे फक्त कथा कादंबऱ्यातून वाचावयास मिळतेे. मागील दोन, तीन दशकात शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. बहुतेक पालक शिक्षणाबद्दल जागरूक झालेत, मुलंही शाळेत येतात, शाळाही चकाचक झाल्यात परंतु मास्तरचा, गुरुजींचा जेव्हापासून ‘सर’ झाला, तेव्हापासून त्याची आणि समाजाची नाळ तुटत गेली. गुरुजी-विद्यार्थी, गुरुजी-पालक हे आपुलकीचे नाते शुष्क होऊन गेले आहे. याची जाणीव अश्या कथा कादंबऱ्या वाचल्यावर होते.
मास्तर बदलले, शिक्षणव्यवस्था बदलली, अनेक चांगले-वाईट बदल घडले… परंतु मानदेशीच्या भाळी असलेला दुष्काळाचा शाप आहे तसाच आहे… तेव्हाही....आताही!

संदिप रामचंद्र चव्हाण.

No comments:

Post a Comment