My Blog List

Thursday 7 March 2019

माणदेशी माणसं




माणदेशी माणसं
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. त्यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी वाचली होती. त्यावेळी त्यांचे माणदेशी माणसं हे १९४०/५० च्या दशकातल्या ग्रामीण कथांचे पुस्तक वाचायचे असे ठरवले होते. आज ते वाचून पूर्ण झाले.

माणगंगा नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. कायम दुष्काळ असणाऱ्या या भागात माडगूळकरांचे बालपण गेले. त्यांना त्यांच्या लहानपणापासून भेटलेली, त्यांच्या मनात घर करून राहिलेली काही माणसं त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘मौज’ साप्ताहिक मध्ये कथा म्हणून लिहण्यासाठी कागदावर उतरून काढली. नंतर १९४९ मध्ये या सर्व कथांचे मिळून ‘मानदेशी माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

स्वातंत्र्यपूर्व आणि संस्थान काळातील मानदेशातील खेड्याचे समाज-जीवण कसे होते. याचबरोबर तेथील बलुतेदार पद्धती, तेथील गरिबी, बोलीभाषा, सामाजिक- शैक्षणिक परिस्थिती, वाहतुकीच्या आणि जीवनावश्यक साधनांची असणारी कमतरता, आजूबाजूच्या परिसराचे-घरांचे- माणसांचे त्यांनी केलेले निरीक्षण पुस्तकात वाचावयास मिळते. त्यांच्या लिखाणाची शैली आपल्याला पुस्तकातून त्या काळात घेऊन जाते. आणि या कथा आपल्यासमोरच घडत आहेत असं जाणवू लागतं.
सगळीकडे असतात तशी प्रेमळ आणि तरेवाईक माणसं माडगूळकरांनाही भेटली. त्याच्या आयुष्यात आली. ही माणसं कशी जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला तो दिवस सुख-दु:खासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, चांगल्या-वाईटाबद्दलच त्यांचं वैयक्तिक मतं इत्यादी गोष्टी पुस्तकातून आपल्याला समजतात.

“बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी’’ म्हणणारा ‘धर्मा रामोशी’ आणि धर्मासाठी दिलेलं जुनं धोतर ‘लुगडं’ म्हणून वापरणारी त्याची मुलगी ‘बजा’ पहिल्याच कथेतून गरिबी म्हणजे काय असते याची जाणीव करून देते. ‘‘मास्तर, मी न्हाई जायाचा आता त्या साळंत!’’ अस म्हणत तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शाळा मास्तरच्या गळ्यात पडून रडणारा लोहाराचा ‘झेल्या’ विद्यार्थी- शिक्षक हे नातं कसं असावं आणि कसं नसावं हे सांगून जातो.
गरिबीमुळे हौस-मौज पुरवू न शकलेल्या ‘रामा मैलकुली’ला त्याची बायको सोडून जाते. तरीही “कुटंबी सुकात असली म्हंजे झालं," असं सोडून गेलेल्या बायकोबद्दलचं त्याचं मत  त्याच्या निर्मळ मनाचं आणि साधेपनाचं दर्शन घडवते.
‘‘चुलत्यानं डागलंय, खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं मानूस बरं हुतं. मी काय वेडा हाय का?’’ अशी कैफियत मांडणारा पोरका ‘मुलाण्याचा बकस’ आणि आयुष्याभर फक्त दुःख आणि दुःखच भोगलेल्या ‘बिटाकाका’ची हकीकत वाचून संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते.
प्रेमळ स्वभावाचा, स्वतःचा वाडा जळल्यावर रानात झोपडी बांधून राहनारा, आणि कुणाचेही उपकार न घेणारा ‘बन्याबापू’; जुन्या रूढी आणि गैरसमजाना चिटकून राहिलेला ‘रामू तेली’; साध्या-सरळ मनाचा परंतु चिलमीच्या व्यसनासापाई आयुष्यातून बरबाद झालेला ‘शिवा माळी’; प्रेमळ, कष्टाळू आणि तरीही आयुष्याची शोकांतिका झालेली ‘तांबोळ्याची ‘खाला’; गरिबीमुळे नैराश्याने ग्रासलेला ‘रघु कारकून’; तमशापाई मास्तरकी सोडणारा ‘नामा’ आणि काबाडकष्ट करूनही गावात पोट भरत नाही म्हणून गाव सोडून मुंबईतील तमाशात गेलेला ‘गणा’ ही सगळी चांगल्या स्वभावाची परंतु परिस्थितीने गांजलेली माणसं वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला भेटतात.
त्याचप्रमाणे गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत हात धुऊन घेणारा ‘शिदा चांभार’; शेतीच्या बांधावरून भाऊबंधकी आणि हाणामाऱ्या करणारा ‘कोंडीबा गायकवाड’; बायकोपेक्षा पोट भरणाऱ्या जनावराला (अस्वल) महत्व देणारा ‘बाबाखान दरवेशी’; इत्यादी बेरकी स्वभावाची माणसंही वेगवेगळ्या कथेतून पुस्तकात आपल्याला भेटतात.
गरीब, साधीसुधी, मनमिळाऊ, बेरकी अश्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटून झाल्यावर शेवटी कष्टाविना पैसा हवा असणारा ‘गणा भपट्या’ वाचल्यावर मात्र, मनसोक्त हसून पुस्तकाचा शेवट होतो.
अशी ही माणदेशातली वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या स्वभावाची सोळा व्यक्तिचित्रे व्यंकटेश माडगूळकरांनी अत्यंत नैसर्गिक, साध्या पद्धतीने आणि छान शैलीत रंगवली आहेत.      

आज सत्तर वर्षांनी बहुतांश खेड्यांमध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल झालेत. शैक्षणिक सुधारणा झाल्या, रस्ते झाले, कुडा-मेढीच्या घरांची जागा आरसीसी घरांनी घेतली, बलुतेदार पध्दत जवळपास संपली आहे, टीव्ही, मोबाईल, दळवळणाची साधनं घरोघरी पोहचली आहेत. एकंदरीत भौतिक विकास झाला आहे. परंतु या विकासात एकमेकांना धरून राहणारी, एकमेकांचा आदर करणारी, प्रेम-जिव्हाळ्याची माणसं मात्र कायमची हरवली आहेत.
एके काळी जातीच्या नावाने हाक मारूनही माणसांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होते. आपुलकी होती. आपलेपणा होता. आज जातीपतीची दरी एवढी वाढली आहे की माणसाला माणूस म्हणून जवळ न करता तो आपल्या जातीचा आहे का हे पाहून जवळ करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. या बदलेल्या परिस्थितीची तुलना ७०/८० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी करता मनात एक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि तो म्हणजे... अडाणी,गरीब,सोशीक,निर्मळ मनाची,माणुसकी जपणारी, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणारी माणसं होती तो काळ चांगला ?? की स्वार्थी, निगरगट्ट, भ्रष्टाचारी, स्वतःपुरता विचार करणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या माणूस नावाच्या जमातीचा हा काळ चांगला???
@संदिप रामचंद्र चव्हाण.

माणदेशी माणसं
लेखक: व्यकंटेश माडगूळकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत: १२५
पृष्ठे: १२८
जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल

माणसं दोन प्रकारची असतात.१) चाकोरीबद्ध मार्गाने आयुष्य जगणारी. २) धोका पत्करून अवघड वाटेने आयुष्याचा प्रवास करणारी. पहिल्या प्रकारात तेच तेच जिणं असतं. पाट्या टाकत दिवस ढकलले जातात. त्यांच्यासाठी आला दिवस सारखाच असतो. नवीन काही शिकण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो. तर दुसऱ्या प्रकारची माणसं ही कोणत्या तरी उत्तुंग ध्येयाच्या ध्यासापोटी वेडी होऊन जगणारी, स्वप्न पाहणारी आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारी असतात. जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल ही अशीच एक रुपककथा आहे…. उत्तुंग ध्येयाच्या ध्यासाने वेड्या झालेल्या एका समुद्रपक्षाची… जोनाथनची! की जो इतर साधारण समुद्रपक्षांपेक्षा नेहमी वेगळा विचार करत असतो. स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी इतरांच्या टीका टिपण्णीकडे दुर्लक्ष करून अखंड परिश्रम करत असतो.

लेखक रिचर्ड बाकने मानवाच्या जगण्याची शैली, त्याच्यातील हेवे-दावे, रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, पाय खेचण्याची वृत्ती आणि काहींची फिनिक्स प्रमाणे राखेतून भरारी घ्यायची जबरदस्त इच्छाशक्ती इत्यादी गुण-अवगुणांना या रुपककथेत अगदी चपखलपणे बसवले आहे. रिचर्ड बाक हा स्वत: वैमानिक असल्याने त्याने समुद्रपक्षी व त्याला दिसणारं जग अत्यंत सोप्या शब्दांत मांडलं आहे. साधारण समुद्रपक्षांचं रोजचं जगणं साधं, सरळ असतं. पोट भरण्यासाठी मच्छिमारांच्या बोटीमागून उडत राहणं. माशाच्या तुकड्यासाठी आपापसात भांडणं. कसही करून पोट भरणं. फक्त पोट भरण्यासाठीच उडत राहणं आणि या रोजच्या घटनाक्रमात जराही बदल न करणं.

जोनाथन मात्र वेगळा विचार करणारा, वेगळी स्वप्ने पाहणारा, केलेला विचार कृतीत उतरवणारा, स्वप्नासाठी धडपडणारा, धडपडताना पडणारा, पडून उठणारा आणि पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवणारा समुद्रपक्षी आहे. एके दिवशी समुद्रपक्षांच्या कळपाचे(थव्याचे) निमय मोडून ‘जोनाथन’ खूप उंच आणि गतिमान भरारी घेतो. स्वतःला आजमावतो. सुरवातीला त्याला अपयश येते. परंतु प्रयत्न करणे तो सोडत नाही. त्याच्या या धडसाला त्याचे आईवडील विरोध करतात. त्याला साधारण समुद्रपक्षांप्रमाणे वागायला सांगतात. परंतु फक्त मासे पकडण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी उडणे जोनाथनला मान्य नाही. त्याला नवनवीन काही शिकायचे आहे. तो पुन्हा पुन्हा अधिक उंचावरून आणि तीव्र गतीने उडण्याचा सराव करतो. या त्याच्या वागण्याने समुद्रपक्षांची पंचायत त्याला बेजबाबदार ठरवते व कळपातुन (थव्यातून) हाकलून देते… बहिष्कृत करते... वाळीत टाकते! जातपंचायतीच्या या निर्णयाचे आणि एकाकी राहण्याचे दुःख जोनाथनला नाही. परंतु इतर समुद्रपक्षी स्वच्छंद उडण्याचे महत्व समजू शकत नाहीत, डोळे बंद करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य नाकारत आहेत. याचे मात्र त्याला दुःख होते.

एकट्या पडलेल्या जोनाथनला त्याच्या ध्येयमार्गाच्या पुढील प्रवासात त्याला त्याच्यासारखा विचार करणारे आणि परिपूर्णतेचा स्वर्ग अनुभवणारे मार्गदर्शक मित्र भेटतात. त्यांच्यासोबत तो एक वेगळ्याच जगात प्रवेश करतो. तिथे सर्वजण परिपूर्णतेचा आनंद घेत असतात. असामान्य कामगिरीने त्यांनी त्यांचं वेगळं जग निर्माण केलेले असते. त्याच्याकडून तो खूप काही शिकतो. त्याला त्याच्या क्षमतांची, परिपूर्णत्वाची, ‘स्व’ची जाणीव होते. हवे ते मिळाल्यानंतर जोनाथन त्या स्वर्गमयी दुनियेत थांबत नाही. ज्यांनी त्याला बहिष्कृत केले, वाळीत टाकले त्या अज्ञानात खितपत पडलेल्या आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी तो ‘स्वर्गसुख’ सोडून ‘धरतीकडे’ परततो. स्वताप्रमाणे इतरांना तरबेज करण्यासाठी धडपडतो. शिकण्यासाठी जे जे इच्छूक आहेत त्या सर्वांना स्वतःजवळची कला-कौशल्ये, ज्ञान देतो. जणू दुसरे ‘जोनाथन’ बनवतो. आणि पुन्हा भरारी घेतो इतर अज्ञानी बांधवांना ज्ञानामृत पाजण्यासाठी….!
इथे कथा संपते.

कोणतंही काम करताना आपण स्वतःला झोकून दिल्यास इच्छित ध्येयापर्यंत पोचण्यास मदत होते. त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी, निर्धार, चिकाटी, आत्मबल हवे असते. या गुणांच्या जोडीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा ध्यास आपण घेतल्यास ठरवलेल्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करू शकतो. आणि एवढ्यावरच न थांबता, आपल्या यशाच्या मार्गात ज्यांनी ज्यांनी काटे पेरले त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करून त्यांच्या आणि इतर सर्व ज्ञातीबांधवांच्या भौतिक समृद्धीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी कटिबद्ध रहायचे असते. ही शिकवण या कथेतून मिळते. आयुष्यात आपल्याला काय व्हायचंय.. जोनाथन की सामान्य समुद्रपक्षी? याचा निर्णय मात्र प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा आहे...

जोनाथनची कथा छान आहे. तरुणांना प्रेरणादायी आहे. असे अनेक तरुण/तरुणी/लोक असतात की जे स्वप्न पाहतात. धोका पत्करून वेगळा मार्ग अवलंबतात. ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कष्ट करतात आणि यशस्वीही होतात. परंतु त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ‘जोनाथन’ बनतात…हे ‘जोनाथन’ मिळालेल्या यशाच्या कोशात अडकून पडत नाहीत. ज्ञानाचा दंभ त्यांना होत नाही. पद-प्रतिष्ठा आणि सत्ता-संपत्तीचे गुलाम ते होत नाहीत. समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, अज्ञान दूर करण्यासाठी अविरतपणे ते धडपडतात. आपल्या ज्ञानाचा, पदाचा, संपत्तीचा वापर ते दिन-दुबळ्या-वंचितांच्या उद्धारासाठी करतात. हे सकारात्मक चित्र एकीकडे तर दुसरीकडे मात्र आपापल्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणारी एक मोठी संख्या आपल्याच कोशात अडकलेली दिसते. ‘मी’ ची बाधा त्यांना झालेली असते. जगाशी त्यांना काही देणेघेणे नसते. ज्ञान, पद, सत्ता, संपत्तीचा वापर ते फक्त स्वतःच्या विकासासाठीच करतात. अशांना या संकुचित मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी रिचर्ड बाकने लिहलेली जोनाथनची ही रुपककथा नक्कीच उपयोगी ठरेल हे मात्र नक्की..!
@संदिप रामचंद्र चव्हाण

जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवाद : बाबा भांड
प्रकाशन: साकेत प्रकाशन
किंमत: ₹१५०
पृष्ठे: १२०


जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवादाची pdf
http://arvindguptatoys.com/arvindgupta/m-jonathan.pdf  या लिंकवर मोफत उपलब्ध
पृष्ठे: १५ (ए४ साईज)



Sunday 3 March 2019

खरे देशभक्त बनूया...

देशात बहुतेकांना आलेला युद्धाचा ताप आता थोडा निवल्यासारखा झालाय म्हणून एक पोस्ट पोस्टावी असा विचार करून हा उपद्व्याप…

पुलगामा दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाची व सुरक्षा बलाची अपरिमित हानी झाली. चाळीसच्या वर CRPF चे जवान हुतात्मा झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरल्याने भारत सरकार व भारतीय सेनेने पाकिस्तानच्या मातीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्यासाठी एअर स्ट्राइक केला. बिनडोक पाकिस्ताननने दहशतवादी विरोधी कारवाईला सैन्यविरोधी कारवाई समजली. पाकिस्तानी हवाई सेनेच्या F16 विमानांनी भारताची हवाईसीमा ओलांडली. आपल्या बहादूर हवाई सेनेने त्यांना पिटाळून लावले. या धुमचक्रीत पाकिस्तानचे F16 व आपले Mig 21 अशी दोन विमाने अनुक्रमे पाकिस्तान व भारतीय हद्दीत पडली. परंतु दोन्हींचे पायलट मात्र पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्यारशूटच्या साह्याने उतरले. देशप्रेम म्हणजे शत्रू देशाचा द्वेष ही मानसिकता असणाऱ्या पाकिस्तानी जनतेने भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन याना मारहाण केली. अभिनंदन यांनी मोठ्या धैर्याने जवळच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला व जवळची काही कागदपत्रे गिळून तर काही कागदपत्रे पाण्याच्या डबक्यात टाकून नष्ट केली. या दरम्यान पाकिस्तान सैन्याने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले. या घटनेचे व्हिडीओ स्थानिकांनी व्हायरल केले. आपल्याला त्याचा अप्रत्यक्ष फायदाच झाला. पाकिस्तानला कबूल करावे लागले की आपला एक पायलट त्यांच्याजवळ आहे. पुढे अनेक नाट्यमय घटना घडल्या व तिसऱ्या दिवशी विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले. विंग कमांडर अभिनंदन त्यांच्या सुटकेचा अवघ्या देशाला आनंद झाला. दरम्यान पाकिस्तानच्या पायलटला भारतीय पायलट समजून पाकिस्तानच्या आंधळ्या देशप्रेमी जनतेने एवढी मारहाण केली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी बातमी वाचण्यास मिळाली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेवेळीसच काश्मीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाला व आपले चार जवान धारातीर्थी पडले. याच दिवशी देशसेवा बजावताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांवर अंत्यसंस्कार झाले. त्यामध्ये नाशिकच्या निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता. एकूणच आजवरच्या सर्व घटना पाहता आपल्या लक्षात येते की कोणत्याही दलाचा जवान हा आपले कर्तव्य पार पाडताना जीवाची बाजी लावतो. प्रसंगी हसत हसत बलिदान देतो. त्यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे इतर देशवासियांना सुखाची झोप मिळते व लोकशाही टिकते. परंतु जवानाच्या बलिदानाची किंमत मात्र त्यांच्या कुटुंबाला चुकवावी लागते. युद्धाने कुणाचेही भले होत नाही. मनुष्यहानी व देशाच्या विकासाला खीळ हे मोठे तोटे युद्धामुळे होतात. मानवाच्या विकासासाठी जगात शांतता हवी. हे सत्य असले तरी पाकिस्तान, तालिबानी, इसिस ही अशी कीड आहे की त्यांना शांततेची भाषा समजत नाही. याशिवाय जगभरातील शस्त्रास्त्रे निर्मिती करणारे मोठे कारखानदार यांनाही शांतता बोचत असते. जगात कायम युद्धजन्य परिस्थिती रहावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. कारण सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली तर त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ येईल. दहशतवाद व तेलाचे राजकारण ही युद्धजन्य परिस्थिती निर्मितीची आणखी मोठी कारणे आहेत. याशिवायही इतरही भरपूर कारणे आहेत की ज्यामुळे जगभरात कुठेना कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, निर्माण केली जाते व छोटी मोठी युद्ध घडतात. त्यामध्ये निष्पाप नागरिक मरतात. त्या त्या देशाच्या सैन्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. हे नाकारता न येणारे कटूसत्य आहे.

फक्त भारत पाक संबंधाबाबत विश्लेषण करायचे झाल्यास…  पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण, सामाजिक स्थिती खूप गुंतागुंतीची आहे. तिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप मोठी दरी आहे (तशी सगळीकडेच आहे) सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला त्यांचे लष्कर व राजकीय नेते दुय्यय स्थान देतात. पाकिस्तानचा कारभार काही लष्करी अधिकारी, ठराविक सरकारी अधिकारी व राजकीय धेंडे चालवतात. हे लोक मोठे जमीनदार,उद्योगपती व व्यापारी आहेत. मूठभर अतिश्रीमंत व्यावसाईक लोकांचे हितसंबंध पाकिस्तानी सैन्यांशी आहेत. या अतिश्रीमंतांचे आपापसात नातेसंबंध आहेत. एकमेकांच्या मुलामुलींचे परस्परात विवाह करून त्यांनी आपले वर्तुळ मर्यादित ठेवले आहे. पाकमध्ये सैन्याचे वर्चस्व रहावे यासाठी हा अतिश्रीमंत वर्ग कायमच प्रयत्नशील असतो. पाकमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापित झाल्यास त्यांचे बिंग फुटेल व त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोचेल याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ते पाकिस्तानच्या जनतेला आणि कठपुतळी सरकारला कायम नाचवत असतात आणि दबावात ठेवून भारताविरुद्ध चेतवत राहतात. त्यांचे आसन मजबूत राहण्यासाठी भारत -पाक संबध ताणलेले असणे गरजेचे असते. शिवाय चिनसारखा देश भारताची अर्थव्यवस्था कमजोर करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद पोसण्यास अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतो. पाकिस्तानची आर्थिक व सामरिक शक्ती भारताच्या तुलनेत कमी असल्यामुळे पाकिस्तान थेट युद्ध न करता दहशतवादी कृत्य व दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम सतत करत असतो. कारगिल घडण्याआधीही आणि नंतरही आपले असंख्य सैनिक व नागरिक विनायुद्धाचेच मारले गेलेत. आतापर्यंत भारताने खुप मोठ्या मनुष्यहानीचे नुकसान सोसले आहे. पाकिस्तानने घडवून आणलेल्या उरी आणि पुलगामा हल्ल्यात आपली सहनशीलता संपली व त्याची प्रतिक्रिया उमटली. भारतीय सैन्याने पाकिस्तानला समजेल अशा भाषेत कारवाई केली. परंतु या कारवाईला युद्ध म्हणून समोर आणून पाकिस्तानी सेनेप्रमाणे भारतीय मीडियानेही अकलेचे तारे तोडले. काहीवेळा ठकास महाठक बनावे लागते व भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करून हे दाखवूनही दिले. पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवादी हे कधीही सरळ न होणारे कुत्र्याचे शेपूट आहे. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून त्याचे वाकडे शेपूट तोडावेच लागेल. म्हणजे त्याना सर्व बाजूनी पंगू करावे लागेल. त्यासाठी आंतराष्ट्रीय दबाव वाढवून जरब म्हणून काही प्रमाणात युद्धही करावे लागेल. हे सर्व करण्यासाठी आपले सैन्य व नेतृत्व सक्षम आहे. पाकिस्तानवर इलाज करताना युद्ध हा अंतिम पर्याय असायला हवा. व आपल्या देशाने याबाबत कायमच संयम दाखवलेला आहे. व जगात वेगळा ठसा उमटवला आहे.

एकीकडे हे घडत असताना देशाच्या नागरिकांचीही काही कर्तव्य असतात. परंतु इंटरनेटचे कोलीत हातात घेऊन
जनता व न्यूज सांगताना वापरावयाच्या दांडक्यालाच बंदूक समजणाऱ्या न्यूज अँकरनी सर्व लाज-शरम सोडून, सैन्य कारवाईला एखाद्या क्रिकेट मॅचच्या कॉमेंट्रीचे स्वरूप दिले. कमरेचे सोडून डोक्याला बांधलेल्या विकाऊ मीडियाने अगदी ताळतंत्र सोडला आणि देशभरात युद्धज्वर वाढीस लावण्याचे काम अत्यंत बेजबाबदारपणे पार पाडले. काही राजकारणी व त्यांचे चेलेही त्यामध्ये रॉकेल ओतण्याचे काम करत आहेत. सध्या देशातील हे वातावरण पाहता व्हाट्सएप बच्चन, फेसबुकवीर आणि मीडियावरील टुकार अँकर यांना मिसाईलला बांधून पाकमध्ये सोडायला हवे असे वाटते. सोशलमीडियावरून आणि ac न्यूज रूम मध्ये बसून गप्पा मारण्याइतप्त युद्ध सोपे नसते हे त्यांच्या अविकसित मेंदूला समजेनासे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या नाशिकच्या निनाद मांडवगणे यांच्या पत्नीने याबाबत खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षित घरात बसून युद्धाची भाषा बोलणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. त्या म्हणाल्या, ‘केवळ मुर्दाबाद किंवा झिंदाबाद अशा घोषणा देत राहू नका, त्याने काही होणार नाही. काही खरेच करायचे असेल, तर सैन्यात दाखल व्हा. काही कारणामुळे ते शक्य नसेल, तर कुटुंबातील कोणाला तरी सैन्यात भरती व्हायला सांगा. तेही शक्य नसेल, तर देशसेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते अवलंबा. तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा होऊ देऊ नका, उघड्यावर शौचास बसू नका, महिलांना त्रास देऊ नका, त्यांची छेड काढू नका… असे झाले, तरच महिला सुरक्षित राहतील. आम्ही सगळे सुखरूप आहोत, हे कळल्यावर निनाद यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल.’ आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावर साथ सोडून गेलेला असतानाही तान्ह्याबाळाला घेऊन त्यांनी ज्या धैर्याने देशहिताच्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हव्यात. परंतु शहिदांच्या श्रद्धांजली पोस्टखालीच  वाढदिवसाचा केक तोंडाला फासून पोस्टीवर पोस्टी टाकणाऱ्या आणि स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या देशवासियांना खरे देशप्रेम केव्हा समजेल? हा मोठाच प्रश्नच आहे. सैनिक व त्यांचे कुटुंबीय देशसेवेची, देशप्रेमाची, देशभक्तीची जबाबदारी पार पाडतात. प्रत्येक भारतीयाने आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर लक्ष ठेवून त्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दैनंदिन वागणुकीत देशहिताच्या गोष्टी करून सच्चे देशभक्त बनायला हवे.
खरं तर युद्ध नसावेच पण काही वेळा पापिस्तानसारखा शेजारी असल्याने पर्याय रहात नाही. युद्धात ज्यांच्या घरचे कोणी शहीद होते किंवा विनाकारण मरते त्यांना युद्ध म्हणजे काय समजून येते. ज्यांना युद्ध लढावे लागत नाही त्यांना युद्ध हवे असते तर ज्यांना लढावे लागते त्यांना ते नको असते. युद्धाने विकास व मानवजात धोक्यात येते हे सर्वांना समजायला हवे. यासाठी जगभर खुप मोठी वैचारिक क्रांती हवी परंतु विचार करायला वेळच नसलेल्या संवेदनाहीन लोकांच्याकडून अश्या क्रांतीची अपेक्षा हे दिवास्वप्न ठरेल!
@संदिप रामचंद्र चव्हाण