My Blog List

Thursday 7 March 2019

जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल

माणसं दोन प्रकारची असतात.१) चाकोरीबद्ध मार्गाने आयुष्य जगणारी. २) धोका पत्करून अवघड वाटेने आयुष्याचा प्रवास करणारी. पहिल्या प्रकारात तेच तेच जिणं असतं. पाट्या टाकत दिवस ढकलले जातात. त्यांच्यासाठी आला दिवस सारखाच असतो. नवीन काही शिकण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो. तर दुसऱ्या प्रकारची माणसं ही कोणत्या तरी उत्तुंग ध्येयाच्या ध्यासापोटी वेडी होऊन जगणारी, स्वप्न पाहणारी आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारी असतात. जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल ही अशीच एक रुपककथा आहे…. उत्तुंग ध्येयाच्या ध्यासाने वेड्या झालेल्या एका समुद्रपक्षाची… जोनाथनची! की जो इतर साधारण समुद्रपक्षांपेक्षा नेहमी वेगळा विचार करत असतो. स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी इतरांच्या टीका टिपण्णीकडे दुर्लक्ष करून अखंड परिश्रम करत असतो.

लेखक रिचर्ड बाकने मानवाच्या जगण्याची शैली, त्याच्यातील हेवे-दावे, रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, पाय खेचण्याची वृत्ती आणि काहींची फिनिक्स प्रमाणे राखेतून भरारी घ्यायची जबरदस्त इच्छाशक्ती इत्यादी गुण-अवगुणांना या रुपककथेत अगदी चपखलपणे बसवले आहे. रिचर्ड बाक हा स्वत: वैमानिक असल्याने त्याने समुद्रपक्षी व त्याला दिसणारं जग अत्यंत सोप्या शब्दांत मांडलं आहे. साधारण समुद्रपक्षांचं रोजचं जगणं साधं, सरळ असतं. पोट भरण्यासाठी मच्छिमारांच्या बोटीमागून उडत राहणं. माशाच्या तुकड्यासाठी आपापसात भांडणं. कसही करून पोट भरणं. फक्त पोट भरण्यासाठीच उडत राहणं आणि या रोजच्या घटनाक्रमात जराही बदल न करणं.

जोनाथन मात्र वेगळा विचार करणारा, वेगळी स्वप्ने पाहणारा, केलेला विचार कृतीत उतरवणारा, स्वप्नासाठी धडपडणारा, धडपडताना पडणारा, पडून उठणारा आणि पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवणारा समुद्रपक्षी आहे. एके दिवशी समुद्रपक्षांच्या कळपाचे(थव्याचे) निमय मोडून ‘जोनाथन’ खूप उंच आणि गतिमान भरारी घेतो. स्वतःला आजमावतो. सुरवातीला त्याला अपयश येते. परंतु प्रयत्न करणे तो सोडत नाही. त्याच्या या धडसाला त्याचे आईवडील विरोध करतात. त्याला साधारण समुद्रपक्षांप्रमाणे वागायला सांगतात. परंतु फक्त मासे पकडण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी उडणे जोनाथनला मान्य नाही. त्याला नवनवीन काही शिकायचे आहे. तो पुन्हा पुन्हा अधिक उंचावरून आणि तीव्र गतीने उडण्याचा सराव करतो. या त्याच्या वागण्याने समुद्रपक्षांची पंचायत त्याला बेजबाबदार ठरवते व कळपातुन (थव्यातून) हाकलून देते… बहिष्कृत करते... वाळीत टाकते! जातपंचायतीच्या या निर्णयाचे आणि एकाकी राहण्याचे दुःख जोनाथनला नाही. परंतु इतर समुद्रपक्षी स्वच्छंद उडण्याचे महत्व समजू शकत नाहीत, डोळे बंद करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य नाकारत आहेत. याचे मात्र त्याला दुःख होते.

एकट्या पडलेल्या जोनाथनला त्याच्या ध्येयमार्गाच्या पुढील प्रवासात त्याला त्याच्यासारखा विचार करणारे आणि परिपूर्णतेचा स्वर्ग अनुभवणारे मार्गदर्शक मित्र भेटतात. त्यांच्यासोबत तो एक वेगळ्याच जगात प्रवेश करतो. तिथे सर्वजण परिपूर्णतेचा आनंद घेत असतात. असामान्य कामगिरीने त्यांनी त्यांचं वेगळं जग निर्माण केलेले असते. त्याच्याकडून तो खूप काही शिकतो. त्याला त्याच्या क्षमतांची, परिपूर्णत्वाची, ‘स्व’ची जाणीव होते. हवे ते मिळाल्यानंतर जोनाथन त्या स्वर्गमयी दुनियेत थांबत नाही. ज्यांनी त्याला बहिष्कृत केले, वाळीत टाकले त्या अज्ञानात खितपत पडलेल्या आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी तो ‘स्वर्गसुख’ सोडून ‘धरतीकडे’ परततो. स्वताप्रमाणे इतरांना तरबेज करण्यासाठी धडपडतो. शिकण्यासाठी जे जे इच्छूक आहेत त्या सर्वांना स्वतःजवळची कला-कौशल्ये, ज्ञान देतो. जणू दुसरे ‘जोनाथन’ बनवतो. आणि पुन्हा भरारी घेतो इतर अज्ञानी बांधवांना ज्ञानामृत पाजण्यासाठी….!
इथे कथा संपते.

कोणतंही काम करताना आपण स्वतःला झोकून दिल्यास इच्छित ध्येयापर्यंत पोचण्यास मदत होते. त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी, निर्धार, चिकाटी, आत्मबल हवे असते. या गुणांच्या जोडीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा ध्यास आपण घेतल्यास ठरवलेल्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करू शकतो. आणि एवढ्यावरच न थांबता, आपल्या यशाच्या मार्गात ज्यांनी ज्यांनी काटे पेरले त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करून त्यांच्या आणि इतर सर्व ज्ञातीबांधवांच्या भौतिक समृद्धीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी कटिबद्ध रहायचे असते. ही शिकवण या कथेतून मिळते. आयुष्यात आपल्याला काय व्हायचंय.. जोनाथन की सामान्य समुद्रपक्षी? याचा निर्णय मात्र प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा आहे...

जोनाथनची कथा छान आहे. तरुणांना प्रेरणादायी आहे. असे अनेक तरुण/तरुणी/लोक असतात की जे स्वप्न पाहतात. धोका पत्करून वेगळा मार्ग अवलंबतात. ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कष्ट करतात आणि यशस्वीही होतात. परंतु त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ‘जोनाथन’ बनतात…हे ‘जोनाथन’ मिळालेल्या यशाच्या कोशात अडकून पडत नाहीत. ज्ञानाचा दंभ त्यांना होत नाही. पद-प्रतिष्ठा आणि सत्ता-संपत्तीचे गुलाम ते होत नाहीत. समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, अज्ञान दूर करण्यासाठी अविरतपणे ते धडपडतात. आपल्या ज्ञानाचा, पदाचा, संपत्तीचा वापर ते दिन-दुबळ्या-वंचितांच्या उद्धारासाठी करतात. हे सकारात्मक चित्र एकीकडे तर दुसरीकडे मात्र आपापल्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणारी एक मोठी संख्या आपल्याच कोशात अडकलेली दिसते. ‘मी’ ची बाधा त्यांना झालेली असते. जगाशी त्यांना काही देणेघेणे नसते. ज्ञान, पद, सत्ता, संपत्तीचा वापर ते फक्त स्वतःच्या विकासासाठीच करतात. अशांना या संकुचित मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी रिचर्ड बाकने लिहलेली जोनाथनची ही रुपककथा नक्कीच उपयोगी ठरेल हे मात्र नक्की..!
@संदिप रामचंद्र चव्हाण

जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवाद : बाबा भांड
प्रकाशन: साकेत प्रकाशन
किंमत: ₹१५०
पृष्ठे: १२०


जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवादाची pdf
http://arvindguptatoys.com/arvindgupta/m-jonathan.pdf  या लिंकवर मोफत उपलब्ध
पृष्ठे: १५ (ए४ साईज)



No comments:

Post a Comment