My Blog List

Saturday 16 December 2017

दिवास्वप्न... मला आवडलेले मराठी पुस्तक 09/12/17

दिवास्वप्न :- वकील असणाऱ्या पण शिक्षक म्हणून जगणाऱ्या एका शिक्षणक्षेत्रातील क्रांतिकारकाचा म्हणजे #गिजुभाई_बधेकांचा शिक्षण प्रयोग... 
गिजुभाईंचा जन्म 15 नोव्हेंबर 1885 साली झाला, 15 नोव्हेंबर 1985 ला त्यांची जन्मशताब्दी बालशिक्षण प्रेमींनी साजरी केली. स्वतः वकील असून त्यांनी बालशिक्षण व त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती याचा अभ्यास केला व वकिलीला राम राम करून बालकांची वकिली चालू केली. गिजुभाईंनी सुमारे 80/85 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षणात चांगले क्रांतिकारक बदल सुचवले व ते सिद्ध करून दाखवले.
गिजुभाई बधेका यांनी स्वानुभवातून 1932 साली हे पुस्तक गुजराथी भाषेत लिहून प्रकाशित केले आहे. त्या नतंर पुढे वेगवेगळ्या भाषेत या पुस्तकाच्या आवृत्या निघाल्या. मराठीमध्ये सुद्धा काही लेखकांनी याचे भाषांतर केले आहे.
मी शोभा भागवत यांनी केलेले भाषांतर वाचले.....त्या बद्दल थोडंस....
दिवास्वप्न या शब्दाचा इंग्रजी मध्ये daydream हा शब्द आहे. मराठीत याला पर्यायी शब्द "गोड गोड गोष्टींचा विचार करणे", मनोराज्य किंवा मनोराज्यात रमणे असा अर्थ डिक्शनरी मध्ये सापडतो. पण रूढार्थाने दिवसा पाहिलेले व सत्यात यायला अशक्य असणारे स्वप्न म्हणजे दिवास्वप्न. 

या पुस्तकात स्वतः लेखक कथानायक लक्ष्मीशंकर या भूमिकेत आहेत... शिक्षक बनलेले लक्ष्मीशंकर शिक्षणाधिकार्यकडे जाऊन प्राथमिक शिक्षणाचा वर्ग  एका वर्षासाठी प्रयोग म्हणून चालवायला मागतात. त्यांची जिद्द व चिकाटी पाहून अधिकारी त्यांची मागणी मान्य करतात. लक्ष्मीशंकर यांना चौथीचा वर्ग वर्षभर चालवायला मिळतो, त्यात त्यांनी केलेले प्रयोग व त्यासाठी घेतलेले कष्ट व त्यातून मुलांच्यात झालेला आमूलाग्र बदल या सत्य घटनेवर आधारित वास्तव सांगणारी कथा म्हणजे दिवास्वप्न.
शिक्षकपेशातील कोणताही अनुभव नसताना चौथीच्या वर्गात शिक्षक म्हणून आल्यावर पहिल्याच दिवशी मुलांच्या चेष्टा मस्करीला व टिंगलटवाळीला सामोरं जायला लागल्याने हे काम आपण समजतो तेवढे सोपं नाही यांची जाणीव लक्ष्मीशंकर यांना होते.
दंगेखोर, उनाड मुलांना शांतीचा क्लास घेऊन फायदा नाही.. गडबड, गोंधळ अशा वातावरणात मोठी झालेली मुलं एकदम शांत होणार नाहीत व मार देऊन मुलांना वळण लावणं मान्य नाही... इतर शिक्षकांचा मारावर भर असताना लक्ष्मीशंकर मात्र मारझोड करण्याच्या विरोधात आहेत. अचानक दिलेली सुट्टी व त्यामुळे अत्यानंदात उड्या मारत पळत सुटणारी, सुट्टी म्हणजे जणू शिक्षेतून मुक्ती अस वाटणारी मुलं म्हणजे मुलांच्यात शाळेविषयी प्रेम निर्माण करायला शाळा, शिक्षक, व व्यवस्था कमी पडली आहे हे ठाम मत लक्ष्मीशंकर यांचं होतं.
आजपर्यंत मुलांना शिक्षणाच्या व अभ्यासक्रमाच्या बागुलबुवामुळे गोष्टी न सांगण्याचा विडा उचललेले व खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असे समजणारे व त्यामुळे मुलांचं भावविश्व न समलेले शिक्षक एका बाजूला तर मुलांचा विश्वास, प्रेम जिंकण्यासाठी गोष्टी व खेळाचा आधार घेऊन गोष्टी व खेळातून अभ्यास शिकवणारे लक्ष्मीशंकर दुसऱ्या बाजूला... हा एकूणच प्रकार रंजक व नाविन्यपूर्ण आहे.
गोष्टींमुळे हा हा, ही ही, करणारी मुलं एकदम शांत होतात, शिक्षक व मुलांचं नात मित्रत्वाच्या टप्प्यावर ज्याण्यास गोष्टी मदत करतात.
मुलांची व्यक्तिगत स्वच्छता, स्वच्छ कपडे इत्यादीबद्दल लक्ष्मीशंकर आग्रही आहेत. पालक लक्ष देत नाहीत म्हणून स्वतः आरसा, कांगवा, टॉवेल घेऊन येतात. मुलांचे हातपाय धुतात हळूहळू मुलांना सवय लागते. डोक्यावर टोपी असणे ज्यावेळी समाजव्यवस्थेत अत्यावशक्य होतीे त्या वेळी मुलांना टोपीचा भार नको असं मत मांडतात. धर्माचं शिक्षण द्यायला आलेल्या साधूंना योग्य वयात धर्माचे शिक्षण हवे, लहानग्यांना धर्म सांगून उपयोग नाही हे पटवून देतात. त्यांनाही शिक्षणक्रांतीच्या बदलात मदतीसाठी सामील करून घेतात.
मोठे अधिकारी येतील तेव्हा मुलांना धाक दाखवून सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे व अधिकाऱ्यांची वाहवा मिळवायची हे लक्ष्मीशंकर यांना मान्य नाही...मुलं ही अधिकाऱ्यांच्या मनोरंजनाचे साधन नव्हे व इतर सहभागी झाले तरी मी माझ्या वर्गातील मुलांना यात सहभागी करणार नाही असा पवित्रा घेतात... मुलांना जे येत ते सादर करतात... अधीकाऱ्यांना नेमके तेच आवडते.
आज जरी ज्ञानरचनावाद आला असला तरी बरेच शिक्षक व बराच अभ्यासक्रम जुन्या पठडीत चालला आहे.  हे पुस्तक 1932 च्या सुमारास लिहले आहे. पण आजही शिक्षकांसाठी आदर्शवत व पालकांसाठी माहितीपूर्ण आहे.
व्याकरण शिकवणे सर्वात कंटाळवाणे असते, शिक्षक मुलांनाही ते कंटाळवाणे वाटते तेव्हा नाम, सर्वनाम, क्रियापद, विषेशन हा शिक्षक खेळातून आणि कृतीतून शिकवतो. गाण्याच्या भेंड्यातून मुलांची भाषेवर पकड दिसते. भवरा फिरवणे, स्वच्छ अक्षर, वस्तुसंग्रालयाची मांडणी इत्यादी गोष्टी मुले सहज करतात.
भूगोल शिकवण्याची पध्दत खूप रोचक आहे. नकाशावरील ठिकाणे पृथ्वीच्या गोलावर शोधणे, गावाला जाताना तयारी करावी तशी एखाद्या देशाला जायला काय काय तयारी करावी लागेल याचे प्रात्यक्षिक घेतात. चित्रकलेची गोडीही मुलांना लागते. ज्यांना अभ्यास जमत नाही ते कोणत्या व्यवसायात तरबेज होतील तेही निरीक्षण लक्ष्मीकांत करतात व तशी व्यवसाय शिक्षण देण्याची शिफारस करतात.
मुलांना अभ्यास हा खेळासारखा, गोष्टीसारखा, मनोरंजनासारखा वाटला पाहिजे. त्याचा भार वाटलायला नकोे असं एकूण मत या पुस्तकातून समोर येतं.
हे पुस्तक शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे. व शिक्षण व्यवस्थेशी संबधीत सर्वांनी वाचायला हवे असे आहे.
आज काळ बदलला असला व शाळा सुधारल्या(?) असल्या तरी गिजुभाईंचे दिवास्वप्न सत्यात आणण्यासाठी शिक्षक, संस्थाचालक, शासन यांच्याकडून म्हणावा तसा प्रयत्न होताना दिसत नाही. मुलांच्या शाळेसाठी पालक वर्ग उपलब्द पर्यायात परवडणारा पर्याय स्वीकारत आहेत. सध्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे.... लहान मुलं मतदार नसल्यामुळं त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या सर्वात महत्वाच्या गोष्टीवर लगेच बदल होतील असं वाटत नाही., व पालक इच्छा असून बदल करण्यात असमर्थ आहेत... जेव्हा गिजुभाईंचे दिवास्वप्न पूर्ण होईल तो सुदिन असेल.....
संदिप रामचंद्र चव्हाण
दिवास्वप्न -- गिजुभाई बधेका.
अनुवाद ---- शोभा भागवत.
प्रकाशन --- इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ एज्युकेशन, पुणे
9 डिसेंबर 2017 रोजी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक ग्रुपवर प्रसिद्ध केलेला ब्लॉग..

No comments:

Post a Comment