My Blog List

Sunday 9 December 2018

         ९ डिसेंबर महाराणी ताराराणी स्मृतिदिन विशेष



                         मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द

पारतंत्र्यातुन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळवलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अशा दोन्ही वेळी ‘स्वातंत्र्ययुद्ध’ खेळावे लागते. दोन्हीही युद्धात असंख्य नरवीरांच्या प्राणांची आहुती पडते. तेव्हा कुठे स्वातंत्र्यदेवता प्रसन्न होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना १६८१ ते १७०७ या २६ वर्षाच्या कालखंडाला अनन्य साधारण महत्व आहे. या प्रदीर्घ कालखंडात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी मराठ्यांनी मोगलांच्या विरुद्ध जो तीव्र लढा दिला त्यालाच ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ संबोधले जाते.

छत्रपती शिवरायांनी आदिलशाह, कुतुबशाह, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी या परकीय सत्तांबरोबरच स्वकीय वतदारांशीही लढून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. स्वतः राज्यभिषेक करवून घेऊन मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची घोषणा केली. यादवांच्या पाडावानंतर तीन शतकांपासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात सत्व-स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवीले. आपण लढूही शकतो आणि जिंकूही शकतो हा आत्मविश्वास सामान्यांच्या मनात निर्माण केला.
मराठयांच्या राज्यनिर्मितीनंतर मोगल सम्राट औरंगजेब याच्याशी कधीना कधी सामना करावा लागणार व तोच स्वराज्याचा मुख्य शत्रू आहे याची जाणीव शिवरायांना फार पूर्वीच झालेली होती. औरंगजेबाच्या बंदोबस्तासाठी त्यांची लष्करी योजनाही चालू होती. दक्षिण दिग्विजय हा त्या योजनेचाच एक भाग होता. औरंगजेब जर महाराष्ट्रावर घसरला तर आणीबाणीच्या वेळेस राजधानी दक्षिणेकडे हलवता येईल ही दूरदृष्टी त्यामध्ये होती. 
शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्या अफाट लष्करी सामर्थ्यानिशी, अगणित खजिन्यासह मराठ्यांची सत्ता समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने दक्षिणेत उतरला आणि इतिहास प्रसिद्ध ‘मराठयांच्या स्वातंत्र्ययुद्धाची’ सुरवात झाली. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले, झटले, झगडले. औरंगजेब हा अनुभव संपन्न, चाणाक्ष, शक्तिशाली, आणि कसलेला सेनानी होता, त्याचप्रमाणे धुर्त राजकारणपटूही होता. असे असूनही त्याला अगदी मराठ्यांच्या नवख्या राज्यापुढे, अननुभवी नेतृत्वापुढे गुडघे टेकावे लागले. मराठ्यांनी औरंगजेबास पुन्हा दिल्लीदर्शन होऊ दिले नाही. त्याला याच मराठी मातीत दफन होण्यास भाग पाडले. एकेका वर्षात आदिलशाही, कुतुबशाही जिंकणाऱ्या व हा हा म्हणता मराठ्यांना बुडवू म्हणणाऱ्या औरंगजेबास महाराष्ट्रातच चिरनिद्रा घ्यावी लागली. 

छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वकीयांचा झालेला विरोध मोडून संभाजीराजे छत्रपती झाले. सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज यांना जरब बसवून त्यांनी औरंगजेबाला आपला मोर्चा आदिलशाही, कुतुबशाहीकडे वळवायला भाग पाडले. १६८० ते १६८९ या नऊ वर्षात स्वराज्य रक्षणासाठी व स्वराज्याच्या वाढीसाठी अथक परिश्रम व संघर्ष केला. मराठयांच्या दुर्दैवाने १६८९ साली आपल्यातीलच काही फितुरांमुळे संभाजीराजे पकडले गेले आणि औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याला मराठे संपले असं वाटलं असेल तर नवल नाही. परंतु संभाजीराजेंची हत्या ही औरंगजेबाची सर्वात मोठी राजकीय चूक ठरली. छत्रपतींच्या हत्येच्या अपमानाने अवघा महाराष्ट्र पेठून उठला. गवतालाही भाले फुटले. सामान्य रयत स्वातंत्र्यरक्षणासाठी उभी ठाकली. संभाजीराज्यांच्या हत्येनेनंतर येसूबाई यांनी पुत्रप्रेम बाजूला ठेऊन आपल्या दिराला (राजाराम महाराज) छत्रपती म्हणून मान्यता दिली. त्यांना जिंजीकडे जायला सांगून स्वतः रायगडी थांबल्या. काही दिवसात रायगड मोगलांच्या हाती आला. बाल शाहू, येसूबाई यांना कैद झाली. राजाराम महाराजांनी अतिशय दिव्य संकटांचा सामना करून जिंजी गाठली. महाराष्ट्रातील कारभाऱ्याना छत्रपतींचे अधिकार देऊन जिंजीत राजधानी स्थापली. छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनेनंतर पहिल्या सहा महिन्यात स्वराज्याचा जवळपास सर्व भाग औरंगजेबाने ताब्यात घेतला परंतु हे यश औरंगजेबाला पचू न देता मराठ्यांनी पुढील सहा महिन्यात मोगलांनी जिंकलेले जवळपास सर्व किल्ले व जिंकलेला भूभाग पुन्हा स्वराज्यात आणला. संताजी-धनाजीं या सेनापतींनी पराक्रमाची शर्थ केली. औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या छावणीच्या कळस कापून नेला त्यावेळी औरंगजेबही थोडक्यात बचावला. मराठ्यांच्या ज्वाज्वल्य पराक्रमाने स्वराज्याचा मामला असा थाटात चालला असताना. राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात वितुष्ट येऊन छत्रपती व सेनापती यांच्यातच युद्ध होणे, छत्रपतींचा पराभव होणे, संताजी-धनाजी या सेनापतींचा दुर्दैवी संघर्ष, संताजी घोरपडेना सेनापती पदावरून हटवले जाणे. फंदफितुरीमुळे संताजी घोरपडयांचा खून होणे. इत्यादी घटना मराठ्यांच्या शोकांतिकेच्या साक्ष देतात. अशा सर्व धामुधुमीच्या काळातच राजाराम महाराजांचे निधन झाले. ऐन तारुण्यात वैधव्य आणि औरंगजेबसारखा कसलेल्या शत्रू या दोन्ही संकटांचा सामना महाराणी ताराबाईंनी केला. महाराणी ताराबाईंनी अतिशय आक्रमकता दाखवत मराठी सैन्याला नर्मदा पार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मराठ्यांनी बंगालच्या सुभ्याला धडक दिली. औरंगजेबाशी त्यांनी एकच निर्णायक लढाई न देता‚ त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमीकाव्याचे युद्ध चालविले आणि शेवटी त्यास अगतिक करून टाकले.
^^मराठ्यांची अस्मिता व स्वातंत्र्यता ताराबाईंच्या रूपाने प्रकटली होती. तत्कालीन कवी देवदत्त याने ताराबाईंना ‘भद्राकाली_भवानी’ असे संबोधले असून तिने खुद्द दिल्लीशहाचे ‘पाणी’ राखले नाही‚ असे म्हटले आहे. ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना तो म्हणतो −
 ‘दिल्ली झाली दीनवाणी 
दिल्लीशाचे गेले पाणी 
ताराबाई रामराणी 
भद्रकाली कोपली ॥ 
ताराबाईंच्या बखतें 
दिल्लीपतीची तखते 
खचो लागली ते विभतें 
कुराणें ही खंडली ॥ 
वजीरांस झोडि जे ते 
मुगलांस तोडि जे ते 
मशीदीस फोडि जे ते 
म्लेंच्छ कुले दंडिली ॥ 
उमराव दस्त झाले 
देव द्विजा बकसिले 
दिगंती ती कीर्ति चाले 
यशें जगे मांडिली ॥ 
ज्या नगरी सुखें नाचे 
हर दिल्लीशावरि 
कहर होता रामराणीची 
नजर जहराची लहरी ॥ 
असी धिंग रामराणी 
नाचतसे वैभवानी 
मूर्तिमंत हे भवानी 
जगी अवतरली ॥ 
मानहानी दिल्लींद्राची 
सभा हासते इंद्राची 
आजिकाल कवींद्राची 
सर्व चिंता हारली ॥ 
निरंतर चाल केली 
पातशाही तळा नेली 
दिल्लीचीही लज्जा गेली 
म्लेंच्छ गवण गळाला ॥ 
रामराणी भद्रकाली 
रणरंगी क्रुद्ध झाली 
प्रलयाची वेळ आली 
मुघल हो सांभाळा ॥ 
देवदत्त म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच दिल्लीच्या मोगल सिंहासनाची लाज गेली होती. त्याची अप्रतिष्ठा झाली होती. मोगलांच्या दृष्टीने हा प्रलयकालच होता. या प्रलयकालात मोगल साम्राज्याची इभ्रत बुडत चालली होती आणि खुद्द मोगल साम्राज्याच्या भव्य इमारतीवर या प्रलयाच्या लाटा धडका मारू लागल्या होत्या.^^
ज्या महाराष्ट्रास गुलाम करण्यास औरंगजेब धावून आला होता‚ त्याच महाराष्ट्रातील मराठ्यांनी त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले.‚ इतिहाससातील हा मराठयांचा दैदिप्यमान विजय आहे. छत्रपती संभाजी‚ छत्रपती राजाराम‚ महाराणी ताराबाई आणि स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केलेले असंख्य मराठे वीर या महान विजयाचे मानकरी आहेत.

आज ९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिस 
#विनम्र_अभिवादन

@संदिप रामचंद्र चव्हाण
(वरील माहितीपर लेख लिहण्यासाठी ‘मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध… लेखक डॉ. जयसिंगराव पवार’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे)

संदर्भ:^^मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध… डॉ. जयसिंगराव पवार

Friday 30 November 2018

टू सर, विथ लव्ह

ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक बणतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी अनुवाद केलेला आहे.


दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६)
निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…!

या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे.
असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते.
सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक ब्रेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत.

मला या पुस्तकाबद्दलची माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या बखर शिक्षणाची या पुस्तकातून मिळाली. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे.
भारतात आज खाजगी शिक्षणसंस्थांचे आलेले उदंड पीक, सरकारी/अनुदानित शाळेतील/महाविद्यालयाततील कायम असणाऱ्या शिक्षक/प्राध्यापकांची विद्यार्थ्यांबद्दलची अनास्था; बहुसंख्य काँट्रॅक्ट भरती केलेले शिक्षक व त्यामुळे त्यांना आलेले नैराश्य; प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकांची समाजाशी-विद्यार्थ्यांशी तुटलेली नाळ; शिक्षकी पेशाचे विसरले गेलेले भान; कुठेच रोजगार नाही म्हणून नाइलाजाने शिक्षक झालेले शिक्षक; संस्था चालकांना लाखों रुपये देऊन व वशिलेबाजी करून मिळवलेली नोकरी; प्राथमिक/माध्यमिक शाळेतील मुलांची मानसीकता त्यांचं निरागस मन समजून घेण्यात आलेलं अपयश इत्यादी अनेक दोष आजच्या बहुसंख्य शिक्षकांमध्ये दिसतात. काही शिक्षक याला अपवाद आहेत; जीव तोडून, पदरच्या खर्चाने, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टाने आणि नेटाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. ब्रेथवेट यांचं टू सर, विथ लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे.
आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट (शिक्षक) प्रत्येक तरुणाला, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.
@संदिप रामचंद्र चव्हाण.

टू सर, विथ लव्ह
मूळ लेखक: ई. आर. ब्रेथवेट
मराठी अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत: ₹१८०
पाने: २०४


Saturday 24 November 2018

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)

‘ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत’ अशांना अर्पण केलेला ‘अलोक’ हा सहा कथांचा कथासंग्रह म्हणजे बदलेल्या ग्रामीण जीवनाची वास्तवता सांगणाऱ्या जणू सहा कादंबऱ्या आहेत.
ग्रामीण कथा म्हणजे किस्से आणि इरसाल गोष्टी अशा समिकरणातून ग्रामीण कथेला यशस्वीपणे बाहेर काढण्याचे काम लेखक आसाराम लोमटे यांनी केलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही दशके खेडे आणि शहर यात बराच फरक होता. उत्तरोत्तर शहर आणि खेडे यांच्या सीमारेषा धुसूर होऊ लागल्या. आजच्या घडीला खेडं कुठं संपतं आणि शहर कुठं सुरू होतं हेही लक्षात येत नाही. सगळी सरमिसळ जाणवते.
शहर आणि खेडं यांच्यातील फरकाने ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ अशी वर्गवारी केली होती. इंडियाने भारताचे शोषण केले ही वास्तवता असली तरी भरतातल्या भारतातही शोषणव्यस्था होती/आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकानी ‘आलोक’ या कथासंग्रहात केलेला आहे.

या कथासंग्रहात एकूण सहा दीर्घकथा आणि एक परिशिष्ट आहे. यातील प्रत्येक कथेची मांडणी, त्यातील बोलीभाषा, प्रसंगाचे वर्णन वाचकाला गुंग करून टाकते.  कथेतील सर्व प्रसंग आपल्याच समोर घडतायत, जणू आपण एखादा चित्रपट पाहतोय असं वाचकाला जाणवतं.

खेड्यातला माणूस म्हणजे केवळ शेतकरी नव्हे तर शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया, मुलं/मुली, शाळेचे शिक्षक, छोटे मोठे व्यावसाईक इत्यादी सर्व घटकांचे मिळून खेडं बनतं. खेड्यातील या माणसांचं संघर्षम जगणं, या जगण्यातले ताणतणाव, त्यांना रोज भेडसावणाऱ्या अनंत अडचणी, त्या अडचणींचा सामना करताना आणि प्राप्त परिस्थितीशी झगडा देताना त्यांच्या मनाची होणारी तगमग, त्यांच्या जीवाची होणारी घालमेल, जीवन जगण्यासाठीचा त्यांचा चिवट जीवनसंघर्ष, संघर्ष करताना येणारं अपयश, गमावलेला आत्मविश्वास, आणि तरीही उठून उभा राहण्याचा प्रयत्न, काहींच्या वाट्याला आलेलं धडपडत जगणं, आणि जगण्यासाठीची धडपड तर काहींच्या वाट्याला आलेली पद-प्रतिष्ठा-सत्ता-संपत्ती, त्याबरोबरच खेड्यापाड्यापर्यंत पोचलेलं भ्रष्ट- वेडंवाकडं राजकारण, राजकारणात सरळ माणसाचे होणारे खच्चीकरण, खेड्यातील वाढती व्यसनाधीनता, जमीन-जुमल्यावरून होणारी भांडणं- मारामाऱ्या त्यातून होणारे खून, इतक्या साऱ्या प्रसंग-घटना-परिस्थितीचे वर्णन ‘आलोक’ या कथासंग्रहात येतं. यातील सर्व कथा मनाच्या आतपर्यंत उतरतात. काही कथा मनाला गदगदून हलवून सोडतात तर काही मनाला चटका लाऊन पापण्याच्या कडा ओलावुन जातात.

#ओझं’ ही मनाला चटका लावणारी अशीच एक कथा. या कथेत आपल्यापेक्षा सात-आठ वर्षानी मोठ्या पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावानं केलेला संवाद आहे. मोठा भाऊ लग्न झाल्यावर, आठव्या इयत्तेत असणारी एक पोर पदरात असताना, सततची नापिकी, वाढत्या कर्जाला कंटाळून व्यसनाच्या आहारी जातो. आर्थिक विवंचना, वाढते कर्ज आणि दुष्काळी परिस्थितीमुळे गावाकडील भाव कमालीचा खचून जातो आणि आत्महत्या करतो. 
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही मृत भावाची बायको जणू निवडुंगातून वाट काढण्यासाठी खंबीर उभी राहते. तिचं आयुष्य म्हणजे जत्रा पांगल्यासारखं, वैशाखातील उन्हांन आयुष्यभरासाठी पाल ठोकावं तसं. आता साऱ्या घराचा डोलारा तिच्यावर.
ज्या घरात कर्त्या माणसाची आत्महत्या होते त्या घरातील लोकांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते, विशेषतः गेलेल्या व्यक्तीच्या बायकोला नवऱ्याच्या पश्चात कच्चीबच्ची वाढवताना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागतात, सामन्य शेतकरी कुटुंबात कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते याची कल्पना या कथेतून येते.

#वळण’ ही मनाचा ठाव घेणारी अशीच दुसरी कथा! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या बापाची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली त्या शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना त्या वाटेवर कोणाचीतरी किंकाळी ऐकते, मागे वळून पाहते तर डोंगराच्या टेकडीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. पुढे प्रयगच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं.
या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावले पोट असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील एक कोडं सुटावं तर दुसऱ्या कोड्यात फसावं अशी अवस्था. संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करते.

#जीत ही कथा ग्रामपंचायत पोटनिवडणूक व त्यातील शह-काटशह यावर बेतलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य असणारा नवरा अचानकपणे अपघातात गेल्यानंतर त्याच्या बायकोला पोटनिवडणुकीचा अर्ज भरायला कसं मजबूर केलं जातं. ग्रामीण भागात भावकीचे राजकारण कसं चालतं. निवडणुकीत पैसा, दारूचा पूर कसा वाहतो याच जिवंत चित्र या कथेतून डोळ्यासमोर उभं राहतं. 

#खुंदळण' ही कथाही राजकारणावर बेतलेली आहे. दत्ताराव हा एक सामाजिक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ता सततच्या पराभवाला कंटाळून, लेकीच्या लग्नाला पैशाची चणचण असताना आमदाराने केलेल्या आर्थिक मदतीच्या ओझ्याखाली दबून पक्षांतर करतो. परंतु त्याचा पिंड या नव्या राजकीय संसारात रमणारा नाही. त्याच्या मनाची घालमेल, जुन्या साथीदारांचं टोचून बोलणं, नव्यानी त्याला उपरा मानणं. यात त्याची कमालीची घुसमट होते. राजकारणातील सामन्य कार्यकर्त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याचं वर्णन या कथेत आहे.

गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन #कुभांड’ या कथेतून होते.

जमीन जुमल्यावरून खून होऊनही हैद्राबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा म्हणून नोंद झालेल्या आणि आजोबाच्या पाठीमागे #चिरेबंदी’ वाड्यात एकटीच राहणाऱ्या आजीच्या शहरातून आलेल्या नातवाला त्या वाड्याबद्दल आत्मीयता न वाटण्याचे कारण चिरेबंदी या कथेत रेखाटलं आहे.

अशा सहा कथा संपल्यावर परिशिष्ट आहे. परिशिष्टात लेखकानी त्यांच्या लिहण्यामागची भूमिका, पत्रकारिता करताना त्यांना समाजात येणारे अनुभव, बदलत्या वास्तवाची झालेली जाणीव इत्यादी गोष्टींचा उवापोह केलेला आहे.

आसाराम लोमटे यांची लेखनशैली वर्तमानातील खऱ्याखुऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारी वाटली. शहरी व्यक्तीला या कथा किती जवळच्या वाटतील हे सांगता येत नाही. परंतु माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या व तिथल्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना हा कथासंग्रह म्हणजे आपल्या गावातीलच घटना आहेत असं वाटल्यास नवल ठरणार नाही.
या पुस्तकातील ‘नाहि रे ‘वर्गाच्या व्यथा सगळीकडे सारख्याच वाटतात. गावोगाव बदलेलं राजकारण, गरिबांचं होणारे शोषण, स्वार्थासाठी कुणाचेही नुकसान करणारी माणसं, वाढती व्यसनाधीनता, तरुण पिढीला आलेलं नैराश्य, वेळीअवेळी पडणारा पाऊस, सततचा दुष्काळ, भाऊबंदकीचे तंटे, उत्पन्न आणि खर्चाचा न बसणारा ताळमेळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड आणि असंख्य तडजोडी, परिस्थितीमुळे अर्ध्यावर सोडावं लागणारं शिक्षण, कसतरी शिकलं तरी नोकरीचा आ-वासून असलेला प्रश्न, एखाद्या उद्योग धंद्यासाठी उपलब्ध न होणारं भांडवलं, शेतकरी मुलांची न होणारी लग्ने, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली तरुण/तरुणी  या व अश्या कित्येक सामाजिक समस्यांनी उग्र रूप धारण करायला सुरुवात केलेली आहे. यातील बहुतेक समस्यांचे प्रतिबिंब लोमटे सरांच्या ‘आलोक’ मध्ये उमटले आहे असं मला वाटतं आणि ते संवेदनशील मनाला साद घालतं, जागं करतं. म्हणूनच प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीनी हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचावे असे माझं मत आहे.
@संदिप रामचंद्र चव्हाण.

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)
लेखक: आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन
किंमत: ₹२५०
पृष्ठ संख्या: १८२ संख्या: १८२

Monday 19 November 2018

दिन_दिन_दिवाळी

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाईचा चारा, बैल नवरा,
झंडू माळ्या, म्हशी काळ्या,
म्हशीच्या पोटी, हंब रेडं,
गाईच्या पोटी चिक्कार पाडं….


बारा-पंधरा पोरांचं टोळकं मोठ्या आवाजात दिवाळीचं गाणं (लोकगीत) गात एका घराच्या चौकटीतून पुढच्या घराच्या चौकटिकडं सरकत होतं. मी चौकात उभा राहून हे पाहिलं आणि एकदम चकित झालो. लगेचच त्यांच्या जवळ येऊन उभा राहिलो… पोरं सगळी वळकीचीच…. वयानं लहान असली तरी चांगली दोस्त असणारी. ह्या पोरांनी एखाद्या घरापुढे मोठ्या आवाजात सूर धरला की त्या घरात उपस्थित असणारी सर्व माणसं, पोरं-बाळं त्यांना पहायला चौकटीत येऊन उभी रहायची. त्या घरातील कोणीतरी अजून एक गाणं(लोकगीत) होऊन जाऊद्या म्हणले की पोरांना हुरूप यायचा… आणि लगेच फर्माईश पूर्ण व्हायची.

अकाकू मकाकू,
कुंच्या बैलाला घालू जु, घालू जु.
रतन बैल कुंनाचा, कुंनाचा,
पाटीव झेंडा फुलांचा, फुलांचा.
फुल गेले दिवसाळी, दिवसाळी,
दिवसाळीला आला राग, आला राग.
शाळेतल्या पोरांनी मारला वाघ, मारला वाघ.
गुरुजींच्या पोरांनी खाल्ला वाघ, खाल्ला वाघ.
(कष्टकऱ्यांच्या कष्टावर बुद्धीजीवी कायमच डल्ला मारतात.. ही अगतिकता वर्षानुवर्षे यातून व्यक्त होते आहे)

हे गीत झालं की , दिन दिन दिवाळी हे अजून दुसऱ्या प्रकारात म्हणायचीत…

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाई-म्हशी कुनाच्या,
लक्ष्मनाच्या.
लक्ष्मन कुनाचा, आई-बापाचा.
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी.!
(माईनं खोबऱ्याची वाटी खायला दिली तर वाघालाही घाबरणार नाही हा आत्मविश्वास यात दिसतो)

बायबापड्या ओवळायला आल्या की गीत म्हणणाऱ्या पोरांना आनंद व्हायचा मग ते गीतातून तेल मागायची…

आक आकल्याच, घोडं लाकडाचं,
मिशी मांजराची, दाडी उंदराची,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
फिरवीन चकार, मारिन डुकार,
सखुबाई,ठकुबाई सण-वार आला,
दिन दिन दिवाळी, पळी पळी तेल घाला.
(शेतीला त्रास देणाऱ्या रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन यात आहे)

पळी पळी तेल घाला म्हणून मोठा आवाज व्हायचा. घराघरातील आयाबहिणींनी तेलाची धार धरली की पोरं वामणाच्या शेंडीला हात घालायची…

वाकडी तिकडी बाभळ,
त्याव बसला व्हला,
मी दिला टोला,
टोला गेला गंगेत,
गंगेची माणसं,
लिंबऱ्याची कणसं,
तिळाची पेंढी,
उपटा वामण्याची शेंडी!!!

कृषिसंस्कृतीशी नातं सांगणारा दिवाळी सण हा सर्व सणात मोठा सण! पावसाळा संपला की दसऱ्याला नवीन पिकांची कापणी होते. घरात धान्यरूपी लक्ष्मी येते. गरजेपुरते ठेऊन शेतकरीराजा नव्या धान्याची विक्री करतो. आलेल्या पैशातून घरदुरुस्ती, जमल्यास रंगरंगोटी, नवीन कपडे, गोडधोड, घरातील लक्ष्मीला एखादा डाग, नवीन बैलजोडी खरेदी करणे इत्यादी गोष्टी शतकांपासून केल्या जात होत्या.
धान्यरूपी दौलतीची(लक्ष्मीपूजन) व ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्या गोधनाची (वसुबारस) पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याची पध्द्त म्हणून #दिवाळीची सुरवात झाली. लोकगीतात म्हणूनच ‘गाई- म्हशी ओवाळी’ हे कडवं आलं. कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या अन्याय अत्याचाला बळी पडलेल्या शेकडो स्त्रियांचे पुनर्वसन केले अशी पुराणकथा जनमानसात रुजली म्हणून नरकचतुर्दशी साजरी करण्याची पध्द्त पडली.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा त्याला वामनाने फसवून पाताळात गाडलं. त्याची आठवण म्हणून बलिप्रतिपदा साजरी होऊ लागली. आणि म्हणूनच वामणावरील राग त्याची शेंडी उपटून लोकगीतातून पिढ्यानपिढ्या काढला गेला.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! तिमिरातून तेजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा! अग्नीचा शोध लागल्यानंतर आदिमानवाचे आयुष्य पालटले. अग्नी हा मानवाच्या आयुष्यात महत्वाचा व त्याचे जीवन बदलवून टाकणारा शोध होता. सहाजिकच सर्वात मोठा व आनंदाचा दिवाळी सण अग्नीच्या साक्षीने दिव्यांच्या लखलखाटात साजरा झाला नसता तर नवल! तर असा हा आनंदाचा, प्रकाशाचा, उत्साहाचा दिवाळी सण कालांतराने बदलत गेला. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मार्केटिंग करून आपलं उत्पादन लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. शांत, प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात उत्साहाने साजरा होणारा दिव्यांचा सण कधी कर्णकर्कश आवाजाच्या फटाक्यांचा झाला आणि त्याच फटाक्यांच्या धुरात हरवून गेला हे कुणालाच समजलं नाही. समाज शिक्षित होऊ लागला, शहराकडे पळू लागला. खेडी ओस पडली आणि शहर बकाल होत गेली. मातीशी नाळ तुटली. जगण्यात कृत्रिमता आली. मल्टिनॅशनल कम्पन्यांनी बाजार भरविला. लोकांच्या डोक्यावर सतत जाहिरातींचा मारा करून आवश्यक अनावश्यक वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले. घरातील जिवंत माणसं कमी झाली आणि निर्जीव वस्तू वाढल्या. त्यालाच सुख मानण्याची सवय जडली. सुखाच्या शोधत समाधान हरवले. माणसं दुरावली. धान्य पूजनाच्या जागी पैशाची बंडलं आली. गाई-म्हशी जाऊन दोनचाकी/चारचाकी गाड्या ओवळण्याची पध्दत सुरू झाली. दिव्यांची जागा भगभगित लायटिंगने घेतली. गरिबांची गरीब दिवाळी (दिवाळ) तर श्रीमंतांची श्रीमंती दाखवणारी दिवाळी साजरी होऊ लागली. समाज एकोप्याने नांदण्यासाठी सणवार उपयोगी पडत होते. आज सणवार आले की समाज दुभंगतो की काय अशी परिस्थिती झाली आहे.
 या सर्व परिस्थितीत माझ्या गावच्या तरुणांनी माझ्या गावात पुन्हा ‘दिन दिन दिवाळीची’ हाळी दिली (पहिला दिवा ते पाचवा दिवा) आणि मला वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला. आमच्या गल्लीतील वयाने मोठ्या असणाऱ्या तरुणांच्या नेतृत्वाखाली आम्हीही दिवाळी घेऊन दारोदारी भटकायचो, किलो किलो गोडेतेल जमवून दुकानात विकायचो.…. त्या पैशाचा खाऊ घ्यायचो. गावात असे पाच/दहा ग्रुप (टोळ्या😊) असायचे प्रत्येकाचा #इलाका ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हा सांस्कृतिक वारसा बंद पडला. महाराष्ट्रातील कित्येक पिढय़ा या लोकगीतांनी दिवाळी साजरी करत होत्या. आता हा भूतकाळ झाला कारण अशी दिवाळी घेऊन घरोघरी तेल मागणारी पोरंठोरं  कुठंही दिसत नाहीत. बरीचशी लोकगीतं विस्मृतीत गेली आहेत. काही खेड्यापाड्यात अजूनही या वारशाची जपणूक केली जाते. परंतु वाढते शहरीकरण व शहराला लागून असणारे खेडेगावं (ना धड शहर ना धड खेडं) तिथे मात्र संस्कृतीच्या अनेक खुणा धुसूर झाल्या आहेत.
माझ्या गावातील तरुणांनी पुन्हा हा वारसा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाला त्यांचे विशेष कौतुक वाटते.

घरोघरी फिरणारी ही ‘दिवाळी’ करंजीच्या झाडाच्या फाट्याची(लगोरी सारखी) फांदी, बाभळीच्या काटेरी छोट्या फांद्या, झेंडू व जास्वंदीची फुले, नागाच्या आकाराच्या फण्या, एक दिवा इत्यादी सामुग्री वापरून तयार केली जाते. ( गावोगाव यात फरक असू शकतो)

ही दिवाळी पुन्हा सुरू करणारे माझे मित्र सागर चव्हाण, विशाल चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सोमनाथ चव्हाण (सोमा), सिद्धनाथ चव्हाण, सागर तुपे, अमोल, संदिप(दादाराम), सारंग, जयंत, सार्थक, आर्यन, आदित्य, सुयश, शुभम बुधे, सुहास, बापूराव, अनिकेत, विशाल, दीपक, निखिल, चैतन्य, अजित यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
राजेंद्र चव्हाण(भावड्या), उत्तम चव्हाण (बापू), हणमंत चव्हाण(आण्णा), प्रदीप साळवे (तात्या), पृथ्वीराज चव्हाण(काका), सोमनाथ बुधे यांनी दिवाळी बांधून देण्यात व गीतं मिळवून चाल लाऊन देण्यात विशेष सहकार्य केले.

हा वारसा असाच वृद्धिंगत होवो या सदिच्छा देऊन सर्वांचं अभिनंदन करतो.
@संदिप रामचंद्र चव्हाण

Saturday 22 September 2018

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे ब्रीदवाक्य आणि “वटवृक्षाचे” बोधचिन्ह घेऊन सामान्य रयतेच्या घराघरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारे ‘रयत शिक्षण संस्थेचे ' संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज १३१ वा जन्मदिन.

 महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी सुरवातीला मुलांसाठी वसतिगृहे स्थापली. शिक्षणासाठी मोठ्या गावात येणाऱ्या दिनदुबळ्या, गरीब, वंचीत घटकातील मुलांसाठी ‘कमवा व शिका’ हा नवा मूलमंत्र देऊन स्वाभिमान, स्वावलंबन शिकवले. ज्या काळात टोकाची जातीव्यवस्था, कर्मठता होती त्याकाळात सर्व जाती-धर्मातील मुलांना एकच वसतिगृह स्थापन करण्याच्या त्यांचा निर्णय मोठा धाडसाचा होता. ‘‘भाऊराव‚ मला साबरमती आश्रमात जे करता आले नाही‚ ते तुम्ही सातारसारख्या एका छोट्या गावी करून दाखविले; याबाबत मी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.’’(हिंदीमध्ये) असे गौरवोद्गार महात्मा गांधींनी सातारच्या ‘छ.शाहू बोर्डिंग हाउस’बद्दल काढले होते.

१११९ मध्ये काले (ता. कराड, जि. सातारा) येथे सत्यशोधक समाजाची परिषद होती. त्यावेळी भाऊरावांनी आवाहन केले की, ‘‘आपल्या समाजाचे विचार आपण भाषणे व जलसे यांद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत परंतु, आपल्या विचारांप्रमाणे जनता सुधारत असल्याचे आढळून येत नाही. शिक्षण प्रसाराशिवाय याला परिणामकारक तोडगा मला तरी दिसत नाही. म्हणून बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण देण्याकरिता एक शिक्षणसंस्था स्थापन करणे आवश्यक आहे.’’ ही सूचना सर्वांना पसंत पडली आणि त्याप्रमाणे ठरावही झाला व ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना झाली.

वसतिगृहातील मुलांसाठी कर्मवीर अण्णांनी मूठ मूठ धान्य गोळा केले. अण्णांच्या गैरहजेरीत पत्नी लक्ष्मीबाईंनी स्वतःचे  सर्व दागिने वेळोवेळी मोडून शेवटी सौभाग्याचे लेणे मंगळसूत्रही मोडून मुलांच्या जेवणाची सोय केली.
किर्लोस्कर नांगराचे सेल्स एजंट म्हणून नोकरी करणारे आणि त्या नोकरीला साजेसा पोषाख करणारे आण्णा, नोकरी सोडून रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी फकिरासारखे आयुष्य जगले. गोरगरीब मुलांसाठी देणग्या गोळा करायला अखंडपणे अनवाणी पायाने फिरले. शरीराने धिप्पाड, पैलवान असणारे आण्णा अतिशय सत्यप्रिय स्वभावाचे होते. कोल्हापुरात इंग्रजांच्या राजा- राणीच्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासले त्या ‘डांबर प्रकरणात’ खोटा गुन्हा दाखल झाल्यावर इंग्रज पोलिसांनी त्यांना असंख्य यातना दिल्या. आण्णा बाबाजी लठ्ठेंच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी इंग्रजांनी त्यांना खूप त्रास दिला. मात्र आण्णानी खोटी साक्ष दिली नाही. हे लठ्ठे म्हणजे ज्यांनी अण्णांना जैन वस्तीगृहातून हाकलून लावले होते ते, परंतु अण्णांनी त्याच्याबद्दल मनात कसलीही अढी ठेवली नाही.
राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधकार ठाकरें या दोघांशीही अण्णांचा चांगला स्नेह होता. त्यांनी सातारच्या वस्तीगृहालाही शाहूमहाराजांचे नाव दिले.
सातारच्या वसतिगृह भेटीच्यावेळी महात्मा गांधीनी कर्मवीर अण्णांना जिज्ञासेपोटी विचारले‚ ‘‘भाऊरावजी‚ आपने इस बोर्डिंग को राजर्षी शाहू महाराज का नाम दिया है। उन्होने आपको कितने पैसे दिये है?’’ भाऊरावांनी उत्स्फूर्त उत्तर दिले‚ ‘‘उनसे मैंने कुछ भी पैसा नहीं लाया‚ लेकिन मैं उनसे बडा दिल लाया हूँ ।’’ आज या मोठ्या मनाच्या, मोठ्या दिलाच्या दिलदार महामानवाची जयंती आहे.

सध्या शिक्षण सम्राटांनी शिक्षण संस्थांना पैसे छपाईचे कारखाने बनवले आहेत; उच्च शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे; सरकारी शाळांची अवस्था तोळा-मास झालेली आहे; अश्यावेळी स्वतः मॅट्रिक नापास असूनही असंख्य तरुणांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या; बहुजनांच्या शिक्षणासाठी अखंडपणे झटणाऱ्या; प्रचलित शिक्षणपद्धतीत ‘कमवा व शिका’ या अनोख्या आणि क्रांतिकारक पध्दतीची सुरवात करणाऱ्या कर्मवीर आण्णांनसारख्या शिक्षणमहर्षीची समाजाला खूप गरज आहे.

कर्मवीर अण्णांना विनम्र अभिवादन!!

संकलन: @संदिप रामचंद्र चव्हाण.
(लेख लिहताना गुगलवर उपलब्ध माहितीचा आधार घेतला आहे; शिवाय काही पुस्तकांमधील माहितीचा उपयोग केला आहे)

Monday 3 September 2018

पूर्णपुरुष कृष्ण

पूर्णपुरुष कृष्ण
काल कृष्णजन्माष्टमी झाली आणि आज गोपाळकाला सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे #कृष्ण! कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा शब्द म्हणजे कृष्ण!
◆कृष्ण शब्दाचा मूळ संस्कृत कृष् धातूशी संबंध आहे. कृष् म्हणजे खेचणे‚ ओढणे. कृष् वरूनच कृषी म्हणजे शेती हा शब्द बनला आहे. शेतकरी शेत नांगरतो‚ नांगर ओढतो‚ ही कार्ये ह्यात अभिप्रेत आहेत. येथे खेचणे म्हणजे जो सगळ्या घटना ओढून घेतो‚ सगळी सारतत्त्वे ग्रहण करतो आणि नंतर ती वहन करून नेतो तो कृष्ण‚ असा एक अर्थ होतो. कृष्ण शब्दाचा संबंध ‘कर्षण’शी जोडता येईल. कर्षण म्हणजे आकर्षणचे मूळ रूप. जो आकर्षक आहे व तो कृष्ण!!◆

आजच्या घडीला कृष्ण आणि त्याचे चरित्र  किती लाभकारक ठरेल हा प्रश्नच आहे. शिवाय कृष्ण होता की नव्हता याबद्दलही मतमतांतरे आहेत. महापुरुषांच्या जयंती/पुण्यतिथी साजऱ्या करण्यात धन्यता मानून त्याच्या विचारांना कायमच फाटा देणार्यांनी कृष्णाच्या जयंतीचाही इव्हेंट केला आहे. असे असले तरीही चांगल्या गोष्टींचा, विचारांचा फायदा कोणत्याही व्यक्तीला आणि समाजाला कायमच होत असतो. महामानवांच्या चरित्रातील प्रेरणादायी गोष्टी पाहून, ऐकून समाजाला नवप्रेरणा मिळू शकते. किमान या हेतून तरी अशी चरित्र पहावयास हवीत.

 कृष्णाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतला देवकीच्या पोटी! मोठा झाला यशोदेच्या मातृछायेत, तिच्याच अंगणी खेळला, हट्ट केला, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या अगदी यशोदेचा मारही खाल्ला. लहानपणापासून तो संकटात वाढला. मृत्यूची छाया त्याच्या जन्मापासून त्याचा पाठलाग करत होती. परंतु प्रत्येकवेळी तो संकटांना पुरून उरला..! सामान्य बालकप्रमाणे बाललीला करत हसतमुखाने लहानाचा मोठा झाला.


कृष्ण श्रीमंत घरात जन्मला. परंतु तो रमला गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये. त्याच्याबरोबर खेळला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा कृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. या आपल्या कृतीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश तो देत होता. कृष्णाने कधीही गरीब श्रीमंत, उच्च- नीच असा भेदभाव केला नाही. त्याला पांडव जितके प्रिय होते तेवढेच त्याचे सुदाम्यावरही प्रेम होते. समाजातील सर्व घटकांशी तो एकरूप होऊन वागला.
गोकुळात उत्पादित होणारे दूध, लोणी, तूप इत्यादी मथुरेतील लोकांना विकले जायचे. त्यावर कंसाची प्रजा, सैनिक पुष्ट व्हायचे. आणि गोकुलवासीयांनाच त्रास द्यायचे. गोकुळात निर्माण होणाऱ्या दूध,दही,ताक,लोणी यावर पहिला हक्क गोकुळातील बालगोपालांचा आणि उरले तर इतरांचा. गोकुळातील भावी पिढीच्या आरोग्यासाठी हितकारक असणारा हा विषय कृष्णाने गोकुलवासीयांना पटवून दिला. वेळप्रसंगी त्याने लोण्याची चोरी करून आपल्या सवंगड्यांना खायला दिले.
आज या घटनेकडे पाहताना आपल्या लक्षात येईल, शेतकरी काबाडकष्ट करून दूध उत्पादन करतो. आपल्या लहानग्यांच्या आणि स्वतःच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी खातो. पोटाला चिमटा घेऊन, पैशासाठी उत्पादित दूध कवडीमोल दराने डेअरीला, शहरातील नवश्रीमंताना इमाने- इतबारे पोचवतो. आर्थिक विवंचना असल्याने त्याच्यापुढेही पर्याय नसतो. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या गोकुळात कृष्णासारखा नेता होईल का नाही माहीत नाही. परंतु मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या नेत्यांची गर्दी पाहिलीे की कृष्णासारख्या नेतृत्वाची आठवण होते.

बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हा गुण कृष्णात होता. गोकुलवासीयांना त्रास देणाऱ्या कालियासर्पाला त्याने यमुनेतून पिटाळून लावले. कर्मकांडापेक्षा कर्माचा पुरस्कार त्याने केला. अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम त्याने केले.  इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वत हाच गोकुळाचा रक्षणकर्ता आहे हे गोकुलवासीयांना पटवून दिले. दुर्लक्षित असणारी गुरख्यांची #बासरी हातात घेऊन प्राणपणाने त्याने फुंकली. तिच्यातून उमटलेल्या स्वरांनी बसरीला संगीतक्षेत्रात अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळवून दिली. साध्या आणि दुर्लक्षित गोष्टीही किती मोठ्या असतात किंवा होऊ शकतात याचाच संदेश जणू त्याने दिला.

गोपिकांशी आणि राधेशी त्याच नातं हे वासणारहीत प्रेमाचे प्रतीक होते. आज या गोष्टीचा वेगळ्या पध्द्तीने विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, राधेला/ गोपिकांना कृष्ण मिळाला नाही किंवा कृष्णाला राधा मिळाली नाही म्हणून त्यातील कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. किंवा स्वतःला इजा करून घेण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचली नाही. कारण त्याचं प्रेम हे त्यागाच्या भक्कम पायावर उभे होते. ते अपेक्षारहित, वासणारहीत, निर्व्याज प्रेम होते. आज टिनएजर्स, कॉलेज तरुण- तरुणी यांची प्रेम(?)प्रकरणे पाहिली की आठवण होते ती #राधाकृष्णाची!

कृष्णाने नेहमीच सामान्यांच्या हिताचे रक्षण केले. धोका पत्करून नेतृत्व स्वीकारले. वेळप्रसंगी आप्तांनाही शिक्षा केली. कंस हा मामा असूनही कृष्णाने त्याचा वध केला. शिशुपाल हा आत्तेभाऊ होता, शंभर अपराध भरल्यावर एकशे एकावा अपराध करण्याची संधीच त्याने शिशुपलास दिली नाही. कृष्णाने ज्या विचारांचा, तत्त्वांचा आयुष्यभर पुरस्कार केला त्यानुसारच तो वागला. उच्चार आणि आचार यांत त्याने फरक केला नाही. गोकुळात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करून कंसवधानतर तो मथुरेत स्थिरावला. गोकुळ सोडल्यानंतर पुन्हा कधीही तो परतून गोकुळाकडे फिरकला नाही. मथुरेत उग्रसेनाने दिलेले राजेपद त्याने नाकारले. आणि तरीही तो यादवांचा नेता राहिला. सत्ता मिळवण्याची, तिचे रक्षण करण्याची पात्रता असूनही सत्तेचा लोभ त्याला नव्हता. खुर्चीची आसक्ती त्याला नव्हती. निर्लोभी आयुष्य कसं जगावं हे कृष्णाने आपल्याला शिकवले आहे. दुर्दैवाने त्याच्याच नावावर आज दहीहंडीचा बाजार भरवून सत्तेची खुर्ची जवळ करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

जरासंध हा कंसाचा सासरा होता. कंसवधानंतर त्याने मथुरेवर अनेक आक्रमणे केली. यादवांनी प्रत्येकवेळी त्याला शौर्याने प्रतिकार केला. जरासंधाबरोबर वारंवार होणारे युद्ध व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृष्णाने संपूर्ण मथुराच दूर द्वारकेत वसवली. यामुळे त्याला कोणी रणछोडदासही म्हणाले परंतु त्याची तमा त्याने बाळगली नाही. कृष्णाची मथुरेतून माघार ही त्या काळानुसार खूप मोठी व महत्वाची घटना आहे. या कृतीमुळे यादवांना सुरक्षितता, स्वास्थ मिळाले, त्यांची भरभराट झाली. परंतु हे रणांगणातून पळ काढण्यासारखे होते. काहींची नाराजी पत्करून कृष्णाने ही कृती केली.
●‘वर्तुणुकीचे कोरडे नियम पाळणारे आणि त्यांना चिटकून राहणारे नष्ट होतात.’ तर ‘काही वेळेस नुसते जिवंत राहणे, अस्तित्व टिकवून ठेवणे हेच एक मूल्य ठरते. कारण अस्तित्व आणि फक्त अस्तित्वच मूल्याधिष्ठित- मूल्यात्मक जगाची निर्मिती करण्याची शक्यता निर्माण करते.’● हे तत्व त्याने या (माघार घेण्याच्या) कृतीतून पटवून दिले.

द्वारकेमध्ये आल्यावर रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती यांच्याबरोबरचा विवाह, स्यमंतक मण्याच्या चोरीचे प्रकरण, स्यमंतक मण्यावर हक्क असूनही तो अक्रूराच्या हवाली करणे, कृष्ण पांडव भेट, जरासंधाचा भिमाकरवी केलेला वध, पंढवांच्या वनवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, पांढवांचा वनवास संपल्यावर कौरव-पंढवांच्या समेटासाठी- शांतीसाठी केलेला प्रयत्न या महत्वाच्या घटना आहेत.

नरकासुरवध आणि नरकासुराचा कैदेत असणाऱ्या, त्याच्या अत्याचारास बळी पडलेल्या आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या हजारो स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकारून केलेले त्यांचे #पुर्नवसन ही खूप मोठी आणि क्रांतिकारक घटना आहे.

महाभारत युद्धात अर्जुनाचा सारथी होणे. ही घटनाही खूप मोठी व महत्वपूर्ण आहे. त्या काळात सारथी हे काम तुलनेने कमीपणाचे होते. परंतु कृष्ण कोणतेही काम कमीपणाचे मानत नव्हता. त्याने सारथी होऊन कृतीतून ते पटवून दिले. त्याने अर्जुनाचे सारथ्य केले. एक प्रकारे मार्गदर्शन केले. युद्धातून प्रारंभीच माघार घ्यायला निघालेल्या अर्जुनास ‘गीता’रूपी तत्वज्ञान सांगितले. त्याला त्याचे कर्म आणि क्षत्रियाचा धर्म सांगितला. अपराजित योद्धा असूनही हाती शस्त्र न घेता सुयोग्य योजना बनवून पांडवांना विजय मिळवून दिला.

यशाच्या, समृद्धीच्या शिखरावर असणाऱ्या यादवांना सत्तेचा, संपत्तीचा, शक्तीचा अहंकार झाला. यादव उन्मत्त झाले. मद्यपानाच्या आहारी गेले. मद्यपी यादवांना नाशापासून वाचविण्याचा, मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. त्याने द्वारकेत दारूबंदीही केली. परंतु यादवांनी मर्यादा ओलांडली, भावबंदकी उफाळून आली आणि त्यांचा नाश झाला. मदमस्त झालेल्या आप्तांनाही कृष्णाने वाचवले नाही किंवा यादव आपापसात भांडत असताना त्यांच्याकडे त्याने संपूर्ण दुर्लक्ष केले. तो प्रत्येक गोष्टीत भरून पावला आणि तेवढाच अलिप्तही राहिला.

कृष्णाचा स्वत:चा शेवट दु:खदायक आहे. त्याच्या आयुष्यात झालेल्या अनेक युद्धात कोणत्याही शस्त्रा-अस्त्राचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. साधा ओरखडाही उठला नाही. परंतु ‘जरा’ नावाच्या व्याध्याच्या साध्या क्षुल्लक बाणाने कृष्णाचा मृत्यू झाला! त्यातून काळाने मानवजातीला धडा दिला आहे... माणूस कितीही महान, देवतुल्य, असू दे, #मृत्यु हे अंतिम सत्य आहे. आणि कृष्णही त्याला अपवाद नाही.

कृष्णाबद्दल लिहण्याइतकी माझी पात्रता कदाचित नसेलही. परंतु लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी, अलीकडे त्याच्याबद्दल वाचलेली पुस्तके यातून कृष्ण या व्यक्तिमत्वाबद्दल काय वाटतं हे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
लोणी खाणारा बाळकृष्ण, बालगोपालांचा सवंगडी, बासरी वाजवणारा वादक, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आद्यसमाजसुधारक, अन्यायाला वाचा फोडणारा बंडखोर, वासनारहीत प्रेमाची परिभाषा शिकवणारा प्रेमी, मैत्रीला जागणारा/जपणारा मित्र, जबाबदारीची जाणीव असणारा पती, प्रेमळ पिता, चक्र-गदा-पाचजन्य हाती घेतलेला योध्दा, पांडवांचा समेटाचा प्रस्ताव कौरवसभेला प्रभावीपणे पटवून देणारा वक्ता, गोंधळलेल्या अर्जुनाला गीता सांगणारा तत्वज्ञ, सर्व शत्रूंना साम-दाम-दंड-भेद या नीतीने पराभूत करणारा राजकारणपटू असे असंख्य गुण कृष्णात होते म्हणूनच त्याला #पूर्णपरुष म्हणतात.
आणि म्हणूनच म्हणतात… झाले_बहु_होतील_बहु_परी_या_सम_हा!!!!

आजच्या घडीला कृष्ण नसला तरी कृष्णाचे बालपण प्रत्येकाच्या घराघरात रांगत असते. घरोघरी प्रत्येकाचा एक बाळकृष्ण(मुलगा/मुलगी या अर्थाने) असतो. आणि तसं पाहिलं तर लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये खोडकर,निरागस, हट्टी, बंडखोर, हवाहवासा, एक #बालळकृष्ण असतोच! परंतु मोठेपणाचे (वय,पद,प्रतिष्ठा) जोखड घेऊन वावरणारे आपण सर्वजण आपल्यातल्या बाळकृष्णाला स्वतःच कारागृहात डांबून ठेवतो…! आणि साऱ्या विश्वाचा भार डोक्यावर घेतल्यासारखे मख्ख चेहऱ्याने आयुष्य जगत असतो. ‘पूर्णपुरुष’ होता नाही आलं तरी किमान गरज आहे आपल्यातल्या बाळकृष्णाला जपण्याची….!! आणि तीच पहिली पायरी असेल कृष्णत्वाच्या प्रवासाची….!!
@संदिप रामचंद्र चव्हाण.

संदर्भ: ◆महाभारतातील पितृवंदाना
          ● या सम हा
           युगधंर
            व्यासपर्व

Wednesday 22 August 2018

मला आवडलेली पुस्तके

मला आवडलेल्या पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे. यातील काही पुस्तके मी पूर्ण वाचलेली आहेत तर काहींची प्रस्तावना वाचली आहे. शिवाय काही पुस्तकाबद्दल वेगवेगळ्या दैनिकात आलेले पुस्तक परिचय वाचून अशी पुस्तके ग्रंथालयात चाळली आहेत.
माझ्या काही मित्रांनी मला चांगल्या पुस्तकाबाबद्दल विचारले होते.. त्यांच्यासाठी व इतर पुस्तकप्रेमींसाठी सदर यादी मी ब्लॉगवर देतो आहे.
व्यक्ती तेवढ्या प्रकृती असल्याने मला आवडलेली पुस्तकं तुम्हालाही आवडतील असं नाही. माझं स्वतःच वाचन जसे वाढत जाईल तसे वेळोवेळी या यादीत सुधारणा करत जाईन.
आपला मित्र.. संदिप चव्हाण.

★प्राचार्य शिवाजीराव भोसले
◆दीपस्तंभ (भारतातील थोर व्यक्तींची व्यक्तिचित्रण)
◆जागर खंड 1 व 2 (जीवन विषयी चिंतनपर लेख)- प्राचार्य शिवाजीराव भोसले
◆जीवनवेध- (जीवन विषयी चिंतनपर लेख)
◆देशोदेशीचे दार्शनिक (जगातील काही महत्वाच्या व्यक्तींचे व्यक्तिचित्रण)
(प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची इतरही पुस्तके वाचनीय आहेत)

★अच्युत गोडबोले. यांची पुस्तके
● मुसाफिर (आत्मचरित्र)
●किमयागार (जगातील विविधक्षेत्रातील शास्त्रज्ञ माहिती)
●अर्थात (अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत अन् चरित्रं यांची रंजक सफर)
●मनात (मानसशास्त्र, मानसशास्त्रज्ञ, याबद्दल माहितीपूर्ण पुस्तक)
●गणिती (गणिताचा इतिहास व गणितातील शास्त्रज्ञ)
(अच्युत गोडबोले यांची इतर सर्व पुस्तके वाचणीय आहेत)

●जोनाथन लिविंग्स्टन सीगल - लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवाद: बाबा भांड (मूळ इंग्रजी मुलांसाठी छान)
【ही एक दंतकथा आहे. आपल्या दररोजच्या जगण्यातच आपलं इप्सित शोधण्याचा मार्ग दाखवणारी गोष्ट. समुद्रपक्ष्यांचा कळप, त्यांचं उडणं, थव्यांचे रीतिरिवाज आणि कायदेकानुन इथं रूपक म्हणून आले आहेत.
जर आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला, तर त्या क्षेत्रातल्या अत्युच्च शिखरावर पोहचता येतं, हे जोनाथनच्या गोष्टीचं सार आहे.】

◆झोंबी (आत्मचरित्र)- आनंद यादव
【यानंतरचे तीन भाग आहेत नांगरणी, घरभिंती, काचवेल】

●छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य- नरहर कुरुंदकर
(छोटे पुस्तक परंतु खूप छान आहे  किंमत 60 रु /पृष्ठे 60)

◆ बाळकांड( आत्मचरित्र)- ह मो मराठे
◆ पोहरा (आत्मचरित्र बाळकांडच्या पुढील भाग आहे)- ह मो मराठे
(दोन्ही पुस्तके अजबने प्रत्येकी 60 रु मध्ये उपलब्ध करून दिली आहेत )

★पू ल देशपांडे
●बटाट्याची चाळ (विनोदी)
●व्यक्ती आणि वल्ली (व्यक्तिचित्रण)
● एका कोळियाने

★अरुण शेवते यांची पुस्तके
◆नापास मुलांची गोष्ट-
◆ नापास मुलांचे प्रगतीपुस्तक
◆ हाती ज्यांच्या शुन्य होते
(तिन्हीही पुस्तके थोर/मोठ्या लोकांच्या शाळेतील अपयशाबद्दल व पुढे त्यांनी घेतलेली मोठी झेप यावर आहेत)

●पृथ्वीवर माणूस उपराच (वैज्ञानिक) - डॉ सुरेशचंद्र नाडकर्णी
●ब्रेन प्रोग्रामिंग-(वैद्यकीय, वैज्ञानिक) - डॉ रमा मराठे

◆टू सर विथ लव्ह - ई आर ब्रेथवेट (मूळ पुस्तक इंग्रजी आहे) मराठी अनुवाद- लीना सोहानी
(अमेरिकेतील निग्रो सैनिक जो पुढे शिक्षक होतो त्याचे आत्मचरित्र)

●हसरे दुःख..भा. द.खेर
(महान विनोदवीर "चार्ली चॅप्लिन" याच्या खडतर आयुष्याचा प्रवास)

★विश्वास पाटील यांच्या कादंबरी
●झाडाझडती - (धरणग्रस्त लोकांच्या जीवनाची झालेली फरफट)
●पानिपत -(पानिपतच्या युद्धावर आधारित कादंबरी)
●महानायक - (सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी)
●संभाजी - (छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी )
◆श्रीमान योगी- रणजित देसाई
( शिवाजीमहाराज चरित्रमय कादंबरी)

●युगंधर - शिवाजी सावंत
(कृष्ण/महाभारत - कादंबरी)
●मृत्युंजय- शिवाजी सावंत
(कर्ण/ महाभारत- कादंबरी)
●व्यासपर्व- दुर्गा भागवत
(महाभारतातील मुख्य व्यक्तिरेखा चित्रण)
●युगांत -दुर्गा भागवत
(महाभारत विषयावर आधारित पुस्तक)


◆अमरगित- निशा मिरचंदानी
(बाबा आमटे चरित्र)
◆ प्रकाशवाटा- डॉ प्रकाश आमटे
(प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र)
◆समिधा (साधनाताई आमटे यांच्या जीवनातील कही संस्मरणे) -साधनाताई आमटे
◆ मेळघाटातील मोहर
डॉ स्मिता कोल्हे व डॉ रवींद्र कोल्हे यांचे चरित्र- मृनालीनी चितळे

●एका दिशेचा शोध- संदिप वासलेकर
(जागतिक घडामोडी व भारताच्या दृष्टीने त्याचे महत्व इत्यादी विषयी लेख असणारे पुस्तक)

◆रिच डॅड पुअर डॅड
(पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गीय शिकवत नाहीत)
--रॉबर्ट टी. कियोसाकी(मूळ इंग्रजी लेखक)
मराठी अनुवाद : अभिजित थिटे
◆कॅशफ्लो कोड्रंट
(आर्थिक समृद्धीसाठी ‘श्रीमंत वडिलांचा’ सल्ला)
--- रॉबर्ट टी. कियोसाकी (मूळ इंग्रजी लेखक)
मराठी अनुवाद : श्याम भुर्के

◆शेअर बाजार जुगार? छे, बुद्धीचा डाव.
-- रविंद्र देसाई.
【शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढील दोन इंग्रजी पुस्तके खूप मार्गदर्शक आहेत त्याचे मराठी भाषांतर उपलब्ध नाही…
◆The Intelligent Investor --Benjamin Graham
◆The Little Book of Value Investing-- Christopher H. Browne.】

●अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष
लेखक : वि. ग. कानिटकर
●व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ
वि. ग. कानिटकर
(औरंगजेबाच्या मोगली सत्तेशी, शिवाजी महाराजांनी शौर्याने व गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने जो यशस्वी लढा दिला, त्या गनिमी युद्धतंत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक काळातील आविष्कार म्हणजे व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा होय. गनिमी काव्याने, हो-चि-मिन्ह जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ धीरोदात्तपणे स्वातंत्र्यासाठी लढत होता. या संघर्षात, तो साम्राज्यवादी शक्तींनी आठ-दहा वेळा त्याच्यावर लादलेल्या देहदंडाच्या शिक्षेतून सुखरूप निसटला.)

◆ वॉरन बफे (चरित्र- पैशांवर जिवापाड प्रेम करूनसुद्धा पैशांची आसक्ती अजिबात न बाळगणारा जगावेगळा माणूस)
--- अतुल कहाते
◆नेल्सन मंडेला (वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष ) -- अतुल कहाते
◆ फिडेल कॅस्ट्रो (चरित्र:- अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतिकारी) --- अतुल कहाते

◆क्रांती नंतरचा क्युबा - माधव गडकरी
(फिडेल कॅस्ट्रो आणि चे गुव्हेरा हे क्युबात  क्रांती झाल्यानंतर साऱ्या जगभर प्रसिद्ध पावले.  परंतु अशा क्रांती नंतर त्या देशाची वाटचाल कशी झाली हे फारसं  कोणी पाहत नाही. कारण क्रांती नंतर होणाऱ्या सुधारणा या क्रांती काळातल्या लढायांसारख्या रोमहर्षक नसतात . परंतु देशाची खरी घडण  ही क्रांतीनंतरच होत असते)

● मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा / मार्गदर्शनपर
‘How to Win Friends & Influence People’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
मूळ लेखक: डेल कार्नेगी
अनुवाद अ‍ॅड. शुभदा विद्वांस
●चिंता सोडा सुखाने जगा / मार्गदर्शनपर
‘How to Stop Worrying and Start Living’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
मूळ लेखक: डेल कार्नेजी
अनुवाद अ‍ॅड. शुभदा विद्वांस
【Most Popular Books
How to Win Friends and Influence People
How to Stop Worrying and Start Living
The Leader in You
The Quick and Easy Way to Effective Speaking
Dale Carnegie's Lifetime Plan for Success: How to Win Friends and Influence People & How to Stop Worrying and Start Living】

◆चीपर बाय दी डझन
मूळ लेखक: फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.), अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे
अनुवाद: सुमेधा फडणीस

●स्टीव्ह जॉब्झ (अधिकृत चरित्र)
वॉल्टर आयझॅक्सन
अनुवाद : विलास साळुंके

★धनंजय किर यांची पुस्तके:-
◆महात्मा जोतीराव फुले (आमच्या समाजक्रांतीचे जनक)
◆लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : एक मूल्यमापन
◆राजर्षी शाहू छत्रपती: एक समाजक्रांतिकारक राजा (चरित्र)
◆स्वातंत्र्यवीर सावरकर (चरित्र)
◆डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
◆कृतज्ञ मी कृतार्थ मी (आत्मचरित्र)
इंग्रजी
◆Veer Savarkar
◆Dr. Ambedkar : Life and Mission
◆ Lokamanya Tilak : Father of the Indian Freedom Struggle
◆ Mahatma Jotirao Phooley : Father of Indian Social Revolution
◆Mahatma Gandhi : Political Saint & Unarmed Prophet
◆Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary 】

★ द.म. मिरासदार यांची विनोदी पुस्तके
नाव     
●अंगतपंगत (कथा संग्रह)
●खडे आणि ओरखडे (कथा संग्रह)
●गप्पांगण(कथा संग्रह)
●गप्पा गोष्टी(कथा संग्रह)
●गंमतगोष्टी (कथा संग्रह)   
●गुदगुल्या(कथा संग्रह)
●गोष्टीच गोष्टी (कथा संग्रह)
●चकाट्या(कथा संग्रह)
●जावईबापूंच्या गोष्टी (कथा संग्रह)
●नावेतील तीन प्रवासी (भाषांतरित कादंबरी)   
●फुकट(कथा संग्रह)   
●बेंडबाजा(कथा संग्रह)       
●भुताचा जन्म (विनोदी कथा संग्रह)   
●भोकरवाडीच्या (गोष्टी कथा संग्रह)   
●भोकरवाडीतील रसवंतीगृह    (कथा संग्रह)   
●माकडमेवा (लेख संग्रह)   
●माझ्या बापाची पेंड (विनोदी कथा संग्रह)   
●मिरासदारी (कथासंग्रह)   
●विरंगुळा           
●हसणावळ (कथा संग्रह)   
●हुबेहूब    (विनोदी कथा संग्रह)

★डॉ. जयसिंगराव पवार यांची ऐतिहासिक विषयावरील पुस्तके
◆शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?/ संशोधनात्मक  
◆ छत्रपती संभाजी : एक चिकित्सा/ संशोधनात्मक
◆मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध/ संशोधनात्मक

● गावगाडा - त्र्यंबक नारायण अत्रे
(शतकापूर्वीचे ग्रामीण जीवन, बलुतेदार पध्दती, त्यावेळची ग्रामरचना)
● गावगाडा शतकांतरचा- डॉ. अनिल पाटील
(बदलेली खेडी व एकूणच व्यवस्था याविषयी)

◆माणदेशी माणसं (व्यक्तिचित्रण)
व्यंकटेश माडगूळकर
◆बनगरवाडी (मानदेशातील छोट्या धनगरवाडीचं चित्रण)
व्यंकटेश माडगूळकर

●शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (लेख व दस्तऐवज) संपादक : दत्ता देसाई
मूळ दस्तऐवजांचा स्रोत : प्रा. चमनलाल

● रिचर्ड फाईनमन : एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व / व्यक्तिचित्र सुधा रिसबुड‚

●हू मूव्हड् माय चीज?
आयुष्यातील आणि व्यवसायातील बदलांना सामोरं जाण्याचा मार्ग
मूळ इंग्रजी लेखक:- स्पेन्सर जॉन्सन, एम.डी.
अनुवाद : मोहन मदगुलकर

Wednesday 27 June 2018

बनगरवाडी... व्यंकटेश माडगूळकर.

बनगरवाडी
लेखक: व्यंकटेश माडगूळकर,
प्रकाशन: मौज प्रकाशन,
किंमत: रु १००
पृष्ठे: १३०

बनगरवाडी माणदेशातल्या 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली आणि लेखक व्यंकटेश माडगूळकर यांना आलेल्या अनुभवावर आधारीत असलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित होऊन आतापर्यंत बारा भाषेत अनुवादित झालेली आहे. बनगरवाडी कथानकावर एक मराठी चित्रपटही १९९५ साली प्रदर्शित झालेला आहे. १९९९ नंतर निघालेल्या आवृत्त्यामध्ये लेखकांनी स्वतः चित्रे रेखाटली आहेत.

 स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानच्या अधिपत्याखाली असणारी मेंढपाळांची ३०/४० घरांची वस्ती म्हणजे बनगरवाडी होय.
 कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. ‘मास्तर’ म्हणून गावात दाखल झाल्या झाल्या त्याला ‘बालट्याच्या’ धमकीचा सामना करावा लागतो. परंतु बनगरवाडीतील म्हाताऱ्या करभाऱ्याची साथ त्याला मिळते.
शाळेत जाण्यापेक्षा मुलांनी मेंढरामागे जावे या मताचा बनगरवाडीतील पालकवर्ग, पालकांना शाळेबद्दल असलेली अनास्था, यामुळे राजाराम मास्तरला वाडीतील मुलं शाळेत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हळूहळू शाळा सुरू होते. राजाराम मास्तर बनगरवाडीतील बाययाबापड्यांचा विश्वास जिंकतो आणि तिथल्या समाजजीवनात मिसळून जातो.

अडाणी, गरीब पण इमानदार असणारी वाडीतील लोकं मास्तरला कारभाऱ्याच्या बरोबरीने मान देतात. घरातील सुखदुःख सांगतात. मास्तरला त्याच्या गावी जाताना, तालुक्याला जाताना हक्काने कामे सांगतात. मास्तरही लोकांची मने जिंकायची म्हणून कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची कामे मास्तर करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असं गावकऱ्यांना वाटत असते. त्यामुळे ‘शेकू’ पेरणीसाठी गावातून कोणाकडूनही बैल घेउन दे अशी विनवणी मास्तरला करतो. पण ती मागणी मास्तर पूर्ण करू शकत नाही. पेरणीसाठी बैल न मिळाल्याने शेकूची बायको नांगराला दुसर्या बैलाच्याठिकाणी स्वतःला जुपूंन घेते. या घटनेचे मास्तरला खूप वाईट वाटते. हाच शेकू पुढे बायकोशी कसा वागतो? दुसऱ्या लग्नाची स्वप्ने का पाहतो? हे कादंबरीच्या पुढच्या टप्प्यात समजते.
 रामा धनगर बुचडा छाप राणीच्या पैशाची (बंध झालेले चांदीचे नाणे) तालुक्याला जाऊन मोड आणण्याची विनंती मास्तरला करतो. मास्तर अशी मोड आणतो. परंतु ते पैसे चोरीला गेल्याने मास्तरला खूप मनस्ताप भोगावा लागतो. पुढे ते पैसे त्याला कसे मिळतात ही घटनाही रंजक आहे.
मदत करण्याचे भूत मास्तरच्या डोक्यात असल्याने कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ‘बालट्याला’ हे माहित होते आणि कारभार्याचे तो कान भरतो. कारभारी आणि मास्तरचे बिनसते परंतु काही दिवसांनी कारभाऱ्याचा गैरसमज कसा दूर होतो, हेही पूर्ण कादंबरी वाचल्यावर समजते.
जगन्या रामोशाचे प्रेमप्रकरण, वयात आलेल्या अंजीचे वागणं, आयुबा आणि आनंदा रामोशी यांचे मास्तरांबद्दल असणारे प्रेम, बाळा धनगराला वाळीत टाकण्याचे कारण, बालट्याला कोणी मारले? याचे शेवटी मिळणारे उत्तर, इत्यादी प्रसंगांनी कथानक जिवंत होते.

हे सर्व घडत असताना एकही पक्की इमारत नसणाऱ्या बनगरवाडीत एक पक्की इमारत असावी म्हणून मास्तर लोकसहभागातून तालीम बांधायची ठरवतो. त्यात येणाऱ्या अनंत अडचणी, पैशाची केलेली व्यवस्था,  बांधकाम शेवटच्या टप्प्यात असताना आयुबच तालमीवरून पडणं, तालीम पूर्ण करण्यासाठी सगळ्या गावाचं एक होणं, पंत सरकारांच्या हस्ते तालीमच्या उद्घाटनाचे नियोजन, मास्तरमुळे छोट्याशा धनगरवाडीत राजाचं येणं, म्हाताऱ्या कारभाऱ्याला पाटीलकीचा मान मिळणं. असं सगळं चांगलं चाललेलं असताना म्हाताऱ्या कारभऱ्याचं अचानक जाणं. माणदेशी दुष्काळ पडणं आणि सारा भाग ओसाड होऊन ‘बनगरवाडीतुन’ सर्वांचं स्थलांतर होणं. चाऱ्या अभावी, रोगराईने असंख्य मेंढरांचा बळी जाणं. आणि हसती खेळती बनगरवाडी निर्मनुष्य होणं.… काळजाचा ठाव घेते.
हा कादंबरीचा सार आहे.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही काळ शिक्षक, गुरुजी किंवा मास्तर याच नावाने ओळखले जात असत. मास्तर नेमणूक झालेल्या गावी मुक्कामी वस्ती करून रहायचे. त्या त्या गावातील खडानखडा माहिती आणि लोकांशी जुळलेली नाळ या बळावर मास्तरला गावात खूप मान असायचा, त्यांच्या शब्दाला किंमत असायची. आता हे फक्त कथा कादंबऱ्यातून वाचावयास मिळतेे. मागील दोन, तीन दशकात शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. बहुतेक पालक शिक्षणाबद्दल जागरूक झालेत, मुलंही शाळेत येतात, शाळाही चकाचक झाल्यात परंतु मास्तरचा, गुरुजींचा जेव्हापासून ‘सर’ झाला, तेव्हापासून त्याची आणि समाजाची नाळ तुटत गेली. गुरुजी-विद्यार्थी, गुरुजी-पालक हे आपुलकीचे नाते शुष्क होऊन गेले आहे. याची जाणीव अश्या कथा कादंबऱ्या वाचल्यावर होते.
मास्तर बदलले, शिक्षणव्यवस्था बदलली, अनेक चांगले-वाईट बदल घडले… परंतु मानदेशीच्या भाळी असलेला दुष्काळाचा शाप आहे तसाच आहे… तेव्हाही....आताही!

संदिप रामचंद्र चव्हाण.