My Blog List

Tuesday 19 April 2022

घर_देता_का_घर..




लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे स्रोत बुडाल्याल्यामुळे घरभाडे देणे अनेकांना जमले नाही. काही घरमलकांनी परिस्थिती समजून घेतली परंतु काहींनी मात्र पैसे द्या नाहीतर घर खाली करा अशी भूमिका घेतली. 

लॉकडाऊनमध्ये अतिशय साध्या पध्दतीने लग्न झालेला तरुण शहरात येऊन पुन्हा कामावर रुजू होतो. ऐन पावसाळ्यात नवीन वैवाहिक जीवनाची सुरवात करण्यासाठी नवीन घर शोधत असतो. बेताचे उत्पन्न असले तरी स्वतःच छोटंसं का होईना घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाच्या मानसिक स्थितीची मांडणी नटसम्राटमधील प्रसिद्ध संवाद  (डायलॉग) 'कोणी घर देता का घर' या चालीवर करण्याचा प्रयत्न...


घर घ्यावं की न घ्यावं??

हा एकच सवाल आहे.

या मोठमोठ्या इमारतींच्या जंगलात,

EMI चे हप्ते भरत जगावं कर्जाच्या बोजाखाली?

की रहावं भाड्याच्या घरात आयुष्यभर, आनंदाने(?) घरमालकाची मर्जी सांभाळत…

की द्यावी नोकरी सोडून आणि जावं परत गावाला, शेतात हाडाची काडं करायला…

पण… तिकडेही घराचं स्वप्न पडायला लागलं तर..?

इथेच मेक आहे...


नव्या घरांच्या महागड्या प्रदेशात हल्ली

प्रवेश करण्याचा धीरच होत नाही.

म्हणूनच सहन करतो, घरमलकाचे माजोरेपण…

सहन करतो, वरचेवर घर बदलण्याची कटकट…

आणि पुन्हा उभं राहतो खालच्या मानेने,

‘ब्याचलर’ म्हणून हाकलून दिलेल्याच्याच दारात लग्नाचं सर्टिफिकेट घेऊन…

आणि विचारतो.. मालक, घर देता का… घर…

भाड्याने रहायला, घर देता का घर??


विधात्या, तू इतका कठोर का झालास?

एका बाजूला करोडोंची घरे,

ती आम्ही घेऊ शकत नाही….!

आणि दुसऱ्या बाजूला,

फुटपाथवर झोपणारी कुटुंबे,

तिथेही आम्ही राहू शकत नाही…!

मग बधिर झालेले हे डोके घेऊन,

हे करुणाकरा ,

आम्ही बेघरांनी,

कोणाच्या घराकडे पहायचं..?

कोणाच्या - घराकडे- कोणाच्या?

☹️

@sandy

06/07/2020


पैठणी




किती वर्षे झाली लग्नाला,

आता तरी घ्याल का पैठणी मला?

अनपेक्षित हा हल्ला झाला,

मीही माझा गल्ला पाहिला!

आहे का प्रॉमिस तुमच्या ध्यानात,

तिनं विचारलं माझ्या कानात!

मी बोललो.. तुझ्या मनात तेच माझ्या ध्यानात,

चल.. जाऊ लागलीच दुकानात!


दुपारी आम्ही खरेदीला गेलो,

मोठं मोठाली दुकानं फिरलो!


साड्यांचे ढीग पडता समोर, 

मलाही पहायची आली लहर!


जेव्हा, पैठणी आणि मोराचा संबंध मला समजला…

तेव्हा ‘मोर नाचरा हवा’ गाण्याचा अर्थ मला उमजला!


काठ-धडी-पदराचा मेळ काही लागत नव्हता…

रंगांच्या संगतीचा घोळ काही मिठत नव्हता!

शंभरभर पैठण्या तिने पहिल्या,

त्यातील एक, दोनच तिला आवडल्या!


अंगावर टाकून पैठणी, तिने आरशात न्याहाळलं!

तिच्या चेहऱ्यावरील आनंदानं, माझं हृदयही पागळलं!

किमतीचा अंदाज काढता, काळीच माझं चरकलं!

अन, मी खिसा का चाचपला? तिनं बरोबर ओळखलं!


मग ती गालात हसली…

 अन, हृदयी धरलेली पैठणी क्षणात पायी कोसळली!

नंतर बोलली....


“दिवस मावळतीला आला, आहो उशीर खूप झाला,

पहा ना, लहानग्या पाखरांचा कलकलाट किती वाढला!

आधी त्यांना घास-घास भरवू,

आणि नवीन स्टॉक आल्यावर, मग पैठणी घेऊ!”


माझी समजूत तिनं अशी काढली,

 गाड्यावर मग कच्ची-दाभेली हाणली!

“दसरा-दिवाळीला पाहू” बोलून,

 तिनं घराची वाट दाखवली!

तेवढ्यात पावसाची एक सर कोसळली,

त्यात माझ्या पापणीची कडा मात्र ओलावली!


दशा न करता तिनं,

दिशा दिली संसाराला!

म्हणून तर मी नेहमी म्हणतो….

बायको माझी फारच गुणी,

 मी आहे, तिचा खूप-खूप ऋणी!!

@sandy



Friday 10 September 2021

घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती…






 घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती… 

शिकार करून पोट भरणारा आदिमानव हळूहळू शेती करू लागला आणि घर बांधून स्थिरावला. सुरवातीला एखादी नैसर्गिक गुहा त्याचे घर होते तर पुढे झोपड्या बांधून तो समूहाने राहू लागला. उन्ह, वारा, पाऊस यापासून घर त्याचे संरक्षण करू लागले. तो वेगवेगळ्या सुधारणा करून घराची रचना अधिक पक्की करत गेला. कुडा-मेढीची, मातीची, विटा-सिमेंटची, कौलारू, पत्र्याची, आरसीसी, घर स्वतःचे, घर भाड्याने घेतलेले.. असे अनेक बदल होत प्रत्येकाच्या कुवतीनुसार घरं बनत गेली. गरीब असो की श्रीमंत त्याला हवे असते किमान एक घर. त्या घरात जीवनावश्यक वस्तू आणि सुख-दुःख वाटून घेणारी माणसं. माणसांशिवाय घर नाही आणि घराशिवाय कुटुंबसंस्था नाही. माणूस आणि घर यांचा असा घनिष्ठ संबध असतो. घर माणसाचं सुरक्षाकवच असते. दिवसभर वणवण करून रात्री त्याची पावले घराकडे वळतात. डोक्यावर छप्पर असले की माणूस थोडा निर्धास्त असतो. एका एका घरात तीन-तीन, चार-चार पिढ्या जन्मतात, मोठया होतात आणि तिथेच खस्त होतात. माणसं बदलली तरी घरं तशीच असतात.  नवीन पिढ्या त्याला आपलंसं करतात. घर म्हणजे केवळ खांबाभिंतींवर तोललेल्या छपरांची, विटा-माती-सिमेंटची निर्जीव इमारत नसते. त्या घरातील माणसांनी ती जिवंत वास्तू बनलेली असते.


माणसं माणसांवर प्रेम करतात तशी आपापल्या घरावरही प्रेम करतात. ज्यांना घर सोडून दूर रहावे लागते त्यांना एखाद्या प्रियतम व्यक्तीसारखंच घर भासते. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असणारी मंडळी दूर असल्यास महिन्या-दोन महिन्यातून, जवळ असल्यास आठ-पंधरा दिवसातुन घराकडे चक्कर मारतात. घराकडे जायला जेव्हा कोणी निघतो तेव्हा घरी कधी पोचतो आणि कधी नाही अशी ओढ प्रवासात व्यक्तीला लागलेली असते. घर अनेक कडू-गोड आठवणींचे कोंदण असते. घर माणसांनी भरलेले गोकुळ असते. घर, घराचा परिसर, शेजार-पाजार, आंगण- परसबाग, सोफा-मधले घर-आतले घर, हॉल-किचन-बेडरूम, जिना-माडी, माळा-पोटमाळा, खिडक्या-दरवाजे-साने-दिवळ्या, पोपडलेल्या भिंती-प्लॅस्टरच्या भिंती.. प्रत्येक घर वेगळे. त्यात राहणारी माणसं वेगळी. परंतु घराबद्दल प्रेमाची भावना मात्र जवळपास सगळ्यांची सारखीच असते. 

काही अपवाद असतात यालाही... घरातील सततचे कज्जे-सतत भांडण तंटा, शिव्यागाळ, मारहाण, अपमान, डावलले जाण्याची भावना यामुळे काहींना घर नकोस वाटतं. त्यामुळे घरापासून दूर कुठेतरी जावं असं काहींना वाटतं पण हे प्रमाण खूप कमी असते.

 घराची सत्वपरिक्षा होते ती अशा वावटळात- संकटकाळात. भांड्याला भांड लागतं, वादविवाद घडतात, कोणी दुखावलं, कोणी दुरावलं, मानसामानसात बेबनाव झाला, घर फुटायची वेळ आली तर घर अस्वस्थ होतं. भांडण तंटा, बेबनाव उंबऱ्याच्या आत असतो तोपर्यंत घरं टिकून असतात. बेबनाव वाढला की घराच्या वाटण्या होतात. सोफा-हॉलची विभागणी होते. मध्ये विटा मातीच्या भिंती उभारल्या जातात…. घर दुभांगते आणि माणसांची मनेही! 


त्याच प्रमाणे घरातील कर्त्या माणसाचं अचानक निघून जाणं घराला पोरकेपन आणतं. कितीही रंगरंगोटी केलेली असली तरी ते घर भकास दिसू लागतं. अशा वेळी मागे राहिल्यालेल्यांनी घर सावरायचचं असतं. सगळ्यांनी मिळून गेलेल्या माणसाची स्वप्न पूर्ण करायची असतात. घराला पुन्हा नेटानं उभं करायचचं असतं. 


अलीकडे दोन तीन दशकात गावखेड्यातून तरुनपिढी मोठ्याप्रमाणावर नोकरी-धंद्यानिमित्त खेडी सोडून शहरात कायम किंवा तात्पुरती स्थिरावली. गावाकडील घरात एखादा भाऊ, आई-वडील असले की दशके गेली तरी घराची नाळ घट्ट राहते. मुळं मजबूत राहतात. परंतु काही कुटुंबातील सगळीच पाखरं अन्नपाण्यासाठी दाहिदीश्या उडालेली असतात. घरात उरलेली म्हातारी खोडं शून्यात नजर लावून बसतात. 'या चिमन्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' ही आर्थ हाक मनातल्या मनात मारत असतात. सणावाराला त्यांच्या चिल्यांपिल्यानी घर भरले की त्यांना काय करू नी काय नको असं होतं. सुट्टी संपली पाखरं उडाली की पुन्हा म्हातारे डोळे पाझरू लागतात. एकाला दुसऱ्याची साथ असेल तर आला दिवस मागं लोटून दिवस काढले जातात. पिकलं पान कधीतरी गळून पडेल पण मागे उरेल त्याला एकटेपणा खाऊन टाकेल ही भीती दोघांच्या मनात असते. पाखरं त्यांच्या नव्या घरट्यात त्यांना बोलावत असली तरी ही म्हातारी खोडं आपलं गाव आणि कित्येक पिढ्यांनी कसलेली माती सोडायला तयार नसतात. त्यांचा हा हट्ट दोघांतील एकाला घेऊन जातो. मागे उरलेल्याच्या मनाला चुटपुट लावतो. राहिलेल्या एकाला कोणत्यातरी एका पाखराच्या घरट्यात मनाच्या विरुद्ध मनावर मनामनाचे दगड ठेवून घर सोडावं लागतं… आता त्या घर नावाच्या गोकुळाच्या फक्त भिंती उरलेल्या असतात.. ते घर आता पोरकं झालेलं असतं.. अगदी पोरकं! 😥

Friday 11 September 2020

पक्षीमित्र

 सालीम अली



"मत्यूनंतर तुम्हाला विस्मृत व्हायचं नसेल तर वाचण्यासारखं काही लिहा किंवा तुमच्यावर काही लिहावं असं करून दाखवा." बेंजामिन फ्रॅंकलिनने सांगीतलेल्या या दोन्ही गोष्टी ज्यांनी सत्यात उतरवल्या अशी अनेक श्रेष्ठ माणसं आपल्या भारत देशात होऊन गेली. सालीम अली त्यापैकीच एक.. नव्हे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातील ते एकमेवाद्वितीय!

ज्या अभ्यासाला समाजात स्थान नाही, प्रतिष्ठा नाही, लौकिकदृष्ट्या जो मार्ग चाकोरीबाहेरचा आहे अशा पक्षीनिरीक्षणशास्त्राचा त्यांनी साठ वर्षे ध्यास घेतला. संशोधन केले. निरीक्षणे नोंदवली. त्यावर शेकडो लेख आणि कित्येक पुस्तके लिहली. त्यांनी भारतात एका नव्या अभ्यास शाखेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' म्हणून संबोधले जाते. 

सालीम अलींना बालपणापासूनच विविध पक्षांच्या निरीक्षणाचा आणि शिकारीचा छंद होता. त्यांना भेट मिळालेल्या बंदुकीने पक्षी टिपण्यात ते पटाईत होते. पक्ष्यांची शिकार करता करता पक्षांच्या जीवनशैलीचा, अभ्यासाचा ध्यास त्यांनी घेतला. १९४३ मध्ये 'द बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकासह त्यांनी लिहलेली इतर अनेक पुस्तके पक्षीप्रेमी-पक्षीअभ्यासक यांच्यासाठी लाखमोलाची ठेव आहे. पक्ष्यांवर प्रेम करताना कृषिप्रधान देशात शेती आणि मानवी जीवनात पक्ष्यांचे अर्थशास्त्रीय आणि महत्वपूर्ण स्थान त्यांनी ओळखले. शेतकऱ्यांचे खरे शत्रू कीटक आहेत पक्षी नव्हेत असं स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडले. निसर्गातील सजीव साखळीतील पक्षी हा मुख्य घटक आहे, जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगले पाहिजेत असं ते स्पष्टपणे सांगत असत.

सालीम अलींचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ आणि मृत्यु  २० जून १९८६ रोजी झाला. ९१ वर्ष निरोगी आयुष्य लाभलेल्या सालीम अलींच्या पत्नी मात्र १९३९ साली तारुण्यातच निर्वातल्या… सालीम अलींचे घरटे जणू उन्मळून पडले. सावलीसारखी नेहमी पाठीशी असणारी पत्नी गेली, मुलबाळ नाही त्यामुळे त्यांचं जगणं नीरस बनले. काही दिवस नैराश्यानेही त्यांना घेरले. मात्र अल्पावधीतच त्यांनी या नैराश्यावर मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. या दुःखद घटनेनंतर जवळपास चार दशके त्यांनी पक्षीनिरीक्षण, संशोधन, जंगल भ्रमंती आणि पुस्तके या गोष्टींनाच आपला संसार मानला. 

शालेय जीवनात साधारण विद्यार्थी, गणिताची परिस्थिती चिंताजनक, वडीलढाऱ्यांच्या सल्ल्यानुसार दादर कॉलेजमध्ये कमर्शिल लॉ आणि अकौंटन्सी शिकणारा विद्यार्थी पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला कसा आला आणि जगभरात ख्याती कसा पावला हे समजून घ्यायचे असेल तर सालीम अलींची साठ वर्षाची तपश्चर्या आपल्याला अभ्यासावी लागेल. सालीम अलींना सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र, पक्षीशास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु या शाखेतील काही विषय त्यांना अवघड वाटले त्यामुळे या कॉलेजचे नियमित विद्यार्थी ते होऊ शकले नाहीत. नंतर इथेच त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची अनुमती मिळाली. (म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक जिज्ञासू विद्यार्थी म्हणून) पक्षीविज्ञानशास्त्रातील भीष्म पितामह होण्यासाठी त्यांना कोणत्याही डिग्रीची आणि त्या शाखेतील नियमित विद्यार्थी होण्याची आवश्यकता भासली नाही. त्याकाळची पक्षीनिरीक्षण आणि अभ्यास करण्याची पद्धत मोडून काढून त्यांनी स्वतः नवीन पद्धती अवलंबल्या. इंग्रजांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. अनेक दिग्गज्यांच्या चुकीच्या निष्कर्षांना संशोधन आणि पुराव्यानिशी खोडून काढले. आणि हे घडले कारण त्यांनी यासंदर्भात स्वतःचं सर्वस्व झोकून काम केले. कामालाच ईश्वर आणि अल्ला मानले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि इतर शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले. सरकार दरबारी मोठा दबदबा वाढला. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली, आवृत्यावर आवृत्त्या छापल्या गेल्या... परंतु सालीम अलींचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. ते नेहमी साधेपणाने.. कोणत्याही डामडौलाविना अगदी सामान्य व्यक्तिप्रमाणे वावरले. आज अशी ऋषितुल्य माणसं खूप अपवादात्मक हयात असतील. एखाद्या ध्येयासाठी जीवन समर्पित करणारेही विरळच!

 पक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या डॉ.सालिम अली यांची जयंती 'पक्षी दिन' म्हणून साजरी केली जाते. या

निसर्गाच्या हानीसोबतच अनेक पक्षी जातींचे नामशेष होणे ही आज चिंतेची बाब बनली आहे. अशा वेळी आपल्याला सालीम अलींची उणीव निश्चितच जाणवते.

Sandip R Chavan


संदर्भ: 

सालिम अली- वीणा गवाणकर (मराठी पुस्तक)

विकिपीडिया

गुगलवरती सालीम अली यांच्यासंदर्भात उपलब्ध असणारे वेगवेगळे लेख.

Thursday 20 February 2020

सेक्स गुलाम ते नोबेलची मानकरी

कल्पनातीत अन्याय-अत्याचार सोसूनही खचून न जाता त्या अत्याचाराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या एका तरुणीची ही कहाणी आहे.. द लास्ट गर्ल.. नादिया_मुराद!!

इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर इराकमधील सुन्नी गटाच्या अबू-बखर-अल-बगदादीने (जो नुकताच मारला गेला) 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (आयसिस) या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. आयसीसीने इराक मधील मोठे तेल क्षेत्र ताब्यात घेऊन तेल आणि खंडणीवसुलीतून भरपूर पैसा आणि शस्त्र मिळवली. त्या जोरावर त्यांनी आतांकी दहशत माजवून संपूर्ण इराकमध्ये खलिफाची राजवट आणण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाच्या आड येणाऱ्यांचा क्रूरपणे खात्मा करण्याचा त्यांनी सपाटा लावला. २०१४ मध्ये इराकमधील मोसुल प्रांतातील त्यांच्या दृष्टीने 'काफिर' असणाऱ्या आणि कोणताही धर्मग्रंथ नसणाऱ्या 'यजीदींना' त्यांनी लक्ष बनवले आणि २०१४/१५ दरम्यान खूप मोठ्या संख्येने यजीदींचा नरसंहार घडवला. [त्याच काळात आयसिसने इराकमधील ३९ भारतीय बांधकाम मजुरांना बंदी बनवून ठार मारले होते.]

जागतिक महासत्तांचे तेलाचे राजकारण, त्यांची शस्त्रस्पर्धा, दहशतवाद्यांना मिळणारे वेगवेगळ्या देशांचे छुपे किंवा उघड पाठबळ, दहशतवादी संघटनांची टोकाची धार्मिक कट्टरता, धर्माच्या नावाने त्यांनी चालवलेला नंगानाच इत्यादी जागतिक समस्या बनलेल्या अनेक गोष्टी सामान्यांच्या आयुष्याची कशी धूळधाण उडवतात याचे बोलके उदाहरण म्हणजे इराकमधील यजीदींचे झालेले हत्याकांड होय.

I want to be the last girl in the world with a story like mine. अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावी..२०१८ च्या शांतता नोबेल पुरस्काराची मानकरी नादिया मुराद हिच्या आत्मकथेतील हे शेवटचे वाक्य आहे.
 नादिया मुराद ही इराकमधील सर्वसामान्य यजीदी कुटुंबातील २१ वर्षाची तरुणी. मोठा कुटूंबकबिला आणि बेताचे उत्पन्न तरीही आनंदीत असणाऱ्या या कुटुंबावर आणि त्यांच्या 'कोचो' गावावर  २०१४ साली आयसिसची वक्रदृष्टी पडली. आयसिसने नादीयाच्या गावातील सगळ्या रहिवाशांना एका शाळेत नेऊन त्यांची पुरुष, लहान मुले, विवाहित तरुणी, अविवाहित तरुणी, वयस्कर स्त्रिया अशी विभागणी केली. सर्वच्या सर्व पुरुषांना आणि वयस्कर स्त्रियांना एकाचवेळी ठार मारून सामूहिक कबरीत त्यांचे दफन केले. लहान मुलांना ब्रेनवॉश करून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत पाठवले. इराकमधील इतर ठिकाणी पकडलेल्या यजीदी तरुणींप्रमाणेच कोचोमधील विवाहित-अविवाहित तरुणींना सेक्स गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून विकायला आणि वापरायला त्यांनी सुरवात केली. फेसबुक आणि इंटरनेटवर या तरुणींची एखाद्या वास्तूप्रमाणे विक्रिची जाहिरात दिली. इराक आणि सीरिया येथील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहशतवादी गटामध्ये भेट म्हणून त्यांना वाटले गेले. या काळात हजारो यजीदी तरुणींना रोजच्या रोज अनेकवेळा बलात्कार सोसावे लागले. कोचो गावामध्ये घडलेल्या हत्याकांडात आयसीसीने नादिया मुरादच्या सहा भावांना आणि आईलाही मारले, तिच्यासह सर्व बहिणींना, वहिनींना, भाच्याना सेक्स गुलाम (सबिया) बनवले आणि इराक, सीरियामधील वेगवेगळ्या दहशतवादी कँम्पमध्ये पाठवले. आणि एका आनंदी, मोठ्या कुटूंबाची त्यांच्या गावाबरोबरच पूर्ण वाताहत झाली.

सुरुवातीला नादियाचा एकच मालक होता त्याचे नाव हाजी सलमान. तो पेशाने न्यायाधीश होता आणि त्याचा खूप दरारा होता. तो नादियाला प्रचंड मारहाण करत असे, बलात्कारापूर्वी मेकअप करायला लावत असे, मध लावलेले त्याचे तळवे तिला चाटायला लावत असे. नादियाने त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि ती पकडली गेली तेव्हा त्यानं तिला चाबकानं फोडून काढलं आणि नग्न करून आपल्या सहा सुरक्षारक्षकांना बलात्कार करण्यासाठी तिच्यावर ‘सोडलं’ अगदी ती बेशुद्ध होईपर्यंत. या घटनेनंतर सलमानने तिला विकून टाकलं. ज्याने तिला विकत घेतले त्याने व त्याच्या ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका रस्त्यावरील चेकपोस्टवरच्या खोलीत बंद केलं.... चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या कुणाही दहशतवाद्यासाठी! तिथे कोणीही तिच्यावर बलात्कार करू शकत होते. तीच्यावरच्या अत्याचाराचा हा प्रवास सतत तीन महिने सुरू होता. एके दिवशी चेकपोस्टवरून एक दहशतवादी तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथून तिने धाडशी पलायन केले…!!

यजीदी तरुणींवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे काही यजीदी तरुणींनी आत्महत्या केली. तर अनेकींची हत्या झाली. काही तरुणीं पळून जाण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत असत परंतु त्यांच्या आजूबाजूला पसरलेला लालची, मुका, बहिरा आणि क्रूर समाज त्यांना पकडून पुन्हा आयसिसच्या ताब्यात देत असे. इराकमधील अशा भयानक वातावरणात सगळीकडे अराजकता माजली असताना, कौर्याची- छळाची परिसीमा गाठली असताना, आयसिसच्या ताब्यातील इलाख्यातील कोणीही व्यक्ती, सबियाला (सेक्स गुलामाला) मदत करेल याची तिळमात्र खात्री नसतानाही नादिया आयसिसच्या ताब्यातून पळून जाण्याचा दुसऱ्यांदा धाडशी प्रयत्न करते आणि एवढ्या बजबजपुरीत तिला आधार मिळतो तोही माणुसकीचा झरा- सहृदय मन असणाऱ्या एका सुन्नी कुटूंबाचा!
या कुटुंबतील सर्वजण जीवावर उदार होउन नादियाला पळून जाण्यासाठी मदत करतात. तिला आसरा देतात, तिची खोटे ओळखपत्र बनवतात. पुढील प्रवासात पावलापावलावर असणारा धोका आणि पकडले गेलो तर क्रूरपणे ठार मारले जाण्याची शक्यता माहीत असूनही त्या कुटुंबातील 'नासिर' तिचा खोटा 'पती' बनतो आणि तिला सुरक्षितपणे कुर्दीस्तानमध्ये पोचवतो. या थरारक घटनाक्रमाची सविस्तर माहिती नादियाच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळते.

क्रूर आयसिसनं नादियाचा आवाज बंद करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला... त्यांनी तिचं अपहरण केलं, तिला गुलाम बनवलं, तिच्यावर बलात्कार केला, तिचा अनन्वित छळ केला, आणि एका दिवसात तिच्या कुटुंबातील सात जणांचा जीवही घेतला. पण नादियानं गप्प राहण्यास नकार दिला. कोणत्याही स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाल्यास त्याबद्दल वाच्यता करण्यास ती स्त्री किंवा तिचे कुटुंब घाबरते. समाज आपल्याला वाळीत टाकेल ही भीती त्यांना असते. विशेषतः आशियाई देशात हे प्रमाण जास्त दिसते. कारण समाजाचा आणि कायद्याचा धाक नसल्याने अत्याचार करणारा गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत असतो आणि चुकी नसतानाही अत्याचारग्रस्त मात्र जगनिंदेला बळी पडतात. शिवाय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठीही अनेक त्रास सोसावे लागतात. त्रास सोसूनही न्याय मिळेल याची खात्री त्यांना नसते. यासारख्या अनेक कारणाने स्त्रिया मूकपणे अत्याचार सोसतात आणि त्यांचे कुटुंबीयही शांत राहण्यात धन्यता मानतात. त्याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो.. ते चेकळतात आणि नवीन गुन्हे करायला सिद्ध होतात. या उलट नादिया मुराद तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जितकी होईल तितकी प्रसिद्धी करते. सगळ्या जगाला तिची (यजीदी तरुणींची) कहाणी समजावी म्हणून ती आत्मचरित्र लिहते. देशोदेशी जाऊन व्याख्यानातून तिची आपबिती सांगते. आयसिसने केलेला अत्याचारालाच त्यांच्याविरुद्धचे शस्त्र म्हणून ती वापरते आणि त्यांना आतंरराष्ट्रीय कोर्टात खेचते. शक्तिशाली राष्ट्रांना यजीदींना मदत करण्यासाठी आवाहन करते.
अनाथ- बलात्काराची शिकार- गुलाम- निर्वासित असे आयुष्यानं नादियावर मारलेले सगळे शिक्के ती धुडकावते. त्याऐवजी तिनं स्वतःसाठी नवी बिरुदे तयार केली आहेत : ‘सर्वायवर’ म्हणजे भयानक आपत्तीतून वाचलेली व्यक्ती. यजिदींची नेता. स्त्रियांच्या हक्कांची पुरस्कर्ती. नोबेल शांतता पुरस्काराचे मानांकन मिळवणारी तरुणी. संयुक्त राष्ट्रसंघाची ‘सदिच्छा दूत’ आणि आता ‘लेखिका’. आज ती नरसंहाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक यजिदीचा, दुर्वर्तनाची शिकार ठरलेल्या प्रत्येक स्त्रीचा, मागे उरलेल्या प्रत्येक निर्वासित व्यक्तीचा आवाज बनली आहे.

छोट्या मोठ्या संकटांनी, कौटूंबिक- सार्वजनिक- शैक्षणिक अपयशाने, अन्याय-अत्याचारास बळी पडल्यास अनेकजण आत्महत्या करतात. वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या आत्महत्या हा आज चिंतेचा विषय बनला आहे. नादियाने मात्र कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, ना तिला कधी स्वत:विषयी घृणा किंवा करुणा वाटली. ती जिवंत राहिली स्वतःवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आई-भावांच्या हत्येची दाद मागण्यासाठी आणि आयसिसच्या ताब्यातील हजारो यजीदी तरुणींना- लहान मुलांना सोडवण्यासाठी!
कोणत्याही घटनेमुळे आलेल्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आप्तांची साथ, वैद्यकीय उपचार, मोठे ध्येय आणि प्रेरणादायी चरित्रे उपयोगी पडतात. जगभरातील मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींनी असंख्य हालअपेष्टा सोसून यशाची शिखरे पादाक्रांत केली. अनेकांचा तिथपर्यंतचा मार्ग निश्चितच सुकर नव्हता. अशांचा जीवनप्रवास सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणादायी असतो. नादिया मुराद त्यापैकीच एक!

~संदीप रामचंद्र चव्हाण

संदर्भ:
१) द लास्ट गर्ल (आत्मचरित्र)
मूळ लेखिका: नादिया मुराद
मराठी अनुवाद: सुप्रिया वकील

२) २०१४/१५ मधील काही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल वरील इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेली माहिती


Saturday 30 November 2019

भय इथले संपत नाही..
महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा महिनाभर चाललेला गोंधळ आणि राजकिय नेत्यांच्या 'सत्तेतसाठी सर्वकाही' या असंवेदनशील भूमिकेने, संवेदनशील माणसाच्या मनात राजकारणी नेत्यांबद्दल आणि राजकीय पक्षांबद्दल आत्यंतिक चीड निर्माण झालेली असतानाच हैद्राबादमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दिशा (नाव बदलले आहे) या तरुणीवर काही नराधमांनी सामुहीक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तेलंगण पोलिसानी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवार दि २७ नोव्हेंबरच्या रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला. हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला. 
घडलेली ही घटना खूपच धक्कादायक, संतापजनक आणि हृदयद्रावक आहे.

स्त्री आपला अभिमान आहे, आपला सन्मान आहे, आपली जननी आहे असं मानणाऱ्या भारत देशात बलात्कार ही घटना तशी नवीन राहिलेली नाही. कुपोषण, गरिबी, बेरोजगारी याबाबतीतील समस्या संपवण्यात आपण इतर देशांच्या तुलनेत पाठीमागे राहिलो असलो तरी जगभरात स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या आकडेवारीत मात्र भारताचा नंबर खूप वरती लागतो. देशात दररोज सरासरी तब्बल १०६ महिलांवर बलात्कार होतात अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) अहवाल २०१६ ने दिली आहे. २०१६ या वर्षी भारतात वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांवर एकूण ३८,९४७ बलात्कार झाले. यामध्ये २१६७ गँगरेप (सामूहिक बलात्कार ) झाले. ही सर्व अधिकृतपणे नोंद झालेल्या बलात्कारांची आकडेवारी आहे. ज्याची नोंदच झाली नाही, जे अत्याचार मूकपणे सोसले गेले, दडपशाही करून दाबून टाकले गेले, ज्यांचा आवाज पोलीसस्टेशनपर्यंत पोचलाच नाही अशी संख्याही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडचे ताजे आकडे याहूनही भयानक असू शकतात. 

दिल्लीमधील निर्भया असो, कोपर्डीची छकुली असो की हैदराबादची दिशा असो, माध्यमातून बातम्या येतात, श्रद्धांजलीचे बोर्ड झळकतात, सोशलमीडियावर दुःख व्यक्त केले जाते, आरोपीचा धर्म कोणता किंवा अत्याचार झालेल्या मुलीची जात कोणती यावरून राजकीय फायद्याची गणिते जुळवण्यासाठी काही नेते आणि काही संघटना पुढे येतात, काही ठिकाणी कँडल मार्च निघतात तर काहींच्या नशिबी फक्त वर्तमानपत्रातील एक किरकोळ बातमी येते. घटनेला काही दिवस होतात, महिने उलटतात आणि पुन्हा अशाच किंबहुना अधिक धक्कादायक गोष्टीसाठी आपण सिद्ध होतो. हे दुर्भाग्यपूर्ण सामाजिक वास्तव आपणाला कोठे घेऊन जाणार आहे याची कल्पनाही भयावह वाटते. समाजात वाढणारी 'मला काय त्याचे' ही वृत्ती गुन्हेगारांना अप्रत्यक्षपणे मदत करणारी ठरत आहे.

 २१ व्या शतकातही भारतातील मोठ्या शहरात स्त्री सुरक्षित नसेल तर मग आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारणे थांबवायला हवे. सत्तास्वार्थासाठी जिथे रात्रंदिवस नेते, अधिकारी, सरकारी यंत्रणा सक्रिय राहतात तिथे मात्र सामान्यांच्या प्रश्नांवर जलदगतीने निर्णय होत नाहीत. पोलिसात तक्रार द्यायला गेलेल्या पीडित तरुणीला प्रश्न विचारून विचारून भांबावून सोडले जाते. कोण्या मोठ्या आसामीबद्दल तक्रार असेल तर तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस वेळकाढूपणा करतात. (पहा ऑगस्ट २०१५ मधील औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णी आत्महत्या.) FIR ची प्रक्रिया पूर्ण होऊन केस कोर्टात उभी राहिली तरी 'तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख' या अजब प्रकाराने आधीच मानसिक, शारीरिक, सामाजिक खच्चीकरण झालेल्या पीडिताला न्याय मिळण्यास उशीर होतो.. बऱ्याच वेळा तो मिळतच नाही. 

बलात्कारी व्यक्तीला अतिकठोर शिक्षा हवी व तशी समाजाची मागणीही आहे. परंतु या शिक्षेच्या भीतीतून आरोपी पीडित व्यक्तीला जिवंत मारण्याचे प्रमाण वाढेल याची भीतीही वाढते. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असायला हवीच पण त्याहून महत्वाचे म्हणजे आरोपींना शिक्षा होणारच ही हमी वाढायला हवी. आम्ही काहीही केलं तर जामिनावर किंवा निर्दोष सुटू ही कायद्याला खिजगणतीतही न धरणारी भावना वाढली असल्याने कायद्याचे भय उरलेले नाही. गावगुंड गुन्हे करून निसटात, चित्रपटातील अभिनेते आपल्या गाडीखाली सामन्यांना चिरडून पुन्हा सेलिब्रिटी जीवन जगतात, राजकारणी/शासकीय अधिकारी मोठमोठाले घोटाळे करून उजळ माथ्याने फिरतात, कायद्याच्या नाकावर टिच्चून निवडणुका लढवून निवडूनही येतात आणि तेच पुन्हा कायदे बनवतात. अशा घटनांमधून गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, हा संदेश समाजात झिरपतो. त्यामुळे गुन्हा करण्याची मानसिकता असणाऱ्यांचे धाडस वाढते. ‘मी कुठल्याही गुन्ह्यातून सुटू शकेन’ असा विश्वास बळावतो आणि मग होतात बलात्कार..!!

यावर उपाय म्हणजे गुन्हेगारांना शासन आणि पीडिताला न्याय मिळेल अशी देशभर जलदगती न्यायालयीन यंत्रणा उभी रहायला हवी. अशा गुन्ह्यातील तक्रार नोंदवताना पोलीस यंत्रणेबद्दल पीडिताच्या निकटवर्तीयांना आणि पीडिताला विश्वास वाटणारे वातावरण निर्माण व्हायला हवे. अगदी लहान वयापासून मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे व्यावसायिक (प्रोफेशनल) पद्धतीने धडे मिळतील अशी व्यवस्था हवी. प्रत्येक शाळेत जुडो-कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी याचे प्रशिक्षण देणारा विशेष प्रशिक्षित स्टाफ असलायला हवा. शाळेतून लैंगिक शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी. बलात्कार पीडित व्यक्तीकडे समाजाने गुन्हेगार म्हणून न पाहता सन्मानाने वागवायला हवे. पीडित व्यक्तीला तिच्या घरातून, मित्र-मैत्रिणीकडून 'आम्ही तुझ्या सोबत आहोत ' हा विश्वास मिळलायला हवा. त्याचबरोबर महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवानगा सहज मिळायला हवा. समाजातून संस्कारशील पिढी घडावी म्हणून प्रत्येक जाती-धर्मातील विचारवंतांनी पुढाकार घ्यायला हवा. बलात्काराच्या समस्येवरील उपाययोजनेत पुढाकार घेण्यासाठी सामान्य लोकांचा लोकप्रिनिधींवर दबाव हवा. बलात्काराची ही कीड कमी करण्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने त्यामध्ये खारीचा वाटा उचलायला हवा… कारण आग शेजारी लागलेली आहे ती कधीही आपल्यापर्यंत पोचू शकते…ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी..!!

~संदीप रामचंद्र चव्हाण

#ताजा_कलम.. 
महाराष्ट्रातील नवीन सरकारने विधिमंडळात आजच विश्वासदर्शक ठराव जिंकला…आशा करूया हे सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना राबवून जनतेचा विश्वास जिंकेल!! 



Monday 30 September 2019

खेळण्यांचा जादूगार

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ॥
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥

कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या ‘लावण्य रेखा’ या कवितेतील वरील ओळी आहेत. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या कतृत्वान व्यक्तींचे हात आणि त्यांनी निवडलेल्या खडतर मार्गावरुन आनंदाने चालणारी त्यांची पाऊले, हीच खरी सुंदरतेची प्रतीके असतात. असा काहीसा अर्थ कविवर्य बोरकरांना सुचवायचा आहे. आज आपण अश्याच एका कतृत्वान व्यक्तीचा परिचय करून घेऊया ज्यांनी लहान मुलांना खेळातून विज्ञान-संकल्पना शिकवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले आहे. चांगल्या पगाराची नोकरी सोडून खडतर वाटेने प्रवास करत गेली चाळीस वर्षें ते अविरतपणे चालत आहेत… न थांबता…. न थकता!
या तपस्वी व्यक्तीचे नाव आहे…अरविंदजी गुप्ता!

काही महिन्यांपूर्वी अरविंदजी गुप्ता यांच्याबद्दलची दोन पुस्तके वाचनात आली. शोभा भागवत यांनी लिहलेले खेळण्यांचा जादूगार आणि दीपा देशमुख यांचे सुपरहिरो अरविंद गुप्ता.
अरविंद गुप्ता यांचे संक्षिप्त चरित्र व त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी ही दोन्ही पुस्तके उपयुक्त आहेत. ही पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर pdf स्वरूपात उपलब्ध आहेत.


अरविंदजीं गुप्ता यांनी विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले आहे. टाकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी बनवण्याच्या शेकडो कृती त्यांनी शोधल्या. लाखों विद्यार्थ्यांना खेळण्यातून विज्ञान शिकवले. हजारो शाळांमध्ये जाऊन विज्ञान खेळण्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली. शेकडो शिक्षकांना कार्यप्रवण केले. त्याचबरोबर त्यांनी खेळणी बनवण्याच्या शोधलेल्या हजारभर कृतींचे व्हिडीओ बनवले, खेळणी बनवण्याची कृती त्यांनी पुस्तकातून उतरवली. जगभरातील शेकडो ऊत्तोमौउत्तम इंग्रजी पुस्तके हिंदी भाषेत अनुवादित केली, ही पुस्तके तळागाळातील लोकांपर्यंत पोचावीत म्हणून पुस्तकांची किंमत कमीतकमी रहावी यासाठी प्रयत्नही केले. "A Million Books for a Billion People" हे ब्रीद घेऊन सामान्यातील सामान्य व्यक्तीला जगभरातील चांगले चांगले साहित्य विनामूल्य वाचायला मिळावे म्हणून त्यांनी http://www.arvindguptatoys.com नावाची वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटवर त्यांनी स्वतः लिहलेली जवळपास २५ ते ३० पुस्तके, त्यांनी अनुवादित केलेली जवळपास ३५० पुस्तके, त्याचबरोबर भारतीय आणि जगभरातील कॉपीराईट हक्क संपलेली मराठी, हिंदी, इंग्रजीमधील दर्जेदार पुस्तके त्यांनी या वेबसाईटवर ठेवली आहेत. कॉपीराईटचा बागुलबुवा न करणाऱ्या भारतीय आणि जगभरातील अनेक नामांकित लेखकांची अलीकडेच प्रकाशित झालेली नवनवीन पुस्तकेही या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहेत. अशी सर्व मिळून जवळपास ८००० (pdf) पुस्तके या वेबसाईट उपलब्ध आहेत. पुस्तकांच्या प्रकारनुसार वेगवेगळ्या विभागात पुस्तकांची विभागणी केली आहे यामुळे ज्या विषयाचे पुस्तक हवे असेल तो विभाग शोधल्यास पुस्तक मिळणे सोपे जाते. इंग्रजी विभागातील पुस्तकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिंदी विभागातील संख्याही लक्षणीय आहे. तर मराठीमध्येही जवळपास  ७०० ते ८०० पुस्तके आहेत.

 पुस्तकांसोबतच २२ भाषेमध्ये विज्ञान खेळणी बनवण्याच्या कृतीचे ८५०० व्हिडीओ आणि खेळणी बनवण्याच्या कृतीचे फोटोही या वेबसाईटवर आहेत. एका क्लिकने आपण हे व्हीडियो पाहू शकतो. बहुतांश व्हिडीओ १ ते ३ मिनिटांचे आहेत. सूचनेप्रमाणे रद्दीपेपर, ड्रॉइंग पेपर किंवा क्राफ्ट पेपरची घडी घालत गेल्यास त्यापासून अनेक प्रकारची खेळणी बनवता येतात. त्यामध्ये घर, कबुतर, फुलपाखरू, मासा, पंख हलवणार पक्षी, उड्या मारणारा बेडूक, मोदक इत्यादी बरोबरच चार पाच प्रकारच्या टोप्याही बनवता येतात. ‘बबलुची बोट’ या गोष्टींच्या व्हिडीओमध्ये एकाच कागदापासून १० ते १५ वस्तू बनवल्या आहेत. त्याचप्रमाणे फुग्यामध्ये हवा भरून त्यास इतर काही वस्तू जोडून त्याचे रॉकेट बनवता येते. पळणारी चार चाकी गाडी बनवता येते. प्लास्टिक स्ट्रॉ थोडी कापून फुंकल्यास त्याची पिपाणी बनवता येते. कंपणाने ध्वनी बनतो हे त्यातून सहज समजवता येते. सिरिंज, सलाइन ट्यूब, झाकणं, लाकडी पट्ट्या इत्यादी वापरून जेसीबी आणि जॅक बनवू शकतो. हा जेसिबी चक्क (छोटी) गवताची पेंढी उचलून दुसरीकडे टाकू शकतो. पुढे मागे, उजवीकडे वा डावीकडे तो फिरू शकतो. तर जॅक वरखाली होऊन खेण्यातील गाडी उचलू शकतो. वापरून फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यापासून बनवलेल्या कित्येक प्रकारच्या खेळण्यांचे व्हिडीओ या संग्रहात आहेत. या बाटल्यापासून घराच्या व्हरांड्यात टांगता येण्यासारखी फुलदाणी, कारंजी, पिचकारी, स्प्रिंकलर, पंप, अशी अनेक खेळणी आहेत. विद्युत जनरेटर्सची अनेक खेळणी या वेबसाईटवर आहेत. या जनरेटरने LED बल्ब उजळण्याएवढी ऊर्जा तयार होते. लोहचुंबकांचा वापर करूनही अनेक प्रकारची खेळणी बनवलेली आहेत. चुंबकांच्या सहाय्याने पेन्सिल तरंगती ठेवणे, मोटर बनवने इत्यादी अनेक प्रयोगांचे व्हिडीओ आहेत. नारळाच्या करवंटीपासून एक सुंदर प्राणी बनवले आहेत. फ्रुटीच्या टेट्रापॅकच्या वेष्टनापासून बनवलेला क्यूब आहे. पिंपळाच्या पानापासून बनवलेले मांजर व त्याची पिल्ले आहेत. त्यांच्या खजिन्यात विज्ञानाचे धडे शिकवणारे अनेक खेळणी आहेत. चायनीज खेळण्यांपेक्षा ही खेळणी नक्कीच ओबडधोबड दिसणारी आहेत परंतु ही खेळणी मुलांच्या स्वतःच्या सहभागाने त्यांच्यासाठी खूप मौल्यवान बनून जातात. स्वतः सहभाग घेऊन बनवलेली खेळणी मुलांसाठी अनमोल असतात. हा अनुभव मी स्वतः घेतो आहे. वेबसाईटवर खेळण्यांचा प्रकारानुसार व्हिडिओचे वेगवेगळे गट केले आहेत. या वेबसाईटला रोज हजारो लोक भेट देतात. आतापर्यंत ६.५ कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिली आहे. रोज हजारो पुस्तके डाउनलोड केली जातात. पदरमोड करून या वेबसाईटचा खर्च अरविंदजीं करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने २०१८ मध्ये पद्मश्री देवून त्यांना सन्मानित केले आहे.

खेळण्यांचा जादूगार आणि  सुपरहिरो अरविंद गुप्ता ही दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर मला वेळ मिळेल तेव्हा http://www.arvindguptatoys.com ही वेबसाईट मी जवळपास दोन महिने पाहिली. त्यावरील खुपसारे व्हिडीओ आणि शेकडो पुस्तके डाउनलोड केली. या व्हिडिओच्या मदतीने जमेल तेव्हा (सुट्टीदिवशी) माझ्या मुलासह जवळपासच्या तीन- चार मुलांना काही खेळणी, वस्तू, प्रयोग करून दाखवण्याचा मी आणि माझे चार मित्र प्रयत्न करत असतो. मुलांनाही हा उपक्रम खूप आवडतो आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून अरविंद गुप्ता यांच्या जीवनप्रवासाबद्दल जसजशी माहिती मिळत गेली तसतसा मी भारावून गेलो. त्यांना भेटण्याची इच्छाही झाली. त्यांना इमेल केल्यानंतर त्यांच्या रिप्लाय मधून ते सध्या वेल्लोरे, तमिळनाडू येथे वास्तव्यास असल्याचे समजले.
@संदीप रामचंद्र चव्हाण

संदर्भ
१)वेबसाईट:- http://www.arvindguptatoys.com

२)पुस्तके:- खेळण्यांचा जादूगार (मराठी पुस्तक):- शोभा भागवत
सुपरहिरो अरविंद गुप्ता (मराठी पुस्तक):- दीपा देशमुख

 ३)मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रातील लेख:-
आनंदयोगी (ब्लॉग):- निलांबरी जोशी, ७ जानेवारी २०१८

मोडा तोडा विज्ञान शिका:- अरविंद गुप्ता, शब्दांकन: वसुधा जोशी, लोकमत १९ एप्रिल २००९

भेट एका अवलीयाची:- संजय सावरकर, अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र, वार्षिक २०११

बाप लेकीचे विलक्षण विश्व:- नीला शर्मा

A Million Books for a Billion People:- Arvind Gupta, Minefield third quarter 2009

Making science child play:- Ankila Kannadasan , THE HINDU 28 March 2017

The toymaker and his dream:- Ankila Kannadasan, THE HINDU

The toy maker who weves TRASH into EDUCATIONAL GOLD:- Chandana Banergee, American Magazine Feb 2017
झाडं लावणारा माणूस
the man who planted trees

इ. स. १९१३ मध्ये फ्रांसमधील आल्प्स पर्वतीय प्रदेशात एका ठिकाणी की जिथे पाणी नाही, झाडे नाहीत, पशु-पक्षी नाहीत, शेती नाही, अगदी तुरळक मनुष्यवस्ती आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे फक्त ओस पडलेली गावे आहेत अशा ओसाड वाळवंट वाटणाऱ्या प्रदेशात एक मेंढपाळ राहत होता. त्याच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचाही मृत्यु झालेला होता. एकटा, एकाकी आयुष्य जगत नियतीने पदरात टाकलेले दुःख कुरवाळत न बसता त्याने आजूबाजूच्या दुष्काळी परिस्थितीत बदल करण्याचा निश्चय केला. या बदलासाठी तिथे झाडे लावून वननिर्मिती करणे गरजेचे होते हे त्या अडाणी-खेडुताला उमजले होते. तो दररोज १०० सफेद्या-झाडाच्या बिया माळावर जाऊन पेरत असे. सुरवातीच्या तीन वर्षात त्याने जवळपास एक लाख सफेद्याच्या बियांची नियमितपणे लागवड केली. त्यापैकी नव्वद टक्के बिया उगवल्या नाहीत किंवा झाडे उगवूनही मरून गेली तरी दहा हजार झाडे या ओसाड माळरानावर जगतील असा त्याचा अंदाज होता. सफेद्याबरोबर त्याने बीच वृक्ष लावले, ओक लावले, भूर्जपत्र लावली. त्याचे हे काम त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच वृक्षारोपणाचे काम सुरू केल्यापासून जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षे चालले. हे काम अतिशय शांतपणे,अखंडपणे, न बोलता इतक्या सहजपणे चालू होते की तो काय करतोय हे कोणाला जाणवले देखील नाही. सुरवातीच्या पंधरा-वीस वर्षांतच तिथे हिरवेगार जंगल तयार झाले. ओसाड प्रदेशात नंदनवन फुलले. पशुपक्षी आले. जमिनीत पावसाचे पाणी मुरले. मृत झरे वाहायला लागले. काही दशकांपूर्वी चिट-पाखरूही नसलेल्या प्रदेशात पक्षांची किलबिलाट ऐकू येऊ लागली. नवनवीन प्राणी दिसू लागले. नवीन घरे बांधली जाऊ लागली, जुनी घरे दुरुस्त केली, माणसे राहायला आली, त्यांची वस्ती वाढली. १९४५ साली दहा हजार लोकवस्ती तिथे गुण्यागोविंदाने राहत होती. हे अशक्य वाटणारे काम प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी फक्त एकटा माणूस झटला. ज्याच्या स्वतःच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता त्याने उघड्या बोडक्या डोंगरावर नंदनवन फुलवले. प्रसिद्धीपासून दूर राहून अगदी शांतपणे, कुणाच्याही मदतीची- कुठल्याही मोबदल्याची-कुणाकडूनही सन्मानाची-कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न धरता, शेवटच्या श्वासापर्यंत नित्यनेमाने काम करून ज्याने नवी सृष्टी फुलविली अशा असामान्य व्यक्तीचे नाव होते… एलिझार बुफिए!

जेव्हा जग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात होरपळत होते. बॉंब, बंदुका, रणगाडे, विमाने या साधनांनी सृष्टीचा आणि मानवजातीचा विनाश घडवला जात होता त्यावेळी गरीब, अडाणी एलिझार बुफिए नावाचा अवलिया मात्र सृजनाचे काम करत होता… निष्ठेने आणि जिद्दीने निसर्गाच्या/ मानवजातीच्या कल्याणासाठी निःस्वार्थपे नवी सृष्टी घडवत होता. स्वतःच्या कामावर श्रद्धा आणि आपण खूप मोठे काम करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या ठाई होता. संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या युद्धपिपासू राज्यकर्त्यांपेक्षा आणि काम न करता फक्त बडबड करणाऱ्या सुशिक्षित लोकांपेक्षा न शिकलेला हा खेडूत जास्त सुसंस्कृत होता.

जाँ जिओनो या फ्रेंच लेखकाने एलिझार बुफिए यांच्या जीवनावर आधारित फ्रेंच मध्ये लिहलेली लघु कथा (Short story) ‘द मॅन हू प्लँटेड ट्रीज’ या नावाने १९५३ मध्ये प्रथम इंग्रजी मध्ये प्रकाशित झाली. या छोट्याशा इंग्रजी पुस्तकांमुळे एलिझार बुफिए ही व्यक्ती जगाला माहिती झाली. माधूरीताई पुरंदरे यांनी या इंग्रजी पुस्तकाचा खूप छान आणि सोप्या भाषेत मराठी अनुवाद केला आहे. अनुवादाबरोबरच त्यांनी पुस्तकामध्ये छानशी चित्रेही रेखाटली आहेत.

(युरोपातील आल्प्स पर्वतीय परदेशात झाडे लावणारा एलिझार बुफिए हा फ्रेंच मेंढपाळ जगभरात प्रसिद्धी पावला. भारतातही ईशान्येकडील आसाम राज्यात असाच एक ध्येयवेडा कार्यरत आहे. ‘फॉरेस्ट मॅन’, ‘मोलाई दा’ अशा नावांनी ओळखली जाणारी ही व्यक्ती म्हणजे जादव मुलाई पायेंग. गेली ३६-३८ वर्षे अव्याहतपणे झाडे लावण्याचे अद्वितीय काम या आसामीने केले आहे. यांचे जीवनकार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी आहे.)
--संदिप रामचंद्र चव्हाण

पुस्तकाचं नाव- झाडं लावणारा माणूस
मूळ लेखक- जाँ जिओनो
अनुवाद व चित्रे - माधुरी पुरंदरे
प्रकाशन - राजहंस प्रकाशन
किंमत - ₹६०
पाने- ६०


Thursday 7 March 2019

माणदेशी माणसं




माणदेशी माणसं
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. त्यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी वाचली होती. त्यावेळी त्यांचे माणदेशी माणसं हे १९४०/५० च्या दशकातल्या ग्रामीण कथांचे पुस्तक वाचायचे असे ठरवले होते. आज ते वाचून पूर्ण झाले.

माणगंगा नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. कायम दुष्काळ असणाऱ्या या भागात माडगूळकरांचे बालपण गेले. त्यांना त्यांच्या लहानपणापासून भेटलेली, त्यांच्या मनात घर करून राहिलेली काही माणसं त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘मौज’ साप्ताहिक मध्ये कथा म्हणून लिहण्यासाठी कागदावर उतरून काढली. नंतर १९४९ मध्ये या सर्व कथांचे मिळून ‘मानदेशी माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

स्वातंत्र्यपूर्व आणि संस्थान काळातील मानदेशातील खेड्याचे समाज-जीवण कसे होते. याचबरोबर तेथील बलुतेदार पद्धती, तेथील गरिबी, बोलीभाषा, सामाजिक- शैक्षणिक परिस्थिती, वाहतुकीच्या आणि जीवनावश्यक साधनांची असणारी कमतरता, आजूबाजूच्या परिसराचे-घरांचे- माणसांचे त्यांनी केलेले निरीक्षण पुस्तकात वाचावयास मिळते. त्यांच्या लिखाणाची शैली आपल्याला पुस्तकातून त्या काळात घेऊन जाते. आणि या कथा आपल्यासमोरच घडत आहेत असं जाणवू लागतं.
सगळीकडे असतात तशी प्रेमळ आणि तरेवाईक माणसं माडगूळकरांनाही भेटली. त्याच्या आयुष्यात आली. ही माणसं कशी जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला तो दिवस सुख-दु:खासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, चांगल्या-वाईटाबद्दलच त्यांचं वैयक्तिक मतं इत्यादी गोष्टी पुस्तकातून आपल्याला समजतात.

“बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी’’ म्हणणारा ‘धर्मा रामोशी’ आणि धर्मासाठी दिलेलं जुनं धोतर ‘लुगडं’ म्हणून वापरणारी त्याची मुलगी ‘बजा’ पहिल्याच कथेतून गरिबी म्हणजे काय असते याची जाणीव करून देते. ‘‘मास्तर, मी न्हाई जायाचा आता त्या साळंत!’’ अस म्हणत तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शाळा मास्तरच्या गळ्यात पडून रडणारा लोहाराचा ‘झेल्या’ विद्यार्थी- शिक्षक हे नातं कसं असावं आणि कसं नसावं हे सांगून जातो.
गरिबीमुळे हौस-मौज पुरवू न शकलेल्या ‘रामा मैलकुली’ला त्याची बायको सोडून जाते. तरीही “कुटंबी सुकात असली म्हंजे झालं," असं सोडून गेलेल्या बायकोबद्दलचं त्याचं मत  त्याच्या निर्मळ मनाचं आणि साधेपनाचं दर्शन घडवते.
‘‘चुलत्यानं डागलंय, खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं मानूस बरं हुतं. मी काय वेडा हाय का?’’ अशी कैफियत मांडणारा पोरका ‘मुलाण्याचा बकस’ आणि आयुष्याभर फक्त दुःख आणि दुःखच भोगलेल्या ‘बिटाकाका’ची हकीकत वाचून संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते.
प्रेमळ स्वभावाचा, स्वतःचा वाडा जळल्यावर रानात झोपडी बांधून राहनारा, आणि कुणाचेही उपकार न घेणारा ‘बन्याबापू’; जुन्या रूढी आणि गैरसमजाना चिटकून राहिलेला ‘रामू तेली’; साध्या-सरळ मनाचा परंतु चिलमीच्या व्यसनासापाई आयुष्यातून बरबाद झालेला ‘शिवा माळी’; प्रेमळ, कष्टाळू आणि तरीही आयुष्याची शोकांतिका झालेली ‘तांबोळ्याची ‘खाला’; गरिबीमुळे नैराश्याने ग्रासलेला ‘रघु कारकून’; तमशापाई मास्तरकी सोडणारा ‘नामा’ आणि काबाडकष्ट करूनही गावात पोट भरत नाही म्हणून गाव सोडून मुंबईतील तमाशात गेलेला ‘गणा’ ही सगळी चांगल्या स्वभावाची परंतु परिस्थितीने गांजलेली माणसं वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला भेटतात.
त्याचप्रमाणे गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत हात धुऊन घेणारा ‘शिदा चांभार’; शेतीच्या बांधावरून भाऊबंधकी आणि हाणामाऱ्या करणारा ‘कोंडीबा गायकवाड’; बायकोपेक्षा पोट भरणाऱ्या जनावराला (अस्वल) महत्व देणारा ‘बाबाखान दरवेशी’; इत्यादी बेरकी स्वभावाची माणसंही वेगवेगळ्या कथेतून पुस्तकात आपल्याला भेटतात.
गरीब, साधीसुधी, मनमिळाऊ, बेरकी अश्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटून झाल्यावर शेवटी कष्टाविना पैसा हवा असणारा ‘गणा भपट्या’ वाचल्यावर मात्र, मनसोक्त हसून पुस्तकाचा शेवट होतो.
अशी ही माणदेशातली वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या स्वभावाची सोळा व्यक्तिचित्रे व्यंकटेश माडगूळकरांनी अत्यंत नैसर्गिक, साध्या पद्धतीने आणि छान शैलीत रंगवली आहेत.      

आज सत्तर वर्षांनी बहुतांश खेड्यांमध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल झालेत. शैक्षणिक सुधारणा झाल्या, रस्ते झाले, कुडा-मेढीच्या घरांची जागा आरसीसी घरांनी घेतली, बलुतेदार पध्दत जवळपास संपली आहे, टीव्ही, मोबाईल, दळवळणाची साधनं घरोघरी पोहचली आहेत. एकंदरीत भौतिक विकास झाला आहे. परंतु या विकासात एकमेकांना धरून राहणारी, एकमेकांचा आदर करणारी, प्रेम-जिव्हाळ्याची माणसं मात्र कायमची हरवली आहेत.
एके काळी जातीच्या नावाने हाक मारूनही माणसांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होते. आपुलकी होती. आपलेपणा होता. आज जातीपतीची दरी एवढी वाढली आहे की माणसाला माणूस म्हणून जवळ न करता तो आपल्या जातीचा आहे का हे पाहून जवळ करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. या बदलेल्या परिस्थितीची तुलना ७०/८० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी करता मनात एक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि तो म्हणजे... अडाणी,गरीब,सोशीक,निर्मळ मनाची,माणुसकी जपणारी, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणारी माणसं होती तो काळ चांगला ?? की स्वार्थी, निगरगट्ट, भ्रष्टाचारी, स्वतःपुरता विचार करणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या माणूस नावाच्या जमातीचा हा काळ चांगला???
@संदिप रामचंद्र चव्हाण.

माणदेशी माणसं
लेखक: व्यकंटेश माडगूळकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत: १२५
पृष्ठे: १२८
जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल

माणसं दोन प्रकारची असतात.१) चाकोरीबद्ध मार्गाने आयुष्य जगणारी. २) धोका पत्करून अवघड वाटेने आयुष्याचा प्रवास करणारी. पहिल्या प्रकारात तेच तेच जिणं असतं. पाट्या टाकत दिवस ढकलले जातात. त्यांच्यासाठी आला दिवस सारखाच असतो. नवीन काही शिकण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो. तर दुसऱ्या प्रकारची माणसं ही कोणत्या तरी उत्तुंग ध्येयाच्या ध्यासापोटी वेडी होऊन जगणारी, स्वप्न पाहणारी आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारी असतात. जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल ही अशीच एक रुपककथा आहे…. उत्तुंग ध्येयाच्या ध्यासाने वेड्या झालेल्या एका समुद्रपक्षाची… जोनाथनची! की जो इतर साधारण समुद्रपक्षांपेक्षा नेहमी वेगळा विचार करत असतो. स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी इतरांच्या टीका टिपण्णीकडे दुर्लक्ष करून अखंड परिश्रम करत असतो.

लेखक रिचर्ड बाकने मानवाच्या जगण्याची शैली, त्याच्यातील हेवे-दावे, रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, पाय खेचण्याची वृत्ती आणि काहींची फिनिक्स प्रमाणे राखेतून भरारी घ्यायची जबरदस्त इच्छाशक्ती इत्यादी गुण-अवगुणांना या रुपककथेत अगदी चपखलपणे बसवले आहे. रिचर्ड बाक हा स्वत: वैमानिक असल्याने त्याने समुद्रपक्षी व त्याला दिसणारं जग अत्यंत सोप्या शब्दांत मांडलं आहे. साधारण समुद्रपक्षांचं रोजचं जगणं साधं, सरळ असतं. पोट भरण्यासाठी मच्छिमारांच्या बोटीमागून उडत राहणं. माशाच्या तुकड्यासाठी आपापसात भांडणं. कसही करून पोट भरणं. फक्त पोट भरण्यासाठीच उडत राहणं आणि या रोजच्या घटनाक्रमात जराही बदल न करणं.

जोनाथन मात्र वेगळा विचार करणारा, वेगळी स्वप्ने पाहणारा, केलेला विचार कृतीत उतरवणारा, स्वप्नासाठी धडपडणारा, धडपडताना पडणारा, पडून उठणारा आणि पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवणारा समुद्रपक्षी आहे. एके दिवशी समुद्रपक्षांच्या कळपाचे(थव्याचे) निमय मोडून ‘जोनाथन’ खूप उंच आणि गतिमान भरारी घेतो. स्वतःला आजमावतो. सुरवातीला त्याला अपयश येते. परंतु प्रयत्न करणे तो सोडत नाही. त्याच्या या धडसाला त्याचे आईवडील विरोध करतात. त्याला साधारण समुद्रपक्षांप्रमाणे वागायला सांगतात. परंतु फक्त मासे पकडण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी उडणे जोनाथनला मान्य नाही. त्याला नवनवीन काही शिकायचे आहे. तो पुन्हा पुन्हा अधिक उंचावरून आणि तीव्र गतीने उडण्याचा सराव करतो. या त्याच्या वागण्याने समुद्रपक्षांची पंचायत त्याला बेजबाबदार ठरवते व कळपातुन (थव्यातून) हाकलून देते… बहिष्कृत करते... वाळीत टाकते! जातपंचायतीच्या या निर्णयाचे आणि एकाकी राहण्याचे दुःख जोनाथनला नाही. परंतु इतर समुद्रपक्षी स्वच्छंद उडण्याचे महत्व समजू शकत नाहीत, डोळे बंद करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य नाकारत आहेत. याचे मात्र त्याला दुःख होते.

एकट्या पडलेल्या जोनाथनला त्याच्या ध्येयमार्गाच्या पुढील प्रवासात त्याला त्याच्यासारखा विचार करणारे आणि परिपूर्णतेचा स्वर्ग अनुभवणारे मार्गदर्शक मित्र भेटतात. त्यांच्यासोबत तो एक वेगळ्याच जगात प्रवेश करतो. तिथे सर्वजण परिपूर्णतेचा आनंद घेत असतात. असामान्य कामगिरीने त्यांनी त्यांचं वेगळं जग निर्माण केलेले असते. त्याच्याकडून तो खूप काही शिकतो. त्याला त्याच्या क्षमतांची, परिपूर्णत्वाची, ‘स्व’ची जाणीव होते. हवे ते मिळाल्यानंतर जोनाथन त्या स्वर्गमयी दुनियेत थांबत नाही. ज्यांनी त्याला बहिष्कृत केले, वाळीत टाकले त्या अज्ञानात खितपत पडलेल्या आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी तो ‘स्वर्गसुख’ सोडून ‘धरतीकडे’ परततो. स्वताप्रमाणे इतरांना तरबेज करण्यासाठी धडपडतो. शिकण्यासाठी जे जे इच्छूक आहेत त्या सर्वांना स्वतःजवळची कला-कौशल्ये, ज्ञान देतो. जणू दुसरे ‘जोनाथन’ बनवतो. आणि पुन्हा भरारी घेतो इतर अज्ञानी बांधवांना ज्ञानामृत पाजण्यासाठी….!
इथे कथा संपते.

कोणतंही काम करताना आपण स्वतःला झोकून दिल्यास इच्छित ध्येयापर्यंत पोचण्यास मदत होते. त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी, निर्धार, चिकाटी, आत्मबल हवे असते. या गुणांच्या जोडीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा ध्यास आपण घेतल्यास ठरवलेल्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करू शकतो. आणि एवढ्यावरच न थांबता, आपल्या यशाच्या मार्गात ज्यांनी ज्यांनी काटे पेरले त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करून त्यांच्या आणि इतर सर्व ज्ञातीबांधवांच्या भौतिक समृद्धीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी कटिबद्ध रहायचे असते. ही शिकवण या कथेतून मिळते. आयुष्यात आपल्याला काय व्हायचंय.. जोनाथन की सामान्य समुद्रपक्षी? याचा निर्णय मात्र प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा आहे...

जोनाथनची कथा छान आहे. तरुणांना प्रेरणादायी आहे. असे अनेक तरुण/तरुणी/लोक असतात की जे स्वप्न पाहतात. धोका पत्करून वेगळा मार्ग अवलंबतात. ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कष्ट करतात आणि यशस्वीही होतात. परंतु त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ‘जोनाथन’ बनतात…हे ‘जोनाथन’ मिळालेल्या यशाच्या कोशात अडकून पडत नाहीत. ज्ञानाचा दंभ त्यांना होत नाही. पद-प्रतिष्ठा आणि सत्ता-संपत्तीचे गुलाम ते होत नाहीत. समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, अज्ञान दूर करण्यासाठी अविरतपणे ते धडपडतात. आपल्या ज्ञानाचा, पदाचा, संपत्तीचा वापर ते दिन-दुबळ्या-वंचितांच्या उद्धारासाठी करतात. हे सकारात्मक चित्र एकीकडे तर दुसरीकडे मात्र आपापल्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणारी एक मोठी संख्या आपल्याच कोशात अडकलेली दिसते. ‘मी’ ची बाधा त्यांना झालेली असते. जगाशी त्यांना काही देणेघेणे नसते. ज्ञान, पद, सत्ता, संपत्तीचा वापर ते फक्त स्वतःच्या विकासासाठीच करतात. अशांना या संकुचित मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी रिचर्ड बाकने लिहलेली जोनाथनची ही रुपककथा नक्कीच उपयोगी ठरेल हे मात्र नक्की..!
@संदिप रामचंद्र चव्हाण

जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवाद : बाबा भांड
प्रकाशन: साकेत प्रकाशन
किंमत: ₹१५०
पृष्ठे: १२०


जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल
मूळ लेखक: रिचर्ड बाक
मराठी अनुवादाची pdf
http://arvindguptatoys.com/arvindgupta/m-jonathan.pdf  या लिंकवर मोफत उपलब्ध
पृष्ठे: १५ (ए४ साईज)



Sunday 3 March 2019

खरे देशभक्त बनूया...

देशात बहुतेकांना आलेला युद्धाचा ताप आता थोडा निवल्यासारखा झालाय म्हणून एक पोस्ट पोस्टावी असा विचार करून हा उपद्व्याप…

पुलगामा दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाची व सुरक्षा बलाची अपरिमित हानी झाली. चाळीसच्या वर CRPF चे जवान हुतात्मा झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरल्याने भारत सरकार व भारतीय सेनेने पाकिस्तानच्या मातीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्यासाठी एअर स्ट्राइक केला. बिनडोक पाकिस्ताननने दहशतवादी विरोधी कारवाईला सैन्यविरोधी कारवाई समजली. पाकिस्तानी हवाई सेनेच्या F16 विमानांनी भारताची हवाईसीमा ओलांडली. आपल्या बहादूर हवाई सेनेने त्यांना पिटाळून लावले. या धुमचक्रीत पाकिस्तानचे F16 व आपले Mig 21 अशी दोन विमाने अनुक्रमे पाकिस्तान व भारतीय हद्दीत पडली. परंतु दोन्हींचे पायलट मात्र पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्यारशूटच्या साह्याने उतरले. देशप्रेम म्हणजे शत्रू देशाचा द्वेष ही मानसिकता असणाऱ्या पाकिस्तानी जनतेने भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन याना मारहाण केली. अभिनंदन यांनी मोठ्या धैर्याने जवळच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला व जवळची काही कागदपत्रे गिळून तर काही कागदपत्रे पाण्याच्या डबक्यात टाकून नष्ट केली. या दरम्यान पाकिस्तान सैन्याने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले. या घटनेचे व्हिडीओ स्थानिकांनी व्हायरल केले. आपल्याला त्याचा अप्रत्यक्ष फायदाच झाला. पाकिस्तानला कबूल करावे लागले की आपला एक पायलट त्यांच्याजवळ आहे. पुढे अनेक नाट्यमय घटना घडल्या व तिसऱ्या दिवशी विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले. विंग कमांडर अभिनंदन त्यांच्या सुटकेचा अवघ्या देशाला आनंद झाला. दरम्यान पाकिस्तानच्या पायलटला भारतीय पायलट समजून पाकिस्तानच्या आंधळ्या देशप्रेमी जनतेने एवढी मारहाण केली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी बातमी वाचण्यास मिळाली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेवेळीसच काश्मीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाला व आपले चार जवान धारातीर्थी पडले. याच दिवशी देशसेवा बजावताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांवर अंत्यसंस्कार झाले. त्यामध्ये नाशिकच्या निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता. एकूणच आजवरच्या सर्व घटना पाहता आपल्या लक्षात येते की कोणत्याही दलाचा जवान हा आपले कर्तव्य पार पाडताना जीवाची बाजी लावतो. प्रसंगी हसत हसत बलिदान देतो. त्यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे इतर देशवासियांना सुखाची झोप मिळते व लोकशाही टिकते. परंतु जवानाच्या बलिदानाची किंमत मात्र त्यांच्या कुटुंबाला चुकवावी लागते. युद्धाने कुणाचेही भले होत नाही. मनुष्यहानी व देशाच्या विकासाला खीळ हे मोठे तोटे युद्धामुळे होतात. मानवाच्या विकासासाठी जगात शांतता हवी. हे सत्य असले तरी पाकिस्तान, तालिबानी, इसिस ही अशी कीड आहे की त्यांना शांततेची भाषा समजत नाही. याशिवाय जगभरातील शस्त्रास्त्रे निर्मिती करणारे मोठे कारखानदार यांनाही शांतता बोचत असते. जगात कायम युद्धजन्य परिस्थिती रहावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. कारण सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली तर त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ येईल. दहशतवाद व तेलाचे राजकारण ही युद्धजन्य परिस्थिती निर्मितीची आणखी मोठी कारणे आहेत. याशिवायही इतरही भरपूर कारणे आहेत की ज्यामुळे जगभरात कुठेना कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, निर्माण केली जाते व छोटी मोठी युद्ध घडतात. त्यामध्ये निष्पाप नागरिक मरतात. त्या त्या देशाच्या सैन्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. हे नाकारता न येणारे कटूसत्य आहे.

फक्त भारत पाक संबंधाबाबत विश्लेषण करायचे झाल्यास…  पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण, सामाजिक स्थिती खूप गुंतागुंतीची आहे. तिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप मोठी दरी आहे (तशी सगळीकडेच आहे) सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला त्यांचे लष्कर व राजकीय नेते दुय्यय स्थान देतात. पाकिस्तानचा कारभार काही लष्करी अधिकारी, ठराविक सरकारी अधिकारी व राजकीय धेंडे चालवतात. हे लोक मोठे जमीनदार,उद्योगपती व व्यापारी आहेत. मूठभर अतिश्रीमंत व्यावसाईक लोकांचे हितसंबंध पाकिस्तानी सैन्यांशी आहेत. या अतिश्रीमंतांचे आपापसात नातेसंबंध आहेत. एकमेकांच्या मुलामुलींचे परस्परात विवाह करून त्यांनी आपले वर्तुळ मर्यादित ठेवले आहे. पाकमध्ये सैन्याचे वर्चस्व रहावे यासाठी हा अतिश्रीमंत वर्ग कायमच प्रयत्नशील असतो. पाकमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापित झाल्यास त्यांचे बिंग फुटेल व त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोचेल याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ते पाकिस्तानच्या जनतेला आणि कठपुतळी सरकारला कायम नाचवत असतात आणि दबावात ठेवून भारताविरुद्ध चेतवत राहतात. त्यांचे आसन मजबूत राहण्यासाठी भारत -पाक संबध ताणलेले असणे गरजेचे असते. शिवाय चिनसारखा देश भारताची अर्थव्यवस्था कमजोर करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद पोसण्यास अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतो. पाकिस्तानची आर्थिक व सामरिक शक्ती भारताच्या तुलनेत कमी असल्यामुळे पाकिस्तान थेट युद्ध न करता दहशतवादी कृत्य व दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम सतत करत असतो. कारगिल घडण्याआधीही आणि नंतरही आपले असंख्य सैनिक व नागरिक विनायुद्धाचेच मारले गेलेत. आतापर्यंत भारताने खुप मोठ्या मनुष्यहानीचे नुकसान सोसले आहे. पाकिस्तानने घडवून आणलेल्या उरी आणि पुलगामा हल्ल्यात आपली सहनशीलता संपली व त्याची प्रतिक्रिया उमटली. भारतीय सैन्याने पाकिस्तानला समजेल अशा भाषेत कारवाई केली. परंतु या कारवाईला युद्ध म्हणून समोर आणून पाकिस्तानी सेनेप्रमाणे भारतीय मीडियानेही अकलेचे तारे तोडले. काहीवेळा ठकास महाठक बनावे लागते व भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करून हे दाखवूनही दिले. पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवादी हे कधीही सरळ न होणारे कुत्र्याचे शेपूट आहे. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून त्याचे वाकडे शेपूट तोडावेच लागेल. म्हणजे त्याना सर्व बाजूनी पंगू करावे लागेल. त्यासाठी आंतराष्ट्रीय दबाव वाढवून जरब म्हणून काही प्रमाणात युद्धही करावे लागेल. हे सर्व करण्यासाठी आपले सैन्य व नेतृत्व सक्षम आहे. पाकिस्तानवर इलाज करताना युद्ध हा अंतिम पर्याय असायला हवा. व आपल्या देशाने याबाबत कायमच संयम दाखवलेला आहे. व जगात वेगळा ठसा उमटवला आहे.

एकीकडे हे घडत असताना देशाच्या नागरिकांचीही काही कर्तव्य असतात. परंतु इंटरनेटचे कोलीत हातात घेऊन
जनता व न्यूज सांगताना वापरावयाच्या दांडक्यालाच बंदूक समजणाऱ्या न्यूज अँकरनी सर्व लाज-शरम सोडून, सैन्य कारवाईला एखाद्या क्रिकेट मॅचच्या कॉमेंट्रीचे स्वरूप दिले. कमरेचे सोडून डोक्याला बांधलेल्या विकाऊ मीडियाने अगदी ताळतंत्र सोडला आणि देशभरात युद्धज्वर वाढीस लावण्याचे काम अत्यंत बेजबाबदारपणे पार पाडले. काही राजकारणी व त्यांचे चेलेही त्यामध्ये रॉकेल ओतण्याचे काम करत आहेत. सध्या देशातील हे वातावरण पाहता व्हाट्सएप बच्चन, फेसबुकवीर आणि मीडियावरील टुकार अँकर यांना मिसाईलला बांधून पाकमध्ये सोडायला हवे असे वाटते. सोशलमीडियावरून आणि ac न्यूज रूम मध्ये बसून गप्पा मारण्याइतप्त युद्ध सोपे नसते हे त्यांच्या अविकसित मेंदूला समजेनासे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या नाशिकच्या निनाद मांडवगणे यांच्या पत्नीने याबाबत खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षित घरात बसून युद्धाची भाषा बोलणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. त्या म्हणाल्या, ‘केवळ मुर्दाबाद किंवा झिंदाबाद अशा घोषणा देत राहू नका, त्याने काही होणार नाही. काही खरेच करायचे असेल, तर सैन्यात दाखल व्हा. काही कारणामुळे ते शक्य नसेल, तर कुटुंबातील कोणाला तरी सैन्यात भरती व्हायला सांगा. तेही शक्य नसेल, तर देशसेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते अवलंबा. तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा होऊ देऊ नका, उघड्यावर शौचास बसू नका, महिलांना त्रास देऊ नका, त्यांची छेड काढू नका… असे झाले, तरच महिला सुरक्षित राहतील. आम्ही सगळे सुखरूप आहोत, हे कळल्यावर निनाद यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल.’ आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावर साथ सोडून गेलेला असतानाही तान्ह्याबाळाला घेऊन त्यांनी ज्या धैर्याने देशहिताच्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हव्यात. परंतु शहिदांच्या श्रद्धांजली पोस्टखालीच  वाढदिवसाचा केक तोंडाला फासून पोस्टीवर पोस्टी टाकणाऱ्या आणि स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या देशवासियांना खरे देशप्रेम केव्हा समजेल? हा मोठाच प्रश्नच आहे. सैनिक व त्यांचे कुटुंबीय देशसेवेची, देशप्रेमाची, देशभक्तीची जबाबदारी पार पाडतात. प्रत्येक भारतीयाने आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर लक्ष ठेवून त्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दैनंदिन वागणुकीत देशहिताच्या गोष्टी करून सच्चे देशभक्त बनायला हवे.
खरं तर युद्ध नसावेच पण काही वेळा पापिस्तानसारखा शेजारी असल्याने पर्याय रहात नाही. युद्धात ज्यांच्या घरचे कोणी शहीद होते किंवा विनाकारण मरते त्यांना युद्ध म्हणजे काय समजून येते. ज्यांना युद्ध लढावे लागत नाही त्यांना युद्ध हवे असते तर ज्यांना लढावे लागते त्यांना ते नको असते. युद्धाने विकास व मानवजात धोक्यात येते हे सर्वांना समजायला हवे. यासाठी जगभर खुप मोठी वैचारिक क्रांती हवी परंतु विचार करायला वेळच नसलेल्या संवेदनाहीन लोकांच्याकडून अश्या क्रांतीची अपेक्षा हे दिवास्वप्न ठरेल!
@संदिप रामचंद्र चव्हाण

Sunday 24 February 2019

प्रिय बाई

‘स्कुओला दि बार्बियाना’ या मूळ इटालियन पुस्तकाचे Letter to a Teacher हे इंग्रजी अनुवादित पुस्तक लेखिका सुधा कुलकर्णी यांनी वाचल्यानंतर त्यांनी त्याचा जो मराठी अनुवाद केला आहे, ते पुस्तक म्हणजेच ...प्रिय बाई, बार्बियानाची शाळा!
हे पुस्तक म्हणजे इटलीमधील डोंगराळ भागातील ‘बार्बियाना’ या छोट्याश्या वस्तीत ‘डॉन लोरेंझो मिलानी’ यांनी सुरू केलेल्या शाळेतील आठ गरीब विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेला लिहलेले पत्र आहे. खरेतर हे पत्र समाजातील उच्चवर्गीय म्हणजेच श्रीमंतांच्या दृष्टीने सोईच्या असनाऱ्या शिक्षणव्यवस्थेला उद्देशून आहे. या पत्राला व त्यातील घटनांना आज जवळपास पन्नास वर्षे उलटून गेली आहेत तरीही या पत्रातून त्या आठ मुलांनी देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणाचे मांडलेले वास्तव वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. जणू काही आपल्या आजूबाजूच्याच गोष्टी या पुस्तकातून मांडल्यात की काय, असं क्षणभर का होईना वाटून जाते.

‘प्रिय बाई, मी किंवा माझं नाव- तुम्हाला काहीच आठवणार नाही. आमच्यातल्या इतक्या जणांना तुम्ही नापास केलेलं आहे. नापास करून सरळ तुम्ही आम्हाला शेतात आणि कारखान्यात टाकून देता आणि विसरून जाता.’ पुस्तकाच्या सुरवातीलाच असणाऱ्या या ओळी वाचताना एके काळी प्राथमिक/माध्यमिक शाळांमधून नापास झालेल्या (की केलेल्या) असंख्य शाळाबाह्य मुलांचं विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ही मुले लहान वयातच प्रौढ होतात. घराला आधार म्हणून चार पैसे मिळविण्यासाठी आपल्या स्वप्नांचा चुराडा करतात. खेळण्या-बागडण्याच्या वयात ढोर मेहनत करतात. त्यामुळे त्यांच हलकं-फुलकं-लाडकं बालपण आकालीच कोमेजून जाते. भांडवली व्यवस्थेला कष्टकरी वर्गाची नेहमीच गरज असते. जणू काही कष्टकऱ्यांच्या निर्मितीसाठीच अधिक ठळक लाल अक्षरात नापास हा शेरा मारत असावेत का? हा प्रश्न पुस्तक वाचताना पडतो.

१९५४ मध्ये ‘डॉन लोरेंझो मिलानी’ हे बार्बियानाच्या चर्चमध्ये पाद्री म्हणून आले. त्यावेळी आजूबाजूच्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची दुरावस्था त्यांच्या लक्षात आली. नापास झाल्याने बहुतेक मुलांनी शाळा सोडून दिली होती. तिथल्या शिकवायच्या पध्द्तीमूळे ही मुलं नापास झाली होती व त्यांचा शिकण्याचा उत्साह मावळला होता. अशी दहा-बारा वर्षाची आठ-दहा मुलं एकत्र करून भरगच्च वेळापत्रक व एकही सुट्टी नसलेली शाळा त्यांनी सुरू केली. ‘शेतात आणि गुरा-ढोरांच्या मागे फिरून कष्ट करण्यापेक्षा शाळा कैकपटीनी चांगली’ या विचाराने मुलं रविवारीही आनंदाने शाळेत येत. त्या शाळेत आवडता विद्यार्थी- नावडता विद्यार्थी असा भेद नव्हता. उलट अभ्यासात कच्चा, मंद, आळशी असलेल्यांना आपणच सगळ्यात आवडते आहोत असे वाटण्याइतपत चांगली वागणूक त्या शाळेत दिली जात असे. शाळा जणूकाही फक्त त्याच्यासाठीच आहे असं त्यांना वाटेल, असं वातावरण त्या शाळेत होते. त्या शाळेने गरीब, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी घटकातील मुलांना सामावून घेऊन त्यांच्यामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण केला की या शाळेतील मोठी मुलं लहान मुलांना शिकवण्याचे काम करत. लहान मुलांना शिकवता -शिकवता त्यातील आठ मुलांनी एक वर्षभर मेहनत घेऊन इटलीतील शैक्षणिक प्रगती/अधोगतीची आकडेवारी गोळा केली. कष्टपूर्वक मिळवली. त्या आधारावर त्यांनी आधीच्या शाळेत भेटलेल्या बाईंना (एक प्रकारे शिक्षणव्यवस्थेलाच उद्देशून) हे पत्र लिहले आहे.

या पत्रात शिक्षक, शिक्षणव्यवस्था, राज्यकर्ते, शिक्षणाधीकारी यांच्यावर जोरदार कोरडे ओढलेले आहेत. तसेच श्रीमंत आणि गरीब मुलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या दर्जाबाबत, असमान संधीबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा या मुलांचा दृष्टिकोन आणि कोवळ्या वयातल्या कडू अनुभवांच्या चटक्यांनी त्यांना आलेलं डोळस शहाणपण या पत्रातून दिसते. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून विविध कारणाने मुलांची शाळेतून गळती होते. त्यामध्ये मुलांना नापास केल्याने होणाऱ्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. यात सर्वाधिक प्रमाण गरीब कुटुंबातील मुलांचे असते. ही गळती झालेली मुले बालकामगार म्हणून काम करतात परंतु सरकारला या मुलांचा विसर पडलेला असतो किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामाला लावायची मनाई असणारा कायदा इटलीमध्ये आहे. परंतु हा कायदा शेतीसाठी लागू नाही. म्हणजे शेतकऱ्यांची मुलं ही बालके नसून प्रौढ (बापे) असतात असंच सरकारला वाटतं की काय? ही शंका ते पत्रातून व्यक्त करतात. शिक्षकांचे कामाचे तास, त्यांच्या पगारी सुट्ट्या, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि इतर कामगारांना कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला, त्यांच्या कामाचे तास इत्यादी अनेक विषयांवर ते भाष्य करतात.

नापास केल्याने बहुतेक गरीब मुलांची शाळा सुटणे हे सर्वात मोठं कारण असले तरी ‘शाळाच आवडत नाही’ हे शाळा सोडण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे. मुलांना शाळेचा वर्ग बंदिखाना वाटतो, तिथे अपमानित आणि सतत दबावाखाली रहावे लागते म्हणून शाळा सोडणारी मुलं आहेत या गोष्टीकडे ते लक्ष वेधताना म्हणतात की ‘शाळेमध्ये कंटाळवाणेपणा कळसाला गेला आहे.’ याउलट बार्बियानाच्या शाळेत मुलं सुट्टी घेत नाहीत. इतर शाळेत मुलं सुट्टीची वाटच बघत असतात. मग कोणती शाळा चांगली आणि मुलांचा विचार करणारी आहे? असा तुलनात्मक प्रश्न ते शिक्षणव्यस्थेला विचारतात. शाळा सोडण्याचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे मुलांना चांगले लिहता-वाचता येत नाही हे होय. शिक्षक आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नाहीत. कामाचे तास कमी व आर्थिक मोबदला जास्त म्हणूनच या शिक्षकी पेशाकडे वळणारांची संख्या जास्त आहे असा आरोप ते करतात. प्राथमिक शाळेत ८०% गरिबांची मुले तर २०% आर्थिक सदन कुटुंबातील मुले असतात हे चित्र विद्यापीठात मात्र पूर्णतः पालटते. विद्यापीठात गरिबांची मुले २०% पेक्षा कमी तर श्रीमंतांची मुले ८०% पेक्षा जास्त असतात. उच्च शिक्षणाचे अर्थकारण स्पष्ट करताना गरिबांच्या कराच्या पैशातून श्रीमंतांची मुलं कशी शिकतात हे वास्तव ते आकडेवारीच्या सहाय्याने शिक्षणव्यवस्थेला समजावतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही उपायही ते सुचवतात. विद्यार्थ्यांना नापास करू नका. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांसाठी दिवसभर शाळा भरवा. पती पत्नीने मिळून घरी चालवलेली व ठरीव वेळापत्रक नसलेली आणि प्रत्येकाला खुली असणारी पूर्णवेळ शाळा बनवता येईल का यावर विचार करा. असे काही पर्याय ते व्यवस्थेला सुचवतात. याशिवाय ते पालकांच्या संघटनेचे महत्व विशद करतात. त्यांच्या मते आईवडिलांची अशी एक छान संघटना असावी  की जी शिक्षकांना आठवण करून देईल की त्यांना पगार आम्ही (पालक) देतो आणि हा पगार आमची (विद्यार्थ्यांची) सेवा करण्यासाठी आहे...आम्हाला शाळेच्या बाहेर हाकलून लावण्यासाठी नाही.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात बार्बियानाच्या शाळेत इतर श्रीमंत शाळांपेक्षा जास्त योग्य प्रकारे माणुसकी शिकवली जाते हे सांगितले आहे. बसमधून प्रवास करणाऱ्याकडे कानाडोळा करायला गाडी, इमारतीतल्या माणसांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लिफ्ट, एकमेकांच्या घरी जाणे टाळण्यासाठी टेलिफोन इत्यादी (अ)सुविधा वापरणाऱ्याना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला आणि इतरांचे ऐकून घ्यायला शिकवण्यास श्रीमंत शाळा कमी पडल्या आहेत ही गोष्ट ते नेमकेपणाने पटवून देतात. एकूणच बिघडलेली/बिघडवलेली शिक्षणव्यवस्था ठीक करावयाची असेल तर पालकांनी संघटित होऊन शिक्षणाप्रति जागरूक असायला हवे यावर ते भर देतात. या जागृतीसाठीच तर त्यांनी हे पुस्तक(पत्र) लिहलय असं ते सांगतात आणि म्हणूनच जिथं जिथं म्हणून मुलं शाळेबाहेर हकलली जातात त्या प्रत्येक देशात हे पुस्तक पोचलं पाहिजे असे या पुस्तकाच्या आठ लेखकांना वाटते.

आकाराने १२×१८ सेमी असे छोटसे असणारे हे पुस्तक कथा-कादंबऱ्या वाचणाऱ्यांना रुक्ष, निरस आणि कंठाळवाणे वाटू शकते. परंतु वास्तव जग हे काल्पनिक जगाहून वेगळे असते ते समजून घ्यायला स्वानुभव किंवा अशी पुस्तके उपयोगी पडतात. अशा वाचनातून सामाजिक परिस्थितीची जाणीव होते. मनात काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठीचा थोडाफार प्रयत्नही होऊ शकतो. प्रश्न समजले की उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नांना थेट भिडण्याची वृत्ती वाढते. यातून व्यवस्था भलेही बदलू शकलो नाही तरी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर काही सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे.
@संदिप रामचंद्र चव्हाण

प्रिय बाई, बार्बियानाची शाळा.
मराठी अनुवाद: सुधा कुलकर्णी
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन
मूल्य: ₹१२०
पाने:१३६