My Blog List

Thursday, 19 April 2018

एका सार्वजनिक मंडळाची अनोखी स्वप्नपूर्ती....

एका_सार्वजनिक_मंडळाची_अनोखी_स्वप्नपूर्ती....
किल्ले_आग्रा_ते_कोपर्डे_हवेली(ता:कराड;जि:सातारा) मार्गे_किल्ले_श्रीरायगड शिवज्योत प्रवास...

महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या जयंती निमित्त शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवरुन शिवज्योत(मशाल) पेटवून आणण्याची परंपरा खुप वर्षांपासून सुरू आहे.
शिवस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणी जाऊन प्रेरणा मिळते. इतिहास समजून घेण्याची लालसा निर्माण होते. शिवजयंतीचे औचित्य साधून अशा ठिकाणाहून शिवज्योतिच्या रूपाने प्रेरणा घेऊन, तरुण मंडळे आपल्या मूळ गावी परततात. जे लोकं गडकोटांवर जाऊ शकत नाहीत त्यांना या शिवज्योतिच्या दर्शनाचे समाधान लाभते. धर्मवीर_संभाजी_मंडळ कोपर्डे हवेली, ता कराड, जि सातारा. यांनी ही परंपरा गेली तीस वर्षे अखंडपणे जपलेली आहे.
  कराड तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेले #कोपर्डे_हवेली हे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हा मुख्य आधार असलेल्या या गावात सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धपडणारी अनेक तरुण मंडळे आहेत. धर्मवीर संभाजी मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाची स्थापना १९८८ साली झाली. गेली ३० वर्षे शिवजयंतीउत्सव, गणेशोत्सव अखंडपणे साजरा केला जात आहे. या तीस वर्षात तरुणांच्या तीन पिढ्या झाल्या.  १९८८ ते १९९८, १९९८ ते २००८ आणि २००८ ते २०१८ अश्या दहा दहा वर्ष्याच्या कालखंडात जुनी पिढी नोकरी धंद्यानिमित बाहेर पडली आपल्या संसाराला लागली. पुढील पिढीने मंडळाचे काम नेटाने चालवले. सध्या पहिली पिढी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. दुसरी पिढी आता थोडी मागल्या पावलावर आहे आणि तिसरी पिढी मंडळाची धुरा सांभाळून आहे. आपले शिक्षण, रोजगार पाहून प्रतिकूल परिस्थितीत सामजिक काम करत एकमेकांप्रती स्नेह, मैत्री, जिव्हाळा जपून, सर्व जुने जाणते सदस्य मार्गदर्शक म्हणून तर नवीन पिढी धडाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून मंडळातील सदस्यांनी एक स्वप्न पाहिले होते.... शिवस्पर्शाने पावन झालेल्या आग्ऱ्याच्या किल्ल्याहून कोपर्डे हवेलीत शिवज्योत आणायची.

साधनांची कमतरता, आर्थिक परिस्थिती, व प्रत्येवेळी काहीतरी अडथळा त्याचबरोबर धकाधकीच्या आयुष्यात दहा बारा दिवस वेळ काढणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. या व अश्या कारणामुळे हे स्वप्न दिवास्वप्न ठरतंय कि काय अशी स्थिती झाली. मी ज्यावेळी या मंडळाचा सक्रिय सभासद म्हणून काम पाहू लागलो तो काळ म्हणजे १९९८ ते २००८/०९ त्यावेळीही तेच स्वप्न तीच चर्चा शिवजयंतीच्या दरम्यान दरवर्षी चालू असायची. तोपर्यंत तरी जिल्ह्यातून १७०० किलोमीटरचा एवढा मोठा प्रवास करून शिवज्योत कोणी आणलेली नव्हती. हे कार्य पार पाडायचे असं एकदा नियोजनही झालं. या दरम्यानच्या काळात मंडळाचे अनमोल रत्न 'दत्तात्रय चव्हाण' काळाने हिराऊन घेतले.😢 पुढे असेच दोन धक्के बसले. आणि पुन्हा हा विषय लांबणीवर पडला. गेल्या पाच सहा वर्षात मंडळाची तिसरी पिढी कामाला लागली. जेष्ठांची पहिली पिढी सदैव पाठीशी तर दुसरी पिढी आर्थिक भार उचलायला नेहमी तयार राहिली..... आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य उचलले..... तीस वर्षाचं स्वप्न सत्यात उतरणारा तो दिवस आला...
दि.५ एप्रिल २०१८ रोजी बारा 'मावळे' आग्ऱ्याच्या दिशेने कूच झाले. लक्ष्मण कृष्णत साळवे(दादा), जयवंत उर्फ सिद्धनाथ बाबुराव चव्हाण, अभिजित सुदाम चव्हाण, गोरख रामचंद्र चव्हाण, गणेश भीमराव चव्हाण, विक्रम भानुदास चव्हाण, गणेश बाबासो साळवे, नितीन अरुण तुपे, कृष्णत सुभाष भोसले, सचिन अर्जुगडे, अंकुश लक्ष्मण शिंदे आणि वाहन चालक अनिकेत गोसावी ही ती मंडळी होय.
आयशर ट्रक, एक सायकल, एक मोटरसायकल, जेवन बनवण्यासाठी गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, जेवणाचे साहित्य इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन ही मंडळी कराड-पुणे-गुजरात मार्गे- राजस्थान(जयपूर)- दिल्ली(लाल किल्ला)- आग्रा असा प्रवास करून ९ एप्रिलच्या सकाळी आग्ऱ्याच्या किल्यावर पोचली. किल्ला पाहून दुपारी शिवज्योत पेटवली. आणि सायकलरुन प्रवास चालू झाला... किल्ले आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली.

सामान्य घरातील पोरं जेव्हा एखाद्या स्वप्नाने वेडी होतात तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतात. आणि असामान्य काम करून दाखवतात. जे लोकं काहीतरी करण्याचे स्वप्न पाहतात ते त्या दिशेने कृती करतात. जीे लोकं स्वप्ने पाहतच नाहीत, त्यांना काहीच करता येत नाही. स्वप्न पाहणे हा अर्धा भाग असतो, ही स्वप्ने व्यवहारात साकार करणे हा उरलेला अर्धा भाग असतो. जे फक्त स्वप्नेच पाहतात ते फार तर कवी होऊ शकतात. ज्यांच्यात काही करून दाखवण्याची धमक असते ते स्वप्नांच्या पुर्तीसाठी झटतात.

गेली पावणेचारशे वर्षे 'शिवाजी' नावाची जादू सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करत आहे. आपल्या देशात एखाद्या राजाला ईश्वरी अंश मानले गेले, त्याला देवत्व बहाल केले असे एकमेव शिवछत्रपती!! कोट्यवधींच्या कल्याणाची स्वप्न पाहणाऱ्या राजाचा इतिहास भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना कळावा, त्यांच्या उपसलेल्या कष्टाचा एक अंश जीवन आपण जगून पहावं म्हणून 'आग्रा ते रायगड' शिवज्योत आणणे हा प्रपंच!!

या मोहिमेत सहभागी बारा मावळ्यांनी जातानाच्या प्रवासात घरूनच सोबत न्हेलेल्या शिदोरीवर दिवस काढले. तर परतीच्या प्रवासात स्वतः अन्न शिजवून पोट भरले. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाऊन जिभिचे चोचले भागवण्यासाठी हा एवढा मोठा प्रवास नाही. त्यासाठी आलोही नाही याचे भान त्यांनी ठेवले. शिवरायांच्या मावळ्यांना सुपारीच्या खांडाच व्यसन नव्हतं, हे आमच्यावर आमच्या वडीलधार्यांनी कायमच बिंबवलेलं आहे. त्यामुळे दारू पिऊन शिवजयंती करतात हे बोलणार्यांनी अशा तरुणांची एकदा भेट घ्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीत कसे रहायचे. त्या परिस्थितीत कसा संघर्ष करायचा. आपल्या ध्येयापर्यंत कसे पोचायचे. त्यासाठी नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्य या गोष्टी कशा महत्वाच्या असतात याचे बाळकडू शिवचरित्रात आपल्याला वाचायला मिळते. आग्रा ते रायगड प्रवास करताना तसे जगायला मिळते.

हा प्रवास करताना या तरुणांनी दिवसरात्र आलटून पालटून सायकल चालवली. त्यांच्या अनुभवावरून त्यांना असं जाणवलं की बाहेरच्या राज्यात शिवरायांना मानणारा, त्यांच्या बद्दल कुतुहल असणारा खूप मोठा वर्ग आहे. शिवरायांची प्रतिमा, डिजिटल फेक्स, भगवा झेंडा ई. ट्रकला लावले असल्यामुळे लोक आस्थेने चौकशी करायचे. दिल्लीसारख्या शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश नसलेल्या ठिकाणीही त्यांची अडवणूक झाली नाही. (वाहनाची सर्व कागदपत्रे, इन्शुरन्स, पियुसी असे कायदेशीर सर्व आवश्यक बाबी सोबत होत्या.) गडबड गोंधळ, उगाचच घोषणाबाजी असला प्रकार नसल्यामुळे व मितभाषी स्वभावामुळे पोलिसांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी मदतच केली. मध्यप्रदेश मध्ये लोक सायकल व त्यापाठोपाठ असणारी मोटरसायकल थांबवून आर्थिक मदत करायचे. आस्थेने विचारपूस करायचे. जेवण्यासाठी आग्रह धरायचे. हे प्रेम का बरं देत असतील... त्यांचं आमचं नात काय?? या प्रश्नांच उत्तर म्हणजे छत्रपती शिवराय!!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। 
यशवन्त, कीर्तिवन्त। सामर्थ्यवन्त,वरदवन्त।
पुण्यवन्त, नीतिवन्त। जाणता राजा।। 

या जाणत्या राजाने जात- पात, धर्म, राज्यांच्या सीमा याचा विचार कधीच केला नाही. एतद्देशीयांचे म्हणजे स्वकीयांचे, प्रजेचे राज्य यावे, म्हणून ते आयुष्यभर झटले, झगडले, लढले. आज महापुरुषांना जातीच्या, धर्माच्या चौकटीतून पाहणारे करंटे आपण, महापुरुषांच्या विचारांची राखरांगोळी करतोय याचे भान ठेवत नाही.

९ एप्रिलला सायकवरून चालू झालेला प्रवास मजल दरमजल करत १४ एप्रिल रोजी पुण्यात पोचला. सातारच्या मातीतून पुण्याच्या कर्मभूमीत स्थिरावलेल्या सातारकरांना मग काय आनंद झाला. 'सातारा मित्र मंडळ' आणि पुणे स्थित 'कोपर्डे हवेली युवा मचं' यांनी या बारा मावळ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी बारामावळात केली. सर्वांच्या डोई मानाचे फेटे बांधले. छोटेखानी स्वागत सभा झाली. मस्त गोड जेवण बनवले गेले. अनेक दिवस स्वतः शिजवून जेवण खाणाऱ्या मावळ्यांचे घरच्या लोकांनी केलेल्या प्रेमाच्या जेवणाने मन तृप्त झाले. आता थोडी तरतरी आली. 'अन्नदाता सुखी भव' या सदिच्छा देऊन मावळ्यांनी रायगडच्या दिशेने कूच केले. या मित्रांचा उत्साह पाहून 'कोपर्डे हवेली युवा मचं' ज्यांच्या प्रेरणेने स्थापन झाला ते संजय चव्हाण(आबा) या सवंगड्यांसोबत पुणे-रायगड-कोपर्डे हवेली या प्रवासात सामील झाले.

हे तेरा मावळे १५ एप्रिलच्या संध्याकाळी रायगडवर पोचले. श्रीशिवछत्रपतींच्या पायावर मस्तक ठेऊन, आग्ऱ्याहुन आणलेली ज्योत होळीच्या माळावर असणाऱ्या सूर्याच्या चरणी ठेवली. समाधीचे दर्शन घेतले. जगदीश्वराचे दर्शन घेतले. शिवतीर्थ रायगडची धूळ मस्तकाला लावली आणि जन्मभूमीकडे कूच केले.
या प्रवासात सर्वसाधारणपणे सर्वांनी दीडशे ते दोनशे किलोमीटर सायकल आलटून पालटून चालवली. अभिजित चव्हाण यांनी एका दमात ८०/९० किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला व एकूण प्रवासात २०० किलोमीटपेक्षा जास्त सायकल चालवली. गणेश चव्हाण २२५ व कृष्णत भोसले यांनी २९० किलोमीटर सायकल(रात्रीची) चालवली. कोणताही सराव नसताना किंवा सायकलपटू नसताना फक्त जिद्दीने हा प्रवास केला.(या मोहिमेत सहभागी असलेले गणेश चव्हाण हे प्रवसासाठी वापरलेल्या आयशर ट्रकचे मालक आहेत. त्यांचे मोठे बंधु 'बजरंग चव्हाण' हा माझा वर्गमित्र व गावातील एका सहकारी संस्थेचा चेअरमन आहे. सामाजिक कामात आपली वाहने(ट्रक, ट्रॅक्टर) कोणत्याही आर्थिक फायद्याविना ते देत असतात या व्यवहारीक जगात तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्या ठाई आहे. राज्याच्या सीमा ओलांडून एवढ्या दूरच्या प्रवासाला, एवढ्या दिवसाचे उत्पन्न बुडवून फक्त डिझेलच्या खर्चावर ट्रक देणे ही साधी गोष्ट नव्हे.)

शिवज्योतीचा प्रवास पुढे सुरू झाला... रायगडहुन पोलादपूर- महाबळेश्वर असा प्रवास करत सातारा जिल्ह्यात आगमन झाले, जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. सातारा जिल्ह्यातून (बहुतेक)प्रथमच कोणी आग्र्याहून शिवज्योत आणत असल्यामुळे लोकांना कुतूहल वाटले.
दि १७ एप्रिल रोजी भगवे फेटे बांधून कोपर्डे गावातील तरुण मंडळी स्वागतासाठी कराडच्या वेशीवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. कराड शहरातून भव्य मिरवणूक काढून, दत्त चौकातील अश्वारूढ शिवमूर्तीचे दर्शन घेतले. नंतर शिवज्योत कोपर्डे हवेली गावात आली. 'वरुणराजाच्या' साक्षीने गावातून मिरवणूक काढली गेली....  तीस वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती झाली!!
(कोपर्डे गावात अनपेक्षित घडलेल्या दुःखद घटनेंमुळे मर्दानी खेळाचा कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांचा छोटेखानी सत्कार केला गेला.)

या मोहिमेत मी ज्यांना दादा म्हणतो, मला जे दादा म्हणतात (मोठा भाऊ या नात्याने) व माझे अगदी समवयस्क असे सवंगडी सामील झाले. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या बालपणीच्या मित्रांनी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात एवढा मोठा पल्ला मोठ्या जिद्दीने सायकलवरून पार केला. आम्हाला जमले नाही ते करून दाखवले. मंडळाचे स्वप्न साकार केले. मला दुःख या गोष्टीचे होते की मी या क्षणांच्या अनुभवाला, या क्षणांचा साक्षीदार होण्याला मुकलो. मी दिल्ली, आग्रा पाहिले नाही असे नाही, ते पाहिले आहे. पण पर्यटक म्हणून...तिथे फक्त पर्यटन होते, इथे मनाचे संवर्धन आहे. आताच्या काळात आग्र्याला किंवा कुठूनही कुठे जाणे काहीच अवघड नाही. पण त्या ठिकाणी एका अनामिक ओढीने, धेय्याने, पडेल ते कष्ट हसत हसत सहन करून जाणे वेगळे! म्हणून त्याचे महत्वही वेगळे!!

कोणतेही चांगले सामजिक,सांस्कृतिक काम होण्यासाठी किंवा झालेल्या कृतीपाठीमागे, कृतींच्या स्फुर्तीमागे तितक्याच चांगल्या दृष्य आणि अदृष्य शक्ती असतात, आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात, सदिच्छा असतात. दृष्य गोष्टी दिसून येतात. त्या लोकांना सहज समजतात. अशा कृतीपाटीमागचे अदृष्य हात सहसा कोणाला दिसत नाहीत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्या हातांनी दिलेला असतो. तो विश्वास कृती करणाऱ्यांचे मनोबल वाढवतो. यात प्रकर्षाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे..
सुदाम मारुती चव्हाण(तात्या), बाळासाहेब चव्हाण(नाना), शिवाजी अधिकाराव चव्हाण(दादा), गुरुदत्त चव्हाण(काका) या दोन जेष्ठ व दोन युवा आधारस्तंभांनी कायमच अशा कार्यात मंडळाला साथ दिली आहे. त्याच्या साथीनेच हे कार्य तडीस गेलेे आहे.
हरिपाठ मंडळ कोपर्डे हवेली, गावातील सर्व सार्वजनिक मंडळे, बजरंग चव्हाण(ट्रक देणारे), अशोक चव्हाण(मंडप डेकोरेशन), अंकुश शिंदे (मोटरसायकल देणारे), मनोज चव्हाण(सायकल देणारे), आणि बहुसंख्य कोपर्डेकर तरुण, ग्रामस्थ यांचे सहकार्य कालच्या कराडमधील मिरवणुकीत व एकूणच सर्व कार्यक्रमात लाभले.

गुरुवर्यांनी सांगितलेला एक श्लोक सांगून माझं लांबलेल माहितीपर मनोगत पूर्ण करतो..
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा!
जयच्या स्मृतीने जळे म्लेंच्छ बाधा!!
नुरे देश अवघा जयाच्या अभावी!
#शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी!!
ज्यांनी 'शिवाजी' हा आपल्या जगण्याचा मंत्र केला त्यांना आयुष्यभर कसं वागावं याचं तंत्र अवगत होतं. आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी, दाखवलेले धाडस या जीवलगांना आणि मंडळाच्या इतर सदस्यांना कायम प्रेरणा देत राहील. या बद्दल शंका नाही.
अक्षय_त्रितीयेच्या_हार्दिक_शुभेच्छा!!
आपला मित्र...
©संदिप रामचंद्र चव्हाण





Sunday, 15 April 2018

मराठी पुस्तक: छत्रपती शिवाजी महाराज जीवन_रहस्य

छत्रपती_शिवाजी_महाराज_जीवन_रहस्य

एखाद्या राष्ट्रपुरुषाला देवत्व बहाल केले, किंवा त्याला ईश्वरी अवतार मानले की त्याच्या जीवनातील संघर्षाचा, कर्तृत्वाचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायची आणि त्या राष्ट्रपुरुषाप्रमाणे आचरण करण्याचीही जबाबदारी राहत नाही. पळवाट शोधून पळायला सामान्य व्यक्ती नेहमीच तयार असतो. आपल्या देशात सध्या राष्ट्रपुरुषाना अशी देवत्व बहाल करण्याची स्पर्धा चालू आहे.

छत्रपती शिवरायांचा मानव्यपातळीवरून अभ्यास करायचा झाल्यास नरहर कुरुंदकर यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य' हे अप्रतिम पुस्तक आहे. अवघ्या सहा प्रकरणात आणि साठ पानात त्यांनी शिवरायांचं 'जीवन-रहस्य' खूप मार्मिकपणे व्यक्त केलेलं आहे. 'श्रीमान योगी' या प्रसिध्द कादंबरीला कुरुंदकरांची प्रस्तावना लाभली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' हे त्याचं बहुदा शेवटचे पुस्तक आहे. या पुस्तकाची प्रस्तावना लिहताना कुरुंदकरांचे अकाली निधन झाले असा उल्लेख स.मा.गर्गे करतात.

जनतेला हा राजा ईश्वरीअंश का वाटला, यशाची खात्री नसतानाही औरंजेबाने स्वतः दख्खनच्या मोहिमेत उतरून शिवरायांचे राज्य संपवण्याचा विडा का उचलला, भारताच्या इतिहासात प्रथमच जनता राज्य वाचवण्यासाठी का लढली. याचा उहापोह केलेला आहे . शिवाय महाराजांचे धर्मविषयक धोरण, सैन्यउभारणी, आरमाराची बांधणी, प्रजेच्या हिताचा विचार, न्यायनिवाडे देण्याची रीत, युद्धातील यशापयश, शिवरायांचे नियोजन, नियोजनपूर्वक साहस, धक्कातंत्र, सैन्य व प्रजा यांचा संबध, शिवरायप्रती प्रजेची अभंग निष्ठा, राज्यभिषेक, औरंजेबच खरा शत्रू आहे व त्याच्या मुकाबल्याची तयारी, आरमाराची उभारणी, अनेपाक्षित मृत्यू या घटनांचा मागोवा या पुस्तकात लेखकांनी घेतला आहे. शिवचरित्राचा अभ्यास करताना हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
कोणताही भपकेबाजपणा किंवा नाटकीपणा नसलेलं तरीही शिवरायांची खरी ओळख करून देणारं छोटंं पण मोठं पुस्तक..!!
संदिप रामचंद्र चव्हाण

मराठी पुस्तक:
छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य
लेखक -नरहर कुरुंदकर
किंमत- ६०रु
प्रकाशन- इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे.
पृष्ठ :- ६०

Tuesday, 10 April 2018

मामाचा गाव हरवलाय....

 मामाचा गाव हरवलाय ...आणि हरवलंय बालपण!
एकेकाळी सुंदर निसर्ग, प्रेमळ आजी-आजोबा, सुगरण मामी, बालहट्ट पुरवणारा मामा, मायेची मावशी-आत्या, लहान मोठे मामेभाऊ-आतेभाऊ ही सगळी मंडळी उन्हाळी सुटयामध्ये आजोळी भेटायची. उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की ग्रामीण व शहरी भागातली मुले मामाच्या गावाला जायची. तेथे गेल्यावर भरपुर खेळायची, विटीदांडू, लगोऱ्या, आबाधबी, लपाछपी (इस्टॉप), चौलोस, गोट्टया, सुरपाट्या, लंगडी, सिगारेटची पाकिटे गोळा करून पाकिटाने खेळणे, पत्ते, सापशिडी असे खेळ असायचे. त्याचबरोबर सर्वजण पोहायला शिकायची, तास न् तास विहीरीत/नदीत डुंबायची, मौजमस्ती करायची. सुट्या लागल्या की मामा न्यायला येणार म्हणून बच्चेकंपनी खुश असायची. सर्व मावस भाऊ/बहीण आणि मामाची मुलं एकत्र आली की पायाला भिंगरी अन कानात वारा भरलेल्या वासरासारखी दिवसभर हुंदडायची.

आजची परिस्थिती मात्र झपाट्याने बदलत आहे.
एकेकाळच्या आठवणीतील सायकल गेली आणि बुलेट आली. बैलगाडीची जागा फोरव्हिलरने घेतली. सायकलवरून/बैलगाडीतुन फिरण्याची मजा बुलेट/फोरव्हीलरमध्ये कुठे आहे? खेळांचंही तेच झालं अंगणात, मैदानावर खेळले जाणारे खेळ बंध झाले. त्याची जागा मोबाईल, टॅबवरील गेम्सने घेतली. लोखसंख्या वाढीचा अन भोंगळ सरकारी नियोजनाचा फटका मैदानांना बसला त्यामुळे मैदाने कमी झाली आणि त्यावर मनसोक्त खेळणारी मुलंही.... ती गुंतली टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल मध्ये.

'गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी' असे म्हणण्याची वेळ सद्या आली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनाचा, बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा फटका लहानग्यांच्या सुट्टीलाही बसला आहे. मामाचा चिरेबंदी वाडा कधीचाच ढासळला आहे. त्याजागी वन,टू,थ्री बीएचके फ्लॅट असणारी अनेक मजली अपार्टमेंट झाली आहेत. रो-हाउस, कडेकोड कंपाऊंड असणाऱ्या बंगलोंनी आपापली हद्दनिच्चीती केली आहे. अगदीच तसे नसले तरी प्रत्येक मामाची छोटीमोठी पण वेगवेगळी घरे झाली आहेत. एकत्र कुटुंब शोधून सापडत नाही. घरातील छोट्या मोठ्या वादविवादाने, प्रॉपर्टीसाठी होणाऱ्या भांडणाने, म्हातारा/म्हातारीचा (काही ठिकाणी म्हाताऱ्या आई वडिलांना बोलण्याची पध्द्त) सांभाळ कुणी करायचा यावरून भावाभावांचे पटत नाही. या कारणातून सक्के भाऊ पक्के वैरी होतात. मुलीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क मिळाल्यामुळे काही ठिकाणी सासुरवासिनीला माहेरच्या संपत्ती/शेतीवाडीत हक्क मागायला लावणारा नवरा, सासू-सासरे भेटतात. याकारणाने बहीण-भावाच्या नात्यात दुरावा येतो. मनं कलुषित होतात. त्याचा परिणाम भाच्यांचे आजोळ कायमचे तुटण्यात होतो.

काळाच्या ओघात आधुनिक मामा पोटापाण्यासाठी आजोळातून हद्दपार झाला. रोजगारासाठी दूरच्या शहरात, अगदी परदेशात स्थिरावला. मामाला वेळ असेल तेव्हा भाच्यांची शाळा असते व भाच्याना सुट्ट्या असतील तेव्हा मामाला वर्कलोड असतोे. त्यामुळे भाच्यांसाठी वेळ द्यायला मामाकडे वेळच नाही. 'मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या नोटा....' बालगीतातील या ओळींचा खराखुरा प्रत्यय येऊ लागला आहे. मामा राहत असलेला गाव(शहर) खूप मोठा आहे. मामाकडे पैसाही आला आहे पण या मोठ्या गावात भाच्यांचा जीव लागत नाही. पैशाच्या नोटा त्यांना नको आहेत. त्यांना हवी असणारी मायेची माणसं त्या ठिकाणी भेटत नाहीत. मामाच्या मोठ्या गावी आणि नवीन घरी आजी आजोबांना स्थान नाही. असलेच तर घरात त्यांना किंमत नाही. एके काळी आजोबांचा असणारा दरारा आता राहिला नाही. सगळ्या घराचं ओझं वागवणारे आजी आजोबा आता मुलांना ओझं वाटत आहेत. आजी-आजोबा स्वतःच परावलंबी(?) असल्याने नातवंडांना हवं ते देऊ शकत नाहीत. जॉब करणाऱ्या मामीला स्वतःचाच डबा करायला वेळ नाही. असलाच वेळ तर टीव्ही, मोबाईलमधून सवड नाही अन स्वयंपाकाची आवड नाही. त्यामुळे 'रोज रोज पोळी शिकरण' हे बोलणं बालगीतापूरतं मर्यादित राहिलं आहे. त्यातच ती कॅलरी कॉन्शन असल्यामुळे रोज रोज पोळी शिकरण करण्याची शक्यताही नाही. या व अशा कारणाने भाच्यांचे मन इथे लागत नाही.

गेल्या पंचवीस/तीस वर्षाचा विचार केल्यास त्यावेळी असणारे भाचे/भाच्या आज मामा/मामीच्या व पालकाच्या भूमिकेत आहेत. हे नवपालक व अलीकडचे मामा/मामी जरा जास्तच जगरूक झालेत. आपल्या मुलांना सुट्टीमध्ये मनसोक्त खेळु बागडू न देता, वेगवेगळ्या व्हेकेशन कँम्पला, पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या ट्युशनक्लासला त्यांची ऍडमिशन घेतात. त्यांचं बालपण हिरावतात. त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात सगळंच कस आखीव, रेखीव असतं. तिथे दंगामस्तीला वावच नसतो. शिस्तीचा तर अतिरेखच असतो. आपल्या लहानपणी आपण काय करत होतो याचा विसर पाडून मुलांचं बालपण हिरावून घेण्यात नवपालकांनी मोठीच आघाडी घेतली आहे. कुटुंबांच्या नॅनो आवृत्तीमुळे मुलांना अनेक नात्यांना मुकावे लागत आहे. त्याची परिणीती मामाचा गाव हरवण्यात होत आहे.

एकुलता एक, एकुलती एक या कारणाने मुलांवर अतिप्रेम. मुलांना कुणी रागावलेलं पालकांना चालत नाही. मुलं एकत्र येऊन वादविवाद होतात. एकत्र जमल्याचा निर्भेळ आनंद घ्यायचा सोडून माझी मुलं इतरांच्या मुलापेक्षा किती हुशार,ऍक्टिव्ह दाखवण्यात मुलांच्या 'मम्मी' वेळ दवडतात. काहीवेळा यातून माहेरी आलेल्या बहिणी बहिणीच्या नात्यात, नणंद भावजयच्या नात्यामध्ये दुरावा येतो. 
शिवाय आता सुट्ट्या चालू होण्याआधी वेगवेगळ्या प्रसिध्द, जगप्रसिद्ध ठिकाणी फ़िरायला जायचे प्लॅनिग झालेले असते. यातून वेळ मिळाला तर मामाचा गाव. तेही अगदी मोजके दिवस. जातानाच येतानाचे रिझर्व्हेशन नक्की केलेले असते. किती दिवस राहणार? याचे उत्तर त्यातच दडलेले असते. अशी सर्व परिस्थिती आहे.

काळ बदलला, वेळ बदलली. अनेक गोष्टी बदलल्या. याचा परिणाम मामा अन मामाच्या गावावरही झाला. रोजगाराचा प्रश्न मोठा असल्यामुळे खेडेगावातील/ छोट्या शहरातील तरुणांना गाव सोडून नोकरी धंद्याला बाहेर पडावेच लागते. या गोष्टीला पर्याय राहिला नाही. स्वतःच्या गावाबद्दल अन मायेच्या नात्याबद्दल कितीही ओढ वाटत असली तरी आहे त्या परिस्थितिचा स्वीकार केल्यावाचून गत्यंतर नसते. सगळ्याच भाच्याना मामाचा गाव दुरावलाय असं नाही. बदललेल्या परिस्थितीत ही भरपूर ठिकाणी आशादायक चित्र आहे. अजूनही कुटुंब एकत्र येतात. सणवार,उत्सव,लग्नकार्य,जावळ,जत्रा याचा आनंद घेतात. जमेल तसा वेळ काढून व काही तडजोडी करून ही मंडळी एकमेकांना भेटतात. 
काही ठिकाणी नवी पिढी अधिक समजूतदार वागताना दिसते. भाऊबंदकी, वाद विवाद टाळताना दिसते. भावा भावात पटत नसेल तर सामंजस्याने स्वतंत्र राहते. त्यामुळे कलह टळतात. दूर असले तरी नाती टिकून राहतात.

गाव असो की शहर, देश असो की परदेश कुठंही राहत असलो तरी ठराविक वयोगटापर्यंत मामाचा गाव प्रिय असतो. आता मात्र मामाचा गाव हरवलाय, ती मायेची माणसं हरवलीत, ते निरागस बालपण हरवलंय…... त्यांना शोधण्याचे, एकत्र आणण्याचे काम मामा-भाच्यांनाच करावे लागेल ना!!.. तर चला! या सुट्टीत सर्वांना एकत्र बोलावूया... हरवलेल्या बालपणाला पुन्हा शोधुया..... मामाच्या गावाला जाऊन सुट्टीचा आनंद द्विगुणीत करूया!😇
समाप्त.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

एक होता मामाचा गाव... हा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post.html?m=1

Monday, 9 April 2018

एक होता मामाचा गाव...

एक_होता_मामाचा_गाव...
वार्षिक परीक्षा संपल्या की वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे! उन्हाळी सुट्यांना काय काय करायचे हे बालगोपालांचे आधीच ठरलेले असते. एकूण नियोजनात मामाच्या गावाला जायचं हे नक्की असायचे. 'झुकु झुकु झुक आगीणगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...' असं बालगीत वर्षोनीवर्षं लोकप्रियतेच्या शिखरावर असण्याचे कारण म्हणजे मामाच्या गावाबद्दल असणारं प्रेम, आकर्षण, जिव्हाळा होय. मामा-भाचे/भाच्या हे नाते कमालीचं प्रेमळ नातं. लहान मुलांना मामा सुपरहिरोपेक्षा काही कमी नव्हता. भाच्याना रानामाळात, नदीकाठी, डोंगरावर, फिरायला घेऊन जाणारा. विहरीत, नदीत पोहायला शिकवणारा. छान छान कपडे घेणारा, त्यांच्याशी खेळणारा, पुढे बसवून सायकलवरून फिरवणारा मामा म्हणजे भाच्यांच जणू सर्वस्व होतं! परिस्थिती कशीही असो भाच्यांचे शक्य ते सर्व बालहट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मामा करत होता. 'मामा होणे' व 'मामा बनणे/बनवणेे' या साधर्म्य असणाऱ्या वाक्यप्रचाराचे वेगवेगळे अर्थ निघतात. 'मामा बनवणे' म्हणजे एखाद्याने फसवणे. वेड्यात काढणे इत्यादी अर्थ होतो. असे असले तरी मामाने ही गोष्ट कधी मनावर घेतली नाही आणि मामा भाच्याच्या नात्यात अंतरही कधी पडलं नाही.

मामाच्या गावात आणि चिरेबंदी वाड्यात अजून कोण कोण होतं?
काही वर्षांपूर्वी पर्यंत दोन मामा, चार मावश्या, मामाची मुलं, मावशीची मुलं, आजी, आजोबा असा खटला असायचा. सगळी भाचरं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आजोळी आली की मामाचं घर गजबजून जायचं. नऊवारी साडी नेसणारी आजी नातवंडांवरून भाकर तुकडा ओवाळून त्यांना घरात घ्यायची. सुग्रण मामी छान छान स्वयंपाक बनवायची. त्यावर आजीची बारीक नजर असायची. नातवंडांना दूध दुपत, दही, ताक, लोणी, तूप भरपूर खायला मिळावं म्हणून दुधाची भरलेली किटली डेअरीकडे न जाता घरातच रीती व्हायची. विस्तवाच्या आरावर तापलेल्या दुधाची खरपूस साय नातवंडांना देणारी आजी राहिलेल्या साईचे दही लावायची. दह्याचे ताक रवीने घुसळायची. लोण्याचा गोळा काढून आवडेल त्याला द्यायची. राहिलेले लोणी कडवून तूप काढायची. तुपाची धार भातावर धरायची. अंगणात टाकलेल्या सतरंजीवर चांदण्याच्या प्रकाशात तूप- भात चारताना रामायण, महाभारतातील गोष्टी आजी सांगायची. आजीच्या लुगड्याला तोंड पुसून आकाशातल्या चांदण्या मोजत आणि आजीची गोष्ट ऐकत कधी झोप लागायची याचा सुट्टीला जमलेल्या नातवंडांना पत्ताच नसायचा.

कधी शेतातून तर कधी आठवडी बाजारातून जांभळं, बोरं, आंबे, द्राक्षे, कलिंगड, काकडी आणणारे व गारेगार बॉंम्बेगोळा घेण्यासाठी चार आने (बंध झाले) ते दोन, दोन रुपयाची नोट हातावर ठेवणारे, यात्रेत कुस्त्या, बैलगाडा शर्यत बघायला घेऊन जाणारे आजोबा म्हणजे आजोळच्या घरातील 'हेड ऑफ डिपार्टमेंट' असायचे. त्यांचे सगळ्यावर वजन असायचे. आजोबा घरी येताच सगळे चिडीचूप बसायचे. हा दरारा असला तरी नातवंडांना ते प्रेमाने जवळ घ्यायचे. आजोबा शेतात जाताना बैलगाडी जुंपायचे. सर्व भाचे मंडळी त्यात बसायची. आजोबा हातातल्या कासऱ्याला हिसका द्यायचे तसे बैलगाडीची चाकं करकर आवाज करत राणाची वाट धरायची. गाडीखाली 'मोत्या' नावाचा कुत्रा चालायचा. रानात गाडी सोडून बैलांना वैरण पाणी दाखवले की आजोबा आंब्याच्या कैऱ्या काढून त्याला हळद, मीठ लाऊन सर्वाना खायला द्यायचे. मामा आपल्या भाच्याना एक एक करून विहरीत पोहायला शिकवत असताना आजोबा विहरीच्या काठावर बसून लक्ष ठेवायचे. धोतर नेसणारे, तीन बटनाचा शर्ट, डोक्यावर टोपी किंवा कोशापटका बांधणारे आजोबा मोठेच रुबाबदार दिसायचे.
नातवंडांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे असे आजी-आजोबा ज्यांना लाभले ते भाग्यवान!

'माय मरो पण मावशी जगो' अशी ख्याती लाभलेली व स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी मावशी. न कंटाळता गोड-धोड स्वयंपाक करून देणारी मामी. आपली कपडे, अंथरून पांगरून, खेळणी 'शेअर' करणारी मामाची मुलं, अन आजी-आजोबा ही सर्व मायेची माणसं भेटतात ती आईच्या माहेरी व आपल्या आजोळी!  गरीब असो की श्रीमंत, राजा असो की रंक, माहेरची परिस्थिती कशीही असो, सासुरवासिनीला आपलं माहेर प्राणांहून प्रिय असतं. पुढे मुलं झाली की हे रक्ताचं माहेर मुलांना आजोळ म्हणून प्रिय असत.

बालपणात आईचं माहेर प्रिय असतं तर तरुणपणात त्याची जागा बायकोचं माहेर घेतं. वृद्धपकाळात पोटची मुलं सांभाळत नसतील तर मुलीच्या सासरचा आधार वाटतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या नात्यांचा त्याच्या वागण्यातील बदलाचा फरक जाणवतो. लहानपणी आईवडीलांना सर्वस्व मानणारे बाळ मोठं झालं की आईवडिलांना आडगळीत टाकतं आणि बायकोला सर्वस्व मानतं. पुढे ते प्रेम स्वतःच्या मुलांवर बसतं व मुलांना मुलं झाल्यावर तेच प्रेम नातवंडांवर बसतं. जीवनाचं रहाटगाडगगं असंच चालू असतं. आजोळही अशा बदलला अपवाद नसतं. काहीही असलं तरी वयाच्या एका टप्प्यापर्यंत मामाचा गाव अन त्याला वेगळाच भाव असतो. त्या वेगळ्याचं भावाचा सध्या अभाव जाणवतोय... मामाचा गाव मात्र, आता हरवतोय.....😢
क्रमशः

©संदिप रामचंद्र चव्हाण
पुढील भाग येथे वाचा..
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post_10.html?m=1

Monday, 26 March 2018

मराठी पुस्तक परिचय: बखर शिक्षणाची

बखर शिक्षणाची
लेखक: हेरंब कुलकर्णी
प्रकाशन: राजहंस प्र.
किंमत: १६० रु.
पृष्ठ संख्या: १५०


बखर शिक्षणाची हे पुस्तक शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त असलेल्या ५४ पुस्तकांच्या बद्दल थोडक्यात माहिती देणारे पुस्तकांवरील पुस्तक (बुक्स ऑन बुक्स) आहे.
लेखक स्वतः इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. ते तरुणपणी मुलांना शिक्षा करायचे, कठोर बोलायचे, मुलं आपल्याला घाबरली पाहिजेत असं त्यांना वाटायचं. त्यामुळे ते विद्यार्थ्यांशी आक्रमकपणे वागायचे. पण एक दिवस त्यांना जाणवलं की मुलांना शिक्षणात रस नसण्याचे, त्यांना शिकवलेले न उमजण्याचे काहीतरी वेगळे कारण असले पाहिजे. काही दिवसांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करणे चुकीचे आहे असे वाटायला लागले. मग त्यांनी या समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यातून वेगवेगळी पुस्तक वाचायला सुरुवात केली.
'शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच अशा जागा आहेत, की जिथे कुणीच स्वतः होऊन जात नाही, तिथे दाखल करावे लागते.'  हे जे. कृष्णमूर्तींचे विचार वाचल्यावर लेखक अस्वस्थ झाले. हादरून गेले. मग लेखकांनी जे. कृष्णमूर्तींची ऐंशी पुस्तके मिळवली. त्याच प्रमाणे भारतातील सर्व 'कृष्णमूर्ती शाळा' बघितल्या. तिथे राहिले, तिथले अनुभव घेतले. (या अनुभवावर आधारीत त्यांचे दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे 'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल'. हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले आहे. किंमत २२०रु आहे.)
कृष्णमूर्ती यांच्या शाळा पाहिल्यामुळे लेखकांना एक वेगळीच दृष्टी मिळाली अस मत ते बखर शिक्षणाची या पुस्तकातील 'हितगुज शिक्षकांशी व पालकांशी' यात व्यक्त करतात.
नंतर लेखकांनी महाराष्ट्रतील शिक्षणात वेगळे प्रयोग करणाऱ्या लीलाताई पाटील, रमेश पानसे यांची पुस्तके वाचली. मुलांना लिहता वाचता यावे म्हणून शिकवण्याच्या पध्दतीत प्रयोगशीलता आणायला हवी हे लेखकांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी स्वतःच्या अध्यनपद्धतीत योग्य ते बदल केले. यातून त्यांचा शिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला असही मत ते हितगुजमध्ये मांडतात.
शिक्षण क्षेत्रात देश परदेशातील अनेक क्रांतिकारक बदल करणाऱ्या शिक्षकांची/शिक्षण क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या आदर्शांची शिक्षणविषयक पुस्तक लेखकांनी वाचली. या पुस्तक वाचनातून लेखकांच्या शिक्षकी जीवनाचा कायापालट झाला.
लेखकांनी शिक्षकांसमोर महाराष्ट्रभर खूप व्याख्याने दिली. त्यात ते या वेगवेगळ्या पुस्तकाबद्दल बोलत. आपण सांगतोय हे शिक्षकांना काहीतरी अद्भुत वाटतंय असं लेखकांना दिसून यायचे. शिक्षक या विविध पुस्तकाबद्दल प्रश्न विचारायचे. यातून मग या पुस्तकांबद्दलची माहिती शिक्षक/ पालकांना व्हावी म्हणून यातील निवडक पुस्तकांचा परिचय देणारे हे पुस्तक तयार झाले. लेखकांनी या पुस्तकांबद्दल दैनिक पुढरीत वर्षभर स्तंभ लिहले आहेत.

या पुस्तकात जपानची तोत्तोचान आणि तिचे शाळा मुख्यद्यापक कोबायशी; दुसऱ्या महायुध्दात जखमी झालेला, आपल्या शरीरात बंदुकीचे छरें घेऊन जगत असलेला, आपल्या बायको आणि बाळाला जर्मन सैनिकांनी मारल्यानंतरही निराश न होता शाळा चालवणारा वासिली सुखोम्लिन्स्की आपल्याला भेटतो; मुलांना स्वातंत्र्य देणारी मुलांना हवी तशी शाळा काढणारा, जगातील शिक्षणक्षेत्राला अनेक दशके प्रभावित करणारा इंग्लंडचा 'निल' व त्याच्या 'नीलची शाळा समरहिल' या पुस्तकाबद्दल माहिती मिळते;
आर्मीतून निवृत्त झालेला. निग्रो असल्यामुळे वर्णद्वेषाचा बळी ठरलेला, कुठेही नोकरी न मिळाल्याने एका झोपडपट्टीजवळच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेला इंग्लंडमधील 'ब्रेथवेल' आपल्याला माहीत होतो. त्याच्या 'टू सर विथ लव्ह' या आत्मचरित्राचा संक्षिप्त भाग आपल्याला इथे वाचायला मिळतो;
अमेरिकेतील भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल ग्रीनबर्ग स्वतःच्या मुलाला हवी तशी शाळा मिळत नाही म्हणून समविचारी पालकांना एकत्र करून शाळा सुरू करतो; न्यूझीलंडमधील शिक्षिका सिल्व्हिया वॉर्नर हिने केलेले शैक्षणिक प्रयोग व तीची झालेली शोकांतिका, तिने चोवीस वर्षे काढलेली व नंतर जाळली गेलेली चित्रे, मृत्यूनंतर अमेरिकेतून प्रकाशित होणारे तिचे शैक्षणिक प्रयोग इत्यादी कहाणी असणाऱ्या 'टीचर' या पुस्तकाची संक्षिप्त माहिती याच पुस्तकातून आपल्याला समजते; 'माय कंट्री स्कुल डायरी' हे अमेरिकेतील डोंगराळ भागात काम करणाऱ्या ज्युलिया वेबन गॉर्डन या एका समर्पित शिक्षिकेचे प्रेरणादायी काम बखर शिक्षणाची या पुस्तकामुळे आपल्या समोर येते.

गिजुभाई बधेका यांचे दिवास्वप्न, जे.कृष्णमुर्ती यांचे शिक्षणविचार, टागोरांचे शांतिनिकेतन; गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पन्नास वर्षांपूर्वी वेगळा शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या गो.ना. मूनघाटेंची काटेमुंढरीची शाळा; चाकोरीबाहेरच्या नऊ शाळाबद्दल रेणू दांडेकर लिहलेले 'कणवू'; शिक्षण आनंदक्षण, नयी तालीम, मुलांचे शिक्षण पालक व शासन ही शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांची पुस्तके; 'कोसबाडच्या टेकडीवरून' शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या कार्याबद्दल आणि अशा शैक्षणिक क्रांती करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती आपल्याला हेरंब कुलकर्णी आपल्या बखर शिक्षणाची या पुस्तकात करून देतात. त्याचप्रमाणे विनोबांचे शिक्षणविचार, आचार्य रजनीश यांचे शिक्षणविचार, भाऊ गावंडे यांचे प्रकाशाच्या उंबरठ्यावर, अमिता नायडू यांचे प्लॅटफॉर्म नंबर झिरो; राजा शिरगुप्पे यांचे न पेटलेले दिवे; अरुण शेवते यांचे नापास मुलांची गोष्ट, लीलाताई पाटील यांचे शिक्षण देता घेता, अर्थपूर्ण आनंदशिक्षणासाठी; सतीश पोरे यांचे वाचन संस्कार; रेणु गावस्कर यांचे आमचा काय गुन्हा; नामदेव माळी यांचे शाळाभेट इत्यादी चोपन्न पुस्तकाबद्दल संक्षिप्त पंरतु अत्यंत उपयोगी माहिती आपल्याला या पुस्तकातून होते. व ही पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढते.
बखर शिक्षणाची या पुस्तकातून शिक्षक, पालकांना नवी दृष्टी मिळेलच परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही ही चरित्रे, आत्मचरित्रे, वेगळे शैक्षणिक प्रयोग प्रेरणा देतील.
सध्या सर्व सुखसोई असूनही रडणारे पालक- शिक्षक यांनीही यातून शोध आणि बोध घेतल्यास शैक्षणिक क्रांती व्हायला उशीर लागणार नाही. मुलांना 'प्रॉडक्ट' समजणाऱ्या आजच्या शैक्षणिक परिस्थितीत हे गरजेचे आहे.
आपल्या समाजाच्या बहुतेक समस्या प्रभावहीन शिक्षण पध्दतीत लपल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील क्रांतिकारक बदल जाणून घ्यायला आणि चांगल्या बदलासाठी शक्य ते प्रयत्न करायला 'बखर शिक्षणाची' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
(लेखकांबद्दलची माहिती लिहताना पुस्तकातील सुरवातीला असणाऱ्या 'हितगुज' यातील संदर्भ म्हणून वापर)

संदिप रामचंद्र चव्हाण

Friday, 16 March 2018

किंडल_डिव्हाईस

किंडल_डिव्हाईस ....चालतं फिरतं ग्रंथालय!
वाचनाचे बदलते तंत्र.

गोष्ट तशी जुनीच आहे. परंतु ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमीसाठी थोडंस नवीन तंत्रज्ञान म्हणजे अमेझॉन किंडल डिव्हाईस होय.
अनेक पुस्तक प्रकाशकांनी खूप सारी पुस्तके वेगवेेगळ्या इबुक्स स्वरूपात आणली आहेत. डेलिहंट इबुक्स, बुकगंगा इबुक्स, साहित्य प्रतिष्ठान यांनी आणलेली इबुक्स, वेगवेगळी पुस्तकाची अँड्रॉईड अँप, अमेझॉन किंडल इबुक्स इत्यादी. ज्या त्या संस्थेने आपापली अँप डेव्हल केली आहेत. काहींनी ईबुक रीडर डिव्हाइस ही टॅबसारखी इलेक्ट्रॉनिक वस्तू (गॅजेट) बनवली आहे. त्यापैकी एक म्हणजे 'अमेझॉन किंडल ईबुक रीडर' होय.


मराठी पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर काही ग्रुप सदस्यांना या बद्दल माहिती हवी होती. त्यांना व सर्व मित्रपरिवराला माहिती कळावी या हेतूने...

जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे।
सकळ जन।।

या भावनेने हा लेख प्रपंच.

अनेक प्रकारची, अनेक विषयांची, अनेक भाषांची, अनेक लेखकांनी लिहलेली, अनुवादित केलेली पुस्तकं मिळण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय किंवा त्याला वाचनालय म्हणण्याचाही प्रघात आहे. सार्वजनिक वाचनालये, शाळा- कॉलेजची, पालिका- महापालिका यांची ग्रंथालये वाचकांसाठी आवडीची ठिकाणे असतात. मोठ्या लोकांची स्वतःची मोठी लायब्ररी घरात किंवा कार्यालयात असते. सर्वसामान्य वाचकप्रेमी जमेल तसा पुस्तकसंग्रह करत असतो. पण सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा छोट्या घरात पुस्तकांची व्यवस्थित निगा राहील असे कपाट किंवा पुस्तक ठेवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करणं मोठं जिकिरीचं होतं. शिवाय नोकरी करणाऱ्यांना, भाड्याच्या घरात राहणार्यांना, बदली झाल्यावर किंवा घर बदलल्यावर संग्रही असणारा पुस्तकसाठा इकडून तिकडे नेण्यात अनेक अडचणी येतात. पेपरलेसच्या जमान्यात यावर उपाय म्हणजे सर्व भाषांमधील पुस्तके इलेक्ट्रॉनिक बुक(ईबुक) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेझॉनने आणलेले किंडल ईबुक होय. 2004 मध्ये अमेझॉनने किंडल ईबुक रीडरची प्रथम पिढी मार्केटमध्ये आणली. आता त्यात संशोधन होऊन आठवी/ नववी पिढी बाजारात आली आहे. अमेझॉनने पुस्तकांच्या दुनियेत मोठा क्रांतिकारक प्रयोग केला व जगभरात त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इंग्रजी भाषेत शेकडो पुस्तके अगदी मोफत आहेत तर प्रादेशिक भाषेतही काही ठराविक पुस्तके मोफत आहेत. चांगल्या चांगल्या पुस्तकांवर भरगोस सूट व हार्डकॉपीच्या मनाने कमी किंमत, फॉन्ट लहान मोठा करायची व्यवस्था, अमेझॉन आकाउंटशी कनेक्ट असल्यामुळे ईबुक लायब्ररी कोणत्याही नवीन गॅझेटवर(मोबाईल किंवा किंडल डिव्हाइसवर) पुन्हा उपलब्ध होते. हजार ते पंधराशे पुस्तके सेव(डाऊनलोड) होऊ शकतील अशी इंटर्नल मेमरी, डोळयांना त्रास होणार नाही असे तंत्रज्ञान, जिथे वाचायचे थांबलो तिथूनच पुढे सुरवात, चांगले ब्याटरी ब्याकप इत्यादी अनेक सुविधा नवीन जनरेशनच्या किंडल मध्ये आहेत.

भारतात किंडल ईबुक लॉन्च करून दहा वर्षे झाली आहेत. सध्या किंडल डिव्हाइसवर भरगोस सूट व त्या बरोबर पुस्तक खरेदी साठी 80% डिस्कउंट मिळणारे दोन हजाराचे प्रमोशन गिफ्ट इत्यादी ऑफर सद्या मिळत आहेत.
किंडलवर खरेदी केलेले पुस्तक आवडले नाही तर काही दिवसाच्या मुदतीत परत करता येते. विकत घेतले पुस्तक परत करण्यासाठी ठराविक संख्येची मर्यादा आहे. नाहीतर प्रत्येक पुस्तक वाचून परत केले जाईल. हे कंपनीने लक्षात घेऊन यावर मर्यादा घातली आहे. पुस्तक परत केल्यावर जेवढे पैसे पेड केलेत तेवढे माघारी मिळतात. खरेदीआधी कोणत्याही उपलब्ध ई पुस्तकाचे सँम्पल मोफत डाउनलोड करता येते. त्यातून पुस्तकाचा सार समजू शकतो. एकच पुस्तक एकाच वेळी किंडल डिव्हाईस व मोबाईल किंडल अँपवरती वाचता येते.

किंडल ईबुक रीडरवरचा पुस्तक संग्रह वाचायला किंडल डिव्हाईसच हवं असं नाही. मोबाईल मधे किंडलचा ॲप इन्स्टॉल करून अमेझॉन आकाउंटचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकला की ॲमेझॉनवर किंडल अँप रजिस्टर होतो. किंडल डिव्हाइस रजिस्ट्रेशनही अमेझॉन लॉगिन आयडीनेच करायचे असते. किंडल डिव्हाइस असल्याचा फायदा म्हणजे ते फक्त वाचाण्यासाठी डिजाईन केलं आहे. ऍडीओ, व्हिडीओ, इतर अँप्स, गेम्स इत्यादी काहीही नसते. त्यामुळे फक्त वाचनावर लक्ष केंद्रीत होते. त्याचप्रमाणे यावर पुस्तक वाचताना कागद वाचतोय असं फील होते. स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्टेबल असल्याने डोळ्यांना सुट होईल तसा सेट करता येतो (पाच हजारच्या आसपास मिळणारे बेसिक मॉडेलमध्ये LED लाईट नाहीत त्यामुळे ते मॉडेल फक्त उजेडातच वापरता येते) अक्षरांचा आकार हवा तितका लहान मोठा करता येतो. त्यामुळे चेष्मा विसरला किंवा जवळ नसला तरी काही फरक पडत नाही. आपण पुस्तकाची हार्डकॉपी जिथे वाचायचे थांबू तिथे काहीतरी खूण ठेवतो तसेच किंडल डिव्हाईस स्वतः लक्षात ठेवते व जिथं थांबलो त्या पुस्तकाचे तेच पान उघडते. त्या मध्ये लेखकांच्या नावावरून, प्रकाशकांच्या नावावरून, कथा, कादंबरी, ऐतिहासिक इत्यादी नावाने फोल्डर बनवता येतात.
मी हार्ड कॉपी व किंडल पेपरव्हाइट ईबुक दोन्ही वापरतो. किंडलवरती पुस्तके हार्डकॉपीच्या तुलनेत कमी किमतीत मिळतात. शिवाय वार्षिक अनलिमिटेड प्लॅन घेतला तर वर्षभर उपलब्द सर्व पुस्तके फ्री मिळतात व वर्षाने पुन्हा पैसे भरावे लागतात. या प्लॅनची पुस्तके कायम अकाउंटवर राहत नाहीत. मी कोणतंही पुस्तक विकत घेतो ते कायमस्वरूपी आपल्या अकाऊंटवर राहते. शिवाय काही पुस्तके फ्री मिळतात. इंग्रजी वाचणाऱ्यांना खूप पुस्तके कमी किमतीत किंवा फ्री मिळू शकतात.
अमेझॉन अँपवरती marathi ebooks for Kindle  असे सर्च केले की पुस्तकांची यादी मिळते. हवे त्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या नावानेही पुस्तक शोधाता येते.
वेगवेळ्या मॉडेलनुसार किंडल डिव्हाइसची किंमत चार हजार ते चाळीस हजार असू शकते. सध्या ईबुक रीडरच्या किंमती जास्त दिसत आहेत. अमेझॉनच्या विशेष ऑफर मध्ये किंमत 10 ते 20 टक्के कमी असते. त्याच वेळी पेटीयम वर त्यापेक्षा कमी किंमत असू शकते हा माझा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनवर किंडल पेपरव्हाइट 8999 ला होते तेव्हा पेटीयमवर 7265 होते. काहीवेळा पुस्तक खरेदीसाठी 2000 रु चे 80 टक्के डिस्काउंट कुपन मिळत. त्यामध्ये 2500 ची पुस्तके 500 मध्ये मिळतात.
 वाचनाची आवड असणार्यांसाठी किंडल नक्कीच उपयुक्त आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप: मी वर उल्लेखलेल्या कोणत्याही कंपनीचा एजेंट नाही. किंवा ही माहिती देण्यात माझा कोणताही आर्थिक लाभ नाही)

किंडल मोबाईल अँप ची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle

Wednesday, 14 March 2018

शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने...

शेतकरी_मोर्चाच्या_निमित्ताने...
नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चाची सांगता १२ मार्च रोजी झाली. ३० ते ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट करत अतिशय शांत, संयमाने मार्गक्रमण करून आपल्या मागण्या मायबाप सरकारपुढे ठेवल्या. सरकाने लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली व मोर्चा विसर्जित झाला. सरकार मागण्यांची पूर्तता व दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी करते हे पुढे दिसेलच. मोर्चा मुबंईत पोचण्याआगोदर निर्णय घेऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या त्रासाला पूर्णविराम देता आला असता. पण निबर झालेले अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री, शासकीय यंत्रणा, कोणतीही गोष्ट गळ्याला आल्याशिवाय लक्ष देत नाहीत. अशी काहीशी परिस्थिती कायमच दिसत आली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलन यशस्वीपणे हाताळले असं म्हणावं लागेल. त्यांनी अजून तत्परता दाखवली असती तर हे आंदोलन कसारा घाट ओलांडुन पुढे गेले नसते. तरीही त्यांनी हे आंदोलन जास्त चिघळू न देता हाताळले... हेही नसे थोडके!!

शेतकरी मोर्चाबद्दल अनेक समज गैरसमज सोशलमीडियामध्ये चर्चिले गेले. अजूनही त्यावर वादविवाद चालूच आहेत. सोशल मीडियावर या मोर्चातील काही फोटो आणि मोर्चासंबंधीच्या काही पोस्ट अनेकांनी शेअर करत शक्य त्या सर्व मार्गांनी अन्नदात्याचे हे प्रयत्न मोठ्या स्तरावर इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियानेही दखल घेतली. कोणी वाटेत खायची,नाष्ट्यापाण्याची सोय केली. कोणी जखमींवर उपचार केलेे. तर कोणी चुकीचे आरोप करून शेतकऱ्यांच्या मनाला जखमी केले. मोर्चातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या जखमी पायांचे, तुटलेल्या चपलांचे, त्यांच्या कारुण्याचे, दयनीयतेचे फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर काहींनी टोमणे मारले. सर्वंच राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन मतपेटी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी तशी राजकीय नेत्यांनी मोर्चाला भेट दिली. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे न उमजलेले एक कोडेच आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांना काय मिळाले? फक्त आश्वासनांची कागदी भेंडोळी! या पेक्षा काही नाही.
शेतकर्याच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या व अनेक समस्या आहेत त्याला आतापर्यंतची सर्व सरकारे जबाबदार आहेत. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर भर द्यायला हवा. पण असं होताना दिसत नाही. प्रगल्भता येण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीय पक्षांचे व नेत्यांचे वैचारीक अधपतन होताना दिसत आहे. त्याच्या नेमकं उलट वर्तन अशिक्षित, जेमतेम शिकलेला शेतकरी आपल्या मोर्चातुन दाखवतो तेव्हा नक्कीच तो कौतुकास पात्र ठरतो.
स्वतः आत्मक्लेश सहन करून आपल्या मागण्या मांडणे, भरपूर संख्या जमली तरी उन्माद न करता शांतता ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी गोष्टींचा वस्तुपाठच या मोर्चाने घालून दिला. एवढ्या संख्येने लोक जमतात परंतु गडबड, गोंधळ, पळापळ, जाळपोळ, दगडफेक यातले काहीही होत नाही. आंदोलक आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत, मुंबईत आल्यावर दहावीच्या मुलांना त्रास नको म्हणून स्वतः त्रास सहन करून कित्येक किलोमीटर चालत रातोरात आझाद मैदानात पोचतात. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडतात. त्यासाठी शांतपणे मोर्चा काढतात. खाजगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान न करता मोर्चा विसर्जीत करतात. हे शेतकऱ्यांच वागणं प्रगल्भता दाखवत नाही का? सध्या विविध आंदोलनामध्ये विध्वंसक वृत्ती वाढत असताना असा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेला आंदोलनाचा एक चांगला पर्याय आहे. (याचा प्रत्यय 'मराठा क्रांती मोर्चा' मध्येही आला आहे.)
या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शेतकरी मोर्चाला नक्षली चळवळीचा संबध कोणी जोडत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून शेतकरी कष्टकरी जनतेच्या भावना लक्षात येत नाहीत. त्यासाठी समाजाची नाळ जुळावी लागते. परंतु सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना कष्टकरी जनतेचे प्रश्न कसे समजणार??

आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, झेंड्याचा रंग कोणता होता हे पाहण्यापेक्षा या मोर्चात आंदोलक शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने त्रास सहन करून कसा आला हे पहावे लागेल. अनेक वेळा आश्वासने मिळून आपल्या मागण्या वर्षोनुवर्षे तशाच आहेत. सत्तेच्या साठमारीत आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही ही भावना शेतकऱ्यांमध्ये बळावली. विरोधीपक्षातील लोक आपल्या मागण्यांसाठी आग्रही दिसत नाहीत व सत्ताधारी मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा समज सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनात तयार होण्याला कोण जबाबदार आहे??
शेतकऱ्यांना झेंड्याच्या रंगाशी देणे घेणे नाही त्यांना गेंडयाच्या कातडीच्या व्यवस्थेपुढे आपले प्रश्न, समाश्या मांडणारे, त्यांना पटवून देणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे हा मोर्चा कोणी काढला हे पाहण्यापेक्षा हा मोर्चा शेतकऱ्यांचा होता असे पहायला हवे.

कोणता झेंडा घेऊ हाती?? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना स्वार्थाने का होईना कोणी त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडण्यात पुढाकार घेत असेल तर सर्वत्र अंधकार दिसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना हा आधार वाटल्यास नवल नाही. शेतकऱ्यांना आता पर्यंत सर्वजण फसवत आले आहेत. संघटित नसल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात कायमच मागे पडला आहे. शेतकऱ्यांच्या आडून सर्वजण सत्तेची खुर्ची जवळ करतात. कदाचित हा मोर्चाही त्याला अपवाद नसेल. मोरच्यातुन स्वतःची इमेजबिल्डिंग व त्यातून राजकीय लाभ असाही कोणाचा छुपा हेतू असू शकतो. परंतु जी संघटना एखादे आंदोलनाचे नियोजन करते तेव्हा तिचे नाव, त्यांचे ब्यांनर, झेंडे त्यात ओघाने येणारच!.. ते काही दुसऱ्या संघटनेचे, पक्षाचे झेंडे आंदोलकांच्या हातात देतील का?? हे लक्षात घेणे जरुरी आहे. टोप्या उन्हापासून रक्षण करतात तरीही 'टोप्या व झेंड्यापेक्षा आंदोलक शेतकऱ्यांना चप्पल द्यायला हवी होती' या काहींनी दिलेल्या सुचनेवर शेतकरी नेत्यांनी नक्कीच विचार करायला हवा. अनाठायी खर्च कोणत्याही संघटनांनी टाळायला हवेत व मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. हे मात्र नक्की!

मुळात या मोर्चातील मुख्य मागणी, वनजमीन कसणार्या शेतकर्याच्या नावे ती वनजमीन असावी ही होती. आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे कागदोपत्री जमीन नसल्यामुळे त्यांना साधं कर्जही मिळत नाही. इतरही मागण्या होत्या परंतु त्या दुय्यम होत्या. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाण्यासह आदिवासी भागातील होते. सलग सहा दिवस रणरणत्या उन्हात पायपीट करत निघालेले मोर्चेकरी जसजसे पुढे गेले, तसतसे नाशिकसह ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील शेतकरी मोर्चात सहभागी होऊ लागले. मुळात त्यांना दिडदोनशे किलोमीटर चालायला लावणे गरजेचे होते का? त्याच्याबरोबर पूर्णवेळ मोर्चाचे आयोजक चालत होते का? हा प्रश्नच आहे?? या आंदोलनात बहुसंख्य आदिवासी शेतकरी व गरीब शेतकरी होते. कष्टप्रद आंदोलनात सुखवस्तू सहभागी होत नाहीत हेही ध्यानात घ्यायला हवे. घरुन घेतलेली कांदा भाकर, आणि मुक्काम असेल तिथे तीन दगडाच्या चुलीवर केलेला भात खाऊन आंदोलक सहभागी झाले होते. ते भाडोत्री नव्हते. आजकाल पैसे देऊन, वाहनांची सोय केल्यानंतरही राजकीय पक्षांच्या सभेला लोक येत नाहीत. तिथे रणरणत्या उन्हात रोज वीस ते तीस किलोमीटर चालत, शिळेपाके अन्न खाऊन स्वतःला त्रास करून कोण घेईल?? ज्या भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले तिथे 'अखिल भारतीय किसन सभा' या डाव्यांच्या संघटनेचे अस्तित्व असल्याशिवाय त्यांच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत. अनेक वर्षे अनेक समस्यांची झळ बसल्यामुळे शेतकरी सहभागी झाले असणार. भूलथापांना बळी पडून एवढ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील का?
डाव्यांनी असाच मोर्चा पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काढला तर यशस्वी होईलच अस नाही. बहुदा यशस्वी होणारच नाही. कारण त्यांचे तिथे अस्तित्व नाही. मुळात मोर्चा कोणी काढला हा मुद्दा गौण आहे. पश्चिम महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टीनी आत्मक्लेश यात्रा काढली होती त्यालाही लोक पुणे ते मुंबई चालत आले होते. त्या मोर्चालाही शेतकऱ्यांचा उस्फुर्थ प्रतिसाद लाभला होता.भाडोत्री लोक अशा आंदोनलात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय? ते आंदोलन का करतात? हे समजून घ्यायला हवे. फक्त वरवरची शेरेबाजी उपयोगाची नाही. यातून फक्त मनं कलुषित होतील... आणि प्रश्न जिथल्या तिथेच राहतील. राजकारणी लोक सेटलमेंट व सर्वसामान्यांची दिशाभूल करायला तरबेज असतात. त्यांना समाजातील विविध घटकामध्ये द्वेषाची दरी वाढली तर आनंदच होतो. कारण दुभांगलेल्या समाजावर पकड ठेवणे तुलनेने सोपे जाते. आज शेतकरी जात्यात आहेत तर इतर घटक सुपात आहेत. हे सर्वांनी लक्षात घेऊन शेतकर्याच्या दुःखावर फुंकर मारता आली नाही तर किमान डागण्यातरी देऊ नयेत.

भारतभर व महाराष्ट्र राज्यातही विभागवार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक शेतकरी संघटना आहेत. त्या वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवतात. या संघटनांच्या आडून संघटनेचे पुढारी काही वेळा आपला स्वार्थ साधतात. कोणी राजा हरिश्चंद्र नाही.
शेतकऱ्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही. पण एकट्या दुकट्याने मागण्या मांडून, आंदोलनं करून, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून काहीही हाती लागत नाही. एकट्याने लढलो तर त्याचा 'धर्मा पाटील' होतो हे शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना कोणत्यातरी संघटनेचा झेंडा हाती घ्यावा लागतो. ही त्याची मजबुरी आहे. टीका करणार्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे.

शेतकरी आत्महत्या, शेतकरी संप, शेतकऱ्यांचा मोर्चा हा टिंगलटवाळी करण्याचा विषय नाही. हा खूप गंबीर सामजिक विषय आहे. सर्वांनाच सुख, संमृद्धि हवी असताना शेतकऱ्यांना का नको? त्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यात काय गैर आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन शेतकरी झालेल्यांना व नवश्रीमंत शहरी वर्गाला हे कधी कळणार?? का कळवूनच घेणार नाहीत??
सत्ताधारी शेतकर्याच्या बाजूने, विरोधक शेतकर्याच्या बाजूने असं असताना शेतकर्यांवर वारंवार आंदोलन करण्याची वेळ का येते?? राजकीय पक्षांच्या धुरणींनी यावर विचार करायला हवा. शेतकरी आज शांततेत मोर्चे काढतोय, आत्मक्लेश करून घेतोय, अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर आत्महत्या करतोय. त्यांचा वापर वेगवेगळ्या संघटना व पक्ष गरजेनुसार करून घेतायत. हे वेळीच थांबायला हवे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात हाच शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी दोन हात करायला उभा राहिला तर त्याचा दोष शेतकऱ्याला देता येणार नाही.

संदिप रामचंद्र चव्हाण.

Tuesday, 6 March 2018

'पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची' आणि 'टीनएजर्सच्या मनात'

पहिली_आठ_वर्षं... सहज शिक्षणाची
लेखिका: डॉ. श्रुती पानसे (पीएचडी शिक्षणशास्त्र)
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १८०रु
पुष्ठ संख्या:१६०


मुल जन्माला आल्यापासून आठ वर्ष्याचे होईपर्यंत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कशी होते याबद्दल विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक आहे. बाळ लहान असल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो.
पहिली एकत्र कुटुंबात मुलं कशी मोठी व्हायची लक्षातही यायचे नाही... परंतु आज त्रिकोणी,चौकोनी कुटुंबात मुलांना वाढवणे म्हणजे अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नवं पालकांना मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.

मुल (मुलगा किंवा मुलगी या अर्थाने) जन्माच्या पूर्वतयारीपासून ते मुलाचा जन्म, त्याचे/ तिचे रांगणे, उभे राहणे, अडखळणे, चालणे, पळणे, बोलणे, चिडणे, रागावणे, रडणे, हट्ट करणे, खोड्या करणे, मोठ्यांचे अनुकरण करणे इत्यादी मुलाच्या वर्तणुकीचे सूक्ष्म निरीक्षण व आपल्या पीएचडी संशोधनात केलेला लहान मुलांचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय अभ्यास डॉ. श्रुती पानसेंनी सर्व पालक, शिक्षक, समाज, शासन यांना पुस्तकरूपाने उपलब्द करून दिला आहे.

कोणत्याही नवपालकांनी, शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे व कसे वागू नये, मुल वाढवताना पालकांची भूमिका कशी असावी त्याच प्रमाणे पहिली आठ वर्षे ही मुलांच्या वाढीसाठी किती महत्वाची असतात याचे सोप्या भाषेत व अतिशय विचार करायला लावणारी मांडणी पुस्तकामध्ये केली आहे.
पुस्तक एकूण एकोणतीस प्रकरणात विभागले आहे. हे सर्व लेख सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'स्मार्ट संगोपन' या नावाने प्रसिध्द झाले आहेत.

मला हे पुस्तक का आवडले?
मी स्वतः पालकाच्या भूमिकेत असल्याने मला यातील बहुतेक सर्व मुद्दे व त्याबद्दलची माहिती महत्वाची वाटली.  मी मुलाशी कसे वागतो, कुठे चुकतो किंवा विनाकारण मुलावर रागवतो का? या बद्दल आत्मपरीक्षण करू लागलो.

हे पुस्तक कोणी वाचावे?
शून्य ते आठ/ दहा वर्षांच्या मुला-मुलींचे पालक, पाळणाघर ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील इतर घटक ज्यांचा संबध या वयोगटातील मुलांसोबत येतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात निर्णय घेणारे राजकारणी व अंमलबजावणी करणारे सनदी अधिकारी, या व्यतिरिक्त ज्यांच्या घरी या वयोगटातील मुलं आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी हे पुस्तक वाचावे.

या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे 'टिन एजर्सच्या मनात' त्याची माहिती खालीलप्रमाणे

पुस्तक परिचय: टीनएजर्सच्या_मनात
लेखिका: डॉ. श्रुती पानसे
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १४०
पृष्ठ संख्या: १२०
'टीनएजर्सच्या मनात' हे पुस्तक साधारण ८-९ वर्षांपासून ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या आईवडीलांसाठी लिहलेलं आहे. परंतु याचे वाचन या वयोगटातील मलामुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांनी व या वयोगटातील मुलं ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वाचल्यास मुलांच्या शारीरिक व मानसिक बदलाचीे शास्त्रीय, मानसशास्त्रीय माहिती मिळेल. हे पुस्तक एकूण २३ प्रकरणात विभागले आहे.


डॉ. श्रुती पानसे यांनी बालमानशास्त्र, मेंदू आणि शिक्षण यावर विविध पुस्तकं लिहली आहेत. लेखिका शिक्षणशास्त्रात पीएचडी आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणविषयक परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले आहेत. विविध शिक्षणसंस्थांमधून व्याख्याने दिली आहेत. 'पहिली आठ वर्षं सहज शिक्षणाची' या पुस्तकाचा पुढील भाग म्हणून 'टीनएजर्सच्या मनात' या पुस्तकाकडे पाहता येईल.
बाळ हळू हळू मोठं होत असत. सुरवातीला बाळाच्या खोड्या बाललीला म्हणून कोणी गंबिरतेने घेत नाही. परंतु हेच बाळ जेव्हा आठ दहा वर्षाचे होते तेव्हा त्याला चांगली समज आलेली असते. नाईन ते नाइंटिन या वयोगटातील मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये असतात. त्यांच्या खोड्या, अनपेक्षित वागणं हे घरापूरते मर्यादित नसते. या वयात शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी, त्यांचे पालक, शिक्षक, यात गुंतले जातात. काहीवेळा मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे 'लहान होती तेच बरे' असं म्हणायची वेळ पालकांवर येते.
९-१९ या वयोगटातील मुलामुलींच्या समस्या लहान वयोगटातील (०-८) मुलामुलींपेक्षा वेगळ्या असतात. शारीरिक वाढ, लैगिंक भावना, परलिंगी आकर्षण, अभ्यासाचा ताण, पालकांशी कमी होणारा संवाद, मित्र-मैत्रिणी अधिक जवळच्या वाटू लागने, स्वप्रतिमेच्या प्रेमात पडणे, कोणत्याही कामात वेळ काळाचे भान हरवणे, अघोरी धाडस करणे, भावनांवर नियंत्रण नसणे, सोशलमीडियाच्या आहारी जाणे, व्यसनात अडकण्याची शक्यता, सबकुछ चलता है ही प्रवृत्ती असणे, इत्यादी वेगवेगळ्या समस्या या वयोगटातील मुलांच्यात/मुलींच्यात दिसतात.

या पुस्तकात मुलाची, मुलीची शारीरिक वाढ, त्यांच्या हार्मोन्समध्ये होणारे बदल, शरीराने मोठे झाले तरी मेंदू विकसन पूर्णत्वाला आलेले नसणे, मोठं होण्याची लक्षणे, मेंदुसदर्भातील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, अमिग्डाला, न्यूरॉन्स, डेन्ड्राईट्स, न्यूक्लिअस, अक्झॉन, सीनँप्स इत्यादी बद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे.
टिनएजर्सच्या वाढीचा मानसशास्त्रीय अभ्यास समजून घेण्यासाठी हे पुस्तक पालकांना, शिक्षकांना उपयोगी आहे.
हे पुस्तक मिळण्याची अमेझॉन लिंक

संदिप रामचंद्र चव्हाण.

Friday, 2 March 2018

निमित्त:होळी, धुलीवंदन, रंगपंचमी

निमित्त_होळी_धुलीवंदन_रंगपंचमी

काल होळी झाली.. आज धुलीवंदन (धुळवड) आहे. अजून चार दिवसांनी रंगपंचमी येईल. भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची एक परंपरा आहे. निसर्गाच्या बदलाप्रमाणे व कृषिसंस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण साजरे करणारा भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे. जगातील इतरही देशात त्यांच्या संस्कृतीनुसार उत्सव साजरे होतात पंरतु वर्षाच्या बाराही महिन्याला येणारी सणांची माळ बहुदा आपल्याच देशात असेल. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेनुसार सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या खंडप्राय  देशात खान-पान, राहणीमान, भाषा जश्या वेगवेगळ्या आहेत तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
आपल्या राज्याचा विचार करता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची सुरवात होते तर फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीने, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलीवंदनाने व धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीने वर्षाची सांगता होते. होळी ते रंगपंचमी हा एकच सण मानला जातो.

शेकडो वर्षांपासून होळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. ^^काहींच्या मते होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत आहे, तर काही लोक त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. पुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नावाची राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेतून साजरा होतो आहे.^^
होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. काही ठिकाणी होळीची राख पाण्यात मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जाते. उत्तर भारतात धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची होळी खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उत्तर भारतीय मोठ्या प्रमानार स्थलांतरित झाल्यामुळे व चित्रपटातील सेलिब्रेटींना हाताशी धरून विविध कंपन्यांनी धुलीवंदनाचे मार्केटिंग केल्यामुळे आजच्या दिवशी रंगांची होळी(होली) खेळली जाते. त्यामुळे मोठ्या शहरात मराठीसण असणारी रंगपंचमी कुठेतरी मराठी भाषेसारखीच हरवत चालली आहे.

कोकणात होळीला शिग्मो म्हणतात. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शिमगा म्हणतात.
शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढतात त्याला शिमग्याने सोंग म्हणतात. काही ठिकाणी तर वेगळीच तरा असते... कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बोरीचा बार यासाठी प्रसिद्ध आहे. काही गावामध्ये जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. धिंड झाल्यावर जावयाला सुहासिनिकडून उटण्याने आंघोळ घातली जाते व पोशाख देऊन सन्मान केला जातो. जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा असते. त्‍यामुळे गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. नाशिक जिल्ह्यातील वंडांगळी या गावात अशी पध्द्त असल्याचं वाचनात आलं आहे. अजूनही वेगवेगळ्या खेडोपाडी वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत.
कोणत्याही रूढी परंपरांचा काही अर्थ असतो. चुकीच्या रूढी परंपरा बंध झाल्या पाहिजेत व कालांतराने त्या बंधही होतात. काही चांगल्या परंपरांचे जतन करणे हेही सर्वांचे काम आहे. वाईट रूढी परंपरा बंध होताहोता आता दारू पिऊन धुळवड साजरी करण्याची नवी परंपरा काही ठिकाणी चालू होताना दिसते आहे. आषाढ आमावस्याची गटारी आमावस्या झाली. त्याचप्रमाणे धुलीवंदन(धुळवड) म्हणजे पिणाऱ्यांसाठी पर्वणीच अस काहीसं चित्र तयार होत आहे.
अलीकडे राजकीय धुळवड असाही शब्दप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो आहे. यातून राजकीय विचारांचे पतनच सुचवायचे असते. नुकत्याच झालेल्या विविध निवडूनकामधून राजकीय धुळवड दिसून आली आहे.

होळीच्या आधी झाडांची पानगळ झालेली असते. तो पालापाचोळा गोळा करून, परिसरातील कचरा एकत्र करून त्यात आपल्या मनातील वाईट विचार टाकून होळी पेटवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड, गोवऱ्या(शेण्या) जाळणे कुठेतरी थांबायला हवे. होळीच्या अग्नीत मनातील काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर, अहंकार यांना जाळून टाकायला हवे. पण हे विकार मनात ओझं म्हणून वागवणारे आपले मन खूपच विचित्र असते. बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात...

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते. (मंत्राने विष उतरत नाही, शब्दशः अर्थ घेऊ नये) पण मनातील विष म्हणजे वाईट दुषवृत्तीवर कोणता इलाज?? आपल्या स्वभावातील दोष शोधून त्याचे निर्मूलन करणे हा होळीचा उद्देश व्हायला हवा.

धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते. शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते. होळीपासून वाढणाऱ्या उष्म्यात झाडांची नवी पालवी डोळ्यांना सुखावते. पशु पक्षांना आपल्या सावलीत घेते. ऋतूंचा राजा म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतु हा तारुण्याचा निदर्शक आहे. जुनी जळमटे काढून नवी पालवी लेऊन आयुष्याचा मार्ग चालायचा असतो. असा काहीसा संदेश वसंतऋतु देत असतो. अडचणी आल्या, संकटे आली म्हणून निराश होऊ नका. वसंत होऊन नव्याने नवी सुरवात करा असाच संदेश तो देतो.

रंगपंचमी उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते.¶
सध्या रंगपंचमीला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का याची जागा कृत्रिम रासायनिक रंगांनी घेतली आहे. रासायनिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. कृत्रिम रासायनिक रंग बाजारात उघडय़ावरही विकले जातात. या रंगाच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते, डोळ्यांना त्रास होतो. रंगपंचमीला कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर हवा. हुल्लडबाजीला आवर हवा. रंगाच्या पाण्याचे फुगे मारणे हा धोकादायक प्रकारही थांबायला हवा. या दिवशी रंगांची उधळण करून एकमेकाप्रति जिव्हाळा, मैत्री, स्नेह जपण्याचा प्रयत्न हवा.

वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?? होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली विभिस्तपणा होणार नाही याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष असायला हवे. आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल... नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.
सर्वांना होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदिप रामचंद्र चव्हाण.

^^ संदर्भ:- भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा
¶¶ संदर्भ:- मराठी विश्वकोश.

Thursday, 15 February 2018

मार्केटिंगचे अजब तंत्र.. अन भरकटलेला समाज...


मार्केटिंगचे_अजब_तंत्र.. अन_भरकटलेला_समाज...


एक मल्याळी चित्रपट येऊ घातला आहे. नाव.. 'ओरू अदार लव. चित्रपटातील अठरा वर्षीय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर हिने सद्या प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तिचा या चित्रपटातील २८ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मूळची केरळ राज्यातील त्रिसूरमधील असणारी प्रिया प्रकाश चोवीस तासात सहा लाख फालोअर मिळवीत देशभर प्रसिद्धीच्या झोतात आली.
'व्यालेंटाइन डे' ची संधी साधून या चित्रपटातील काही सीन्स, व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल केले गेले. आणि सोशलमीडियावर चोवीस तास ऑनलाईन असणार्यांनी हे व्हिडिओ शेअर करण्याचा धडाका लावला. सध्या कुठेही निवडणुका नसल्यामुळे, दंगल नसल्यामुळे, रोजगाराची गंभीर समस्या असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तरुण लोखंसंख्येच्या हाताला काम नाही. त्यामुळे हे व्हिडिओ हातोहात शेअर होऊन बहुतेक मोबाईलच्या इनबिल्ट मेमरीत जाऊन पोचले. व्हिडीओ पाहिल्यावर हा चित्रपट 'शाळा- कॉलेजमधील भिन्नलिंगी आकर्षण' हा विषय केंद्रबिंदू ठेऊन बनवला आहे हे अगदी शेंबड पोरगं सांगेल. फक्त यात एक फरक दिसतो तो म्हणजे मुलीने यात आघाडी घेतली आहे.
मार्केटिंग मध्ये सोशलमीडियाला आलेले अनन्यसाधारण महत्व धंदेवाईक प्रवृत्तीने बरोबर ओळखून चित्रपटाची जाहिरात केली. व्यवसायच्या दृष्टीने चित्रपट निर्मिती यंत्रणा त्यांच्या जागेवर ठीक आहे.  *एका मल्याळी चित्रपटात शाळेत शिकत असणारी मुलगी तिच्याच वर्गातील मुलाला डोळा मारते... आणि मुलगा खल्लास!* असा हा व्हिडीओ पाहून अनेकजण असे काही चेकाळून जातात की त्या मुलीने यांनाच डोळा मारला की काय? हा प्रश्न पडतो.
चित्रपट हिट होईल, तो अनेक भाषेत प्रदर्शित होईल, ती मुलगी उद्या कदाचित मोठी अभिनेत्रीही होईल इतपर्यंत सर्व ठीक आहे.
पण याचा समाजमनावर किती पगडा पडावा? माध्यमातून किती चर्चा व्हावी? 'तरुण तुर्क अन म्हातारे अर्क' किती चेकाळावेत? यातून नव्या पिढीने काय घ्यावे? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
या एका व्हिडीओमुळे, दक्ष समजल्या जाणाऱ्या सोशलमीडियातुन सगळे गंबीर प्रश्न, मुद्दे कसे बाजूला पडतात हे या निमित्ताने दिसून आले.
सोशलमीडिया व्यक्त होण्याचे माध्यम आहे. सोशलमीडियावरून क्रांती वैगेरे काही होणार नाही व तिथे समाजहिताच्या गोष्टींनाही जास्त महत्व नाही. वाद-विवाद निर्माण करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, जाती धर्मात तेढ वाढवण्यासाठी, राजकीय प्रचार प्रसारासाठी सोशलमीडियाचा भरपूर उपयोग होत आहे. सामान्य जनता गुड मॉर्निंग आणि गुड नाइटच्या पलीकडे पोचलेली नाही. फॉरवोर्ड खेळ खेळनारे फॉरवोर्ड केल्या जाणाऱ्या बातमीची, घटनेची सत्यता तपासून बघण्याचे कष्टही घेत नाहीत. त्यातूनच मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या देशासाठी फाशी गेलेल्या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा दिवस बदलला जातो. आणि व्यालेंटाइनला विरोध करण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. व्यालेंटाइन साजरा करावा का नाही हा वेगळा विषय आहे. मुळात प्रिय व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज असतेच असं नाही. पण बाजारपेठेला विविध 'डे' ची गरज असते. व ती गरज भागविण्यासाठी असे 'डे' प्रसिद्धीच्या झोतात आणले जातात.
अनलिमिटे इंटनेट पॅक मुळे सोशलमीडिया वापरताना वेगळा खर्च होत नाही असा एक सार्वत्रिक (गैर)समज आहे. परंतु ज्या वेळी आपण एखादी गोष्ट विनामोबदला वापरत असतो, सतत वापरत असतो त्या वेळी आपण त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट् असतो. त्यांच्यासाठी आपण वस्तू असतो.. ते(सोशलमीडियातुन स्वताचे हित साधणारे) आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी वापरतात. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आपण आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी सोशलमीडियाचा प्रभावी वापर करुन देशहित पाहणे गरजेचे आहे.
व्यालेंटाइन व प्रिया प्रकाशाच्या व्हिडीओ मुळे विस्मृतीत गेलेल्या घटना पाहू...
काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्यांचा तीव्र हल्ला झाला असतानाच, १० फेब्रुवारीच्या पहाटे सुंजवानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना चाललेल्या सलग तीस तासांच्या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. आपलेही पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला शनिवारी पहाटे झाला. पाठोपाठ सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या crpf तळावर दहशतवादी हल्ला झाला यात crpf जवानांनी दोन दहशतवादी ठार मारले तर आपला एक जवान हुतात्मा झाला. देशात पाकपुरस्कृत दहशतवाद कारवाया व सीमेवरील चकमकी वाढल्याने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आपल्या प्रणाची बाजी लावत आहेत. देशात दहशतवादी संकट असताना, इकडे महाराष्ट्रात आस्मानी संकट आले. अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला रब्बी पिकाचा घास हिराऊन घेतला व त्यांच्या चिंतेत भर घातली. यावर चर्चा होऊन झालेले नुकसान टळणार नाही. आपण बंदूक घेऊन सीमेवर जाणार नाही. किंवा लगेचच शेतकऱ्यांची शेती तोट्यातून फायद्याची होणार नाही. परंतु या गोष्टींवर किमान चर्चा झाली तर आपल्यासाठी कोण कोण कष्ट उपसत आहे याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव उत्पन्न होईल.
सोशलमीडियाचा कमालीचा वापर करून बहुतेक सर्व स्थरातील लोकसंख्येला त्यात गुंतवून मुख्य समस्येपासून दूर घेऊन जाणे हे काही लोकांच्या फायद्याचे असते. त्यासाठी विविध यंत्रणा विविध स्थरावर काम करत असतात. अश्या यंत्रणा जाळे टाकून ठेवतात... माणसांची झालेली मेंढरे त्या जाळ्यात धावत जाऊन स्वतःला अडकवून घेतात, हे नित्याचे झाले आहे. समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे.
अखंड सावधान असावे... एवढेच आपल्या हाती आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
🙏🙏🙏🙏

Thursday, 8 February 2018

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!


देशातील प्रत्येक नागरीक प्रजासत्ताकाचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत होता. त्याच वेळी धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या शेतकऱ्यावर सरकारी अनास्थेला कंटाळून राज्याच्या मंत्रालयात विष पिण्याची वेळ आली. त्यातच २८ जानेवारी २०१८ ला त्यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे सर्वत्र शेतकरी आत्महत्या मुद्दा चर्चिला गेला. भरपूर गदारोळ झाला. राजकीय धुरळा उडाला. सोशलमीडिया वर राग- चीड व्यक्त झाली. आणि आता ते तापलेले वातावरण,राग,गदारोळ  मात्र शांत,शांत झाला. असे का झाले? असे का होतेय?

  गजनी या हिंदी चित्रपटात नायकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला अगदी अलीकडे घडलेली घटना आठवत नाही. कोणतीही गोष्ट त्याच्या विस्मृतीत जाते. त्याला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असं म्हंटल जातं. आज समाजमनाचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की हा आजार बहुतेक सर्व भारतवासीयांना जडला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अप्रिय घटना घडत असतात. लोक जेवढ्यास तेवढे दुःख व्यक्त करतात. पुढे चालायला लागतात. कोणालाच कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याची गरज वाटत नाही.
                सर्वसामान्यांचा रोजच्या रोज पोटाची खळगी भरण्यासाठीची लढाई लढण्यातच वेळ जात असेल. ही त्याची मजबुरी ही असेल. पण शासन-प्रशासनाचं काय? ते हा वेळकाढूपणा का करतात? शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना व त्याबद्दल समाजात, शासन स्तरावर निर्ढावलेपणा आलेला आहे. कोणत्याही अप्रिय घटनेतून बोध न घेता पुढील घटनेला तेवढ्याच निर्ढावलेपणानं तोंड देण्यासाठी आम्ही कसे तयार आहोत. हे दाखवण्याची सद्या सर्वत्र स्पर्धा दिसून येते. यातून या सर्वांना झालेल्या 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या आजाराची दाहकता समजते.
       शेतकरी वेगवेळ्या कारणांच्यामुळे आत्महत्या करत आहेत. अस्मानी संकटे येतात ती रोखली जाऊ शकत नाहीत. मात्र कृत्रिम संकटं निश्चित कमी केली जाऊ शकतात. वाढत्या आणि न थांबणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा जणू भारतदेशाला लागलेला शाप आहे.
याची सुरवात कशी झाली?कोणते घटक याला जबाबदार आहेत? काही उपाय केले तर या आत्महत्या कमी होऊ शकतात का? या बद्दल हा ऊहापोह.....
     'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' अशी म्हण किंवा विचारसरणी काही दशकापूर्वी जनमानसात रुजली होती. कारण त्या वेळी तशीच समाजरचना होती. देश स्वतंत्र झाल्यावर हळूहळू ही मानसिकता बदलू लागली पुढे हा बदल 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असा झाला. तर सद्या उत्तम नोकरी, उत्तम व्यवसाय, मध्यम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि शेती मात्र कनिष्ट, त्रासदायक ते अति त्रासदायक ठरली आहे. हा बदल सर्वसाधारण पणे चाळीस ते पन्नास वर्षात झालेला बदल आहे. याला जागतिक व देशपातळीवरील धोरणे व अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. सर्वदूर प्रगतीचे वारे वाहत असताना शेती व शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडत गेला.. त्याला शासनाने आधार दिला नाही.आणि समाजातील इतर घटकांनीही आधार दिला नाही.
       भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे शाळेत शिकवले गेले.. अजूनही शिकवले जाते. याच शाळेत शिकुन डॉक्टरची मुलं डॉक्टर होऊन पुढे तो व्यवसाय चालवतात. (सेवेचा व्यवसाय झाला आहे), इंजिनियरची मुलं इंजिनियर किंवा इतर क्षेत्रात चमकावी म्हणून इंजिनियर कष्ट घेतो, व्यावसायिकाची किंवा बिझनेसमनची मुलं पुढे जाऊन तो व्यवसाय करतात किंवा त्यांनी तो करावा अशी त्या व्यावसायिकांची इच्छा असते. सनदी सेवेत असणाऱ्या बहुतेकांची मुलं त्या क्षेत्राकडे वळतात किंवा त्यांचे पालक त्यासाठी मार्गदर्शन करतात.सर्वसामान्य नोकरदारही आपली मुलं शिकुन मोठी व्हावी. त्यांना चांगली नोकरी आणि सुंदर छोकरी मिळावी. ही इच्छा बाळगतात. राजकीय नेत्यांची मुलं वंशपरंपरेने त्यांच्या गादीवर बसतात किंवा बसवली जातात. हे सर्व समाजघटक आपापली मुलं आपापल्या व्यवसायात, उद्योगधंद्यात, राजकारणात, उच्च पदावर जावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी तसा प्रयत्न करणे चूक आहे किंवा करू नये असे ही नाही. पण हे सर्व होत असताना कोणत्याही शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा किंवा आपल्या मुलीला शेतकरी नवरा जोडीदार म्हणून मिळावा असं वाटत नाही. असा प्रयत्न करताना तो दिसत नाही. हे असं का? जगाचा पोशिंदा म्हणून सगळ्यांनी डोक्यावर घेतले असताना, जय किसान म्हणून जयजयकार केला जात असताना, शेतकऱ्याला किंवा कोणाही व्यावसायीक, उच्चपदस्थांना, राजकीय नेत्यांना आपली पुढची पिढी शेतकरी व्हावी असं का वाटत नसावं? मग जगाचा पोशिंदा म्हणणे. जयजयकार करणं हे खोटं आहे का? 
     शेतीत कष्टाच चीज होत नाही. वाढलेल्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक उत्पन्नाची शाश्वती नाही. हे देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्याने सिद्ध केले आहे. देशात शेतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असणारी संख्या मोठी आहे. जवळपास एकूण लोकसंख्येच्या ५० ते ६०% म्हणजे जवळपास ६०ते ७०कोटी लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत.
शहरात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असतात त्यामुळे शहरी लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून नसते. असली तरी ते प्रमाण नगण्य असते. त्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे यातून नव नवे प्रश्न निर्माण होत आहेत. 
     सद्या ग्रामीण भागात राहणारी बहुतांशी लोखसंख्या प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामा शिवाय रोजगाराचे इतर पर्याय नाहीत.असले तर ते खूप कमी आहेत. ग्रामीण भागात पर्याय नाहीत म्हणून शेती केली जाते... शेतीला पूरक जोडधंदेही केले जातात. तर शहरी भागातील लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती (खरेदी) करतात. टॅक्स वाचवण्यासाठीही शेती करणारे व शेतकरी होणारे शेतीप्रेमी शेतकरी आपल्या याच देशात आहेत.
      ग्रामीण भागात राहणाऱ्या व पूर्णपणे शेतीवर उपजीविका असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचे खूप मोठे प्रश्न व समस्या आहेत. त्या समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. असे असताना अलीकडच्या दिवसात काही घटना घडल्या त्याचा थोडा आढावा घेऊ.
     १)नुकताच 'वर्ल्ड इकॉनॉमी फोरम' (WEF) या जागतिक परिषदेत 'ऑक्सफॅम' या संस्थेने एक चिंताजनक अहवाल प्रस्तुत केला. या अहवालात नमूद केल्यानुसार, भारतातल्या १ टक्का श्रीमंताकडे ७३ टक्के संपत्ती एकवटली आहे. भारतातल्या त्या १ टक्का श्रीमंतांची संपत्ती ही २०.९ लाख कोटींनी वाढली. ही रक्कम भारताच्या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाइतकी मानली जाते. 
2)गेल्या दोन दशकामध्ये संसदेतील लोकप्रतिनिधींचे वेतन १२५० टक्के वाढले.अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाली.
तर ५६/५७ वर्षात महाराष्ट्रातील आमदारांचे वेतन दीड रुपया ते दीड लाख रुपये वाढले. हेही प्रिंट मीडियात छापून आलं आहे.
३)सरकारी व खाजगी बँकांचे Non-performing asset (NPA) थकीत कर्ज आठ लाख कोटीच्या जवळ जाऊन पोचले आहे. यात सरकारी बँकांचा वाटा सहा लाख कोटींचा आहे. यापैकी तीन लाख कोटी हे बुडीत कर्ज आहे.
भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जाचा आकडा हा तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या माजी डेप्युटी गव्हर्नरनी केला आहे. 
४)'पद्मावत’ चित्रपटातचे तिकीट २४०० रूपयांवर गेले.
५)श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला.
६)देशातील एकूण शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. असाही अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
    वर नमूद केलेले सहा मुद्दे पाहिले तर वेगवेगळे व वेगवेळ्या क्षेत्राशी निगडती आहेत. पण त्यांचा शेती व शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांशी अप्रत्यक्ष संबध आहे. कसा ते पाहू...
      संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहेत. ज्यांनी गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढणाऱ्या दरीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ते सर्व राज्याचे व केंद्राचे धोरणकर्ते, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वतःचं हित साधताना पक्षभेद विसरून एक होताना दिसून येतात. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी एकत्र येत नाहीत. लोकप्रतिनिधीच्या मध्ये काही सन्माननीय अपवाद आहेत. पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. लोकप्रतिनिधी पूर्ण ताकतीने किंवा निस्वार्थीपने सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत.अनेक संकटात शेतकरी असताना लोकप्रतिनिधी आपले पगार, भत्ते, सोई-सुविधा या बाबतीत कमालीचे दक्ष असतात. 
      मोठे उद्योगपती हजारो कोटींचे कर्ज काढतात, थकवतात, बुडवतात, शिवाय आलिशान आयुष्य जगतात, अगदीच वेळप्रसंगी देश सोडून पळून जातात. त्यांना कोणतेही राज्यकर्ते शासन करत नाही. बँका त्यांची कर्जे पुन्हा पुन्हा रिन्यू करतात. व्याजात सूट देतात. त्यांना  सेलिब्रेटीची वागणूक देतात. त्याच्या उलट  सामान्य शेतकऱ्यांना बँका दारात ही  उभ्या करत नाहीत. सन्मानजनक वागणूक देत नाहीत. थोड्या थकबाकीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठवतात. अब्रूच्या भीतीने मग शेतकरी आत्महत्या करतो. तरीही त्याचे कर्ज माफ होत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला ते फेडावे लागते. अशा वेळी प्रशासन ती आत्महत्या शेतकरी आत्महत्या आहे का नाही हे ठरवत बसते.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातलगांना कागदपत्रांची पूर्तता करत बसावे लागते.
      महाराष्ट्रात अगदी अलीकडे गाजलेली आत्म(हत्या) म्हणजे धर्मा पाटील यांची आत्म(हत्या) होय. शेतीच्या योग्य मोबदल्यासाठी ८४ वर्षाचा शेतकरी बलिदान देतो... त्यावेळी पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी याच देशाच्या मातीतील काही घटक आनंदाने २४००रु मोजतात... त्यांना शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचं किंवा कोणत्याही शेतकरी आत्महत्येबद्दल काही देणंघेणं नसतं. खा-प्या-मजा करा ही संस्कृती वाढत आहे. तर सामाजिक संवेदना नष्ट होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम साहजिकच उपेक्षित घटकावर होतो. शेतकऱ्यांची नवी पिढी शिकली आहे. व्हाट्सअँप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी सोशल माध्यमे वापरत आहे. त्यांना ही सामाजिक परिस्थिती दिसते. आमची कदर तुम्ही करणार नसाल तर तुमची कदर आम्ही का करू? हा रोकडा सवाल घेऊन ती उभी राहिली तर इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष टोकाचा होऊ शकतो. आणि ही गोष्ट सगळ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्याची झलक नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी दिसून आली होती.
     हे सगळं घडत असताना जगातील सर्वात श्रीमंत देशात आपल्या देशाचा सहावा नंबर लागतो. असाही एक सर्व्हे रिपोर्ट आला. तसा पूर्वीपासूनच आपला देश श्रीमंत होता. *सोने की चिडीया* असं इंग्रज आपल्या देशाला संबोधत होते. भारतीय लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघायचा असंही बोललं जायचं. म्हणजे संपन्नता आताही आहे पूर्वीही होती. शेतकरी, कष्टकरी तेव्हा सामान्य जीवन जगत होता अन आता मात्र हालाखीचीचं जीवन जगतो आहे. मग या सर्व्हेमधील श्रीमंती कोणाची?? हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांच्याकडे संपत्ती आली म्हणजे देश श्रीमंत झाला का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तो होणार नसेल तर आपण स्वतःलाच फसवतोय असं होईल.
      पूर्वी काही प्रमाणात का होईना शेतकरी समाधानी होता. त्याच्याजवळ खूप पैसा नसला तरी गरजा कमी असल्यामुळे त्या भागत होत्या. पाऊसपाणी वेळेवर झाला की सुगी चांगली व्हायची...शेतकरी आनंदी व्हायचा.... गाईगुरांना भरपूर चारा उपलब्ध व्हायचा. शेतकरी आपल्या घरी आलेल्या धान्यांतील काही भाग इतरांना भरभरून द्यायचा. सुगी संपली की खेडोपाडी यात्रा भरायच्या. पाव्हणे-रावळे भेटायचे. सगळं कसं ठीक चाललेलं असायचं. ही परिस्थिती कायमच असायची असं नाही.. दुष्काळही पडायचा, कधी अतिवृष्टी व्हायची, पीकं पाण्यावाचून अथवा पाण्यामुळे हातची जायची. पण शेतकरी कधी नाउमेद झाला नव्हता. त्यानं स्वतःला संपवल नव्हतं. घरच्यांच्या पाठींब्यावर तो बिकट परिस्थितीचा नेटाने सामना करीत उभा राहत होता. आर्थिक संकटे यायची पण त्यातून तो उभारी घेत होता. 
    परंतु ही परिस्थिती पुढे पालटत गेली. शेतीचं तुकडे झाले एका हिश्श्याचे दोन, चार, सहा तुकडे झाले. आज ७०% शेतकरी अल्पभूधारक आहेत.बरेच शेतमजूर भूमिहीन आहेत.एक टक्के शेतकऱ्याकडे दहा हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे. त्यातही कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. तुकडीकरणामुळे शेतीचा मशागत खर्च वाढत आहे. उत्पन्न हवं तसं निघत नाही. यांत्रिक शेती करण्यात अडचण येते. त्यातच खाणारी तोंडे वाढली. महागाई वाढली. शिक्षणाची गंगा खेडोपाडी आली. मुलं मुली शिकू लागल्या. शेतात राबणारे हात कमी झाले. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढल्या. काही प्रमाणात उत्पन्न वाढले पण खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचबरोबर निसर्गाचा प्रकोपही वाढू लागला. वेळी,अवेळी अवकाळी पाऊस पडतोय. तर कधी दुष्काळ. चांगला पाऊस झाला अन पिकं चांगली आली तर पिकाला भाव नसतो. मातीमोल भावाने पीकं विकावी लागतात. रक्ताचं पाणी आणि पिकाचा लाल चिखल हे सद्याच्या शेतकर्याच्या पाचवीला पूजलेलं आहे. सर्व औदयोगिक उत्पादक स्वतःच्या मालाचा दर स्वतः ठरवतात पण हे भाग्य शेतकर्याच्या नशिबात नाही. पिकलेल्या पालेभाज्या नाशवंत असतात. तर धान्य साठवणुकीसाठी जागा नसते. असली तरी पैशाची निकड असते. त्यामुळे येईल त्या भावात हाती आलेलं पीक विकावं लागते. निसर्ग झोडपतो. दलाल लूट करतात. ग्राहक फुकट मिळतंय का ते बघतो. राज्यकर्ते ग्राहकांचं हित जपतात. आणि उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागतो. अशी परिस्थिती सद्या आहे.
       शेतीत घातलेला पैसा मिळेल का नाही, कष्टाचं चीज होईल का नाही, याची शाश्वती नाही. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागेनासा झाला की तो मेळ बसवायला कर्ज काढतो. ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज. मग व्याज देण्यासाठी तिसरं कर्ज. कर्ज... आणि कर्ज..!! बँका कर्ज देत नसतील तर सावकाराकडून कर्ज घेतो. सावकारी कर्जाचे व्याज हे खूप जास्त असते. या कर्जासाठी घरातील लक्ष्मीच्या अंगावरील किडुक मिडुक डाग गहाण ठेवतो. कधी कधी शेतही गहाण ठेवतो.अशा चक्रव्युहात शेतकरी अडकला,की त्याला हे चक्रव्युह सहजासहजी भेदता येत नाही. पैशाचे सर्व मार्ग बंद झाले की खाणारी तोंडे बोलू लागतात. मुलं ऐकत नाहीत. प्रत्युत्तर करतात. बायको अबोला धरते. चार लोकात किंमत राहत नाही. समाजात प्रतिष्ठा मिळत नाही,प्रतिष्ठा संपते. असं दुःख शेतकरयांच्या वाट्याला येतं. यातून हा शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मग कधी तो व्यसनाचा आधार घेतो. आणि बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो. 
    तर कधी याच्या उलट परिस्थिती असते. घरातील लोकांना पूर्ण परिस्थितीची जाणीव असते. ते सर्व निमूटपणे सहन करत असतात. आपल्या बापाचे, आपल्या नवऱ्याचे मन दुखावणार नाही अशीही काळजी बायको मुलं घेत असतात, कष्टाची कामे करून सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न घरातील प्रत्येकजण करत असतो, मुलं अकाली प्रौढ होतात, मनातील अनेक इच्छा मारायला शिकतात, घरधणीन फाटक्या साडीला ठिगळे लावून तीच साडी नेसते. पण आबाळच फाटलं तिथं हे उपाय तोकडे पडतात..कुटुंबाला सतत चिंता सतावते... अश्या एकूण परिस्थितीत आपण घर चालवायला लायक नाही हा विचार शेतकर्याच्या मनात घर करतो. घरातील बायका मुलांच्या गरजा भागवता येत नसल्यामुळे कर्ता शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मुलांचं शिक्षण, मुलींची लग्ने, घरातील एखाद्याच मोठं आजारपण यात तो पूर्ण कोसळून पडतो. आता यातून मार्ग नाही, अस मनाशी पक्क होत जातं. कर्ज कसं फिटायचं?मुलांचं शिक्षण कस व्हायचं? मुलीचं लग्न करायला अन आई- वडिलांच्या आजारपणावर उपचार करायला पैसा कुठून आणायचा? बायकोला तर लग्नापासून साधा फुटका मनी घेतला नाही. होता तोही गहाण ठेवला.याचं दुःख शेतकऱ्याला होत असत.आपल्या जीवनाला अर्थ नाही.आपल्याला जगण्याचा हक्क नाही. असा विचार कर्जाच्या चक्रव्हूवात सापडलेला शेतकरी करत असतो. आणि त्याला या सर्वातून शेवटी एकच मार्ग दिसून येतो. तो म्हणजे आत्महत्या आणि आत्महत्या!
      शेतकरी आत्महत्या हा कृषिप्रधान(?) भारत देशाला लागलेला शाप आहे. आपल्या महाराष्ट्राचा यात पहिला नंबर आहे. शेतकरी आत्महत्या हा खूप गंभीर व सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. साहेबराव शेषराव करपे. राहणार चिलगव्हाण, जिल्हा यवतमाळ. यांनी संपूर्ण कुटुंबासह १९ मार्च १९८६ या दिवशी आत्महत्या केली. ही अधिकृत पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते. अधिकृत यासाठी की आधीही शेकडो शेतकरी आत्महत्या झाल्या असतील पण त्याची सरकारदरबारी नोंद नसल्यामुळे त्या अधिकृत मानल्या जात नाहीत. गेल्या एकतीस बत्तीस वर्षात सरकारदरबारी नोंद झालेल्या आत्महत्यांची देशभरातील आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. २००७ पर्यंत दोन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या अस एका संशोधन प्रबंधात वाचण्यात आले. तर २०१७ पर्यंत हा आकडा ३ लाखावर पोचला आहे.
सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून प्रतिवर्षी १२ हजारापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत.म्हणजे दिवसाला सरासरी ३०ते४० शेतकरी मृत्यूला जवळ करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, समाजाला अपयश आलं आहे. 
      आता वेळ आली आहे आत्महत्या विरुद्धची लढाई शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने लढण्याची, लढवण्याची. गावकी- भावकीच्या वादात अन टुकार राजकारणाच्या फंदात न पडता शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरायला हवे. जमेल तेवढे शिक्षण, मिळेल ते काम,नवनवीन उद्योगधंदा याकडे वळून काबाडकष्ट करून आपल्या शेतकरी बापाला वाचवण्याची जबाबदारी आता आपण घ्यायला हवी. शासन काही करेल की नाही, समाज काय भूमिका घेईल. हे पाहण्यात आता वेळ दवडून चालणार नाही.शेतकरी आत्महत्येचा वणवा आपल्या घरापर्यंत यायच्या आधी शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याची भूमिका महत्त्वाची आहे. खोटी प्रतिष्ठा, लग्नामधील अनाठायी खर्च,जावळ-जत्रा, इतर करतात म्हणून वाढदिवसाचा दिखावा, कर्ज काढून सोसायट्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणे, गरज नसताना चारचाकी घेणे, उगाचच बुलेटचा थाट करणे, शेतातील कामात कामचुकारपणा करून गावातल्या चौकात किंवा पारावर बसून वेळ घालवणे, गल्ली पुढार्यांच्या नादाला लागून पूर्ण दिवस वाया घालवणे, अश्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हौसेला मोल नसते हे जरी खरं असले तरी हौस करणारा कर्जाच्या विळख्यात सापडू नये.म्हणून हे उपाय केले पाहिजेत. थोडक्यात रिन काढून सण करण्याची पद्धत कुठं तरी थांबली पाहिजे. अनावश्यक खर्च टाळलेे पाहिजेत. सर्वांनी 'एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' यामार्गाने जाणे हिताचे आहे. तरुण शेतकर्यांनी अडचणीत खचून न जाता आपलं दुःख कुणाजवळतरी बोललं पाहिजे. प्रत्येक समस्येवर उपाय असतात. प्रश्न असले की उत्तरही असते. आत्महत्या करून प्रश्न संपणार नाहीत. ते अधिक वाढतील. आपल्या आईवडिलांना, बायको- मुलांना, मित्रांना आपली गरज आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करणार नाही. असा ठाम निश्चय सर्व शेतकरी बंधूनी करावा ही हातजोडून त्यांना एका शेतकऱ्याच्या पोराची विनंती आहे.
    बहिणाबाई चौधरी आपल्या पेरणी या कवितेत म्हणतात...
पेरणी पेरणी,अवघ्या जगाच्या कारनी।
ढोराची चारनी,कोटी पोटाची भरणी।

शेतकरी स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी शेती करतो, ढोर मेहनत करून पिकं पिकवतो. साऱ्या जगातील लोकांच्या पोटाची तो काळजी घेतो. लोकांसाठी, गुराढोराच्यासाठी तो शेतात राबतो. म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.
'लाख मेले तर चालतील.पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे' अशी मराठीत म्हण आहे. आज लाखोंचा पोशिंदा किड्यामुग्याप्रमाणे रोज मरतोय. भारतदेशाच्या कपाळी लागलेला शेतकरी आत्महत्येचा शाप पुसुन टाकण्यासाठी, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी समाजातील सर्वस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. या कामी शक्य ते सर्व उपाय समाजातील सर्वस्तरातून व्हायला हवेत.
....संदिप रामचंद्र चव्हाण.











मुद्दा क्र 1 ते 6 चे संदर्भ..
1)संपत्तीचे केंद्रीकरण https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/why-is-indias-wealth-inequality-growing-so-rapidly/articleshow/62679685.cms
2)खासदारांचे वेतन (https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/varun-gandhi/articleshow/62763017.cms)
आमदारांचे वेतन 
(http://prahaar.in/mla-salary-increased-now-give-result/)
3)NPA
http://www.lokmat.com/business/banks-bad-debts-amount-rs-20-lakh-crore/

https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/public-sector-banks-npa-hits-rs-7-34-lakh-crore-at-september-end/articleshow/62231730.cms
4)पद्मावत चित्रपट तिकीट दर
http://www.tarunbharat.com/news/552597
5)श्रीमंत देशात भारत सहावा
http://zeenews.india.com/marathi/india/india-ranks-6th-in-wealthiest-country-in-the-world/410055
6) शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
https://www.krushiking.com/newsdetail.php?goytrarenyarjf&100102584

Thursday, 1 February 2018

अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथशोध आणि वाचन-बोध

अक्षरनिष्ठांची_मांदियाळी
ग्रंथशोध आणि वाचन-बोध

लेखक:- डॉ. अरुण टिकेकर
प्रकाशन:-रोहन प्रकाशन
पृष्टे:- 173
किंमत:- 140
(अक्षरधाराच्या पुणे येथील पुस्तक प्रदर्शन व विक्री यामध्ये 11 जानेवारी 18 रोजी 25% डिस्कउंड वर खरेदी केले आहे)
रुंदी 110mm ×उंची180mm(रेग्युलर पुस्तक साइजपेक्षा लहान)

पुस्तकावरील पुस्तक या प्रकारातील हे तिसरे पुस्तक मी वाचून संग्रही ठेवले आहे. सुरवातीला 'बखर शिक्षणाची' हे शिक्षण क्षेत्रातील धडपड्या व शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेले पालक- शिक्षकांना अतिशय उपयुक्त असे हेरंब कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. नंतर बहुचर्चित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे निरंजन घाटे यांचे पुस्तक वाचले व माझ्या शब्दात जमेल तसे त्यावर लिहून इतर वाचकांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच पठडीतील डॉ. अरुण टिकेकर यांचे अक्षरनिष्ठांची_मांदियाळी' हे पुस्तक वाचून पूर्ण केले.


या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला ‘ग्रंथ-शोध’ तर दुसरा 'वाचन- बोध'.
लेखक लोकसत्ताच्या संपादकपदी असताना 'लोकमुद्रा' या पुरवणीत डिसेंबर 2000 ते डिसेंबर 2001 या काळातील लेख ग्रंथ शोध या भागात आहेत.
मदिराप्राशन आणि ग्रंथवाचन या दोन्हीमुळे कैफ चढतो पण या कैफातील गुणात्मक फरक सांगत पुस्तकाची सुरवात होते.
ग्रंथ-शोध या भागात लेखकांनी आपल्या नोकरीतील 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव अश्या ठिकाणी दुर्मीळ व जुन्या ग्रंथखरेदी बद्दल व त्या अनुभवाबद्दल लिहले आहे. रद्दीच्या दुकानात व जुन्या पुस्तकांच्या दुकानात भरपूर वेळ घालवला त्याच्या आठवणी, त्याचप्रमाणे अश्या ठिकाणची त्या दुकान मालकाबद्दलच्या स्नेहाची हकीकत सांगितली आहे.
  पुस्तकांना वाळवी, कृमी, लागू नये म्हणून वेखंडच्या मुळ्या पुस्तकाच्या कपाटात ठेवाव्या, ग्रंथ मुलासारखे सांभाळावे लागतात त्यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर मोठ्या प्रमाणावरील ग्रंथसंचय घरातील इतरांना कसा तापदायक होऊ शकतो, सवलत न देणारे ग्रंथ विक्रेते व सर्वसामान्यांना परवडेल अशी भरगोस सवलत देणारे 'पद्मश्री टी. एन. शानभाग' आणि त्यांचे 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल' अशा अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. लेखकांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ कसे मिळवले, पैसे नसल्यामुळे काही वेळा काही ग्रंथ हातचे गेले, तर काही परवडत नसतानाही खरेदी केले याबद्दल माहिती देतात. महनीय व्यक्तींच्या सही असलेलेे किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या संग्रहातील ग्रंथ रस्त्यावर कसे येतात, जिवंतपणी आपल्या ग्रंथसंग्रहाची योग्य रीतीने काळजी घेतो तशी मृत्यूनंतर त्याचे काय करायचे हेही स्पष्ट होण्यासाठी मृत्युपत्र करावे अथवा जिवंतपणी योग्य हातात ते सोपवावे असे मत लेखक व्यक्त करतात. आपल्या देशातून खुपसारे दुर्मिळ ग्रंथ परदेशी गेले आपल्याला ते सांभाळत आले नाहीत याचे लेखकांना वाईट वाटते. परंतु आपल्या येथील एकूण परिस्थिती पाहता झाले ते बरेच झाले असंही खेदाने म्हणतात. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ व त्याची झालेली आबाळ, दुर्मिळ ग्रंथ जपणूक करण्यात झालेला हलगर्जीपणा, त्याचप्रमाणे इंग्लड मधील हे-ऑन-वाय हे पुस्तकांचे गाव याबद्दल माहिती देतात.

‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. या भागात लेखकांचे आवडते व त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या फक्त इंग्रजी ग्रंथांविषयी लिहिले आहे. (त्यामुळे फक्त मराठी वाचनार्यांची निराशा होऊ शकते). यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज किती महत्वाची आहे, योग्य मार्गदर्शक मिळाल्यास अनावश्यक वाचन व त्यामुळे वाया जाणारा वेळ कसा वाचू शकतो या बद्दल सांगितले आहे.
एखादं पुस्तक वाचले की आपणाला वाटतं... काय छान पुस्तक आहे. परंतु काय छान आहे हे सांगता येत नाही. फक्त Value judgement म्हणजे चांगलं आणि वाईट यापलीकडे सांगता येत नाही... म्हणून 'लर्निंग टू फिलॉसफाइझ' अशी पुस्तक मराठीत हवीत अस लेखक सुचवतात.
लेखकांच्या मते काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत.
बहुतेक वाचक आत्मचरित्र या पायरीपर्यंत जातात. तत्वचिंतन, तत्वचर्चेची पायरी ही वाचनाची प्रगतावस्था म्हणायला हवी, व ही अवस्था फारश्या लोकांनी गाठलेली नसते.कारण तसं शिक्षणच दिल जात नाही. अस मत ते व्यक्त करतात.
वाचक ते ग्रंथसंग्राहक अवस्था खूप मार्मिकपणे वर्णन केली आहे, खूप लोकांना ती आपलीच कहाणी वाटू शकते.
लेखक वाचकाचे चार प्रकार सांगतात... 1) वाचतो पण काय वाचतो याचे निकष त्याच्याजवळ नसतात 2) न वाचता पुस्तकांवर बोलणारे, 3) चांगलं-वाईट काय हे बरोबर ओळखणारे 4)समीक्षक जे की चांगलं काय, वाईट काय हे जाणतात. समीक्षक लेखक-वाचक-प्रकाशक यांना सांधनारा दुवा असतात.

कोणत्याही पुस्तकाची पूर्ण माहिती किंवा त्या विषयातील सखोल अभ्यास नसताना समीक्षा करू नये अस लेखकांचे मत आहे. समीक्षा करताना त्या विषयाचा अभ्यास नसेल तर लेखकावर अन्याय होऊ शकतो असही मत ते व्यक्त करतात...अजूनही बरच काही या पुस्तकात आहे.
एकूणच डॉ. अरुण टिककेकर यांच्या समृद्ध वाचन-लेखन जीवनाचे काही प्रमाणात दर्शन घडवणारे व वाचकांसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

(पुस्तक छान आहे पण नेमकं छान म्हणजे कसं.. हे मला सांगणं जमलंच आहे असं नाही... वाचलेल्या सर्वच पुस्तकावर लिहलं पाहिजे असही नाही... परंतु जे समजले किंवा लिहताना आठवले ते इतर वाचकांना उपयोगी पडेल व पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल या उद्देशाने हा लेखन प्रपंच.... चांगल्या समीक्षकांनी अजून योग्य शब्दात या बद्दल माहिती लिहून प्रसिद्ध करावी ही विनंती..संदिप रामचंद्र चव्हाण)