My Blog List

Saturday, 26 May 2018

मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश: ज्ञानाचा सागर आता एका क्लिकवर.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापणेच्यावेळी राज्यकारभारासंबधी काही मुलभूत धोरणे सांगितली. या धोरणानुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या वाढीसाठी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाची’ स्थापना १९ नोव्हेंबर १९६० रोजी झाली. या साहित्य मंडळाने सर्वसंग्राहक विश्वकोश संपादित करून प्रकाशित करणे असे काम हाती घेतले. मराठी विश्वकोश निर्मिती हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प मान्य झाल्यानंतर वाई येथे या प्रकल्पाची स्थापना झाली.
मह्याराष्ट्रातील थोर विचारवंत आणि संस्कृत पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची या मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर पुढे १९८० साली मह्याराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन करण्यात आले आणि मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पासाठी ‘मह्याराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ हे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले. ह्या स्वतंत्र मंडळाच्या अध्यक्षपदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची नियुक्ती तशीच ठेवण्यात आली. ह्या प्रकल्पाच्या अगदी आरंभापासून ते २७ मे १९९४ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते.  मराठी विश्वकोशाचे पहिले पंधरा खंड (१९७६-९५) त्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली तयार झाले. त्यांच्या नंतर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून प्रा. मे. पु. रेगे ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकाल...
१) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. १९ नोव्हेंबर १९६० ते २७ मे १९९४
२) प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे. ४ जून १९९४ ते २८ डिसेंबर २०००
३) प्रा. रा. ग. जाधव. १६ जानेवारी २००१ ते १० फेब्रुवारी २००३
४) डॉ. श्रीकांत जिचकार. २१ जुलै २००३ ते २ जून २००४
५) डॉ. विजया वाड. ९ डिसेंबर २००५ ते ८ डिसेंबर २००८ आणि जून २००९ पासून ते १६ फेब्रुवारी २०१५.
६)दिलीप करंबेळकर. ०८ ऑगस्ट २०१५ पासून कार्यरत.

सुरवातीला एक हजार पृष्ठांचे २० खंड तयार करायचे ठरले होते व यातील लेखांना शब्द संख्येची मर्यादाही घातली होती. पुढे या खंडांची संख्या २३ इतकी झाली. गरजेनुसार पृष्ठांची व लेखातील शब्दांची मर्यादा वाढत जाऊन २२ ते २३ हजारापेक्षा जास्त पाने,  ३०० पेक्षा जास्त सूची, आणि तब्बल #१८_हजार पेक्षा जास्त लेखांचा समावेश होऊन २० खंड प्रकाशित झाले आहेत. परंतु हे विश्वकोशीय खंड फक्त सरकारी विक्रीकेंद्रावरच विक्रीसाठी उपलब्ध असल्याने इतर ग्रंथासारखे कुठेहीे सहज मिळत नाहीत. शिवाय एका वेळी एका विक्रीकेंद्रावर २० खंड मिळतील याचीही खात्री नाही. परंतु आता हा ज्ञानाचा खजाना डिजिटल स्वरूपात, मोबाईल अँप स्वरूपात उपलब्ध झाला आहे. याची माहिती पुढे घेऊ.
 
मराठी विश्वकोश हा मराठी असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याने यात मराठी भाषा व मराठी साहित्य त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अन्य प्रकारची माहिती अधिक तपशीलवार दिली आहे. त्यानंतर भारताच्या माहितीला प्राधान्य आहे. इतर देशांची महिती तुलनेने कमी स्वरूपात आहे.
सामाजिक शास्त्र, कला, तंत्रज्ञान या संबंधितील माहिती अधिक विस्तृत आहे. ज्या ज्या विषयांना ज्ञानाच्या दृष्टीने अधिक महत्व आहे त्यांना अधिक महत्व दिले आहे. कारण याबाबत प्रादेशिक प्रश्न उद्धवत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सखोल माहिती, रेखाचित्रे, छायाचित्रे, आलेख, आकृत्या, नकाशे यांच्या समावेशने काही विषय अधिक स्पष्टपणे समजतात.
कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान तपशीलवार सांगणे हे विश्वकोशाचे काम नसते. विश्वकोश काही मर्यादेत मार्गदर्शन करू शकतो. मराठी विश्वकोशात दिलेले सर्व लेख अभ्यासपूर्ण लिहलेले आहेत. सर्वसामान्य शिक्षितांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सामान्य वाचकसंसाठी संदर्भग्रंथ म्हणून हा विश्वकोश उपयुक्त आहे.

#मराठी_विश्वकोशाची_विषयव्याप्ती:-
अर्थशास्त्र, कला व कारागिरी, खेळ व मनोरंजन,
 ग्रंथालयशास्त्र, चलचित्रविद्या, चित्रकला,
जगातील भाषा व साहित्ये, तत्त्वज्ञान, धर्म, नृत्य, पुरातत्त्वविद्या, इतिहास, भूगोल, मूर्तिकला (शिल्पकला), लिपिप्रकार, वास्तुकला, संगीत, साहित्य प्रकार, साहित्यविषयक संकीर्ण विषय, साहित्यसमीक्षा.
भाषाशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र, विद्युतशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, विधीशिक्षणशास्त्र, स्थापत्यशास्त्र,
अणुविज्ञान, नाविकयांत्रिक, वैमानिकी, संदेशवहन, स्वयंचल, अवकाश, विज्ञानउद्योग व व्यापार, मत्स्योद्योग, 
कीटकविज्ञान, कृषिविज्ञान, धातुविज्ञान, वनस्पतिविज्ञान, वातावरणविज्ञान, पशुविकारविज्ञान, प्राणिविज्ञान, भूविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, वैज्ञानिकसंस्था, संग्रहालये, सांख्यिकी, इत्यादी सुमारे शंभरभर विषय विश्वकोशाच्या एकूण २० खंडात समाविष्ट केले आहेत.

मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा  ज्ञानकोश इंटरनेटवर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.
मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड इंटरनेटवर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. “घराघरात विश्वकोश” या प्रकल्पा अंतर्गत सर्वसामान्यांना अर्पण करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचा पत्ता
 http://www.marathivishvakosh.in/ असा आहे. “तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार', हे विश्वकोशाचे ब्रीद आहे.

#मराठी_विश्वकोश_अँड्रॉइड_अँप_मध्येही_उपलब्ध.....

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेले विश्वकोश बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन मोबाइल अॅपच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत.
मराठी विश्वकोशाच्या वीस जाडजूड खंडांमधील माहितीचा सागर आता अवघ्या चार ‘एमबी’च्या मोबाइल अॅपमध्ये मोफत उपलब्ध झाला आहे. परंतु हे अँप ऑफलाइन चालत नाही. इंटरनेट आवश्यक आहे.
‘बुकगंगा डॉट कॉम’ने विकसित केलेल्या या अॅपचे १२ जानेवारी २०१८ रोजी वाई येथे झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
मोफत अँड्रॉइड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक :https://goo.gl/TxPXyK
आयफोन आणि आयपॅड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/pXNNFp
विश्वकोश पेन ड्राइव्ह खरेदी करण्यासाठी लिंक :http://www.bookganga.com/R/7HX54

सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे नवीन माहितीत मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे असे समजते. परंतु २० खंड तयार होण्यासाठी लागलेला वेळ पाहता विश्वकोश अद्ययावतीकरणाच्या कामास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. विश्वकोश मंडळ हे काम जलदगतीने करेल व त्या कामास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी आशा बाळगुया व उपलब्ध डिजिटल विश्वकोशाचा आस्वाद घेऊया.

【वरील लेखामध्ये दिलेली माहिती खाली दिलेल्या संदर्भातून मिळालेल्या माहिच्या आधारे लिहलेली आहे. काही माहिती आहे तशी घेतली आहे. यातील बरीचशी माहिती गुगलवरून मिळवलेली आहे.
मी संपूर्ण विश्वकोश (२० खंड) वाचलेला नाही. ग्रंथालयात जाऊन विश्वकोशाचे सुमारे १२ खंड पाहिले आहेत. त्याची प्रस्तावना,रचना,आकार, त्यामधील समाविष्ट असणारे विषय इत्यादी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणतीही चूक आढळल्यास जाणकारांनी निदर्शनास आणून द्यावी.】

संदिप रामचंद्र चव्हाण.

संदर्भ:-
१)मराठी विश्वकोश (प्रस्तावना) खंड १
२)विश्वकोश(लेख) सु.रा.चुनेकर आणि अ.र.कुलकर्णी   (मराठी विश्वकोश खंड१६, सूची८,साहित्य संकीर्ण)
३)विकासपीडिया.
४)विकिपीडिया
५)विविध वर्तमानपत्रातील लेख व बातम्या.

Thursday, 3 May 2018

संत वाङमय प्रसाराची तीन दशके..

संत वाङमय प्रसाराची तीन दशके..

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने।
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने।।
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे।
बुद्धय़ाचि वाण धरिले करि हे सतींचे।।


या तत्वाने आणि कोणत्याही फायद्याविना स्वतः आर्थिक नुकसान सोसून २८/२९ वर्षात अंदाजे १८ ते २० लाख लहान-मोठे ग्रंथ (संत वाङमय) महाराष्ट्राच्या घराघरात पोचवण्यासाठी धडपडणारी एक संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहे..... नाव:- संत वाङमय प्रसारक मंडळ, कराड (महाराष्ट्र).



संत वाड्मय प्रसारक मंडळ, कराडची स्थापना १९८९ साली झाली. संस्थेचा कारभार चालू झाल्यानंतर अल्पावधीतच तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांचे संपादन करून सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत प्रकाशित करण्याचे काम संस्थेने 'वैष्णव सदन कोपर्डे हवेली' येथून चालू केले.

संस्था सध्या १५ प्रकारचे लहान मोठे ग्रंथ प्रकाशित करते. हे ग्रंथ महाराष्ट्रातील ठराविक ठिकाणाहून वितरित(विक्री) केले जातात.
एकूण १५ ग्रंथ प्रकारात पुढिल प्रमाणे ग्रंथ उपलब्ध आहेत. 
१)तुकाराम गाथा वेगवेगळ्या तीन साइजमध्ये छापली जाते [११०,१२५,१४० रु ]
२)ज्ञानेश्वरी दोन साइजमध्ये मिळते. [१००,१२५ रु]
बाकी सर्व ग्रंथ एकाच प्रकारात छापले जातात. त्यामध्ये ३)एकनाथी भागवत(मोठ्या आकारात)[२०० रु]
४)संत निळोबांची गाथा [६५ रु]
५)संत बहिणाबाईंची गाथा [७५ रु]
६)सदाचार मकरंद [३० रु]
७)वारकरी नित्यनिय भजनी मालिका [७५ रु]
८)सुलभ नित्योपासना [३० रु]
९)हरिपाठ [५ रु]
१०) ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्याय [१० रु]
११)नाट [५ रु]
१२)भजनी मालिका (पॉकेट प्रत) [१० रु]
वरील प्रमाणे ग्रंथ व त्याच्या किंमती आहेत. त्याच प्रमाणे व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र. ही दिनदर्शिकाही छापली जाते.

या ग्रंथाची उकृष्ट छपाई कोल्हापूर येथील 'मयूर इंडस्ट्रीज' येथे होते. या ग्रंथाचे बायडिंग व शिलाई 'वैष्णव सदन कोपर्डे हवेली ता. कराड जि. सातारा' येथे होते. सर्व ग्रंथ हे पुठ्ठाबांधणी (हार्डकव्हर) प्रकारात आहेत.(पॉकेट मालिका सोडून)

ग्रंथ छपाईसाठी वापरलेला पेपर, हार्डकवर, छपाईचा फॉन्ट, एकूण पृष्ठसंख्या इत्यादींची तुलना केल्यास या ग्रथांची किंमत अत्यल्प आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे काम संस्था गेली जवळपास तीन दशके अखंडपणे करत आहे. आणि इथे छपाई होणाऱ्या ग्रंथाना मागणीही मोठी आहे. महाराष्ट्राच्या खेडोपाडी हरीनाम सप्ताह भारतात तिथे अनेक वाचकाकडून तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत हे ग्रंथ मागवले जातात. आतापर्यंत १८ ते २० लाख ग्रंथ संस्थेच्या वतीने छापले आहेत व वितरीतही केले आहेत. ग्रंथांच्या छपाई, बायडिंग, फॉन्ट इत्यादी गुणवत्तापूर्ण कामामुळे वाचकांच्या पसंतीला हे ग्रंथ उतरतात. संस्थेने ग्रंथ निर्मितीमध्ये गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केलेली नाही. वाचकाने हे ग्रंथ हातात घेतल्यानंतर माझ्या म्हणण्यातील तथ्य पटेल.

हे ग्रंथ खालील ठिकाणच्या केंद्रातून कोणालाही विकत मिळतात.
१)मारुतीबुआ कराडकर मठ, गुरुवार पेठ, कराड २)मारुतीबुआ कराडकर मठ चाकण रोड, आळंदी. 
३)मारुतीबुआ कराडकर मठ, झेंडे गल्ली, पंढरपूर.
४)श्री गंगुकाका शिरवळकरवाडा, विणे गल्ली, पंढरपूर.
५) वैष्णव सदन, कोपर्डे हवेली, ता कराड,जि सातारा.
याबद्दलची अधिक माहिती मॅनेजर सुभाष पाटील देऊ शकतात त्याचा मोबाइल क्रमांक खाली दिला आहे.

वरीलपैकी ५ नंबरचे जे ठिकाण आहे 'वैष्णव सदन', या ठिकाणी ग्रंथ बायडिंग व ग्रंथ शिलाईचे काम चालते. येथील सर्व कामाची जबाबदारी मॅनेजर सुभाष पाटील यांच्याकडे २००३ पासून आहे. त्यांच्या सोबत सहा सहकारी काम करतात. सुभाष पाटील यांचा संपर्क क्रमांक ९७६३५६८५३६ असा आहे.

हे ग्रंथ कोणालाही एका किंवा अनेक प्रतिमध्ये हवे असल्यास वरील पाच विक्रीकेंद्रावर संपर्क करावा. सर्व ग्रंथ हे MRP (मूल्य) किमतीनुसारच मिळतात त्यामध्ये कोणतीही सूट मिळत नाही. कारण त्याची किंमतच खूप कमी आहे. छपाई, बांधणी, वाहतूक, यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षाही थोडी कमी किंमत असण्याची शक्यता आहे. कारण 'संत वाड्मय प्रसारक मंडळ, कराड.' ही संस्था नफा कमवण्यासाठी स्थापन झालेली नसून संत वाड्मय घराघरात पोचावे व हे ज्ञान सर्वसामान्य जनतेला अत्यल्प किंमतीत मिळावे या उद्देशाने निर्माण झाली आहे. कागदाची वाढती किंमत व वाढती महागाई यामुळे संस्था काही लाख रुपयांचे नुकसान सोसून हे काम करत आहे.

काही प्रसिद्ध पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क कोणाकडे असावेत यावरुन काही प्रकाशक न्यायालयात जातात. लेखक-प्रकाशक यांच्यात आर्थिक कारणावरून, रॉयल्टीवरून, पुस्तक छपाईवरून काही वेळा खटके उडतात. पुस्तकांच्या किंमती विषयी सर्वसामान्य समाजात समज गैरजम असतात. हे पाहिले की निस्वार्थपणे ज्ञानप्रसाराचे कार्य करणाऱ्या अशा संस्था, व्यक्तींच्या बद्दल मनातील आदर द्विगुणीत होतो.

संत वाङमय प्रसारक मंडळ कराड,(महाराष्ट्र) या संस्थेच्या कार्याला वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक, युवकमित्र, गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे आणि वारकरी संप्रदयातील अनेक अग्रणींचे आशीर्वाद लाभले आहेत.
त्यांच्या कार्याला लाख लाख प्रणाम!!!!

मी ही माहिती लिहण्याचे कारण....
वैष्णव सदन ही इमारत व संत वाङमय प्रसारक मंडळ यांचे कार्यालय गेली कित्येक वर्षे माझ्या गावात, कराड कोरेगाव राज्यमार्गावर आहे. लहानपणापासू इथे ग्रंथ छपाई होते हे माहितही होते व पाहीलेही आहे. अनेक वेळा पाहुण्यांपैकडून, परगावच्या मित्रांच्या घरातून अमुक अमुक ग्रंथ हवा असा निरोप आला की मी तिथे जायचो व गाथा, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ विकत घ्यायचो.
परंतु ग्रंथ छपाईचे, वितरणाचे हे निस्वार्थ काम कसे चालते, याबद्दल कधीही माहिती घेतली नाही. अलीकडे पुस्तकवाचनाचा छंद लागला व त्यातून थोडं लिखाणही करू लागलो. त्याच प्रेरणेतून हे लिखाण केले आहे. शिवाय अनेक प्रकाशक, लेखक, पुस्तकविक्रेते वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या पुस्तकांची जाहिरात करत असतात. त्यांनी तशी जाहिरात करणे गैर नाही. परंतु ज्या संस्थेने जवळपास तीन दशके संत वाङमयाचा प्रसार केला. त्यासाठी कष्ट उपसले त्यांनी कधीही कुठेही जाहिरात केल्याचे निदर्शनास आले नाही. म्हणून माझ्यापरीने जमेल तशी माहिती महाराष्ट्रातील वाचक वर्गाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||


शब्दांना देव मानून, संत साहित्याची पूजा करणारी एखादी संस्था खेडेगावातही असू शकते व एवढे मोठे काम करू शकते...याची माहिती महाराष्ट्राच्या शहरी भागाला व्हावी म्हणून हा लेखप्रपंच... वाचक मित्रांनीही त्याच उदात्त दृष्टीने लेख वाचावा. ही विनंती.

टीप: वरील लेखातील सर्व संख्यकीय माहिती संस्थेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडून तोंडी स्वरूपात मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहली आहे. शिवाय मी जे पाहिले आहे त्यावरून लिहली आहे. या लिखाणात काही चुका असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. माझा संस्थेशी फक्त वाचक म्हणून संबध आहे. तसेच ही माहिती प्रसिध्द करण्यासाठी मला कोणीही सांगितलेले नाही.
संस्थेच्या कोणत्याही जबाबदार घटकाने जर काहीही कारणास्तव ही पोस्ट काढून टाकण्यास सांगितली तर मी ही पोस्ट काढून टाकेन.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

या लिंकवरही हा लेख वाचावयास मिळेल...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=369436020243370&id=100015309253068








Wednesday, 2 May 2018

फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या... जरा कष्टकऱ्यांचाही विचार करा..

#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या....

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी भेट म्हणून फुलांच्या ऐवजी पुस्तकं द्यावी का? या प्रश्नावर #मराठी_पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर परवा बरीच चर्चा झाली. ग्रुपमध्ये २०/३० हजार सदस्य असावेत. फुलं नाकारून पुस्तकं घ्या हा विचार अनेकांनी व्यक्त केला.
फुलांचं अर्थकारण व फुलशेतीशी संबधीत घटकांना या फुलंबहिष्काराचा फटका बसेल हे पटवून देण्यासाठी मी कमी वेळात परिश्रम पूर्वक एक लेख लिहला...
पण पांढरपेशा आणि स्वतःला हुशार मानणाऱ्या लोकांचे वर्चस्व असणाऱ्या ग्रुपने तो लेख डिलीट केला.
अनेक संवेदनशील मनाच्या सदस्यांनी फुलशेतीची निघडीत सर्व घटकाबद्दल, शेतकरी, कष्टकऱ्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवून कॉमेंट केल्या व पुस्तकाबरोबर फुलंही घेऊ अस मत व्यक्त केले.
मला काही वेळेची बंधनं असल्यामुळे सर्वाना रिप्लाय देता आला नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो.
म्हणून हा लेख मी माझ्या व्हॉलवर पेस्ट करतोय.
आज पर्यंत मी माझी पोस्ट शेअर करा असं कधीही आवाहन केलं नाही... परंतु यावेळी आपण ही पोस्ट शेअर करावी व आपल्या शेतकरी, कष्टकरी, फुलेविक्रेते, वाहन चालक/मालक, छोटे व्यापारी यांच्या बद्दलची व्यथा समाजाला समजून सांगावीे ही विनंती!!


#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या
सध्या लग्नकार्यात, वाढदिवस कार्यक्रमात, सत्कार समारंभ, सरकारी कार्यालयात नवीन अधिकारी आल्यास, पुष्पगुच्छ(बुके) ऐवजी पुस्तके देण्याची चढाओढ काही ठिकाणी दिसून येत आहे. 'बुके नको, बुकं द्या' हे 'खुळ', हवं तर फॅड म्हणा.. सांस्कृतिक क्षेत्रात मूळ धरू पहात आहे. किंवा त्याची चर्चा होताना दिसत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध किंवा उच्छपदस्त व्यक्ती पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन करतात. त्या व्यक्तीचे फालोअर्स त्या आवाहनाला आज्ञा मानून कृती करतात. पुस्तकांचे व्यापारी या नव्या 'फॅड'चा जोमानं प्रचार करतात. फुलांना डावलून पुस्तकं कशी श्रेष्ठ हे पटवून देण्याचा अट्टहास ते करत असतात. कोणत्याही फॅडला सहज 'बळी' पडणाऱ्या शिक्षित जनतेच्या 'गळी' 'बुके नको,बुकं द्या' ही घोषणा पध्दतशीर उतरवली जाते.

फुलं लगेच कोमेजून जातात, बुके घेऊन पैसे 'वेस्ट' जातात, बुकेचे आयुष्य जास्तीत जास्त चार पाच दिवसांचं, ५०० रुपयांचा बुके पाच दिवसचं टिकतो.. त्याच्या ऐवजी पुस्तकं द्या, ते व्यक्तीला आयुष्यभर साथ करतील, त्यातुन ज्ञान मिळेल...वगैरे वगैरे.... असे बिनतोड व कोणालाही सहज पटतील असे मुद्दे सांगून फुलांना डावलले जाते.

पुस्तकांनी माणसाचं आयुष्य समृद्ध होऊ शकते. पुस्तकं ही गुरुच आहेत. पुस्तकं वाचण्याने व्यक्तीच्या वर्तणुकीत चांगला फरक पडू शकतो. व्यक्ती शांत, संयमी, विचारी होऊ शकते. पुस्तक वाचण्यातून आयुष्यातील मर्म, कर्म आणि धर्म समजू शकतो. पराजित मनाला उभारी देण्याचं काम पुस्तकं करतात. पुस्तकं माणसाला 'माणूस' बनवतात. (काहींच्या बाबतीत अपवाद). हे सर्व खरं आहे. मला व्यक्तिशः मान्यही आहे. मी ही कोणाला भेट द्यायची असल्यास प्रसंगानुरूप 'बुके बरोबर बुक' देतो. परंतु फुलं/बुके देऊच नका पुस्तकंच द्या. हा युक्तिवाद मान्य नाही. पुस्तकं व फुलं यांची तुलनाच अयोग्य वाटते.
फुलं हे सुंदरतेचं, कोमलतेचं, प्रेमाचं, मैत्रीचं प्रतीक आहे. पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे.
फुल फुलाच्या ठिकाणी, पुस्तक पुस्तकाच्या ठिकाणी... दोन्हीही आपापल्या ठिकाणी महान आहेत.
आपण तुलना करून त्यांचे महत्व कमी करायला नको.
(तसे ते होणारही नाही)

साहित्याच्या निर्मितीत फुलांचा वाटा मोठा आहे. अनेक कवींनी, लेखकांनी आपल्या कवितांमधून, कथा- कादंबरी मधून फुलांचं महत्व अधोरेखित केले आहे. प्रेमिकांच प्रेम खुलवलं आहे, फुलांच्या उपस्थितीने, सुगंधाने, कोमलतेने कवीकल्पनांना वाव मिळाला आहे. आणि त्या कवितेची, प्रेमकहाणीची पुस्तकं झाली आहेत... त्या पुस्तकांसाठी ती फुलचं नाकारायची?? हा कृतघ्नपणा नाही का??

आपण लहान मुलांना फुलांची उपमा देतो.... काय कारण असेल?? कारण मुलं ही जीवनवेलीवरची सुंदर फुलं असतात. ती सुंदर, निरागस, कोमल असतात. फुल हे भावनेचे, सहृद्यतेचे प्रतीक म्हणून आपण वापरतो. त्याचं एक वेगळं महत्व आहे. बीज रुजते त्याचे रोप होते, रोपाचे झाड बनते, झाडांना आधी फुले येतात मग फळधारणा होते, फळांच्या बिया पासून पुन्हा रोप बनते...निसर्गाचा क्रम चालूच असतो.... वेली, रोपं, झाड यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार काही फुलझाडे तर काही वेली तर काही महावृक्ष असतात. त्यांना येणारी फुलं मग ती वेगवेगळ्या प्रकारची असली तरी निसर्गचक्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावत... निसर्गाला पूर्णत्व आणतात. फुलं निसर्गाने त्यांना नेमून दिलेलं काम निस्वार्थ भावनेने पार पाडतात.  त्यांचं आयुष्य काही क्षण का असेना.. ती फक्त आनंदाची बरसात करतात. आणि आपण मात्र त्यांनाच दोष लावतो की ती कोमेजतात...ठराविक कालावधीने कोमेजून जाणे हा फुलांचा नैसर्गिक गुणधर्मच आहे. पण तरीही त्यांना लाभलेल्या छोट्याशा आयुष्यात ती फक्त आणि फक्त सुगंधी दरवळ पसरवतात. वातावरणात उत्साह भरतात.. जणू ती माणसाला चांगल्या वर्तणुकीचा संदेश देत असतात.

ज्ञान गरजेचेच आहे. विद्ये विना मती गेली.... हे महात्मा फुलेंनी सांगून ठेवले आहे. पण ज्ञानाने (काहींचा) अहंकार वाढतो. ज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी फुलासारखे सुंदर, संवेदनशील मन हवे... ते नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नसतो. ज्ञानी माणसाला समाजातील कष्टकरी, उपेक्षित जनतेचा विसर पडला आणि तो 'स्व'च्याच धुंदीत राहिला तर अज्ञानी लोकं परवडली अस खेदाने म्हणावे लागेल.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकरणामुळे कृषिक्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. समस्येच्या चक्रात शेतकरी अडकला. ज्या शेतकऱ्यांना तो चक्रव्यूह भेदने शक्य झाले नाही त्यांनी गळ्यात फास अडकवला... आणि आपल्या जीवलगांना पोरकं करून तो निघून गेला.😥

काहींनी नवीन त्रज्ञानाचा आधार घेतला. शेतीत नवनवे प्रयोग, प्रयत्न केले. व्यावसाईक फुलशेती हा त्यातील एक प्रयत्नच आहे. फुलशेती प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.१)हरितगृह शेती व २) खुल्या पध्दतीने फुलशेती.

फुलांच्या अर्थकारणाचा व फुलशेतीचा थोडासा परिचय:
२००१०/११ साली महाराष्ट्रात ४००० हेक्टरपेक्षा जास्त फुलशेती होतीे. देशाचा विचार केल्यास ५७७३० हेक्टर शेतीवर फुलशेती केली जात होती. सध्याची आकडेवारी मला मिळाली नाही परंतु महाराष्ट्र टाइम्स मध्ये ०९ सप्टेंबर २०१४ रोजी एक बातमी आली होती त्यानुसार देशातील फुलशेतीचे एकूण क्षेत्र दोन लाख हेक्टरच्या जवळपास होते.२०१८ चा विचार करायचा झाल्यास हे क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर किंवा जास्त असावे.
एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फुलशेती होते त्याच्या लागवड, उत्पादन, वाहतूक, विक्री या संपूर्ण व्यवस्थेवर असंख्य कुटुंबांची उपजीविका चालते.

शेतकरी फुलं पिकवतो. शेतमजुराला रोजगार मिळतो, खते-बी-बियाणे दुकानदारांचा व्यवसाय चालतो, खते व बी-बियाणे निर्माण करणारे कारखाने त्यात काम करणारे कामगार, फुलशेतीची मशागत करणारा ट्रॅक्टरवाला, फुलांची वाहतूक करणारी वाहने व त्यावर पोट भरणारे वाहन मालक/ चालक, फुलांचे छोटे-मध्यम-मोठे व्यापारी, हमाल, फुलांपासून बुके बनवणारा कारागीर, बुके बनवण्यासाठी रॉ मटेरियल बनवणाऱ्या यंत्रनेत काम करणारे कामगार, इत्यादी असंख्य लोकांना यातून रोजगार मिळतो त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यातूनच चालतो.
फुलं जरी अल्पजीवी असली तरी ती फुलवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतेे, घाम गाळावा लागतो, निसर्गाच्या कृपा - अवकृपेला तोंड द्यावे लागते. याचाही विचार व्हायला हवा. फुलं लागवड, त्याचे संगोपन, काढणी, वेचणी, शेतीतील वाहतूक, सावलीत साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, पुन्हा कोल्डहाऊसमध्ये साठवणूक, मार्केट पर्यंतची वाहतूक व शेवटी विक्री. इतक्या टप्प्यातुन शेतकरी ते ग्राहक असा फुलांचा प्रवास होतो. यामध्ये ३०% पर्यंत फुलांचे नुकसान होते. राहिलेली फुले विकली जातात काही वेळा विकलीही जात नाहीत. फुलांच्या शेतीशी निगडित असणारी सगळी व्यवस्था फुलांच्या विक्रीवर व त्याच्या दरावर अवलंबून असते. फुलांना चांगला भाव मिळाला तर त्यावर उपजीविका असणाऱ्या हजारो कुटुंबांना 'अच्छे दिन' येतात. फुलांची विक्री घटली तर सहाजिकच त्या सर्वांवर 'बुरे दिन' येण्याची शक्यता असते.
एकट्या पुण्यात एका दिवसात फुलांच्या खरेदीविक्रीच्या व्यवसायात ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. मग भारतभर किती होत असेल याचा विचार करा. सुज्ञ लोकांनीच जर या शेतीपूरक व्यवसायाच्या विरोधी बोलायचे तर मग इतरांकडून चांगल्याची अपेक्षा ती काय?? अवधानाने का होईना, एकसाठी दुसऱ्याचा बळी नको... दोघांनाही आधार देता येईल का हे पहावे!

वरील सर्व गोष्टींचा सारासार विचार व्हायला हवा.
दोन शब्दाची कॉमेंट सुद्धा कुणाचे तरी, रोजचे ५०/१०० रुपये बुडवू शकते. हातावरचे पोट असणाऱ्यांना तेवढे पैसे लाखमोलाचे असतात.
आपण पुस्तकप्रेमी फक्त पुस्तकांना महत्व देणार असू...तर हा एकांगी (अ)विचार आहे. शेतकऱ्यांची तरुण पिढी समाजातील शिक्षित, अभ्यासू लोकांकडे आशेने पहाते आहे. अशा अभ्यासू(?) लोकांनीच जर नाकं मुरडली तर शेतकऱ्यांच्या पोरांनी पहावे तर कोणाकडे??

स्वतःपुरता विचार किंवा 'सेल्फीश' जीवनपध्दती वाढीस लागली असताना जो तो आपापला स्वार्थ बघणार याबद्दल दुमत नाही. परंतु साहित्याने, ज्ञानाने समृध्द असणाऱ्या, विचारशील गटाकडूनही अविचारांचे प्रदर्शन झाले तर मात्र 'पुस्तकं फक्त वाचली... शिकलो काहीच नाही' असं होईल.

फुलं आणि पुस्तकं यांची तुलना नसावी असं माझं व्यक्तिगत मत आहे... सर्वांनीच ते मान्य करावं हा माझा आग्रह नाही. हट्टही नाही.....प्रत्येकाचं एक मत असतं, या मताशी मी सह'मत' आहे. परंतु माझ्या 'मता'वर जरूर विचार करावा...
मी शेतकरीपुत्र आहे. मी किंवा माझ्या कुटुंबातील, पावण्यारावळ्यातील, मित्रपरीवारातील(काही अपवाद) कोणीही फुलशेती करत नाही. शिवाय फुलं खरेदी-विक्री या व्यवसायाशी माझा काडीमात्रही संबंध नाही. परंतु तरीही मला फुलांशी निगडित त्या सर्व कष्टकरी घटकाबद्दल ममत्व वाटते. त्यांचा व्यवसाय फुलावा त्याला आपला हातभार लागावा या उद्देशाने हा लेखप्रपंच केला आहे. माझा लेख वाचून एकाने जरी पुस्तकाबरोबर फुलं/बुके घ्यायचं ठरवलं तरी मला माझ्या लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.

कोणालाही भेट देताना शक्य असल्यास फुलं व पुस्तक, दोन्ही द्या... फुलाच्या साथीने पुस्तकाच्या भेटीची गोडी वाढेल..... फुलं आणि पुस्तक ही जोडी सुद्धा खुलेलं! तीच खरी स'प्रेम' भेट ठरेल!!😇

©संदिप रामचंद्र चव्हाण.

【हा लेख लिहताना फक्त आकडेवारीसाठी कृषी व पणन विभाग महाराष्ट शासन यांची प्रशिक्षण पुस्तिका(कोणत्या वर्षीची आहे माहीत नाही), महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे यांची कृषिदर्शनी २०१६, फुलशेतीची मूलतत्वे व कार्यपद्धती, पाठयपुस्तिका 1. याचा आधार घेतला आहे. शिवाय काही वृत्तपत्रामधील बातम्यांचा आधार घेतला आहे

बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध! https://www.loksatta.com/pune-news/flowers-market-1397691//lite/

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/indian-flowers-market/moviereview/42058803.cms?utm_source=whatsapp】
सर्व लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!!
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏

Thursday, 19 April 2018

एका सार्वजनिक मंडळाची अनोखी स्वप्नपूर्ती....

एका_सार्वजनिक_मंडळाची_अनोखी_स्वप्नपूर्ती....
किल्ले_आग्रा_ते_कोपर्डे_हवेली(ता:कराड;जि:सातारा) मार्गे_किल्ले_श्रीरायगड शिवज्योत प्रवास...

महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या जयंती निमित्त शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवरुन शिवज्योत(मशाल) पेटवून आणण्याची परंपरा खुप वर्षांपासून सुरू आहे.
शिवस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणी जाऊन प्रेरणा मिळते. इतिहास समजून घेण्याची लालसा निर्माण होते. शिवजयंतीचे औचित्य साधून अशा ठिकाणाहून शिवज्योतिच्या रूपाने प्रेरणा घेऊन, तरुण मंडळे आपल्या मूळ गावी परततात. जे लोकं गडकोटांवर जाऊ शकत नाहीत त्यांना या शिवज्योतिच्या दर्शनाचे समाधान लाभते. धर्मवीर_संभाजी_मंडळ कोपर्डे हवेली, ता कराड, जि सातारा. यांनी ही परंपरा गेली तीस वर्षे अखंडपणे जपलेली आहे.
  कराड तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेले #कोपर्डे_हवेली हे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हा मुख्य आधार असलेल्या या गावात सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धपडणारी अनेक तरुण मंडळे आहेत. धर्मवीर संभाजी मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाची स्थापना १९८८ साली झाली. गेली ३० वर्षे शिवजयंतीउत्सव, गणेशोत्सव अखंडपणे साजरा केला जात आहे. या तीस वर्षात तरुणांच्या तीन पिढ्या झाल्या.  १९८८ ते १९९८, १९९८ ते २००८ आणि २००८ ते २०१८ अश्या दहा दहा वर्ष्याच्या कालखंडात जुनी पिढी नोकरी धंद्यानिमित बाहेर पडली आपल्या संसाराला लागली. पुढील पिढीने मंडळाचे काम नेटाने चालवले. सध्या पहिली पिढी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. दुसरी पिढी आता थोडी मागल्या पावलावर आहे आणि तिसरी पिढी मंडळाची धुरा सांभाळून आहे. आपले शिक्षण, रोजगार पाहून प्रतिकूल परिस्थितीत सामजिक काम करत एकमेकांप्रती स्नेह, मैत्री, जिव्हाळा जपून, सर्व जुने जाणते सदस्य मार्गदर्शक म्हणून तर नवीन पिढी धडाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून मंडळातील सदस्यांनी एक स्वप्न पाहिले होते.... शिवस्पर्शाने पावन झालेल्या आग्ऱ्याच्या किल्ल्याहून कोपर्डे हवेलीत शिवज्योत आणायची.

साधनांची कमतरता, आर्थिक परिस्थिती, व प्रत्येवेळी काहीतरी अडथळा त्याचबरोबर धकाधकीच्या आयुष्यात दहा बारा दिवस वेळ काढणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. या व अश्या कारणामुळे हे स्वप्न दिवास्वप्न ठरतंय कि काय अशी स्थिती झाली. मी ज्यावेळी या मंडळाचा सक्रिय सभासद म्हणून काम पाहू लागलो तो काळ म्हणजे १९९८ ते २००८/०९ त्यावेळीही तेच स्वप्न तीच चर्चा शिवजयंतीच्या दरम्यान दरवर्षी चालू असायची. तोपर्यंत तरी जिल्ह्यातून १७०० किलोमीटरचा एवढा मोठा प्रवास करून शिवज्योत कोणी आणलेली नव्हती. हे कार्य पार पाडायचे असं एकदा नियोजनही झालं. या दरम्यानच्या काळात मंडळाचे अनमोल रत्न 'दत्तात्रय चव्हाण' काळाने हिराऊन घेतले.😢 पुढे असेच दोन धक्के बसले. आणि पुन्हा हा विषय लांबणीवर पडला. गेल्या पाच सहा वर्षात मंडळाची तिसरी पिढी कामाला लागली. जेष्ठांची पहिली पिढी सदैव पाठीशी तर दुसरी पिढी आर्थिक भार उचलायला नेहमी तयार राहिली..... आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य उचलले..... तीस वर्षाचं स्वप्न सत्यात उतरणारा तो दिवस आला...
दि.५ एप्रिल २०१८ रोजी बारा 'मावळे' आग्ऱ्याच्या दिशेने कूच झाले. लक्ष्मण कृष्णत साळवे(दादा), जयवंत उर्फ सिद्धनाथ बाबुराव चव्हाण, अभिजित सुदाम चव्हाण, गोरख रामचंद्र चव्हाण, गणेश भीमराव चव्हाण, विक्रम भानुदास चव्हाण, गणेश बाबासो साळवे, नितीन अरुण तुपे, कृष्णत सुभाष भोसले, सचिन अर्जुगडे, अंकुश लक्ष्मण शिंदे आणि वाहन चालक अनिकेत गोसावी ही ती मंडळी होय.
आयशर ट्रक, एक सायकल, एक मोटरसायकल, जेवन बनवण्यासाठी गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, जेवणाचे साहित्य इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन ही मंडळी कराड-पुणे-गुजरात मार्गे- राजस्थान(जयपूर)- दिल्ली(लाल किल्ला)- आग्रा असा प्रवास करून ९ एप्रिलच्या सकाळी आग्ऱ्याच्या किल्यावर पोचली. किल्ला पाहून दुपारी शिवज्योत पेटवली. आणि सायकलरुन प्रवास चालू झाला... किल्ले आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली.

सामान्य घरातील पोरं जेव्हा एखाद्या स्वप्नाने वेडी होतात तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतात. आणि असामान्य काम करून दाखवतात. जे लोकं काहीतरी करण्याचे स्वप्न पाहतात ते त्या दिशेने कृती करतात. जीे लोकं स्वप्ने पाहतच नाहीत, त्यांना काहीच करता येत नाही. स्वप्न पाहणे हा अर्धा भाग असतो, ही स्वप्ने व्यवहारात साकार करणे हा उरलेला अर्धा भाग असतो. जे फक्त स्वप्नेच पाहतात ते फार तर कवी होऊ शकतात. ज्यांच्यात काही करून दाखवण्याची धमक असते ते स्वप्नांच्या पुर्तीसाठी झटतात.

गेली पावणेचारशे वर्षे 'शिवाजी' नावाची जादू सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करत आहे. आपल्या देशात एखाद्या राजाला ईश्वरी अंश मानले गेले, त्याला देवत्व बहाल केले असे एकमेव शिवछत्रपती!! कोट्यवधींच्या कल्याणाची स्वप्न पाहणाऱ्या राजाचा इतिहास भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना कळावा, त्यांच्या उपसलेल्या कष्टाचा एक अंश जीवन आपण जगून पहावं म्हणून 'आग्रा ते रायगड' शिवज्योत आणणे हा प्रपंच!!

या मोहिमेत सहभागी बारा मावळ्यांनी जातानाच्या प्रवासात घरूनच सोबत न्हेलेल्या शिदोरीवर दिवस काढले. तर परतीच्या प्रवासात स्वतः अन्न शिजवून पोट भरले. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाऊन जिभिचे चोचले भागवण्यासाठी हा एवढा मोठा प्रवास नाही. त्यासाठी आलोही नाही याचे भान त्यांनी ठेवले. शिवरायांच्या मावळ्यांना सुपारीच्या खांडाच व्यसन नव्हतं, हे आमच्यावर आमच्या वडीलधार्यांनी कायमच बिंबवलेलं आहे. त्यामुळे दारू पिऊन शिवजयंती करतात हे बोलणार्यांनी अशा तरुणांची एकदा भेट घ्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीत कसे रहायचे. त्या परिस्थितीत कसा संघर्ष करायचा. आपल्या ध्येयापर्यंत कसे पोचायचे. त्यासाठी नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्य या गोष्टी कशा महत्वाच्या असतात याचे बाळकडू शिवचरित्रात आपल्याला वाचायला मिळते. आग्रा ते रायगड प्रवास करताना तसे जगायला मिळते.

हा प्रवास करताना या तरुणांनी दिवसरात्र आलटून पालटून सायकल चालवली. त्यांच्या अनुभवावरून त्यांना असं जाणवलं की बाहेरच्या राज्यात शिवरायांना मानणारा, त्यांच्या बद्दल कुतुहल असणारा खूप मोठा वर्ग आहे. शिवरायांची प्रतिमा, डिजिटल फेक्स, भगवा झेंडा ई. ट्रकला लावले असल्यामुळे लोक आस्थेने चौकशी करायचे. दिल्लीसारख्या शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश नसलेल्या ठिकाणीही त्यांची अडवणूक झाली नाही. (वाहनाची सर्व कागदपत्रे, इन्शुरन्स, पियुसी असे कायदेशीर सर्व आवश्यक बाबी सोबत होत्या.) गडबड गोंधळ, उगाचच घोषणाबाजी असला प्रकार नसल्यामुळे व मितभाषी स्वभावामुळे पोलिसांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी मदतच केली. मध्यप्रदेश मध्ये लोक सायकल व त्यापाठोपाठ असणारी मोटरसायकल थांबवून आर्थिक मदत करायचे. आस्थेने विचारपूस करायचे. जेवण्यासाठी आग्रह धरायचे. हे प्रेम का बरं देत असतील... त्यांचं आमचं नात काय?? या प्रश्नांच उत्तर म्हणजे छत्रपती शिवराय!!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। 
यशवन्त, कीर्तिवन्त। सामर्थ्यवन्त,वरदवन्त।
पुण्यवन्त, नीतिवन्त। जाणता राजा।। 

या जाणत्या राजाने जात- पात, धर्म, राज्यांच्या सीमा याचा विचार कधीच केला नाही. एतद्देशीयांचे म्हणजे स्वकीयांचे, प्रजेचे राज्य यावे, म्हणून ते आयुष्यभर झटले, झगडले, लढले. आज महापुरुषांना जातीच्या, धर्माच्या चौकटीतून पाहणारे करंटे आपण, महापुरुषांच्या विचारांची राखरांगोळी करतोय याचे भान ठेवत नाही.

९ एप्रिलला सायकवरून चालू झालेला प्रवास मजल दरमजल करत १४ एप्रिल रोजी पुण्यात पोचला. सातारच्या मातीतून पुण्याच्या कर्मभूमीत स्थिरावलेल्या सातारकरांना मग काय आनंद झाला. 'सातारा मित्र मंडळ' आणि पुणे स्थित 'कोपर्डे हवेली युवा मचं' यांनी या बारा मावळ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी बारामावळात केली. सर्वांच्या डोई मानाचे फेटे बांधले. छोटेखानी स्वागत सभा झाली. मस्त गोड जेवण बनवले गेले. अनेक दिवस स्वतः शिजवून जेवण खाणाऱ्या मावळ्यांचे घरच्या लोकांनी केलेल्या प्रेमाच्या जेवणाने मन तृप्त झाले. आता थोडी तरतरी आली. 'अन्नदाता सुखी भव' या सदिच्छा देऊन मावळ्यांनी रायगडच्या दिशेने कूच केले. या मित्रांचा उत्साह पाहून 'कोपर्डे हवेली युवा मचं' ज्यांच्या प्रेरणेने स्थापन झाला ते संजय चव्हाण(आबा) या सवंगड्यांसोबत पुणे-रायगड-कोपर्डे हवेली या प्रवासात सामील झाले.

हे तेरा मावळे १५ एप्रिलच्या संध्याकाळी रायगडवर पोचले. श्रीशिवछत्रपतींच्या पायावर मस्तक ठेऊन, आग्ऱ्याहुन आणलेली ज्योत होळीच्या माळावर असणाऱ्या सूर्याच्या चरणी ठेवली. समाधीचे दर्शन घेतले. जगदीश्वराचे दर्शन घेतले. शिवतीर्थ रायगडची धूळ मस्तकाला लावली आणि जन्मभूमीकडे कूच केले.
या प्रवासात सर्वसाधारणपणे सर्वांनी दीडशे ते दोनशे किलोमीटर सायकल आलटून पालटून चालवली. अभिजित चव्हाण यांनी एका दमात ८०/९० किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला व एकूण प्रवासात २०० किलोमीटपेक्षा जास्त सायकल चालवली. गणेश चव्हाण २२५ व कृष्णत भोसले यांनी २९० किलोमीटर सायकल(रात्रीची) चालवली. कोणताही सराव नसताना किंवा सायकलपटू नसताना फक्त जिद्दीने हा प्रवास केला.(या मोहिमेत सहभागी असलेले गणेश चव्हाण हे प्रवसासाठी वापरलेल्या आयशर ट्रकचे मालक आहेत. त्यांचे मोठे बंधु 'बजरंग चव्हाण' हा माझा वर्गमित्र व गावातील एका सहकारी संस्थेचा चेअरमन आहे. सामाजिक कामात आपली वाहने(ट्रक, ट्रॅक्टर) कोणत्याही आर्थिक फायद्याविना ते देत असतात या व्यवहारीक जगात तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्या ठाई आहे. राज्याच्या सीमा ओलांडून एवढ्या दूरच्या प्रवासाला, एवढ्या दिवसाचे उत्पन्न बुडवून फक्त डिझेलच्या खर्चावर ट्रक देणे ही साधी गोष्ट नव्हे.)

शिवज्योतीचा प्रवास पुढे सुरू झाला... रायगडहुन पोलादपूर- महाबळेश्वर असा प्रवास करत सातारा जिल्ह्यात आगमन झाले, जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. सातारा जिल्ह्यातून (बहुतेक)प्रथमच कोणी आग्र्याहून शिवज्योत आणत असल्यामुळे लोकांना कुतूहल वाटले.
दि १७ एप्रिल रोजी भगवे फेटे बांधून कोपर्डे गावातील तरुण मंडळी स्वागतासाठी कराडच्या वेशीवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. कराड शहरातून भव्य मिरवणूक काढून, दत्त चौकातील अश्वारूढ शिवमूर्तीचे दर्शन घेतले. नंतर शिवज्योत कोपर्डे हवेली गावात आली. 'वरुणराजाच्या' साक्षीने गावातून मिरवणूक काढली गेली....  तीस वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती झाली!!
(कोपर्डे गावात अनपेक्षित घडलेल्या दुःखद घटनेंमुळे मर्दानी खेळाचा कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांचा छोटेखानी सत्कार केला गेला.)

या मोहिमेत मी ज्यांना दादा म्हणतो, मला जे दादा म्हणतात (मोठा भाऊ या नात्याने) व माझे अगदी समवयस्क असे सवंगडी सामील झाले. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या बालपणीच्या मित्रांनी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात एवढा मोठा पल्ला मोठ्या जिद्दीने सायकलवरून पार केला. आम्हाला जमले नाही ते करून दाखवले. मंडळाचे स्वप्न साकार केले. मला दुःख या गोष्टीचे होते की मी या क्षणांच्या अनुभवाला, या क्षणांचा साक्षीदार होण्याला मुकलो. मी दिल्ली, आग्रा पाहिले नाही असे नाही, ते पाहिले आहे. पण पर्यटक म्हणून...तिथे फक्त पर्यटन होते, इथे मनाचे संवर्धन आहे. आताच्या काळात आग्र्याला किंवा कुठूनही कुठे जाणे काहीच अवघड नाही. पण त्या ठिकाणी एका अनामिक ओढीने, धेय्याने, पडेल ते कष्ट हसत हसत सहन करून जाणे वेगळे! म्हणून त्याचे महत्वही वेगळे!!

कोणतेही चांगले सामजिक,सांस्कृतिक काम होण्यासाठी किंवा झालेल्या कृतीपाठीमागे, कृतींच्या स्फुर्तीमागे तितक्याच चांगल्या दृष्य आणि अदृष्य शक्ती असतात, आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात, सदिच्छा असतात. दृष्य गोष्टी दिसून येतात. त्या लोकांना सहज समजतात. अशा कृतीपाटीमागचे अदृष्य हात सहसा कोणाला दिसत नाहीत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्या हातांनी दिलेला असतो. तो विश्वास कृती करणाऱ्यांचे मनोबल वाढवतो. यात प्रकर्षाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे..
सुदाम मारुती चव्हाण(तात्या), बाळासाहेब चव्हाण(नाना), शिवाजी अधिकाराव चव्हाण(दादा), गुरुदत्त चव्हाण(काका) या दोन जेष्ठ व दोन युवा आधारस्तंभांनी कायमच अशा कार्यात मंडळाला साथ दिली आहे. त्याच्या साथीनेच हे कार्य तडीस गेलेे आहे.
हरिपाठ मंडळ कोपर्डे हवेली, गावातील सर्व सार्वजनिक मंडळे, बजरंग चव्हाण(ट्रक देणारे), अशोक चव्हाण(मंडप डेकोरेशन), अंकुश शिंदे (मोटरसायकल देणारे), मनोज चव्हाण(सायकल देणारे), आणि बहुसंख्य कोपर्डेकर तरुण, ग्रामस्थ यांचे सहकार्य कालच्या कराडमधील मिरवणुकीत व एकूणच सर्व कार्यक्रमात लाभले.

गुरुवर्यांनी सांगितलेला एक श्लोक सांगून माझं लांबलेल माहितीपर मनोगत पूर्ण करतो..
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा!
जयच्या स्मृतीने जळे म्लेंच्छ बाधा!!
नुरे देश अवघा जयाच्या अभावी!
#शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी!!
ज्यांनी 'शिवाजी' हा आपल्या जगण्याचा मंत्र केला त्यांना आयुष्यभर कसं वागावं याचं तंत्र अवगत होतं. आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी, दाखवलेले धाडस या जीवलगांना आणि मंडळाच्या इतर सदस्यांना कायम प्रेरणा देत राहील. या बद्दल शंका नाही.
अक्षय_त्रितीयेच्या_हार्दिक_शुभेच्छा!!
आपला मित्र...
©संदिप रामचंद्र चव्हाण





Sunday, 15 April 2018

मराठी पुस्तक: छत्रपती शिवाजी महाराज जीवन_रहस्य

छत्रपती_शिवाजी_महाराज_जीवन_रहस्य

एखाद्या राष्ट्रपुरुषाला देवत्व बहाल केले, किंवा त्याला ईश्वरी अवतार मानले की त्याच्या जीवनातील संघर्षाचा, कर्तृत्वाचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायची आणि त्या राष्ट्रपुरुषाप्रमाणे आचरण करण्याचीही जबाबदारी राहत नाही. पळवाट शोधून पळायला सामान्य व्यक्ती नेहमीच तयार असतो. आपल्या देशात सध्या राष्ट्रपुरुषाना अशी देवत्व बहाल करण्याची स्पर्धा चालू आहे.

छत्रपती शिवरायांचा मानव्यपातळीवरून अभ्यास करायचा झाल्यास नरहर कुरुंदकर यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य' हे अप्रतिम पुस्तक आहे. अवघ्या सहा प्रकरणात आणि साठ पानात त्यांनी शिवरायांचं 'जीवन-रहस्य' खूप मार्मिकपणे व्यक्त केलेलं आहे. 'श्रीमान योगी' या प्रसिध्द कादंबरीला कुरुंदकरांची प्रस्तावना लाभली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' हे त्याचं बहुदा शेवटचे पुस्तक आहे. या पुस्तकाची प्रस्तावना लिहताना कुरुंदकरांचे अकाली निधन झाले असा उल्लेख स.मा.गर्गे करतात.

जनतेला हा राजा ईश्वरीअंश का वाटला, यशाची खात्री नसतानाही औरंजेबाने स्वतः दख्खनच्या मोहिमेत उतरून शिवरायांचे राज्य संपवण्याचा विडा का उचलला, भारताच्या इतिहासात प्रथमच जनता राज्य वाचवण्यासाठी का लढली. याचा उहापोह केलेला आहे . शिवाय महाराजांचे धर्मविषयक धोरण, सैन्यउभारणी, आरमाराची बांधणी, प्रजेच्या हिताचा विचार, न्यायनिवाडे देण्याची रीत, युद्धातील यशापयश, शिवरायांचे नियोजन, नियोजनपूर्वक साहस, धक्कातंत्र, सैन्य व प्रजा यांचा संबध, शिवरायप्रती प्रजेची अभंग निष्ठा, राज्यभिषेक, औरंजेबच खरा शत्रू आहे व त्याच्या मुकाबल्याची तयारी, आरमाराची उभारणी, अनेपाक्षित मृत्यू या घटनांचा मागोवा या पुस्तकात लेखकांनी घेतला आहे. शिवचरित्राचा अभ्यास करताना हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
कोणताही भपकेबाजपणा किंवा नाटकीपणा नसलेलं तरीही शिवरायांची खरी ओळख करून देणारं छोटंं पण मोठं पुस्तक..!!
संदिप रामचंद्र चव्हाण

मराठी पुस्तक:
छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य
लेखक -नरहर कुरुंदकर
किंमत- ६०रु
प्रकाशन- इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे.
पृष्ठ :- ६०

Tuesday, 10 April 2018

मामाचा गाव हरवलाय....

 मामाचा गाव हरवलाय ...आणि हरवलंय बालपण!
एकेकाळी सुंदर निसर्ग, प्रेमळ आजी-आजोबा, सुगरण मामी, बालहट्ट पुरवणारा मामा, मायेची मावशी-आत्या, लहान मोठे मामेभाऊ-आतेभाऊ ही सगळी मंडळी उन्हाळी सुटयामध्ये आजोळी भेटायची. उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की ग्रामीण व शहरी भागातली मुले मामाच्या गावाला जायची. तेथे गेल्यावर भरपुर खेळायची, विटीदांडू, लगोऱ्या, आबाधबी, लपाछपी (इस्टॉप), चौलोस, गोट्टया, सुरपाट्या, लंगडी, सिगारेटची पाकिटे गोळा करून पाकिटाने खेळणे, पत्ते, सापशिडी असे खेळ असायचे. त्याचबरोबर सर्वजण पोहायला शिकायची, तास न् तास विहीरीत/नदीत डुंबायची, मौजमस्ती करायची. सुट्या लागल्या की मामा न्यायला येणार म्हणून बच्चेकंपनी खुश असायची. सर्व मावस भाऊ/बहीण आणि मामाची मुलं एकत्र आली की पायाला भिंगरी अन कानात वारा भरलेल्या वासरासारखी दिवसभर हुंदडायची.

आजची परिस्थिती मात्र झपाट्याने बदलत आहे.
एकेकाळच्या आठवणीतील सायकल गेली आणि बुलेट आली. बैलगाडीची जागा फोरव्हिलरने घेतली. सायकलवरून/बैलगाडीतुन फिरण्याची मजा बुलेट/फोरव्हीलरमध्ये कुठे आहे? खेळांचंही तेच झालं अंगणात, मैदानावर खेळले जाणारे खेळ बंध झाले. त्याची जागा मोबाईल, टॅबवरील गेम्सने घेतली. लोखसंख्या वाढीचा अन भोंगळ सरकारी नियोजनाचा फटका मैदानांना बसला त्यामुळे मैदाने कमी झाली आणि त्यावर मनसोक्त खेळणारी मुलंही.... ती गुंतली टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल मध्ये.

'गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी' असे म्हणण्याची वेळ सद्या आली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनाचा, बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा फटका लहानग्यांच्या सुट्टीलाही बसला आहे. मामाचा चिरेबंदी वाडा कधीचाच ढासळला आहे. त्याजागी वन,टू,थ्री बीएचके फ्लॅट असणारी अनेक मजली अपार्टमेंट झाली आहेत. रो-हाउस, कडेकोड कंपाऊंड असणाऱ्या बंगलोंनी आपापली हद्दनिच्चीती केली आहे. अगदीच तसे नसले तरी प्रत्येक मामाची छोटीमोठी पण वेगवेगळी घरे झाली आहेत. एकत्र कुटुंब शोधून सापडत नाही. घरातील छोट्या मोठ्या वादविवादाने, प्रॉपर्टीसाठी होणाऱ्या भांडणाने, म्हातारा/म्हातारीचा (काही ठिकाणी म्हाताऱ्या आई वडिलांना बोलण्याची पध्द्त) सांभाळ कुणी करायचा यावरून भावाभावांचे पटत नाही. या कारणातून सक्के भाऊ पक्के वैरी होतात. मुलीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क मिळाल्यामुळे काही ठिकाणी सासुरवासिनीला माहेरच्या संपत्ती/शेतीवाडीत हक्क मागायला लावणारा नवरा, सासू-सासरे भेटतात. याकारणाने बहीण-भावाच्या नात्यात दुरावा येतो. मनं कलुषित होतात. त्याचा परिणाम भाच्यांचे आजोळ कायमचे तुटण्यात होतो.

काळाच्या ओघात आधुनिक मामा पोटापाण्यासाठी आजोळातून हद्दपार झाला. रोजगारासाठी दूरच्या शहरात, अगदी परदेशात स्थिरावला. मामाला वेळ असेल तेव्हा भाच्यांची शाळा असते व भाच्याना सुट्ट्या असतील तेव्हा मामाला वर्कलोड असतोे. त्यामुळे भाच्यांसाठी वेळ द्यायला मामाकडे वेळच नाही. 'मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या नोटा....' बालगीतातील या ओळींचा खराखुरा प्रत्यय येऊ लागला आहे. मामा राहत असलेला गाव(शहर) खूप मोठा आहे. मामाकडे पैसाही आला आहे पण या मोठ्या गावात भाच्यांचा जीव लागत नाही. पैशाच्या नोटा त्यांना नको आहेत. त्यांना हवी असणारी मायेची माणसं त्या ठिकाणी भेटत नाहीत. मामाच्या मोठ्या गावी आणि नवीन घरी आजी आजोबांना स्थान नाही. असलेच तर घरात त्यांना किंमत नाही. एके काळी आजोबांचा असणारा दरारा आता राहिला नाही. सगळ्या घराचं ओझं वागवणारे आजी आजोबा आता मुलांना ओझं वाटत आहेत. आजी-आजोबा स्वतःच परावलंबी(?) असल्याने नातवंडांना हवं ते देऊ शकत नाहीत. जॉब करणाऱ्या मामीला स्वतःचाच डबा करायला वेळ नाही. असलाच वेळ तर टीव्ही, मोबाईलमधून सवड नाही अन स्वयंपाकाची आवड नाही. त्यामुळे 'रोज रोज पोळी शिकरण' हे बोलणं बालगीतापूरतं मर्यादित राहिलं आहे. त्यातच ती कॅलरी कॉन्शन असल्यामुळे रोज रोज पोळी शिकरण करण्याची शक्यताही नाही. या व अशा कारणाने भाच्यांचे मन इथे लागत नाही.

गेल्या पंचवीस/तीस वर्षाचा विचार केल्यास त्यावेळी असणारे भाचे/भाच्या आज मामा/मामीच्या व पालकाच्या भूमिकेत आहेत. हे नवपालक व अलीकडचे मामा/मामी जरा जास्तच जगरूक झालेत. आपल्या मुलांना सुट्टीमध्ये मनसोक्त खेळु बागडू न देता, वेगवेगळ्या व्हेकेशन कँम्पला, पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या ट्युशनक्लासला त्यांची ऍडमिशन घेतात. त्यांचं बालपण हिरावतात. त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात सगळंच कस आखीव, रेखीव असतं. तिथे दंगामस्तीला वावच नसतो. शिस्तीचा तर अतिरेखच असतो. आपल्या लहानपणी आपण काय करत होतो याचा विसर पाडून मुलांचं बालपण हिरावून घेण्यात नवपालकांनी मोठीच आघाडी घेतली आहे. कुटुंबांच्या नॅनो आवृत्तीमुळे मुलांना अनेक नात्यांना मुकावे लागत आहे. त्याची परिणीती मामाचा गाव हरवण्यात होत आहे.

एकुलता एक, एकुलती एक या कारणाने मुलांवर अतिप्रेम. मुलांना कुणी रागावलेलं पालकांना चालत नाही. मुलं एकत्र येऊन वादविवाद होतात. एकत्र जमल्याचा निर्भेळ आनंद घ्यायचा सोडून माझी मुलं इतरांच्या मुलापेक्षा किती हुशार,ऍक्टिव्ह दाखवण्यात मुलांच्या 'मम्मी' वेळ दवडतात. काहीवेळा यातून माहेरी आलेल्या बहिणी बहिणीच्या नात्यात, नणंद भावजयच्या नात्यामध्ये दुरावा येतो. 
शिवाय आता सुट्ट्या चालू होण्याआधी वेगवेगळ्या प्रसिध्द, जगप्रसिद्ध ठिकाणी फ़िरायला जायचे प्लॅनिग झालेले असते. यातून वेळ मिळाला तर मामाचा गाव. तेही अगदी मोजके दिवस. जातानाच येतानाचे रिझर्व्हेशन नक्की केलेले असते. किती दिवस राहणार? याचे उत्तर त्यातच दडलेले असते. अशी सर्व परिस्थिती आहे.

काळ बदलला, वेळ बदलली. अनेक गोष्टी बदलल्या. याचा परिणाम मामा अन मामाच्या गावावरही झाला. रोजगाराचा प्रश्न मोठा असल्यामुळे खेडेगावातील/ छोट्या शहरातील तरुणांना गाव सोडून नोकरी धंद्याला बाहेर पडावेच लागते. या गोष्टीला पर्याय राहिला नाही. स्वतःच्या गावाबद्दल अन मायेच्या नात्याबद्दल कितीही ओढ वाटत असली तरी आहे त्या परिस्थितिचा स्वीकार केल्यावाचून गत्यंतर नसते. सगळ्याच भाच्याना मामाचा गाव दुरावलाय असं नाही. बदललेल्या परिस्थितीत ही भरपूर ठिकाणी आशादायक चित्र आहे. अजूनही कुटुंब एकत्र येतात. सणवार,उत्सव,लग्नकार्य,जावळ,जत्रा याचा आनंद घेतात. जमेल तसा वेळ काढून व काही तडजोडी करून ही मंडळी एकमेकांना भेटतात. 
काही ठिकाणी नवी पिढी अधिक समजूतदार वागताना दिसते. भाऊबंदकी, वाद विवाद टाळताना दिसते. भावा भावात पटत नसेल तर सामंजस्याने स्वतंत्र राहते. त्यामुळे कलह टळतात. दूर असले तरी नाती टिकून राहतात.

गाव असो की शहर, देश असो की परदेश कुठंही राहत असलो तरी ठराविक वयोगटापर्यंत मामाचा गाव प्रिय असतो. आता मात्र मामाचा गाव हरवलाय, ती मायेची माणसं हरवलीत, ते निरागस बालपण हरवलंय…... त्यांना शोधण्याचे, एकत्र आणण्याचे काम मामा-भाच्यांनाच करावे लागेल ना!!.. तर चला! या सुट्टीत सर्वांना एकत्र बोलावूया... हरवलेल्या बालपणाला पुन्हा शोधुया..... मामाच्या गावाला जाऊन सुट्टीचा आनंद द्विगुणीत करूया!😇
समाप्त.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

एक होता मामाचा गाव... हा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post.html?m=1

Monday, 9 April 2018

एक होता मामाचा गाव...

एक_होता_मामाचा_गाव...
वार्षिक परीक्षा संपल्या की वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे! उन्हाळी सुट्यांना काय काय करायचे हे बालगोपालांचे आधीच ठरलेले असते. एकूण नियोजनात मामाच्या गावाला जायचं हे नक्की असायचे. 'झुकु झुकु झुक आगीणगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...' असं बालगीत वर्षोनीवर्षं लोकप्रियतेच्या शिखरावर असण्याचे कारण म्हणजे मामाच्या गावाबद्दल असणारं प्रेम, आकर्षण, जिव्हाळा होय. मामा-भाचे/भाच्या हे नाते कमालीचं प्रेमळ नातं. लहान मुलांना मामा सुपरहिरोपेक्षा काही कमी नव्हता. भाच्याना रानामाळात, नदीकाठी, डोंगरावर, फिरायला घेऊन जाणारा. विहरीत, नदीत पोहायला शिकवणारा. छान छान कपडे घेणारा, त्यांच्याशी खेळणारा, पुढे बसवून सायकलवरून फिरवणारा मामा म्हणजे भाच्यांच जणू सर्वस्व होतं! परिस्थिती कशीही असो भाच्यांचे शक्य ते सर्व बालहट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मामा करत होता. 'मामा होणे' व 'मामा बनणे/बनवणेे' या साधर्म्य असणाऱ्या वाक्यप्रचाराचे वेगवेगळे अर्थ निघतात. 'मामा बनवणे' म्हणजे एखाद्याने फसवणे. वेड्यात काढणे इत्यादी अर्थ होतो. असे असले तरी मामाने ही गोष्ट कधी मनावर घेतली नाही आणि मामा भाच्याच्या नात्यात अंतरही कधी पडलं नाही.

मामाच्या गावात आणि चिरेबंदी वाड्यात अजून कोण कोण होतं?
काही वर्षांपूर्वी पर्यंत दोन मामा, चार मावश्या, मामाची मुलं, मावशीची मुलं, आजी, आजोबा असा खटला असायचा. सगळी भाचरं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आजोळी आली की मामाचं घर गजबजून जायचं. नऊवारी साडी नेसणारी आजी नातवंडांवरून भाकर तुकडा ओवाळून त्यांना घरात घ्यायची. सुग्रण मामी छान छान स्वयंपाक बनवायची. त्यावर आजीची बारीक नजर असायची. नातवंडांना दूध दुपत, दही, ताक, लोणी, तूप भरपूर खायला मिळावं म्हणून दुधाची भरलेली किटली डेअरीकडे न जाता घरातच रीती व्हायची. विस्तवाच्या आरावर तापलेल्या दुधाची खरपूस साय नातवंडांना देणारी आजी राहिलेल्या साईचे दही लावायची. दह्याचे ताक रवीने घुसळायची. लोण्याचा गोळा काढून आवडेल त्याला द्यायची. राहिलेले लोणी कडवून तूप काढायची. तुपाची धार भातावर धरायची. अंगणात टाकलेल्या सतरंजीवर चांदण्याच्या प्रकाशात तूप- भात चारताना रामायण, महाभारतातील गोष्टी आजी सांगायची. आजीच्या लुगड्याला तोंड पुसून आकाशातल्या चांदण्या मोजत आणि आजीची गोष्ट ऐकत कधी झोप लागायची याचा सुट्टीला जमलेल्या नातवंडांना पत्ताच नसायचा.

कधी शेतातून तर कधी आठवडी बाजारातून जांभळं, बोरं, आंबे, द्राक्षे, कलिंगड, काकडी आणणारे व गारेगार बॉंम्बेगोळा घेण्यासाठी चार आने (बंध झाले) ते दोन, दोन रुपयाची नोट हातावर ठेवणारे, यात्रेत कुस्त्या, बैलगाडा शर्यत बघायला घेऊन जाणारे आजोबा म्हणजे आजोळच्या घरातील 'हेड ऑफ डिपार्टमेंट' असायचे. त्यांचे सगळ्यावर वजन असायचे. आजोबा घरी येताच सगळे चिडीचूप बसायचे. हा दरारा असला तरी नातवंडांना ते प्रेमाने जवळ घ्यायचे. आजोबा शेतात जाताना बैलगाडी जुंपायचे. सर्व भाचे मंडळी त्यात बसायची. आजोबा हातातल्या कासऱ्याला हिसका द्यायचे तसे बैलगाडीची चाकं करकर आवाज करत राणाची वाट धरायची. गाडीखाली 'मोत्या' नावाचा कुत्रा चालायचा. रानात गाडी सोडून बैलांना वैरण पाणी दाखवले की आजोबा आंब्याच्या कैऱ्या काढून त्याला हळद, मीठ लाऊन सर्वाना खायला द्यायचे. मामा आपल्या भाच्याना एक एक करून विहरीत पोहायला शिकवत असताना आजोबा विहरीच्या काठावर बसून लक्ष ठेवायचे. धोतर नेसणारे, तीन बटनाचा शर्ट, डोक्यावर टोपी किंवा कोशापटका बांधणारे आजोबा मोठेच रुबाबदार दिसायचे.
नातवंडांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे असे आजी-आजोबा ज्यांना लाभले ते भाग्यवान!

'माय मरो पण मावशी जगो' अशी ख्याती लाभलेली व स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी मावशी. न कंटाळता गोड-धोड स्वयंपाक करून देणारी मामी. आपली कपडे, अंथरून पांगरून, खेळणी 'शेअर' करणारी मामाची मुलं, अन आजी-आजोबा ही सर्व मायेची माणसं भेटतात ती आईच्या माहेरी व आपल्या आजोळी!  गरीब असो की श्रीमंत, राजा असो की रंक, माहेरची परिस्थिती कशीही असो, सासुरवासिनीला आपलं माहेर प्राणांहून प्रिय असतं. पुढे मुलं झाली की हे रक्ताचं माहेर मुलांना आजोळ म्हणून प्रिय असत.

बालपणात आईचं माहेर प्रिय असतं तर तरुणपणात त्याची जागा बायकोचं माहेर घेतं. वृद्धपकाळात पोटची मुलं सांभाळत नसतील तर मुलीच्या सासरचा आधार वाटतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या नात्यांचा त्याच्या वागण्यातील बदलाचा फरक जाणवतो. लहानपणी आईवडीलांना सर्वस्व मानणारे बाळ मोठं झालं की आईवडिलांना आडगळीत टाकतं आणि बायकोला सर्वस्व मानतं. पुढे ते प्रेम स्वतःच्या मुलांवर बसतं व मुलांना मुलं झाल्यावर तेच प्रेम नातवंडांवर बसतं. जीवनाचं रहाटगाडगगं असंच चालू असतं. आजोळही अशा बदलला अपवाद नसतं. काहीही असलं तरी वयाच्या एका टप्प्यापर्यंत मामाचा गाव अन त्याला वेगळाच भाव असतो. त्या वेगळ्याचं भावाचा सध्या अभाव जाणवतोय... मामाचा गाव मात्र, आता हरवतोय.....😢
क्रमशः

©संदिप रामचंद्र चव्हाण
पुढील भाग येथे वाचा..
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post_10.html?m=1

Monday, 26 March 2018

मराठी पुस्तक परिचय: बखर शिक्षणाची

बखर शिक्षणाची
लेखक: हेरंब कुलकर्णी
प्रकाशन: राजहंस प्र.
किंमत: १६० रु.
पृष्ठ संख्या: १५०


बखर शिक्षणाची हे पुस्तक शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त असलेल्या ५४ पुस्तकांच्या बद्दल थोडक्यात माहिती देणारे पुस्तकांवरील पुस्तक (बुक्स ऑन बुक्स) आहे.
लेखक स्वतः इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. ते तरुणपणी मुलांना शिक्षा करायचे, कठोर बोलायचे, मुलं आपल्याला घाबरली पाहिजेत असं त्यांना वाटायचं. त्यामुळे ते विद्यार्थ्यांशी आक्रमकपणे वागायचे. पण एक दिवस त्यांना जाणवलं की मुलांना शिक्षणात रस नसण्याचे, त्यांना शिकवलेले न उमजण्याचे काहीतरी वेगळे कारण असले पाहिजे. काही दिवसांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करणे चुकीचे आहे असे वाटायला लागले. मग त्यांनी या समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यातून वेगवेगळी पुस्तक वाचायला सुरुवात केली.
'शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच अशा जागा आहेत, की जिथे कुणीच स्वतः होऊन जात नाही, तिथे दाखल करावे लागते.'  हे जे. कृष्णमूर्तींचे विचार वाचल्यावर लेखक अस्वस्थ झाले. हादरून गेले. मग लेखकांनी जे. कृष्णमूर्तींची ऐंशी पुस्तके मिळवली. त्याच प्रमाणे भारतातील सर्व 'कृष्णमूर्ती शाळा' बघितल्या. तिथे राहिले, तिथले अनुभव घेतले. (या अनुभवावर आधारीत त्यांचे दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे 'जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल'. हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले आहे. किंमत २२०रु आहे.)
कृष्णमूर्ती यांच्या शाळा पाहिल्यामुळे लेखकांना एक वेगळीच दृष्टी मिळाली अस मत ते बखर शिक्षणाची या पुस्तकातील 'हितगुज शिक्षकांशी व पालकांशी' यात व्यक्त करतात.
नंतर लेखकांनी महाराष्ट्रतील शिक्षणात वेगळे प्रयोग करणाऱ्या लीलाताई पाटील, रमेश पानसे यांची पुस्तके वाचली. मुलांना लिहता वाचता यावे म्हणून शिकवण्याच्या पध्दतीत प्रयोगशीलता आणायला हवी हे लेखकांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी स्वतःच्या अध्यनपद्धतीत योग्य ते बदल केले. यातून त्यांचा शिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला असही मत ते हितगुजमध्ये मांडतात.
शिक्षण क्षेत्रात देश परदेशातील अनेक क्रांतिकारक बदल करणाऱ्या शिक्षकांची/शिक्षण क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या आदर्शांची शिक्षणविषयक पुस्तक लेखकांनी वाचली. या पुस्तक वाचनातून लेखकांच्या शिक्षकी जीवनाचा कायापालट झाला.
लेखकांनी शिक्षकांसमोर महाराष्ट्रभर खूप व्याख्याने दिली. त्यात ते या वेगवेगळ्या पुस्तकाबद्दल बोलत. आपण सांगतोय हे शिक्षकांना काहीतरी अद्भुत वाटतंय असं लेखकांना दिसून यायचे. शिक्षक या विविध पुस्तकाबद्दल प्रश्न विचारायचे. यातून मग या पुस्तकांबद्दलची माहिती शिक्षक/ पालकांना व्हावी म्हणून यातील निवडक पुस्तकांचा परिचय देणारे हे पुस्तक तयार झाले. लेखकांनी या पुस्तकांबद्दल दैनिक पुढरीत वर्षभर स्तंभ लिहले आहेत.

या पुस्तकात जपानची तोत्तोचान आणि तिचे शाळा मुख्यद्यापक कोबायशी; दुसऱ्या महायुध्दात जखमी झालेला, आपल्या शरीरात बंदुकीचे छरें घेऊन जगत असलेला, आपल्या बायको आणि बाळाला जर्मन सैनिकांनी मारल्यानंतरही निराश न होता शाळा चालवणारा वासिली सुखोम्लिन्स्की आपल्याला भेटतो; मुलांना स्वातंत्र्य देणारी मुलांना हवी तशी शाळा काढणारा, जगातील शिक्षणक्षेत्राला अनेक दशके प्रभावित करणारा इंग्लंडचा 'निल' व त्याच्या 'नीलची शाळा समरहिल' या पुस्तकाबद्दल माहिती मिळते;
आर्मीतून निवृत्त झालेला. निग्रो असल्यामुळे वर्णद्वेषाचा बळी ठरलेला, कुठेही नोकरी न मिळाल्याने एका झोपडपट्टीजवळच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेला इंग्लंडमधील 'ब्रेथवेल' आपल्याला माहीत होतो. त्याच्या 'टू सर विथ लव्ह' या आत्मचरित्राचा संक्षिप्त भाग आपल्याला इथे वाचायला मिळतो;
अमेरिकेतील भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल ग्रीनबर्ग स्वतःच्या मुलाला हवी तशी शाळा मिळत नाही म्हणून समविचारी पालकांना एकत्र करून शाळा सुरू करतो; न्यूझीलंडमधील शिक्षिका सिल्व्हिया वॉर्नर हिने केलेले शैक्षणिक प्रयोग व तीची झालेली शोकांतिका, तिने चोवीस वर्षे काढलेली व नंतर जाळली गेलेली चित्रे, मृत्यूनंतर अमेरिकेतून प्रकाशित होणारे तिचे शैक्षणिक प्रयोग इत्यादी कहाणी असणाऱ्या 'टीचर' या पुस्तकाची संक्षिप्त माहिती याच पुस्तकातून आपल्याला समजते; 'माय कंट्री स्कुल डायरी' हे अमेरिकेतील डोंगराळ भागात काम करणाऱ्या ज्युलिया वेबन गॉर्डन या एका समर्पित शिक्षिकेचे प्रेरणादायी काम बखर शिक्षणाची या पुस्तकामुळे आपल्या समोर येते.

गिजुभाई बधेका यांचे दिवास्वप्न, जे.कृष्णमुर्ती यांचे शिक्षणविचार, टागोरांचे शांतिनिकेतन; गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पन्नास वर्षांपूर्वी वेगळा शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या गो.ना. मूनघाटेंची काटेमुंढरीची शाळा; चाकोरीबाहेरच्या नऊ शाळाबद्दल रेणू दांडेकर लिहलेले 'कणवू'; शिक्षण आनंदक्षण, नयी तालीम, मुलांचे शिक्षण पालक व शासन ही शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांची पुस्तके; 'कोसबाडच्या टेकडीवरून' शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या कार्याबद्दल आणि अशा शैक्षणिक क्रांती करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती आपल्याला हेरंब कुलकर्णी आपल्या बखर शिक्षणाची या पुस्तकात करून देतात. त्याचप्रमाणे विनोबांचे शिक्षणविचार, आचार्य रजनीश यांचे शिक्षणविचार, भाऊ गावंडे यांचे प्रकाशाच्या उंबरठ्यावर, अमिता नायडू यांचे प्लॅटफॉर्म नंबर झिरो; राजा शिरगुप्पे यांचे न पेटलेले दिवे; अरुण शेवते यांचे नापास मुलांची गोष्ट, लीलाताई पाटील यांचे शिक्षण देता घेता, अर्थपूर्ण आनंदशिक्षणासाठी; सतीश पोरे यांचे वाचन संस्कार; रेणु गावस्कर यांचे आमचा काय गुन्हा; नामदेव माळी यांचे शाळाभेट इत्यादी चोपन्न पुस्तकाबद्दल संक्षिप्त पंरतु अत्यंत उपयोगी माहिती आपल्याला या पुस्तकातून होते. व ही पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढते.
बखर शिक्षणाची या पुस्तकातून शिक्षक, पालकांना नवी दृष्टी मिळेलच परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही ही चरित्रे, आत्मचरित्रे, वेगळे शैक्षणिक प्रयोग प्रेरणा देतील.
सध्या सर्व सुखसोई असूनही रडणारे पालक- शिक्षक यांनीही यातून शोध आणि बोध घेतल्यास शैक्षणिक क्रांती व्हायला उशीर लागणार नाही. मुलांना 'प्रॉडक्ट' समजणाऱ्या आजच्या शैक्षणिक परिस्थितीत हे गरजेचे आहे.
आपल्या समाजाच्या बहुतेक समस्या प्रभावहीन शिक्षण पध्दतीत लपल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील क्रांतिकारक बदल जाणून घ्यायला आणि चांगल्या बदलासाठी शक्य ते प्रयत्न करायला 'बखर शिक्षणाची' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
(लेखकांबद्दलची माहिती लिहताना पुस्तकातील सुरवातीला असणाऱ्या 'हितगुज' यातील संदर्भ म्हणून वापर)

संदिप रामचंद्र चव्हाण

Friday, 16 March 2018

किंडल_डिव्हाईस

किंडल_डिव्हाईस ....चालतं फिरतं ग्रंथालय!
वाचनाचे बदलते तंत्र.

गोष्ट तशी जुनीच आहे. परंतु ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमीसाठी थोडंस नवीन तंत्रज्ञान म्हणजे अमेझॉन किंडल डिव्हाईस होय.
अनेक पुस्तक प्रकाशकांनी खूप सारी पुस्तके वेगवेेगळ्या इबुक्स स्वरूपात आणली आहेत. डेलिहंट इबुक्स, बुकगंगा इबुक्स, साहित्य प्रतिष्ठान यांनी आणलेली इबुक्स, वेगवेगळी पुस्तकाची अँड्रॉईड अँप, अमेझॉन किंडल इबुक्स इत्यादी. ज्या त्या संस्थेने आपापली अँप डेव्हल केली आहेत. काहींनी ईबुक रीडर डिव्हाइस ही टॅबसारखी इलेक्ट्रॉनिक वस्तू (गॅजेट) बनवली आहे. त्यापैकी एक म्हणजे 'अमेझॉन किंडल ईबुक रीडर' होय.


मराठी पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर काही ग्रुप सदस्यांना या बद्दल माहिती हवी होती. त्यांना व सर्व मित्रपरिवराला माहिती कळावी या हेतूने...

जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे।
सकळ जन।।

या भावनेने हा लेख प्रपंच.

अनेक प्रकारची, अनेक विषयांची, अनेक भाषांची, अनेक लेखकांनी लिहलेली, अनुवादित केलेली पुस्तकं मिळण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय किंवा त्याला वाचनालय म्हणण्याचाही प्रघात आहे. सार्वजनिक वाचनालये, शाळा- कॉलेजची, पालिका- महापालिका यांची ग्रंथालये वाचकांसाठी आवडीची ठिकाणे असतात. मोठ्या लोकांची स्वतःची मोठी लायब्ररी घरात किंवा कार्यालयात असते. सर्वसामान्य वाचकप्रेमी जमेल तसा पुस्तकसंग्रह करत असतो. पण सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा छोट्या घरात पुस्तकांची व्यवस्थित निगा राहील असे कपाट किंवा पुस्तक ठेवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करणं मोठं जिकिरीचं होतं. शिवाय नोकरी करणाऱ्यांना, भाड्याच्या घरात राहणार्यांना, बदली झाल्यावर किंवा घर बदलल्यावर संग्रही असणारा पुस्तकसाठा इकडून तिकडे नेण्यात अनेक अडचणी येतात. पेपरलेसच्या जमान्यात यावर उपाय म्हणजे सर्व भाषांमधील पुस्तके इलेक्ट्रॉनिक बुक(ईबुक) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेझॉनने आणलेले किंडल ईबुक होय. 2004 मध्ये अमेझॉनने किंडल ईबुक रीडरची प्रथम पिढी मार्केटमध्ये आणली. आता त्यात संशोधन होऊन आठवी/ नववी पिढी बाजारात आली आहे. अमेझॉनने पुस्तकांच्या दुनियेत मोठा क्रांतिकारक प्रयोग केला व जगभरात त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इंग्रजी भाषेत शेकडो पुस्तके अगदी मोफत आहेत तर प्रादेशिक भाषेतही काही ठराविक पुस्तके मोफत आहेत. चांगल्या चांगल्या पुस्तकांवर भरगोस सूट व हार्डकॉपीच्या मनाने कमी किंमत, फॉन्ट लहान मोठा करायची व्यवस्था, अमेझॉन आकाउंटशी कनेक्ट असल्यामुळे ईबुक लायब्ररी कोणत्याही नवीन गॅझेटवर(मोबाईल किंवा किंडल डिव्हाइसवर) पुन्हा उपलब्ध होते. हजार ते पंधराशे पुस्तके सेव(डाऊनलोड) होऊ शकतील अशी इंटर्नल मेमरी, डोळयांना त्रास होणार नाही असे तंत्रज्ञान, जिथे वाचायचे थांबलो तिथूनच पुढे सुरवात, चांगले ब्याटरी ब्याकप इत्यादी अनेक सुविधा नवीन जनरेशनच्या किंडल मध्ये आहेत.

भारतात किंडल ईबुक लॉन्च करून दहा वर्षे झाली आहेत. सध्या किंडल डिव्हाइसवर भरगोस सूट व त्या बरोबर पुस्तक खरेदी साठी 80% डिस्कउंट मिळणारे दोन हजाराचे प्रमोशन गिफ्ट इत्यादी ऑफर सद्या मिळत आहेत.
किंडलवर खरेदी केलेले पुस्तक आवडले नाही तर काही दिवसाच्या मुदतीत परत करता येते. विकत घेतले पुस्तक परत करण्यासाठी ठराविक संख्येची मर्यादा आहे. नाहीतर प्रत्येक पुस्तक वाचून परत केले जाईल. हे कंपनीने लक्षात घेऊन यावर मर्यादा घातली आहे. पुस्तक परत केल्यावर जेवढे पैसे पेड केलेत तेवढे माघारी मिळतात. खरेदीआधी कोणत्याही उपलब्ध ई पुस्तकाचे सँम्पल मोफत डाउनलोड करता येते. त्यातून पुस्तकाचा सार समजू शकतो. एकच पुस्तक एकाच वेळी किंडल डिव्हाईस व मोबाईल किंडल अँपवरती वाचता येते.

किंडल ईबुक रीडरवरचा पुस्तक संग्रह वाचायला किंडल डिव्हाईसच हवं असं नाही. मोबाईल मधे किंडलचा ॲप इन्स्टॉल करून अमेझॉन आकाउंटचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकला की ॲमेझॉनवर किंडल अँप रजिस्टर होतो. किंडल डिव्हाइस रजिस्ट्रेशनही अमेझॉन लॉगिन आयडीनेच करायचे असते. किंडल डिव्हाइस असल्याचा फायदा म्हणजे ते फक्त वाचाण्यासाठी डिजाईन केलं आहे. ऍडीओ, व्हिडीओ, इतर अँप्स, गेम्स इत्यादी काहीही नसते. त्यामुळे फक्त वाचनावर लक्ष केंद्रीत होते. त्याचप्रमाणे यावर पुस्तक वाचताना कागद वाचतोय असं फील होते. स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्टेबल असल्याने डोळ्यांना सुट होईल तसा सेट करता येतो (पाच हजारच्या आसपास मिळणारे बेसिक मॉडेलमध्ये LED लाईट नाहीत त्यामुळे ते मॉडेल फक्त उजेडातच वापरता येते) अक्षरांचा आकार हवा तितका लहान मोठा करता येतो. त्यामुळे चेष्मा विसरला किंवा जवळ नसला तरी काही फरक पडत नाही. आपण पुस्तकाची हार्डकॉपी जिथे वाचायचे थांबू तिथे काहीतरी खूण ठेवतो तसेच किंडल डिव्हाईस स्वतः लक्षात ठेवते व जिथं थांबलो त्या पुस्तकाचे तेच पान उघडते. त्या मध्ये लेखकांच्या नावावरून, प्रकाशकांच्या नावावरून, कथा, कादंबरी, ऐतिहासिक इत्यादी नावाने फोल्डर बनवता येतात.
मी हार्ड कॉपी व किंडल पेपरव्हाइट ईबुक दोन्ही वापरतो. किंडलवरती पुस्तके हार्डकॉपीच्या तुलनेत कमी किमतीत मिळतात. शिवाय वार्षिक अनलिमिटेड प्लॅन घेतला तर वर्षभर उपलब्द सर्व पुस्तके फ्री मिळतात व वर्षाने पुन्हा पैसे भरावे लागतात. या प्लॅनची पुस्तके कायम अकाउंटवर राहत नाहीत. मी कोणतंही पुस्तक विकत घेतो ते कायमस्वरूपी आपल्या अकाऊंटवर राहते. शिवाय काही पुस्तके फ्री मिळतात. इंग्रजी वाचणाऱ्यांना खूप पुस्तके कमी किमतीत किंवा फ्री मिळू शकतात.
अमेझॉन अँपवरती marathi ebooks for Kindle  असे सर्च केले की पुस्तकांची यादी मिळते. हवे त्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या नावानेही पुस्तक शोधाता येते.
वेगवेळ्या मॉडेलनुसार किंडल डिव्हाइसची किंमत चार हजार ते चाळीस हजार असू शकते. सध्या ईबुक रीडरच्या किंमती जास्त दिसत आहेत. अमेझॉनच्या विशेष ऑफर मध्ये किंमत 10 ते 20 टक्के कमी असते. त्याच वेळी पेटीयम वर त्यापेक्षा कमी किंमत असू शकते हा माझा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनवर किंडल पेपरव्हाइट 8999 ला होते तेव्हा पेटीयमवर 7265 होते. काहीवेळा पुस्तक खरेदीसाठी 2000 रु चे 80 टक्के डिस्काउंट कुपन मिळत. त्यामध्ये 2500 ची पुस्तके 500 मध्ये मिळतात.
 वाचनाची आवड असणार्यांसाठी किंडल नक्कीच उपयुक्त आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप: मी वर उल्लेखलेल्या कोणत्याही कंपनीचा एजेंट नाही. किंवा ही माहिती देण्यात माझा कोणताही आर्थिक लाभ नाही)

किंडल मोबाईल अँप ची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle

Wednesday, 14 March 2018

शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने...

शेतकरी_मोर्चाच्या_निमित्ताने...
नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चाची सांगता १२ मार्च रोजी झाली. ३० ते ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट करत अतिशय शांत, संयमाने मार्गक्रमण करून आपल्या मागण्या मायबाप सरकारपुढे ठेवल्या. सरकाने लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली व मोर्चा विसर्जित झाला. सरकार मागण्यांची पूर्तता व दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी करते हे पुढे दिसेलच. मोर्चा मुबंईत पोचण्याआगोदर निर्णय घेऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या त्रासाला पूर्णविराम देता आला असता. पण निबर झालेले अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री, शासकीय यंत्रणा, कोणतीही गोष्ट गळ्याला आल्याशिवाय लक्ष देत नाहीत. अशी काहीशी परिस्थिती कायमच दिसत आली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलन यशस्वीपणे हाताळले असं म्हणावं लागेल. त्यांनी अजून तत्परता दाखवली असती तर हे आंदोलन कसारा घाट ओलांडुन पुढे गेले नसते. तरीही त्यांनी हे आंदोलन जास्त चिघळू न देता हाताळले... हेही नसे थोडके!!

शेतकरी मोर्चाबद्दल अनेक समज गैरसमज सोशलमीडियामध्ये चर्चिले गेले. अजूनही त्यावर वादविवाद चालूच आहेत. सोशल मीडियावर या मोर्चातील काही फोटो आणि मोर्चासंबंधीच्या काही पोस्ट अनेकांनी शेअर करत शक्य त्या सर्व मार्गांनी अन्नदात्याचे हे प्रयत्न मोठ्या स्तरावर इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियानेही दखल घेतली. कोणी वाटेत खायची,नाष्ट्यापाण्याची सोय केली. कोणी जखमींवर उपचार केलेे. तर कोणी चुकीचे आरोप करून शेतकऱ्यांच्या मनाला जखमी केले. मोर्चातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या जखमी पायांचे, तुटलेल्या चपलांचे, त्यांच्या कारुण्याचे, दयनीयतेचे फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर काहींनी टोमणे मारले. सर्वंच राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन मतपेटी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी तशी राजकीय नेत्यांनी मोर्चाला भेट दिली. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे न उमजलेले एक कोडेच आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांना काय मिळाले? फक्त आश्वासनांची कागदी भेंडोळी! या पेक्षा काही नाही.
शेतकर्याच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या व अनेक समस्या आहेत त्याला आतापर्यंतची सर्व सरकारे जबाबदार आहेत. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर भर द्यायला हवा. पण असं होताना दिसत नाही. प्रगल्भता येण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीय पक्षांचे व नेत्यांचे वैचारीक अधपतन होताना दिसत आहे. त्याच्या नेमकं उलट वर्तन अशिक्षित, जेमतेम शिकलेला शेतकरी आपल्या मोर्चातुन दाखवतो तेव्हा नक्कीच तो कौतुकास पात्र ठरतो.
स्वतः आत्मक्लेश सहन करून आपल्या मागण्या मांडणे, भरपूर संख्या जमली तरी उन्माद न करता शांतता ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी गोष्टींचा वस्तुपाठच या मोर्चाने घालून दिला. एवढ्या संख्येने लोक जमतात परंतु गडबड, गोंधळ, पळापळ, जाळपोळ, दगडफेक यातले काहीही होत नाही. आंदोलक आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत, मुंबईत आल्यावर दहावीच्या मुलांना त्रास नको म्हणून स्वतः त्रास सहन करून कित्येक किलोमीटर चालत रातोरात आझाद मैदानात पोचतात. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडतात. त्यासाठी शांतपणे मोर्चा काढतात. खाजगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान न करता मोर्चा विसर्जीत करतात. हे शेतकऱ्यांच वागणं प्रगल्भता दाखवत नाही का? सध्या विविध आंदोलनामध्ये विध्वंसक वृत्ती वाढत असताना असा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेला आंदोलनाचा एक चांगला पर्याय आहे. (याचा प्रत्यय 'मराठा क्रांती मोर्चा' मध्येही आला आहे.)
या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शेतकरी मोर्चाला नक्षली चळवळीचा संबध कोणी जोडत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून शेतकरी कष्टकरी जनतेच्या भावना लक्षात येत नाहीत. त्यासाठी समाजाची नाळ जुळावी लागते. परंतु सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना कष्टकरी जनतेचे प्रश्न कसे समजणार??

आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, झेंड्याचा रंग कोणता होता हे पाहण्यापेक्षा या मोर्चात आंदोलक शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने त्रास सहन करून कसा आला हे पहावे लागेल. अनेक वेळा आश्वासने मिळून आपल्या मागण्या वर्षोनुवर्षे तशाच आहेत. सत्तेच्या साठमारीत आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही ही भावना शेतकऱ्यांमध्ये बळावली. विरोधीपक्षातील लोक आपल्या मागण्यांसाठी आग्रही दिसत नाहीत व सत्ताधारी मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा समज सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनात तयार होण्याला कोण जबाबदार आहे??
शेतकऱ्यांना झेंड्याच्या रंगाशी देणे घेणे नाही त्यांना गेंडयाच्या कातडीच्या व्यवस्थेपुढे आपले प्रश्न, समाश्या मांडणारे, त्यांना पटवून देणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे हा मोर्चा कोणी काढला हे पाहण्यापेक्षा हा मोर्चा शेतकऱ्यांचा होता असे पहायला हवे.

कोणता झेंडा घेऊ हाती?? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना स्वार्थाने का होईना कोणी त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडण्यात पुढाकार घेत असेल तर सर्वत्र अंधकार दिसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना हा आधार वाटल्यास नवल नाही. शेतकऱ्यांना आता पर्यंत सर्वजण फसवत आले आहेत. संघटित नसल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात कायमच मागे पडला आहे. शेतकऱ्यांच्या आडून सर्वजण सत्तेची खुर्ची जवळ करतात. कदाचित हा मोर्चाही त्याला अपवाद नसेल. मोरच्यातुन स्वतःची इमेजबिल्डिंग व त्यातून राजकीय लाभ असाही कोणाचा छुपा हेतू असू शकतो. परंतु जी संघटना एखादे आंदोलनाचे नियोजन करते तेव्हा तिचे नाव, त्यांचे ब्यांनर, झेंडे त्यात ओघाने येणारच!.. ते काही दुसऱ्या संघटनेचे, पक्षाचे झेंडे आंदोलकांच्या हातात देतील का?? हे लक्षात घेणे जरुरी आहे. टोप्या उन्हापासून रक्षण करतात तरीही 'टोप्या व झेंड्यापेक्षा आंदोलक शेतकऱ्यांना चप्पल द्यायला हवी होती' या काहींनी दिलेल्या सुचनेवर शेतकरी नेत्यांनी नक्कीच विचार करायला हवा. अनाठायी खर्च कोणत्याही संघटनांनी टाळायला हवेत व मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. हे मात्र नक्की!

मुळात या मोर्चातील मुख्य मागणी, वनजमीन कसणार्या शेतकर्याच्या नावे ती वनजमीन असावी ही होती. आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे कागदोपत्री जमीन नसल्यामुळे त्यांना साधं कर्जही मिळत नाही. इतरही मागण्या होत्या परंतु त्या दुय्यम होत्या. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाण्यासह आदिवासी भागातील होते. सलग सहा दिवस रणरणत्या उन्हात पायपीट करत निघालेले मोर्चेकरी जसजसे पुढे गेले, तसतसे नाशिकसह ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील शेतकरी मोर्चात सहभागी होऊ लागले. मुळात त्यांना दिडदोनशे किलोमीटर चालायला लावणे गरजेचे होते का? त्याच्याबरोबर पूर्णवेळ मोर्चाचे आयोजक चालत होते का? हा प्रश्नच आहे?? या आंदोलनात बहुसंख्य आदिवासी शेतकरी व गरीब शेतकरी होते. कष्टप्रद आंदोलनात सुखवस्तू सहभागी होत नाहीत हेही ध्यानात घ्यायला हवे. घरुन घेतलेली कांदा भाकर, आणि मुक्काम असेल तिथे तीन दगडाच्या चुलीवर केलेला भात खाऊन आंदोलक सहभागी झाले होते. ते भाडोत्री नव्हते. आजकाल पैसे देऊन, वाहनांची सोय केल्यानंतरही राजकीय पक्षांच्या सभेला लोक येत नाहीत. तिथे रणरणत्या उन्हात रोज वीस ते तीस किलोमीटर चालत, शिळेपाके अन्न खाऊन स्वतःला त्रास करून कोण घेईल?? ज्या भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले तिथे 'अखिल भारतीय किसन सभा' या डाव्यांच्या संघटनेचे अस्तित्व असल्याशिवाय त्यांच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत. अनेक वर्षे अनेक समस्यांची झळ बसल्यामुळे शेतकरी सहभागी झाले असणार. भूलथापांना बळी पडून एवढ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील का?
डाव्यांनी असाच मोर्चा पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काढला तर यशस्वी होईलच अस नाही. बहुदा यशस्वी होणारच नाही. कारण त्यांचे तिथे अस्तित्व नाही. मुळात मोर्चा कोणी काढला हा मुद्दा गौण आहे. पश्चिम महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टीनी आत्मक्लेश यात्रा काढली होती त्यालाही लोक पुणे ते मुंबई चालत आले होते. त्या मोर्चालाही शेतकऱ्यांचा उस्फुर्थ प्रतिसाद लाभला होता.भाडोत्री लोक अशा आंदोनलात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय? ते आंदोलन का करतात? हे समजून घ्यायला हवे. फक्त वरवरची शेरेबाजी उपयोगाची नाही. यातून फक्त मनं कलुषित होतील... आणि प्रश्न जिथल्या तिथेच राहतील. राजकारणी लोक सेटलमेंट व सर्वसामान्यांची दिशाभूल करायला तरबेज असतात. त्यांना समाजातील विविध घटकामध्ये द्वेषाची दरी वाढली तर आनंदच होतो. कारण दुभांगलेल्या समाजावर पकड ठेवणे तुलनेने सोपे जाते. आज शेतकरी जात्यात आहेत तर इतर घटक सुपात आहेत. हे सर्वांनी लक्षात घेऊन शेतकर्याच्या दुःखावर फुंकर मारता आली नाही तर किमान डागण्यातरी देऊ नयेत.

भारतभर व महाराष्ट्र राज्यातही विभागवार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक शेतकरी संघटना आहेत. त्या वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवतात. या संघटनांच्या आडून संघटनेचे पुढारी काही वेळा आपला स्वार्थ साधतात. कोणी राजा हरिश्चंद्र नाही.
शेतकऱ्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही. पण एकट्या दुकट्याने मागण्या मांडून, आंदोलनं करून, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून काहीही हाती लागत नाही. एकट्याने लढलो तर त्याचा 'धर्मा पाटील' होतो हे शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना कोणत्यातरी संघटनेचा झेंडा हाती घ्यावा लागतो. ही त्याची मजबुरी आहे. टीका करणार्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे.

शेतकरी आत्महत्या, शेतकरी संप, शेतकऱ्यांचा मोर्चा हा टिंगलटवाळी करण्याचा विषय नाही. हा खूप गंबीर सामजिक विषय आहे. सर्वांनाच सुख, संमृद्धि हवी असताना शेतकऱ्यांना का नको? त्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यात काय गैर आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन शेतकरी झालेल्यांना व नवश्रीमंत शहरी वर्गाला हे कधी कळणार?? का कळवूनच घेणार नाहीत??
सत्ताधारी शेतकर्याच्या बाजूने, विरोधक शेतकर्याच्या बाजूने असं असताना शेतकर्यांवर वारंवार आंदोलन करण्याची वेळ का येते?? राजकीय पक्षांच्या धुरणींनी यावर विचार करायला हवा. शेतकरी आज शांततेत मोर्चे काढतोय, आत्मक्लेश करून घेतोय, अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर आत्महत्या करतोय. त्यांचा वापर वेगवेगळ्या संघटना व पक्ष गरजेनुसार करून घेतायत. हे वेळीच थांबायला हवे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात हाच शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी दोन हात करायला उभा राहिला तर त्याचा दोष शेतकऱ्याला देता येणार नाही.

संदिप रामचंद्र चव्हाण.

Tuesday, 6 March 2018

'पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची' आणि 'टीनएजर्सच्या मनात'

पहिली_आठ_वर्षं... सहज शिक्षणाची
लेखिका: डॉ. श्रुती पानसे (पीएचडी शिक्षणशास्त्र)
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १८०रु
पुष्ठ संख्या:१६०


मुल जन्माला आल्यापासून आठ वर्ष्याचे होईपर्यंत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कशी होते याबद्दल विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक आहे. बाळ लहान असल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो.
पहिली एकत्र कुटुंबात मुलं कशी मोठी व्हायची लक्षातही यायचे नाही... परंतु आज त्रिकोणी,चौकोनी कुटुंबात मुलांना वाढवणे म्हणजे अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नवं पालकांना मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.

मुल (मुलगा किंवा मुलगी या अर्थाने) जन्माच्या पूर्वतयारीपासून ते मुलाचा जन्म, त्याचे/ तिचे रांगणे, उभे राहणे, अडखळणे, चालणे, पळणे, बोलणे, चिडणे, रागावणे, रडणे, हट्ट करणे, खोड्या करणे, मोठ्यांचे अनुकरण करणे इत्यादी मुलाच्या वर्तणुकीचे सूक्ष्म निरीक्षण व आपल्या पीएचडी संशोधनात केलेला लहान मुलांचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय अभ्यास डॉ. श्रुती पानसेंनी सर्व पालक, शिक्षक, समाज, शासन यांना पुस्तकरूपाने उपलब्द करून दिला आहे.

कोणत्याही नवपालकांनी, शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे व कसे वागू नये, मुल वाढवताना पालकांची भूमिका कशी असावी त्याच प्रमाणे पहिली आठ वर्षे ही मुलांच्या वाढीसाठी किती महत्वाची असतात याचे सोप्या भाषेत व अतिशय विचार करायला लावणारी मांडणी पुस्तकामध्ये केली आहे.
पुस्तक एकूण एकोणतीस प्रकरणात विभागले आहे. हे सर्व लेख सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'स्मार्ट संगोपन' या नावाने प्रसिध्द झाले आहेत.

मला हे पुस्तक का आवडले?
मी स्वतः पालकाच्या भूमिकेत असल्याने मला यातील बहुतेक सर्व मुद्दे व त्याबद्दलची माहिती महत्वाची वाटली.  मी मुलाशी कसे वागतो, कुठे चुकतो किंवा विनाकारण मुलावर रागवतो का? या बद्दल आत्मपरीक्षण करू लागलो.

हे पुस्तक कोणी वाचावे?
शून्य ते आठ/ दहा वर्षांच्या मुला-मुलींचे पालक, पाळणाघर ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील इतर घटक ज्यांचा संबध या वयोगटातील मुलांसोबत येतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात निर्णय घेणारे राजकारणी व अंमलबजावणी करणारे सनदी अधिकारी, या व्यतिरिक्त ज्यांच्या घरी या वयोगटातील मुलं आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी हे पुस्तक वाचावे.

या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे 'टिन एजर्सच्या मनात' त्याची माहिती खालीलप्रमाणे

पुस्तक परिचय: टीनएजर्सच्या_मनात
लेखिका: डॉ. श्रुती पानसे
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १४०
पृष्ठ संख्या: १२०
'टीनएजर्सच्या मनात' हे पुस्तक साधारण ८-९ वर्षांपासून ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या आईवडीलांसाठी लिहलेलं आहे. परंतु याचे वाचन या वयोगटातील मलामुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांनी व या वयोगटातील मुलं ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वाचल्यास मुलांच्या शारीरिक व मानसिक बदलाचीे शास्त्रीय, मानसशास्त्रीय माहिती मिळेल. हे पुस्तक एकूण २३ प्रकरणात विभागले आहे.


डॉ. श्रुती पानसे यांनी बालमानशास्त्र, मेंदू आणि शिक्षण यावर विविध पुस्तकं लिहली आहेत. लेखिका शिक्षणशास्त्रात पीएचडी आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणविषयक परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले आहेत. विविध शिक्षणसंस्थांमधून व्याख्याने दिली आहेत. 'पहिली आठ वर्षं सहज शिक्षणाची' या पुस्तकाचा पुढील भाग म्हणून 'टीनएजर्सच्या मनात' या पुस्तकाकडे पाहता येईल.
बाळ हळू हळू मोठं होत असत. सुरवातीला बाळाच्या खोड्या बाललीला म्हणून कोणी गंबिरतेने घेत नाही. परंतु हेच बाळ जेव्हा आठ दहा वर्षाचे होते तेव्हा त्याला चांगली समज आलेली असते. नाईन ते नाइंटिन या वयोगटातील मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये असतात. त्यांच्या खोड्या, अनपेक्षित वागणं हे घरापूरते मर्यादित नसते. या वयात शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी, त्यांचे पालक, शिक्षक, यात गुंतले जातात. काहीवेळा मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे 'लहान होती तेच बरे' असं म्हणायची वेळ पालकांवर येते.
९-१९ या वयोगटातील मुलामुलींच्या समस्या लहान वयोगटातील (०-८) मुलामुलींपेक्षा वेगळ्या असतात. शारीरिक वाढ, लैगिंक भावना, परलिंगी आकर्षण, अभ्यासाचा ताण, पालकांशी कमी होणारा संवाद, मित्र-मैत्रिणी अधिक जवळच्या वाटू लागने, स्वप्रतिमेच्या प्रेमात पडणे, कोणत्याही कामात वेळ काळाचे भान हरवणे, अघोरी धाडस करणे, भावनांवर नियंत्रण नसणे, सोशलमीडियाच्या आहारी जाणे, व्यसनात अडकण्याची शक्यता, सबकुछ चलता है ही प्रवृत्ती असणे, इत्यादी वेगवेगळ्या समस्या या वयोगटातील मुलांच्यात/मुलींच्यात दिसतात.

या पुस्तकात मुलाची, मुलीची शारीरिक वाढ, त्यांच्या हार्मोन्समध्ये होणारे बदल, शरीराने मोठे झाले तरी मेंदू विकसन पूर्णत्वाला आलेले नसणे, मोठं होण्याची लक्षणे, मेंदुसदर्भातील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, अमिग्डाला, न्यूरॉन्स, डेन्ड्राईट्स, न्यूक्लिअस, अक्झॉन, सीनँप्स इत्यादी बद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे.
टिनएजर्सच्या वाढीचा मानसशास्त्रीय अभ्यास समजून घेण्यासाठी हे पुस्तक पालकांना, शिक्षकांना उपयोगी आहे.
हे पुस्तक मिळण्याची अमेझॉन लिंक

संदिप रामचंद्र चव्हाण.

Friday, 2 March 2018

निमित्त:होळी, धुलीवंदन, रंगपंचमी

निमित्त_होळी_धुलीवंदन_रंगपंचमी

काल होळी झाली.. आज धुलीवंदन (धुळवड) आहे. अजून चार दिवसांनी रंगपंचमी येईल. भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची एक परंपरा आहे. निसर्गाच्या बदलाप्रमाणे व कृषिसंस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण साजरे करणारा भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे. जगातील इतरही देशात त्यांच्या संस्कृतीनुसार उत्सव साजरे होतात पंरतु वर्षाच्या बाराही महिन्याला येणारी सणांची माळ बहुदा आपल्याच देशात असेल. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेनुसार सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या खंडप्राय  देशात खान-पान, राहणीमान, भाषा जश्या वेगवेगळ्या आहेत तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
आपल्या राज्याचा विचार करता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची सुरवात होते तर फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीने, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलीवंदनाने व धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीने वर्षाची सांगता होते. होळी ते रंगपंचमी हा एकच सण मानला जातो.

शेकडो वर्षांपासून होळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. ^^काहींच्या मते होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत आहे, तर काही लोक त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. पुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नावाची राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेतून साजरा होतो आहे.^^
होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. काही ठिकाणी होळीची राख पाण्यात मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जाते. उत्तर भारतात धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची होळी खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उत्तर भारतीय मोठ्या प्रमानार स्थलांतरित झाल्यामुळे व चित्रपटातील सेलिब्रेटींना हाताशी धरून विविध कंपन्यांनी धुलीवंदनाचे मार्केटिंग केल्यामुळे आजच्या दिवशी रंगांची होळी(होली) खेळली जाते. त्यामुळे मोठ्या शहरात मराठीसण असणारी रंगपंचमी कुठेतरी मराठी भाषेसारखीच हरवत चालली आहे.

कोकणात होळीला शिग्मो म्हणतात. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शिमगा म्हणतात.
शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढतात त्याला शिमग्याने सोंग म्हणतात. काही ठिकाणी तर वेगळीच तरा असते... कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बोरीचा बार यासाठी प्रसिद्ध आहे. काही गावामध्ये जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. धिंड झाल्यावर जावयाला सुहासिनिकडून उटण्याने आंघोळ घातली जाते व पोशाख देऊन सन्मान केला जातो. जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा असते. त्‍यामुळे गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. नाशिक जिल्ह्यातील वंडांगळी या गावात अशी पध्द्त असल्याचं वाचनात आलं आहे. अजूनही वेगवेगळ्या खेडोपाडी वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत.
कोणत्याही रूढी परंपरांचा काही अर्थ असतो. चुकीच्या रूढी परंपरा बंध झाल्या पाहिजेत व कालांतराने त्या बंधही होतात. काही चांगल्या परंपरांचे जतन करणे हेही सर्वांचे काम आहे. वाईट रूढी परंपरा बंध होताहोता आता दारू पिऊन धुळवड साजरी करण्याची नवी परंपरा काही ठिकाणी चालू होताना दिसते आहे. आषाढ आमावस्याची गटारी आमावस्या झाली. त्याचप्रमाणे धुलीवंदन(धुळवड) म्हणजे पिणाऱ्यांसाठी पर्वणीच अस काहीसं चित्र तयार होत आहे.
अलीकडे राजकीय धुळवड असाही शब्दप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो आहे. यातून राजकीय विचारांचे पतनच सुचवायचे असते. नुकत्याच झालेल्या विविध निवडूनकामधून राजकीय धुळवड दिसून आली आहे.

होळीच्या आधी झाडांची पानगळ झालेली असते. तो पालापाचोळा गोळा करून, परिसरातील कचरा एकत्र करून त्यात आपल्या मनातील वाईट विचार टाकून होळी पेटवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड, गोवऱ्या(शेण्या) जाळणे कुठेतरी थांबायला हवे. होळीच्या अग्नीत मनातील काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर, अहंकार यांना जाळून टाकायला हवे. पण हे विकार मनात ओझं म्हणून वागवणारे आपले मन खूपच विचित्र असते. बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात...

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते. (मंत्राने विष उतरत नाही, शब्दशः अर्थ घेऊ नये) पण मनातील विष म्हणजे वाईट दुषवृत्तीवर कोणता इलाज?? आपल्या स्वभावातील दोष शोधून त्याचे निर्मूलन करणे हा होळीचा उद्देश व्हायला हवा.

धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते. शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते. होळीपासून वाढणाऱ्या उष्म्यात झाडांची नवी पालवी डोळ्यांना सुखावते. पशु पक्षांना आपल्या सावलीत घेते. ऋतूंचा राजा म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतु हा तारुण्याचा निदर्शक आहे. जुनी जळमटे काढून नवी पालवी लेऊन आयुष्याचा मार्ग चालायचा असतो. असा काहीसा संदेश वसंतऋतु देत असतो. अडचणी आल्या, संकटे आली म्हणून निराश होऊ नका. वसंत होऊन नव्याने नवी सुरवात करा असाच संदेश तो देतो.

रंगपंचमी उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते.¶
सध्या रंगपंचमीला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का याची जागा कृत्रिम रासायनिक रंगांनी घेतली आहे. रासायनिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. कृत्रिम रासायनिक रंग बाजारात उघडय़ावरही विकले जातात. या रंगाच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते, डोळ्यांना त्रास होतो. रंगपंचमीला कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर हवा. हुल्लडबाजीला आवर हवा. रंगाच्या पाण्याचे फुगे मारणे हा धोकादायक प्रकारही थांबायला हवा. या दिवशी रंगांची उधळण करून एकमेकाप्रति जिव्हाळा, मैत्री, स्नेह जपण्याचा प्रयत्न हवा.

वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?? होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली विभिस्तपणा होणार नाही याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष असायला हवे. आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल... नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.
सर्वांना होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदिप रामचंद्र चव्हाण.

^^ संदर्भ:- भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा
¶¶ संदर्भ:- मराठी विश्वकोश.