My Blog List

Saturday 16 December 2017

दिवास्वप्न... मला आवडलेले मराठी पुस्तक 09/12/17

दिवास्वप्न :- वकील असणाऱ्या पण शिक्षक म्हणून जगणाऱ्या एका शिक्षणक्षेत्रातील क्रांतिकारकाचा म्हणजे #गिजुभाई_बधेकांचा शिक्षण प्रयोग... 
गिजुभाईंचा जन्म 15 नोव्हेंबर 1885 साली झाला, 15 नोव्हेंबर 1985 ला त्यांची जन्मशताब्दी बालशिक्षण प्रेमींनी साजरी केली. स्वतः वकील असून त्यांनी बालशिक्षण व त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती याचा अभ्यास केला व वकिलीला राम राम करून बालकांची वकिली चालू केली. गिजुभाईंनी सुमारे 80/85 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षणात चांगले क्रांतिकारक बदल सुचवले व ते सिद्ध करून दाखवले.
गिजुभाई बधेका यांनी स्वानुभवातून 1932 साली हे पुस्तक गुजराथी भाषेत लिहून प्रकाशित केले आहे. त्या नतंर पुढे वेगवेगळ्या भाषेत या पुस्तकाच्या आवृत्या निघाल्या. मराठीमध्ये सुद्धा काही लेखकांनी याचे भाषांतर केले आहे.
मी शोभा भागवत यांनी केलेले भाषांतर वाचले.....त्या बद्दल थोडंस....
दिवास्वप्न या शब्दाचा इंग्रजी मध्ये daydream हा शब्द आहे. मराठीत याला पर्यायी शब्द "गोड गोड गोष्टींचा विचार करणे", मनोराज्य किंवा मनोराज्यात रमणे असा अर्थ डिक्शनरी मध्ये सापडतो. पण रूढार्थाने दिवसा पाहिलेले व सत्यात यायला अशक्य असणारे स्वप्न म्हणजे दिवास्वप्न. 

या पुस्तकात स्वतः लेखक कथानायक लक्ष्मीशंकर या भूमिकेत आहेत... शिक्षक बनलेले लक्ष्मीशंकर शिक्षणाधिकार्यकडे जाऊन प्राथमिक शिक्षणाचा वर्ग  एका वर्षासाठी प्रयोग म्हणून चालवायला मागतात. त्यांची जिद्द व चिकाटी पाहून अधिकारी त्यांची मागणी मान्य करतात. लक्ष्मीशंकर यांना चौथीचा वर्ग वर्षभर चालवायला मिळतो, त्यात त्यांनी केलेले प्रयोग व त्यासाठी घेतलेले कष्ट व त्यातून मुलांच्यात झालेला आमूलाग्र बदल या सत्य घटनेवर आधारित वास्तव सांगणारी कथा म्हणजे दिवास्वप्न.
शिक्षकपेशातील कोणताही अनुभव नसताना चौथीच्या वर्गात शिक्षक म्हणून आल्यावर पहिल्याच दिवशी मुलांच्या चेष्टा मस्करीला व टिंगलटवाळीला सामोरं जायला लागल्याने हे काम आपण समजतो तेवढे सोपं नाही यांची जाणीव लक्ष्मीशंकर यांना होते.
दंगेखोर, उनाड मुलांना शांतीचा क्लास घेऊन फायदा नाही.. गडबड, गोंधळ अशा वातावरणात मोठी झालेली मुलं एकदम शांत होणार नाहीत व मार देऊन मुलांना वळण लावणं मान्य नाही... इतर शिक्षकांचा मारावर भर असताना लक्ष्मीशंकर मात्र मारझोड करण्याच्या विरोधात आहेत. अचानक दिलेली सुट्टी व त्यामुळे अत्यानंदात उड्या मारत पळत सुटणारी, सुट्टी म्हणजे जणू शिक्षेतून मुक्ती अस वाटणारी मुलं म्हणजे मुलांच्यात शाळेविषयी प्रेम निर्माण करायला शाळा, शिक्षक, व व्यवस्था कमी पडली आहे हे ठाम मत लक्ष्मीशंकर यांचं होतं.
आजपर्यंत मुलांना शिक्षणाच्या व अभ्यासक्रमाच्या बागुलबुवामुळे गोष्टी न सांगण्याचा विडा उचललेले व खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असे समजणारे व त्यामुळे मुलांचं भावविश्व न समलेले शिक्षक एका बाजूला तर मुलांचा विश्वास, प्रेम जिंकण्यासाठी गोष्टी व खेळाचा आधार घेऊन गोष्टी व खेळातून अभ्यास शिकवणारे लक्ष्मीशंकर दुसऱ्या बाजूला... हा एकूणच प्रकार रंजक व नाविन्यपूर्ण आहे.
गोष्टींमुळे हा हा, ही ही, करणारी मुलं एकदम शांत होतात, शिक्षक व मुलांचं नात मित्रत्वाच्या टप्प्यावर ज्याण्यास गोष्टी मदत करतात.
मुलांची व्यक्तिगत स्वच्छता, स्वच्छ कपडे इत्यादीबद्दल लक्ष्मीशंकर आग्रही आहेत. पालक लक्ष देत नाहीत म्हणून स्वतः आरसा, कांगवा, टॉवेल घेऊन येतात. मुलांचे हातपाय धुतात हळूहळू मुलांना सवय लागते. डोक्यावर टोपी असणे ज्यावेळी समाजव्यवस्थेत अत्यावशक्य होतीे त्या वेळी मुलांना टोपीचा भार नको असं मत मांडतात. धर्माचं शिक्षण द्यायला आलेल्या साधूंना योग्य वयात धर्माचे शिक्षण हवे, लहानग्यांना धर्म सांगून उपयोग नाही हे पटवून देतात. त्यांनाही शिक्षणक्रांतीच्या बदलात मदतीसाठी सामील करून घेतात.
मोठे अधिकारी येतील तेव्हा मुलांना धाक दाखवून सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे व अधिकाऱ्यांची वाहवा मिळवायची हे लक्ष्मीशंकर यांना मान्य नाही...मुलं ही अधिकाऱ्यांच्या मनोरंजनाचे साधन नव्हे व इतर सहभागी झाले तरी मी माझ्या वर्गातील मुलांना यात सहभागी करणार नाही असा पवित्रा घेतात... मुलांना जे येत ते सादर करतात... अधीकाऱ्यांना नेमके तेच आवडते.
आज जरी ज्ञानरचनावाद आला असला तरी बरेच शिक्षक व बराच अभ्यासक्रम जुन्या पठडीत चालला आहे.  हे पुस्तक 1932 च्या सुमारास लिहले आहे. पण आजही शिक्षकांसाठी आदर्शवत व पालकांसाठी माहितीपूर्ण आहे.
व्याकरण शिकवणे सर्वात कंटाळवाणे असते, शिक्षक मुलांनाही ते कंटाळवाणे वाटते तेव्हा नाम, सर्वनाम, क्रियापद, विषेशन हा शिक्षक खेळातून आणि कृतीतून शिकवतो. गाण्याच्या भेंड्यातून मुलांची भाषेवर पकड दिसते. भवरा फिरवणे, स्वच्छ अक्षर, वस्तुसंग्रालयाची मांडणी इत्यादी गोष्टी मुले सहज करतात.
भूगोल शिकवण्याची पध्दत खूप रोचक आहे. नकाशावरील ठिकाणे पृथ्वीच्या गोलावर शोधणे, गावाला जाताना तयारी करावी तशी एखाद्या देशाला जायला काय काय तयारी करावी लागेल याचे प्रात्यक्षिक घेतात. चित्रकलेची गोडीही मुलांना लागते. ज्यांना अभ्यास जमत नाही ते कोणत्या व्यवसायात तरबेज होतील तेही निरीक्षण लक्ष्मीकांत करतात व तशी व्यवसाय शिक्षण देण्याची शिफारस करतात.
मुलांना अभ्यास हा खेळासारखा, गोष्टीसारखा, मनोरंजनासारखा वाटला पाहिजे. त्याचा भार वाटलायला नकोे असं एकूण मत या पुस्तकातून समोर येतं.
हे पुस्तक शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे. व शिक्षण व्यवस्थेशी संबधीत सर्वांनी वाचायला हवे असे आहे.
आज काळ बदलला असला व शाळा सुधारल्या(?) असल्या तरी गिजुभाईंचे दिवास्वप्न सत्यात आणण्यासाठी शिक्षक, संस्थाचालक, शासन यांच्याकडून म्हणावा तसा प्रयत्न होताना दिसत नाही. मुलांच्या शाळेसाठी पालक वर्ग उपलब्द पर्यायात परवडणारा पर्याय स्वीकारत आहेत. सध्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे.... लहान मुलं मतदार नसल्यामुळं त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या सर्वात महत्वाच्या गोष्टीवर लगेच बदल होतील असं वाटत नाही., व पालक इच्छा असून बदल करण्यात असमर्थ आहेत... जेव्हा गिजुभाईंचे दिवास्वप्न पूर्ण होईल तो सुदिन असेल.....
संदिप रामचंद्र चव्हाण
दिवास्वप्न -- गिजुभाई बधेका.
अनुवाद ---- शोभा भागवत.
प्रकाशन --- इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ एज्युकेशन, पुणे
9 डिसेंबर 2017 रोजी मराठी पुस्तकप्रेमी या फेसबुक ग्रुपवर प्रसिद्ध केलेला ब्लॉग..

Friday 15 December 2017

साल्वातोर मुंडी अन् आपली घसरगुंडी 06/12/17

साल्वातोर_मुंडी_अन्_आपली_घसरगुंडी
.... संदिप रामचंद्र चव्हाण
6 डिसेंबर 2017
कलाकृती काय असते व त्याचे मूल्य किती(ही) होऊ शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे 'लिओनार्दो दा विन्सी(विंची)' याच्या 'साल्वातोर मुंडी' या चित्राला मिळालेली किंमत...
मोनालीसाचे चित्र काढणारा लिओनार्दो लोकांना माहिती आहे ... काही दिवसांपूर्वी त्याच्या नावावरून एक चित्रपटही येऊन गेला. लिओनार्दो पंधराव्या शतकातील इटलीतील जगप्रसिद्ध चित्रकार होता.

नोव्हेंबर मध्ये त्याच्या 'साल्वातोर मुंडी' या चित्राचा ‘ख्रिस्तीज’ या लिलाव करणाऱ्या जगप्रसिद्ध कम्पनीने न्यूयॉर्क येथे लिलाव केला. त्यांना अपेक्षित असणाऱ्या 100 दशलक्ष डॉलरच्या  साडेचार पट रक्कमेला म्हणजेच 450 दशलक्ष डॉलरला हे चित्र आज्ञात व्यक्तीने खरेदी केले... भारतीय मूल्यात याची किंमत तीन हजार कोटीच्या जवळ जाते. (जवळपास 2,941 कोटी)
तीन हजार कोटीला दीड बाय दोन फुटाच्या आसपास (26 इंच बाय 18.5 इंच) असणारे एक चित्र विकलं जाऊ शकत हे आपल्यासाठी खूप विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. कलेचे चाहते आणि कलेला तिच्या कलाने घेणारे जगात भरपूर लोक आहेत. बऱ्याच प्रगत देशात कलेचे वेगळेपण व वेगळ्यापणाने कला जपली जाते. चित्रकला, हस्तकला, पुरातन वास्तू, यांना राष्ट्राचा अनमोल ठेवा म्हणून जपण्यावर भर असतो.
या चित्रबद्दल, त्याच्या खऱ्या खोट्याबद्दल वाद आहेत, चार वर्षे यावर संशोधन झाले आहे. हे चित्र एका रशियन अब्जाधिशाकडे होते... आता त्याचा लिलाव झाला आहे..जवळपास 3 हजार कोटीला...असो.
बिल गेट्सनी लिओनार्दोची विज्ञान नोंदी असणारी एक डायरी( कोडेक्स लिसेस्टर) 1994 मध्ये 30 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. आपल्याही देशातील वासुदेव गायतोंडे यांचे एक पेंटिंग 2015 मध्ये तब्बल तीस कोटीला विकले गेले होते.
एकूणच काय कला व त्याच्याशी असणारा सांस्कृतिक वारसा यामुळे त्या कलेची किंमत वाढते.
पाच्यात्यांच्या तुलेनेत आपल्या देशात सांस्कृतिक व पुरातन वास्तू, वस्तू जपण्याच्या पध्दतीमध्ये खूप मोठा फरक आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षणातूनही जवळपास कला विषयाची हद्दपारी  झाली आहे. शिक्षणामध्ये चित्रकलेला किंवा कोणत्याही कलेला असणारं दुय्यम स्थान हे त्याचेच द्योतक आहे. एक चित्र हजार शब्दांचे काम करते. अशी ताकत चित्रात असते. हस्तकलेच्या वस्तू मधून मुलांचं कौशल्य विकसित होतं... पण चित्र काढणं किंवा इतर कला म्हणजे वेळेचा अपव्यय व अभ्यासाकडे दूर्लक्ष असे मानणारा मोठा पालकवर्ग आहे. थोड्याफार फरकाने शाळांचही असंच मत आहे.
आपण परकीयांचे अनुकरण करताना अवगुण घेतले पण गुणांकडे दुर्लक्ष केले... ही परंपरा मोडीत काढणे गरजेचे आहे.
सध्या देशात पुरातन वास्तूवरूनही गोंधळ माजवला जात असताना, त्याचप्रमाणे पुरातन वास्तू या प्रेमी युगलांच्या गुजगोष्टी करण्याच्या व त्यांचे प्रेम कोरून ठेवण्याच्या हक्काच्या जागा झाल्या आहेत. जनतेची अनास्था व सरकारचे दुर्लक्ष यामुळे अनेख ठिकाणचा पुरातन 'वारसा' बेवारस होऊन अखेरच्या घटका मोजत आहे. आर्थिक प्रश्न व बजेटची समस्या असली व आपल्याला 'साल्वातोर मुंडी' खरेदी विक्रीसारखी चैन परवडणार नसली तरी खऱ्या वारश्यांकडे दुर्लक्ष असताना, मताच्या राजकारणासाठी स्मारकांची स्पर्धा भरवून जनतेनेही त्याला अस्मितेचे लेबल लावल्यामुळे.... 


"कारे भुललाससी वरलीया रंगा!" अशी परिस्थिती दिसते....ही परिस्थिती बदलुन कलेला, ऐतिहासिक वास्तू, वस्तूंना चांगले दिवस येतील तो सुदिन!!


(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.6 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)

काकस्पर्ष 13/09/17

काकस्पर्ष......
13 सप्टेंबर 2017
सकाळी लवकर उठणारा...एका डोळ्याने पाहणारा... मिळेल ते भाऊबंधाना देऊन व वाटून खाणारा...निसर्गातील महत्वाचा स्वछतादूत...कावळा.

आपण लहानपणापासून कावळा व चिमणीची गोष्ट ऐकत आलो आहोत...पण कावळा कायमच व्हिलन ठरवल्यामुळे किंवा बालमनावर तस बिंबवल्यामुळे कावळ्याबद्दल लोकांच्यात बहुदा प्रेम नसावे. पण दुसऱ्या गोष्टीत कावळा किती हुशारीने छोटे छोटे दगड टाकून मडक्यातले पाणी वर काढतो व पितो..यात कावळ्याची बुद्धिमत्ता, चिकाटी दिसते. पण चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा जन्मजात स्वभाव असल्यामुळे आपल्याला कावळ्याची ती हुशारी लक्षात राहत नाही. आता तर #काऊ' म्हणलं की मुलं #गाई' दाखवतात. एक घास चिऊचा, एक घास काऊचा करुन लहानग्यांना चारणाऱ्या आई, माई, ताईला आता वेळ आहे कुठे?
पण कावळा कितीही नावडता असला तरी पितृ पंधरवडा आला की सगळ्यांना आठवण होते ती कावळ्याची. पिंडाला कावळा शिवला की पितरांची शांती होते व आत्मा मुक्त होतो असा समज जनमानसावर आरुढ झाला आहे. त्याच बरोबर कोणताही व्यक्ती परलोकवासी झाला की त्याच्या प्रियजनाना त्याच्या मातीला(2ऱ्याला किंवा 3ऱ्याला, सावरायला महाराष्ट्रात वेवेगळे शब्द वापरतात), दशक्रिया विधीला, नंतर श्राद्धाला व शेवटी पितृपंधरवढ्यात कावळ्याची आठवण हमखास होते.
तर असा मुक्ती देणारा कावळा गरजेपुरता आवढणारा पण इतर वेळा दुर्लक्षित असणारा पक्षी आहे.
मागील काही दिवसांपूर्वी काही मराठी न्यूज चॅनेलला दाखवले..नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांज्यात एक कावळा अडकला होता...फायरब्रिगेडणे त्या कावळ्याला सुखरूप काढले पण तो जखमी झाला असल्यामुळे जास्त हालचाल करत नव्हता... एका व्यक्तीने त्याला पकडून हातामध्ये घेतले...मग काय लोकांची झुंबड उडाली पिंडाचा नैवेद्य घेऊन त्या कावळ्याकडे.... पितृपंधरवढ्यात हमखास काकस्पर्शाची पर्वणी साधण्यासाठी लोकांची रांग लागली नसती तर नवलच..
भुके_नाहीं_अन्न_मेल्यावरी_पिंडदान!!
हे_तों_चाळवाचाळवी_केलें_आपणची_जेवी!!

संत तुकाराम महाराज म्हणतात की माणूस जिवंत आहे तो पर्यंत त्याला खाऊ पिऊ घाला, भुकेल्याना अन्न द्या, आई वडिलांची सेवा करा. मेल्यावर पिंडदान करणे व त्यासाठी बनवलेले आपणच खाणे ही शुद्ध फसवणूक आहे.
खर तर पितरांना शांत कराव लागतं नाहीतर ते त्रास देतात ही गोष्टच न पटणारी आहे..मनुष्यजाती आपल्या वंशवाढीसाठी सतत प्रयत्नशील असते..भावीपिढीसाठी कष्ट उपसते..मग मृत्यूनंतर पित्र बनून त्या वाढलेल्या वंशवेलीला त्रास का देईल?? असो....
किमान पितरांच्या मुक्तीसाठीतरी कावळ्यांची आठवण होतेे..हे ही नसे थोडके!
कावळ्याचे काही गुणविशेष माणसाने घेण्यासारखे आहेत...कावळा काळा असतो पण त्याला बिलकुल न्यूनगंड नसतो..तो कोणतेही क्रीम तोंडाला किंवा शरीरावर लावत नाही किंवा फेशियल करत नाही. तरीही तो आनंदी असतो. तो कुणालाही आवडत नाही म्हणून त्याला काही फरक पडत नाही.
असं म्हणतात की कावळ्याला एकाच डोळ्याने दिसते कावळा एकाक्ष पक्षी आहे...म्हणजे तो अपंग असूनही भक्ष मिळवण्यात पटाईत आहे...म्हणजे त्याने स्वतःला सिद्ध केले आहे..हम भी किसीसे कम नही.
कावळा हा भारत व अन्य अनेक देशात आढळतो, जंगलात, झाडावर, घरावर, बिल्डिंगवर, इलेक्टरीक टॉवरवर, तारांवर, ग्रामीण भागात, शहरी भागात,कुठेही स्वतःला अडजेस्ट करुन घेतो..जमेल तसे काटक्या कुटक्यांचे घर बांधतो..2bhk,3bhk हवा असा अट्टाहास नसतो. म्हणजे गरजा कमी ठेवतो व आनंदी राहतो. त्याचप्रमाणे तो कोकिळीची अंडी उबवतो...म्हणजे सहकार्य करतो. त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे काहीही खायला मिळाले तरी तो एकटा खात नाही...काव काव करुन आपले सगळे मित्र, सगेसोयरे बोलावतो व मिळेल ते वाटून खातो. एकूणच तो एक_मेका_साह्य_करु_अवघे_धरु_सुपंथ अस जीवन जगत असतो.
कावळ्याचे इतके सारे गुण जर मनुष्याने घेतले तर समाजात खुपकाही चांगला बदल घडेल..
कावळा मेलेल्या जनांवरापासून ते मिष्ठांनापर्यंत काहीही खातो..पर्यावरण स्वच्छता हे वृत घेऊन आयुष्य जगतो..पण वाढत्या शहरीकरणामुळे, वाढत्या वृक्षतोडीमुळे, पिकावरील रासायनिक औषधांच्या अतिवापरामुळे जसा सर्व पक्षांच्या प्रजनन क्षमतेवर,वाढीवर, विपरीत परिणाम झाला आहे तसा तो कावळ्यांच्या संख्येवर सुद्धा झाला आहे. आज महाराष्ट्रातून गिधाड हा अन्नसाखळीतील महत्वाचा घटक नष्ट होण्याच्यामार्गावर असताना कावळाही त्याच परिस्थितीत आडकावा हे नैसर्गिक, आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
कावळ्यांची संख्या कमालीची घटत असताना मनुष्यरूपी डोमकावळ्यांची संख्या राजकारणात, समाजकारणात व एकूणच जगभरात कमालीची वाढत आहे. वारंवार पक्ष बदलून स्वतःला अडजेस्ट करुन राजकारण्यांनी कोणत्याही परिस्थितीत अडजेस्ट करण्यात कावळ्यालाही मागे टाकले आहे.
कोणी कितीही हटकले, निंदा केली तरी लाज ना शरम,  'गिरे तो भी टांग उपर' असे कावळ्यालाही शरम वाटनारे कृत्य भ्रष्ट राजकारणी, भोंदू बाबा, भ्रष्ट सरकारी नोकर, समाजातील विविध घटकांकडून व लोकांच्याकडून होऊ लागले आहे.
मिळेल तेवढे, मिळेल त्या चांगल्या वाईट मार्गाने आपले घर भरुन आपल्या ज्ञातीबांधवाना वाऱ्यावर सोडणारे डोमकावळे सर्वत्र मुक्त संचार करत आहेत..त्यांना ना धाक आहे समाजाचा, ना शासनाचा, ना कायद्याचा.
आपल्याला हा भारत खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण बनवायचा असेल तर गरज आहे पर्यावरण प्रेमी खऱ्या कावळ्यांची...त्यासाठी बंदोबस्त करावा लागेल आपल्यातल्या डोमकावळ्यांचा.
मगच खऱ्या अर्थाने पितरांना मुक्ती मिळेल...
नाहीतर आपण अशीच फसवणूक करत राहू ..... आपली व ....आपल्या पितरांची!!
.....संदिप रामचंद्र चव्हाण

गोतावळा....मला आवडलेले मराठी पुस्तक 09/11/17

9 नोव्हेंबर 2017 
गोतावळा म्हंटल की डोळ्यासमोर येतो तो गण-गोत आणि नात्यागोत्यांचा पसारा....पण गोतावळा काय फक्त मानवी नात्यांचा असतो?
गोतावळा:- या आंनद यादवांच्या पुस्तकात वेगळाच गोतावळा अनुभवास येतो, कमी अधिक प्रमाणात कृषी संस्कृतीशी नात असणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव आलेला असेल...पुस्तक ग्रामीण संस्कृतीशी नाळ सांगणार आहे..चांगला वाचक दोन/ तीन बैठकीत वाचून संपवेल अस....तर त्या बद्दल थोडंस...  
संदिप रामचंद्र चव्हाण
गोतावळा --लेखक आनंद यादव.
गोतावळा कथेतील नायक #नारबा हा एका मळ्यात वीस वर्षे सालगडी म्हणून राहणारा...फक्त दोन टाईम जेवण, वर्षांतून एखाद्या वेळी कापडं यावरच अपार कष्ट करुन मालकाचा मळा फुलवणारा, पिकवणारा...अगदी लहान वयात कामाला जुंपून घेऊन अकाली प्रौढ बनलेला, अशिक्षित,अडाणी, आई-बा, भाऊ- बहीण, बायको-पोर नसलेला एकटा-एकाकी....
दिवसभर ढोर मेहनत करुन मालकाच्या घरुन आलेला जेवणाचा डबा खाऊन मळ्याच्या वस्तीला खोपित राहणारा... कुणाशी दोन शब्द बोलाव म्हणलं तरी आजूबाजूला एक माणूस नाही...आजारी पडलं, कष्टानं हात पाय दुखलं तर बोलणार कुणाला आणि कुणाशी?? कामात कसूर करेल म्हणून मालकाने लग्न लाऊन दिलं नाही, यंदा करू, पुढल्या साली बघू, अस करुन लग्न झालं नसलेला ...शारीरिक, मानसिक कुचंबणा सहन करून अंतरीच दुःख मनात तसच दाबून ठेवणारा, जिवाभावाचं एकही माणूस साथीला नसल्यामुळं मुक्या प्राण्यावर अतोनात जीव लावणारा , प्रेम करणारा.....नारबा!
कोंबडा, कोंबडी, पिल्लं, गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, बकरे, करडू, कुत्रा, कासव, मांजर, घोडा, ससा, धामण, मोर, लांडोर, कावळे, घुबड्, मधमाश्या, कोल्हे, गाढवं, खंड्या, खेकडे, यांच्या सानिध्यात राहणारा व त्यातील मालकाच्या दावणीला असणाऱ्या पण मुलासारखं प्रेम करून वाढवलेल्या गुरांढोरांना आपलं गणगोत मानणारा नारबा आपले माणूसपण विसरत नाही कधीकधी तर त्याला वाईट वाटते स्वतःच्या माणूस असण्याबद्दल!!
पाच बैल त्यापैकी एक म्हातारा म्हालिंग्या, दोन मध्यम वयस्क तर दोन तरुण खोंड, दोन रेडे, यांना शेतीच्या कामाला सांभाळून कमी खर्चात जास्त कष्ट करुन शेती कशी पिकेल हा हिशेब मालकाचा...अजून दावणीला म्हैस, गाई(पाडी), शेरड आहेत. यातील सर्व गुरं कमी करुन मालकाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे...मालक व्यवहारिक दृष्ट्या त्याच्या जागी बरोबर आहे..यांत्रिक शेतीशिवाय पर्याय नाही हे त्याला सत्तरच्या दशकात समजलंय... पण नारबाचा जीव मुक्या गुराढोरांत अडकलाय तोही त्याच्या जागी बरोबर आहे..अशी ही कथा वाचत जाईल तशी फुलत जाणारी....शिक्षण, तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोचलं नव्हतं त्यावेळी शेतीची कामे कशी चालत या बद्दल सखोल माहिती आहे.. ज्यांचा कधीही शेतीशी व ग्रामीण जीवनाशी संबध आला नाही त्यांना समजायला अवघड वाटेल पण समजली तर सर्व घटना आपल्या समोरच घडत आहेत असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं...
रोज एक कोंबडीच पिल्लू मुंगूस पळवून न्हेतय  म्हणून मालकीणीन त्यांचा बाजार केला...कोंबडी आधीच मेलेली व पिल्लं विकली गेलेली, मग मागे राहिला म्हसोबला सोडलेला कोंबडा...अगदी एकटा... नारबा सारखा...मग तो आक्रमक झाला व कुत्र्या पेक्षा तोच मळ्याचा राकणदारी झाला...कोणा तिरायत माणसाला खोपिकड फिरकू द्यायचा नाही. रोज सकाळी नारबाचा अलार्म तो कोंबडाच..कोंबड्याने बांग दिली की नारबाचा दिवस चालू....एक दिवस त्यालाही म्हसोबाला कापायचं ठरतं व त्याला जाळं टाकून पकडायची जबाबदारी नारबावर येते...मुलासारखं वाढवलेल्या कोंबड्याच मटण खान नारबाच्या जीवावर येत...सकाळी कोंबडा पोटातच आरवतोय असा भास त्याला होतो...
कुत्री जखमी होऊन मरते...शेळ्या, बोकड विकली जातात, दोन रेडे व दोन बैल विकले जातात...म्हालिंग्या बैल मरणाच्या दारात असताना झाडं तोडायला आलेल्या श्रमिकांना खायला दिला जातो...दावणीची गाई एका महाराजांच्या आश्रमात सोडायची जबाबदारी नारबावरच येते...जड अंतकरणारे तो गाईला निरोप देतो...भरगच्च भरलेली दावन व खोप पार मोकळी होते...बांधावरील झाडं व मोकळ्या माळावरील भला मोठा पिंपळ तोडला जातो....कापला जातो...सगळा मळा व मोकळा माळ नारबाला ओसाड वाटतो..खायला उठतो...त्यातच नवीन ट्रॅक्टर व त्याचा ड्रायव्हर येतो...बैलांच्या जागी ट्रॅक्टर लावला जातो...राहिलेल्या बैल जोडीतील एकाने लाथ मारली म्हणून ड्रायव्हर बैलाला खूप मारतो...याचा संताप, चीड नारबाला येते ....मालकापशी तक्रार करतो पण मालक ड्रायवरची बाजू घेतो...नारबाच काळीज तुटून विदीर्ण होत...जिथे आयुष्यच्या जडणघडणीची वीस वर्षे घालवली तिथे आता आपली किंमत नाही हे त्याच्या लक्षात येतं... आणि तिथून निघायचा निर्णय नारबा घेतो...पण कुठं जाईल?? ना घर, ना दार , ना गण, ना गोत,  वर आभाळ खाली धरती या शिवाय कोणी नाही...होता तो गोतावळा संपला...एकटा नारबा..एकटाच राहिला.
पुस्तकाचे नाव:- गोतावळा
लेखक:- आनंद यादव
प्रकाशन:- मेहता पब्लिकेशन
किंमत:- 150 रु

कडकलक्ष्मी... 25/10/17

कडकलक्ष्मी
25 ऑक्टोबर 2017

दिपवाळीच्या सुट्टीत गावी असताना एक दिवशी दुपारी लयबद्ध ढोलकीचा आवाज यायला लागला खूप दिवसांनी ऐकला तरी आवाज ओळखीचा वाटला... वातावरणात आणि मनात कंपन करणारा तो आवाज... कडकलक्ष्मी गल्लीतल्या चौकात आली हे सांगणारा होता.
मरीआईचा भक्त पोतराज, कडकलक्ष्मी बनून कित्येक पिढ्या आपल्या कुटुंबाची गुजराण करतोय... लहानपणी त्याच्याबद्दल वाटणारी भीती आता गेली होती... चाबकाचे फटके, ढोलकीचा, पायातील घुंगराचा आवाज सगळे दृष्य डोळ्यात साठवत होतो... चाबकाचे फटके मारून घेताना त्याच्या बायकोच्या डोळ्यातील भाव काळीज चिरून जात होता...
आजूबाजूला राहत असणाऱ्या घरातील महिलां पसा पसा धान्य, तेल, एक, दोन, पाच, दहा रुपये देऊन कडकलक्ष्मीचा आशीर्वाद घेत होत्या...
मरीआई ही कडक म्हणून मरीआईचा भक्त कडकलक्ष्मी झाला... कमरेला रंगीबेरंगी चिंध्या, हातात चाबूक(कोरडे), कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, पायात चाळ असा पोशाख धारण करून मरीआई व लोकांच्या मधला संपर्काचा दुवा ठरला.
ज्या वेळी विज्ञानाची प्रगती व औषधांचा शोध कमी होता त्या वेळी साथीच्या आजाराने गावेच्या गावे माणसांच्या मरणाने ओस पडत, हे मरीआईच्या कोपाणेच होते असा लोकांचा समज असे... त्यावेळी पोतराजला बोलवून देवीला प्रसन्न केले जाई, व मरीआईचा गाडा गावाच्या बाहेर काढला जाई.
औधोगिक प्रगती बरोबर विज्ञानाची प्रगती झाली, अनेक रोगांवर उपचार उपलब्द झाले... श्रद्धा अंधश्रद्धा वाद विकोपाला गेले... गावगाड्यात महत्वाच्या असणाऱ्या इतर लुप्त होणाऱ्या गोष्टीबरोबर कडकलक्ष्मीच गावा गावात येणं कमी झालं.. आणि लोकांना तिची आठवण येईनाशी झाली.. शहरात तर कडकलक्ष्मी अदृष्य झाली...
कोणत्याही गावात गेल्यावर, त्या गावचे व लोकांच्या आरोग्याचे मागणे मागता मागता स्वतःबद्दल मागायचे विसरून गेलेल्या पोतराजाचे कुटुंब, चार दिवस या गावी तर चार दिवस त्या गावी असा प्रवास करत फिरते. उपेक्षित जीवन जगताना सुद्धा समाजाच्या आरोग्याची काळजी वाहत असते...
चौकात ठाण मांडून बसलेल्या पोतराजचा फोटो मोबाईल मध्ये घेऊन... श्रद्धा, अंधश्रद्धा बाजूला ठेऊन त्याची अस्तेवाईक चौकशी केली, त्याची नातवंड आता शाळेत जातात हे ऐकून समाधान वाटलं.... फटाके फोडायचे का, नाही या वादात सुशिक्षितांची दिवाळी चालू असताना, गावच्या मोडकळीस आलेल्या st स्टँड मध्ये, आपल्या आयुष्याची होळी झाली आता लेकरांच्या आयुष्यात दिवाळी येवो अशी आस करणारी कडकलक्ष्मी वास्तव्यास होती... पुरुष असून स्त्री पात्र जगणाऱ्या पोतराजाला घरातील दिवाळीचे गोड धोड  खायला देऊनं... माझ्या मुलाच्या हातून पन्नासची नोट ओवाळणी म्हणून टाकली... त्याने देवाऱ्यातला मोरपिसांचा झाडू काढून दोघांच्या डोक्यावर ठेवला... माझ्या कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना देवीपुढे केली... मग मी ही मनोभावे देवीला वंदन करून... त्याच्या कुटुंबाच्या उपेक्षित, कष्टप्रद जीवनात पुढील दिवाळी आनंदाची, भरभराटीची येऊ दे अस मागणं मागितलं...
समाजातील उपेक्षित घटकांच्या आयुष्यात आनंदाची पहाट येण्यासाठी समाजातील "आहे रे वर्गाने", "नाही रे वर्गाचा" विचार करायला हवा..
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण लहानपणापासून घेत आलो आहे... सर्वांनी सर्वकाळ कष्टप्रद आयुष्य जगणाऱ्या बांधवाप्रति संवेदना दाखवणे गरजेचे वाटते.
....संदीप रामचंद्र चव्हाण

आजचे उत्सव अन बदलती तरुणाई...16/10/17


आजची_तरुणाई_व_उत्सवांचे_बदलते_रूप....
संदिप रामचंद्र चव्हाण.
16 ऑक्टोंबर 2017
भारत हा सर्वात तरुण देश मानला जातो. जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारताचे लोकसंख्येचे सरासरी वय कमी आहे...तरुण आहे. तरुणांचा व उत्सवांचा देश असणारणा भारत एक महाशक्ती होण्याकडे वाटचाल करतो आहे...अश्या वेळी तरुणांची जबाबदारी वाढते.
उत्सवप्रिय आपल्या देशात खूप पूर्वी पासून सण साजरे करण्याची परंपरा आहे. वर्ष्याचे बारा महिने ऋतूनुसार सणांची रचना भारतीय संस्कृतीत आहे. प्रत्येक ऋतूनुसार आहार विहार कसा असावा याचा जणू संदेश सणामध्ये लपला आहे...सर्व कुटुंबीय, पावणे रावळे, नातलग, आप्त, इष्ट मित्र, असा अवघा समाज एकत्र येऊन सण साजरे करताना त्याला उत्सवाचे स्वरूप येते..
समाजाच्या एकोप्यासाठी, माणसा माणसात मैत्रीपूर्ण नातं बनण्यासाठी असे सण उत्सव गरजेचे होते, आहेत व राहतील...
देशातील विविध राज्यांत वेगवेगळे उत्सव पाहायला मिळतात. प्रत्येक राज्याची वेगळी तऱ्हा आहे...

महाराष्ट्रात मोठ्या सण उत्सवात प्रामुख्याने दीवाळी, दसरा, भाऊबीज, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव(नवरात्री), होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा व गावोगावी भरणाऱ्या यात्रा किंवा जत्रा यांचा समावेश होतो. कालांतराने यामध्ये थर्टीफस्ट, फ्रेन्डशिप डे, वेलेंटाइन डे, साखरपुडा, लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादिंचा समावेश झाला आहे. लग्न, साखरपुडा पूर्वी होत नव्हते असे नाही पण त्याला जे सरसकट मोठ्या उत्सवाचे(?) स्वरूप आले आहे ते अलीकडेच.
या सगळ्या सण उत्सवात तरुणाईचा सहभाग, जल्लोष टिपेला असतो. प्रत्येक सण उत्सवांचा इव्हेंट करण्यात राष्ट्रीय आंतराष्ट्रीय कंपन्याना यश आले आहे...असंख्य ग्राहकांची बाजारपेठ समोर ठेऊन व सण उत्सवांचा आधार घेऊन आपल्या प्रॉडक्ट्च अस काही मार्केटिंग केलं जातं की त्याला तरुणाई भुलली नाही तर नवल.
कोठेही नजर टाकली तर कोणत्याही उत्सवातील पावित्र्य हरवत चालले आहे असं वाटतं. नववर्षाच्या सुरवातीपासून ते वर्षाअखेरपर्यंत सगळ्या उत्सवात खा-प्या, मजा करा असा प्रकार दिसतो. डॉल्बीचा कर्कश आवाजात गणपती पुढे नाचणे, गुलालाची उधळण करत रस्स्त्यावर ठाण मांडून गणपतीबरोबर पोलिसांना वेठीस धरने, शिवजयंतीच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, नवरात्रीला गरबा भरवून पैसे कमावणे, गरब्याच्या निमित्ताने मुलींशी जवळीक वाढवणे, थर्टीफस्टला दारू पिऊन रस्स्त्यावर धिंगाणा घालणे, नववर्षाला, दिवाळीला फटाके वाजवून प्रदूषण करणे, फ्रेंडशिपडेला, व्हॅलंटाइनडेला कॉलेजमध्ये धिंगाणा घालणे, गावच्या जत्रेला दारूचा पूर येणे, लग्नासरख्या आयुष्यातील महत्वाच्या कार्यात पैशाचा चुराडा करुन नवीन जीवनाची सुरवात करणे, वाढदिवस म्हणजे जेवणावळी असा काहीसा अर्थ लावणे...असा सगळ्या उत्सवांचा विचका होत आहे... याला काही अपवाद जरूर आहेत पण साधी राहणी उच्च विसारसरणी हे पुस्तकात राहिलं आहे.... कोण कुणाच ऐकत नाही....कुणाबद्दल आदर नाही...बापाला म्हातारं, शिक्षकांना येडपट, मुलींना आयटम म्हणणारे तरुण कॉलेजच्या कट्ट्यावर व गल्लीतल्या वटट्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतात. कोणताही कार्यक्रम, उपक्रम, सण, उत्सव शांततापूर्ण, आनंदी, प्रसन्न वातावरणात होऊ शकतो...त्यासाठी तरुणाईची साथ हवी.
आता दिवाळी सण अगदी सुरवात होण्याची वेळ आली असताना, फटाक्यांच्या वापरावर वाद होऊ लागला आहे. खरे फटाके फुटण्याआगोदर वादाचे फटाके सोशलमीडियावरून फुटू लागले आहेत. दिवाळी ही फक्त फटाक्यांचा सण अस काहीतरी वातावरण तयार होऊ लागले असताना...दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. ही गोष्ट तरुण विसरत आहेत. 

दिवाळी सण प्रकाशाचा, आनंदाचा, चैतन्याचा, स्वछतेचा, मांगल्याचा, एकोप्याचा, प्रेमाचा पण त्याचे रूपांतर फटाक्यांचा व फक्त आवश्यक अनावश्यक वस्तू खरेदीचा सण अस होत असेल तर ते खऱ्या अर्थाने भारतीय सणाचं विद्रुपिकरणच म्हणावं लागेल.
ग्रामसंस्कृतीशी नातं सांगणारे सण, त्याला मार्केटिंग कंपन्यांनी पैसेवाल्यांचे इव्हेंट बनवले आहेत. वर्षभर मिळणारी मिठाई, बाराही महिने चोवीस तास कोणत्याही वस्तू, कपडे लत्ता, हव्या त्या गोष्टी खरेदीची असणारी व्यवस्था व उपलब्ध पैसा त्यामुळे दिवाळीतील फराळाची गोडी व वर्षातून एकदा घेतली जाणारी कपडे याचं आकर्षण व महत्व हरवून गेले आहे...
उन्हाळ्यात अंगमेहनत करून खरिपासाठी शेती मशागत केली जाते. पावसाळ्यात शेतशिवार फुलतो, पिके मोठी होतात, बहरतात. बहुतांशी खरीप पिकं दिवाळीच्या आधी निघतात..धन धान्याच्या रुपात लक्ष्मी घरात येते. ते विकून चार पैसे शेतकर्याच्या गाठीला येतात. पुढील वर्षभर पुन्हा कष्ट करण्याची ताकत येण्यासाठी गोडधोड स्निग्ध पदार्थ केले जात. मुलांना, घरातील लक्ष्मीला नवीन कपडे खरेदी केली जात...लक्ष्मी पूजनाला घरातील झाडू (साळूता) पूजन करुन... जेथे स्वच्छता, आरोग्य तेथे लक्ष्मी वास करते असा संदेश पूर्वापार अशिक्षित लोक देत. पण याचे गांबिर्य संपले आहे..घराची साफसफाई बरोबर मनामनांची साफसफाई करणारा दिवाळी सण व इतर उत्सव त्यांचे बदलते स्वरूप व तरुणांचा त्यातील सहभाग यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
आधी फुकट व आता अनलिमिटेड इंटरनेट मुळे तरुण सामाजिक प्रश्नांना समजून न घेता फोर्वोरडेड खेळ खेळत आहेत.... जेवढाकाही मोकळा वेळ मिळेल तो मोबाईल मध्ये वाया चालला आहे... वाचन, लेखन, खेळ, व्यायाम, समस्यांना, प्रश्नांना भिडणे कमी होऊन, नैराश्याच्या गर्तेत तरुण अडकत आहे... खोट्या प्रतिष्ठेपाई कर्जबाजारी होऊन व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत....काही तरुण आत्महत्तेसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत... समजून घेतले तर सणउत्सव त्यांना उभारी देऊ शकतात...
अशी सगळीकडे नकारात्मक परिस्थिती असताना, काही प्रमाणात आजची तरुण पिढी सणउत्सवांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत...सोशीलमीडियाची मदत कुटुंब जोडण्यात घेतली जात आहे...जुन्या मित्रांचे, पाहुण्यांचे ग्रुप बनत आहेत...एकमेकांना उपयोगी पडत आहेत...कुणासाठी चार पैसे खर्चायला मागेपुढे पहात नाहीत...तरुणांनी ग्रामस्वच्छता, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, पारंपरिक उपक्रम, रक्तदान, अवयवदान, आधुनिक शेती, स्वयंरोजगार, यामध्ये मोलाचे काम चालू केले आहे. सनउत्सवांचे औचित्य साधून काही तरुण, तरुणांचे ग्रुप, संघटना आपल्या वाट्याला आलेला आंनद समाजातील दुर्लक्षित, अनाथ, अपंग यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्सवातील भपका टाळून वाचलेला पैसा दिन दुबळ्यांच्या कल्यानासाठी खर्च करत आहेत... त्याचबरोबर सोशलमीडियावरून व्यक्त होत आहेत... कोण सोबतीला असो अथवा नसो हा अवघड मार्ग चालण्याचा प्रयत्न करत आहेत.... त्यांच्या या वाटचालीतील यशातच उत्सवांचा उत्सव होईल यात शंका नाही...गरज आहे तरुणाईने उत्सव समजून घेण्याची.
ही_दिवाळी_सर्वांच्या_आयुष्यात_आनंदाचा_सुखाचा_ समृद्धीचा_प्रकाश_घेऊन_येवो...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

क्रांतिसूर्य... मला आवडलेले मराठी पुस्तक 15/10/17

अभिमान आहे ज्यांचा असे "क्रांतिसूर्य".......
संदिप रामचंद्र चव्हाण.
15 ऑक्टोंबर 2017
छत्रपतींच्या शौर्याने पावन झालेल्या साताऱ्यात, इंग्रजांची घमेंड उतरवणारा सिंह जन्म घेतो...गनिमी काव्याने गोऱ्याना जेरीस आणुन, प्रतिसरकार स्थापन करतो, व आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही अस्थ होत नाही...अशी शेखी मिरवणाऱ्या इंग्रजांचे गर्वहरण करतो... क्रांतिकारकांचे मेरूमनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची विश्वास पाटील लिखित क्रांतिसूर्य चरित्रात्मक कादंबरी नुकतीच वाचली... त्या बद्दल थोडंस...

गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म घेणारे नाना आताचे सातारा व सांगली व तेव्हाचा फक्त सातारा जिल्हा असणाऱ्या येडेमच्छिंद्र गावचे.  आपलं पोरगं शिकुन तलाठी बनावं, व आपल्या घरदारातील दारिद्र्याच्या अंधकारातून मुक्ती मिळावी असं स्वप्न बाळगणारे नानांचे आई, वडील व आजी यांचा नानांच्यावर खूप जीव असतो.
नाना लहानपणापासून खोडकर व आडदांड स्वभावाचे, हाडापिंडाने एकदम मजबूत, तालमीची आवड असणारे...गरिबीचे चटके सोसत कसेबसे सातवी होऊन तलाठी बनतात...पण त्यांचे मन सत्यशोधकी चळवळीत रमलेलं असत...सुरवातीला सरकारी नोकरी करून सत्यशोधक चळवळीचे काम करायचे...मोठं घरदार, हुंडा नाकारून साध्या पध्द्तीने लग्न केरतात...1925 च्या काळात बायकोला शिकवायचा हट्ट केला...घरच्यांचा विरोध पत्करला...पण पत्नीला लिहायला वाचायला शिकवले.
गांधींच्या काँगेसचे आकर्षण वाटून गावोगाव काँग्रेसचा प्रचार प्रसार चालू केला...साहेबाला हे रुचले नाही... मुलकी पाटलाने शेतसारा उशिरा भरला त्याचा ठपका नानांच्यावर ठेऊन नानांना सस्पेंड केलं...नोकरी गेली त्याच दुःख नव्हतं नानांना, पण चारित्र्यावर चोरीचा डाग लागला त्याने नानांचे हृदय तिळतीळ तुटलं.
तुरुंगवास झाला...गावकरी येड्याचा येडा चोर म्हणून हिनवु लागले...
काँग्रेसच्या तिसच्या आंदोलनावेळी पुन्हा येरवडा वारी झाली...बेचाळीसपर्यंत सर्व मिळून एकूण दहा वर्षे सजा भोगली...पेरॉल वर असताना इस्लापुरला दोन वेळा हजेरी द्यावी लागे... पोटापाण्यासाठी हमाली केली...कपडे नाहीत म्हणून गोणपाट पोत्याची कपडे सुतळीने शिवून घातली...लोक #पोतेबुवा म्हणून टिंगल करू लागले...पण नाना मात्र चळवळीचं काम करतच होते...स्वताच स्वतःच्या सभेची दवंडी द्यायचे...लोक वेडा आला म्हणून चिडवायचे...
एकदा नोकरी गेल्यावर नानांच्या देशकार्याच्या कामाला आता अडथळा नव्हता...अमोघ वक्तृत्वाने नाना गावोगावी फिरून शेतकरी, कष्टकर्यांना जागे करू लागले. तासगावच्या कचेरीवरी युनियन जॅक उतरून #तिरंगा फडकवला, वडूज, इस्लामपूर व इतर ठिकाणी आंदोलनावेळी इंग्रजांच्या फायरिंगमध्ये नानांचे साथीदार हुतात्मा झाले... गांधीगिरीने चाललेल्या आंदोलनावर गोऱ्यानी गोळ्या चालवल्या...मधल्या काळात गावगुंड व गोऱ्यानी मिळून नानांच्या घरावर जप्ती आणली...घरदार, जमीन जप्त केली...मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ सर्वांना गावातून हाकलून दिले....मग मात्र नानांनी हातात तलवार घेऊन गावगुंडांचा बंदोबस्त केला.... पुढे पत्नी गेली, वडीलही गेले..पण नानांना त्यांच्या अत्यविधील जाता आलं नाही...इंग्रजांनी त्यांच्यावर पकड वॊरन्ट काढले...आता नाना सापडतील अशी योजना इंग्रजांनी बनवली...पण नाना वडिलांच्या उत्तरकार्यला येऊन, गोर्यांच्या हातावर तुरी देऊन पळाले...
करो या मरो या आंदोलनात नुसतच मरो हे नानांना मान्य नव्हतं... गोळ्या पेरल्या तर गोळ्याचं उगवतील हा शेतकरी बाणा घेऊन हाती बंदूक धरली...#तुफान_सेना स्थापन केली...#जीडी_बापू_लाड, #क्रांतिवीर_नागनाथअण्णा_नायकवडी अश्या जिवाभावाच्या साथीदारांनी साथ दिली, तुफान सेनेचे नेर्तुत्व केले...बेचाळीसच आंदोलन थंडावले... पण थंड होतोय तो #सातारा कसला...सातारा धुमसत राहिला...आता आपलं सरकार, आपली न्यायालये, आपली सेना, असा काही बेत करुन #प्रतिसरकरची स्थापना झाली...
गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना, जमीन लटणार्यांना, आया बहिणींच्या अब्रूला हात घळणार्यांना पकडून झाडाला उलटे टांगून पायाला पत्र्या ठोकल्या(वेताच्या काठीने चोप दिला)... लोकं सुखावली.
हे काम करण्यासाठी त्याचप्रमाणे शस्त्र घेण्यासाठी व प्रतिसरकार चालवण्यासाठी मिरज पे ट्रेन लुटली, कल्याणचा खजिना धुळ्याजवळ लुटला. प्रतिसरकरचा बोलबाला चर्चिलपर्यंत गेला...इंग्रजांच्या साम्राज्याला साताऱ्यात ग्रहण लागले... युनियन_जॅकचा_सूर्य_साताऱ्यात_मावळला...
पण हे महाराष्ट्रातील त्या वेळच्या गांधी चळवळीतील वरिष्ठ नेत्यांना रुचले नाही...नानांना गुंड म्हणून हिनवले... देश स्वतंत्र झाला...नानांना शेकाप, कम्युनिस्ट असा प्रवास करावा लागला.. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पुन्हा येरवड्याची वारी करावी लागली...संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते...दोन वेळा खासदार होऊनही नाना मात्र साधे होते साधेच राहिले...
आजचे जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय ते आपल्याला खूप सहज मिळालेलं नाही...याची जाणीव अशी चरित्र वाचून होते...स्वातंत्र्याच्या यज्ञात हजारो देशभक्तांच्या आयुष्याची होळी व घरादाराची राखरांगोळी झाली...तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळाले....पण आज सर्वत्र परिस्तिथी पाहता...त्या क्रांतीविराना, त्या क्रांतिसिंहांना, त्या क्रांतिसूर्याना काय वाटतं असेल?? हेचि काय फळ मम तपाला...#क्रांतिसिंह नाना पाटील या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येऊन आपण त्यांना कसे विसरलो?? हा प्रश्न संवेदनशील मनाला पडतो...
क्रांतिसिंह- एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी. त्यांचे लोभस, रांगडे, व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मूलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेण्यासाठी, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा जाऊन घेण्यासाठी वाचा.... #क्रांतिसूर्य
क्रांतिसूर्य- विश्वास पाटील
किंमत- 150 रु
प्रकाशन- मेहता पब्लिकेशन
पृष्ठ संख्या-156

तोत्तोचान.....मला आवडलेले मराठी पुस्तक 8/10/17

मला आवडलेलं पुस्तक....
संदिप रामचंद्र चव्हाण
8 ऑक्टोंबर 2017
"मुलांना शाळेत पाठवताना सगळ्यात खराब कपडे घालत जा"...असे एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले तर आपण त्यांना वेडे ठरवू.
पण असे मुख्यद्यापक होते जपानमधील तोमोई शाळेचे....नाव.. सोसाकु कोबायाशी.

कपडे खराब असले, की मळण्याची किंवा फाटण्याची भीती नसते. कपडे मळण्याच्या किंवा फाटण्याच्या भीतीने मुलं न खेळणं त्यांना लज्जास्पद वाटायचं..
लेखिका तेत्सुको कुरोयानागी उर्फ तोत्तोचान यांच्या तोत्तोचान या बेस्ट सेलर पुस्तकात लेखिकेच्या आयुष्यातील लहानपणीच्या शाळेतील आठवणी आहेत.
तोत्तोचानला ज्या शाळेतून काढून टाकलं तिथे तिला रोज काहीतरी कारणाने शिक्षा होत असे...शाळेने काढून टाकलं होत ही गोष्ट तिला तिची आई 20 वर्षानंतर सांगते..जर तिला हे त्याच वेळी सांगितलं असत तर...तर कदाचित तिचं बालपण कोमेजून गेलं असतं... आपण कोणी वाईट मुलगी आहोत म्हणून शाळेने काढून टाकलं अस बालमनावर कोरल गेलं असत...कदाचित नंतर आवडलेली शाळा तिला आवडली नसती.
तोत्तोचान सारखी खोडकर लहान मुलगीसुद्धा समजून घेतली तर किती बदलू शकते हे या पुस्तकाचा सार आहे.
रेल्वेच्या डब्यात भरणारी शाळा 1937 ला चालू झाली व 1945 ला युद्धात जळून गेली. इतकं कमी आयुष्य लाभलेली शाळा जगाला आदर्श झाली.
मुलांचे ऐकून घेणारे शिक्षक-मुख्याध्यापक, खेळातून संतुलित आहार करायला लावणारे मुख्याध्यापक, रोज सर्वांचा डबा बघणारे व ज्याच्या डब्यात कमी खायला किंवा एकच पदार्थ असेल तर स्वतःच्या पत्नीला इतर पदार्थ द्यायला लावणारे मुख्याध्यापक, जेवताना रोज एका विद्यार्थ्यांला समोर येऊन बोलायला लावून सभाधिटपना गुण शिकवणारे, मुलांना इंट्रेस असेल तो विषय आधी शिकवायला तयार असणारे शिक्षक, रोज जेवनानंतर फिरायला घेऊन जाणारे शिक्षक, श्रमाची प्रतिष्ठा करणारी शाळा, अनुभवातून शिक्षण देणारी शाळा व शिक्षक, अगदी पोहायला सुद्धा शिकवणारे व नेणारे शिक्षक व शाळा, प्रत्येकाचे नाव झाडाला देऊन निसर्गप्रेमी बनवण्याचा केलेला प्रयत्न, भूतांची भीती घालवण्यासाठी स्मशानभूमीची सहल, संगीत कवायत हा नवीन प्रकार चालू करून व्यायाम व संगीत बद्दल आवड निर्माण करण्याचा उपक्रम, खेळाच्या स्पर्धेत नंबर येणाऱ्या मुलांना बक्षीस म्हणून भाज्या(गाजर, बिट, मुळा इ), शारीरिक अपंग मुलांचा आपल्या शरीराबद्दल असणारा न्यूनगंड दूर व्हावा अशा स्पर्धांच आयोजन करणे, अपंग मुलावर चुकून चुकीची कमेंट करणाऱ्या शिक्षिकेला झापणे, मुलांना शेतीचं शिक्षण द्यायसाठी खऱ्या शेतकऱ्यालाच शिक्षक म्हणून शाळेत आणणे, अगदी मुख्याध्यापक यांच्या मांडीवर, खांद्यावर बसण्याचे मुलांना असणारे स्वातंत्र्य..."तू खरोखरच चांगली मुलगी आहेस" असं बोलून लेखिकेला स्वतः बद्दल आत्मविश्वास देणे...आणि युद्धात डोळ्यासमोर नष्ट झालेली शाळा पाहून खचून न जाणारे मुख्यद्यापक...असे सगळे तुम्हाला भेटेल तोत्तोचान या पुस्तकात...
तोत्तोचान...
मूळ लेखिका-तेत्सुको कुरोयानागी
अनुवाद- चेतना सरदेशमुख-गोसावी
प्रकाशन- nbt. india
किंमत- 75 रु(मी घेतले त्या वेळी)
पृष्ठ संख्या-130

गणेशोत्सव दशा आणि दिशा..25/08/17

गणेशोत्सव_काल_आणि_आज....
संदिप रामचंद्र चव्हाण
25 ऑगस्ट 2017
भाऊसाहेब रंगारी गणपती की लोकमान्य टिळक  या पैकी कोणी प्रथम गणेशोत्सव चालू केला हा वाद महाराष्ट्रात चालू असताना आपण त्यात न पडता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार व कृती करणे गरजेचे आहे.

जवळपास सौवाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गणेशोत्सव चालू झाला. एवढी मोठी परंपरा असताना गणेशोत्सव चालू कोणी केला यावर वाद घालण्यापेक्षा गणेशोत्सव कसा सामाजिक जबाबदारीने व पर्यावरण पूरक होईल यासाठी जाणकारांनी शक्ती खर्च केली तर ते समाजाच्या व देशाच्या हिताचे राहील.
गणेशोत्सव ज्या काळात चालू झाला तो काळ म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असणारा काळ. घरातील देव्हाऱ्यात असणारा गणपती व गणेश चतुर्थीला, सार्वजनिक व संघटनात्मक पातळीवर आणण्याचा उद्देशच मुळी लोकांच्यात एकी व इंग्रजांच्या विरुद्ध ही शक्ती उभी करणे असा होता. त्यावेळी एकत्र जमन्यावर बंधी होती. पण धार्मिक गोष्टीत इंग्रज हस्तक्षेप करत नसत.
भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी १८९२ साली ‘भाऊसाहेब रंगारी गणपती’ या नावाने सर्वप्रथम गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.
परंतु भारतीय लोक श्रद्धाळू व धार्मिक असल्यामुळे व इंग्रजांना धार्मिक गोष्टीत लुडबुड करणे परवडणारे नसल्यामुळे टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर कसे साजरे होतील यासाठी प्रयत्न केला. केसरीमधून याची संकल्पना मांडली. व पुढे या उत्सवातून लोकांना एकत्र करुन देशभक्ती जागवली.
कालांतराने देश स्वतंत्र झाला, महाराष्ट्रात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला. यातून नवीन संघटना, सामजिक कामे उभी राहिली. तरुणांचे संघटन झाले. भक्तीला व श्रद्धेला एक सांघिक बळ मिळाले.
देशात एक मानाचे स्थान असलेला गणेशोत्सव म्हणजे समाजातील विविध स्थरातील, वयातील, जातीतील लोकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा राखणारा उत्सव आहे. घरचं काम समजून रात्र-दिवस, ऊन-पाऊस न पाहता मंडळाचं काम करताना तरुण झटत असतात. त्यातून एक मेकाप्रति आदर, प्रेम, आपलेपणा वाढतो. माझे मंडळ, माझ्या मंडळातील सदस्य हे आपले वाटतात.
यातून नवीन नेतृत्व तयार होत. संघटन बांधणी, सगळ्यांना सामावून घेऊन पुढे न्यायचे, सुख दुःखात साथ द्यायची ही भावना तरुणाच्या मनात निर्माण करणारा गणेशोत्सव आज वेगळ्या टप्प्यावर पोचला आहे.
काळ बदलला व गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. काळाप्रमाणे बदल हवा व त्याचे स्वागतही हवे. पण सर्वजनीक गणेशोत्सवाचे आनंददायी व भक्तिभावाचे वातावरण जाऊन त्याला व्यावसाईक व हिडीस स्वरूप आले...व ते एवढे वाढले की वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणे चालू झाले. व ही खंडणी न देणाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली....एकूणच आनंददायी, भक्तीभावणे, उदात्त हेतूने चालू झालेला गणेशोत्सवात कर्कश आवाज, सार्वजनिक रस्ते अडवणे, चांगले रस्ते उकरने, खड्डे काढणे, उत्सव संपल्यावर ते तसेच सोडून देणे. विरोध केला की धर्मद्रोही ठरवणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, डॉल्बी लाऊन हीडीस गाण्यावर नाचगाने करणे, हानिकारक गुलालाची उधळण करणे, मिरवणूक भरपूर वेळ चालवणे, पोलिसांना व जनतेला वेठीस धरणे अश्या एक ना अनेक कारणाने गणेशोत्सवाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भाव निर्माण व्हायला लागला.
पोलीस सुध्दा माणूस असतो हे सार्वजनिक उत्सव करणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यालाही वाटते आपल्या प्रियजनाबरोबर अशा उत्सवांचा आनंद घ्यावा, पण फक्त सर्वांच्या सुरक्षेसाठी व उत्सव व्यवस्थित पार पडावा म्हणून तो ड्युटी करत असतो. याचे किमान भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
एका गावात, गल्लीत, शहरात किती सार्वजनिक मंडळे असावीत याचा काहीच हिशेब नाही. गल्लोगल्ली मंडळेच मंडळे. प्रत्येक राजकीय महत्वकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीला गणेशोत्सव मंडळ म्हणजे राजकारणात यायचा राजमार्ग वाटायला लागला व तिथेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वाट लागली. कोना एका व्यक्तीच्या दावणीला विशिष्ठ मंडळे बांधली गेली.
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे समाजहिताच्या कामासाठी आग्रही असतात व तशी कामे करतात. पण बरीच मंडळे अजून चूकीच्या पध्द्तीने कामकाज करतात, राजकीय नेतृत्व किंवा सरकार या बाबत त्यांचे कान उपटण्याचे धाडस दाखवत नाही.
गणपती मूर्ती कोणत्या प्रकारची व कोणत्या मटेरियलची असावी, किती उंचीची असावी व त्या पासून पर्यावरण हानी होऊ नये या बद्दल अनेकांची जनजागृती चालू आहे. व लोकांच्यात त्या बद्दल जागृती वाढत आहे. पण कृत्रिम हौदात मुर्ती विसर्जनाला विरोध किंवा त्या मुळे अत्यंत नाजूक असलेल्या भावना दुखावणे हा एक नवीन वाद अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे.
मुळात आपल्या भावना एवढ्या नाजूक नसाव्यात की त्या लगेच दुखावतील. निसर्ग जर परमेश्वराणे निर्माण केला असेल तर त्या निसर्गाची हानी होणे त्याला आवडेल का? तीही त्याच्याच मूर्तीने. मला वाटते त्यालाही ते आवडत नसावे....पण त्याला बोलता येत नसल्यामुळे, मुकी बिचारी कुणीही हाका अशीच त्याची अवस्था झाली आहे.
हिंदू धर्मातील सण उत्सव खूप चांगले व वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे आहेत. प्रत्येक सण उत्सवसमागे काहींना काही चांगला हेतू, उद्देश आहे.
गणेशोत्सव सुद्धा खूप लोकप्रिय, तरुणाईचा भरपूर सहभाग, जोश, जल्लोष असणारा असा उत्सव आहे. थोडासा भरकटला आहे पण तुम्ही आम्ही, समाजातील जबाबदार धुरणींनी जर आपापल्या पातळीवर प्रयत्न केला तर नक्कीच आशादायक चित्र बघायला मिळेल.
बरीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक काम करतात व प्रत्येक वर्षी त्यात वाढ करतात.
खेड्यापाड्यात व शहरात बेरोजगारी वाढली आहे. तरुण तरुणी मोबाईल, इंटरनेट, सोशलमीडिया, वेगवेगळी व्यसने, नैराश्य याने ग्रासली आहेत. शहरातील वेगळे तर ग्रामीण भागातील वेगळे प्रश्न आहेत. काममधंदा, नोकरी नसल्यामुळे तरुणांची लग्न ठरत नाहीत. त्यातून कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत. असे एक ना अनेक सामाजिक प्रश्न असताना तरुनांच्या मनाला उभारी देणारा, थोडंस नैराश्य विसरायला लावणारा गणेशोत्सव गरजेचा आहे...पण त्याला चांगल्या विचारांची व चांगल्या कृतीची बैठक हवी. याचे भान तरुणांना व समाजाला यायला हवे.

Thursday 14 December 2017

आर्थिक नियोजनातील टप्पे 30/07/17

आर्थिक_नियोजनातील_टप्पे...
संदिप रामचंद्र चव्हाण
30 जुलै 2017

दाम करी काम अशी आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे. फक्त तीन शब्द पण या तीन शब्दात जन्मापासून मृत्यूपर्यंत पैसा किती महत्वाचा आहे हे दिसुन येते. मनुष्याला जीवन जगण्यासाठी किमान अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता करावी लागते. त्याच बरोबर चौथी व आताच्या जगात जगण्यासाठी  शिक्षण ही सुद्धा मुलभूत गरजच मानवी लागेल. तर या गरजा पूर्तीसाठी गरज असते पैशाची...
पूर्वी समाजात चार वर्ण होते...आता सामाजातील आर्थिक स्थर पाहता अती गरीब ते अती श्रीमंत असे नवीन वर्ण म्हणजेच स्थर तयार झाले आहेत....अतिशय गरीब, गरीब, सामान्य, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत असे नवीन आर्थिक स्थर तयार झाले आहेत. या आर्थिक स्थरानुसार आहेरे व नाहिरे असे वर्ग तयार झाले आहेत. या स्थरांच्या आर्थिक गरजा, आर्थिक समस्या वेगवेगळ्या आहेत.
आज देशातील व जगातील काही कोटी लोकसंख्या एकवेळ पोटाला खाऊन एक वेळ उपाशीपोटी झोपते. तर काहींना एकवेळ सुद्धा अन्न मिळणे मुश्किल असते.
तर दुसरीकडे खाऊन खाऊन अजीर्ण होऊन माणसं मरतात अशीही बातमी येते..
जे अन्न मिळवण्यासाठीचे हाल तेच वस्त्र व निवारा या गरजांचेही...मग शिक्षण तर दूरची गोष्ट.
तरीही आजच्या घडली आर्थिक नियोजन या विषयावर चरच्या होणे गरजेचे वाटते, प्रत्येकाकडे जो काही पैसा उपलब्द असतो त्या नुसार आर्थिक नियोजन कसे असावे या बद्दल बोलू..
आर्थिक नियोजन करताना चार टप्पे किंवा गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. विमा, सेव्हिंग, गुंतवणुक व कर्ज
१) इन्शुरन्स (विमा):- यात उपप्रकार आहेत. जीवन विमा व आरोग्य विमा
अ) जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स मध्ये पारंपरिक विमा व टर्म इन्शुरन्स (प्युअर इन्शुरन्स) असे दोन प्रकार आहेत. कुटुंबातील कमावती मुख्य व्यक्तीचा अचानक नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यु झाला तर त्या कुटुंबाच न भरुन येणारे नुकसान होते. मुलं लहान असतील तर त्या कतुंबतील स्त्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आर्थिक खर्च व आर्थिक आघाडी कशी संभाळायची ही होय. या साठी प्रत्येक कुटुंब प्रमुखाने मोठ्या रकमेचा जीवन विमा काढणे गरजेचे आहे.
पारंपरिक जीवन विमा यामध्ये पॉलिसी म्याच्युअर झाली किंवा विमा असणारी व्यक्ती नैसर्गिक किंवा अपघातात मरण पावली तर पॉलिसीचे पैसे मिळतात. पण ही मिळणारी रक्कम महागाईनुसार पुरेशी असते का हा प्रश्न आहे. सर्वसाधारण एक लाखाच्या विम्याला (म्हणजे मिळणारे 2 लाख) 5 हजारच्या आसपास हप्ता बसतो(वय 25 च्या आसपास). मग वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट मिळण्यासाठी वार्षिक किती रक्कम हप्ता म्हणून भरावी लागेल? याचा विचार होणे गरजेचे आहे
शिवाय विमा काळात विमा धारक व्यक्ती आरोग्यपूर्ण व व्यवस्थित आहे अस मानलं तर पॉलिसी म्याच्युअर झाल्यावर मिळणारी राशी ही 4 ते 5% व्याज दराने मिळते.
म्हणुन टर्म इन्शुरन्स म्हणजेच प्युअर इन्शुरन्स याचा विचार होणे गरजेचे आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे ज्याने हा इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्या वारसाला हा फक्त त्या विमा धारकाच्या मृत्युनंतरच मिळतो. किंवा कायमचे अपंगत्व आल्यास काही रक्कम मिळते. यात इन्शुरन्स कव्हर जास्त व हप्ता कमी असतो. एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी टर्म इन्शुरन्स काढला व 30 वर्ष मुदत ठेवली तर त्याला ठरलेला हप्ता 30 वर्ष भरावा लागेल. 30 वर्ष कालावधीत तो व्यक्ती जिवंत राहिला तर रिटर्न एकही रुपया मिळत नाही. पण हा व्यक्ती इन्शुरन्स चालू असताना  त्याचा मध्येच अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर विमा रक्कम मिळते.
हा टर्म इन्शुरन्स वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट असावा.
म्हणजे वार्षिक 3 लाख उत्पन्न असेल तर 30 लाखाचा इन्शुरन्स असावा व हप्ता 5 ते 6 हजार प्रति वर्ष बसेल.
(येथे आपण इन्शुरन्स काढतानाचे वय 25 वर्ष अस गृहीत धरले आहे)
शुद्ध विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स म्हणजेच प्युअर इन्शुरन्स ही गरजेची गोष्ट आहे...आर्थिक नियोजनातील ती पहिली पायरी आहे. विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे हे प्रत्येकाने ध्यानी धरले पाहिजे.
ब) आरोग्य विमा:- आजकाल खाजगी,सरकारी सर्व स्थरात कायम स्वरूपी काम करणाऱ्या व्यक्तीला आरोग्यविम्याचे कवच मिळते किंवा त्या त्या संस्थांची हॉस्पिटल असल्यास तिथे उपचार मिळतात.
पण असंघटीत क्षेत्रात, शेती व्यवसायात, व्यपारी किंवा इतर सर्वसामान्य व्यक्ती की ज्यांना असा आरोग्य विमा स्वतःला काढावा लागतो त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करु नये.
कुटुंबातील प्रत्येकाला स्वतंत्र किंवा सर्वांना संख्येनुसार एकत्रित (फ्लोटर प्लान) आरोग्य विमा घ्यावा.
आरोग्य विमा पुरवणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत त्यांच्या नियम अठी पाहुन, कोणते आजार समाविष्ट आहेत, कोणते नाहीत, आता असणाऱ्या आजाराच्या उपचाराला पैसे मिळणार का, बाळंतपणासाठीच्या खर्चाची त्या मध्ये तरतूद आहे का?, कॅशलेस हॉस्पिटलची यादी हे सर्व बारकावे पहावे. आजच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चाचा विचार व आपले उत्पन्न पाहून हा विमा घ्यावा.
वरील दोन्ही प्रकारचे विमा काढताना विमा धारकास कोणता आजार किंवा व्यसन असल्यास लपवू नये...नाहीतर क्लेम सेटलमेंट वेळेस अडचणी येऊ शकतात.
२) सेव्हिंग
आता आर्थिक नियोजनातील पुढचा व महत्वाचा टप्पा म्हणजे सेव्हिंग म्हणजेच बचत.
आपण रोजचे आयुष्य जगत असताना रोजचा खर्च करुन जो पैसे शिल्लक राहिल त्याचे सेव्हिंग करतो. म्हणजे आधी खर्च मग सेव्हिंग... जगातील सर्वात मोठे गुंतवणुकतज्ञ वॊरेन बफेट म्हणतात आधी सेव्हिंग करावी व मग राहिलेला पैसा खर्च करावा.
आपल्याला रोजचा खर्च सोडून आपत्कालीन खर्च, लग्न, मुंज, जावळ, जत्रा, पाहुणे- राऊळे, छोट्या सहली, आवढीची गॅजेट, विम्याचे हप्ते इत्यादी साठी आपल्याला पैसा लागतो या साठी सेव्हिंग महत्वाची असते. तज्ञानच्या मते वार्षिक उपन्नाचा 10 ते 15 टक्के सेव्हिंग करावी. ही गुंतवून घरी, बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर, FD, RD, इत्यादी मध्ये असावी याला व्याजदर कमी असले तरी तरलता म्हणजे लिक्विडीटी जास्त असते असपणाला हवे तेव्हा अगदी थोड्या कालावधीत हे पैसे मिळू शकतात.
सेव्हिंग साठी काही अनावश्यक गोष्टी टाळणे गरजेचे आहे. त्यात व्यसने, गरज नसताना व अनावश्यक शॉपिंग, इ.
त्याच प्रमाणे नुसते पैसे साठवायचे म्हणुन मन मारण्यातही अर्थ नाही. वर्षातून एकदा दोनदा कुटुंबासोबत छोट्या सहली, गरजेची गॅजेट, परिपूर्ण आहारासाठी गरजेचे खाद्य समान, इ.
आयुष्य जगताना कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे हे समजून उमजून घेतल्यास व गरजा कमी असल्या की पैसा व वस्तू कमी लागतात हे समजल्यास जीवन सुकर होण्यास मदत मिळते. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही जीवनपध्द्ती अवलंबल्यास आर्थिक घडी व्यवस्थित बसु शकते. व यातुन सेव्हिंग होऊ शकते.
पण हे सेव्हिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट मानू नये. ही फक्त साठवणूक मानावे. आपत्कालीन निधी म्हणुन वार्षिक उपन्नाच्या 50% पैसे सेव्हिंग अकाऊंट किंवा त्वरित मोडता येईल अशा FD, लिक्विड फंड मध्ये असावा
३) इन्व्हेस्टमेंट
आर्थिक नियोजनातील पुढचा व सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) होय.
रिटायरमेंट प्लॅनिंग, म्हातारपणी खर्चासाठी पैशाची तरतूद, मुलांचे उच्च शिक्षण व लग्न, घर, चारचाकी गाडी व देश विदेशात सहली इत्यादी मध्यम व दीर्घ पल्ल्याची ध्येय(गोल) असतात व प्रत्येकाला म्हातारपण हे नक्कीच येते त्यामुळे त्यावेळेसाठी खर्चाची तरतूद म्हणून तरुणपणातच थोडी थोडी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
आता ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारात करता येते. दीर्घ मुदतीच्या बँक FD, PPF, सोने, म्युचुअल फ़ंड, विविध कंपनीचे शेअर्समध्ये थोडी थोडी पण नियमित गुंतवणूक केल्यास दीर्घ पल्याची ध्येय गाठता येऊ शकतात.
जमीन ही गुंतवणूक होऊ शकते पण त्यासाठी एकरकमी मोठी गुंतवणूक करावी लागते व हे सर्वांना शक्य होत नाही.
आता वरील वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायातील मिळणारे रिटर्न्स व गुंतवणुकीतील रिस्क वेगवेगळी आहे.
सोनं-चांदी-प्लॅटिनम अशा धातुमध्ये वार्षिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त गुंतवणूक नसावी. शिवाय सोने चांदी बाळगणे किंवा जवळ ठेवणे आजकाल धोक्याचे झाले आहे. बँक लॉकर उपलब्ध आहेत पण त्यालाही काही चार्जेस लागतात.
बँक FD हा सध्या 6 ते 7% रिटर्न मिळणारा सर्वात जास्त सुरक्षित पर्याय आहे. पण महागाईचा दर बघता (इन्फलेशन रेट 5% पकडल्यास) मिळणारे व्याज हे महागाई दरा एवढेच आहे हे लक्षात येते,मुद्दल वाढली तरी त्याचे मुल्य तेवढेच राहते. म्हणजे समजा आज एक लाख रुपये  दामदुप्पट योजनेत गुंतवले तर सर्वसाधारण 9 ते 10 वर्षानंतर मिळणारे दोन लाख हे आजच्या एक लाखाएवढेच असतात.
PPF हा पर्यायही चांगला आहे हे खाते कुणीही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात काढू शकतो. याला 8 ते 9% च्या दरम्यान व्याज मिळते व हे व्याजदर सरकार वेळोवेळी ठरवते. या खात्यात वर्षाला 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतो ही गुंतवणूक 15 वर्ष मुदतीची असते. (नोकरी करणाऱयांसाठी PF असतो)
आता म्युच्युअल फ़ंड मध्ये गुंतवणूक ही सर्वात प्रभावी व जास्त रिटर्न्स देणारी ठरत आहे. ही गुंतवणूक एकरकमी किंवा महिन्याला करु शकतो. प्रत्येक महिन्याला अशी गुंतवणूक केल्यास त्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्वेसमेंट प्लॅन असे म्हणतात.
ज्यांना शेअरमार्केटचे ज्ञान नाही अशांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास त्या त्या फ़ंडचे फ़ंड मॅनजर योग्य त्या कंपनीत इन्वेसमेंट करतात. व याच्यावर सेबीचे नियंत्रण असते.
जर दीर्घ (15 ते 20 वर्षे) मुदतीची गुंतवणूक असेल तर सरासरी 15 ते 20% रिटर्न्स मिळू शकतात. हे 100% खात्रीशीर नसले तरी आज फक्त भांडवली बाजारातील इन्वेसमेंट फक्त एवढे रिटर्न्स देऊ शकते.
म्युच्युअल फ़ंड मध्ये वेगवेगळे प्रकार व अनेक फंड आहेत ते जाणकारांकडून समजून घेणे जरुरी आहे.
ज्यांना शेअरमार्केटचे ज्ञान आहे व ज्यांची रिस्क घेण्याची क्षमता आहे अशांनी थेट चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करणे ही सुद्धा चांगली गुंतवणूक ठरु शकते.
आज आपल्या देशाची ग्रोथ पाहता निफ्टी व सन्सेक्स याची वाटचाल निश्चित आशादायक आहे.
तर गुंतवणूक ही कधीही एका असेट म्हणजे एकाच प्रकारात असू नये, ती नेहमी डायव्हर्सिफाइड असावी. म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
गुंतवणूक करताना कधीही चितफ़ंड सारख्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू नये. अलीकडेच पर्ल्स, पॅनकार्ड क्लब, केबीसी, कल्पवृक्ष, इत्यादी कंपन्यात गुंतवणूकदार कसे फसले आहेत हे लक्षात येते. अशा कंपन्यांचे एजेंट हे नेहमी ओळखीचे असतात त्यामुळे त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या बोलण्यावर सर्वसामान्य विश्वास ठेवतात. काही वेळा एजेंट असणार्यांनाही त्या बद्दलची पूर्ण माहिती नसते.
४)कर्ज:-
आर्थिक नियोजनात कर्ज किती असावे किंवा किती काढावे हे सुद्धा महत्वाचे आहे. आजच्या घडीला मोटरसायकल, चारचाकी, tv, मोबाईल, लॅपटॉप अश्या व इतर चैनीच्या वस्तु झिरो डाऊन पेमेंट व EMI वर मिळतात. त्याच प्रमाणे फ्लॅट साठीही मोठे कर्ज मिळते. उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेण्याचे प्रमाणही जास्त आहे. एकावेळी अनेक प्रकारची कर्ज म्हणजे एका न दिसणाऱ्या संकटाला लोक आमंत्रण देतात.
*हांतरुन पाहून पाय पसरावे* ही म्हण जनमानसात रुजली ती उगाच नाही. आपल्या कुवतीपेक्षा जास्त कर्ज व EMI झाले की व्यक्ती नैराश्याने ग्रासला जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिगत आरोग्यावर व कौटूंबिक वातावरणावर पडतो. पैशाच्या येण्यापेक्षा जाणे वाढले की चीड चीड, वादावादी,भीती, नैराश्य वाढते. यातुन कुटुंबाचे स्वास्थ बिघडते. नवरा बयकोची भांडणे, बाप लेकांची भांडणे होतात. यातुन घटस्फोट, मारामाऱ्या, खुन व आत्महत्या सारखे गंभीर प्रश्न निर्माण होतात. या सर्वाचा परिणाम कुटुंबातील लहान मुलांवर होतो, त्याच्या शिक्षणावर होतो. एकूणच कुवतीपेक्षा मोठे कर्ज व्यक्तीची समाजातील पत व घरातील स्वास्थ घालवण्यासाठी कारणीभूत आहे.
कर्ज हे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या चार ते पाच पट असावे. त्या पेक्षा जास्त नसावे, अस अर्थशात्रातील तज्ञानचं मत आहे.
५)सामाजिक जबाबदारी:-
आता आर्थिक नियोजनात अजुन एक टप्पा आहे पण याकडे दुर्लक्ष होते किंवा सर्वजण याचे नियोजन करत नाहीत. तोे म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही भाग(2ते5%) खर्च आपण सामाजिक भान किंवा समाजातील दिन-दुबळ्यांसाठी, अपंग- अनाथांसाठी, सामाजिक उन्नतीसाठी करतो का? किंवा तसे नियोजन करतो का? हा प्रश्न आहे.
प्रत्येकाचा आर्थिक स्थर वेगवेगळा असतो व आहे. पण प्रत्येकाने आपल्या आर्थिक स्थरानुसार रोजचा खर्च, विमा, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, कर्ज, सामाजिक जबाबदारी इत्यादींमध्ये योग्य प्रकारे नियोजन केल्यास भविष्यातील मार्ग सुकर होऊ शकतो.
सर्वसाधारण पणे एकूण उपन्नाच्या तीस टक्के खर्च रोजच्या दैनंदिनी गरजांवर करावा, तीस टक्के भविष्यातील तरतूद म्हणून गुंतवणूक करावी, तीस टक्के आपल्या जबाबदऱ्यांवर म्हणजे मुलांचे शिक्षण, आरोग्य, लग्न इ व राहिलेला दहा टक्के खर्च आवडीच्या गोष्टींवर करावा.
जगद्गुरू संत तुकारामांनी म्हातारपणाचे त्यांच्या अभंगात अगदी यतार्थ वर्णन केले आहे....
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे |
     अंत हे काळीचे कोणी नाही ||
     जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती |
      सांडोनि पळ्ती रांडा पोरे ||
      बाईल म्हणे खरे मरता तरी बरे |
      नासिले हे घर थुंकोनिया ||
     तुका म्हणे माझी नसतील कोणी |
      तुज चक्रपाणी वाचूनिया ||
शेवटी पैसा असेल तर दुनिया विचारते, किंमत देते. आणि तो नसेल तर घरातील लोक सुद्धा किंमत देत नाहीत. व्यवस्थित आयुष्य मिळाल्यास सर्वाना म्हातारपण येणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे लक्षात ठेवल्यास म्हातारपण आनंदी जावे यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे... व अकाली बोलावणं आलं तरीही आर्थिक नियोजन गरजेचे आहे हे लक्षात ठेवल्यास कुटुंबाची आपल्या पश्चात व आपली म्हातारपणात ससेहोलपट काही प्रमाणात निश्चित कमी होईल.
आपली ही अवस्था टाळायची असेल व मरेपर्यंत मानसन्मानाणे जगायचे असेल तर आर्थिक नियोजन गरजेचे आहे....
व त्याची सुरवात आजपासूनच का नको???
ग्रामीण भागात आर्थिक नियोजनाला जास्त महत्व दिले जात नाही, तुटपुंज्या उपन्नात सर्व भागवावे लागते...प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते पण जशी आहे त्यातही नियोजन बहुदा नसते...(काही पैसेवाले गुंतवणुकीचे नियोजन करतात पण या कानाचे त्या कानाला कळू देत नाहीत)
या विषयी माझे स्वताचे अनुभव काही वाचनातील माहिती व तज्ञानचं ऐकलेली लेक्चर यातून वरील माहिती लिहली आहे...
मी आर्थिक नियोजन किंवा अर्थशास्त्र यातील तज्ञ नाही
माझी सर्व मते जशीच्या तशी योग्य नसतील पण एक प्रयत्न केला आहे... चुकीचा मुद्दे वाटल्यास त्यावर भाष्य करा..

तंबाकुचे_व्यसन_आणि...23/07/17

तंबाकुचे_व्यसन_आणि_तेरा_रुपये
संदिप रामचंद्र चव्हाण
23 जुलै 2017

गायछाप तेरा रुपयाला झाली भाऊ...गरिबांनी सकाळचा नैसर्गिक विधी कसा करावा.... अशा आशयाचा मेसेज सोशीलमीडियावरून फिरत आहे...गमतीचा भाग सोडला तरी तंबाकू किंवा तंबाकुजन्य गोष्टींचे व्यसन समाजात किती खोलवर रुजले आहे हेच यावरून दिसून येते.
तंबाकुच्या शेतीची मोकाट जनावरांपासून सुरक्षा करावी लागत नाही, कारण कोणतेही जनावर तंबाकुला तोंड लावत नाही. अगदी गाढव सुद्धा नाही... मग... तंबाकुला गाढवच तोंड लावत नाहीत किंवा  तंबाकुला तोंड न लावणारे गाढव असतात का?? असा प्रश्न एखाद्या तंबाकू प्रिय व्यक्तीला पडला तर तो त्याचा दोष न मानता त्याच्या विचारांच्या उंचीचा मानावा.
तंबाकुचे किंवा तंबाकू जन्य गोष्टींचे त्यात सिगारेट, बिडी इत्यादिंचे व्यसन, त्याचे दुष्परिणाम या बद्दल वेळोवेळी खुप लिखाण, माहिती, व प्रसिद्धी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे..पण तो कायदा धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते. तंबाकुच्या पिचकाऱ्या रस्तोरस्ती व कोपऱ्याकोपऱ्यात टाकल्या जातात. यातून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
आज तंबाकू बद्दल लिहावे असं वाटलं त्याला कारण म्हणजे व्हाट्स वर फिरणारा मेसेज व त्याची खात्री म्हणून पाणपट्टीवर गायछापची 16 ग्रॅम वजनाच्या तंबाकुची पुडी 13 रुपयाला व  कोणत्यातरी कंपनीची 9 ग्रॅम चुना पुडी 1 रुपयाला आहे हे पाहिले... ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची गाडी विचारा कशाला या म्हणी प्रमाणे तंबाकू, सिगारेट, गुटका, दारु या जगप्रसिद्ध वस्तुंच्या चालू ब्रँडबद्दल व लेटेस्ट किमतीबद्दल माझे बरेच अज्ञान आहे.
सर्वसाधारण सर्व तंबाकू कंपन्यांच्या तंबाकू पुडीची किंमत याच दरम्यान असेल असं मानुया. सिगारेटची किंमत जास्त आहे एका सिगारेटची किंमत 13 ते 15 रु पर्यंत आहे. अजूनही महागड्या सिगारेट, सिगार आहेत. पण सर्वसमान्य आर्थिक स्थर असणाऱ्या वर्गातील बहुसंख्य लोकसंख्या या किमतीच्या सिगारेट व 10 ते 15 रु किंमतीची तंबाकू पुडी घेण्यावर भर देतात. त्याच प्रमाणे गुटका, मावा हे व्यसन करणार्याणीची संख्या सुद्धा असंख्य आहे. गुटक्याच्या पुडी की ज्याला पाण मसाला हे गोंडस नाव दिले आहे याची किंमत पाच रुपये ते साठ रुपयापर्यंत आहे अशी माहिती खाणारे देतात.
सर्वसाधारण रोज एक तंबाकुची पुडी संपवणारा महिना 400 ते 450 रुपये, तर वार्षिक 5 हजारच्या आसपास खर्च करतो. दिवसला चार ते पाच सिगारेट ओडणारे दिवसाला 50 ते 75 रु खर्च करतो म्हणजे महिना दीड ते दोन हजार व वार्षिक 20 ते 24 हजार खर्च करतात. गुटखा खाणारे वार्षिक 5 ते 15 हजार खर्च करतात.
वरील खर्च करणारे हे आर्थिक परिस्थिती बेताची असणारे आहेत. उंचे लोग उंची पसंद असणारे या पेक्षा खूप पैसा तंबाकुजन्य व इतर उंची व्यसनावर खर्च करतात.
तंबाकू व गुटखा हे व्यसन ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर दिसते, तर सिगारेट व गुटखा हे व्यसन शहरी भागात जास्त प्रमानात दिसते. गुटक्याने सर्वत्र सर्वमान्यता मिळवली आहे असेच यावरून दिसते.

तर चर्चेचा मुख्य मुद्दा असा की तंबाकुजन्य व्यसन करणारे महिना पाचशे ते दोन हजार रु स्वतःच्या व्यसनावर खर्च करतात, कुठेही थुंकतात, स्वताच व इतरांचं आरोग्य धोक्यात घालतात. पण घरातील लहान मुलांना चांगला सकस आहार मिळावा व त्यासाठी महिन्यातून काही वेळा त्यांना फळं, काजू, खारीक, बदाम, अंजीर, तुप, सकस आहारासाठी लागणारे इतर घटक इत्यादी खायचे पदार्थ मिळावे किंवा आणून द्यावे असं त्यांना वाटतं नाही. त्यावेळी हे खाण पैसेवाल्यांचं गरिबाला कुठलं काजू आणि बदाम असा सूर लावला जातो. तेच इतर शालोपयोगी वस्तूंच स्वतःच्या तंबाकुला 500 रु असतात पण मुलांच्या बसपासाठी, वह्या,पुस्तके, दप्तर, शुज, सायकल घेण्यासाठी  पैसे नसतात.
आठशे ते नऊशे रुपये किलो तंबाकू, काही हजार रुपये किलो गुटखा, काही शे रुपये लिटर दारु घेताना महागाईचा विचार होत नाही. पण 50 रु लिटर दुध घेताना, 200 रु किलो खारीक घेताना, 600 रु किलो काजु  बदाम घेताना, 500 रु किलो तूप घेताना हा विचार केला जातो व महाग म्हणून घेण्याचे टाळले जाते. त्यावेळी हे व्यसन स्वतःला किती आत्मकेंद्री करते व आरोग्यास घातक गोष्टीसाठी आपण खर्च करतो पण मुलांच्या आरोग्यपूर्ण वाढीच्या गरज असणाऱ्या गोष्टीसाठी मात्र पैसा नसतो. याला काय म्हणावे...

त्याच प्रमाणे घरातील गृहलक्ष्मीला या वर्षाचे त्या वर्षाला साडी चोळी घेतली जाते... तिला ही कधीतरी सुखद धक्का देऊन एखादे आवडीचे गिफ्ट दिले तर संसारात अजुन रंगत येईल..मग ते कपडे असोत, संसारसाठीच्या वस्तू असोत,अथवा अन्य काही ...तर हे तंबाकू गुटक्याचे पैसे सत्कारणी लागल्यासारखे होतील.
त्याच प्रमाणे आजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिक नियोजनाला खूप महत्व आहे. या व्यसनात वाया जाणारा पैसा जीवन विमा, म्युच्युअल फ़ंड, आरडी मध्ये गुंतवला तर काही वर्षांनी लखपती होण्याचे भाग्य मिळेल.
आपण आपली आर्थिक परिस्थिती नसताना आरोग्यास घातक व्यसनावर किती पैसा खर्च करतो आणि एखाद्या सामाजिक कामावर किती?? हे एखादा स्वतःस विचारणे गरजेचे आहे...
वाचा विचार करा...शेवटी पैसे तुमचे, आरोग्य तुमचे, व कुटुंबही तुमचं आणि व्यसनही तुमचेच....काय ठेवायचे काय सोडायचे...कशाला महत्व द्यायचे हे ठरवण्याइतप्त तुम्ही सुज्ञ आहात.
(आर्थिक परिस्थिती नाजुक आहे, कष्ट करुन घर संसार चालवतात पण कोणतेही व्यसन करत नाहीत त्याच्यासाठी यातील कोणतीही गोष्टी लागु नाही)

Wednesday 13 December 2017

चिनी वस्तू व आपले देशप्रेम 14/07/17

चिनी_वस्तू_व_आपण...
संदिप रामचंद्र चव्हाण.
14 जुलै 2027

इंग्रजांच्या प्रदिर्घ काळच्या सत्तेच्या जोखडातून, असंख्य क्रांतिकारकांच्या रक्तातुन, अनेक देशवासीयांच्या त्यागातुन आपल्या देशाला १५ऑगस्ट१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व जनतेचे एक समान ध्येय होते...देशाला स्वतंत्र करायचे...
देश स्वतंत्र झाला...राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाला...हळू हळू साक्षर व सक्षम झाला...प्रगतीचे, विकासाचे वारे सर्वत्र वाहु लागले. तंत्रज्ञान घराघरात जाऊन पोचले ....पण हे सर्व होताना बहुसंख्य लोक मानसिक गुलामगिरी विसरले नाहीत किंवा वंश परंपरागत ती पुढल्या पिढीत जशी आहे तशी किंवा जास्तच रुजत गेली.
जेजे परकीय तेते चांगले व भारतीय, स्वदेशी ते टाकाऊ अशी विचारसरणी असणारी जमात या देशात तयार झाली. आज देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीतील लोक हयात नाहीत, असले तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतप्त असतील. आज जी पिढी तरुण आहे त्यांना हे स्वातंत्र्य कोणत्याही त्यागाशिवाय, कष्टाशिवाय मिळाले आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना त्याचे मोल वाटेनासे झाले आहे...
देशात आज जी चिनी वस्तुंची रेलचेल व त्या खरेदी करण्यावर तुटून पडलेले भारतीय पाहता..चर्चिलच्या वाक्याची आठवण झाल्याशिवास राहत नाही. भारताला सातंत्र्य देताना चर्चिल बोलला होता...अरे यांना स्वातंत्र्य देऊ नका, हे त्या योग्यतेचे नाहीत...ही फक्त मोठी लोकसंख्या आहे...राष्ट्र नव्हे. India is not a nation, it is huge population.
(“Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would be taxed in India”.
अर्थात--“सत्ता धूर्तों, दुष्टों और बदमाशों के हाथों में जाएगी, भारत के सभी नेता कम क्षमता और सूखी घास जैसे लोग हैं। इनके पास मीठी जुबान और मूर्खता भरे दिल हैं। ये सत्ता के लिए आपस में लड़ेंगे और भारत राजनैतिक झगड़ों में फँस जायेगा। एक दिन ऐसा भी आ सकता है जब भारत में हवा और पानी पर भी टैक्स लगाया जायेगा।”..संग्रहित)
आज देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तरीत चर्चिल द्रष्टापुरुष होता असं वाटल्यास चुकीचं नाही... त्याच विधान आपण भारतीयांनी खर करुन दाखवलं, असच म्हणावं लागेल. खोटा राष्ट्राभिमान, जातीपातीच्या लढाया, धर्मांधता, सर्वत्र प्रचंड प्रमाणावर बोकाळलेला भ्रष्टाचार, हे त्याचेच उदाहरण आहे.
भारत देशाने १९९१ ला आर्थिक उदारीकरण स्वीकारले व आपल्या देशात इतर सर्व देशांना व्यापारासाठी दारे खुली झाली. सर्व देशांना भारत देश म्हणजे मोठा ग्राहक वाटू लागला. मग वेगवेगळ्या पध्द्तीने जो तो देश आपापल्या मालाची जाहिरात करुन भारतीयांच्या मनावर आमचेच प्रॉडक्ट्स कशी चांगली आहेत हे बिंबवू लागला..मग कधी नव्हे ते भारतीय तरुणी मिस वल्ड होऊ लागल्या...मग दरवर्षी भारतीय तरुणीची निवड जगातील सर्वात सुंदर व हुशार तरुणी म्हणुन व्हायला लागली...हे प्रमाण काही वर्षे इतके वाढले की जगातील इतर देशांच्या तरुणींची सुंदरता लोप पावली का काय? असा प्रश्न निर्माण व्हावा. मग क्रिकेटला आलेले गँम्लर त्यातील खेळाडूंचा व बॉलिवूड मधील नट नट्यांचा जाहिरातीत केलेला उपयोग व बिनडोक भारतीयांनी त्यांना डोक्यावर घेऊन देशहितला दिलेली तिलांजली हा सगळा विकसित राष्ट्रांनी रचलेला सापळा होता व त्यात आपण अलगद फसत गेलो.
बहुतेक विकसित देशांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. पण सर्वात चिंतेचा विषय बनला तो म्हणजे चीन व चिनी वस्तूंचा...
चीन हा भरतदेशाचा क्रमांक एकचा शत्रू आहे. पाकिस्तान क्रमांक दोन. हिंदी चिनी भाई भाई करत गळ्यात हात टाकून टांगड्यात पाय घालण्याची चिनी प्रवृत्ती लक्षात घेता...चीन हाच देशाच्या प्रगतीला खोडा आहे हे सर्वांनी ध्यानी, मनी, स्वप्नी लक्षात ठेवले पाहिजे..पाकिस्तान हे प्यादे आहे..त्यांचेच खायचे वांदे आहेत...त्यामुळे चीन हाच क्रमांक एकचा शत्रू आहे.
चीनकडुन आपण मोठ्या ऊर्जा प्रकल्पांपासून ते अगदी छोट्या पिनां, गणेशमूर्ती, देवांची चित्रं, फटाके, राख्या, आकाशकंदील, रांगोळी, कपडे, वॉटर प्युरिफायर, गॅस गीझर, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, इलेक्ट्रिकच्या आकर्षक माळा, इलेक्ट्रिकच्या अनेक वस्तू, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, कीबोर्ड, मेमरी स्टोरेज डिव्हाइस, घरातील फेंगशुई वस्तू, खते, एवढेच नव्हे तर टीबी आणि कुष्ठरोगावरची औषधे, अँटिबायोटिक्स, मुलांची खेळणी,रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर, सेट टॉप बॉक्सेस, टीव्हीचे सुटे भाग आणि बरेच काही आपण चीनकडून आयात करतो. लहान मुलांच्या खेळण्यातील मार्केट मध्ये खुप मोठ्या प्रमाणावर चिनी खेळणी आहेत.
आपण चीनकडून जे आयात करतो, त्या वस्तू भारतात बनत नाहीत का? नक्कीच बनतात. पण तुलनेने महाग असतात. चीन या वस्तू अत्यंत कमी खर्चात उत्पादन करून भारताला विकतो.
चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात.  चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. आपल्याकडे असे घरगुती रोजगार नाहीत. या वस्तू तुम्हीआम्ही घेता कामा नये, हे सांगणे पटतेही. परंतु, स्वस्त वस्तूंचे आकर्षण असणाऱ्या भारतीय ग्राहकाच्या हे कसे गळी उतरावायचे?
आपण रोज वर्तमानपत्रात चिनी फोनच्या जाहिराती पाहतो...मोठमोठे डिजिटल बोर्ड पाहतो..प्रसारमाध्यमे सुद्धा पैसा कमण्यासाठी बातम्यापेक्षा जाहिरातीवर भर देतात. जो तो पैसा कमावणे व पैसा वाचवणे याचाच विचार करत असल्यामुळे देशहिताचा अविचार कोणाला परवडेल??चायनीज पदार्थ खाऊन खाऊन बुद्धी जर चीन हितचिंतकाची झाली व त्यांच्या प्रगतीचे ढोल वाजवू लागली तर नवल ते काय?
चिनी माल स्वस्तात मिळतो म्हणून भराभर घेतला जातो. चिनी माल स्वस्त असतो, पण मस्त नसतो. म्हणजे त्याची LIFE कमी असते...तरीही घेतला जातो. युज अँड थ्रो ही मानसिकता वस्तु पासून नात्यांपर्यंत वाढत गेली आहे त्याचा परीणाम देशाच्या पर्यावरणावर व मानवी संबंधावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सरकार काही कारणाने किंवा जागतिक दबावामुळे थेट चिनी वस्तुवर आयात निर्बंध लादू शकत नाही...पण मोठ्या प्रमाणावर आयतकर लावल्यास चिनी वस्तू महाग होतील. त्याच प्रमाणे चीन वरुन खेळणी, फटाके, शो च्या वस्तु, लेडीज पर्स, परफ्यूम, कपडे इत्यादी की ज्याच्या ओरीजनल बिलाची मागणी ग्राहक करत नाहीत त्या वस्तू कंटेनरच्या कंटेनर भरून दोन नंबर मार्गाने भारतात येतात, यात देशाचा कर चुकवला जातो...अशा कृत्यात पोर्टट्रस्ट मधील अधीकारी, कस्टम ऑफिसर, मोठे व्यापारी यांची साखळी असते. यांना हुडकून कठोर कारवाही करणे गरजेचे आहे.
कोणताही बदल किंवा क्रांती सर्वसामान्य जनता करते...प्रस्थापीताकडून किंवा राज्यकर्त्याकडून देशहितापेक्षा स्वहिताला,पक्षहीतला जास्त प्राधान्य दिले जाते...सहाजिकच जबाबदारी सामान्यजनावरच पडते...त्यांनी दुर्लक्ष केलं की मग गुलामगिरीकडे वाटचाल नक्की होते.
चिनी वस्तुवर बहिष्कार टाकणे हे सर्वसामान्यांच्या हातात आहे. सर्वच वस्तुवर हे शक्य नसले तरी बऱ्याच वस्तुवर बहिष्कार हे ब्रम्हास्त्र वापरले जाणे काळाची गरज आहे. या बद्दलच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी समाजसेवी संस्था, देशप्रेमी संघटना, प्रसार माध्यमे यांनी उचलायला हवी. जातीवाद, फुकाचे धर्मप्रेम व खोटे देशप्रेम उपयोगी नाही. चालू काळात व सध्यस्थीतीत राष्ट्रहिताच्या गोष्टीला प्राथमिकता देने गरजेचे आहे...व हे देशप्रमाचे बाळकडू घराघरातून व शाळाशाळातून देने गरजेचे आहे. यासाठी अवघा समाज जागृत होणे जरुरी आहे.
आपण जे काम करतोय ते पूर्ण क्षमतेने करु. प्रत्येकाचा थोडाथोडा हातभार एकूणच प्रगतीला कारणीभूत ठरत असतो. आपल्या कामाने काय फरक पडणार आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे. आपल्या सर्वांच काम करणं हि आपलीच नाही तर आपल्या देशाची गरज आहे. आणि हे आपण जेवढं लवकर लक्षात घेऊ तेवढं लवकर आपला देश प्रगतीची शिखरे पार करील.*
आपणही या चीनी माल बहिष्कार मध्ये खारीचा वाटा उचलून हे काम जमेल तसे करत राहूया... बोलणे जाते विरुनी अमर राहे सत्कृती हे संत वचन मनी धरुन कृतीला सुरवात करुया.

झाडे लावा... झाडे जगवा 05/06/17

झाडे_लावा_झाडे_जगवा...
संदिप रामचंद्र चव्हाण
5 जुन 2017, जागतिक पर्यावरण दिन.

"झाडे लावा झाडे जगवा" ही घोषणा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. लहानपणी शाळेची प्रभातफेरी निघायची व त्या फेरीमध्ये वेगवेगळे बोर्ड मुलांच्या हाती असायचे, त्यात काहींच्या हाती झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा बोर्डही असायचा...लहान मुलं तेव्हाही व आत्ताही मनापासून घोषणा द्यायची...प्रभात फेरी संपायची...शाळा सुटायची...शिक्षक व मुलं आपापल्या घरी जायची...व ही घोषणा हवेत विरुन जायची व आजही जाते आहे.
सर्वसाधारण गेली 25/30 वर्ष असंच चालु आहे. याचा थोडाफार परिणाम संवेदनशील लोकांवर पडायचा मग काही ठिकाणी व्यक्तिगत तर काही ठिकाणी संस्था, मंडळे,शासकीय आस्थापने वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचे...त्यावेळी सेल्फीचा आजार जडला नव्हता किंवा मोबाईल सर्वत्र उपलब्ध नव्हता त्यामुळे प्रसिद्धीही जेमतेम व्हायची...पावसाळा असे पर्यंत लावलेल्या झाडातील काही झाडे तग धरायची तर काही मरायची...पुढे जिवंत झाडांनाही गाई गुरे, शेळ्या मेंढ्या फस्त करायच्या, पुढल्या पावसाळ्यात त्याच जागी पुन्हा नव्याने वृक्षरोपण कार्यक्रम चालु... हा सगळा (अ)नियोजित कार्यक्रम वर्षोनीवर्षो तसाच चालु आहे...त्यामुळे गेली कित्येक दशके झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा चालुच आहे व अजून काही दशके चालूच राहील.

माणसाला निसर्गाने इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी, हात, व बोलण्याची शक्ती दिली..मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर आपल्या हाताने कृतज्ञता म्हणुन निसर्गाचे सनवर्धन करायला हवे होते,, पण झाले उलटेच मानवाची निसर्गावर अवकृपा झाली, निसर्गाशी कृतघ्नपणे वागून शक्य तितकी हानी केली.
फक्त पृथ्वीग्रहावर सजीव सृष्टी आहे. अजून तरी पृथ्वी सोडून इतर कोणत्या ग्रहावर ती आहे असा शोध लागला नाही. पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या दोन त्रितीअंश (७०%)भाग पाण्याने व्यापला आहे. व बाकी जमीन आहे.
उपलब्ध जमिनीवर ३३% वनक्षेत्र असावे असं तज्ञानच मत आहे. व पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे. पण विकासाच्या नावाखाली व वाढत्या लोखसंख्या, शहरीकरणामुळे बेसुमार वृक्षतोड झाली. जगातील कोणतेच  राष्ट्र याला अपवाद नाही.
आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरकारी आकडेवारी नुसार राज्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी फक्त २० ते २१% वने आहेत. म्हणजे अजुन १२ते१३% जमीन वनक्षेत्रात बदलावी लागेल किंवा वृक्षरोपण करावे लागेल. व ही हेक्टर मध्ये ४० लाख हेक्टर होते.
(राज्याचे एकूण क्षेत्रफळ ३ लाख sqkm आहे, म्हणजे जमीन ३००लाख हेक्टर)
४० लाख हेक्‍टरमध्ये हेक्‍टरी एक हजार झाडांप्रमाणे आपणास ४०० कोटी झाडं लावणं अपेक्षित आहे. मात्र हे काम सरकारी यंत्रणेची इच्छाशक्ती व कठोर नियोजन केल्याशिवाय शक्‍य नाही. पुढील २५ वर्षे हे काम करावं लागेल.
झाडाचे उपयोग पाहता, झाडाशिवाय मनुष्यजीव जगु शकणार नाही. मनुष्य ऑक्सिजन घेतो व कार्बनडाय ऑक्सइड सोडतो..झाडे नेमकं उलट करतात. वातावरणातला CO2 घेऊन O2 सोडतात व तापमान कमी करतात. त्याच प्रमाणे डोंगरऊतारावरील माती धरून ठेवणे, जमिनीची धूप थांबवणे, सरपण, फर्निचर, घरबांधणी, जहाजबांधणी इत्यादी कामासाठी लाकुड हवे असते, औषधे बनवण्यासाठी, औधोगिक कामात सुद्धा झाडांचा उपयोग आहे.
झाडाच्या आश्रयाने पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी, किटक इत्यादी राहतात.या सर्वांचे नैसर्गिक अन्नसाखळीत खुप असते.
पण प्रगतीच्या व विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड झाली..परिणामी झाडांची जंगले कमी व इमारतींची जंगले जास्त झाली. कोणत्याही शहराची श्रीमंती ही इमारतीच्या उंचावरून न मोजता झाडांच्या संख्येवरुन जेव्हा मोजली जाईल व झाडापेक्षा इमारती कमी उंचीच्या असतील तेव्हा ती शहर आनंदी व आल्हाददायक असतील.
वाढती लोकसंख्या व तिच्या गरजा, वाढते औद्योगिकीकरण, रस्ते,रेल्वे,विमानतळ, इत्यादी साठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होते.
आज जगात सर्वात जास्त प्रदूषण करणाऱ्या देशात आपला क्रमांक आहे.
आपल्या भावी पिढीला आरोग्यपूर्ण जीवन, स्वच्छ हवा,स्वच्छ पाणी हवे असल्यास आतापासूनच प्रत्येकाने एक, दोन झाडे लावुन ती कसोशीने जगवली पाहिजेत.
फक्त राज्याला ४००कोटी झाडे लावणे गरजेचे आहे तर देशाचा विचार केला तर हा आकडा सहज पाच दहा हजार कोटींच्या घरात जाईल...लोकसंख्येचा विचार करता व किती लोकं खरच एकतरी झाड लावतील का?  व सरकारी यंत्रणेने केलेले वृक्षरोपण व त्याची विश्वासहर्रता पहिली तर मग प्रत्येकाची जबाबदारी वाढते.
आज कोणच आपापली जबाबदारी जबाबदारीने पार पाडताना दिसत नाही, जो तो कामापासून पळतोय व शॉर्टकट शोधतोय... मग ते लोकप्रतिनिधी व मंत्री असो, सरकारी अधिकारी कर्मचारी असो कि सर्वसामान्य नागरिक. *मला काय त्याचं* ही वृत्ती वाढली आहे. मी एकट्याने काम करुन काय होणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे...आज आपण जागे झालो नाही तर पुढच्या पिढीला याही पेक्षा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. जागतिक स्तरावर पॅरीस करारा सारखे उपयोजनेचे काही प्रयत्न चालु आहेत पण अमेरिकेसारख्या राष्ट्राने या कराराला खो दिला आहे.
वृक्षप्रेम जोपासणारे आपल्याही देशात आहेत... जादव (मोलाई) पायेंग, सालुमारदा ठिम्माक्का ही व अशी दोनचार नावे आपल्याला नवी दिशा देतात...
त्याच प्रमाणेआपल्याही देशात इतर सर्व खात्यासारखे वनखात्यालाही भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. जो पर्यंत देशातील नागरिकांत खरेखुरे देशप्रेम जागृत होत नाही तो पर्यंत कोणतेही काम सोपे नाही. आजचे तरुण तुर्क व म्हातारे अर्क सगळे सोशीलमीडियावरून देशभक्तीच्या गप्पा व चर्चेचा सपाटा लावतात. गरज आहे कृतीची, चांगल्या कामासाठी संघटित होण्याची... व ही सुरवात आपल्यापासूनच का नको??


Monday 11 December 2017

संस्कृतीकडून विकृतीकडे.... भाग एक. 20/12/17

संस्कृतीकडून_विकृतीकडे... भाग एक

ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका, मस्तानोंका..., इस देश का यारो क्या कहना!!!,, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती!!! अशी खूप प्रसिद्ध असणारी गीतं आहेत. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला हमखास ऐकायला मिळतात. यातून देशाच्या संस्कृतीबद्दल अभिमानास्पद वर्णन आहे.... हजारो वर्षांची परंपरा असणारा, अनेक भाषा, अनेक चालीरीती, सर्व ऋतू, नद्या, डोंगर, पर्वत, समुद्र, वाळवंट असे नैसर्गिक वेगवेगळेपण असणारा, असंख्य वीर-योध्ये, असंख्य वीरांगना, संत, महात्मे, समाजपुरुष, युगपुरुष ज्या मातीत घडले तो देश म्हणजे आपला भारत देश!
भा म्हणजे 'तेज, प्रकाश', रत म्हणजे रममाण असणारा.... तेजात, प्रकाशात रममाण असणारा, एकरूप असणारा जो, तो भारत! असा काहीसा अर्थ आपल्या देशाचा आहे. या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली, या आक्रमकांनी संस्कृतीची देशवासीयांची हानीही केली. पण त्या त्या वेळच्या महापुरुषांनी, जनतेने ती आक्रमणे परतवली, पचवली व भारताचे भारतीयांचे वेगळेपण जपले. अस्तित्व टिकवून ठेवले. अगदी शेवटी इंग्रज आले त्यांनी दीड शकत राज्य केले. त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून जमेल तसे लोक लढले, आंदोलने केली, फासावर चढले. लक्षावधी लोक देशासाठी हुतात्मा झाले... काहींची नावे इतिहासाला माहीत आहेत तर बर्याचजनांची नोंदही नाही... पण जे स्वातंत्र्य मिळाले ते अनेकांच्या त्यागातुन, कष्टातून, रक्तातुन मिळाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील लोक आज हयात नाहीत किंवा वृद्ध झाले आहेत. पुढे भारत पाकिस्तान, भारत चीन अशी युद्धे झाली, दहशतवाद हे छुपे युद्ध नेहमीचेच चालू आहे. यातही असंख्य जवान हुतात्मा झाले. या सर्वांचा त्याग देशासाठी व देशवासीयांंसाठी होता. याचे स्मरण युवा पिढीने ठेवणे गरजेचे आहे.
परंतु या दोन, तीन दशकात आपल्या देशाची एकूण परिस्तिथी, संस्कृती कडून विकृतीकडे चालली का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या आजूबाजूला जरी परिस्थिती पाहिली तरी अनेक विकृतीने भरलेल्या गोष्टी दिसतात. त्यापैकी तरुनपिढीचा ओढा विकृतीकडे अधिक दिसतो आहे.
काही दिवसांपूर्वी कराड मध्ये किरकोळ कारणावरून कॉलेज युवकाचा खून कॉलेज युवकांनीच केला अशी बातमी वाचनात आली, तर काही दिवसांपूर्वी दिल्ली जवळील गुरुग्राम मधील मोठ्या खाजगी शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलाचा खून अकरावीत शिकत असणाऱ्या त्याच शाळेतील मुलाने केला.. कारण काय? तर पालक मिटिंग टाळावी म्हणून!
कोणत्याही शहरात कॉलेजमधील युवकांची भांडणे, मारामारी, हिरोगीरी, चमकोगिरी, भन्नाट बाईक चालवणे, कट मारणे, बाईक स्टंट करणे, वाहतुकीचे नियम तोडणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मुलींची छेड काढणे, मुलींवर कॉमेंट करणेे, कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चरला दांडी मारणे व बाहेर खाजगी क्लास लावणे, वाढलेली व्यसनाधीनता, गुन्हेगारी विश्वाचं आकर्षण वाटणे, दादा- भाई आदर्श असणे व खऱ्या आदर्शाना विसरणे, हे प्रमाण वाढले आहे. कॉलेजमधील लेक्चरला दांडी मारण्यात मुलीही मागे नाहीत. खूप सारा वेळ मोबाईल इंटरनेटवर ऑनलाईन असणे, रोडवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालतानाही सुरक्षेचे भान न ठेवणे, हे व्यसन मुलामुलींमध्ये वाढत आहे. कॉलेजच्या कट्ट्यावर, गार्डनच्या बाकड्यावर, हॉटेलच्या खुरच्यावर प्रेमी युगलांची संख्या कमालीची वाढली आहे. मुलांच्याबरोबर तोंडाला स्कार्फ बांधून बाईकवरून दूर दूर भटकणे, निर्जन स्थळी वेळ घालवणे व घरच्यांना याची दादही लागू न देणे यात मुलीही पटाईत झाल्या आहेत.
ठराविक वयात भिन्नलिंगी आकर्षण असते पण त्यालाच प्रेम मानून, खर तर ते शारीरिक आकर्षण असते हे समजून न घेता थ्रिल म्हणून या लव्ह बर्डसनी फिजिकल रिलेशनशिप पर्यंत मजल मारली आहे. शरीर सुखाची एकदा चटक लागली की वारंवार ते हवे वाटणे, पुढे ब्रेकप होणे, याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक व खाजगी आयुष्यावर होत आहे, यातून नैराश्य येणे, दारू-सिगारेटच्या आहारी जाणे, एकलकोंडेपणा, आक्रमकता, संयम हरवणे, आत्महत्तेसारखं टोकाचं पाऊल उचलणे अशा घटना घडत आहेत. कॉलेज मधील 90% भांडणं, मारामाऱ्या या अशाच करणातून होतात. यात समाजाचे, पालक, शिक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष चालू आहे.
"अडाणी आई घर वाया जाई" हे समाजाला समजू लागले... मुली शिकल्या, मोठ्या पदावर गेल्या, स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या राहिल्या. पण आई वडील नोकरीला व मुलं पाळणाघरात अशी नवीन व बालकांचे बालपण बंदिस्त करणारी व्यवस्था उभी राहिली. विभक्त कुटुंब, करियरच्या मागे धावणारे आई बाबा, मायेच्या माणसांच्या सहवासाला पोरकी झालेली लहान मुलं, कमी वयात मागेल ते मिळणे, मोबाईल, टीव्हीचे अतिप्रमाणात आकर्षण या व अश्या गोष्टींमुळे लहानपणापासूनच मुलं असंवेदनशील हट्टी होत आहेत. त्यांना कशाप्रकारे हाताळायचे या बद्दल नवपालकांच्यात संभ्रम आहे. पळवून नेलेली मुलं, अनाथ असणारी मुलं, कमी वयात गुन्हेगारीकडे वळालेली मुलं, लैगिंक अत्याचाराला बळी पडलेली मुलं, शाळाबाह्य मुलं, शाळा कॉलेजला असून तिकडे न फिरकणारी मुलं यातूनही मुलांच्यात वर्तनसमस्या तयार होत आहेत.
आजची मुलं ही उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे या घटनांकडे दुर्लक्ष उपयोगाचे नाही.

आपल्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षणाची कथा अजूनच भयानक आहे.. प्रिप्रायमरीचे उदंड पीक आले आहे. खाजगी प्रायमरी मध्ये खूप अभ्यासक्रम, प्रोजेक्ट्स, रट्टे मारून मुलांना पोपटपंची करायला लावणे इत्यादी बाबी आहेत. सरकारी शाळांचे तर वास्तव भयानक आहे. मुलांना फक्त वरच्या वर्गात ढकलणे चालू आहे. काही शाळा अपवाद आहेत. अशीच मुलं पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिककडे प्रवास करतात. ज्यांचा बालपणीचा पायाच डळमळीत आहे त्यांची आयुष्याची इमारत उभी राहते पण छोट्याशा धक्क्याने कोसळते.
गणिताच्या विषयात व्यवहाराचे गणित शिकवले जात नाही, आयुष्य जगताना आनंदाची बेरीज तर चुकीच्या गोष्टींची वजाबाकी करायची असते, नात्यांचा गुणाकार अन नैराश्याचा, अपयशाचा भागाकार करायची शिकवण अभ्यासक्रमात नाही. जे शिकवले जाते त्या साइन, कॉस, टॅन चा व्यवहारात उपयोग नाही.
अशीच कथा इतर विषयांची आहे...
इतिहासाच्या विद्यार्थ्यांना इतिहास हा भूतकाळातील चुका टाळून वर्तमान सुधारणे व भविष्य उज्वल घडवणे या साठी जाणून घ्यायचा असतो याची कल्पनाच दिली जात नाही, भूगोलाच्या विद्यार्थांना दिशा सांगताना आयुष्याची दिशा कशी ठरवायची याचे ज्ञान मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी दिशाहीन होतात. अर्थशास्त्र शिकणार्याला समाजाचे, घरचे अर्थशास्त्र कळत नसेल आर्थिक परिस्थिती नसताना EMI वर चैनीच्या गोष्टी घेतल्या जात असतील व क्रेडिट नसताना क्रेडीतकार्डचा वापर करून चक्रवाढ व्याजात अडकत असतील तर अश्या अभ्यासक्रमाचा उपयोग आहे का? या सर्व घटकांचा विचार व्यवस्थेने करणे गरजेचे आहे.
तरुण पिढी, समाज, गुन्हेगारी वृत्ती यावर ना कायद्याचा धाक आहे ना पोलिसांचा....
त्यातच भर म्हणून आधी फुकट व आता अनलिमिटेड इंटरनेटमुळे कायम ऑनलाइन असणे व फेसबूक, व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम, ट्विटर यालाच वास्तव मानणारी पिढी मानसिक रोगी होत आहे. आभासी जग व वास्तव जग हा फरक लक्षात न घेता त्यात गुरफटून गेलेली तरुण तरुणी जगण्याची दिशा हरवून बसली आहेत.  टीव्ही, चित्रपट, इंटरनेट माध्यमातून चंगळवादाला खतपाणी मिळेल असे भरपूर कार्यक्रम आहेत. या चक्रव्यूहात सारासार विचार करण्यात कमी पडत असणारी तरुण पिढी सापडत आहे.

याकडे दुर्लक्ष समाज म्हणून सर्वांना घातक आहे. रोगावर वेळीच उपचार झाला नाही तर पेशन्ट दगावण्याची शक्यता असते... आज आपली तरुणपिढी याच अवस्थेतून जात आहे.. तिचे पूर्ण विकृतीत रूपांतर होण्याआधी सर्वांनी सजग व सावध होणे गरजेचे आहे. (क्रमशः)
... संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.29 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)

भाग २ खालील लिंकवर वाचा..
https://sandiprchavan.blogspot.in/2018/01/201217.html?m=1