My Blog List

Friday 15 December 2017

कडकलक्ष्मी... 25/10/17

कडकलक्ष्मी
25 ऑक्टोबर 2017

दिपवाळीच्या सुट्टीत गावी असताना एक दिवशी दुपारी लयबद्ध ढोलकीचा आवाज यायला लागला खूप दिवसांनी ऐकला तरी आवाज ओळखीचा वाटला... वातावरणात आणि मनात कंपन करणारा तो आवाज... कडकलक्ष्मी गल्लीतल्या चौकात आली हे सांगणारा होता.
मरीआईचा भक्त पोतराज, कडकलक्ष्मी बनून कित्येक पिढ्या आपल्या कुटुंबाची गुजराण करतोय... लहानपणी त्याच्याबद्दल वाटणारी भीती आता गेली होती... चाबकाचे फटके, ढोलकीचा, पायातील घुंगराचा आवाज सगळे दृष्य डोळ्यात साठवत होतो... चाबकाचे फटके मारून घेताना त्याच्या बायकोच्या डोळ्यातील भाव काळीज चिरून जात होता...
आजूबाजूला राहत असणाऱ्या घरातील महिलां पसा पसा धान्य, तेल, एक, दोन, पाच, दहा रुपये देऊन कडकलक्ष्मीचा आशीर्वाद घेत होत्या...
मरीआई ही कडक म्हणून मरीआईचा भक्त कडकलक्ष्मी झाला... कमरेला रंगीबेरंगी चिंध्या, हातात चाबूक(कोरडे), कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, पायात चाळ असा पोशाख धारण करून मरीआई व लोकांच्या मधला संपर्काचा दुवा ठरला.
ज्या वेळी विज्ञानाची प्रगती व औषधांचा शोध कमी होता त्या वेळी साथीच्या आजाराने गावेच्या गावे माणसांच्या मरणाने ओस पडत, हे मरीआईच्या कोपाणेच होते असा लोकांचा समज असे... त्यावेळी पोतराजला बोलवून देवीला प्रसन्न केले जाई, व मरीआईचा गाडा गावाच्या बाहेर काढला जाई.
औधोगिक प्रगती बरोबर विज्ञानाची प्रगती झाली, अनेक रोगांवर उपचार उपलब्द झाले... श्रद्धा अंधश्रद्धा वाद विकोपाला गेले... गावगाड्यात महत्वाच्या असणाऱ्या इतर लुप्त होणाऱ्या गोष्टीबरोबर कडकलक्ष्मीच गावा गावात येणं कमी झालं.. आणि लोकांना तिची आठवण येईनाशी झाली.. शहरात तर कडकलक्ष्मी अदृष्य झाली...
कोणत्याही गावात गेल्यावर, त्या गावचे व लोकांच्या आरोग्याचे मागणे मागता मागता स्वतःबद्दल मागायचे विसरून गेलेल्या पोतराजाचे कुटुंब, चार दिवस या गावी तर चार दिवस त्या गावी असा प्रवास करत फिरते. उपेक्षित जीवन जगताना सुद्धा समाजाच्या आरोग्याची काळजी वाहत असते...
चौकात ठाण मांडून बसलेल्या पोतराजचा फोटो मोबाईल मध्ये घेऊन... श्रद्धा, अंधश्रद्धा बाजूला ठेऊन त्याची अस्तेवाईक चौकशी केली, त्याची नातवंड आता शाळेत जातात हे ऐकून समाधान वाटलं.... फटाके फोडायचे का, नाही या वादात सुशिक्षितांची दिवाळी चालू असताना, गावच्या मोडकळीस आलेल्या st स्टँड मध्ये, आपल्या आयुष्याची होळी झाली आता लेकरांच्या आयुष्यात दिवाळी येवो अशी आस करणारी कडकलक्ष्मी वास्तव्यास होती... पुरुष असून स्त्री पात्र जगणाऱ्या पोतराजाला घरातील दिवाळीचे गोड धोड  खायला देऊनं... माझ्या मुलाच्या हातून पन्नासची नोट ओवाळणी म्हणून टाकली... त्याने देवाऱ्यातला मोरपिसांचा झाडू काढून दोघांच्या डोक्यावर ठेवला... माझ्या कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना देवीपुढे केली... मग मी ही मनोभावे देवीला वंदन करून... त्याच्या कुटुंबाच्या उपेक्षित, कष्टप्रद जीवनात पुढील दिवाळी आनंदाची, भरभराटीची येऊ दे अस मागणं मागितलं...
समाजातील उपेक्षित घटकांच्या आयुष्यात आनंदाची पहाट येण्यासाठी समाजातील "आहे रे वर्गाने", "नाही रे वर्गाचा" विचार करायला हवा..
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण लहानपणापासून घेत आलो आहे... सर्वांनी सर्वकाळ कष्टप्रद आयुष्य जगणाऱ्या बांधवाप्रति संवेदना दाखवणे गरजेचे वाटते.
....संदीप रामचंद्र चव्हाण

No comments:

Post a Comment