My Blog List

Friday 15 December 2017

साल्वातोर मुंडी अन् आपली घसरगुंडी 06/12/17

साल्वातोर_मुंडी_अन्_आपली_घसरगुंडी
.... संदिप रामचंद्र चव्हाण
6 डिसेंबर 2017
कलाकृती काय असते व त्याचे मूल्य किती(ही) होऊ शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे 'लिओनार्दो दा विन्सी(विंची)' याच्या 'साल्वातोर मुंडी' या चित्राला मिळालेली किंमत...
मोनालीसाचे चित्र काढणारा लिओनार्दो लोकांना माहिती आहे ... काही दिवसांपूर्वी त्याच्या नावावरून एक चित्रपटही येऊन गेला. लिओनार्दो पंधराव्या शतकातील इटलीतील जगप्रसिद्ध चित्रकार होता.

नोव्हेंबर मध्ये त्याच्या 'साल्वातोर मुंडी' या चित्राचा ‘ख्रिस्तीज’ या लिलाव करणाऱ्या जगप्रसिद्ध कम्पनीने न्यूयॉर्क येथे लिलाव केला. त्यांना अपेक्षित असणाऱ्या 100 दशलक्ष डॉलरच्या  साडेचार पट रक्कमेला म्हणजेच 450 दशलक्ष डॉलरला हे चित्र आज्ञात व्यक्तीने खरेदी केले... भारतीय मूल्यात याची किंमत तीन हजार कोटीच्या जवळ जाते. (जवळपास 2,941 कोटी)
तीन हजार कोटीला दीड बाय दोन फुटाच्या आसपास (26 इंच बाय 18.5 इंच) असणारे एक चित्र विकलं जाऊ शकत हे आपल्यासाठी खूप विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. कलेचे चाहते आणि कलेला तिच्या कलाने घेणारे जगात भरपूर लोक आहेत. बऱ्याच प्रगत देशात कलेचे वेगळेपण व वेगळ्यापणाने कला जपली जाते. चित्रकला, हस्तकला, पुरातन वास्तू, यांना राष्ट्राचा अनमोल ठेवा म्हणून जपण्यावर भर असतो.
या चित्रबद्दल, त्याच्या खऱ्या खोट्याबद्दल वाद आहेत, चार वर्षे यावर संशोधन झाले आहे. हे चित्र एका रशियन अब्जाधिशाकडे होते... आता त्याचा लिलाव झाला आहे..जवळपास 3 हजार कोटीला...असो.
बिल गेट्सनी लिओनार्दोची विज्ञान नोंदी असणारी एक डायरी( कोडेक्स लिसेस्टर) 1994 मध्ये 30 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. आपल्याही देशातील वासुदेव गायतोंडे यांचे एक पेंटिंग 2015 मध्ये तब्बल तीस कोटीला विकले गेले होते.
एकूणच काय कला व त्याच्याशी असणारा सांस्कृतिक वारसा यामुळे त्या कलेची किंमत वाढते.
पाच्यात्यांच्या तुलेनेत आपल्या देशात सांस्कृतिक व पुरातन वास्तू, वस्तू जपण्याच्या पध्दतीमध्ये खूप मोठा फरक आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षणातूनही जवळपास कला विषयाची हद्दपारी  झाली आहे. शिक्षणामध्ये चित्रकलेला किंवा कोणत्याही कलेला असणारं दुय्यम स्थान हे त्याचेच द्योतक आहे. एक चित्र हजार शब्दांचे काम करते. अशी ताकत चित्रात असते. हस्तकलेच्या वस्तू मधून मुलांचं कौशल्य विकसित होतं... पण चित्र काढणं किंवा इतर कला म्हणजे वेळेचा अपव्यय व अभ्यासाकडे दूर्लक्ष असे मानणारा मोठा पालकवर्ग आहे. थोड्याफार फरकाने शाळांचही असंच मत आहे.
आपण परकीयांचे अनुकरण करताना अवगुण घेतले पण गुणांकडे दुर्लक्ष केले... ही परंपरा मोडीत काढणे गरजेचे आहे.
सध्या देशात पुरातन वास्तूवरूनही गोंधळ माजवला जात असताना, त्याचप्रमाणे पुरातन वास्तू या प्रेमी युगलांच्या गुजगोष्टी करण्याच्या व त्यांचे प्रेम कोरून ठेवण्याच्या हक्काच्या जागा झाल्या आहेत. जनतेची अनास्था व सरकारचे दुर्लक्ष यामुळे अनेख ठिकाणचा पुरातन 'वारसा' बेवारस होऊन अखेरच्या घटका मोजत आहे. आर्थिक प्रश्न व बजेटची समस्या असली व आपल्याला 'साल्वातोर मुंडी' खरेदी विक्रीसारखी चैन परवडणार नसली तरी खऱ्या वारश्यांकडे दुर्लक्ष असताना, मताच्या राजकारणासाठी स्मारकांची स्पर्धा भरवून जनतेनेही त्याला अस्मितेचे लेबल लावल्यामुळे.... 


"कारे भुललाससी वरलीया रंगा!" अशी परिस्थिती दिसते....ही परिस्थिती बदलुन कलेला, ऐतिहासिक वास्तू, वस्तूंना चांगले दिवस येतील तो सुदिन!!


(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.6 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)

No comments:

Post a Comment