My Blog List

Wednesday 13 December 2017

झाडे लावा... झाडे जगवा 05/06/17

झाडे_लावा_झाडे_जगवा...
संदिप रामचंद्र चव्हाण
5 जुन 2017, जागतिक पर्यावरण दिन.

"झाडे लावा झाडे जगवा" ही घोषणा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. लहानपणी शाळेची प्रभातफेरी निघायची व त्या फेरीमध्ये वेगवेगळे बोर्ड मुलांच्या हाती असायचे, त्यात काहींच्या हाती झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा बोर्डही असायचा...लहान मुलं तेव्हाही व आत्ताही मनापासून घोषणा द्यायची...प्रभात फेरी संपायची...शाळा सुटायची...शिक्षक व मुलं आपापल्या घरी जायची...व ही घोषणा हवेत विरुन जायची व आजही जाते आहे.
सर्वसाधारण गेली 25/30 वर्ष असंच चालु आहे. याचा थोडाफार परिणाम संवेदनशील लोकांवर पडायचा मग काही ठिकाणी व्यक्तिगत तर काही ठिकाणी संस्था, मंडळे,शासकीय आस्थापने वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचे...त्यावेळी सेल्फीचा आजार जडला नव्हता किंवा मोबाईल सर्वत्र उपलब्ध नव्हता त्यामुळे प्रसिद्धीही जेमतेम व्हायची...पावसाळा असे पर्यंत लावलेल्या झाडातील काही झाडे तग धरायची तर काही मरायची...पुढे जिवंत झाडांनाही गाई गुरे, शेळ्या मेंढ्या फस्त करायच्या, पुढल्या पावसाळ्यात त्याच जागी पुन्हा नव्याने वृक्षरोपण कार्यक्रम चालु... हा सगळा (अ)नियोजित कार्यक्रम वर्षोनीवर्षो तसाच चालु आहे...त्यामुळे गेली कित्येक दशके झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा चालुच आहे व अजून काही दशके चालूच राहील.

माणसाला निसर्गाने इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी, हात, व बोलण्याची शक्ती दिली..मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर आपल्या हाताने कृतज्ञता म्हणुन निसर्गाचे सनवर्धन करायला हवे होते,, पण झाले उलटेच मानवाची निसर्गावर अवकृपा झाली, निसर्गाशी कृतघ्नपणे वागून शक्य तितकी हानी केली.
फक्त पृथ्वीग्रहावर सजीव सृष्टी आहे. अजून तरी पृथ्वी सोडून इतर कोणत्या ग्रहावर ती आहे असा शोध लागला नाही. पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या दोन त्रितीअंश (७०%)भाग पाण्याने व्यापला आहे. व बाकी जमीन आहे.
उपलब्ध जमिनीवर ३३% वनक्षेत्र असावे असं तज्ञानच मत आहे. व पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे. पण विकासाच्या नावाखाली व वाढत्या लोखसंख्या, शहरीकरणामुळे बेसुमार वृक्षतोड झाली. जगातील कोणतेच  राष्ट्र याला अपवाद नाही.
आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरकारी आकडेवारी नुसार राज्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी फक्त २० ते २१% वने आहेत. म्हणजे अजुन १२ते१३% जमीन वनक्षेत्रात बदलावी लागेल किंवा वृक्षरोपण करावे लागेल. व ही हेक्टर मध्ये ४० लाख हेक्टर होते.
(राज्याचे एकूण क्षेत्रफळ ३ लाख sqkm आहे, म्हणजे जमीन ३००लाख हेक्टर)
४० लाख हेक्‍टरमध्ये हेक्‍टरी एक हजार झाडांप्रमाणे आपणास ४०० कोटी झाडं लावणं अपेक्षित आहे. मात्र हे काम सरकारी यंत्रणेची इच्छाशक्ती व कठोर नियोजन केल्याशिवाय शक्‍य नाही. पुढील २५ वर्षे हे काम करावं लागेल.
झाडाचे उपयोग पाहता, झाडाशिवाय मनुष्यजीव जगु शकणार नाही. मनुष्य ऑक्सिजन घेतो व कार्बनडाय ऑक्सइड सोडतो..झाडे नेमकं उलट करतात. वातावरणातला CO2 घेऊन O2 सोडतात व तापमान कमी करतात. त्याच प्रमाणे डोंगरऊतारावरील माती धरून ठेवणे, जमिनीची धूप थांबवणे, सरपण, फर्निचर, घरबांधणी, जहाजबांधणी इत्यादी कामासाठी लाकुड हवे असते, औषधे बनवण्यासाठी, औधोगिक कामात सुद्धा झाडांचा उपयोग आहे.
झाडाच्या आश्रयाने पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी, किटक इत्यादी राहतात.या सर्वांचे नैसर्गिक अन्नसाखळीत खुप असते.
पण प्रगतीच्या व विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड झाली..परिणामी झाडांची जंगले कमी व इमारतींची जंगले जास्त झाली. कोणत्याही शहराची श्रीमंती ही इमारतीच्या उंचावरून न मोजता झाडांच्या संख्येवरुन जेव्हा मोजली जाईल व झाडापेक्षा इमारती कमी उंचीच्या असतील तेव्हा ती शहर आनंदी व आल्हाददायक असतील.
वाढती लोकसंख्या व तिच्या गरजा, वाढते औद्योगिकीकरण, रस्ते,रेल्वे,विमानतळ, इत्यादी साठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होते.
आज जगात सर्वात जास्त प्रदूषण करणाऱ्या देशात आपला क्रमांक आहे.
आपल्या भावी पिढीला आरोग्यपूर्ण जीवन, स्वच्छ हवा,स्वच्छ पाणी हवे असल्यास आतापासूनच प्रत्येकाने एक, दोन झाडे लावुन ती कसोशीने जगवली पाहिजेत.
फक्त राज्याला ४००कोटी झाडे लावणे गरजेचे आहे तर देशाचा विचार केला तर हा आकडा सहज पाच दहा हजार कोटींच्या घरात जाईल...लोकसंख्येचा विचार करता व किती लोकं खरच एकतरी झाड लावतील का?  व सरकारी यंत्रणेने केलेले वृक्षरोपण व त्याची विश्वासहर्रता पहिली तर मग प्रत्येकाची जबाबदारी वाढते.
आज कोणच आपापली जबाबदारी जबाबदारीने पार पाडताना दिसत नाही, जो तो कामापासून पळतोय व शॉर्टकट शोधतोय... मग ते लोकप्रतिनिधी व मंत्री असो, सरकारी अधिकारी कर्मचारी असो कि सर्वसामान्य नागरिक. *मला काय त्याचं* ही वृत्ती वाढली आहे. मी एकट्याने काम करुन काय होणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे...आज आपण जागे झालो नाही तर पुढच्या पिढीला याही पेक्षा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. जागतिक स्तरावर पॅरीस करारा सारखे उपयोजनेचे काही प्रयत्न चालु आहेत पण अमेरिकेसारख्या राष्ट्राने या कराराला खो दिला आहे.
वृक्षप्रेम जोपासणारे आपल्याही देशात आहेत... जादव (मोलाई) पायेंग, सालुमारदा ठिम्माक्का ही व अशी दोनचार नावे आपल्याला नवी दिशा देतात...
त्याच प्रमाणेआपल्याही देशात इतर सर्व खात्यासारखे वनखात्यालाही भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. जो पर्यंत देशातील नागरिकांत खरेखुरे देशप्रेम जागृत होत नाही तो पर्यंत कोणतेही काम सोपे नाही. आजचे तरुण तुर्क व म्हातारे अर्क सगळे सोशीलमीडियावरून देशभक्तीच्या गप्पा व चर्चेचा सपाटा लावतात. गरज आहे कृतीची, चांगल्या कामासाठी संघटित होण्याची... व ही सुरवात आपल्यापासूनच का नको??


No comments:

Post a Comment