My Blog List

Friday 15 December 2017

गणेशोत्सव दशा आणि दिशा..25/08/17

गणेशोत्सव_काल_आणि_आज....
संदिप रामचंद्र चव्हाण
25 ऑगस्ट 2017
भाऊसाहेब रंगारी गणपती की लोकमान्य टिळक  या पैकी कोणी प्रथम गणेशोत्सव चालू केला हा वाद महाराष्ट्रात चालू असताना आपण त्यात न पडता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार व कृती करणे गरजेचे आहे.

जवळपास सौवाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गणेशोत्सव चालू झाला. एवढी मोठी परंपरा असताना गणेशोत्सव चालू कोणी केला यावर वाद घालण्यापेक्षा गणेशोत्सव कसा सामाजिक जबाबदारीने व पर्यावरण पूरक होईल यासाठी जाणकारांनी शक्ती खर्च केली तर ते समाजाच्या व देशाच्या हिताचे राहील.
गणेशोत्सव ज्या काळात चालू झाला तो काळ म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असणारा काळ. घरातील देव्हाऱ्यात असणारा गणपती व गणेश चतुर्थीला, सार्वजनिक व संघटनात्मक पातळीवर आणण्याचा उद्देशच मुळी लोकांच्यात एकी व इंग्रजांच्या विरुद्ध ही शक्ती उभी करणे असा होता. त्यावेळी एकत्र जमन्यावर बंधी होती. पण धार्मिक गोष्टीत इंग्रज हस्तक्षेप करत नसत.
भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी १८९२ साली ‘भाऊसाहेब रंगारी गणपती’ या नावाने सर्वप्रथम गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.
परंतु भारतीय लोक श्रद्धाळू व धार्मिक असल्यामुळे व इंग्रजांना धार्मिक गोष्टीत लुडबुड करणे परवडणारे नसल्यामुळे टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर कसे साजरे होतील यासाठी प्रयत्न केला. केसरीमधून याची संकल्पना मांडली. व पुढे या उत्सवातून लोकांना एकत्र करुन देशभक्ती जागवली.
कालांतराने देश स्वतंत्र झाला, महाराष्ट्रात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला. यातून नवीन संघटना, सामजिक कामे उभी राहिली. तरुणांचे संघटन झाले. भक्तीला व श्रद्धेला एक सांघिक बळ मिळाले.
देशात एक मानाचे स्थान असलेला गणेशोत्सव म्हणजे समाजातील विविध स्थरातील, वयातील, जातीतील लोकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा राखणारा उत्सव आहे. घरचं काम समजून रात्र-दिवस, ऊन-पाऊस न पाहता मंडळाचं काम करताना तरुण झटत असतात. त्यातून एक मेकाप्रति आदर, प्रेम, आपलेपणा वाढतो. माझे मंडळ, माझ्या मंडळातील सदस्य हे आपले वाटतात.
यातून नवीन नेतृत्व तयार होत. संघटन बांधणी, सगळ्यांना सामावून घेऊन पुढे न्यायचे, सुख दुःखात साथ द्यायची ही भावना तरुणाच्या मनात निर्माण करणारा गणेशोत्सव आज वेगळ्या टप्प्यावर पोचला आहे.
काळ बदलला व गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. काळाप्रमाणे बदल हवा व त्याचे स्वागतही हवे. पण सर्वजनीक गणेशोत्सवाचे आनंददायी व भक्तिभावाचे वातावरण जाऊन त्याला व्यावसाईक व हिडीस स्वरूप आले...व ते एवढे वाढले की वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणे चालू झाले. व ही खंडणी न देणाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली....एकूणच आनंददायी, भक्तीभावणे, उदात्त हेतूने चालू झालेला गणेशोत्सवात कर्कश आवाज, सार्वजनिक रस्ते अडवणे, चांगले रस्ते उकरने, खड्डे काढणे, उत्सव संपल्यावर ते तसेच सोडून देणे. विरोध केला की धर्मद्रोही ठरवणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, डॉल्बी लाऊन हीडीस गाण्यावर नाचगाने करणे, हानिकारक गुलालाची उधळण करणे, मिरवणूक भरपूर वेळ चालवणे, पोलिसांना व जनतेला वेठीस धरणे अश्या एक ना अनेक कारणाने गणेशोत्सवाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भाव निर्माण व्हायला लागला.
पोलीस सुध्दा माणूस असतो हे सार्वजनिक उत्सव करणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यालाही वाटते आपल्या प्रियजनाबरोबर अशा उत्सवांचा आनंद घ्यावा, पण फक्त सर्वांच्या सुरक्षेसाठी व उत्सव व्यवस्थित पार पडावा म्हणून तो ड्युटी करत असतो. याचे किमान भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
एका गावात, गल्लीत, शहरात किती सार्वजनिक मंडळे असावीत याचा काहीच हिशेब नाही. गल्लोगल्ली मंडळेच मंडळे. प्रत्येक राजकीय महत्वकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीला गणेशोत्सव मंडळ म्हणजे राजकारणात यायचा राजमार्ग वाटायला लागला व तिथेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वाट लागली. कोना एका व्यक्तीच्या दावणीला विशिष्ठ मंडळे बांधली गेली.
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे समाजहिताच्या कामासाठी आग्रही असतात व तशी कामे करतात. पण बरीच मंडळे अजून चूकीच्या पध्द्तीने कामकाज करतात, राजकीय नेतृत्व किंवा सरकार या बाबत त्यांचे कान उपटण्याचे धाडस दाखवत नाही.
गणपती मूर्ती कोणत्या प्रकारची व कोणत्या मटेरियलची असावी, किती उंचीची असावी व त्या पासून पर्यावरण हानी होऊ नये या बद्दल अनेकांची जनजागृती चालू आहे. व लोकांच्यात त्या बद्दल जागृती वाढत आहे. पण कृत्रिम हौदात मुर्ती विसर्जनाला विरोध किंवा त्या मुळे अत्यंत नाजूक असलेल्या भावना दुखावणे हा एक नवीन वाद अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे.
मुळात आपल्या भावना एवढ्या नाजूक नसाव्यात की त्या लगेच दुखावतील. निसर्ग जर परमेश्वराणे निर्माण केला असेल तर त्या निसर्गाची हानी होणे त्याला आवडेल का? तीही त्याच्याच मूर्तीने. मला वाटते त्यालाही ते आवडत नसावे....पण त्याला बोलता येत नसल्यामुळे, मुकी बिचारी कुणीही हाका अशीच त्याची अवस्था झाली आहे.
हिंदू धर्मातील सण उत्सव खूप चांगले व वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे आहेत. प्रत्येक सण उत्सवसमागे काहींना काही चांगला हेतू, उद्देश आहे.
गणेशोत्सव सुद्धा खूप लोकप्रिय, तरुणाईचा भरपूर सहभाग, जोश, जल्लोष असणारा असा उत्सव आहे. थोडासा भरकटला आहे पण तुम्ही आम्ही, समाजातील जबाबदार धुरणींनी जर आपापल्या पातळीवर प्रयत्न केला तर नक्कीच आशादायक चित्र बघायला मिळेल.
बरीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक काम करतात व प्रत्येक वर्षी त्यात वाढ करतात.
खेड्यापाड्यात व शहरात बेरोजगारी वाढली आहे. तरुण तरुणी मोबाईल, इंटरनेट, सोशलमीडिया, वेगवेगळी व्यसने, नैराश्य याने ग्रासली आहेत. शहरातील वेगळे तर ग्रामीण भागातील वेगळे प्रश्न आहेत. काममधंदा, नोकरी नसल्यामुळे तरुणांची लग्न ठरत नाहीत. त्यातून कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत. असे एक ना अनेक सामाजिक प्रश्न असताना तरुनांच्या मनाला उभारी देणारा, थोडंस नैराश्य विसरायला लावणारा गणेशोत्सव गरजेचा आहे...पण त्याला चांगल्या विचारांची व चांगल्या कृतीची बैठक हवी. याचे भान तरुणांना व समाजाला यायला हवे.

No comments:

Post a Comment