My Blog List

Thursday 14 December 2017

तंबाकुचे_व्यसन_आणि...23/07/17

तंबाकुचे_व्यसन_आणि_तेरा_रुपये
संदिप रामचंद्र चव्हाण
23 जुलै 2017

गायछाप तेरा रुपयाला झाली भाऊ...गरिबांनी सकाळचा नैसर्गिक विधी कसा करावा.... अशा आशयाचा मेसेज सोशीलमीडियावरून फिरत आहे...गमतीचा भाग सोडला तरी तंबाकू किंवा तंबाकुजन्य गोष्टींचे व्यसन समाजात किती खोलवर रुजले आहे हेच यावरून दिसून येते.
तंबाकुच्या शेतीची मोकाट जनावरांपासून सुरक्षा करावी लागत नाही, कारण कोणतेही जनावर तंबाकुला तोंड लावत नाही. अगदी गाढव सुद्धा नाही... मग... तंबाकुला गाढवच तोंड लावत नाहीत किंवा  तंबाकुला तोंड न लावणारे गाढव असतात का?? असा प्रश्न एखाद्या तंबाकू प्रिय व्यक्तीला पडला तर तो त्याचा दोष न मानता त्याच्या विचारांच्या उंचीचा मानावा.
तंबाकुचे किंवा तंबाकू जन्य गोष्टींचे त्यात सिगारेट, बिडी इत्यादिंचे व्यसन, त्याचे दुष्परिणाम या बद्दल वेळोवेळी खुप लिखाण, माहिती, व प्रसिद्धी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे..पण तो कायदा धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते. तंबाकुच्या पिचकाऱ्या रस्तोरस्ती व कोपऱ्याकोपऱ्यात टाकल्या जातात. यातून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
आज तंबाकू बद्दल लिहावे असं वाटलं त्याला कारण म्हणजे व्हाट्स वर फिरणारा मेसेज व त्याची खात्री म्हणून पाणपट्टीवर गायछापची 16 ग्रॅम वजनाच्या तंबाकुची पुडी 13 रुपयाला व  कोणत्यातरी कंपनीची 9 ग्रॅम चुना पुडी 1 रुपयाला आहे हे पाहिले... ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची गाडी विचारा कशाला या म्हणी प्रमाणे तंबाकू, सिगारेट, गुटका, दारु या जगप्रसिद्ध वस्तुंच्या चालू ब्रँडबद्दल व लेटेस्ट किमतीबद्दल माझे बरेच अज्ञान आहे.
सर्वसाधारण सर्व तंबाकू कंपन्यांच्या तंबाकू पुडीची किंमत याच दरम्यान असेल असं मानुया. सिगारेटची किंमत जास्त आहे एका सिगारेटची किंमत 13 ते 15 रु पर्यंत आहे. अजूनही महागड्या सिगारेट, सिगार आहेत. पण सर्वसमान्य आर्थिक स्थर असणाऱ्या वर्गातील बहुसंख्य लोकसंख्या या किमतीच्या सिगारेट व 10 ते 15 रु किंमतीची तंबाकू पुडी घेण्यावर भर देतात. त्याच प्रमाणे गुटका, मावा हे व्यसन करणार्याणीची संख्या सुद्धा असंख्य आहे. गुटक्याच्या पुडी की ज्याला पाण मसाला हे गोंडस नाव दिले आहे याची किंमत पाच रुपये ते साठ रुपयापर्यंत आहे अशी माहिती खाणारे देतात.
सर्वसाधारण रोज एक तंबाकुची पुडी संपवणारा महिना 400 ते 450 रुपये, तर वार्षिक 5 हजारच्या आसपास खर्च करतो. दिवसला चार ते पाच सिगारेट ओडणारे दिवसाला 50 ते 75 रु खर्च करतो म्हणजे महिना दीड ते दोन हजार व वार्षिक 20 ते 24 हजार खर्च करतात. गुटखा खाणारे वार्षिक 5 ते 15 हजार खर्च करतात.
वरील खर्च करणारे हे आर्थिक परिस्थिती बेताची असणारे आहेत. उंचे लोग उंची पसंद असणारे या पेक्षा खूप पैसा तंबाकुजन्य व इतर उंची व्यसनावर खर्च करतात.
तंबाकू व गुटखा हे व्यसन ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर दिसते, तर सिगारेट व गुटखा हे व्यसन शहरी भागात जास्त प्रमानात दिसते. गुटक्याने सर्वत्र सर्वमान्यता मिळवली आहे असेच यावरून दिसते.

तर चर्चेचा मुख्य मुद्दा असा की तंबाकुजन्य व्यसन करणारे महिना पाचशे ते दोन हजार रु स्वतःच्या व्यसनावर खर्च करतात, कुठेही थुंकतात, स्वताच व इतरांचं आरोग्य धोक्यात घालतात. पण घरातील लहान मुलांना चांगला सकस आहार मिळावा व त्यासाठी महिन्यातून काही वेळा त्यांना फळं, काजू, खारीक, बदाम, अंजीर, तुप, सकस आहारासाठी लागणारे इतर घटक इत्यादी खायचे पदार्थ मिळावे किंवा आणून द्यावे असं त्यांना वाटतं नाही. त्यावेळी हे खाण पैसेवाल्यांचं गरिबाला कुठलं काजू आणि बदाम असा सूर लावला जातो. तेच इतर शालोपयोगी वस्तूंच स्वतःच्या तंबाकुला 500 रु असतात पण मुलांच्या बसपासाठी, वह्या,पुस्तके, दप्तर, शुज, सायकल घेण्यासाठी  पैसे नसतात.
आठशे ते नऊशे रुपये किलो तंबाकू, काही हजार रुपये किलो गुटखा, काही शे रुपये लिटर दारु घेताना महागाईचा विचार होत नाही. पण 50 रु लिटर दुध घेताना, 200 रु किलो खारीक घेताना, 600 रु किलो काजु  बदाम घेताना, 500 रु किलो तूप घेताना हा विचार केला जातो व महाग म्हणून घेण्याचे टाळले जाते. त्यावेळी हे व्यसन स्वतःला किती आत्मकेंद्री करते व आरोग्यास घातक गोष्टीसाठी आपण खर्च करतो पण मुलांच्या आरोग्यपूर्ण वाढीच्या गरज असणाऱ्या गोष्टीसाठी मात्र पैसा नसतो. याला काय म्हणावे...

त्याच प्रमाणे घरातील गृहलक्ष्मीला या वर्षाचे त्या वर्षाला साडी चोळी घेतली जाते... तिला ही कधीतरी सुखद धक्का देऊन एखादे आवडीचे गिफ्ट दिले तर संसारात अजुन रंगत येईल..मग ते कपडे असोत, संसारसाठीच्या वस्तू असोत,अथवा अन्य काही ...तर हे तंबाकू गुटक्याचे पैसे सत्कारणी लागल्यासारखे होतील.
त्याच प्रमाणे आजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिक नियोजनाला खूप महत्व आहे. या व्यसनात वाया जाणारा पैसा जीवन विमा, म्युच्युअल फ़ंड, आरडी मध्ये गुंतवला तर काही वर्षांनी लखपती होण्याचे भाग्य मिळेल.
आपण आपली आर्थिक परिस्थिती नसताना आरोग्यास घातक व्यसनावर किती पैसा खर्च करतो आणि एखाद्या सामाजिक कामावर किती?? हे एखादा स्वतःस विचारणे गरजेचे आहे...
वाचा विचार करा...शेवटी पैसे तुमचे, आरोग्य तुमचे, व कुटुंबही तुमचं आणि व्यसनही तुमचेच....काय ठेवायचे काय सोडायचे...कशाला महत्व द्यायचे हे ठरवण्याइतप्त तुम्ही सुज्ञ आहात.
(आर्थिक परिस्थिती नाजुक आहे, कष्ट करुन घर संसार चालवतात पण कोणतेही व्यसन करत नाहीत त्याच्यासाठी यातील कोणतीही गोष्टी लागु नाही)

No comments:

Post a Comment