My Blog List

Friday 15 December 2017

काकस्पर्ष 13/09/17

काकस्पर्ष......
13 सप्टेंबर 2017
सकाळी लवकर उठणारा...एका डोळ्याने पाहणारा... मिळेल ते भाऊबंधाना देऊन व वाटून खाणारा...निसर्गातील महत्वाचा स्वछतादूत...कावळा.

आपण लहानपणापासून कावळा व चिमणीची गोष्ट ऐकत आलो आहोत...पण कावळा कायमच व्हिलन ठरवल्यामुळे किंवा बालमनावर तस बिंबवल्यामुळे कावळ्याबद्दल लोकांच्यात बहुदा प्रेम नसावे. पण दुसऱ्या गोष्टीत कावळा किती हुशारीने छोटे छोटे दगड टाकून मडक्यातले पाणी वर काढतो व पितो..यात कावळ्याची बुद्धिमत्ता, चिकाटी दिसते. पण चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा जन्मजात स्वभाव असल्यामुळे आपल्याला कावळ्याची ती हुशारी लक्षात राहत नाही. आता तर #काऊ' म्हणलं की मुलं #गाई' दाखवतात. एक घास चिऊचा, एक घास काऊचा करुन लहानग्यांना चारणाऱ्या आई, माई, ताईला आता वेळ आहे कुठे?
पण कावळा कितीही नावडता असला तरी पितृ पंधरवडा आला की सगळ्यांना आठवण होते ती कावळ्याची. पिंडाला कावळा शिवला की पितरांची शांती होते व आत्मा मुक्त होतो असा समज जनमानसावर आरुढ झाला आहे. त्याच बरोबर कोणताही व्यक्ती परलोकवासी झाला की त्याच्या प्रियजनाना त्याच्या मातीला(2ऱ्याला किंवा 3ऱ्याला, सावरायला महाराष्ट्रात वेवेगळे शब्द वापरतात), दशक्रिया विधीला, नंतर श्राद्धाला व शेवटी पितृपंधरवढ्यात कावळ्याची आठवण हमखास होते.
तर असा मुक्ती देणारा कावळा गरजेपुरता आवढणारा पण इतर वेळा दुर्लक्षित असणारा पक्षी आहे.
मागील काही दिवसांपूर्वी काही मराठी न्यूज चॅनेलला दाखवले..नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांज्यात एक कावळा अडकला होता...फायरब्रिगेडणे त्या कावळ्याला सुखरूप काढले पण तो जखमी झाला असल्यामुळे जास्त हालचाल करत नव्हता... एका व्यक्तीने त्याला पकडून हातामध्ये घेतले...मग काय लोकांची झुंबड उडाली पिंडाचा नैवेद्य घेऊन त्या कावळ्याकडे.... पितृपंधरवढ्यात हमखास काकस्पर्शाची पर्वणी साधण्यासाठी लोकांची रांग लागली नसती तर नवलच..
भुके_नाहीं_अन्न_मेल्यावरी_पिंडदान!!
हे_तों_चाळवाचाळवी_केलें_आपणची_जेवी!!

संत तुकाराम महाराज म्हणतात की माणूस जिवंत आहे तो पर्यंत त्याला खाऊ पिऊ घाला, भुकेल्याना अन्न द्या, आई वडिलांची सेवा करा. मेल्यावर पिंडदान करणे व त्यासाठी बनवलेले आपणच खाणे ही शुद्ध फसवणूक आहे.
खर तर पितरांना शांत कराव लागतं नाहीतर ते त्रास देतात ही गोष्टच न पटणारी आहे..मनुष्यजाती आपल्या वंशवाढीसाठी सतत प्रयत्नशील असते..भावीपिढीसाठी कष्ट उपसते..मग मृत्यूनंतर पित्र बनून त्या वाढलेल्या वंशवेलीला त्रास का देईल?? असो....
किमान पितरांच्या मुक्तीसाठीतरी कावळ्यांची आठवण होतेे..हे ही नसे थोडके!
कावळ्याचे काही गुणविशेष माणसाने घेण्यासारखे आहेत...कावळा काळा असतो पण त्याला बिलकुल न्यूनगंड नसतो..तो कोणतेही क्रीम तोंडाला किंवा शरीरावर लावत नाही किंवा फेशियल करत नाही. तरीही तो आनंदी असतो. तो कुणालाही आवडत नाही म्हणून त्याला काही फरक पडत नाही.
असं म्हणतात की कावळ्याला एकाच डोळ्याने दिसते कावळा एकाक्ष पक्षी आहे...म्हणजे तो अपंग असूनही भक्ष मिळवण्यात पटाईत आहे...म्हणजे त्याने स्वतःला सिद्ध केले आहे..हम भी किसीसे कम नही.
कावळा हा भारत व अन्य अनेक देशात आढळतो, जंगलात, झाडावर, घरावर, बिल्डिंगवर, इलेक्टरीक टॉवरवर, तारांवर, ग्रामीण भागात, शहरी भागात,कुठेही स्वतःला अडजेस्ट करुन घेतो..जमेल तसे काटक्या कुटक्यांचे घर बांधतो..2bhk,3bhk हवा असा अट्टाहास नसतो. म्हणजे गरजा कमी ठेवतो व आनंदी राहतो. त्याचप्रमाणे तो कोकिळीची अंडी उबवतो...म्हणजे सहकार्य करतो. त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे काहीही खायला मिळाले तरी तो एकटा खात नाही...काव काव करुन आपले सगळे मित्र, सगेसोयरे बोलावतो व मिळेल ते वाटून खातो. एकूणच तो एक_मेका_साह्य_करु_अवघे_धरु_सुपंथ अस जीवन जगत असतो.
कावळ्याचे इतके सारे गुण जर मनुष्याने घेतले तर समाजात खुपकाही चांगला बदल घडेल..
कावळा मेलेल्या जनांवरापासून ते मिष्ठांनापर्यंत काहीही खातो..पर्यावरण स्वच्छता हे वृत घेऊन आयुष्य जगतो..पण वाढत्या शहरीकरणामुळे, वाढत्या वृक्षतोडीमुळे, पिकावरील रासायनिक औषधांच्या अतिवापरामुळे जसा सर्व पक्षांच्या प्रजनन क्षमतेवर,वाढीवर, विपरीत परिणाम झाला आहे तसा तो कावळ्यांच्या संख्येवर सुद्धा झाला आहे. आज महाराष्ट्रातून गिधाड हा अन्नसाखळीतील महत्वाचा घटक नष्ट होण्याच्यामार्गावर असताना कावळाही त्याच परिस्थितीत आडकावा हे नैसर्गिक, आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
कावळ्यांची संख्या कमालीची घटत असताना मनुष्यरूपी डोमकावळ्यांची संख्या राजकारणात, समाजकारणात व एकूणच जगभरात कमालीची वाढत आहे. वारंवार पक्ष बदलून स्वतःला अडजेस्ट करुन राजकारण्यांनी कोणत्याही परिस्थितीत अडजेस्ट करण्यात कावळ्यालाही मागे टाकले आहे.
कोणी कितीही हटकले, निंदा केली तरी लाज ना शरम,  'गिरे तो भी टांग उपर' असे कावळ्यालाही शरम वाटनारे कृत्य भ्रष्ट राजकारणी, भोंदू बाबा, भ्रष्ट सरकारी नोकर, समाजातील विविध घटकांकडून व लोकांच्याकडून होऊ लागले आहे.
मिळेल तेवढे, मिळेल त्या चांगल्या वाईट मार्गाने आपले घर भरुन आपल्या ज्ञातीबांधवाना वाऱ्यावर सोडणारे डोमकावळे सर्वत्र मुक्त संचार करत आहेत..त्यांना ना धाक आहे समाजाचा, ना शासनाचा, ना कायद्याचा.
आपल्याला हा भारत खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण बनवायचा असेल तर गरज आहे पर्यावरण प्रेमी खऱ्या कावळ्यांची...त्यासाठी बंदोबस्त करावा लागेल आपल्यातल्या डोमकावळ्यांचा.
मगच खऱ्या अर्थाने पितरांना मुक्ती मिळेल...
नाहीतर आपण अशीच फसवणूक करत राहू ..... आपली व ....आपल्या पितरांची!!
.....संदिप रामचंद्र चव्हाण

No comments:

Post a Comment