My Blog List

Monday 11 December 2017

संस्कृतीकडून विकृतीकडे.... भाग एक. 20/12/17

संस्कृतीकडून_विकृतीकडे... भाग एक

ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका, मस्तानोंका..., इस देश का यारो क्या कहना!!!,, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती!!! अशी खूप प्रसिद्ध असणारी गीतं आहेत. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला हमखास ऐकायला मिळतात. यातून देशाच्या संस्कृतीबद्दल अभिमानास्पद वर्णन आहे.... हजारो वर्षांची परंपरा असणारा, अनेक भाषा, अनेक चालीरीती, सर्व ऋतू, नद्या, डोंगर, पर्वत, समुद्र, वाळवंट असे नैसर्गिक वेगवेगळेपण असणारा, असंख्य वीर-योध्ये, असंख्य वीरांगना, संत, महात्मे, समाजपुरुष, युगपुरुष ज्या मातीत घडले तो देश म्हणजे आपला भारत देश!
भा म्हणजे 'तेज, प्रकाश', रत म्हणजे रममाण असणारा.... तेजात, प्रकाशात रममाण असणारा, एकरूप असणारा जो, तो भारत! असा काहीसा अर्थ आपल्या देशाचा आहे. या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली, या आक्रमकांनी संस्कृतीची देशवासीयांची हानीही केली. पण त्या त्या वेळच्या महापुरुषांनी, जनतेने ती आक्रमणे परतवली, पचवली व भारताचे भारतीयांचे वेगळेपण जपले. अस्तित्व टिकवून ठेवले. अगदी शेवटी इंग्रज आले त्यांनी दीड शकत राज्य केले. त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून जमेल तसे लोक लढले, आंदोलने केली, फासावर चढले. लक्षावधी लोक देशासाठी हुतात्मा झाले... काहींची नावे इतिहासाला माहीत आहेत तर बर्याचजनांची नोंदही नाही... पण जे स्वातंत्र्य मिळाले ते अनेकांच्या त्यागातुन, कष्टातून, रक्तातुन मिळाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील लोक आज हयात नाहीत किंवा वृद्ध झाले आहेत. पुढे भारत पाकिस्तान, भारत चीन अशी युद्धे झाली, दहशतवाद हे छुपे युद्ध नेहमीचेच चालू आहे. यातही असंख्य जवान हुतात्मा झाले. या सर्वांचा त्याग देशासाठी व देशवासीयांंसाठी होता. याचे स्मरण युवा पिढीने ठेवणे गरजेचे आहे.
परंतु या दोन, तीन दशकात आपल्या देशाची एकूण परिस्तिथी, संस्कृती कडून विकृतीकडे चालली का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या आजूबाजूला जरी परिस्थिती पाहिली तरी अनेक विकृतीने भरलेल्या गोष्टी दिसतात. त्यापैकी तरुनपिढीचा ओढा विकृतीकडे अधिक दिसतो आहे.
काही दिवसांपूर्वी कराड मध्ये किरकोळ कारणावरून कॉलेज युवकाचा खून कॉलेज युवकांनीच केला अशी बातमी वाचनात आली, तर काही दिवसांपूर्वी दिल्ली जवळील गुरुग्राम मधील मोठ्या खाजगी शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलाचा खून अकरावीत शिकत असणाऱ्या त्याच शाळेतील मुलाने केला.. कारण काय? तर पालक मिटिंग टाळावी म्हणून!
कोणत्याही शहरात कॉलेजमधील युवकांची भांडणे, मारामारी, हिरोगीरी, चमकोगिरी, भन्नाट बाईक चालवणे, कट मारणे, बाईक स्टंट करणे, वाहतुकीचे नियम तोडणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मुलींची छेड काढणे, मुलींवर कॉमेंट करणेे, कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चरला दांडी मारणे व बाहेर खाजगी क्लास लावणे, वाढलेली व्यसनाधीनता, गुन्हेगारी विश्वाचं आकर्षण वाटणे, दादा- भाई आदर्श असणे व खऱ्या आदर्शाना विसरणे, हे प्रमाण वाढले आहे. कॉलेजमधील लेक्चरला दांडी मारण्यात मुलीही मागे नाहीत. खूप सारा वेळ मोबाईल इंटरनेटवर ऑनलाईन असणे, रोडवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालतानाही सुरक्षेचे भान न ठेवणे, हे व्यसन मुलामुलींमध्ये वाढत आहे. कॉलेजच्या कट्ट्यावर, गार्डनच्या बाकड्यावर, हॉटेलच्या खुरच्यावर प्रेमी युगलांची संख्या कमालीची वाढली आहे. मुलांच्याबरोबर तोंडाला स्कार्फ बांधून बाईकवरून दूर दूर भटकणे, निर्जन स्थळी वेळ घालवणे व घरच्यांना याची दादही लागू न देणे यात मुलीही पटाईत झाल्या आहेत.
ठराविक वयात भिन्नलिंगी आकर्षण असते पण त्यालाच प्रेम मानून, खर तर ते शारीरिक आकर्षण असते हे समजून न घेता थ्रिल म्हणून या लव्ह बर्डसनी फिजिकल रिलेशनशिप पर्यंत मजल मारली आहे. शरीर सुखाची एकदा चटक लागली की वारंवार ते हवे वाटणे, पुढे ब्रेकप होणे, याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक व खाजगी आयुष्यावर होत आहे, यातून नैराश्य येणे, दारू-सिगारेटच्या आहारी जाणे, एकलकोंडेपणा, आक्रमकता, संयम हरवणे, आत्महत्तेसारखं टोकाचं पाऊल उचलणे अशा घटना घडत आहेत. कॉलेज मधील 90% भांडणं, मारामाऱ्या या अशाच करणातून होतात. यात समाजाचे, पालक, शिक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष चालू आहे.
"अडाणी आई घर वाया जाई" हे समाजाला समजू लागले... मुली शिकल्या, मोठ्या पदावर गेल्या, स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या राहिल्या. पण आई वडील नोकरीला व मुलं पाळणाघरात अशी नवीन व बालकांचे बालपण बंदिस्त करणारी व्यवस्था उभी राहिली. विभक्त कुटुंब, करियरच्या मागे धावणारे आई बाबा, मायेच्या माणसांच्या सहवासाला पोरकी झालेली लहान मुलं, कमी वयात मागेल ते मिळणे, मोबाईल, टीव्हीचे अतिप्रमाणात आकर्षण या व अश्या गोष्टींमुळे लहानपणापासूनच मुलं असंवेदनशील हट्टी होत आहेत. त्यांना कशाप्रकारे हाताळायचे या बद्दल नवपालकांच्यात संभ्रम आहे. पळवून नेलेली मुलं, अनाथ असणारी मुलं, कमी वयात गुन्हेगारीकडे वळालेली मुलं, लैगिंक अत्याचाराला बळी पडलेली मुलं, शाळाबाह्य मुलं, शाळा कॉलेजला असून तिकडे न फिरकणारी मुलं यातूनही मुलांच्यात वर्तनसमस्या तयार होत आहेत.
आजची मुलं ही उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे या घटनांकडे दुर्लक्ष उपयोगाचे नाही.

आपल्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षणाची कथा अजूनच भयानक आहे.. प्रिप्रायमरीचे उदंड पीक आले आहे. खाजगी प्रायमरी मध्ये खूप अभ्यासक्रम, प्रोजेक्ट्स, रट्टे मारून मुलांना पोपटपंची करायला लावणे इत्यादी बाबी आहेत. सरकारी शाळांचे तर वास्तव भयानक आहे. मुलांना फक्त वरच्या वर्गात ढकलणे चालू आहे. काही शाळा अपवाद आहेत. अशीच मुलं पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिककडे प्रवास करतात. ज्यांचा बालपणीचा पायाच डळमळीत आहे त्यांची आयुष्याची इमारत उभी राहते पण छोट्याशा धक्क्याने कोसळते.
गणिताच्या विषयात व्यवहाराचे गणित शिकवले जात नाही, आयुष्य जगताना आनंदाची बेरीज तर चुकीच्या गोष्टींची वजाबाकी करायची असते, नात्यांचा गुणाकार अन नैराश्याचा, अपयशाचा भागाकार करायची शिकवण अभ्यासक्रमात नाही. जे शिकवले जाते त्या साइन, कॉस, टॅन चा व्यवहारात उपयोग नाही.
अशीच कथा इतर विषयांची आहे...
इतिहासाच्या विद्यार्थ्यांना इतिहास हा भूतकाळातील चुका टाळून वर्तमान सुधारणे व भविष्य उज्वल घडवणे या साठी जाणून घ्यायचा असतो याची कल्पनाच दिली जात नाही, भूगोलाच्या विद्यार्थांना दिशा सांगताना आयुष्याची दिशा कशी ठरवायची याचे ज्ञान मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी दिशाहीन होतात. अर्थशास्त्र शिकणार्याला समाजाचे, घरचे अर्थशास्त्र कळत नसेल आर्थिक परिस्थिती नसताना EMI वर चैनीच्या गोष्टी घेतल्या जात असतील व क्रेडिट नसताना क्रेडीतकार्डचा वापर करून चक्रवाढ व्याजात अडकत असतील तर अश्या अभ्यासक्रमाचा उपयोग आहे का? या सर्व घटकांचा विचार व्यवस्थेने करणे गरजेचे आहे.
तरुण पिढी, समाज, गुन्हेगारी वृत्ती यावर ना कायद्याचा धाक आहे ना पोलिसांचा....
त्यातच भर म्हणून आधी फुकट व आता अनलिमिटेड इंटरनेटमुळे कायम ऑनलाइन असणे व फेसबूक, व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम, ट्विटर यालाच वास्तव मानणारी पिढी मानसिक रोगी होत आहे. आभासी जग व वास्तव जग हा फरक लक्षात न घेता त्यात गुरफटून गेलेली तरुण तरुणी जगण्याची दिशा हरवून बसली आहेत.  टीव्ही, चित्रपट, इंटरनेट माध्यमातून चंगळवादाला खतपाणी मिळेल असे भरपूर कार्यक्रम आहेत. या चक्रव्यूहात सारासार विचार करण्यात कमी पडत असणारी तरुण पिढी सापडत आहे.

याकडे दुर्लक्ष समाज म्हणून सर्वांना घातक आहे. रोगावर वेळीच उपचार झाला नाही तर पेशन्ट दगावण्याची शक्यता असते... आज आपली तरुणपिढी याच अवस्थेतून जात आहे.. तिचे पूर्ण विकृतीत रूपांतर होण्याआधी सर्वांनी सजग व सावध होणे गरजेचे आहे. (क्रमशः)
... संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.29 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)

भाग २ खालील लिंकवर वाचा..
https://sandiprchavan.blogspot.in/2018/01/201217.html?m=1

No comments:

Post a Comment