My Blog List

Friday 15 December 2017

गोतावळा....मला आवडलेले मराठी पुस्तक 09/11/17

9 नोव्हेंबर 2017 
गोतावळा म्हंटल की डोळ्यासमोर येतो तो गण-गोत आणि नात्यागोत्यांचा पसारा....पण गोतावळा काय फक्त मानवी नात्यांचा असतो?
गोतावळा:- या आंनद यादवांच्या पुस्तकात वेगळाच गोतावळा अनुभवास येतो, कमी अधिक प्रमाणात कृषी संस्कृतीशी नात असणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव आलेला असेल...पुस्तक ग्रामीण संस्कृतीशी नाळ सांगणार आहे..चांगला वाचक दोन/ तीन बैठकीत वाचून संपवेल अस....तर त्या बद्दल थोडंस...  
संदिप रामचंद्र चव्हाण
गोतावळा --लेखक आनंद यादव.
गोतावळा कथेतील नायक #नारबा हा एका मळ्यात वीस वर्षे सालगडी म्हणून राहणारा...फक्त दोन टाईम जेवण, वर्षांतून एखाद्या वेळी कापडं यावरच अपार कष्ट करुन मालकाचा मळा फुलवणारा, पिकवणारा...अगदी लहान वयात कामाला जुंपून घेऊन अकाली प्रौढ बनलेला, अशिक्षित,अडाणी, आई-बा, भाऊ- बहीण, बायको-पोर नसलेला एकटा-एकाकी....
दिवसभर ढोर मेहनत करुन मालकाच्या घरुन आलेला जेवणाचा डबा खाऊन मळ्याच्या वस्तीला खोपित राहणारा... कुणाशी दोन शब्द बोलाव म्हणलं तरी आजूबाजूला एक माणूस नाही...आजारी पडलं, कष्टानं हात पाय दुखलं तर बोलणार कुणाला आणि कुणाशी?? कामात कसूर करेल म्हणून मालकाने लग्न लाऊन दिलं नाही, यंदा करू, पुढल्या साली बघू, अस करुन लग्न झालं नसलेला ...शारीरिक, मानसिक कुचंबणा सहन करून अंतरीच दुःख मनात तसच दाबून ठेवणारा, जिवाभावाचं एकही माणूस साथीला नसल्यामुळं मुक्या प्राण्यावर अतोनात जीव लावणारा , प्रेम करणारा.....नारबा!
कोंबडा, कोंबडी, पिल्लं, गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, बकरे, करडू, कुत्रा, कासव, मांजर, घोडा, ससा, धामण, मोर, लांडोर, कावळे, घुबड्, मधमाश्या, कोल्हे, गाढवं, खंड्या, खेकडे, यांच्या सानिध्यात राहणारा व त्यातील मालकाच्या दावणीला असणाऱ्या पण मुलासारखं प्रेम करून वाढवलेल्या गुरांढोरांना आपलं गणगोत मानणारा नारबा आपले माणूसपण विसरत नाही कधीकधी तर त्याला वाईट वाटते स्वतःच्या माणूस असण्याबद्दल!!
पाच बैल त्यापैकी एक म्हातारा म्हालिंग्या, दोन मध्यम वयस्क तर दोन तरुण खोंड, दोन रेडे, यांना शेतीच्या कामाला सांभाळून कमी खर्चात जास्त कष्ट करुन शेती कशी पिकेल हा हिशेब मालकाचा...अजून दावणीला म्हैस, गाई(पाडी), शेरड आहेत. यातील सर्व गुरं कमी करुन मालकाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे...मालक व्यवहारिक दृष्ट्या त्याच्या जागी बरोबर आहे..यांत्रिक शेतीशिवाय पर्याय नाही हे त्याला सत्तरच्या दशकात समजलंय... पण नारबाचा जीव मुक्या गुराढोरांत अडकलाय तोही त्याच्या जागी बरोबर आहे..अशी ही कथा वाचत जाईल तशी फुलत जाणारी....शिक्षण, तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोचलं नव्हतं त्यावेळी शेतीची कामे कशी चालत या बद्दल सखोल माहिती आहे.. ज्यांचा कधीही शेतीशी व ग्रामीण जीवनाशी संबध आला नाही त्यांना समजायला अवघड वाटेल पण समजली तर सर्व घटना आपल्या समोरच घडत आहेत असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं...
रोज एक कोंबडीच पिल्लू मुंगूस पळवून न्हेतय  म्हणून मालकीणीन त्यांचा बाजार केला...कोंबडी आधीच मेलेली व पिल्लं विकली गेलेली, मग मागे राहिला म्हसोबला सोडलेला कोंबडा...अगदी एकटा... नारबा सारखा...मग तो आक्रमक झाला व कुत्र्या पेक्षा तोच मळ्याचा राकणदारी झाला...कोणा तिरायत माणसाला खोपिकड फिरकू द्यायचा नाही. रोज सकाळी नारबाचा अलार्म तो कोंबडाच..कोंबड्याने बांग दिली की नारबाचा दिवस चालू....एक दिवस त्यालाही म्हसोबाला कापायचं ठरतं व त्याला जाळं टाकून पकडायची जबाबदारी नारबावर येते...मुलासारखं वाढवलेल्या कोंबड्याच मटण खान नारबाच्या जीवावर येत...सकाळी कोंबडा पोटातच आरवतोय असा भास त्याला होतो...
कुत्री जखमी होऊन मरते...शेळ्या, बोकड विकली जातात, दोन रेडे व दोन बैल विकले जातात...म्हालिंग्या बैल मरणाच्या दारात असताना झाडं तोडायला आलेल्या श्रमिकांना खायला दिला जातो...दावणीची गाई एका महाराजांच्या आश्रमात सोडायची जबाबदारी नारबावरच येते...जड अंतकरणारे तो गाईला निरोप देतो...भरगच्च भरलेली दावन व खोप पार मोकळी होते...बांधावरील झाडं व मोकळ्या माळावरील भला मोठा पिंपळ तोडला जातो....कापला जातो...सगळा मळा व मोकळा माळ नारबाला ओसाड वाटतो..खायला उठतो...त्यातच नवीन ट्रॅक्टर व त्याचा ड्रायव्हर येतो...बैलांच्या जागी ट्रॅक्टर लावला जातो...राहिलेल्या बैल जोडीतील एकाने लाथ मारली म्हणून ड्रायव्हर बैलाला खूप मारतो...याचा संताप, चीड नारबाला येते ....मालकापशी तक्रार करतो पण मालक ड्रायवरची बाजू घेतो...नारबाच काळीज तुटून विदीर्ण होत...जिथे आयुष्यच्या जडणघडणीची वीस वर्षे घालवली तिथे आता आपली किंमत नाही हे त्याच्या लक्षात येतं... आणि तिथून निघायचा निर्णय नारबा घेतो...पण कुठं जाईल?? ना घर, ना दार , ना गण, ना गोत,  वर आभाळ खाली धरती या शिवाय कोणी नाही...होता तो गोतावळा संपला...एकटा नारबा..एकटाच राहिला.
पुस्तकाचे नाव:- गोतावळा
लेखक:- आनंद यादव
प्रकाशन:- मेहता पब्लिकेशन
किंमत:- 150 रु

No comments:

Post a Comment