My Blog List

Thursday 14 December 2017

आर्थिक नियोजनातील टप्पे 30/07/17

आर्थिक_नियोजनातील_टप्पे...
संदिप रामचंद्र चव्हाण
30 जुलै 2017

दाम करी काम अशी आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे. फक्त तीन शब्द पण या तीन शब्दात जन्मापासून मृत्यूपर्यंत पैसा किती महत्वाचा आहे हे दिसुन येते. मनुष्याला जीवन जगण्यासाठी किमान अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांची पूर्तता करावी लागते. त्याच बरोबर चौथी व आताच्या जगात जगण्यासाठी  शिक्षण ही सुद्धा मुलभूत गरजच मानवी लागेल. तर या गरजा पूर्तीसाठी गरज असते पैशाची...
पूर्वी समाजात चार वर्ण होते...आता सामाजातील आर्थिक स्थर पाहता अती गरीब ते अती श्रीमंत असे नवीन वर्ण म्हणजेच स्थर तयार झाले आहेत....अतिशय गरीब, गरीब, सामान्य, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत असे नवीन आर्थिक स्थर तयार झाले आहेत. या आर्थिक स्थरानुसार आहेरे व नाहिरे असे वर्ग तयार झाले आहेत. या स्थरांच्या आर्थिक गरजा, आर्थिक समस्या वेगवेगळ्या आहेत.
आज देशातील व जगातील काही कोटी लोकसंख्या एकवेळ पोटाला खाऊन एक वेळ उपाशीपोटी झोपते. तर काहींना एकवेळ सुद्धा अन्न मिळणे मुश्किल असते.
तर दुसरीकडे खाऊन खाऊन अजीर्ण होऊन माणसं मरतात अशीही बातमी येते..
जे अन्न मिळवण्यासाठीचे हाल तेच वस्त्र व निवारा या गरजांचेही...मग शिक्षण तर दूरची गोष्ट.
तरीही आजच्या घडली आर्थिक नियोजन या विषयावर चरच्या होणे गरजेचे वाटते, प्रत्येकाकडे जो काही पैसा उपलब्द असतो त्या नुसार आर्थिक नियोजन कसे असावे या बद्दल बोलू..
आर्थिक नियोजन करताना चार टप्पे किंवा गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. विमा, सेव्हिंग, गुंतवणुक व कर्ज
१) इन्शुरन्स (विमा):- यात उपप्रकार आहेत. जीवन विमा व आरोग्य विमा
अ) जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स मध्ये पारंपरिक विमा व टर्म इन्शुरन्स (प्युअर इन्शुरन्स) असे दोन प्रकार आहेत. कुटुंबातील कमावती मुख्य व्यक्तीचा अचानक नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यु झाला तर त्या कुटुंबाच न भरुन येणारे नुकसान होते. मुलं लहान असतील तर त्या कतुंबतील स्त्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आर्थिक खर्च व आर्थिक आघाडी कशी संभाळायची ही होय. या साठी प्रत्येक कुटुंब प्रमुखाने मोठ्या रकमेचा जीवन विमा काढणे गरजेचे आहे.
पारंपरिक जीवन विमा यामध्ये पॉलिसी म्याच्युअर झाली किंवा विमा असणारी व्यक्ती नैसर्गिक किंवा अपघातात मरण पावली तर पॉलिसीचे पैसे मिळतात. पण ही मिळणारी रक्कम महागाईनुसार पुरेशी असते का हा प्रश्न आहे. सर्वसाधारण एक लाखाच्या विम्याला (म्हणजे मिळणारे 2 लाख) 5 हजारच्या आसपास हप्ता बसतो(वय 25 च्या आसपास). मग वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट मिळण्यासाठी वार्षिक किती रक्कम हप्ता म्हणून भरावी लागेल? याचा विचार होणे गरजेचे आहे
शिवाय विमा काळात विमा धारक व्यक्ती आरोग्यपूर्ण व व्यवस्थित आहे अस मानलं तर पॉलिसी म्याच्युअर झाल्यावर मिळणारी राशी ही 4 ते 5% व्याज दराने मिळते.
म्हणुन टर्म इन्शुरन्स म्हणजेच प्युअर इन्शुरन्स याचा विचार होणे गरजेचे आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे ज्याने हा इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्या वारसाला हा फक्त त्या विमा धारकाच्या मृत्युनंतरच मिळतो. किंवा कायमचे अपंगत्व आल्यास काही रक्कम मिळते. यात इन्शुरन्स कव्हर जास्त व हप्ता कमी असतो. एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी टर्म इन्शुरन्स काढला व 30 वर्ष मुदत ठेवली तर त्याला ठरलेला हप्ता 30 वर्ष भरावा लागेल. 30 वर्ष कालावधीत तो व्यक्ती जिवंत राहिला तर रिटर्न एकही रुपया मिळत नाही. पण हा व्यक्ती इन्शुरन्स चालू असताना  त्याचा मध्येच अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर विमा रक्कम मिळते.
हा टर्म इन्शुरन्स वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट असावा.
म्हणजे वार्षिक 3 लाख उत्पन्न असेल तर 30 लाखाचा इन्शुरन्स असावा व हप्ता 5 ते 6 हजार प्रति वर्ष बसेल.
(येथे आपण इन्शुरन्स काढतानाचे वय 25 वर्ष अस गृहीत धरले आहे)
शुद्ध विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स म्हणजेच प्युअर इन्शुरन्स ही गरजेची गोष्ट आहे...आर्थिक नियोजनातील ती पहिली पायरी आहे. विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे हे प्रत्येकाने ध्यानी धरले पाहिजे.
ब) आरोग्य विमा:- आजकाल खाजगी,सरकारी सर्व स्थरात कायम स्वरूपी काम करणाऱ्या व्यक्तीला आरोग्यविम्याचे कवच मिळते किंवा त्या त्या संस्थांची हॉस्पिटल असल्यास तिथे उपचार मिळतात.
पण असंघटीत क्षेत्रात, शेती व्यवसायात, व्यपारी किंवा इतर सर्वसामान्य व्यक्ती की ज्यांना असा आरोग्य विमा स्वतःला काढावा लागतो त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करु नये.
कुटुंबातील प्रत्येकाला स्वतंत्र किंवा सर्वांना संख्येनुसार एकत्रित (फ्लोटर प्लान) आरोग्य विमा घ्यावा.
आरोग्य विमा पुरवणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत त्यांच्या नियम अठी पाहुन, कोणते आजार समाविष्ट आहेत, कोणते नाहीत, आता असणाऱ्या आजाराच्या उपचाराला पैसे मिळणार का, बाळंतपणासाठीच्या खर्चाची त्या मध्ये तरतूद आहे का?, कॅशलेस हॉस्पिटलची यादी हे सर्व बारकावे पहावे. आजच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चाचा विचार व आपले उत्पन्न पाहून हा विमा घ्यावा.
वरील दोन्ही प्रकारचे विमा काढताना विमा धारकास कोणता आजार किंवा व्यसन असल्यास लपवू नये...नाहीतर क्लेम सेटलमेंट वेळेस अडचणी येऊ शकतात.
२) सेव्हिंग
आता आर्थिक नियोजनातील पुढचा व महत्वाचा टप्पा म्हणजे सेव्हिंग म्हणजेच बचत.
आपण रोजचे आयुष्य जगत असताना रोजचा खर्च करुन जो पैसे शिल्लक राहिल त्याचे सेव्हिंग करतो. म्हणजे आधी खर्च मग सेव्हिंग... जगातील सर्वात मोठे गुंतवणुकतज्ञ वॊरेन बफेट म्हणतात आधी सेव्हिंग करावी व मग राहिलेला पैसा खर्च करावा.
आपल्याला रोजचा खर्च सोडून आपत्कालीन खर्च, लग्न, मुंज, जावळ, जत्रा, पाहुणे- राऊळे, छोट्या सहली, आवढीची गॅजेट, विम्याचे हप्ते इत्यादी साठी आपल्याला पैसा लागतो या साठी सेव्हिंग महत्वाची असते. तज्ञानच्या मते वार्षिक उपन्नाचा 10 ते 15 टक्के सेव्हिंग करावी. ही गुंतवून घरी, बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर, FD, RD, इत्यादी मध्ये असावी याला व्याजदर कमी असले तरी तरलता म्हणजे लिक्विडीटी जास्त असते असपणाला हवे तेव्हा अगदी थोड्या कालावधीत हे पैसे मिळू शकतात.
सेव्हिंग साठी काही अनावश्यक गोष्टी टाळणे गरजेचे आहे. त्यात व्यसने, गरज नसताना व अनावश्यक शॉपिंग, इ.
त्याच प्रमाणे नुसते पैसे साठवायचे म्हणुन मन मारण्यातही अर्थ नाही. वर्षातून एकदा दोनदा कुटुंबासोबत छोट्या सहली, गरजेची गॅजेट, परिपूर्ण आहारासाठी गरजेचे खाद्य समान, इ.
आयुष्य जगताना कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे हे समजून उमजून घेतल्यास व गरजा कमी असल्या की पैसा व वस्तू कमी लागतात हे समजल्यास जीवन सुकर होण्यास मदत मिळते. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही जीवनपध्द्ती अवलंबल्यास आर्थिक घडी व्यवस्थित बसु शकते. व यातुन सेव्हिंग होऊ शकते.
पण हे सेव्हिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट मानू नये. ही फक्त साठवणूक मानावे. आपत्कालीन निधी म्हणुन वार्षिक उपन्नाच्या 50% पैसे सेव्हिंग अकाऊंट किंवा त्वरित मोडता येईल अशा FD, लिक्विड फंड मध्ये असावा
३) इन्व्हेस्टमेंट
आर्थिक नियोजनातील पुढचा व सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) होय.
रिटायरमेंट प्लॅनिंग, म्हातारपणी खर्चासाठी पैशाची तरतूद, मुलांचे उच्च शिक्षण व लग्न, घर, चारचाकी गाडी व देश विदेशात सहली इत्यादी मध्यम व दीर्घ पल्ल्याची ध्येय(गोल) असतात व प्रत्येकाला म्हातारपण हे नक्कीच येते त्यामुळे त्यावेळेसाठी खर्चाची तरतूद म्हणून तरुणपणातच थोडी थोडी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
आता ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारात करता येते. दीर्घ मुदतीच्या बँक FD, PPF, सोने, म्युचुअल फ़ंड, विविध कंपनीचे शेअर्समध्ये थोडी थोडी पण नियमित गुंतवणूक केल्यास दीर्घ पल्याची ध्येय गाठता येऊ शकतात.
जमीन ही गुंतवणूक होऊ शकते पण त्यासाठी एकरकमी मोठी गुंतवणूक करावी लागते व हे सर्वांना शक्य होत नाही.
आता वरील वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायातील मिळणारे रिटर्न्स व गुंतवणुकीतील रिस्क वेगवेगळी आहे.
सोनं-चांदी-प्लॅटिनम अशा धातुमध्ये वार्षिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त गुंतवणूक नसावी. शिवाय सोने चांदी बाळगणे किंवा जवळ ठेवणे आजकाल धोक्याचे झाले आहे. बँक लॉकर उपलब्ध आहेत पण त्यालाही काही चार्जेस लागतात.
बँक FD हा सध्या 6 ते 7% रिटर्न मिळणारा सर्वात जास्त सुरक्षित पर्याय आहे. पण महागाईचा दर बघता (इन्फलेशन रेट 5% पकडल्यास) मिळणारे व्याज हे महागाई दरा एवढेच आहे हे लक्षात येते,मुद्दल वाढली तरी त्याचे मुल्य तेवढेच राहते. म्हणजे समजा आज एक लाख रुपये  दामदुप्पट योजनेत गुंतवले तर सर्वसाधारण 9 ते 10 वर्षानंतर मिळणारे दोन लाख हे आजच्या एक लाखाएवढेच असतात.
PPF हा पर्यायही चांगला आहे हे खाते कुणीही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात काढू शकतो. याला 8 ते 9% च्या दरम्यान व्याज मिळते व हे व्याजदर सरकार वेळोवेळी ठरवते. या खात्यात वर्षाला 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतो ही गुंतवणूक 15 वर्ष मुदतीची असते. (नोकरी करणाऱयांसाठी PF असतो)
आता म्युच्युअल फ़ंड मध्ये गुंतवणूक ही सर्वात प्रभावी व जास्त रिटर्न्स देणारी ठरत आहे. ही गुंतवणूक एकरकमी किंवा महिन्याला करु शकतो. प्रत्येक महिन्याला अशी गुंतवणूक केल्यास त्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्वेसमेंट प्लॅन असे म्हणतात.
ज्यांना शेअरमार्केटचे ज्ञान नाही अशांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास त्या त्या फ़ंडचे फ़ंड मॅनजर योग्य त्या कंपनीत इन्वेसमेंट करतात. व याच्यावर सेबीचे नियंत्रण असते.
जर दीर्घ (15 ते 20 वर्षे) मुदतीची गुंतवणूक असेल तर सरासरी 15 ते 20% रिटर्न्स मिळू शकतात. हे 100% खात्रीशीर नसले तरी आज फक्त भांडवली बाजारातील इन्वेसमेंट फक्त एवढे रिटर्न्स देऊ शकते.
म्युच्युअल फ़ंड मध्ये वेगवेगळे प्रकार व अनेक फंड आहेत ते जाणकारांकडून समजून घेणे जरुरी आहे.
ज्यांना शेअरमार्केटचे ज्ञान आहे व ज्यांची रिस्क घेण्याची क्षमता आहे अशांनी थेट चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करणे ही सुद्धा चांगली गुंतवणूक ठरु शकते.
आज आपल्या देशाची ग्रोथ पाहता निफ्टी व सन्सेक्स याची वाटचाल निश्चित आशादायक आहे.
तर गुंतवणूक ही कधीही एका असेट म्हणजे एकाच प्रकारात असू नये, ती नेहमी डायव्हर्सिफाइड असावी. म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
गुंतवणूक करताना कधीही चितफ़ंड सारख्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू नये. अलीकडेच पर्ल्स, पॅनकार्ड क्लब, केबीसी, कल्पवृक्ष, इत्यादी कंपन्यात गुंतवणूकदार कसे फसले आहेत हे लक्षात येते. अशा कंपन्यांचे एजेंट हे नेहमी ओळखीचे असतात त्यामुळे त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या बोलण्यावर सर्वसामान्य विश्वास ठेवतात. काही वेळा एजेंट असणार्यांनाही त्या बद्दलची पूर्ण माहिती नसते.
४)कर्ज:-
आर्थिक नियोजनात कर्ज किती असावे किंवा किती काढावे हे सुद्धा महत्वाचे आहे. आजच्या घडीला मोटरसायकल, चारचाकी, tv, मोबाईल, लॅपटॉप अश्या व इतर चैनीच्या वस्तु झिरो डाऊन पेमेंट व EMI वर मिळतात. त्याच प्रमाणे फ्लॅट साठीही मोठे कर्ज मिळते. उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेण्याचे प्रमाणही जास्त आहे. एकावेळी अनेक प्रकारची कर्ज म्हणजे एका न दिसणाऱ्या संकटाला लोक आमंत्रण देतात.
*हांतरुन पाहून पाय पसरावे* ही म्हण जनमानसात रुजली ती उगाच नाही. आपल्या कुवतीपेक्षा जास्त कर्ज व EMI झाले की व्यक्ती नैराश्याने ग्रासला जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिगत आरोग्यावर व कौटूंबिक वातावरणावर पडतो. पैशाच्या येण्यापेक्षा जाणे वाढले की चीड चीड, वादावादी,भीती, नैराश्य वाढते. यातुन कुटुंबाचे स्वास्थ बिघडते. नवरा बयकोची भांडणे, बाप लेकांची भांडणे होतात. यातुन घटस्फोट, मारामाऱ्या, खुन व आत्महत्या सारखे गंभीर प्रश्न निर्माण होतात. या सर्वाचा परिणाम कुटुंबातील लहान मुलांवर होतो, त्याच्या शिक्षणावर होतो. एकूणच कुवतीपेक्षा मोठे कर्ज व्यक्तीची समाजातील पत व घरातील स्वास्थ घालवण्यासाठी कारणीभूत आहे.
कर्ज हे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या चार ते पाच पट असावे. त्या पेक्षा जास्त नसावे, अस अर्थशात्रातील तज्ञानचं मत आहे.
५)सामाजिक जबाबदारी:-
आता आर्थिक नियोजनात अजुन एक टप्पा आहे पण याकडे दुर्लक्ष होते किंवा सर्वजण याचे नियोजन करत नाहीत. तोे म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही भाग(2ते5%) खर्च आपण सामाजिक भान किंवा समाजातील दिन-दुबळ्यांसाठी, अपंग- अनाथांसाठी, सामाजिक उन्नतीसाठी करतो का? किंवा तसे नियोजन करतो का? हा प्रश्न आहे.
प्रत्येकाचा आर्थिक स्थर वेगवेगळा असतो व आहे. पण प्रत्येकाने आपल्या आर्थिक स्थरानुसार रोजचा खर्च, विमा, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, कर्ज, सामाजिक जबाबदारी इत्यादींमध्ये योग्य प्रकारे नियोजन केल्यास भविष्यातील मार्ग सुकर होऊ शकतो.
सर्वसाधारण पणे एकूण उपन्नाच्या तीस टक्के खर्च रोजच्या दैनंदिनी गरजांवर करावा, तीस टक्के भविष्यातील तरतूद म्हणून गुंतवणूक करावी, तीस टक्के आपल्या जबाबदऱ्यांवर म्हणजे मुलांचे शिक्षण, आरोग्य, लग्न इ व राहिलेला दहा टक्के खर्च आवडीच्या गोष्टींवर करावा.
जगद्गुरू संत तुकारामांनी म्हातारपणाचे त्यांच्या अभंगात अगदी यतार्थ वर्णन केले आहे....
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे |
     अंत हे काळीचे कोणी नाही ||
     जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती |
      सांडोनि पळ्ती रांडा पोरे ||
      बाईल म्हणे खरे मरता तरी बरे |
      नासिले हे घर थुंकोनिया ||
     तुका म्हणे माझी नसतील कोणी |
      तुज चक्रपाणी वाचूनिया ||
शेवटी पैसा असेल तर दुनिया विचारते, किंमत देते. आणि तो नसेल तर घरातील लोक सुद्धा किंमत देत नाहीत. व्यवस्थित आयुष्य मिळाल्यास सर्वाना म्हातारपण येणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे लक्षात ठेवल्यास म्हातारपण आनंदी जावे यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे... व अकाली बोलावणं आलं तरीही आर्थिक नियोजन गरजेचे आहे हे लक्षात ठेवल्यास कुटुंबाची आपल्या पश्चात व आपली म्हातारपणात ससेहोलपट काही प्रमाणात निश्चित कमी होईल.
आपली ही अवस्था टाळायची असेल व मरेपर्यंत मानसन्मानाणे जगायचे असेल तर आर्थिक नियोजन गरजेचे आहे....
व त्याची सुरवात आजपासूनच का नको???
ग्रामीण भागात आर्थिक नियोजनाला जास्त महत्व दिले जात नाही, तुटपुंज्या उपन्नात सर्व भागवावे लागते...प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते पण जशी आहे त्यातही नियोजन बहुदा नसते...(काही पैसेवाले गुंतवणुकीचे नियोजन करतात पण या कानाचे त्या कानाला कळू देत नाहीत)
या विषयी माझे स्वताचे अनुभव काही वाचनातील माहिती व तज्ञानचं ऐकलेली लेक्चर यातून वरील माहिती लिहली आहे...
मी आर्थिक नियोजन किंवा अर्थशास्त्र यातील तज्ञ नाही
माझी सर्व मते जशीच्या तशी योग्य नसतील पण एक प्रयत्न केला आहे... चुकीचा मुद्दे वाटल्यास त्यावर भाष्य करा..

No comments:

Post a Comment