My Blog List

Friday 15 December 2017

आजचे उत्सव अन बदलती तरुणाई...16/10/17


आजची_तरुणाई_व_उत्सवांचे_बदलते_रूप....
संदिप रामचंद्र चव्हाण.
16 ऑक्टोंबर 2017
भारत हा सर्वात तरुण देश मानला जातो. जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारताचे लोकसंख्येचे सरासरी वय कमी आहे...तरुण आहे. तरुणांचा व उत्सवांचा देश असणारणा भारत एक महाशक्ती होण्याकडे वाटचाल करतो आहे...अश्या वेळी तरुणांची जबाबदारी वाढते.
उत्सवप्रिय आपल्या देशात खूप पूर्वी पासून सण साजरे करण्याची परंपरा आहे. वर्ष्याचे बारा महिने ऋतूनुसार सणांची रचना भारतीय संस्कृतीत आहे. प्रत्येक ऋतूनुसार आहार विहार कसा असावा याचा जणू संदेश सणामध्ये लपला आहे...सर्व कुटुंबीय, पावणे रावळे, नातलग, आप्त, इष्ट मित्र, असा अवघा समाज एकत्र येऊन सण साजरे करताना त्याला उत्सवाचे स्वरूप येते..
समाजाच्या एकोप्यासाठी, माणसा माणसात मैत्रीपूर्ण नातं बनण्यासाठी असे सण उत्सव गरजेचे होते, आहेत व राहतील...
देशातील विविध राज्यांत वेगवेगळे उत्सव पाहायला मिळतात. प्रत्येक राज्याची वेगळी तऱ्हा आहे...

महाराष्ट्रात मोठ्या सण उत्सवात प्रामुख्याने दीवाळी, दसरा, भाऊबीज, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव(नवरात्री), होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा व गावोगावी भरणाऱ्या यात्रा किंवा जत्रा यांचा समावेश होतो. कालांतराने यामध्ये थर्टीफस्ट, फ्रेन्डशिप डे, वेलेंटाइन डे, साखरपुडा, लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादिंचा समावेश झाला आहे. लग्न, साखरपुडा पूर्वी होत नव्हते असे नाही पण त्याला जे सरसकट मोठ्या उत्सवाचे(?) स्वरूप आले आहे ते अलीकडेच.
या सगळ्या सण उत्सवात तरुणाईचा सहभाग, जल्लोष टिपेला असतो. प्रत्येक सण उत्सवांचा इव्हेंट करण्यात राष्ट्रीय आंतराष्ट्रीय कंपन्याना यश आले आहे...असंख्य ग्राहकांची बाजारपेठ समोर ठेऊन व सण उत्सवांचा आधार घेऊन आपल्या प्रॉडक्ट्च अस काही मार्केटिंग केलं जातं की त्याला तरुणाई भुलली नाही तर नवल.
कोठेही नजर टाकली तर कोणत्याही उत्सवातील पावित्र्य हरवत चालले आहे असं वाटतं. नववर्षाच्या सुरवातीपासून ते वर्षाअखेरपर्यंत सगळ्या उत्सवात खा-प्या, मजा करा असा प्रकार दिसतो. डॉल्बीचा कर्कश आवाजात गणपती पुढे नाचणे, गुलालाची उधळण करत रस्स्त्यावर ठाण मांडून गणपतीबरोबर पोलिसांना वेठीस धरने, शिवजयंतीच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, नवरात्रीला गरबा भरवून पैसे कमावणे, गरब्याच्या निमित्ताने मुलींशी जवळीक वाढवणे, थर्टीफस्टला दारू पिऊन रस्स्त्यावर धिंगाणा घालणे, नववर्षाला, दिवाळीला फटाके वाजवून प्रदूषण करणे, फ्रेंडशिपडेला, व्हॅलंटाइनडेला कॉलेजमध्ये धिंगाणा घालणे, गावच्या जत्रेला दारूचा पूर येणे, लग्नासरख्या आयुष्यातील महत्वाच्या कार्यात पैशाचा चुराडा करुन नवीन जीवनाची सुरवात करणे, वाढदिवस म्हणजे जेवणावळी असा काहीसा अर्थ लावणे...असा सगळ्या उत्सवांचा विचका होत आहे... याला काही अपवाद जरूर आहेत पण साधी राहणी उच्च विसारसरणी हे पुस्तकात राहिलं आहे.... कोण कुणाच ऐकत नाही....कुणाबद्दल आदर नाही...बापाला म्हातारं, शिक्षकांना येडपट, मुलींना आयटम म्हणणारे तरुण कॉलेजच्या कट्ट्यावर व गल्लीतल्या वटट्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतात. कोणताही कार्यक्रम, उपक्रम, सण, उत्सव शांततापूर्ण, आनंदी, प्रसन्न वातावरणात होऊ शकतो...त्यासाठी तरुणाईची साथ हवी.
आता दिवाळी सण अगदी सुरवात होण्याची वेळ आली असताना, फटाक्यांच्या वापरावर वाद होऊ लागला आहे. खरे फटाके फुटण्याआगोदर वादाचे फटाके सोशलमीडियावरून फुटू लागले आहेत. दिवाळी ही फक्त फटाक्यांचा सण अस काहीतरी वातावरण तयार होऊ लागले असताना...दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. ही गोष्ट तरुण विसरत आहेत. 

दिवाळी सण प्रकाशाचा, आनंदाचा, चैतन्याचा, स्वछतेचा, मांगल्याचा, एकोप्याचा, प्रेमाचा पण त्याचे रूपांतर फटाक्यांचा व फक्त आवश्यक अनावश्यक वस्तू खरेदीचा सण अस होत असेल तर ते खऱ्या अर्थाने भारतीय सणाचं विद्रुपिकरणच म्हणावं लागेल.
ग्रामसंस्कृतीशी नातं सांगणारे सण, त्याला मार्केटिंग कंपन्यांनी पैसेवाल्यांचे इव्हेंट बनवले आहेत. वर्षभर मिळणारी मिठाई, बाराही महिने चोवीस तास कोणत्याही वस्तू, कपडे लत्ता, हव्या त्या गोष्टी खरेदीची असणारी व्यवस्था व उपलब्ध पैसा त्यामुळे दिवाळीतील फराळाची गोडी व वर्षातून एकदा घेतली जाणारी कपडे याचं आकर्षण व महत्व हरवून गेले आहे...
उन्हाळ्यात अंगमेहनत करून खरिपासाठी शेती मशागत केली जाते. पावसाळ्यात शेतशिवार फुलतो, पिके मोठी होतात, बहरतात. बहुतांशी खरीप पिकं दिवाळीच्या आधी निघतात..धन धान्याच्या रुपात लक्ष्मी घरात येते. ते विकून चार पैसे शेतकर्याच्या गाठीला येतात. पुढील वर्षभर पुन्हा कष्ट करण्याची ताकत येण्यासाठी गोडधोड स्निग्ध पदार्थ केले जात. मुलांना, घरातील लक्ष्मीला नवीन कपडे खरेदी केली जात...लक्ष्मी पूजनाला घरातील झाडू (साळूता) पूजन करुन... जेथे स्वच्छता, आरोग्य तेथे लक्ष्मी वास करते असा संदेश पूर्वापार अशिक्षित लोक देत. पण याचे गांबिर्य संपले आहे..घराची साफसफाई बरोबर मनामनांची साफसफाई करणारा दिवाळी सण व इतर उत्सव त्यांचे बदलते स्वरूप व तरुणांचा त्यातील सहभाग यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
आधी फुकट व आता अनलिमिटेड इंटरनेट मुळे तरुण सामाजिक प्रश्नांना समजून न घेता फोर्वोरडेड खेळ खेळत आहेत.... जेवढाकाही मोकळा वेळ मिळेल तो मोबाईल मध्ये वाया चालला आहे... वाचन, लेखन, खेळ, व्यायाम, समस्यांना, प्रश्नांना भिडणे कमी होऊन, नैराश्याच्या गर्तेत तरुण अडकत आहे... खोट्या प्रतिष्ठेपाई कर्जबाजारी होऊन व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत....काही तरुण आत्महत्तेसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत... समजून घेतले तर सणउत्सव त्यांना उभारी देऊ शकतात...
अशी सगळीकडे नकारात्मक परिस्थिती असताना, काही प्रमाणात आजची तरुण पिढी सणउत्सवांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत...सोशीलमीडियाची मदत कुटुंब जोडण्यात घेतली जात आहे...जुन्या मित्रांचे, पाहुण्यांचे ग्रुप बनत आहेत...एकमेकांना उपयोगी पडत आहेत...कुणासाठी चार पैसे खर्चायला मागेपुढे पहात नाहीत...तरुणांनी ग्रामस्वच्छता, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, पारंपरिक उपक्रम, रक्तदान, अवयवदान, आधुनिक शेती, स्वयंरोजगार, यामध्ये मोलाचे काम चालू केले आहे. सनउत्सवांचे औचित्य साधून काही तरुण, तरुणांचे ग्रुप, संघटना आपल्या वाट्याला आलेला आंनद समाजातील दुर्लक्षित, अनाथ, अपंग यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्सवातील भपका टाळून वाचलेला पैसा दिन दुबळ्यांच्या कल्यानासाठी खर्च करत आहेत... त्याचबरोबर सोशलमीडियावरून व्यक्त होत आहेत... कोण सोबतीला असो अथवा नसो हा अवघड मार्ग चालण्याचा प्रयत्न करत आहेत.... त्यांच्या या वाटचालीतील यशातच उत्सवांचा उत्सव होईल यात शंका नाही...गरज आहे तरुणाईने उत्सव समजून घेण्याची.
ही_दिवाळी_सर्वांच्या_आयुष्यात_आनंदाचा_सुखाचा_ समृद्धीचा_प्रकाश_घेऊन_येवो...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment